सोमवार, ३१ मार्च, २०२५

मुंबईकरांसाठी उन्नत मार्गावरील निसर्ग भ्रमंती

मुंबईकरांसाठी मलबार हिल येथे उन्नत मार्गावर निसर्ग भ्रमंती मुंबई, दि. ३१ मार्च निसर्गाच्या कुशीत भ्रमंती करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने निसर्ग उन्नत मार्ग उपलब्ध करून दिला आहे. कमला नेहरू उद्यान व फिरोजशहा मेहता उद्यान येथे घनदाट झाडांमधून मुंबईकरांना आता भ्रमंती करता येणार आहे. दररोज पहाटे ५ ते रात्री ९ या वेळेत हा उन्नत मार्ग सुरू राहणार असून भारतीय व परदेशी नागरिकांना यासाठी अनुक्रमे २५ आणि १०० रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. बृहन्मुंबई महापालिका जल अभियंता विभागातर्फे हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.‌ येथे भेट देण्यासाठी https://naturetrail.mcgm.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन तिकीट काढता येणार आहे. या मार्गावर भ्रमंती करण्यासाठी एका वेळी फक्त २०० जणांना चार प्रवेश देण्यात येणार आहे. या उन्नत मार्गावर भ्रमंती करताना १०० हून अधिक झाडांसह वेगवेगळे पक्षीही पाहता येणार आहेत.
उन्नत मार्गावरील निसर्ग भ्रमंती

रविवार, ३० मार्च, २०२५

सामूहिक हनुमान चालीसा पठण

हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी देशभरात सामूहिक हनुमान चालीसा पठण - मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात एक हजारांहून अधिक हिंदूंचा सहभाग ठाणे, दि. ३० मार्च हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी सनातन संस्थेतर्फे शनिवारी संपूर्ण देशभरात सामूहिक श्री हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात होता. या निमित्ताने ठिकठिकाणच्या श्री हनुमान, श्रीराम मंदिरात झालेल्या कार्यक्रमात २० हजारांहून भाविक,साधक, हिंदुत्ववादी सहभागी झाले होते. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील कार्हयक्रमात एक हजारांहून अधिक हिंदू नागरिक सहभागी झाले.ठाणे येथील पितांबरी उद्योगसमूहातील कर्मचाऱ्यांनीईह सामूहिक हनुमानचालिसा पठण केले.

शनिवार, २९ मार्च, २०२५

स्वयंसेवक,प्रचारक,मुख्यमंत्री ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची संघ मुख्यालयाला भेट!

