मंगळवार, १४ मार्च, २०१७

मराठी भाषेसाठी सर्वकाही...


मराठी भाषेसाठी सर्वकाही...

'डोक्यावर सोनेरी मुकुट आणि अंगावर फाटके कपडे अशा अवस्थेत मराठी भाषा मंत्रालयाच्या दाराशी उभी आहे' असे विधान जागतिक मराठी परिषदेच्या मुंबईत झालेल्या पहिल्या अधिवेशनाच्या उदघाटन प्रसंगी ज्येष्ठ नाटककार-कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी केले होते.

आज २५/३० वर्षांनंतरही त्यात बदल झालेला नाही. इंग्रजीचे वाढते प्रस्थ, मराठीची होणारी गळचेपी, बंद पडत चाललेल्या मराठी शाळा, इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याकडे वाढलेला कल, हळूहळू कमी होत चाललेली मराठी वाचन संस्कृती आणि अन्य काही कारणांमुळे मराठी भाषेवरील आक्रमणे वाढत चालली आहेत. मराठी भाषा व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन तसेच राज्य व्यवहारापासून ते वेगवेगळ्या स्तरावर मराठीचाच वापर करणे आणि मराठी भाषेला तिचे राजभाषेचे स्थान मिळवून देणे हे खरे तर राज्य शासनाचे काम. पण महाराष्ट्र राज्य शासनाच्या स्थापनेनंतर इतक्या वर्षानंतरही् ते पूर्णपणे साध्य झाले आहे आणि मराठीचा वापर होतो आहे असे दिसत नाही. कुसमाग्रज यांच्या जन्मदिनी किंवा १ मे या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनी आयोजित कार्यक्रमातून मराठीचे गोडवे गायले जातात. मराठी भाषेसाठी अमुक करु, तमूक करु म्हणून घोषणा होतात पण प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच पाहायला मिळते.

हे काम राज्य शासनाचे असले तरी ते कर्तव्य शासन जर योग्य प्रकारे पार पाडत नसेल तर मराठी भाषकांनी एकत्र येऊन जनमताचा रेटा लावणे आवश्यक ठरते. पण त्या पातळीवरही आनंदी-आनंद आहे. मराठी भाषा जतन आणि संवर्धनासाठी काही संस्था त्यांच्या पातळीवर काम करत आहेत. पण त्यांचे एकत्र येऊन सामुहिक प्रयत्न झाले आहेत, असेही दिसत नाही. राजभाषा मराठीला सर्व स्तरावर तिचे न्याय्य स्थान मिळवून देण्यासाठी या सर्व संस्था आणि मराठी भाषेवर प्रेम करणाऱया सर्वांनी एकत्र येण्याची आज गरज आहे.

राज्य शासनावर दबाव टाकून मराठी भाषेसंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न न करता सर्वांनी एकत्र आले पाहिजे. मराठी अस्मितेची वज्रमुठ व दबावगट तयार करणे सगळ्यात महत्वाचे आहे. त्यादृष्टीने मराठी भाषा संरक्षण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि न्यायालयात मराठीचा वापर झालाच पाहिजे यासाठी लढा देणारे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. शांताराम दातार यांनी पुढाकार घेतला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्याशी दातार यांनी चर्चा केली आणि साहित्य महामंडळानेही या कामात सक्रीय पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर महामंडळाचे काम फक्त साहित्य संमेलन भरविण्यापुरतेच मर्यादित नाही. तर मराठी भाषा, साहित्य व संस्कृती जतन आणि संवर्धनासाठीही महामंडळाने काम केले पाहिजे, अशी भूमिका डॉ. जोशी यांनी घेतली होती.

त्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून या संदर्भात येत्या १९ मार्च रोजी डोंबिवलीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मराठी भाषेला तिचे स्थान मिळवून देण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा होणारच आहे. हा लढा संपूर्ण राज्य स्तरावर उभारला जावा आणि मराठी भाषकांची एकजूट व्हावी हा उद्देश या मागे आहे. भारतीय राज्य घटनेतील कलम ३४८-२ नुसार उच्च न्यायालयाचीही प्राधिकृत भाषा मराठीच झाली पाहिजे, त्यासाठी काय करता येईल हा विषयही बैठकीत आहे. २१ जुलै १९९८ च्या राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार तालुका आणि जिल्हा पातळीवरील न्यायालयाची भाषा मराठी झाली पण ती पूर्णपणे स्थिरावली नाही. मराठीला ज्ञानभाषा करण्याचे बोलले जाते, पण प्रत्यक्षात त्यासाठी राज्य शासन काय पावले उचलते, मराठीसाठी काम करणाऱया संस्था काय करतात, त्यांनी नेमके काय करायला पाहिजे, अशा सर्व विषयांवर या बैठकीत उहापोह होणार आहे.

