सोमवार, ६ फेब्रुवारी, २०२३
मंदिरांच्या संरक्षणासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना
हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ‘भारतीय मंदिर संस्कृती’ आज धर्मविहीन शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे. आपल्याला मिळालेला हा दैवी वारसा जपणे, त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे. यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ' स्थापना करण्यात आला आह, अशी घोषणा हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी येथे केली.
जळगाव येथील ‘पद्मालय विश्रामगृहा’त आयोजित पत्रकार परिषदेत घनवट यांनी ही घोषणा केली. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष, अधिवक्ता भरत देशमुख, सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी सेवा प्रतिष्ठानचे सचिव नीळकंठ चौधरी, जळगावचे ग्रामदैवत श्रीराम मंदिराचे श्रीराम जोशी महाराज, हिंदू जनजागृती समितीचे जळगाव समन्वयक प्रशांत जुवेकर उपस्थित होते.
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून मंदिरांवरील सर्व प्रकारचे आघात, अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी संघटितपणे प्रयत्न केले जातील. मंदिरांचे सरकारीकरण होऊ न देणे, मंदिरांच्या प्रथा-परंपरा, धार्मिक कृत्ये शास्त्रीय पद्धतीने होण्यासाठी आग्रह धरणे, मंदिरांमध्ये कोणत्याही प्रकारे शासकीय-प्रशासकीय हस्तक्षेप होऊ न देणे, यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ' प्रयत्न आणि पाठपुरावा करेल, असेही घनवट यांनी सांगितले.
मंदिरांमध्ये धर्मशिक्षणवर्ग आयोजित करणे, मंदिरांमध्ये धर्मशास्त्रानुसार वस्त्रसंहिता लागू करणे, समाजाचे संघटन होण्यासाठी मंदिरांत सामूहिक गुढीपाडवा, सामूहिक शस्त्रपूजन, हनुमानचालिसापठण, महाआरती आदी उपक्रम चालू करणे, मंदिरांवरील आघातांच्या विरोधात व्यापक आंदोलन उभारणे आदि उपक्रम महासंघाकडून राबविण्यात वतीने येतील, अशी माहितीही घनवट यांनी दिली.
महाराष्ट्र सरकारने सरकारीकरण झालेली मंदिरे मुक्त करून न्यायालयाच्या आदेशांचे पालन करावे, राज्य सरकारने मंदिरांची संपत्ती विकासकामांसाठी न वापरण्याची घोषणा करावी, पौराणिक किंवा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या; परंतु प्रशासन, पुरातत्त्व विभाग यांकडून दुर्लक्षित मंदिरांचा तात्काळ जीर्णाेद्धार करण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी, राज्यातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ल्यांवरील मंदिरे यांवरील इस्लामी, तसेच अन्य अतिक्रमण यांचे सर्वेक्षण करून ती तात्काळ हटवावीत आदि ठराव यावेळी मंजूर करण्यात आले.
या ठरावांचे निवेदन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन देण्यात येणार आहे.
श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान (पुणे), श्रीक्षेत्र घृष्णेश्वर देवस्थान (वेरुळ, संभाजीनगर),अष्टविनायक मंदिर ट्रस्ट, श्री तुळजापूर देवस्थान पुजारी मंडळ, श्री काळाराम मंदिर (नाशिक), श्री लक्ष्मण मंदिर (पंचवटी, नाशिक), श्री रेणुकामाता मंदिर (माहूर), श्री कानिफनाथ देवस्थान (गुहा), श्री गणपति मंदिर देवस्थान मंडळ (पद्मालय, जळगाव), श्रीराम मंदिर (जळगाव), श्री मंगळग्रह सेवा संस्थान (अमळनेर), अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघ, सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी सेवा प्रतिष्ठान, बालाजी मंदिर (पारोळा), नवकार जैन टेम्पल ट्रस्ट, श्री बालाजी महाराज संस्थान (देऊळगाव राजा) यांसह महाराष्ट्रातील विविध मंदिरांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते.
