सोमवार, १३ मार्च, २०१७

युवकांसाठी वक्तृत्व महोत्सव साजरे केले जावेत- प्रा. शिवाजीराव भोसले


कला वक्तृवाची-१४

प्रा. शिवाजीराव भोसले

युवकांसाठी वक्तृत्व महोत्सव साजरे केले जावेत

तर्कशास्त्र व तत्त्वज्ञान विषयांचे अध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, संपूर्ण महाराष्ट्रभर विविध विषयांवर अनेक व्याख्याने देणारे लोकप्रिय व फर्डे वक्ते प्रा. शिवाजीराव भोसले यांचे ‘वक्तृत्व स्पर्धा’ आणि ‘भाषणे’ याविषयीचे विचार.

वक्तृत्व ही एक साधना आहे. तिचा संबंध अभ्यास, अभिव्यक्ती, विचार, भाषा, व्यक्तिमत्त्व अशा अनेक घटकांशी असतो. या सर्वाचे वारंवार प्रत्यक्ष प्रकटीकरण होत गेले, तर त्यांचे सहज संवर्धन घडते. ते घडावे या हेतूने वक्तृत्व सोहळ्यांचे नियोजन व्हावयास हवे. प्रतिवर्षी काही संगीत महोत्सव साजरे होतात तसे युवकांसाठी वक्तृत्व महोत्सव साजरे करता आले तर किती बरे होईल. ज्यांना बोलणे आवडत असेल, बोलणे या प्रकारात रस असेल, आपल्या शब्दसामर्थ्यांचे व विचारशक्तीचे कोठेतरी मुक्त आविष्करण व प्रकटीकरण घडावे, असे वाटत असेल. अशा मुला-मुलींचा एखादा आनंदमेळावा अगदी आवर्जून भरवावा आणि त्यांना बोलते करावे.

जर आपले वक्तृत्वकलेवर प्रेम असेल व नव्या पिढीविषयी मनात कौतुकाची भावना असेल तर आपण असे वातावरण निर्माण करावे की मुलांनी मनोभावे बोलत राहावे. त्यांच्या मनावर कसलेही दडपण येऊ देऊ नये. ज्यांना प्रभावी वक्तृत्व नावाची शक्ती प्रसन्न करून घ्यावी, असे वाटत असेल तर त्यांनी आपल्या मनातले विचार आपल्या भाषेत मनापासून मांडण्याचा प्रयत्न करावा. बोलणे आनंदाने व उत्स्फूर्तपणे करावे. पारितोषिक हे वक्तृत्वचे फळ किंवा गमक मानू नये. मागच्या पिढीशी तुलना करता आजकालची अनेक मुले उत्तम भाषण करतात. मराठी, हिंदूी, इंग्लिश या भाषांतून प्रकट होणारे हे रसवंतीचे झरे आटू नयेत, याची सर्वानी काळजी घेतली पाहिजे. स्पर्धेपेक्षा वत्कृत्वाला आणि संयोजक व परीक्षक यापेक्षा वक्त्यांना महत्त्व मिळाले पाहिजे. मनापासून बोलणाऱ्याला मानसिक आनंद मिळतो.

भाषणे हा प्रकार केव्हा अस्तित्वात आला आणि कसा रूढ झाला हे सांगणे अवघड आहे. माणसांचे प्रारंभीचे बोलणे परस्परांशी व संवादरूप होते. या बोलण्यामुळे मने कळत होती, कामे होत होती. पुढे पुढे कळणे आणि बोलणे वाढतच गेले. सगळ्याच गोष्टी बदलत, सुधारत, संस्कारित, संवर्धित होत राहिल्या. जीवन हा एक परिवर्तनप्रवाह आहे. नित्यनूतनता हा त्याचा भाव आहे. बोलण्याच्या पद्धती यासुद्धा अशाच बदलल्या.

