सोमवार, १३ मार्च, २०१७

हातवारे आणि हावभाव-डॉ. अशोक दा. रानडे


कला वक्तृत्वाची-६

अशोक दा. रानडे

हातवारे आणि हावभाव

भाषणक्रियेवर ज्यांचा प्रत्यक्ष परिणाम होतो, प्रभाव पडतो अशा ज्या काही बाबी आहेत त्यात हातवारे आणि हावभाव यांचा निर्विवादपणे अंतर्भाव होतो. हालचाल, हातवारे आणि हावभाव यांच्यामुळे भाषणाचे हेल निश्चित होतात. हाताच्या चलनवलनांचे मानवी जीवनात खास महत्त्व आहे. भाषणासमवेत हातवारे होतात. तसेच हावभावही होतात. खरे पाहता हावभाव हा जोडशब्द मानायला हवा. भाव प्रकट करण्याच्या हेतूने मान, उच्छवास, भुवया व डोळ्याचे विस्फारणे इत्यादींचा वापर करणे हे हाव. हालचाल आणि हातवाऱ्यांखेरीजची शरीरांगांची सूक्ष्म चलने म्हणजे हाव असा अर्थ मानणे सोयीचे राहील. आता राहिला भाव. मनावरचा कोणताही तरंग म्हणजे भाव. भाव म्हणजे स्थिर मनातली कोणतीही सूक्ष्म चलबिचल हा सोपा अर्थ ध्यानात घेऊ. विशिष्ट प्रसंगाच्या अनुषंगाने भाव जेव्हा एक खास परंग घेऊन येतो तेव्हा निर्माण होते ती भावना. आपल्या हातवाऱ्यांचे आणि हावभावांचे भाषणाबरोबरोबरचे नाते काय ते पाहावयाचे. भाषणाचा स्वत:चा म्हणून जो काही परिणाम असतो त्याच्याशी हातवारे-हावभावांचे नाते दोन प्रकारचे संभवते. एक तर भाषणाच्या अर्थाला त्यांच्यामुळे दुजोरा मिळावा किंवा भाषणार्थास त्यांच्यामुळे छेद जावा.

भाषण, हातवारे आणि हावभाव हे तिन्ही एक समान आविष्काराचे घटक म्हणून येत असल्याकारणाने त्यांचे एकमेकांशी काहीही नाते नसणे संभवत नाही. मूळ भाषणार्थ कोणता हे समजून घेण्यात चूक झाली तर भाग वेगळा. पण सर्वसाधारणत: कोणत्या भाषणाबरोबर कोणते हातवारे वगैरे असावेत याची सूचना भाषणांतूनच मिळत असते. हातवारे आणि हावभाव जर निश्चित संकेतांच्या साखळीत बसविले तर नृत्यातली मुद्रांची भाषा तयार होते हे सर्वाना माहिती आहे.शरीरापासून दूर/जवळ जाण्याची क्रिया हात किती झपाटय़ाने, वेगाने करतात यातूनही भावनांचा आवेग दर्शविला जातो. काहीशी विरोधाभासात्मक बाब अशी की भावनाक्षोभाची तीव्रतम मानसिक अवस्था दाखविण्याकरिता हात शरीराला लगटून ठेवणे ‘बोलके’ ठरते.भाषणकर्त्यांचे शिष्टपण, गावंढळपण किंवा त्याच्या मनाचा समतोल/तिरकसपणा दर्शविण्यासाठी अनुक्रमे सफाईदार/खडबडीत वा हिसक्यांनी युक्त हातवारे उपयोगी पडतात.