काशी येथील ‘ज्ञानवापी’ मुक्तीसाठी लढा देणारे सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन, जैन इरिगेशनचे आणि श्री पद्मालय मंदिराचे अध्यक्ष अशोक जैन, सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सदगुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस, तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे हे ही उपस्थित होते, अशी माहिती प्रशांत जुवेकर यांनी दिली.
शनिवार, ४ फेब्रुवारी, २०२३
आधी कोथरूड आता कसबा गृहित धरणा-यांना धडा शिकवा
जे कोथरूड मतदार संघात झाले तेच आता कसबा मतदार संघात घडते आहे, घडवून आणले जात आहे. दोन्ही ठिकाणची परिस्थिती जरी वेगळी असली तरी 'सॉफ्ट टार्गेट' 'कुलकर्णी' आणि 'टिळक' हेच आहेत हे स्पष्ट आहे. 'नाना फडणविशी' खेळी तेव्हाही खेळली गेली आणि आताही खेळली गेली आहे. त्यामुळे 'आधी कोथरूड आता कसबा गृहित धरणा-यांना मतपेटीतून धडा शिकवा' असे म्हणण्याची आणि कृती करण्याची वेळ आली आहे.
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सुरक्षित मतदार मतदार संघ हवा म्हणून तेव्हा प्रा. मेधा कुलकर्णी यांचा 'राजकीय बळी' घेण्यात आला. जे चंद्रकांत पाटील इतकी वर्षे कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करतात त्यांना स्वतः:ला इतक्या वर्षांत कोल्हापूर मतदार संघ का बांधता आला नाही? हे त्यांचे आणि भाजपचे अपयशच म्हणायचे.
बरे, चंद्रकांत पाटील यांना अगदी सुरक्षितच मतदार संघ हवाच होता तर तो डोंबिवली विधानसभा मतदारसंघ हा ही होता. अगदी शंभर टक्के 'चंपा' इथून निवडून आले असते. पण जी हिंमत कोथरूड मतदार संघात मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी कापण्यात देवेंद्र फडणवीस यांनी आणि भाजपच्या चाणक्यांनी दाखविली ती त्यांनी डोंबिवलीत रवींद्र चव्हाण यांच्याबाबतीत दाखविली नाही. कारण भाजपसाठी 'चव्हाण' यांच्यापेक्षा 'कुलकर्णी' हे सॉफ्ट टार्गेट होते. फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी डोंबिवलीत चव्हाण यांची उमेदवारी रद्द केली असती तर कदाचित मनी मसल पॉवर असलेल्या चव्हाण यांनी वेगळी वाट निवडली असती. आणि ते चंद्रकांत पाटील यांच्यासाठीही अडचणीचे ठरले असते. त्यामुळे भाजपच्या 'फडणविशी' खेळीने त्या तुलनेत कमी त्रासदायक किंवा त्रासदायक ठरणारच नाही, अशा 'कुलकर्णी' यांची उमेदवारी रद्द केली.
आता तीच खेळी कसबा मतदार संघात खेळली जात आहे. जो न्याय चिंचवड मतदार संघासाठी लावण्यात आला तोच न्याय कसबा मतदार संघासाठी लावण्यात येणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. चिंचवड आणि कसबा येथील उमेदवार जाहीर करण्यापूर्वी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी टिळक कुटुंबीयांची भेट घेतली आणि दिवंगत मुक्ता टिळक यांचे पती आणि मुलाची 'समजूत' काढली. यात गंमत अशी की टिळक कुटुंबातील एकाची पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती केली. खरे तर त्याची काहीच आवश्यकता नव्हती. पण आता टिळक कुटुंबातील एकाला पक्षप्रवक्तेपद दिल्याने पुन्हा कुटुंबातील अन्य व्यक्तीला उमेदवारी कशी द्यायची? असे साळसुदपणे सांगितले गेले. बिंबवले गेले.