टिकून राहणारी भाषणे कशामुळे टिकली याचाही शोध घ्यावा लागेल. एका भाषणासाठी अरतीपरतीचा अनेक तासांचा प्रवास हा एक सायास असतो. भाषण हे उभ्यानेच करावे लागते. तोही एक ताण असतो. मनापासून बोलणाऱ्याला एक मानसिक आनंद मिळतो, हे खरे आहे. लोकांच्या सद्भावना व सदिच्छा ही एक अमूर्त आणि अनामिक शक्ती वक्त्याच्या कायेत प्रवेश करते. ही यंत्रशक्ती नसते, ती मन:शक्ती असते. उत्तम भाषणातही एक प्रकारची अपूर्णता राहू शकते. लिहिताना एखादी चूक घडली तर खाडाखोड करता येते. लिहिलेले वाक्य बदलून पुन्हा लिहिता येते. समर्पक शब्द सुचेपर्यंत थांबता येते. भाषणात ही संधी मिळत नाही. मागे वळून पाहता येत नाही. मध्येच थांबता येत नाही. फक्त एवढेच की नित्य उपाययोजनांमुळे मनाच्या काही शक्ती वाढीस लागतात. वक्ता हाच स्वत:चा श्रोता होतो. साक्षित्वाने स्वत:चे बोलणे ऐकत, त्यात रस घेत, जरूर तेथे थोडा बदल करीत तो बोलू शकतो. वाट पाहत पावले टाकणे, हा सराईत पांथस्थाचा गुण बोलणाऱ्याच्या अंगी उतरतो. त्याच सहजतेने तो सभासंचार करतो.

येथून पुढे भाषणांना बहर येईल काय? अर्थपूर्ण, रसपूर्ण, भावपूर्ण भाषणे केली जातील काय? लोकांना भाषणांचे आकर्षण राहील काय? सभा भरतील काय? एकूण परिस्थिती निराशाजनक नसली तरी फारशी आशादायकही नाही. लोकांच्या आवडी बदलत चालल्या आहेत. सिनेसंवाद आणि गीते यांनी अलंकृत झालेली वाणी रसवंतीच्या राज्यात रमणार नाही असे वाटते. या पिढीतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अतिशय प्रगल्भ आहेत. पण बिकट जीवनकलहामुळे आलेली व्यग्रता त्यांना शब्दांची आणि विचारांची हौसमौज करण्याची संधी देत नाही. जगण्याची दिशा आणि ओघ यात सतत आणि अकल्पित बदल होत आहेत.

साहित्य, संगीत, तत्त्वज्ञान यांचा मूलगामी विचार मागे पडत चालला आहे. व्यायामशाळा आणि ग्रंथालये कमी होत चालली आहेत. दवाखाने, औषधांची दुकाने यांची संख्या वाढते आहे. भेळपुरीची दुकाने आणि गाडे रात्रभर चालत आहेत. अशा स्थितीत संस्कृतीच्या आकाशात शब्दांची इंद्रधनुष्ये दिसतील काय? विचारांची नक्षत्रे आढळतील काय? तंत्रविद्येमुळे पंचमहाभूते शरणागती पत्करून आपल्या सेवेत सतत राहतील, पण तुकोबांची अभंगवाणी, ज्ञानदेवांची अमृतवाणी, मुक्तेश्वराची विवेकवाणी श्रवणी पडेल काय? विवेकानदांची भाषणे, सावरकरांची व्याख्याने ही वाग्देवतेची रूपे पुन्हा पाहावयास मिळतील काय?

(प्रा. शिवाजीराव भोसले लिखित आणि अक्षरब्रह्म प्रकाशन प्रकाशित ‘एक विचार मांडव जागर खंड १ व २’ या पुस्तकांवरून साभार)

संकलन-शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/मुख्य अंक/१३ फेब्रुवारी २०१७)

कीर्ती आणि सामर्थ्य यात फरक आहे--डॉ. पु.ग. सहस्त्रबुद्धे


कला वक्तृत्वाची-१३

डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे

कीर्ती आणि सामर्थ्य यात फरक आहे

प्रखर बुद्धिवादी, राष्ट्रीय विचारवंत, समाजशिक्षक, ग्रंथकार, अभ्यासू वक्ते असलेले डॉ. पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे यांनी ‘लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान’ या विषयावर आठ व्याख्याने दिली होती. यापैकी सहा व्याख्यानांमध्ये त्यांनी ‘भारतीय लोकसत्तेच्या सामर्थ्यां’चे मूल्यमापन केले होते. त्यातील ‘राष्ट्रीय स्वार्थाची उपासना’ या व्याख्यानातील काही भाग.