सरळ रेषेत होणारे हातवारे आक्रमक व मर्दानी तर वक्र रेषेत होणारे मनमिळाऊ व जनानी असेही गमक मानता येईल. सर्वसाधारणत: शब्द अधिक असल्यास हातवारे कमी असे समीकरण मांडण्यास हरकत नाही. हालचाल, हातवारे आणि हावभाव यांची आपापली खास ‘भाषा’ त्याच क्रमाने अधिकाधिक सूक्ष्म होत जाते. म्हणजे असे की कर्त्यांची शरीरशक्ती कमी कमी खर्च होत जाते आणि त्याचबरोबर संदेशग्राकाची (म्हणजे प्रेक्षक वगैरेची) संवेदनशीलताही अधिकाधिक आवश्यक ठरू लागते. प्रयोग सादर करणाऱ्या बाह्य़ सोयी (उदा. प्रकाशयोजना, ध्वनिवर्धन इत्यादी) किती उपलब्ध आहेत त्याचा अंदाज घेऊनच ‘भाषा’ कितपत सूक्ष्म ठेवावी याचा निर्णय करावयाचा असतो.

फेक आणि हातवारे

मनात उद्भवलेला विकार साजेशा जलदीने व कमीत कमी अक्षरांच्या/ शब्दांच्या मदतीने दाखविण्याकरिता मानवी उद्गाराच्या या खास स्वरूपामुळे हातवाऱ्यांबरोबर त्याची सांगड घातली जाणे स्वाभाविक म्हटले पाहिजे. या स्वाभाविक संगतीमुळे हातवारे आणि उद्गारांची फेक यांनी मिळून काही अभ्यास सिद्ध होतात.

‘हा:’सारख्या कमी ध्वनींनी तयार होणाऱ्या उद्गारांची एक यादी तयार करा, यादीपैकी एक कोणताही उद्गार घेऊन बोटांची पेरे क्रमाक्रमाने वाकविताना त्याची फेक करा.


हळूहळू उद्गाराच्या फेकीचा वेग वाढवा, हाताचा पंजा सावकाश उघडा व बोटे पसरा. उभे राहून दोन्ही हात जमिनीला समांतर पसरा-पक्ष्याच्या पंखासारखे. बोटांच्या टोकापासून खांद्यापर्यंत एक लाट हळूहळू येत असून त्यानुसार बाताचा तो तो भाग खालीवर होत आहे अशी कल्पना करून त्यानुसार हातांची हालचाल करा.

मार्गदर्शक सूत्रे. हातवारे, हावभाव वगैरेंचे प्रमाण व प्रकार अंतिमत: भाषणार्थाच्या अनुषंगाने निश्चित होतात हे मूलतत्त्व ध्यानात घेता त्यांच्या जबरदस्त विविधतेची कल्पना सहजपणे करता येईल. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत निरपवादपणे लागू पडतील असे नियम सांगणे अवघड नव्हे तर अयोग्यही ठरेल. पण तरीही हातवारे आणि हावभाव कोणते असावेत ते ठरविण्यासाठी बऱ्याच प्रमाणात साहाय्यक ठरणारी काही सूत्रे पुढीलप्रमाणे मांडता येतील. सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल की भावनांचा आवेग जितका तीव्र तितके हात शरीरापासून अधिक दूर नेणे स्वाभाविक वाटेल.

संकलन – शेखर जोशी

(अशोक दा. रानडे लिखित आणि पॉप्युलर प्रकाशन प्रकाशित ‘भाषणरंग-व्यासपीठ आणि रंगपीठ’या पुस्तकावरून साभार.)

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता-मुख्य अंक/४ फेब्रुवारी २०१७)

मराठी भाषेचे तेज आचार्य अत्रे यांनी शिकविले-पु. ल. देशपांडे


कला वक्तृत्वाची-५

पु. ल. देशपांडे

२८ मार्च १९८१ रोजी पुण्यातील आचार्य अत्रे सभागृहाचे उद्घाटन झाले. त्या वेळी श्रोत्यांच्या आग्रहास्तव पु. ल. देशपांडे यांनी आयत्या वेळी भाषण केले. आचार्य अत्रे यांच्यावरील पुलंचे ते भाषण म्हणजे श्रोत्यांना मेजवानीच होती. त्या भाषणातील काही भाग.