हे सर्व करणे म्हणजे मतदारांना गृहीत धरणे आहे. आपण काहीही केले तरी मते आपण ज्याला ऊभा करू तोच निवडून येणार, पारंपारिक मतदार झाले गेले विसरून त्यालाच मतदान करणार, असा आत्मविश्वास भाजपच्या चाणक्यांना आहे आणि तो चुकीचा किंवा खोटा नाही. हेच सर्व ठिकाणी चालत आले आहे. या गृहीत धरण्याला कुठेतरी आळा बसण्याची, फाजील आत्मविश्वासाचा फुगा फोडण्याची वेळ आली आहे.
एकदा तरी धडा मिळू दे, निकाल वेगळा लागू दे...
©️ शेखर जोशी
शनिवार, २८ जानेवारी, २०२३
संस्कृत राजभाषा व्हावी' असे सांगणारे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे अभिनंदन
ी
आपल्या देशासाठी संस्कृत अत्यंत उपयुक्त भाषा आहे आणि संस्कृत राजभाषा व्हावी, असे स्पष्ट शब्दात सांगणारे भारताचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे अभिनंदन.
काही सन्माननीय अपवाद वगळता उच्च पदावर काम करणारी, काम केलेली माणसे भारतीय संस्कृती, धर्म, अध्यात्म, परंपरा याविषयी थेट समर्थन करणारी भाषा बोलत नाहीत. आपण असे काही बोललो, याचे समर्थन केले तर आपण प्रतिगामी ठरू, आपल्यावर मागासलेपणाचा, उजवी विचारसरणी असल्याचा शिक्का बसेल, अशी अनाठायी भीती या मंडळींना वाटत असते. किंवा काही मंडळींना मनातून हे पटलेले असले तरी हे सर्व नाकारून हे लोकं स्वतःला पुरोगामी म्हणवून घेण्यात धन्यता मानत असतात. त्या पार्श्वभूमीवर बोबडे यांनी संस्कृत भाषा, त्याचे महत्त्व आणि एकूणच संस्कृत भाषेच्या महत्वाविषयी जे भाष्य केले ते कौतुकास्पद आहे.
उच्च न्यायालयांसाठी संस्कृत अधिकृत भाषा म्हणून स्वीकारल्यास अपील हाताळणे सोपे होईल त्यासाठी शब्दसंग्रह विकसित करण्याची गरज आहे. 'संस्कृत भारती' ने नागपूर येथे आयोजित केलेल्या अखिल भारतीय युवा संमेलनात बोलताना बोबडे यांनी हे मत व्यक्त केले.आपल्या देशासाठी संस्कृत ही अत्यंत उपयुक्त भाषा आहे. त्यामुळे ती केवळ देवभाषा न राहता, धर्माशी न जोडता राजभाषा व्हावी, असेही त्यांनी सांगितले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नोव्हेंबर १९४९ मध्ये संविधान सभेत राष्ट्रीय आणि दुवा भाषा म्हणून स्वीकारलेल्या हिंदीचा विकास करण्यासाठी संस्कृतचा परिचय करून देण्याचा प्रस्ताव दिला होता मात्र चर्चेनंतर विधानसभेने डॉ. आंबेडकरांचा मूळ प्रस्ताव लांबवला आणि आठ अनुसूचित भाषांशी जोडला, असेही बोबडे म्हणाले.
शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३
ओम सदगुरू प्रतिष्ठानतर्फे श्रीगुरुचरित्र पारायण सप्ताह
ओम सद्गुरू प्रतिष्ठानतर्फे बोरिवली येथे येत्या ३० जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत श्रीगुरुचरित्र पारायणाचा ४० वा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमही होणार आहेत.
ओम सद्गुरू प्रतिष्ठानचे संस्थापक, सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर यांनी गाणगापूर यात्रेनिमित्त होणाऱ्या श्री गुरुचरित्र पारायणाची सुरवात १९८४ साली केली होती. ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान दररोज सकाळी सहा वाजता सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर यांच्या ध्वनिमुद्रित आवाजातील श्रीगुरुचरित्राच्या अध्यायांचे पारायण होणार आहे.
दररोज संध्याकाळी लक्षार्चना, व्याख्यान, कीर्तन, प्रवचन आणि संगीत सेवा असे विविध अध्यात्मिक कार्यक्रम होणार आहेत.