१९५४ सालीच चीनने भारताचा सीमाप्रांत बळकावला होता. आपल्या पंतप्रधानांनी काही राजकीय धोरणाने ते भारताच्या नागरिकांना कळू दिले नाही इतकेच. पण नव्याने उघडकीस आलेल्या सत्यामुळे या आक्रमणाचे स्वरूप जास्त भयानक आहे असे ठरते. चीनमध्ये कम्युनिस्टांची सत्ता १९४९ मध्ये प्रस्थापित झाली आणि त्यानंतर अवघ्या पाच वर्षांत भारतासारख्या एका मोठय़ा राष्ट्राला शह देण्याइतके सामथ्र्य, इतका आत्मविश्वास चीनला प्राप्त व्हावा हे जितके आश्चर्यकारक तितकेच भारताच्या दृष्टीने लज्जास्पद आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळून बारा वर्षे झाली, पण आपला एकही प्रश्न सोडविण्यात आपल्याला यश आलेले नाही. गोवा, काश्मीर हे प्रश्न बाजूलाच राहिले. पाकिस्तानकडून आपले कर्ज वसूल करण्याचे सुद्धा सामथ्र्य आपल्यात नाही. आणि चीनला मात्र चार-पाच वर्षांत भारताच्या सरहद्दीत घुसून केवळ भारताच्या नव्हे तर सर्व जगाच्या छातीवर पाय देण्याइतके सामथ्र्य प्राप्त करून घेण्यात यश आले आहे. आपले राष्ट्र नुकतेच स्वतंत्र झाले आहे तेव्हा इतक्यातच आक्रमणामुळे निर्माण होणारा संघर्ष आपण ओढवून घेतला तर आपला नाश होईल ही भीती चीनला नाही. आपण केलेला मनसुबा ‘युनो’ संघटनेला अमान्य झाला तर जगातली अनेक बलाढय़ राष्ट्रे आपल्याविरुद्ध उठतील याची चीनला पर्वा नाही आणि भारतावर स्वारी केली तर तो प्रतिकार करील आणि मग मोठे रणकंदन माजेल ही चिंता तर स्वप्नातसुद्धा चीनच्या मनाला स्पर्श करीत नाही. चीन व पाकिस्तानच्या दृष्टीने भारत हा इतका प्रतिकारशून्य, इतका दुबळा ठरला आहे. आम्ही आत्मरक्षणाला पूर्ण समर्थ आहोत असे भारताचे शास्ते सर्वाना कंठरवाने सांगत आहेत. पण आपल्या स्त्रियांची विटंबना, सरहद्दीचा भंग व तेथील नागरिकांची मानखंडना, विवस्त्र होत असलेल्या द्रौपदीकडे शांतपणे पाहणाऱ्या धर्मराजाच्या शांतपणाने भारत पाहात उभा असताना, या घोषणांना वल्गनांपेक्षा जास्त किंमत द्यावी असे कोणालाच वाटत नाही. अर्थात या संयमामुळे, या शांततावादामुळे जगात भारताची कीर्ती पसरत चालली आहे हे खरे आहे. पण कीर्ती आणि सामथ्र्य यात फरक आहे हे आपण जाणले पाहिजे.

स्वार्थ, सत्तालोभ, धनक्षोभ, जातीयता या दुर्धर रोगांनी काँग्रेसला ग्रासले आहे. त्यामुळे राष्ट्रसेवा करण्याचे सामथ्र्यच तिच्या ठायी राहिलेले नाही. आपल्या कार्यक्षमतेचा हिशेब केला तर ती शून्यावर येऊन ठेपली आहे असे दिसते. आपल्याला साधे हिशेबसुद्धा नीट करता येत नाहीत. मग ठरल्या वेळात, ठरलेल्या भांडवलात एखादी योजना यशस्वी करून दाखविणे लांबच राहिले. आपल्या रेल्वे, आपले कारखाने, आपली शेती, आपली रुग्णालये याविषयी सरकारने नेमलेल्या समित्यांचे अहवाल पाहिले तर उधळपट्टी, विध्वंस, कर्तव्यशून्यता हीच आपल्या अठरा कारखान्यांची लक्षणे होऊन बसलेली दिसतात.