..आत्तापर्यंत आचार्य अत्रे यांच्यावर प्रत्येकाने बोलण्याचा प्रयत्न केला (हशा). मी असे विधान करतो याचे कारण असे की, आचार्य अत्रे ही अशी व्यक्ती होती तिच्यावर किती बोलले तरी शिल्लक राहते. काही धाडसी लोकांनी त्यांच्यावर ‘पीएच.डी.’ करण्याचाही प्रयत्न चालविला आहे (हशा). काही व्यक्ती महाराष्ट्रात अफाट झाल्या आहेत. बाळ गंगाधर टिळक, आचार्य अत्रे ही माणसेच अशी आहेत की त्यांच्याबद्दल कोणत्या अंगाने लिहावे आणि बोलावे?

आज आम्ही मोकळेपणाने लोकांना सांगू शकतो, न घाबरता सांगू शकतो की आम्ही अत्र्यांच्या काळात वाढलो. आम्ही मनात खांडेकर आणि जनात अत्रे धरूनच सगळं बोलत होतो (हशा). याचे कारणही तसंच आहे. अफाट लोकप्रियता बालगंधर्वाना आणि अत्र्यांना मिळाली. कारण हा आपला माणूस आहे असं लोकांना वाटत असे. तो बरोबर बोलतो असं वाटे. आपल्या विचारालाच प्रतिसाद मिळत आहे असं त्यांना वाटे. त्यांचा महाराष्ट्रावरचा सर्वात मोठा उपकार असा की अस्सल मराठी भाषेचं तेज म्हणजे काय ते त्यांनी आम्हाला शिकविलं. मराठीकडे थट्टेचा विषय म्हणून दुर्लक्ष होई. त्याच मराठीच्या माध्यमातून आचार्य अत्र्यांनी हसविलं आणि हसवता हसवता महाराष्ट्राला शहाणं केलं (टाळ्या). संयुक्त महाराष्ट्राचे दिवस आठवतात. अन्यायाविरुद्ध संतापून उठणं म्हणजे काय हे त्यांनी दाखवून दिलं. वन्ही चेतवित ठेवण्याचं, त्वेषानं लोकांना उठविण्याचं सामथ्र्य त्यांच्याकडं होतं. याचं कारण त्यांच्या जीवनाचे सर्वस्वच मुळी उत्कटतेत होतं. त्यांना लहान काही दिसत नाही. मी एकदा अत्रे यांना म्हटलं, आम्ही सारे जण बे एके बे, बे दुणे चार शिकलो. तुमच्या मास्तरांनी तुम्हाला दोन हजार एके दोन हजार, दोन हजार दुणे चार हजार असंच शिकवलेलं दिसतय (प्रचंड हशा).आमच्या म्युनिसिपल शाळेतील मास्तरांना आम्हाला दोन सांगतानाही आपण जास्त सांगतो असं वाटायचं. अत्र्यांना कोण ते सासवडचे गुरुजी मिळाले कोण जाणे (हशा).

एकदा माझं आणि अत्र्यांचं एका व्यासपीठावर भाषण होतं. अत्र्यांनी मला विचारलं, पीएल किती माणसं सभेला आहेत असं तुला वाटतं? मी आपला कारकुनी अंदाज करीत सांगितलं, असतील हजार बाराशे. अरे काय म्हणतोस, अत्रे म्हणाले. ७० ते ८० हजार लोक म्हण. नाही तर जिल्हा पत्राचाही तू संपादक होणार नाहीस (प्रचंड हशा). पुण्यात सभा असल्यामुळं एक माणूस दहा माणसांबरोबर होता ही गोष्ट निराळी (टाळ्या आणि हशा).

अत्रे ज्या क्षणी लिहित होते त्या क्षणाशी ते अत्यंत प्रामाणिक होते. मग ते त्या वेळी कोणतंही कृत्य करीत असो. कारण विनोदी लेखकाचे वैशिष्टय़च हे असते की त्याला जीवनातील सुसंगत म्हणजे काय ते कळावं लागतं. त्या वेळीच तो विसंगतीवर लिहू शकतो. अत्र्यांचं वाचन अफाट होतं. त्यांच्या शैलीवर संत वाङ्मयाचे संस्कार आहेत. अत्र्यांसारखं सरळ मराठी आज कुणी लिहीत नाही. आचार्य अत्रे व्यक्ती नसून जीवनाकडे पाहण्याची दृष्टी होती. चागलं असेल त्याला अति चांगलं करीत, वाईट असेल त्याला अतिवाईट ठरवून झोडपूनही काढीत. अशी त्यांची विचारसरणी होती. प्रत्येक क्षेत्रांत त्यांनी कर्तृत्व गाजवलं. अशा व्यक्तीला लवकर विसरून जाण्याइतका महाराष्ट्र कृतघ्न नाही.