मंगळवार ३१ जानेवारी रोजी लक्षार्चना, बुधवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी प्राची गडकरी यांचे "देवाचिये द्वारी" या विषयावर व्याख्यान, गुरुवार २ फेब्रुवारी रोजी ह. भ. प. वीणा खाडिलकर यांचे 'संत परम हितकारी' या विषयावर कीर्तन होणार आहे. शुक्रवार ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत दत्तयाग तर ४ फेब्रुवारी रोजी डॉ. पं. संदीप अवचट यांचे 'शास्त्रामागचे विज्ञान' या विषयावर व्याख्यान, रविवार ५ फेब्रुवारी रोजी प पु गुळवणी महाराज यांचे शिष्य कानडे गुरुजी यांचे 'भारतीय कालगणना' या विषयावर प्रवचन, सोमवार ६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता 'मलन सप्तसुरांचे - भावगीत व भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ७ फेब्रुवारी महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे.
उत्सवाचे कार्यक्रम ओम सद्गुरू प्रतिष्ठान, ए/८, दौलत नगर रस्ता क्र. ७, प प टेम्बेस्वामी महाराज चौक, नवनीत
रुग्णालयाशेजारी, बोरिवली (पूर्व) येथे होणार आहेत. संपूर्ण उत्सव सर्वांसाठी खुला असून विनामूल्य आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - शशी करंदीकर ९७६९९३९०४५
सोमवार, २३ जानेवारी, २०२३
सुट्टीच्या फक्त आठवणी उरल्या- बाळासाहेब ठाकरे
'मुंबई सकाळ' असताना १९९३ मध्ये 'आमची सुट्टी' हे सदर मी चालवले होते. सकाळमध्ये दरवर्षी सुट्टीच्या कालावधीत लहान मुलांसाठी 'सुट्टीचे पान' असायचे. लहान मुलांसाठीचा मजकूर या पानावर असायचा. सकाळ-पुणे कडून या पानासाठी जो मजकूर यायचा तोच आम्ही मुंबई सकाळमध्ये लावत असू. मुंबई सकाळचे तेव्हाचे संपादक राधाकृष्ण नार्वेकर यांच्याकडे मी 'आमची सुट्टी' ही कल्पना मांडली. विविध क्षेत्रातील मान्यवर लहान असताना मे महिन्याची सुट्टी कशी घालवत होते? ते या सदरात असेल असे त्यांना सांगितले. नार्वेकर साहेबांना कल्पना आवडली आणि मला कामाला लाग म्हणून सांगितले.
यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कसेही करुन घ्यायचेच असे मनाशी ठरविले आणि प्रयत्न सुरु केले. 'मातोश्री'वर दूरध्वनीकरुन संपर्क साधला. चार/सहा वेळा प्रयत्न केल्यानंतर एका प्रयत्नात मातोश्रीवरील ऑपरेटरने बाळासाहेब यांच्याशी फोन जोडून दिला. मी माझ्या सदराची कल्पना सांगितली आणि त्यासाठी भेटीची वेळ मागितली.
बाळासाहेबांनी मला वीस मिनिटांचा वेळ दिला होता. ठरलेल्या दिवशी आणि वेळी 'मातोश्री' वर दाखल झालो. पत्रकारिता सुरु करुन चार वर्ष झाली होती. आणि मी थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांच्यासमोर बसलो होतो. त्यामुळे नाही म्हटले तरी थोडेसे दडपण मनावर होतेच. पण बाळासाहेबांनी सुरुवातीलाच मोकळेपणाने बोला असे सांगून आणि कुठे राहता? मुंबई सकाळमध्ये किती वर्षे आहात? तिथे काय पाहता? अशी आस्थेवाईकपणे चौकशी करुन मनावरचे दडपण कमी केले.
खरे तर मी पहिला प्रश्न विचारुन गप्पांना सुरुवात केली आणि नंतर मला प्रश्नच विचारावे लागले नाहीत. बाळासाहेब भरभरुन बोलायला लागले. मध्येच त्यांनी, अगं मीना येऊन बस इकडे ऐकायला आणि मीनाताईही गप्पा ऐकायला येऊन बसल्या. या मुलाखतीच्या वेळी शिवसेना नेते सुभाष देसाई आणि सुधीर जोशी ही उपस्थित होते.