आपण धर्महीन, चारित्र्यहीन तरी का झालो याचा आपण विचार केला पाहिजे. स्वातंत्र्याआधीच्या वीस-पंचवीस वर्षांत आपण अनेक सत्याग्रहसंग्राम केले होते. त्यावेळी राष्ट्राच्या हाकेला साद देऊन लक्षावधी लोक संग्रामात उतरले आणि ध्येयवादाने प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केले. गेल्या शंभर वर्षांच्या काळात रानडे, टिळक, आगरकर, लाला लजपतराय, गांधी, पटेल, नेहरू, सुभाषचंद्र यासारखे अव्वल दर्जाचे श्रेष्ठ नेते भारताने निर्माण केले आणि त्यांच्या संदेशाने प्रेरित होऊन अखिल भारतभर हिंडून, सरकारी रोषाची पर्वा न करता लोकजागृती करणारे तरुण तर प्रत्येक प्रांतात सहस्रसंख्येने निर्माण झाले होते. हे सर्व लोक आता कोठे गेले? सत्ता-मोहिनीचे दर्शन होताच हे सर्व पतित आणि भ्रष्ट झालेत काय? स्वातंत्र्यसंग्रामात निर्माण झालेले ते शुभ्र चारित्र्य, तो ध्येयवाद, ते असामान्य कर्तृत्व एकाएकी अगदी निपटून नष्ट व्हावे याला केवळ सत्तालोभ, स्वार्थ ही कारणमीमांसा पुरेशी नाही असे वाटते. रशियात, चीनमध्ये राज्यक्रांती झाली, पण सत्ता हाती आल्यामुळे तेथल्या नेत्यांच्या कर्तृत्वाचा व चारित्र्याचा इतका लोप केव्हाही झाला नाही. मग भारतातच तसे का व्हावे? आपला ध्येयवाद इतका तकलुपी, इतका दिखाऊ होता काय? कीर्ती, सत्ता, धन यांचा मोह जिंकण्याचे सामथ्र्यच भारतीयांच्या ठायी नाही काय? असे म्हणवत नाही. याची काहीतरी निराळी कारणे असली पाहिजेत. तीच आता शोधायची आहेत..

(डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे विचारमंच व त्यांचे समग्र साहित्य असलेल्या https://sites.google.com/site/drpgsahasrabudhevicharmanch/home या संकेतस्थळावरून साभार)

संकलन – शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/ मुख्य अंक/१२ फेब्रुवारी २०१७)

शुद्ध चित्ताचे बनणे आणि इतरांचे कल्याण करणे हाच उपासनांचा सारांश-स्वामी विवेकानंद


कला वक्तृत्वाची-१२

स्वामी विवेकानंद

शुद्ध चित्ताचे बनणे आणि इतरांचे कल्याण करणे हाच उपासनांचा सारांश

स्वामी विवेकानंद रामेश्वर मंदिरात गेले होते. तेथे जमलेल्या लोकांनी काहीतरी बोलावे अशी विनंती त्यांना केली. त्यावेळी स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या भाषणातील काही भाग. धर्म हा अनुरागांत असतो, अनुष्ठानात नव्हे. हृदयातील पवित्र आणि निष्कपट प्रेमातच धर्माचे अधिष्ठान असते. जर देह आणि मन शुद्ध नसेल तर मंदिरात जाऊन शिवपूजा करणे व्यर्थ होय. या कलियुगात लोक इतके अवनत होऊन गेले आहेत की त्यांना वाटते की आपण एरवी हवे तसे वागू, तीर्थस्थानी जाताच आपली सगळी पापे धुऊन निघतील. परंतु वस्तुत: कुणी जर अपवित्र भावाने एखाद्या तीर्थाला जाईल तर तिथे जमा झालेले इतर सगळ्या लोकांचे पाप त्याच्या मानगुटीला येऊन बसेल. पापाचा आधीपेक्षा आणखी मोठा बोजा खांद्यावर घेऊन त्याला घरी परतावे लागेल. सगळ्या उपासनांचा सारांश आहे, शुद्धचित्ताचे बनणे आणि इतरांचे कल्याण करणे. गरीब, दुबळे, रोगी वगैरेंमध्ये ज्यांना शिव दिसतो तेच खरेखुरे शिवाचे उपासक होत. तेच खरोखर शिवाची उपासना करीत असतात.

तुम्ही शुद्धचित्ताचे व्हावयास हवे आणि जो कुणी तुमच्याकडे येईल त्याची यथाशक्ती सेवा करावयास हवी. अशा भावाने दुसऱ्याची सेवा करणे हे शुभ कर्म होय. अशा सत्कर्माच्या शक्तीने चित्त शुद्ध होते आणि सगळ्यांच्या अंतर्यामी जो शिव वसत आहे तो त्या शुद्ध चित्तात प्रकट होतो. तो शिव सगळ्यांच्याच हृदयात विराजमान आहे. जर आरशावर धूळ, माती बसलेली असेल तर त्यात आपल्याला आपले रूप दिसत नाही. आमच्या हृदयरूपी आरशावरदेखील असला अज्ञानाचा आणि पापाचा मळ साचलेला आहे. सगळ्यात मोठे पाप म्हणजे स्वार्थीपणा हे होय. स्वार्थीपणा म्हणजे आधी स्वत:चीच फिकीर करणे. आधी आपलाच विचार करणे. मी आधी खाईन, मी सगळ्यांपेक्षा जास्त श्रीमंत होईन, मीच सगळ्या धनाचा मालक होईन असे ज्याला वाटते तो स्वार्थी होय.