स्वयंसेवक,प्रचारक,मुख्यमंत्री ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची संघ मुख्यालयाला भेट! - 'तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना' असेच संघ आणि भाजपचे नाते शेखर जोशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांचे नेते, पदाधिकारी यांनी वेळोवेळी एकमेकांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष टीका केली तरी रा.स्व. संघ आणि भाजप यांचे नाते अतूट आहे. 'तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना'अशी दोघांची अवस्था असून वेळप्रसंगी मी मारल्यासारखे करतो तू पडल्यासारखे कर, असे प्रसार माध्यमांना दाखविण्यासाठी केले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची पितृसंघटना असून भाजपप्रमाणे अन्य अनेक संघटना रा.स्व.‌संघाच्या मुशीतूनच तयार झाल्या आहेत. त्यामुळे या सर्वांचेच एकमेकांशी आतून घट्ट ऋणानुबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपूर दौऱ्यावर येत असून ते रा. स्व. संघ मुख्यालयाला, संघाचे संस्थापक, संस्थापक सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत. माधव नेत्रालय, संशोधन केंद्राच्या नवीन व अत्याधुनिक इमारतीचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते होणार आहे.‌ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आणि मोदी यांची संघ मुख्यालय रेशीम बागेची भेट त्यासाठीही महत्त्वाची मानण्यात येत आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी २०१२ मध्ये संघाचे माजी सरसंघचालक सुदर्शन यांच्या अंत्यदर्शनासाठी संघ मुख्यालयात आले होते. त्याआधी संघाचे प्रचारक म्हणून मोदी यांचे संघ मुख्यालयात येणे झालेही असेल. मात्र पंतप्रधान या नात्याने मोदींची संघ मुख्यालयाला ही पहिलीच भेट आहे. याआधी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली होती पण तेव्हा ते पंतप्रधान पदावर नव्हते. संघ मुख्यालयाला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाले. मात्र इतक्या वर्षांनंतर ते नागपुरात संघ मुख्यालयाला भेट देण्यासाठी येत आहेत. राम मंदिर भुमिपूजन, राम मंदिर उदघाटन आणि अन्य एक दोन प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ‌. मोहन भागवत व पंतप्रधान मोदी एका व्यासपीठावर एकत्र आले. पण संघ मुख्यालयाला मोदी यांची पंतप्रधान झाल्यानंतरची ही पहिलीच भेट आहे‌ आणि म्हणूनच संघ, भाजपसह प्रसार व समाज माध्यमातूनही या भेटीबद्दल औत्सुक्य आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काही मतभेद आहेत, मोदी आता संघाला डोईजड होऊ लागले आहेत, मोदी संघाच्या नेत्यांचे ऐकत नाहीत, स्वतःला पाहिजे तेच करतात याची आणि सरसंघचालक भागवत यांनी केलेल्या काही वक्तव्यांची चर्चा होत असते. सरसंघचालक भागवत यांची ही वक्तव्ये म्हणजे अप्रत्यक्षपणे मोदी यांच्यावर केलेली टीका आहे, त्यांनी मोदींचे कान टोचले, असेही बोलले जाते. अर्थात संघ आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून वेळोवेळी अशी विधाने केली जातात ती अगदी ठरवून केली जातात. खरे तर आपल्या वक्तव्याचे समाज माध्यमातून, प्रसार माध्यमातून काय परिणाम होतात, विरोधकांसह संघ स्वयंसेवक, भाजप कार्यकर्ते, पाठिराखे, हितचिंतक ही मंडळी त्यावर काय प्रतिक्रिया देतात? याची ती चाचपणी असते. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आता भाजपला रा. स्व. संघाची गरज नाही, भाजप सक्षम झाला असल्याचे विधान एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केले होते. २०१४ आणि २०१९ च्या तुलनेत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला. स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नाही. नाराज झालेल्या संघाने मनापासून निवडणुकीत भाजपसाठी काम केले नाही, पण हातातून सत्ता जाणार नाही, इतपत संघाने भूमिका बजावत भाजपसाठी काम केले, अशी चर्चा तेव्हा केली गेली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही भाजपने मार खाल्ला. खरे तर संघाने न बोलता भाजपला दिलेला हा जोरदार झटका होता. पण विधानसभा निवडणुकीत संघाने भूमिका बदलली. आपली संपूर्ण ताकद वेगवेगळ्या माध्यमातून विशेषकरून भाजप आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या पाठीशी उभी केली.संघप्रणित संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात सजग रहो अभियान राबविण्यात आले. नुकत्याच झालेल्या नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीतही पडद्याआड संघ भाजपसाठी सक्रियच राहिला. त्याचे परिणाम दिसून आले. खरे तर नगरसेवक ते खासदार पर्यंतच्या निवडणुकीत संघ, संघाचे कार्यकर्ते आणि संघप्रणित संस्थां, संघटना निस्वार्थीपणे काम, प्रचार करतात म्हणूनच भाजपचे उमेदवार निवडून येतात, हे सत्य नाकारून चालणार नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची काही विधाने अप्रत्यक्षपणे मोदींची कानउघाडणी करण्यासाठीच होती. काही जण स्वतःला देवाचा अवतार समजायला लागले आहेत, प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याची आणि नवीन वाद उकरून काढण्याची गरज नाही, देशात शांतता आवश्यक असून देशातील मणिपूर राज्य गेल्या एक वर्षापासून अशांत आहे, तिथे हिंसाचार थांबविण्याला सरकारने प्राधान्य दिले पाहिजे, जो मर्यादेचे पालन करतो त्याच्यात अहंकार नसतो आणि अहंकार नसलेल्या व्यक्तिलाच सेवक म्हणवून घेण्याचा अधिकार आहे, अशा आशयाची वक्तव्ये संघाचे विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केली होती‌. यामुळे भाजप व मोदी आणि रा.स्व. संघ यांच्यातील संबंध ताणले गेल्याचे बोलले जात होते. मात्र एका घरात राहणाऱ्यांचे भांड्याला भांडे लागते असाच तो प्रकार होता. अलिकडेच नवी दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जाहीर कौतुक केले होते. महाराष्ट्रात मराठी भाषिकाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. संघ आता वटवृक्ष झाला असून तो शब्तादी साजरी करतो आहे. माझ्यासह लाखो लोकांना संघाने देशासाठी जगण्याची प्रेरणा दिली, असे मोदी म्हणाले होते. विरोधात असलेले किंवा एकाच विचारसरणीचे दोन महत्त्वाचे राजकीय नेते जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा कोणी कितीही व काहीही सांगितले तरी त्या भेटीत हवा पाण्याच्या गप्पा नक्कीच होत नाहीत. त्यामुळे मोदींची संघ मुख्यालय, डॉ. हेडगेवार स्मृतीस्थळाला भेट हे वरवरचे आणि दाखवण्यासाठीचे निमित्त असू शकते. या धावत्या भेटीप्रसंगी किंवा नंतरच्या गुप्त बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते आणि मोदी यांच्यात भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड हा महत्त्वाचा मुद्दा असू शकतो. मोदींच्या पंचाहत्तरीनंतर त्यांचा पर्याय कोण? की २०२९ मध्येही अपवाद म्हणून पुन्हा मोदीच, वक्फ बोर्ड, भाजपने थेट हिंदुत्व स्विकारावे का, भाजपची मुस्लिमांबाबतची भूमिका अशा काही विषयांवररही चर्चा होणारच नाही, असे म्हणता येणार नाही‌.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना बाजूला करून नरेंद्र मोदी यांचे नाव रा.स्व. संघाने पुढे केले होते. आता भविष्यात मोदींचा पर्याय म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अन्य कोणाचे नाव पुढे करणार का? आपला पितृ संघटनेचा अधिकार बजावून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोदी व भाजपला काही गोष्टी सुनावणार का? की संघाचे वर्चस्व न मानता मोदी माझेच काय ते खरे करणार? या प्रश्नांची उत्तरे येणारा काळ देईलच. पण तोपर्यंत मोदींच्या संघ मुख्यालय भेटीचे कवित्व मात्र कायम राहील हे नक्की.
शेखर जोशी २९ मार्च २०२५

उघड्यावर कचरा जाळला तर मुंबईत एक हजार रुपये दंड

उघड्यावर कचरा जाळला तर मुंबईत एक हजार रुपये दंड उघड्यावर कचरा जाळला तर त्यामुळे होणारे वायू आणि पर्यावरण प्रदूषण तसेच आरोग्याच्या निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या विचारात घेऊन बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने आता उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना जबर दंड आकारणी करण्याचे ठरवले आहे बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात उघड्यावर कचरा जाळला तर आता एक हजार रुपये दंड आकारला जाणार असून येत्या एक एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. बृहन्मुंबई आणि उपनगरात अनेक ठिकाणी उघड्यावर कचरा जाळण्यात येतो यातून विषाणू वायू तयार होऊन हवेची गुणवत्ता खराब होत आहे तसेच नागरिकांमध्ये शासनाचे आजारही वाढत आहेत. आतापर्यंत उघड्यावर कचरा जाळताना कोणी दिसून आलं तर महापालिकेच्या स्वच्छता उपविधीनुसार फक्त शंभर रुपये इतकाच दंड आकारला जात होता तंडाची रक्कम कमी असल्यामुळे नागरिकांमध्ये याविषयी गांभीर्य नसल्याचं आढळून आलं त्यामुळे आता उघड्यावर कचरा जळताना कोणी आढळल्यास त्या व्यक्तीला एक हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने घेतला आहे.
(छायाचित्र गुगल फोटोवरुन साभार) उघड्यावर कचरा जाण्याचे प्रकार रोखण्यासाठी महापालिकेच्या प्रभाग स्तरावर पथके तयार करण्यात आली आहेत. नोव्हेंबर २३ ते फेब्रुवारी २५ या कालावधीत कचरा जाळल्याच्या ५३१ तक्रारी महापालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. उघड्यावर कचरा जाळण्याबाबत तक्रार करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई या हेल्पलाइन अंतर्गत 81696-81697 हा हेल्पलाइन क्रमांक दिला आहे.