संकलन- शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/मुख्य अंक/३ फेब्रुवारी २०१७

भाषणाचे तंत्र आणि मंत्र-माधव गडकरी


कला वक्तृत्वाची-४

माधव गडकरी भाषणाचे तंत्र आणि मंत्र

आवाज कसा आहे त्याचा अभ्यास करा- प्रा. राम कुलकर्णी


कला वक्तृत्वाची-३

प्रा. राम कुलकर्णी

आवाजालाही व्यायाम हवा- प्रबोधनकार ठाकरे


कला वक्तृत्वाची-२

प्रबोधनकार ठाकरे

आवाजालाही व्यायाम हवा

आवाज हे वक्तृत्वाचे मुख्य अंग आहे. माणसाच्या नुसत्या बोलण्याच्या आवाजावरून त्याच्या अंतर्बाह्य़ संस्कृतीचा बोध होतो. वक्त्याच्या तोंडून नुसता पहिला स्वर निघताच तो विद्वान, व्यासंगी, निश्चयी, सत्यप्रेमी, कळकळीचा आहे की हळवा, कमजोर आहे याची श्रोत्यांना पारख करता येते. मनुष्याच्या अंत:करणातील गूढ विकाराचे आविष्करण त्याच्या स्वरांच्या रोखठोक अथवा कंपित लहरींवरून होत असल्यामुळे शीलाने तो कच्चा की पक्का, त्याच्या स्वभावातील बरे-वाईट गुणधर्म कोणते, त्याच्या भाषणात नि:स्पृहता आहे की दंभ आहे, तो ज्या विषयावर बोलणार आहे त्याबद्दल त्याचा आत्मविश्वास भरपूर आहे की कोता वगैरे अनेक गोष्टींचा साक्षात्कार श्रोत्यांना होतो.

भाषणाला काय किंवा व्याख्यान, प्रवचन, कीर्तनाला काय, निकोप आवाज हे मोठे आवश्यक भांडवल आहे. घोगरे, किरटे, चिरफाळलेले किंवा कोकीळकंठी बायकी आवाजाचे वक्ते पट्टीचे पंडित असले तरी श्रोत्यांवर त्यांना आपली छाप पाडता येत नाही. चारचौघांत बसून गप्पाष्टकी संभाषण करतानाही उत्तम, गहिरा, मोहक आवाजाचा चतुरस्र असामी बाकीच्या मंडळींवर तेव्हाच इतकी छाप पाडतो की थोडय़ाच वेळात तो एकटा वक्ता आणि बाकीचे सारे उत्सुक श्रोते असा बनाव बनतो. आवाजालाही व्यायाम हवाच. व्यायामाने आणि नियमित आहार-विहाराने शरीरप्रकृती व काव्यशास्त्र विनोदप्रचुर ग्रंथांच्या व्यासंगाने मानसिक प्रकृती उत्तम राखण्याची आपण काळजी घेतो. शरीर नि मनाइतकाच आपला आवाजही निकोप आणि निरोगी राखण्याची जरुरी आहे हे फार थोडय़ांच्या लक्षात येते. सकाळ, संध्याकाळ दोन-दोन तास तंबोऱ्यावर सुरावटीची मेहनत (रियाज) करणाऱ्यांचा आवाज आणि आरोग्य उत्तम राहते.