कुणी धार्मिक आहे की अधार्मिक आहे याची पारख करावयाची असल्यास बघावे की ती व्यक्ती कितपत नि:स्वार्थ आहे. जो अधिक नि:स्वार्थ तोच अधिक धार्मिक होय. तोच शिवाच्या अधिक जवळ असतो. आणि जर कुणी स्वार्थी असेल तर तो जरी जगातील सारी मंदिरे पुजून आला, सगळ्या तीर्थामध्ये बुचकळून आला, रोज साऱ्या अंगभर वाघासारखे भस्माचे पट्टे ओढीत असला अन् चित्यासारखे टिळे-ठिपके काढीत असला तरी तो शिवापासून खूप खूप दूर आहे असे समजावे.

स्वामी विवेकानंद यांनी मद्रास येथे दिलेल्या एका व्याख्यानातील काही भाग..

सामथ्र्यसंपन्न व्हा!

आपली उपनिषदे कितीही थोर असली, आपण ऋषींचे वंशज आहोत असा आपल्याला कितीही गर्व वाटला तरीही मला हे सांगितलेच पाहिजे की अन्य जातींशी तुलना करता आपण फार दुर्बल आहोत. प्रथमत: आपण शरीराने दुर्बल आहोत. आपले हे शारीरिक दौर्बल्य निदान आपल्या एकतृतीयांश दु:खाचे कारण आहे. आपण आळशी आहोत. आपण काम करू शकत नाही. आपण एकत्र येऊन कार्य करू शकत नाही. परस्परांवर आपण प्रेम करू शकत नाही. आपण अत्यंत स्वार्थी आहोत. आपल्यापैकी तीन जण जरी एकत्र आले तरी ते परस्परांचा द्वेष करतील, मत्सर करतील. आपली सध्याची अवस्था ही अशी आहे. आपल्यात मुळीच एकोपा नाही. आपली स्वार्थबुद्धी शिगेला पोहोचली आहे. कपाळावर आडवे गंध लावावे की उभे या गोष्टीसाठी आपण गेली शेकडो वर्षे परस्परांशी भांडत आहोत. एखाद्याच्या नजरेने माझे अन्न दूषित होईल काय, यासारख्या गोष्टींवर आपण मोठमोठे ग्रंथ लिहीत आहोत. या गोष्टी आपण गेली काही शतके करीत आलो. असल्या सुंदर व महत्त्वाच्या विषयांचे संशोधन करण्यात ज्यांचे सर्व बौद्धिक सामथ्र्य खर्ची पडले आहे अशा जातींकडून आपण कोणतीही उच्च अपेक्षा करू शकत नाही. आपण पोपटाप्रमाणे पुष्कळ गोष्टी बोलतो पण त्या प्रत्यक्ष करत नाही. केवळ बोलणे आणि काहीही न करणे ही आपली सवयच होऊन बसली आहे. याचे कारण काय? मानसिक दौर्बल्य हेच याचे कारण होय. दुर्बल मेंदू काहीच करू शकत नाही. आपण तो बलवान केला पाहिजे. प्रथम आपली तरुण पिढी सशक्त बनली पाहिजे. धर्म नंतरची बाब आहे. माझ्या तरुण मित्रांनो, सामथ्र्यसंपन्न व्हा! हा माझा तुम्हाला उपदेश आहे.

(श्रीरामकृष्ण आश्रम-नागपूर यांनी प्रकाशित केलेल्या ‘स्वामी विवेकानंद ग्रंथावली’ खंड पाचवा या ग्रंथावरून साभार)

संकलन – शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/मुख्य अंक/११ फेब्रुवारी २०१७)

मोडक्या घरात राहा पन मुलाले शिक्षन दिल्याविने सोडू नका-गाडगे बाबा


कला वक्तृत्वाची-११

समाजसुधारक गाडगे बाबा

मोडक्या घरात राहा पन मुलाले शिक्षन दिल्याविने सोडू नका

गाडगे बाबा यांनी कीर्तनातून समाजप्रबोधन केले. श्रोत्यांशी संवाद साधत, प्रश्न विचारत आणि त्यांच्याकडून उत्तर मिळवून घेत त्यांचे कीर्तन पुढे जात असे. समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा यावर त्यांनी कोरडे ओढले आणि समाजजागृती केली. त्यांनी वेळोवेळी केलेल्या काही कीर्तनांतील निवडक भाग..