शुक्रवार, २८ मार्च, २०२५

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी आता दरमहा ५० हजार रुपये मिळणार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी आता दरमहा ५० हजार रुपये मिळणार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश मुंबई, दि. २८ मार्च मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरासाठी दरमहा ५० हजार रुपये निधी वाढवून देण्यात यावा. आणि त्यासाठी तत्काळ लेखी प्रस्ताव सादर करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी महसूल विभागाच्या सचिवांना दिले. तसेच शासनाची मदत सुरू होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वैयक्तिक ५० हजार रुपयांची मदत केली.‌ क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीसाठी लाखो रुपये खर्च होत असतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी तुटपुंजे अर्थसाहाय्य हा अन्याय आहे, या भूमिकेतून हिंदू जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.‌ त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महसूल विभागाच्या सचिवांना दूरध्वनी करून मंदिरासाठी दरमहा २५० रुपयांऐवजी ५० हजार रुपये देण्याचे स्पष्ट आदेश दिले.
केंद्रातील तत्कालिन काँग्रेस सरकारच्या काळात २०१२ पासून क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीसाठी निधी देण्यास सुरुवात झाली. नोव्हेंबर २०२३ पर्यंत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी ६.५० लाख रुपयांहून अधिक निधी खर्च केला. औरंगजेब हा एक क्रूर आक्रमक होता. त्याने छत्रपती संभाजी महाराजांवर अमानुषपणे निर्घृण हत्या केली. त्याच्या कबरीच्या देखभालीसाठी निधी खर्च करणे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारे आहे. त्यामुळे हा निधी सरकारने बंद करावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली.‌ छत्रपती राजाराम महाराजांनी स्वत: मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर बांधलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे हे एकमेव आणि प्राचीन मंदिर आहे. येथे लाखो शिवप्रेमी आणि पर्यटक भेट देतात. किल्ल्यावर बोटीने यावे लागते. त्यामुळे येणार्‍या पर्यटकांची योग्य सोय करणे आवश्यक आहे. किल्ला मोठा असल्यामुळे झाडी-झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. त्या हटवून किल्ल्याचे सुशोभीकरण करणे, परिसरात सुंदर बगीचा, पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, प्रसाधनगृह आणि गोड्या पाण्याच्या विहिरीचे सुशोभीकरण करावे, इत्यादी मागण्या उपमुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या वेळी समितीचे सतीश सोनार, रवि नलावडे, नांदेड येथील शिवसेनेचे आमदार आनंद बोंडारकर उपस्थित होते.

डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग

डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. जम्मू काश्मीर भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरळीत व सुरक्षित शिक्षण घेता यावे आणि भारतातील इतर भागांशी या विद्यार्थ्यांची सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने डोंबिवलीतील हम चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था गेली आठ वर्षे जम्मू काश्मीरमध्ये काम करत आहे.'जोडो काश्मीर'हे संस्थेचे ध्येय आहे.
डोंबिवलीतील यंदाच्या नववर्ष शोभायात्रेत सेवाभारती संचालित जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थी वसतिगृहातील ३१ विद्यार्थी आणि 'सेवाभारती'चे काही पदाधिकारी चित्ररथासह सहभागी होणार आहेत.‌ डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थान आयोजित या नववर्ष स्वागत यात्रेत हम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमधील विद्यार्थी करोना काळ वगळता गेली काही वर्षे सातत्याने सहभागी होत आहेत.‌
(संग्रहित छायाचित्र) जम्मू आणि कटरा येथील या विद्यार्थ्यांचा डोंबिवलीत पाच दिवसांचा मुक्काम असून हे विद्यार्थी सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत डोंबिवलीत वेगवेगळ्या कुटुंबात एक दिवस राहणार आहेत. तसेच या दौऱ्यात सर्व विद्यार्थी डोंबिवलीतील टिळकनगर विद्या मंदिर, पै फ्रेंड्स लायब्ररी, हेरंब म्युझिक अकादमीला तसेच मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्र तसेच अन्य काही महत्त्वाच्या ठिकाणीही भेट देणार आहेत.‌ दरम्यान हम चॅरिटेबल ट्रस्टच्या जम्मू काश्मीर येथील शिक्षण क्षेत्रातील कामाची माहिती डोंबिवलीकर नागरिकांना व्हावी यासाठी ३१ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात हम संस्थेच्या कार्याची माहिती तसेच जम्मू व कटरा येथून डोंबिवलीत आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद, या विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.‌ हा कार्यक्रम सर्वेश सभागृह, दुसरा मजला, डोंबिवली पूर्व येथे होणार असून डोंबिवलीकर नागरिक, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हम चॅरिटेबल ट्रस्टने केले आहे. शेखर जोशी २८ मार्च २०२५

भारतीय किसान संघाचे 'भाकरी ठेचा' खाऊन निषेध आंदोलन!

भारतीय किसान संघाचे 'भाकरी ठेचा' खाऊन निषेध आंदोलन! अहिल्यानगर, दि. २८ मार्च शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय किसान संघाने राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारने शेतीमालाची हमीभावाने खरेदी न केल्याने किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी अहिल्या नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात भाकरी व ठेचा खाऊन निषेधात्मक आंदोलन केले. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना निवेदन सादर करण्यात आले.‌ शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याने गोडधोड खाण्याऐवजी त्याला भाकरी -ठेचा खावा लागत आहे. याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी भारतीय किसान संघाचे अहिल्यानगर शाखेचे अध्यक्ष दिलीप गोंदकर, जिल्हा मंत्री निलेश चिपाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने आपल्या सरकारला पाठिंबा दिला. निवडणुकीच्या वेळी कर्जमुक्ती तसेच सोयाबीन, तूर, हरभरा, कापूस यांची हमीभावाने खरेदी केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या गेल्या नाहीत, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.‌ मध्यप्रदेशात सोयाबीनसाठी बोनससह ४५० रुपयांनी तर तेलंगणात ९० टक्के कापूस खरेदी करण्यात आला. कर्नाटकात तुरीसाठी ५० रुपये बोनस अधिक एमएसपी मिळून ८ हजार रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी झाली आहे. गुढीपाडवा हा नव्या कृषीवर्षाचा प्रारंभ आहे. या दिवशी शेतकऱ्यांची पुरणपोळी खाण्याची परंपरा असते. मात्र, यंदा शेतकरी आर्थिक संकटात अडकले असल्याने त्यांना गोडधोड नव्हे तर भाकरी ठेचा खावा लागणार आहे, याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

गुरुवार, २७ मार्च, २०२५

नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यात कामगार साहित्याचा जागर होणार

नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यात कामगार साहित्याचा जागर होणार - सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा मुंबई, दि. २७ मार्च पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून कवीवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे नारायण सुर्वे यांच्या साहित्य संपदेवर आधारित कार्यक्रमाची निर्मिती तसेच राज्यात विविध ठिकाणी कामगार साहित्याचा जागर केला जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी गुरुवारी येथे केली.
प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या 'मराठी आठव दिवस' चा तृतीय वर्धापन दिन आणि सुर्वे साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात ॲड. शेलार बोलत होते. कामगार साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या एका साहित्यिकाला माझ्याकडून ५० हजार रुपयांचा पुरस्कार 'मराठी आठव दिवस' च्या नारायण सुर्वे वार्षिक साहित्य संमेलनात पुढील वर्षापासून दिला जाईल, अशी घोषणाहीम्हणाले. ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिवसभर झालेल्या सुर्वे साहित्य संमेलनात सर्वश्री भाऊ कोरगावकर, डॉ. महेश केळुसकर, अशोक नायगावकर या 'मराठी आठव दिवस' च्या सुरुवातीपासूनच्या पाठीराख्यांना कृतज्ञता सन्मानाने सन्मानित करण्यात आले. तसेच प्रदीप आवटे, योगिता राजकर, मधुकर मातोंडकर, सुनील उबाळे, सुजाता राऊत, सफरअली इसफ या नवोदित साहित्यिकांना 'जाहीरनामा पुरस्कार' देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. दर महिन्याच्या २७ तारखेला ' मराठी आठव दिवस' कार्यक्रम करण्यासाठी राज्यभरातून अनेक मराठी दानशूर व्यक्ती उत्स्फूर्तपणे पुढे येत असल्याबद्दल संस्थापक रजनीश राणे यांनी समाधान व्यक्त केले.

फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण!

 

गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त
यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक

फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण!

- शैलेंद्र रिसबुड, प्रल्हाद परशुराम म्हात्रे यांचा संयुक्त उपक्रम 

शेखर जोशी 

डोंबिवली, दि. २७ मार्च 

गेल्या काही वर्षांपासून सर्वपक्षीय राजकारण्यांनी सण, उत्सव, वाढदिवसाच्या निमित्ताने 'चेहरे फलक' लावून शहर विद्रुप करण्यात मोठा हातभार लावला आहे. त्यामुळे फलक/बॅनर दिसले की सर्वसामान्य व सुजाण नागरिकांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. या पाश्र्वभूमीवर लोकमान्य टिळकप्रेमी व त्यांच्या चरित्राचे अभ्यासक शैलेंद्र रिसबूड आणि सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते प्रल्हाद परशुराम म्हात्रे यांनी गेल्या सात वर्षांपासून राबविलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. 

भारतीय असंतोषाचे जनक आणि स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे कार्य/विचार मोठ्या फलकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. या निमित्ताने लोकमान्य टिळकांचे स्मरणही केले जात आहे. विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे या फलकावर फक्त आणि फक्त लोकमान्य टिळक यांचेच छायाचित्र प्रदर्शित केले जाते. रिसबूड आणि म्हात्रे यांची छायाचित्रे या फलकावर नसतात. तसेच रस्ता किंवा चौकांचे नामफलक न झाकता हा फलक उभारण्यात येत आहे. आणि या दोघांनीही ही गोष्ट आजवर कटाक्षाने जपली आहे. संयोजक शैलेंद्र रिसबुड व सौजन्य प्रल्हाद परशुराम म्हात्रे अशी एक ओळ या फलकाच्या खाली लिहिण्यात येते. 

लोकमान्य टिळक यांच्या शताब्दी पुण्यस्मरणाच्या निमित्ताने लावण्यात आलेला फलक 

मध्य रेल्वेवरील कोपर रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागातील मोकळ्या जागेत हा फलक लावण्यात येतो. लोकमान्य टिळक यांची जयंती, पुण्यतिथी, गीता रहस्य ग्रंथ जयंती ( लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला हा एकमेव ग्रंथ आहे की या ग्रंथाचा जयंती उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी येत्या ३० मार्च रोजी गीतारहस्य जयंती असून त्या निमित्ताने कोपर रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात हा फलक उभारण्यात आला आहे.

लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या 'केसरी'चा वर्धापनदिन


लोकमान्य टिळक यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवावेत आणि त्यांचे अशा प्रकारे स्मरण करावे, ही मूळ संकल्पना रिसबूड यांची. ही कल्पना म्हात्रे यांच्या समोर मांडल्यानंतर त्यांना आवडली आणि त्यांनी रिसबूड यांना पाठिंबा दिला. जागा आणि फलक यासाठी येणा-या खर्चाचा सर्व आर्थिक जबाबदारी म्हात्रे यांनी सांभाळली आहे. 

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने लावण्यात आलेला फलक 

कल्याण, कर्जत आणि कसा-याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कल्याणच्या दिशेने येताना अप आणि डाऊन मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांचे विचार पोहोचविण्यात येत आहेत. 

शेखर जोशी 

२७ मार्च २०२५


नेपाळ येथील जागतिक युवा महोत्सवात डोंबिवलीचे मिहिर देसाई विशेष निमंत्रित

 

नेपाळ येथील जागतिक युवा महोत्सवात

डोंबिवलीचे मिहिर देसाई विशेष निमंत्रित 

- तीन वर्षांपासून भरडधान्य प्रक्रिया उद्योगात कार्यरत

- ७५ हून अधिक देशांतील युवा नवउद्योजकांचा सहभाग

नेपाळ येथे २७ ते ३१ मार्च या कालावधीत होणाऱ्या

जागतिक युवा महोत्सवासाठी सहभागी नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष अतिथी म्हणून डोंबिवलीतील नवउद्योजक (नवउद्यमी-स्टार्टअप) मिहिर मुकुंद देसाई यांना निमंत्रित करण्यात आले आहे. देसाई गेल्या तीन वर्षांपासून भरडधान्य प्रक्रिया उद्योग व्यवसायात काम करत आहेत. 

नेपाळमधील कावरेपल्लानचोक येथे होणाऱ्या जागतिक युवा महोत्सवासाठी ७५ हून अधिक देशांतील प्रतिभाशाली युवा नवउद्योजक, नवउद्यमी (स्टार्टअप), युवा संशोधक, विद्यार्थी, कलाकार, युवा मार्गदर्शक सहभागी होणार आहेत.

या जागतिक युवा महोत्सवातील ‘कृषी आणि अन्न सुरक्षा’ विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी जागतिक युवा परिषदेचे अध्यक्ष आणि जिल्हा समन्वयक समितीचे प्रमुख दीपक कुमार गौतम यांनी मिहिर देसाई यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे

देसाई आठ वर्षापूर्वी रशियातील सोची येथे पार पडलेल्या जागतिक युवा आणि विद्यार्थी महोत्सवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भारताचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते.