मराठी भाषेवर प्रेम करणाऱया, मराठी भाषेविषयी आस्था असणाऱया आणि मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी होणाऱया उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा असलेल्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन अॅड. दातार यांनी केले आहे. ही बैठक १९ मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता डोंबिवली साहित्य संमेलनाचे कार्यालय असलेल्या आगरी युथ फोरमच्या कार्यालयात (जगन्नाथ प्लाझा, पहिला मजला, मानपाडा रस्ता, गोदरेज शो रुमच्या जवळ,, डोबिवली-पूर्व) होणार आहे.

अॅड. शांताराम दातार यांचा संपर्क क्रमांक-

९८२०९२६६९५

-शेखर जोशी

सोमवार, १३ मार्च, २०१७

विधायक आणि आक्रमक शक्तीचा नरसिंह प्रकटू दे


कला वक्तृत्वाची-१८

कला वक्तृत्वाची

अविनाश धर्माधिकारी

विधायक आणि नागरी शक्तीचा नरसिंह प्रकटू दे

निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी हे आज, शुक्रवारी होणाऱ्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीस प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. धर्माधिकारी यांनी जून १९९६ ते डिसेंबर १९९७ कालावधीत ‘लोकसत्ता’मध्ये ‘नागरिक’या नावाचा स्तंभ चालविला होता. दर मंगळवारी हे सदर प्रसिद्ध होत होते. ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीच्या निमित्ताने त्या सदरातील समारोपाच्या लेखातील काहीभाग. या भागाबरोबरच ‘कला वक्तृत्वाची’ हे सदर येथे समाप्त होत आहे.

आज स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांनंतर एक राष्ट्र, एक संस्कृती म्हणून आपण एका अत्यंत अर्थपूर्ण आणि निर्णायक वळणावर आहोत. भ्रष्टाचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, देशद्रोही आणि तत्त्वशून्य राजकारण, पर्यावरणाचा नाश, वाढती विषमता, निरक्षरता, बेरोजगारी, स्त्रियांवरचे वाढते अत्याचार, फुटीरतावाद हे घटक प्रबळ होत गेले तर एक राष्ट्र, एक संस्कृती म्हणून आपण नष्ट होऊ. पण याच पन्नास वर्षांत गाठता आलेली अन्नधान्याची स्वयंपूर्णता, शास्त्र-तंत्रज्ञानातील प्रगती, अणू-अवकाश-अंटाक्र्टिका-जैव तंत्रज्ञान-सुपर कंडक्टिव्हिटी-संगणक, इत्यादी घटक प्रबळ होत गेले तर भारताच्या इतिहासातलं एक नवीन, अभूतपूर्व सुवर्णयुग आपण निर्माण करू शकू. यातनं काय निवडायचं, हा ऐतिहासिक पर्याय आपल्यासमोर आहे. कुठले तरी ग्रह-तारे, कुठला तरी नॉस्टड्रॅमस

किंवा बहुउद्देशीय कंपन्या याविषयीचा निर्णय करणार नाहीत. तो इथल्या प्रत्येक नागरिकाच्या अंत:करणातून आणि कृतीतूनच आकाराला येणार आहे.नव्या सुवर्णयुगाच्या आशेचं हे स्वप्न मांडताना देश मध्यावधी निवडणुकांना सामोरा जातोय. सर्वच पक्ष, आघाडय़ांनी कंबरेचं सोडून डोक्याला बांधलंय आणि एकमेकांच्या नागडेपणाचा शंख करणं चाललंय. राजकारण पन्नास वर्षांतल्या सर्वात नीच पातळीला पोचलंय हे बरंच आहे. गटाराचे हे सर्व पूर वाहून, ओसरून गेले की स्वच्छ निर्मळ पाण्यासाठी वाटा तयार होतील. तोवर मात्र स्वच्छ, निर्मळ पाण्यानं आपलं स्वत्व जपून ठेवायला हवं. गटाराच्या संगतीत धीर सोडून, शॉर्ट टर्म फायद्यांसाठी स्वच्छ, निर्मळ, पारदर्शक पाण्यानं गटाराशी आघाडी केली, तडजोड केली, सीट अ‍ॅटजस्टमेंट केली, तर सत्तेच्या सिंहासनावर गटारच ओघळणार आहे. आपलं स्वत्व आपणच जपून ठेवायला हवं. त्यासाठी नागरिक म्हणून एकत्र यायला हवं. गेल्या पन्नास वर्षांत या सामान्य नागरिकांनीच पुन्हा पुन्हा आपली राजकीय प्रगल्भता सिद्ध करुन दाखवली आहे. ही प्रगल्भता ही आपली बहुधा शेवटची आणि सर्वात भरवशाची आशा आहे.