हे लोक का गरिबीत राहिले?

एक तर पहिले नाही विद्या

काय नाही?

विद्या.

ज्याले विद्या नसेल त्याले खटाऱ्याचा बैल म्हनलं तरी चालल. आता तरी मुलाले शिक्षन द्या. पैसे नाही म्हनाल तर जेवनाचं ताट मोडा. हातावर भाकरी खा. बायाकोले लुगडं कमी भावाचं घ्या. इव्हायाला पाहुनचार करु नका. पन मुलाले साळतं घ्यातल्याविने सोडू नका. विद्या मोठं धन आहे. यातलेच मानसं दिल्लीच्या तक्तावर भाशेन करतात आणि यातलेच मानसं बोरिबंदरच्या ठेसनावर पोतं उचलतात.

ते मानसं अन् हे कोन?

हे काई बैल नाहीत ना?

कोन आहेत..

मानसं

विद्या केवढी मोठी गोष्ट हाये. डॉक्टर आंबेडकर साहेब यांच्या पिढय़ान पिढीनं झाडू मारायचं काम केलं. यांच्या वडिलाले सुबुद्धी सुचली आणि आंबेडकर साहेबाले साळतं घातलं. आंबेडकर साहेबानं काही लहानसहान कमाई नाही केली. हिंदुस्थानची घटना केली. घटना!

अन तेच साळतं जाते ना, अन शिकते ना तर झाडू मारनचं त्यांच्या कर्मात होतं. तवां विद्या मोठं धन आहे.

सोन्याची नाव वर काढा, आपल्या देशाचं लई भलं होऊन जाईल

काऊन रे

तुमी सत्यनारायण करता ना?

मग सत्यनारायण केल्यावर पोथिमदी लिवलय ना, बुडालेली नाव वर येते. मग आता सत्यनारायण कराव. इंग्लंडची नाव पान्यात बुडाली. तिच्यात लई मोठं सोनं है. अरे, सत्यनारायण करा, ते नाव वर काढा. आपल्या देशाचं लई भलं होऊन जाईल.

काऊन रे, एका सत्यनारायणानं होत नाही काय? मंग दहा दहा सत्यनारायण घाला. धा सत्यनारायणानं होत नसलं तर दहा हजार सत्यनारायण घाला. इथून सत्यनारायण पावत नसल तर मम्हैच्या समुद्राजवळ जा. पैसे मी देतो. तिथं सत्यनारायण करा, पण बुडालेली नाव वर काढा! दहा हजार सत्यनारायण घालून जर ते नाव वर येत नायी तर कायले ती खोट्टारडी पोथी वाचता? कायले तो खोट्टारडा सत्यनारायण करता? आणि वरून त्याले सत्यनारायण म्हणता?

तुझ्या पोराले काप आणि घे देवाला प्रसन्न करुन काय करुन राहायला रे?

न्हाय जी नवस फेडून राहिलो.

म्या म्हनलं माझ पोरगं ठीक झालं की कोंबडं कापीन.

अरे कोंबडं कुनाचं लेकरु हाय,

देवाचचं लेकरु हाय?

आन तुह लेकरु?

माह व्हय ना जी

आन तू कोनाचा रं

मी माझ्या बापाचा न जी

म्हन्जे शेवटी कोनाचा?

देवाचं लेकरु.

मंग तूह लेकरु बी देवाचचं ना

व्हय जी

अरे, तूच म्हनते कोंबडं बी देवाचं, लेकरु आणि तूह बी देवाचं आणि आत्ताच मले सांगत्व्हताय की कोंबडं कापलं की देव प्रसन्न होतो. तूह पोरगं बी देवाचं लेकरु हाय.. मग काप त्याले आणि देवाले प्रसन्न करुन!

तुमचा देव तुमचं गंडांतर काय हाकलनार रे!