म्हणजे मी 'मातोश्री'वर गेलो तेव्हा अन्य काही कामासाठी बाळासाहेब यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते दोघे जण आधीच तिथे आलेले होते. आमच्या गप्पा/मुलाखत सुरु झाली तेव्हा, हे दोघे इथेच बसले तर चालतील ना? असे मला बाळासाहेबांनी विचारले. खरे तर बाळासाहेबांनी हे मला विचारले नसते तरी चालले असते पण संकेत म्हणून त्यांनी विचारले आणि मी ही हो म्हटले.
लहानपणच्या आठवणीत बाळासाहेब रंगून गेले होते. खरे तर मुलाखतीसाठी त्यांनी वीस मिनिटेच दिली होती पण या गप्पा जवळपास तास/सव्वातास चालल्या. राजकारण हा विषयच कुठे आला नाही आणि म्हणूनही ते लहानपणीच्या जुन्या आठवणीत रंगून गेले असतील. गप्पा झाल्यावर बाळासाहेब म्हणाले, मुलाखत प्रसिद्ध करण्यापूर्वी मला पाहायला मिळाली तर चांगले म्हणजे काही संदर्भ चुकायला नको. मी हो म्हटले आणि मुलाखत लिहून झाली की दूरध्वनीकरुन तुम्हाला वाचून दाखवेन असे सांगितले. बाळासाहेब यांनीही त्याला होकार दिला. एक/दोन दिवसात मजकूर लिहून झाल्यावर 'मातोश्री'वर दूरध्वनीकरुन बाळासाहेबांना मुलाखत वाचून दाखवली. एखाद, दुसरा शब्द/वाक्य बदलायला सांगून त्यांनी छान लिहिलाय असे सांगून सर्व मुलाखत ओके केली.
आणि ही मुलाखत २६ एप्रिल १९९३ या दिवशी मुंबई सकाळमध्ये प्रसिद्ध झाली. 'आमची सुट्टी' हे सदर सकाळच्या अन्य आवृत्यांमध्येही त्यांच्या सोयीनुसार आणि जागेनुसार लावले जात होते. 'आमची सुट्टी' या सदरात तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्यासह रामदास पाध्ये, दिलीप प्रभावळकर, महेश कोठारे, अजय वढावकर, दिलीप वेंगसरकर, डॉ. श्रीराम लागू, शिवाजी साटम, शाहीर साबळे, मोहन जोशी, सुरेश वाडकर या मान्यवरांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या होत्या. हे सदर तेव्हा वाचकप्रिय ठरले होते.
रविवार, २२ जानेवारी, २०२३
'बाप पळविणा-या टोळीला' उघडे पाडण्याची संधी उद्धव ठाकरे यांनी गमावली
विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात उद्या (२३ जानेवारी) आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरण सोहळ्यास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. हे जर खरे असेल तर तो उद्धव ठाकरे यांचा पळपुटेपणा आहे असेच म्हटले पाहिजे.