आपण नीट विचारपूर्वक दिलेलं एकेक मत आणि आनंदानं बजावलेलेलं एकेक कर्तव्य नव्या सुवर्णयुगाचं मंदिर घडवेल. ‘नागरिक’ हा त्या मंदिराचा एक स्तंभ. वेगवेगळ्या स्वरूपातल्या नागरिकांच्या समित्या, इथल्या राजकारण, अर्थकारण, समाजकारण सर्व मिळून तयार होणाऱ्या देशकारणाला दिशा देऊ शकतील. कारण जगातली सर्व तत्त्वज्ञानं, सर्व धर्म, सर्व विचारधारा, सर्व पोथ्या या सर्वाचा मानवी जीवनाच्या रोजच्या जगण्याच्या पातळीवर एका ओळीचा सारांश काढायचा, तर तो अगद सोपा आहे. तो म्हणजे स्वत:चं कर्तव्य आनंदानं करत जगणं. मला समजणाऱ्या भारतीय/वैश्विक संस्कृतीचा आत्मा हाच आहे. आणि आज तरी दुर्दैवानं संपूर्ण भारतवर्षांत हा आत्मा हरवलेला आहे. आपण कर्तव्य चुकवणारा समाज बनलोय. आणि चुकवत चुकवत कधी कर्तव्य बजावलंच तर ते खत्रूडपणे, रडत-भेकत, आदळआपट करत, घिसाडघाईनं, अकार्यक्षमतेनं, शोषणाचे साक्षीदार बनत आपण कर्तव्य बजावण्याची ‘पाटी’ टाकतो. शंभर कोटींच्या या मानवतेला उत्थानासाठी हवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांत कर्तव्य बजावणाऱ्या नागरिकांची सेना. संघटित सेना. आम्हाला शिवाजी जन्माला यायला हवा असतो, पण तो शेजाऱ्याच्या घरात. माझ्या घरात आपला पोटार्थी तडजोडवीरच जन्माला यावा. हे झुगारून देऊन आपणच अफजलखानाचा कोथळा काढणारा व आपल्यातच लपलेला शिवाजी बाहेर काढायला हवा. वाघनख्यांसकट. आता आपला उद्धार दुसरा कोणी तरी करणार नाहीये, आपला उद्धार आपणच करायचाय, या भूमिकेवर जेवढे जास्त नागरिक येतील, तेवढा हा देश, हे विश्व जगायला अधिक सुंदर जागा बनेल.

नाही तर सामान्य नागरिकाला लाथा बसतातच आहेत. आपला नुसता जगत राहण्याचा संघर्ष रोज जास्त जास्तच अवघड बनतोय. तो संघर्ष लढत, धडपडत, चाचपडत आपण जगतो. वर लाथा खात राहतो. लाथा देणारा बदलतो. त्याची विचारधारा, रंग, त्याची परिभाषा बदलते, पण नागरिकाला लाथा चालूच राहतात. याला खरा उपाय एकच. लाथा खाणारा हा स्तंभ कडाडू दे. त्यातून विधायक आणि आक्रमक नागरिक शक्तीचा नरसिंह प्रकटू दे. मानवी सन्मान आणि आत्मविश्वास असलेला, आपलं कर्तव्य आनंदानं करणारा नागरिक म्हणजे हा नरसिंह. विसाव्या शतकाच्या संध्यासमयी, एकविसाव्या शतकाच्या उंबरठय़ावर राक्षसही नाही आणि देवही नाही अशा माणसांच्या संघटित नख्यांनी दुष्ट, भ्रष्ट, लुटारू, चारित्र्यशून्य, अन्याय, अनीतिसंपन्न हिरण्यकश्यपूंची पोटं

फाडून काढू दे. हा स्तंभ कडाडू दे.

आता सामान्य नागरिकानं

नख्या रोवाव्यात जमिनीत खोल

अन् मान ठेवावी ताठ

क्रूरच असतील कर्मभोग, तर

बळकट व्हावेत हात

तर आता, कामाला सुरुवात करू या.