मिहिर देसाई भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले देसाई भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद उर्फ भाई देसाई यांचे चिरंजीव आहेत.

बुधवार, २६ मार्च, २०२५

'आपले सरकार सेवा केंद्रां'ची संख्या वाढवणार

आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार

- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा*

मुंबई, दि. २६ मार्च 

राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ रितीने उपलब्ध करून देण्यासाठी 'आपले सरकार सेवा केंद्रे' यांचे जाळे विस्तारीत करण्यात येणार असून सेवा केंद्राची संख्या वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सुधारित निर्णयानुसार, लोकसंख्या आणि प्रशासनाच्या गरजेनुसार सेवा केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. सुधारित निकषानुसार ग्रामपंचायत स्तरावर ५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी १ ऐवजी २ सेवा केंद्रे तर पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी २ ऐवजी ४ सेवा केंद्रे देण्यात देणार आहेत.  बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात १२ हजार ५०० लोकसंख्येसाठी २ केंद्रे तर इतर महापालिका व नगरपरिषद क्षेत्रांमध्ये दहा हजार लोकसंख्येसाठी एक ऐवजी दोन सेवा केंद्रे देण्यात येणार असल्याचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी जाहीर केले. 

सध्या आपले सरकार सेवा केंद्रांवरील सेवा शुल्क २० रुपये असून २००८ पासून या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती. वाढती महागाई आणि सेवा केंद्र चालकांच्या मागणीच्या अनुषंगाने सेवा शुल्क आता ५० रुपये करण्यात येणार आहेत.‌ नागरिकांना अधिक सुलभ सेवा मिळण्यासाठी घरपोच वितरण सेवाही सुरू करण्यात येणार आहे. घरपोच भेटीसाठी सेवा शुल्क १००रुपये प्रति नोंदणी (कर वगळून), महाआयटी सेवा दर २० टक्के, सेवा केंद्र चालक सेवा दर ८० टक्के, याशिवाय प्रति अर्ज अतिरिक्त शुल्क ५० रुपये असणार आहे.

श्री विठ्ठल रुख्माई संस्थान रेवसाची जमीन पुन्हा देवस्थानच्या नावावर होणार

श्री विठ्ठल रुख्माई संस्थान रेवसाची जमीन 

पुन्हा देवस्थानच्या नावावर होणार

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पुढाकाराने मिळाला ऐतिहासिक विजय 

श्री विठ्ठल रुख्माई संस्थान, रेवसा (ता. जि. अमरावती) यांच्या मालकीची तब्बल ३० कोटी रुपयांची शेतजमीन अखेर देवस्थानच्या नावावर पुन्हा नोंदवली जाणार आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे झालेल्या पत्रकार परिषदेत मंदिर महासंघाचे राज्य पदाधिकारी अनुप प्रमोद जयस्वाल यांनी ही माहिती दिली. 

महासंघाचे जिल्हा संयोजक विनीत पाखोडे, हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक निलेश टवलारे, अधिवक्ता अभिजीत बजाज संस्थानचे विश्वस्त राजेंद्र वाकोडे, हरीभाऊ वाकोडे, हरिदास मानवटकर, समितीचे सचिन वैद्य उपस्थित होते. 

मौजा रेवसा येथील गट क्र. १६५, क्षेत्रफळ ३ हेक्टर ६९ आर ही शेतजमीन श्री विठ्ठल रुख्माई संस्थानच्या मालकीची आहे. मात्र, ही जमीन हडप करण्याच्या उद्देशाने प्रदीप त्र्यंबकराव वाकोडे व प्रवीण त्र्यंबकराव वाकोडे यांनी तत्कालीन तहसीलदार संतोष काकडे यांच्यासमोर जमिनीच्या ७/१३ उताऱ्यावरील संस्थानचे नाव कमी करून स्वतःच्या नावावर नोंद करण्यासाठी अर्ज सादर केला. 

९ मे २०२२ रोजी तहसीलदार काकडे यांनी महसूल कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करून ७/१२ उताऱ्यातून संस्थानचे नाव कमी केले आणि वाकोडे बंधूंच्या नावावर बेकायदेशीर नोंद केली. या निर्णयाविरोधात राजेंद्र पद्माकर वाकोडे यांनी उपविभागीय अधिकारी अमरावती यांच्यासमोर अपील दाखल केले. अपील प्रकरणात वाकोडे बंधू आणि महसूल कर्मचाऱ्यांचे संगनमत उघड झाले.‌

तहसिलदार काकडे यांनी पारीत केलेला आदेश हा आर्थिक लाभ घेण्याच्या दृष्टीनेच करुन घेतल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचा निष्कर्ष भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी रिचर्ड यंथन यांनी नोंदविला आणि १ ऑगस्ट २०२३ रोजी तहसीलदार काकडे यांचा आदेश रद्द केला. उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशावरील अपिल प्रकरणात अतिरिक्त जिल्हाधिकारी अमरावती यांनी प्रकरणाचा अधिक सखोल तपास करून पुन्हा सुनावणीचे आदेश दिले असल्याचे या वेळी सांगण्यात आले.‌ 

मंदिर महासंघाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देवस्थानच्या हितासाठी तहसीलदारांना निवेदन दिले. या पाठपुराव्याला यश मिळाले आणि तहसीलदार विजय लोखंडे यांनी २० मार्च २०१५ संस्थानच्या बाजूने अंतिम निर्णय दिला.


मंगळवार, २५ मार्च, २०२५

नवाजुद्दीन सिद्दीकी व ‘बिग कॅश’वर कारवाई होणार

नवाजुद्दीन सिद्दीकी व ‘बिग कॅश’वर कारवाई होणार

- पोलिसांच्या गणवेशाचा अवमान करणारी जाहिरात हटवली

मुंबई, दि. २५ मार्च

हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांच्या गणवेशात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकींना दाखवणारी आणि जनतेला जुगार खेळण्यास प्रवृत्त करणारी वादग्रस्त ‘बिग कॅश पोकर’ जाहिरात सोशल मीडियावरून अखेर हटविण्यात आली आहे. मात्र दोषींवर कारवाई अद्याप झालेली नाही. 

जाहिरात हटवण्यात आली असली, तरी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ‘बिग कॅश’चे मालक अंकुर सिंग यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. सुराज्य अभियानाने या प्रकरणात वेळोवेळी फेसबुक, यू-ट्यूब आणि ट्विटर (X) यांच्या तक्रार निवारण अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या होत्या; परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. अखेरीस तक्रार अपील समिती (GAC) कडे तक्रार केली आणि त्यानंतरच ही जाहिरात हटवण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्ता अमिता सचदेवा यांच्या कायदेशीर हस्तक्षेपामुळे हे यश मिळाले आहे. 