उत्तम आकर्षक गायनासाठी सकस, निकोप आणि झारदार गळ्याची जेवढी आवश्यकता तेवढीच ती भाषिक वक्त्यांनाही असावी लागते. वक्त्यांच्या पांडित्यापेक्षाही त्याच्या भरघोस मोहक आवाजाच्या मोहिनीचाच श्रोत्यांवर परिणाम होत असतो. पं. विष्णू दिगंबर पलुस्कर हे जसे उच्च श्रेणीचे गायनाचार्य होते तसे पट्टीचे वक्तेही होते. त्यांचे शास्त्रोक्त गायन ऐकताना श्रोते नादब्रह्माने जसे मंत्रमुग्ध होत तसेच त्यांचे व्याख्यान, प्रवचन चालले असतानाही श्रोते तल्लीनतेने माना डोलवीत असत. महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यांनी शंभरी ओलांडली. पण त्यांच्या आवाजातील गोंडसपणा आणि गोडवा जणू काय अगदी बाल आवाजाचाच वाटत असे. कशाचा हा परिणाम? शारीरिक आणि मानसिक आरोग्याप्रमाणे या थोर पुरुषांनी आवाजाच्या आरोग्यालाही तितक्याच काळजीने जोपासले. आवाज कमाविण्यासाठी वक्तृत्वाच्या हौशी व महत्त्वाकांक्षी उमेदवारांनी एखाद्या गवयाचे मार्गदर्शन पत्करल्यास फार चांगले. रोज तास-अर्धा तास तंबोऱ्यावर किंवा पेटीच्या स्वरावर खर्ज लावण्याच्या कसरतीने किरटा, घोगरा, कमताकद आवाज सुधारल्याची उदाहरणे आहेत.

आवाजाचा उपयोग करताना त्यावर कसल्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक दाब नसावा. तो अगदी मोकळा, दिलखुलास असावा. चोरटा नसावा. भाषणाची सुरुवात अगदी मंद, साहजिक आणि तोलदार आवाजात केली म्हणजे विचारशक्ती आपल्या ताब्यात राहते. उच्चार स्वच्छ, स्पष्ट आणि ठाशीव असले म्हणजे शब्दांचा नाद-निनाद श्रोत्यांच्या मनावर छान परिणाम घडवितो. माईकवर मोठय़ा आवाजात बोलणे ही आवाजाची वारेमाप उधळपट्टीच आहे. ती टाळावी. श्रोता आणि वक्ता परस्पर सन्मुख असले पाहिजेत. भाषणात खरे महत्त्व भावनेला असून स्वरांच्या खोचा, वाक आणि आरोह-अवरोह निरनिराळ्या गोष्टीतील, विचारांतील किंवा तत्त्वातील भेद दर्शवितात.

संकलन – शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता-मुख्य अंक/३० जानेवारी २०१७)

(‘प्रबोधनकारडॉटऑर्ग’ या संकेतस्थळाच्या सौजन्याने)

साहित्य क्रांती करु शकते-आचार्य अत्रे


साहित्य क्रांती करू शकते

वक्तृत्व कलेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रषु’ या उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वास सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत वक्त्यांच्या भाषणातील काही उतारे तसेच वक्तृत्वकलेसंदर्भातील त्यांचे विचार येथे क्रमश: सादर केले जाणार आहेत. पहिले भाषण लेखक, नाटककार, संपादक, झुंजार वक्ते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे. पुणे येथे उभारण्यात आलेल्या राम गणेश गडकरी यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण अत्रे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी केलेल्या भाषणातील काही भाग..

कला वक्तृत्वाची-१

आचार्य प्र. के. अत्रे

आजपर्यंत मी काही कमी मानसन्मान नाही मिळविले. परंतु त्या सर्व सन्मानापेक्षा आज माझ्या थोर गुरूंचा पुतळा माझ्या हातून उघडला जात आहे हा सन्मान अनन्यसाधारण आहे. (टाळ्या) मोक्ष प्राप्त करून देणारी आणि अमृताचा वर्षांव करणारी ज्ञानेश्वरी मराठी भाषेतच लिहिली गेली. ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी देऊ माथा’ असे खडे बोल तुकोबांनी मराठीतच सांगितले. तुकाराम हे महाराष्ट्रातील युगप्रवर्तक लोकगीतकार होते. ‘धटासी असावे धट उद्धटासी उद्धट’ ही मराठी शिकवण समर्थ रामदास स्वामी यांनी दिली. ‘एक पाय सदैव तुरुंगात ठेवून लोकशिक्षणासाठी आम्ही हातात लेखणी धरली’ असे सांगणाऱ्या विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी मराठी भाषेला सामथ्र्यवान केले तर राम गणेश गडकरी यांनी तिला सौंदर्यवान केले.