संकलन – शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/मुख्य अंक/१७ फेब्रुवारी २०१७)

कवितेचे कवितापण हरवणार नाही याची काळजी कवींनी घ्यावी


कला वक्तृत्वाची-१७

शांता शेळके

कवितेचे कवितापण हरवणार नाही याची काळजी कवींनी घ्यावी

साहित्य सभा, बडोदे या संस्थेचे वार्षिक संमेलन ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या अध्यक्षतेखाली काही वर्षांपूर्वी आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी केलेल्या ‘आजची मराठी कविता- स्वरूप व समस्या’ या भाषणातील काही भाग...

कविता हा माझा सर्वाधिक आवडीचा, कुतूहलाचा व चिंतनाचा विषय आहे. गेली अनेक वर्षे मी कविता फार प्रेमाने आणि पूर्वग्रहरहित वृत्तीने वाचत आले आहे. माझ्यासारख्या काव्यप्रेमी व्यक्तीला आजची मराठी कविता वाचताना काही गोष्टी तीव्रतेने जाणवतात. काही उणिवा तिच्यात दिसून येतात. काही अपप्रवृत्ती तिच्यामध्ये वाढीला लागत आहेत असे वाटते. पूर्वीच्या काळी कविता लिहिताना वृत्त, जाती, छंद अशा अनेक रचनाप्रकारांवर किमान काही प्रभुत्व असावे लागे. आज मुक्तछंदात कविता लिहिली जात असल्यामुळे कवींना तेवढेही ज्ञान असण्याची गरज भासेनाशी झाली आहे. कविता नेमके कोणत्या रचनेला म्हणावे यासंबंधी अनेकांच्या मनात फार संदिग्ध व धूसर कल्पना असतात. त्यामुळे आज कालबाह्य़ ठरलेल्या वृत्तात व छंदात लिहिली जाणारी सांकेतिक कविता, मंगलाष्टके, बारशाची कविता, स्वागतगीते, मान्यवर मंत्र्यांच्या प्रशस्तीखातर लिहिली जाणारी पद्यात्मक रचना या साऱ्या ‘कविता’च असतात. यामुळे कवींची संख्या नको तितकी वाढत आहे.

जिला ‘कविता’ हे नाव प्रामाणिकपणे देता येईल अशी फार मोजकी रचना आपल्यासमोर येते. पण तीही पूर्णत: निर्दोष वा समाधानकारक नसते. अशा कवितेचा विचार कताना प्रथम नजरेसमोर येते ती दलित कविता. ही कविता प्रथम लिहिली गेली ती प्रामुख्याने पांढरपेशा प्रस्थापित कवितेच्या विरोधात. हिंदू धर्मातील चातुर्वण्र्यव्यवस्था, जातीपातींची उतरंड, विषमता समाजाने निर्माण केली आहे तिच्याशी असलेला कट्टर विरोध व्यक्त करावा, तिच्यावर हल्ले चढवावेत ही दलित कवितेची मूळ भूमिका होती. ‘विद्रोह’ हा तिचा परवलीचा शब्द होता. डॉ. आंबेडकर यांनी दलित समाजाची अस्मिता जागृत केली. दलित साहित्याचा प्रथम जो उत्तम अविष्कार झाला तो मुख्यत्वे आत्मचरित्र आणि कविता या साहित्यातून. दलित कवितेने एक अगदी वेगळे अनुभवविश्व प्रथमच मराठी कवितेत आणले. दलित कवितेने एकूणच मराठी कवितेच्या कक्षा विस्तारल्या, इतकेच नव्हे तर तिने या कवितेला एक वेगळे परिमाणही दिले, परंतु आता दलित कवितेतली वाफ गेली आहे, असे वाटू लागते. मराठी कवितेतील सांकेतिकतेच्या विरोधात उभ्या असलेल्या दलित कवितेने आपलेही काही संकेत निर्माण केले आहेत की काय अशी शंका येऊ लागते. केवळ विध्वंसक, आरडाओरड करणारी, अपशब्द वापरणारी कविता फार काळ टिकून राहणे शक्य नव्हते. दलितांना, पीडितांना अंतर्मुख करून त्यांना विद्रोहाला प्रवृत्त करण्याची तिची शक्तीही आता लुप्त होत आहे. जी गोष्ट दलित कवितेची तीच बाब ग्रामीण कवितेची. मराठीत प्रथम ग्रामीण किंवा तेव्हाचा शब्द वापरायचा झाला तर जानपद कविता लिहिली गेली ती रविकिरण मंडळांच्या कवींकडून. पण हे कवी पांढरपेशे होते आणि त्यांनी लिहिलेल्या या कवितांमध्ये अस्सल जीवनदर्शकापेक्षा भावुक स्वप्नरंजनाचा भाग अधिक होता. बहिणाबाई चौधरी यांनी शिक्षण, संस्कार, व्यासंग यातले काहीही लाभलेले नसता जन्मजात प्रतिभेच्या बळावर उत्तम ग्रामीण कविता त्या काळात लिहिली. इथे वास्तव चित्रणाला जीवनचिंतनाचीही जोड मिळाल्यामुळे या कवितांचा दर्जा खूपच उंचावला आहे. आज ‘मंचीय कविता’ नावाचा एक नवा प्रकार मराठीत आला आहे. काही कवी रंगमंचावरून आपल्या कविता सादर करतात व त्यासाठी व्यासपीठावर सजावट, वाद्यमेळ, गेयता, जमल्यास नृत्य व नाटय़ या साऱ्याची जोड त्यांना देतात. कुठल्या कवीने आपली कविता कशा प्रकारे रसिकांपर्यंत पोहोचवावी हा ज्याच्या त्याच्या पसंतीचा प्रश्न असला तरी कवितेभोवती इतकी सारी सजावट करताना कवितेचे कवितापणच त्यात हरवून जात नाही ना, याची काळजी कवीने घेतली पाहिजे असे मला वाटते.