काउन रे तुमी देव मानता का नाय? अरे मी बी देव मानतो. माहा देव माझ्या मनात असते. अरे, तुमच्या देवळातल्या देवाला धोतर असतं का न्हायी? मंग, तुमच्या देवळातले देवाला धोतर कोन नेसवते रे? लोकं म्हणायची आमीच नेसवतो जी. काउन देवाले धोतर नेसता येत नाय काय? त्यावर लोक म्हणायचे, नाय जी नाय नेसता येत. त्यावर गाडगेबाबा म्हणायचे, अरे व्वा रे व्वा तुमचा देव, ज्या तुमच्या देवाले सोताच धोतर नेसता येत नाही तो तुमाला काय नेसवणार रे.. काय रे देवाला निवद दाखवता का नाय? लोक म्हणायचे, हो जी दाखवतो. मंग काय करता? लोक म्हणायचे, हातात काठी घेऊन बसतो. कायले काठी घेऊन बसता? लोक म्हणायचे, नाय मंजे के कुत्रं येतं, मांजर येतं त्याले हाकलाय लागते नव्ह. अरे व्वा रे व्वा तुमचा देव, तुमच्या देवाले सोताच्या निवदावरचं कुत्रं न मांजर हाकलता येत नाय तो तुमचं गंडांतर काय हाकलनार रे? अरं देवळात देव नसते, देव मानसाच्या मनात होयते. देवळात देव राहात न्हाई. देवळात फक्त पुजाऱ्याचे पोट हायते!

संकलन – शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/मुख्य अंक/१० फेब्रुवारी २०१७)

दुबळ्या शांतीपाठाच्या मृगजळामागे धावण्याची खोड सोडा-स्वातंत्र्यवीर सावरकर


कला वकृत्वाची-१०

स्वातंत्र्यवीर सावरकर

दुबळ्या शांतीपाठाच्या मृगजळामागे धावण्याची खोड सोडा-स्वातंत्र्यवीर सावरकर


(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/ मुख्य अंक/ ९ फेब्रुवारी २०१७)

स्वत; सुधारल्याशिवाय तुम्ही इतरांना काय शिकविणार-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


कला वक्तृत्वाची-९

डॉ. बाबासाहेब आंबेडकरट

स्वत; सुधारल्याशिवाय तुम्ही इतरांना काय शिकविणार

(पूर्वप्रसिद्धी-लोकसत्ता/मुख्य अंक/८ फेब्रुवारी २०१७)

लोकशक्ती हिच राष्ट्रशक्ती- बॅ. नाथ पै


कला वक्तृत्वाची-८

बॅ. नाथ पै

लोकशक्ती हिच राष्ट्रशक्ती

आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून १६ फेब्रुवारी १९६६ रोजी ‘राष्ट्राची शक्ती’ या राष्ट्रीय भाषणमालेत बॅ. नाथ पै यांचे भाषण झाले होते. त्या भाषणातील काही भाग.

लोकशक्ती हाच लोकशाहीचा पाया असतो. सर्व सत्तेचे उगमस्थान लोक हे असते आणि सत्तेचा संचयही लोक या घटकातच होत असतो. खऱ्या लोकशाहीची ही एक मूलभूत कल्पना आहे. जुन्या काळात लोकशाहीच्या या जाणिवेने अभिमंत्रित झालेली मंडळी होती तशी ती आजच्या काळातही आपल्याला आढळतात. लोकांची शक्तीच अखेर यशस्वी होते हे आपल्याला काही नवे नाही. जुन्या काळात आणि आधुनिक काळात हे आपल्या देशातील अनेक विचारवंतांनी सांगून ठेवले आहे. लोकशक्ती ही राज्यशक्तीपेक्षा प्रभावी असते.

आपले संविधान, आपली घटना हाच विश्वास, हीच श्रद्धा व्यक्त करते. शक्ती आणि सत्ता यांचे उगमस्थान जनता, लोक हेच आहे आणि तेच सत्तेचेही अधिष्ठान आहे. संचयस्थान आहे. आपली घटना, आपले संविधान हीच आपल्या स्वराज्याची सनद आहे, ग्वाही आहे. आपल्या स्वातंत्र्याचे ते संरक्षक कवच आहे. कधी स्वार्थान्ध, मतान्ध मंडळी, जगाच्या इतिहासात उठणाऱ्या प्रचंड लाटांचे भान नसणारी मंडळी, अज्ञानी मंडळी, लोकशक्तीला थोपविण्याचा आटापिटा करताना दिसतात, तिला पराभूत करण्याचा उद्योग करतात. पण त्यांनी उभ्या केलेल्या सगळ्या तटबंद्या लोकशक्तीपुढे धडाधड कोसळून पडतात. सगळे अडथळे लोकशक्तीच्या पुरात कुठल्या कुठे वाहून जातात. त्यातूनच क्रांतीचा उदय होतो. प्रचंड परिवर्तन आकाराला येते.