एखादा वीर योद्धा जसा लढता लढता रणांगणी पडतो तसे गडकरी वीराच्या मरणाने मेले. ‘भावबंधन’चा शेवटचा प्रयोग लिहून त्यांनी लेखणी खाली ठेवली आणि अवघ्या तीस मिनिटांतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. ‘एकच प्याला’ हे त्यांचे लोकप्रिय नाटक मरणोत्तर प्रसिद्ध झाले. प्रत्येक कवितेत किंवा प्रत्येक लेखनात एक शब्द, एक कल्पना, एक भावना अगदी नवीन असलीच पाहिजे, अशी त्यांची प्रतिज्ञा असे व त्याप्रमाणेच ते लिहीत असत. कवितेखाली त्यांचे नाव नसले तरी त्या कवितेच्या ढंगावरून ती गडकऱ्यांचीच असली पाहिजे असे ओळखू येत असे. नाटकाचे यश हे भाषेवर अवलंबून नाही तर त्या नाटकातील संघर्षांवर ते अवलंबून असते. नुसती भाषा चांगली पण नाटकात कुठेही खटका नसेल, संघर्ष नसेल तर ते नाटक कोणीही पाहण्यास येणार नाही. प्रेक्षकांच्या हृदयाची पकड कशी घ्यावी हे गडकरी चांगलेच ओळखत आणि म्हणूनच त्यांची नाटके लोकप्रिय ठरली. कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे विनोद क्षेत्रातील गडकऱ्यांचे गुरू होते. कोल्हटकर यांच्या विनोदाचे सौंदर्य गडकऱ्यांनी अधिक खुलवून सांगितले. गडकऱ्यांचा विनोद सामाजिक होता. समाजसुधारणेसाठी त्यांनी विनोदाचा उपयोग केला.

साहित्य ही शक्ती आहे. त्याबाबत वाद करण्याची आवश्यकता नाही. राज्यकर्ते आणि साहित्यिक यांचे कार्य समान आणि परस्परावलंबी आहे. साहित्य क्रांती करू शकते. जगात समाजपरिवर्तनाचे अनेक प्रयोग सुरू आहेत. काही राज्यकर्ते हे कार्य कायद्याच्या जोरावर करू पाहतात, पण कायद्याने माणूस सुधारत नाही. त्यासाठी त्याचे हृदय पकडावे लागते. समाजाची नीती कायद्याने सुधारता येत नाही. महाराष्ट्राची परंपरा ज्ञानेश्वरांची आहे. समाजवादी महाराष्ट्र संपन्न करायचा म्हटल्यास अन्य गोष्टींबरोबरच सुवाङ्मयाची, चांगल्या साहित्याची आवश्यकता आहे. गडकऱ्यांसारखे साहित्यिक ते काम करू शकतील..

(संकलन-शेखर जोशी)

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता-मुख्य अंक/२९ जानेवारी २०१७)

रविवार, १२ मार्च, २०१७

दादर येथे सापडलेला स्कुटर बॉम्ब आणि...


दादर येथे सापडलेला स्कुटर बॅाम्ब आणि....

(सोमवार १५ मार्च १९९३ च्या मुंबई सकाळमध्ये प्रसिद्ध झालेली माझी बातमी आणि आठवण)

१२ मार्च १९९३, मुंबई आणि भारताच्या इॉतिहासातील एक दुर्देवी व काळा दिवस. याच दिवशी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले गेले. या भयानक व धक्कादायक घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांनी दादर (पश्चिम) येथे एका बेवारस स्कुटरमध्ये शक्तीशाली बॉम्ब सापडला. वेळीच लक्षात आल्याने बॉम्बशोधक पथकाने तो निकामी केला. रस्त्यावर उभ्या केलेल्या या स्कुटरला कोणी सहज खेळ महणून नुसती किक मारली असती तरी हा स्फोट घडेल, अशी व्यवस्था करण्यात आली होती.