आजच्या कवींमध्ये मला आणखी एक प्रवृत्ती दिसून येते व ती भयावह आहे असे मला वाटते. हे कवी इंग्रजी कविता वाचतात, इतर प्रांतभाषांतल्या कविता वाचतात, पण मराठी कवितेची पूर्वपंरपरा ते जाणून घेत नाहीत. ही परंपरा म्हणताना मला एकीकडे संतपंडितांचे प्राचीन काव्य अभिप्रेत आहे तर दुसरीकडे ओव्या, स्त्री-गीते, लोकगीते, ग्रामीण गीते वगैरे मौखिक काव्य प्रकारांशी परिचय या दोन्ही गोष्टी कवींना आवश्यक आहेत, ते त्यांना उमगत नाही.जी गोष्ट जुन्या काव्यपरंपरेची तीच गोष्ट भजन, कीर्तन, भारूड, कूटकाव्ये, विराण्या यांची. या पारंपरिक काव्यरूपांना आधुनिक वळण देऊन त्यातून नव्या कवींना आपली कविता अधिक सुंदर, समृद्ध करता येईल.

संकलन – शेखर जोशी

(ज्ञानदा पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी प्रकाशित केलेल्या शांता शेळके यांच्या ‘पत्रं पुष्पं’ या पुस्तकावरून साभार)

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/मुख्य अंक/१६ फेब्रुवारी २०१७)

मरणाचे स्मरण ठेवणे हा पापातून मुक्त होण्याचा उपाय


कला वक्तृत्वाची-१६

विनोबा भावे

मरणाचे स्मरण ठेवणे हा पापातून मुक्त हो्ण्याचा उपाय

संकलन-शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/मुख्य अंक/१५ फेब्रुवारी २०१७)

ग्रंथ प्रकाशन व्यवसाय मनाची मशागत करणारा


कला वक्तृत्वाची-१५

जयंतराव साळगावकर

ग्रंथ प्रकाशन व्यवसाय मनाची मशागत करणारा

संकलन-शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धीी- लोकसत्ता/मुख्य अंक/१४ फेब्रुवारी २०१७)

युवकांसाठी वक्तृत्व महोत्सव साजरे केले जावेत- प्रा. शिवाजीराव भोसले


कला वक्तृवाची-१४

प्रा. शिवाजीराव भोसले

युवकांसाठी वक्तृत्व महोत्सव साजरे केले जावेत

तर्कशास्त्र व तत्त्वज्ञान विषयांचे अध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, संपूर्ण महाराष्ट्रभर विविध विषयांवर अनेक व्याख्याने देणारे लोकप्रिय व फर्डे वक्ते प्रा. शिवाजीराव भोसले यांचे ‘वक्तृत्व स्पर्धा’ आणि ‘भाषणे’ याविषयीचे विचार.

वक्तृत्व ही एक साधना आहे. तिचा संबंध अभ्यास, अभिव्यक्ती, विचार, भाषा, व्यक्तिमत्त्व अशा अनेक घटकांशी असतो. या सर्वाचे वारंवार प्रत्यक्ष प्रकटीकरण होत गेले, तर त्यांचे सहज संवर्धन घडते. ते घडावे या हेतूने वक्तृत्व सोहळ्यांचे नियोजन व्हावयास हवे. प्रतिवर्षी काही संगीत महोत्सव साजरे होतात तसे युवकांसाठी वक्तृत्व महोत्सव साजरे करता आले तर किती बरे होईल. ज्यांना बोलणे आवडत असेल, बोलणे या प्रकारात रस असेल, आपल्या शब्दसामर्थ्यांचे व विचारशक्तीचे कोठेतरी मुक्त आविष्करण व प्रकटीकरण घडावे, असे वाटत असेल. अशा मुला-मुलींचा एखादा आनंदमेळावा अगदी आवर्जून भरवावा आणि त्यांना बोलते करावे.