सुराज्य अभियानाच्या वतीने सतीश सोनार, रवी नलावडे यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेतली आणि ही जाहिरात पोलीस दलाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणारी असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.‌ गृहराज्यमंत्री कदम यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांना तपास करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

जे पोलीस खाते जुगार खेळणार्‍यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करते, त्याच पोलिसांच्या वेशात अशी जाहिरात केली जाते, हे पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे आणि व्यावसायिक फायद्यासाठी समाजाची दिशाभूल करणारे आहे. यात ‘बडे काम का खेल’ असे म्हणून ‘जुगार’ हा गुन्हे उकलण्यासाठी आवश्यक कौशल्य असल्याचे पोलीस वेशातील नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यांकडून प्रचारित करण्यात आले होते, तसेच यात भगवद्गीतेचाही अवमान करण्यात आला होता. त्यामुळे सुराज्य अभियानाने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ‘बिग कॅश पोकर’ आस्थापनावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची, तसेच भविष्यात पोलीस दलाच्या प्रतिमेचा गैरवापर थांबवण्यासाठी कठोर धोरण आखण्याची मागणी सरकारकडे केली आहे. 

डॉ. होमी भाभा विद्यापीठाचा पदवीदान समारंभ

राज्यपालांचा उपस्थितीत डॉ. होमी भाभा

विद्यापीठाचा पदवीदान समारंभ साजरा 

राज्यपाल तथा कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा चौथा वार्षिक दीक्षांत समारंभ मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात पार पडला.

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्लीचे सदस्य सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सच्चिदानंद जोशी यांचे यावेळी दीक्षांत भाषण झाले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते पीएचडी, पदव्युत्तर पदवी तसेच पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आली तर ६ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राजनीश कामत, कुलसचिव प्रा. विलास पाध्ये, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक नानासाहेब फटांगरे, तसेच विविध विभागांचे अधिष्ठाता. प्राध्यापक, स्नातक विद्यार्थी तसेच निमंत्रित यावेळी उपस्थित होते. प्रारंभी कुलगुरू प्रा. कामत यांनी विद्यापीठाचा मागील वर्षाचा अहवाल सादर केला.



दोन डझनहून अधिक छायाचित्रांचा चेहरे फलक

तब्बल दोन डझनहून अधिक नेत्यांची छायाचित्रे असलेला
 हाच तो चेहरे फलक 

दोन डझनहून अधिक छायाचित्रांचा 'चेहरे फलक' लावून 

भारतीय जनता पक्ष डोंबिवलीतर्फे गुढीपाडवा शुभेच्छा

नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता, विष्णुनगर डोंबिवली पश्चिम, पंजाब नॅशनल बँक चौक येथे कमान उभारून त्यावर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा (डोंबिवली) गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणारा फलक लागला आहे. सत्ताधारी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल दोन डझनहून अधिक नेत्यांच्या छायाचित्रांची हा फलक पूर्ण भरलेला आहे. 

छायाचित्रात नेताजी सुभाषचंद्र बोस नामफलक दिसत आहे.
तर चेहरे फलकाने महर्षी कर्वे रस्ता नामफलक झाकला गेला आहे 

कमानीवरील चेहरे फलक लावण्याआधी नेताजी सुभाषचंद्र बोस व महर्षी कर्वे रस्ता नामफलक असे स्पष्ट व ठळकपणे दिसत होते.

कमानीवरील भरगच्च चेहरे फलकामुळे सुदैवाने चौकातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा नामफलक वाचला आहे. मात्र ते भाग्य महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या वाट्याला आले नाही. या चेहरे फलकाने महर्षी कर्वे नामफलक पुन्हा एकदा झाकला गेला आहे.‌

भाजपचे आमदार व प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण व
अन्य दोन डझनहून अधिक नेत्यांची छायाचित्रे असलेला 
 हाच तो चेहरे फलक 

फलकावर भाजपचे आमदार व भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मोठे छायाचित्र असून फलकावर डाव्या बाजूला चव्हाण यांच्यासह आठ जणांची (यात अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, मोदी, शहा, नड्डा आणि फडणवीस) छायाचित्रे आहेत. तर उजवीकडे वाजपेयी, ठाकरे, दिघे यांची छायाचित्रे कायम ठेवून त्याखाली एकनाथ शिंदे, अजित पवार, श्रीकांत शिंदे, राजेश मोरे यांची छायाचित्रे आहेत. इकडेही रवींद्र चव्हाण यांचे छायाचित्र आहेच. या फलकाच्या अगदी वरच्या बाजूला छोट्या छोट्या गोलात बसवलेली तब्बल दोन डझनहून अधिक नेत्यांची (एकूण ३१) छायाचित्रे आहेत.

शेखर जोशी 

२५ मार्च २०२५

भारताचा 'गोटी सोडा' आता जागतिक बाजारपेठेत!

 

भारताचा 'गोटी सोडा' आता जागतिक बाजारपेठेत! 

भारतातील 'गोटी सोडा' हे शितपेय आता लवकरच 'गोटी पॉप सोडा' या नावाने जागतिक बाजारपेठेत दाखल झाला आहे.‌ 

केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने पारंपरिक गोटी सोड्याला नवे नाव आणि रूप देत जागतिक पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे.‌

https://youtu.be/WhioUg0tXcU

अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि आखाती देशांत गोटी सोडा उत्पादन निर्यातीची चाचणीही यशस्वी झाली असून प्राधिकरणाने 'फेअर एक्सपोर्ट्स इंडिया' सोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. त्यामुळे आखाती प्रदेशातील सर्वात मोठ्या किरकोळ व्यापार साखळींपैकी एक असलेल्या 'लुलू हायपर मार्केट'मध्ये 'गोटी पॉप सोडा' नावाने याचे वितरण होणार आहे.‌

https://youtu.be/WhioUg0tXcU

लंडन येथे १७ ते १९ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'आंतरराष्ट्रीय अन्न आणि पेय महोत्सवात' कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने 'गोटीसोडा' सादर केला होता. 

https://youtu.be/WhioUg0tXcU

'गोटी सोडा' फोडल्यानंतर येणारा आवाज आणि बुडबुडे हे याचे खास वेगळेपण आहे.‌ आंतरराष्ट्रीय पातळीवर 'गोटी सोडा' सादर करताना त्याचे हे वैशिष्ठ्य कायम ठेवण्यात आले आहे.‌ बहुराष्ट्रीय शीतपेय कंपन्यांच्या वर्चस्वामुळे बाजारपेठेतून 'गोटी सोडा' हद्दपार झाला होता. देशी शीतपेय उत्पादनाला प्रोत्साहन आणि त्याची निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. आणि त्या प्रयत्नांमधून 'गोटी सोडा' आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दाखल झाला आहे.‌ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 'गोटी सोडा' नव्या व आधुनिक वेष्टनासह सादर झाला आहे. 