सहा- आठ महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यापासून उद्धव ठाकरे हे पहिल्या दिवसापासून आजतागायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दार, मिंधे, खोके अशा शब्दांत तोंडसुख घेत आहेत. मुख्यमंत्री असताना ते जितके मुंबईबाहेर फिरले नाहीत त्यापेक्षा अधिक वेळा ते मुख्यमंत्रीपद गेल्यावर बाहेर पडले. भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष फोडला म्हणूनही उद्धव ठाकरे सतत टिका करत असतात. खरे तर चाळीसहून अधिक आमदार, तेरा खासदार, काही महापालिका/नगरपालिकांमधील नगरसेवक इतकी माणसे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना सोडून गेली. खरेतर इतकी माणसे आपल्यला सोडून का गेली? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या मनाला विचारायला पाहिजे. पण तो सारासार विचार न करता उद्धव ठाकरे हे भोवती जे बदसल्लागार जमा केले आहेत त्यांच्याच सल्ल्याने वागत आहेत, भूमिका घेत आहेत. ही सर्व मंडळी/बदसल्लागार शिवसेना संपवायला निघाले आहेत, याचे भान उद्धव ठाकरे यांन कधी येणार? असो.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम उद्धव ठाकरे यांच्यासाठी खरेतर एक मोठी संधी होती. कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे थेट त्यांच्यासमोर शिंदे- फडणवीस यांचे वाभाडे काढण्याची, त्यांना उघडे पाडण्याची चांगली संधी उद्धव ठाकरे यांच्यासाठी चालून आली होती. पण त्यांनी ( की बदसल्लागार, किचन कॅबिनेट यांनी सांगितले म्हणून) सोहळ्यास उपस्थित न राहण्याचा निर्णय घेऊन संधी तर गमावलीच पण वैचारिक लढाईच्या रणांगणातूनही पळ काढला असेच म्हणावे लागेल.
मागेही 'हनुमान चालीसा' प्रकरणी राणा दाम्पत्याचे आव्हान स्वीकारून त्यांच्या आंदोलनातील हवा उद्धव ठाकरे यांना काढून घेता आली असती. उपरोधिकपणे पण का होईना राणा दाम्पत्याला 'मातोश्री' बाहेर मांडव घालून या हनुमान चालिसा म्हणायला, असे सांगितले असते तर राणा दाम्पत्याला जेवढी प्रसिद्धी मिळाली ती मिळाली नसती आणि ते मोठेही झाले नसते.
राजकारणात प्रसंगी माघार घेऊन शत्रुला चित करायचे असते, त्याचे दात त्याच्याच घशात घालायचे असतात हे उद्धव ठाकरे विसरले. कंगना राणावत, अर्णव गोसावी प्रकरणीही नाहक अडेलतट्टू भूमिका घेऊन स्वतःचे करून घेतले होते.
इतके होऊनही उद्धव ठाकरे भानावर येत नाहीत. विनाशकाले विपरित बुद्धी म्हणतात ती हीच.
कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर उद्धव ठाकरे यांचे नाव देण्यात आलेले नाही, त्याचा हा अपमान आहे, त्याच दिवशी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम मोदी भक्तांचा आहे, गद्दाराच्या कार्यक्रमाला कशाला जायचे? हा कार्यक्रम राजकीय आहे असली तकलादू कारणे उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या लोकांकडून सांगितली जात आहेत. त्यामुळे त्याला काहीही अर्थ नाही. मुळात उद्धव ठाकरे आता कोणत्याही संविधानिक पदावर नाहीत. शासकीय रिवाजाप्रमाणे निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, आमंत्रक म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांची नावे देण्यात आली आहेत. राज ठाकरे यांचेही नाव देण्यात आलेले नाही. बरे कार्यक्रमाचे रितसर निमंत्रण उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि इतर मान्यवरांना देण्यात आले आहे. मग हा मानापमान कशाला?
अशा कार्यक्रमाच्या वेळी राजकीय हेवेदावे काढणे योग्य दिसले नसते, तिथे उद्धव ठाकरे यांना भाषण करण्याची संधी मिळाली असती का? असे प्रश्न काहीजण विचारतील. समजा भाषण करता आले नसते तरी कार्यक्रमास उपस्थित राहून मोठेपणा घेता आला असता. भाषण करायला मिळाले असते तर शिंदे- फडणवीस यांना किमान पुन्हा एकदा टोमणे तरी मारता आले असते, 'बाप पळवून नेणा-या टोळीला' उघडे करता आले असते. आणि अशा कार्यक्रमात शिंदे- फडणवीस यांना उघडे पाडणे औचित्यभंग ठरला असता तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी करायचा. नाहीतरी या आधीही त्यांनी तो वेळोवेळी केलाच आहे, त्यात आणखी एका प्रसंगाची, भाषणाची भर पडली असती.
शेखर जोशी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...

