जर आपले वक्तृत्वकलेवर प्रेम असेल व नव्या पिढीविषयी मनात कौतुकाची भावना असेल तर आपण असे वातावरण निर्माण करावे की मुलांनी मनोभावे बोलत राहावे. त्यांच्या मनावर कसलेही दडपण येऊ देऊ नये. ज्यांना प्रभावी वक्तृत्व नावाची शक्ती प्रसन्न करून घ्यावी, असे वाटत असेल तर त्यांनी आपल्या मनातले विचार आपल्या भाषेत मनापासून मांडण्याचा प्रयत्न करावा. बोलणे आनंदाने व उत्स्फूर्तपणे करावे. पारितोषिक हे वक्तृत्वचे फळ किंवा गमक मानू नये. मागच्या पिढीशी तुलना करता आजकालची अनेक मुले उत्तम भाषण करतात. मराठी, हिंदूी, इंग्लिश या भाषांतून प्रकट होणारे हे रसवंतीचे झरे आटू नयेत, याची सर्वानी काळजी घेतली पाहिजे. स्पर्धेपेक्षा वत्कृत्वाला आणि संयोजक व परीक्षक यापेक्षा वक्त्यांना महत्त्व मिळाले पाहिजे. मनापासून बोलणाऱ्याला मानसिक आनंद मिळतो.

भाषणे हा प्रकार केव्हा अस्तित्वात आला आणि कसा रूढ झाला हे सांगणे अवघड आहे. माणसांचे प्रारंभीचे बोलणे परस्परांशी व संवादरूप होते. या बोलण्यामुळे मने कळत होती, कामे होत होती. पुढे पुढे कळणे आणि बोलणे वाढतच गेले. सगळ्याच गोष्टी बदलत, सुधारत, संस्कारित, संवर्धित होत राहिल्या. जीवन हा एक परिवर्तनप्रवाह आहे. नित्यनूतनता हा त्याचा भाव आहे. बोलण्याच्या पद्धती यासुद्धा अशाच बदलल्या.

टिकून राहणारी भाषणे कशामुळे टिकली याचाही शोध घ्यावा लागेल. एका भाषणासाठी अरतीपरतीचा अनेक तासांचा प्रवास हा एक सायास असतो. भाषण हे उभ्यानेच करावे लागते. तोही एक ताण असतो. मनापासून बोलणाऱ्याला एक मानसिक आनंद मिळतो, हे खरे आहे. लोकांच्या सद्भावना व सदिच्छा ही एक अमूर्त आणि अनामिक शक्ती वक्त्याच्या कायेत प्रवेश करते. ही यंत्रशक्ती नसते, ती मन:शक्ती असते. उत्तम भाषणातही एक प्रकारची अपूर्णता राहू शकते. लिहिताना एखादी चूक घडली तर खाडाखोड करता येते. लिहिलेले वाक्य बदलून पुन्हा लिहिता येते. समर्पक शब्द सुचेपर्यंत थांबता येते. भाषणात ही संधी मिळत नाही. मागे वळून पाहता येत नाही. मध्येच थांबता येत नाही. फक्त एवढेच की नित्य उपाययोजनांमुळे मनाच्या काही शक्ती वाढीस लागतात. वक्ता हाच स्वत:चा श्रोता होतो. साक्षित्वाने स्वत:चे बोलणे ऐकत, त्यात रस घेत, जरूर तेथे थोडा बदल करीत तो बोलू शकतो. वाट पाहत पावले टाकणे, हा सराईत पांथस्थाचा गुण बोलणाऱ्याच्या अंगी उतरतो. त्याच सहजतेने तो सभासंचार करतो.

येथून पुढे भाषणांना बहर येईल काय? अर्थपूर्ण, रसपूर्ण, भावपूर्ण भाषणे केली जातील काय? लोकांना भाषणांचे आकर्षण राहील काय? सभा भरतील काय? एकूण परिस्थिती निराशाजनक नसली तरी फारशी आशादायकही नाही. लोकांच्या आवडी बदलत चालल्या आहेत. सिनेसंवाद आणि गीते यांनी अलंकृत झालेली वाणी रसवंतीच्या राज्यात रमणार नाही असे वाटते. या पिढीतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अतिशय प्रगल्भ आहेत. पण बिकट जीवनकलहामुळे आलेली व्यग्रता त्यांना शब्दांची आणि विचारांची हौसमौज करण्याची संधी देत नाही. जगण्याची दिशा आणि ओघ यात सतत आणि अकल्पित बदल होत आहेत.