शेखर जोशी 


https://youtu.be/WhioUg0tXcU

सोमवार, २४ मार्च, २०२५

वाल्मिकी रामायणातील 'लोकाभिराम' कथा सादरीकरण

प्रकाशक व निरुपणकार दिलीप महाजन सांगणार 

वाल्मिकी रामायणातील 'लोकाभिराम' कथा!  

चैत्र महिन्यातील राम नवरात्राच्या निमित्ताने प्रकाशक व निरुपणकार दिलीप महाजन कल्याण आणि डोंबिवलीत वाल्मिकी रामायणातील 'लोकाभिराम' कथा उलगडणार आहेत. 

येत्या ३१ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत पारनाका, कल्याण पश्चिम येथील त्रिविक्रम देवस्थान येथे संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत महाजन लोकाभिराम कथा सांगणार आहेत. श्री त्रिविक्रम देवस्थानने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. 

तर ३ ते ५ एप्रिल दरम्यान ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, महात्मा फुले रस्ता, डोंबिवली पश्चिम येथे संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत महाजन यांच्या लोकाभिराम कथा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कल्याण आणि डोंबिवलीतील कार्यक्रम सर्वांसाठी खुले आहेत.



राम नवरात्र पर्वकाळात ही रामसेवा श्रीरामांच्याच कृपेने घडते आहे, असे महाजन यांनी सांगितले.


हलाल प्रमाणित उत्पादने-महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी

हलाल प्रमाणित उत्पादनांवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याची सूचना समितीला केली आहे. समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. 

खाद्यपदार्थांच्या संदर्भातील कायद्यानुसार ‘भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI) या शासकीय संस्थेला खाद्यपदार्थांचे मानके ठरवण्याचा व प्रमाणपत्र देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. असे असतानही ‘हलाल प्रमाणपत्र’ ही समांतर प्रणाली उभी करण्यात आली आहे.‌ यातून मिळणारा पैसा पैसा लष्कर-ए-तोयबा, इंडियन मुजाहिदीन, इस्लामिक स्टेट आदी आतंकवादी संघटनांच्या सुमारे ७०० आरोपींना कायदेशीर साहाय्य करण्यासाठी वापरला जात असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

महाराष्ट्रासह देशभरात ‘हलाल इंडिया’, ‘हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस इंडिया’, ‘जमियत उलेमा-ए-हिंद’, ‘जमियत उलेमा-ए-महाराष्ट्र’ आदी अनेक संस्थांकडून बेकायदेशीपणे हलाल प्रमाणपत्रांचे वाटप करून कोट्यवधी रुपये गोळा करण्यात येत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात त्यावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही खाजगी संस्थांना प्रमाणपत्र वाटप करून पैसे गोळा करण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट केले आहे, अशी माहिती निवेदनात देण्यात आली आहे.‌ 


महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे हलाल प्रमाणपत्रे देणार्‍या खाजगी संस्थांवर तत्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, हिंदूंच्या संविधानिक अधिकारांवर आघात करणार्‍या हलाल प्रमाणिकरणावर त्वरित बंदी आणावी; हलालच्या नावाखाली खाजगी संस्थांनी जमा केलेल्या निधीची चौकशी करून कारवाई करावी; हलाल प्रमाणपत्रांतून जमा केलेली अवैध संपत्ती व्याजासह वसूल करावी; या पैशाचा उपयोग कुठे केला आणि त्यातून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला का, याबाबतही सखोल चौकशी करावी, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.



सुभाषचंद्र बोस, महर्षी कर्वे नामफलक पुन्हा एकदा झाकला जाणार

नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता, विष्णुनगर डोंबिवली पश्चिम पंजाब नॅशनल बँक चौक येथील नामफलक 

सुभाषचंद्र बोस, महर्षी कर्वे नामफलक 

पुन्हा एकदा झाकला जाणार

शेखर जोशी 

नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता, विष्णुनगर डोंबिवली पश्चिम पंजाब नॅशनल बँक चौक येथील नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता व महर्षी कर्वे रस्ता नामफलक पुन्हा एकदा झाकला जाणार आहे. दोन दिवसांपूर्वी येथे बांबूची कमान बांधण्यात आली असून बहुदा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणारा फलक तिथे लावण्यात येणार असावा. कमानी उभारण्यात आल्या असत्या तरी अद्याप फलक लावले गेले नसल्याने कोणत्या बड्या असामीचा चेहरे फलक या कमानीवर लावला जाणार आहे? हे गुलदस्त्यात आहे. 

नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता विष्णुनगर डोंबिवली पश्चिम पंजाब नॅशनल बँक चौक येथे उभारण्यात आलेली कमान 

कमान मोठी असल्याने ज्यांचा फलक लावण्यात येईल ती मंडळीही 'मोठी' असामी असण्याची शक्यता आहे. या मोठ्या असामी म्हणजे सत्ताधारी पक्षाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे असतील की शआमदार रवींद्र चव्हाण असतील याची उत्सुकता आहे. असामी कोणीही असोत पण या चेहरे/शुभेच्छा फलकबाजीमुळे आता पुन्हा एकदा सुभाषचंद्र बोस व महर्षी कर्वे नामफलक झाकला जाणार हे नक्की. 

डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागात रस्ते, चौक येथे अनेक ठिकाणी अशा कमानी उभारण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी या कमानी वाहतुकीसाठी अडथळा ठरतात. पण सर्वपक्षीय राजकारण्यांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही. गणपती, नवरात्र, दहीहंडीच्या निमित्ताने कमानी उभारण्याचा अक्षरशः उत आलेला असतो.‌ गणपतीसाठी उभारण्यात आलेल्या या कमानी पुढे नवरात्रापर्यंत कायम असतात. 

या कमानीमुळे आता पुन्हा एकदा नेताजी सुभाषचंद्र बोस व महर्षी कर्वे रस्ता नामफलक झाकला जाणार आहे 

राजकीय फलकबाजी, चेहरे फलक लावून तुमचे नामफलक झाकणा-या या सर्वपक्षीय कोडग्या राजकारण्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस, महर्षी धोंडो केशव कर्वे तुम्ही क्षमा करा.‌ आपले चेहरे फलक लावल्याशिवाय गुढीपाडवा साजराच होणार नाही, असे या महान मंडळींना वाटत असावे आणि त्यासाठीच ही कमान उभारली असावी. असो. 