जागृत लोकशक्तीच्या मतपरिवर्तनकारी दडपणामुळे स्वतंत्र भारतात राजकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील किती तरी निर्णय हटवादी राज्यकर्त्यांना बदलावे लागले आहेत. लोकशक्तीचा अंतिम विजय निश्चित आहे, असे म्हणताना त्यात काहीच खाचखळगे नाहीत, अडथळे नाहीत, अडचणी नाहीत असे मला म्हणायचे नाही. लोकशक्ती आपोआप विजयी होते अशी समजूत कोणी करून घेऊ नये. पूर्वग्रह आणि भोळ्या समजुती, अज्ञान आणि अपसमज या गोष्टी अडचणी निर्माण करतात. काही वेळा लोककल्याण आणि जनतेची इच्छा यांच्या नावाखालीदेखील लोकशाहीला घातक अशी पावले टाकली जातात. अनेकदा लोकशक्तीचा वापर सामाजिक, राजकीय व आर्थिक परिवर्तन आणि न्याय धाब्यावर बसविण्यासाठी केल्याचेही दिसते. लोकांनी दडपशाहीला सिंहासनावर बसविले, एवढेच नव्हे तर ती दडपशाही चालू ठेवण्यासाठी साहय़ केले, असे दाखले दुर्मीळ नाहीत. ह्या अशा उदाहरणांमुळेच लोकशक्तीबद्दल लोकांची श्रद्धा भंग पावते आणि मग कडवटपणे ते लोकशक्तीबद्दल अद्वातद्वा बोलतात. लोकशाहीच्या कल्पनेबद्दल अशी मंडळी संशय व्यक्त करताना दिसतात. लोकांना सतत जागरूक ठेवणे, त्यांचे शिक्षण करणे, त्यांना सर्व अंगांनी विचार करायला शिकवणे हा लोकशाहीच्या अनुषंगाने पोसल्या जाणाऱ्या अनाचारांवर रामबाण इलाज आहे.

लोकशाही हे सामाजिक व आर्थिक न्यायप्रस्थापनेचे एक प्रभावी साधन आहे, असा दावा करणाऱ्यांचे हे कर्तव्य आहे की सत्तेचा दुरुपयोग रोखण्यासाठी लोकांनी सतत सबळ आणि तत्पर असले पाहिजे. ही जाणीव त्यांनी निर्माण करावी. असे सुजाण, संघटित लोकमत असेल तरच सत्तेला अंकुश लावता येतो आणि लाचलुचपतीने बरबटलेला कारभार नेस्तनाबूत करणे शक्य होते. लोकशाहीच्या यशाचे ते गमक आहे. नेत्याने लोकांची भाबडेपणाने भलावण करणे किंवा लोकमतापुढे लोटांगण घालणे म्हणजे लोकशाही नेतृत्व नव्हे. लोकशाही नेतृत्वाची कसोटी लोकांच्या व्यापक व उचित आकांक्षांशी ते किती एकरूप होते आणि त्यासाठी प्रसंगी तात्पुरती माघार व अपयश घेण्याची तयारी दाखवते यावर लागते. लोकांच्या पूर्वग्रह व अपसमजुतींविरुद्ध दंड थोपटण्याची त्याची तयारी असली पाहिजे. यासाठी आपले सर्वस्व समर्पण करण्यालाही त्याने कचरता कामा नये.

लोकेच्छेपुढे राज्यकर्त्यांची शरणागती

सत्ताधाऱ्यांना सत्तेचा पुष्कळदा मद चढतो, मस्ती येते. लोकशक्तीला ते क:पदार्थ समजतात. लोकशक्तीची अवहेलना करतात. तिला तुच्छ लेखतात. पण लोकशक्ती त्यांना नमवते. सरळ मार्गावर आणते. आपल्या उर्मटपणाचा त्यांना त्याग करावा लागतो. शिरजोरी, मुजोरी त्यांना सोडावी लागते. इतिहासात अशी कितीतरी उदाहरणे सापडतील की जेथे राज्यकर्त्यांना आपला हट्ट सोडून देऊन लोकेच्छेपुढे शरणागती पत्करावी लागली आहे.

संकलन – शेखर जोशी

(अनुबंध प्रकाशन प्रकाशित ‘वक्तृत्व कला दिग्गजांची’ -श्यामसुंदर उके या पुस्तकावरून साभार)

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/मुख्य अंक/७ फेब्रुवारी २०१७)