साहित्य, संगीत, तत्त्वज्ञान यांचा मूलगामी विचार मागे पडत चालला आहे. व्यायामशाळा आणि ग्रंथालये कमी होत चालली आहेत. दवाखाने, औषधांची दुकाने यांची संख्या वाढते आहे. भेळपुरीची दुकाने आणि गाडे रात्रभर चालत आहेत. अशा स्थितीत संस्कृतीच्या आकाशात शब्दांची इंद्रधनुष्ये दिसतील काय? विचारांची नक्षत्रे आढळतील काय? तंत्रविद्येमुळे पंचमहाभूते शरणागती पत्करून आपल्या सेवेत सतत राहतील, पण तुकोबांची अभंगवाणी, ज्ञानदेवांची अमृतवाणी, मुक्तेश्वराची विवेकवाणी श्रवणी पडेल काय? विवेकानदांची भाषणे, सावरकरांची व्याख्याने ही वाग्देवतेची रूपे पुन्हा पाहावयास मिळतील काय?

(प्रा. शिवाजीराव भोसले लिखित आणि अक्षरब्रह्म प्रकाशन प्रकाशित ‘एक विचार मांडव जागर खंड १ व २’ या पुस्तकांवरून साभार)

संकलन-शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/मुख्य अंक/१३ फेब्रुवारी २०१७)

कीर्ती आणि सामर्थ्य यात फरक आहे--डॉ. पु.ग. सहस्त्रबुद्धे


कला वक्तृत्वाची-१३

डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे

कीर्ती आणि सामर्थ्य यात फरक आहे

प्रखर बुद्धिवादी, राष्ट्रीय विचारवंत, समाजशिक्षक, ग्रंथकार, अभ्यासू वक्ते असलेले डॉ. पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे यांनी ‘लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान’ या विषयावर आठ व्याख्याने दिली होती. यापैकी सहा व्याख्यानांमध्ये त्यांनी ‘भारतीय लोकसत्तेच्या सामर्थ्यां’चे मूल्यमापन केले होते. त्यातील ‘राष्ट्रीय स्वार्थाची उपासना’ या व्याख्यानातील काही भाग.

१९५४ सालीच चीनने भारताचा सीमाप्रांत बळकावला होता. आपल्या पंतप्रधानांनी काही राजकीय धोरणाने ते भारताच्या नागरिकांना कळू दिले नाही इतकेच. पण नव्याने उघडकीस आलेल्या सत्यामुळे या आक्रमणाचे स्वरूप जास्त भयानक आहे असे ठरते. चीनमध्ये कम्युनिस्टांची सत्ता १९४९ मध्ये प्रस्थापित झाली आणि त्यानंतर अवघ्या पाच वर्षांत भारतासारख्या एका मोठय़ा राष्ट्राला शह देण्याइतके सामथ्र्य, इतका आत्मविश्वास चीनला प्राप्त व्हावा हे जितके आश्चर्यकारक तितकेच भारताच्या दृष्टीने लज्जास्पद आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळून बारा वर्षे झाली, पण आपला एकही प्रश्न सोडविण्यात आपल्याला यश आलेले नाही. गोवा, काश्मीर हे प्रश्न बाजूलाच राहिले. पाकिस्तानकडून आपले कर्ज वसूल करण्याचे सुद्धा सामथ्र्य आपल्यात नाही. आणि चीनला मात्र चार-पाच वर्षांत भारताच्या सरहद्दीत घुसून केवळ भारताच्या नव्हे तर सर्व जगाच्या छातीवर पाय देण्याइतके सामथ्र्य प्राप्त करून घेण्यात यश आले आहे. आपले राष्ट्र नुकतेच स्वतंत्र झाले आहे तेव्हा इतक्यातच आक्रमणामुळे निर्माण होणारा संघर्ष आपण ओढवून घेतला तर आपला नाश होईल ही भीती चीनला नाही. आपण केलेला मनसुबा ‘युनो’ संघटनेला अमान्य झाला तर जगातली अनेक बलाढय़ राष्ट्रे आपल्याविरुद्ध उठतील याची चीनला पर्वा नाही आणि भारतावर स्वारी केली तर तो प्रतिकार करील आणि मग मोठे रणकंदन माजेल ही चिंता तर स्वप्नातसुद्धा चीनच्या मनाला स्पर्श करीत नाही. चीन व पाकिस्तानच्या दृष्टीने भारत हा इतका प्रतिकारशून्य, इतका दुबळा ठरला आहे. आम्ही आत्मरक्षणाला पूर्ण समर्थ आहोत असे भारताचे शास्ते सर्वाना कंठरवाने सांगत आहेत. पण आपल्या स्त्रियांची विटंबना, सरहद्दीचा भंग व तेथील नागरिकांची मानखंडना, विवस्त्र होत असलेल्या द्रौपदीकडे शांतपणे पाहणाऱ्या धर्मराजाच्या शांतपणाने भारत पाहात उभा असताना, या घोषणांना वल्गनांपेक्षा जास्त किंमत द्यावी असे कोणालाच वाटत नाही. अर्थात या संयमामुळे, या शांततावादामुळे जगात भारताची कीर्ती पसरत चालली आहे हे खरे आहे. पण कीर्ती आणि सामथ्र्य यात फरक आहे हे आपण जाणले पाहिजे.