शेखर जोशी 

२४ मार्च २०२५


रविवार, २३ मार्च, २०२५

अशोक मुळ्ये काकांचा 'माझा पुरस्कार'


ज्येष्ठ निवृत्त नाट्य व्यवस्थापक अशोक मुळ्ये

यांचा 'माझा पुरस्कार' सोहळा साजरा 

- संदेश कुलकर्ण, शुभांगी गोखले, अविनाश नारकर, 

राजन ताम्हाणे, ऋषिकेश शेलार यांना पुरस्कार प्रदान 

ज्येष्ठ निवृत्त नाट्य व्यवस्थापक व रंगकर्मी यांच्या संकल्पनेतून साकारलेला 'माझा पुरस्कार ' वितरण सोहळा शिवाजी नाट्य मंदिर येथे रसिकांच्या उपस्थितीत पार पडला. पुरस्कार सोहळ्याचे यंदा १९ वे वर्ष होते. माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या सोहळ्यात संदेश कुलकर्णी यांना 'असेन मी... नसेन मी...' या नाटकासाठी 'सर्वोत्कृष्ट नाटककार' तर याच नाटकासाठी 'सर्वोत्कृष्ट दुहेरी भूमिका' हा पुरस्कार शुभांगी गोखले यांना प्रदान करण्यात आला. 

 

'सर्वोत्कृष्ट पुनरुज्जीवित नाटका'चा बहुमान जयवंत दळवी लिखित 'पुरुष' नाटकाला मिळाला. या नाटकातील भूमिकेसाठी 

अभिनेते अविनाश नारकर यांना 'सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता' पुरस्काराने गौरविण्यात आले.‌ राजन ताम्हणे यांना 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शका'चा पुरस्कार मिळाला. 'उर्मिलायन' या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र यांना 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, याच नाटकातील अभिनेत्री निहारिका राजदत्त हिला 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' म्हणून तर अभिनेते हृषिकेश शेलार यांना 'शिकायला गेलो एक' या नाटकासाठी 'सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता' पुरस्कार देण्यात आला. अशोक मुळ्ये, सत्यरंजन धर्माधिकारी तसेच पुरस्कार विजेत्यांची मनोगत व्यक्त केले.

याच कार्यक्रमात गेली २५ वर्षे सुरू असलेल्या 'मटा सन्मान' पुरस्कारासाठी महाराष्ट्र टाइम्सचा गौरव करण्यात आला. मटाचे प्रतिनिधी कल्पेशराज कुबल यांनी हा सत्कार स्वीकारला. 

जयंत पिंगुलकर, केतकी भावे-जोशी, शिल्पा मालंडकर, नीलिमा गोखले आणि मंदार आपटे यांनी मराठी आणि हिंदी प्रेमगीते सादर केली. याचे संगीत संयोजन प्रशांत लळीत यांचे होते.

शनिवार, २२ मार्च, २०२५

राजकीय फलकबाजीविना गुढीपाडवा साजरा व्हावा



राजकीय फलकबाजीविना गुढीपाडवा साजरा व्हावा; 

डॉ. श्रीकांत शिंदे, रवींद्र चव्हाण यांना आवाहन 

- शहर विद्रूपीकरण न करण्याची गुढी उभारा

शेखर जोशी 

यंदाच्या वर्षी गुढीपाडवा शुभेच्छा फलकबाजीने डोंबिवली शहराचे विद्रुपीकरण होणार नाही, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा आणि शुभेच्छांच्या राजकीय फलकबाजीविना गुढीपाडवा साजरा व्हावा. 

नववर्ष स्वागत यात्रेची सुरुवात डोंबिवलीतून झाली आणि पुढे संपूर्ण महाराष्ट्राने त्याचे अनुकरण केले‌. त्याप्रमाणे यंदाच्या गुढीपाडव्यापासून शुभेच्छा फलकबाजी विरहित गुढीपाडवा साजरा करण्याचा नवा आदर्श या दोघांनी घालून द्यावा. 

शुभेच्छा द्यायच्याच असतील तर या दोघांनी पुढाकार घेऊन डोंबिवली शहरातील सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करावी. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्यावतीने शुभेच्छा देणारा फक्त एक मोठा फलक डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागात रेल्वेस्थानक परिसरात लावावा. 

या फलकावर डोंबिवलीतील सर्वपक्षीय नेत्यांची नावे ठेवावी. या मुख्य व प्रातिनिधिक फलकाखेरीज शहराच्या कोणत्याही भागात, रस्ते, चौकात शुभेच्छांची राजकीय फलकबाजी होणार नाही, यासाठी शिंदे व चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा. असे जर खरोखरच झाले तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ती एक नवी सुरुवात ठरेल. 

नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता व महर्षी कर्वे रस्ता 

नामफलक पुन्हा एकदा झाकला जाणार

गेल्या दोन/चार दिवसांपासून मोकळा श्वास घेत असलेले नेताजी सुभाषचंद्र बोस व महर्षी कर्वे रस्ता नामफलक गुढीपाडवा शुभेच्छांनी पुन्हा एकदा झाकले जाणार आहेत.‌

गेल्या काही महिन्यांपासून नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता, विष्णुनगर, पंजाब नॅशनल बँक चौक, डोंबिवली पश्चिम येथील हे दोन्ही नामफलक राजकीय फलकबाजीने झाकले जात होते. मात्र समाज माध्यमातून आणि लोकसत्ता ऑनलाईनने यावर लिहिल्यावर ते फलक हटविण्यात आले होते. शुक्रवारी फलकासाठी बांबूची कमान बांधण्यात आली. कमान बांधतांना एक कामगारा तर चक्क या दोन्ही नामफलकाच्या पाटीवर पाय ठेवून काम करतांना दिसून आला. 

किती सर्वपक्षीय राजकारणी, नेते, पदाधिकारी अशा कमानी उभारून फलक लावण्यासाठी महापालिकेची परवानगी घेतात? परवानगी न घेता किती राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी, संस्था, संघटना अशा अनधिकृत फलकबाजी करतात? आत्तापर्यंत अनधिकृत फलकबाजी करणा-यांच्या विरोधात किती गुन्हे महापालिकेने दाखल केले? किती दंड वसूल केला त्याचीही माहिती महापालिका प्रशासनाने जाहीर करावी. 

शेखर जोशी 

२२ मार्च २०२५