दादर (पश्चिम) येथे डॉ. मांडोत यांच्या दवाखान्यासमोर एका बेवारस स्कुटरमध्ये बॉम्ब ठेवला असल्याची बातमी कळली. तेव्हा आजच्या सारखे वृत्तवाहिन्यांचे प्रस्थ नव्हते. त्यामुळे वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी व छायाचित्रकार घटनास्थळी होते.मी तेव्हा मुंबई सकाळमध्ये वार्ताहर म्हणून नोकरी करत होतो. आमचे मुख्य वार्ताहर रमाकांत पारकर ऊर्फ तात्या यांनी मला आणि आमचा छायाचित्रकार सचिन चिटणीस याला तिकडे जायला सांगितले. दोघेही तिकडे गेलो. बॉम्बशोध पथक घटनास्थळी आले आणि त्यांनी बॉम्ब निकामी केला. संध्याकाळी पाच/साडेपाच वाजल्यापासून जवळपास दोन-तीन तास हे सर्व सुरु होते. बॉम्ब निकामी केल्यानंतर वृत्तपत्रांचे पत्रकार व छायाचित्रकार तिथून निघाले.

मी आणि सचिन थोडा वेळ तिथेच थांबलो. बॉम्ब तर निकामी केला आता पुढे काय करणार, याची माहिती घेतली. मिळालेल्या माहितीुसार तो बॉम्ब, आतील आरडीएक्स हे सर्व विक्रोळी येथे नेले जाणार होते. कार्यालयात हे सगळे कळविले.सचिन आणि मी तेथे जायचे ठरविले. आम्ही तिथे गेलो. तेव्हा चंद्रकांत हंडोरे हे मुंबईचे महापौर होते. ते ही विक्रोळीला त्या ठिकाणी होते. तेथे रात्री त्या बॉम्बची पूर्ण विल्हेवाट लावण्यात आली. या सगळ्याचे मी आणि सचिन साक्षीदार होतो. रात्री तिथून निघालो. मोबाईल व अन्य संपर्काचे प्रभावी माध्यम तेव्हा नव्हते. कार्यालयात दूरध्वनी करुन अशी बातमी आहे हे सांगितले. नारायण पेडणेकर, प्रभाकर नेवगी हे वरिष्ठ तसेच उमेश करंदीकर रात्रपाळीत होते. कार्यालययात गेल्यानंतर मी बातमी लिहून काढली. आणि फक्त मुंबई सकाळमध्ये त्या बातमीची आठ कॉलम हेडलाईन झाली. तेव्हाच्या सर्व अन्य मराठी वृत्तपत्रात दादर य़ेथे बॉम्ब सापडला आणि तो निकामी केला एवढीच बातमी होती. आमच्याकडे त्यानंतरचा सगळा घटनाक्रम आणि बातमीचा पाठपुरावा केल्यामुळे सचिनच्या फोटोसह सविस्तर बातमी आली.

मुंबई सकाळची ही बातमी त्या दिवशी (१५ मार्च १९९३) वेगळी ठरली. त्याबाबत मुंबई सकाळचे संपादक राधाकृष्ण नार्वेकर यांनीही आमचे कौतुक केले. इतरांपेक्षा वेगळी बातमी फक्त आपल्याकडे दिल्याचे आणि बातमीलाही व्यवस्थित न्याय मिळाल्याचा आनंंद काही वेगळाच होता.

दादर (पश्चिम) येथे असलेला हा स्कुटर बॉम्ब अत्यंत शक्तीशाली होता. जर त्याचा स्फोट झाला असता तर सेंच्युरी बाजार येथील स्फोटापेक्षाही त्याची तीव्रता जास्त असती. दादर रेल्वे स्थानक परिसर उध्वस्त होईल इतका तो शक्तीशाली होता. सुदैवाने तो वेळीच निकामी केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पण आज इतक्या वर्षांनंतरही ते सगळे आठवले की अंगावर अजूनही काटा येतो....

-शेखर जोशी

सोमवार १५ मार्च १९९३ च्या मुंबई सकाळमधील मी दिलेल्या त्या बातमीचे कात्रण, सचिन चिटणीस याच्या छायाचित्रासह