स्वार्थ, सत्तालोभ, धनक्षोभ, जातीयता या दुर्धर रोगांनी काँग्रेसला ग्रासले आहे. त्यामुळे राष्ट्रसेवा करण्याचे सामथ्र्यच तिच्या ठायी राहिलेले नाही. आपल्या कार्यक्षमतेचा हिशेब केला तर ती शून्यावर येऊन ठेपली आहे असे दिसते. आपल्याला साधे हिशेबसुद्धा नीट करता येत नाहीत. मग ठरल्या वेळात, ठरलेल्या भांडवलात एखादी योजना यशस्वी करून दाखविणे लांबच राहिले. आपल्या रेल्वे, आपले कारखाने, आपली शेती, आपली रुग्णालये याविषयी सरकारने नेमलेल्या समित्यांचे अहवाल पाहिले तर उधळपट्टी, विध्वंस, कर्तव्यशून्यता हीच आपल्या अठरा कारखान्यांची लक्षणे होऊन बसलेली दिसतात.

आपण धर्महीन, चारित्र्यहीन तरी का झालो याचा आपण विचार केला पाहिजे. स्वातंत्र्याआधीच्या वीस-पंचवीस वर्षांत आपण अनेक सत्याग्रहसंग्राम केले होते. त्यावेळी राष्ट्राच्या हाकेला साद देऊन लक्षावधी लोक संग्रामात उतरले आणि ध्येयवादाने प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केले. गेल्या शंभर वर्षांच्या काळात रानडे, टिळक, आगरकर, लाला लजपतराय, गांधी, पटेल, नेहरू, सुभाषचंद्र यासारखे अव्वल दर्जाचे श्रेष्ठ नेते भारताने निर्माण केले आणि त्यांच्या संदेशाने प्रेरित होऊन अखिल भारतभर हिंडून, सरकारी रोषाची पर्वा न करता लोकजागृती करणारे तरुण तर प्रत्येक प्रांतात सहस्रसंख्येने निर्माण झाले होते. हे सर्व लोक आता कोठे गेले? सत्ता-मोहिनीचे दर्शन होताच हे सर्व पतित आणि भ्रष्ट झालेत काय? स्वातंत्र्यसंग्रामात निर्माण झालेले ते शुभ्र चारित्र्य, तो ध्येयवाद, ते असामान्य कर्तृत्व एकाएकी अगदी निपटून नष्ट व्हावे याला केवळ सत्तालोभ, स्वार्थ ही कारणमीमांसा पुरेशी नाही असे वाटते. रशियात, चीनमध्ये राज्यक्रांती झाली, पण सत्ता हाती आल्यामुळे तेथल्या नेत्यांच्या कर्तृत्वाचा व चारित्र्याचा इतका लोप केव्हाही झाला नाही. मग भारतातच तसे का व्हावे? आपला ध्येयवाद इतका तकलुपी, इतका दिखाऊ होता काय? कीर्ती, सत्ता, धन यांचा मोह जिंकण्याचे सामथ्र्यच भारतीयांच्या ठायी नाही काय? असे म्हणवत नाही. याची काहीतरी निराळी कारणे असली पाहिजेत. तीच आता शोधायची आहेत..

(डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे विचारमंच व त्यांचे समग्र साहित्य असलेल्या https://sites.google.com/site/drpgsahasrabudhevicharmanch/home या संकेतस्थळावरून साभार)

संकलन – शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/ मुख्य अंक/१२ फेब्रुवारी २०१७)