गुरुवार, २ मार्च, २०२३

कसबा पोटनिवडणूक निकाल; भाजपने आत्मपरीक्षण करावे आणि कॉंग्रेसने हुरळू नये

 

'

आधी कोथरूड आता कसबा गृहित धरणा-यांना धडा शिकवा' अशी चर्चा समाज माध्यमांतून रंगली होती. आज निकाल जाहीर झाल्यानंतर मतदारांना गृहीत धरणा-या भाजपला मतदारांनी खरोखरच धडा शिकवला, असे म्हणावे लागेल. ठेच लागल्यामुळे भाजपने आत्मपरीक्षण करावे आणि कॉंग्रेसने, पर्यायाने महाविकास आघाडीने हुरळून जाऊ नये, हा कसबा पोटनिवडणूक निकालाचा धडा आहे. 

मतदारांना कोणीही, कोणत्याही राजकीय नेत्यांनी किंवा राजकीय पक्षांनी गृहीत धरू नये. सुजाण आणि सुबुद्ध मतदार कधी, केव्हा आणि कसा धडा शिकवितील हे अनाकलनीय आहे. कसबा हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता. २८ वर्षांनंतर पहिल्यांदाचा भाजपला येथे पराभवाची धूळ चारली गेली.‌ कसब्यातील नाराजांनी 'नोटा' मताधिकार वापरून की 

की उमेदवार पाहून भाजपला धडा शिकवला? महापालिका किंवा नगरपालिका निवडणुकीत अनेकदा स्थानिक प्रश्न, दिलेला उमेदवार, त्याची ओळख हेच महत्वाचे ठरते. महापालिका पातळीवर राष्ट्रीय राजकारण, प्रश्न फारसे महत्त्वाचे ठरत नाहीत.‌ कसब्यातील पोटनिवडणूक विधानसभेची असली आणि भाजपच्या बालेकिल्ल्यात होणारी होती, राज्यात भाजप व शिवसेना (शिंदे गट) सत्ताधारी होते. तरीही भाजपला पराभव पत्करावा लागला याचे मुळात जाऊन चिंतन करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व ताकद पणाला लावूनही भाजपचा बालेकिल्ला ढासळला.

 


'पार्टी विथ डिफरन्स' अशी टिमकी वाजविणा-या भाजपची भगवी कॉंग्रेस होत चालली आहे.‌ कॉंग्रेस (आय) असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो. दोन्हीही काँग्रेसला मत देऊच नये. आज देशातून दोन्ही काँग्रेस आपल्या कर्माने संपत चालल्या आहेत, त्यांना त्यांच्या कर्माने संपू दे. भाजप, विशेषतः महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमधील आयारामांना पायघड्या घालून भाजपमध्ये प्रवेश दिला. 'आयारामांना पायघड्या आणि निष्ठावंतांचे पोतेरे' कशासाठी? दोन्ही काँग्रेसमधील ओवाळून टाकलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना मोठे करून त्यांची सोय कशासाठी लावली गेली? हे राजकारण तत्कालिक फायद्याचे ठरले तरी दीर्घकाळ ते सोयीचे किंवा फायद्याचे न ठरता अडचणीचेच ठरू शकते.‌

खरे तर पोटनिवडणुकीत मृत झालेल्या महिला किंवा पुरुष लोकप्रतिनिधींच्या निकटच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली जाते.‌ हे चूक की बरोबर हा वेगळा मुद्दा. पण सर्व राजकीय पक्ष हाच निकष लावतात आणि भाजपनेही चिंचवडमध्ये तोच निकष लावला तर हाच न्याय कसब्यात का लावला गेला नाही? की पोटनिवडणुक होती म्हणून भाजपने जुगार खेळायचे ठरवले? 

या आधी कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आणि ब्राह्मण वर्गाची नाराजी ओढवून घेतली. पण कोथरुडकरांना जे जमले नाही ते कसबाकरांनी करून दाखवले. काही वर्षांपूर्वी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतही डोंबिवलीकर मतदारांनी भाजपला धडा शिकविला होता. डोंबिवलीत भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या अधिकृत उमेदवारांना पाडून त्या प्रभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक निवडून आले होते.  

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक झाली होती.‌ काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकीत काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली.तर भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळाली. इथे जयश्री जाधव विजयी झाल्या. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत दिवंगत रमेश कटके यांच्या पत्नीला शिवसेनेने उमेदवारी दिली आणि त्या विजयी झाल्या.‌ भाजपने इथे आधी उमेदवार उभा केला आणि नंतर माघार घेतली. 


कसब्यातील रासने यांचा पराभव आणि धंगेकर यांचा विजय भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी धक्कादायक आहे. काही दिवसांपू्र्वी झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतही भाजपला पराभवाचा धक्का बसला. कसब्यातील सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि शनिवार पेठेतील ब्राह्मण समाज हे भाजपचे पारंपरिक मतदार आहेत आणि तरीही येथे कॉंग्रेसचा उमेदवार विजयी होणे धक्कादायक आहे. यापुढे सर्वसामान्य मतदाराला गृहित धरू नये, असा धडा कसब्यातील मतदारांनी भाजपसहित सर्व राजकीय पक्षांना दिला आहे. या विजयामुळे कॉंग्रेसला पर्यायाने महाविकास आघाडीला आनंदाचे भरते आले आहे. पण म्हणून कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीने किंवा भाजप विरोधकांनी हुरळून जाऊ नये. असेच चित्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत किंवा विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळेल या भ्रमात राहू नये. धंगेकर यांच्या विजयाने संपत चाललेल्या दोन्ही काँग्रेसना, शिवसेनेला थोडी धुगधुगी मिळाली, एवढाच याचा अर्थ आहे. भाजपनेही एकूणच आपल्या धोरणांचा, निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज आहे.‌ 

राजकारणात कोणीही आणि कोणताही पक्ष धुतल्या तांदुळासारखा स्वच्छ नसतो. कोणी होऊन गेले ते सन्माननीय अपवाद म्हणता येतील. सध्याच्या 'मनी, मसल पॉवर' आणि 'निवडून येणे' हीच क्षमता असलेल्या राजकारणात सर्वसामान्य मतदारांच्या हातात 'दगडापेक्षा वीट मऊ' एवढाच पर्याय असतो. आता दगड की वीट निवडायची? तो शेवटी वैयक्तिक प्रश्न आहे. असो. 

पण एकदा कधीतरी निवडणूक आयोगाने जो नकाराधिकार मतदानाचा अधिकार (नोटा) दिला आहे, त्याला सर्वाधिक मते मिळावीत आणि कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराला कमी मते पडून सर्वाधिक मते घेतलेल्या उमेदवाराची निवडणूक रद्द व्हावी अशी इच्छा आहे. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत जाऊ दे पण किमान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकदा तरी असे घडू दे.‌ कसब्यातील ऐतिहासिक निकालाने एक वेगळी वाट चोखाळली गेली आहेच तसेच 'नोटा' बाबतीत व्हावे.

शेखर जोशी

२ मार्च २०२३

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०२३

'सहस्रबुद्धे आणि मंडळी' शताब्दी स्मरणिका

कल्याण येथील सहस्रबुद्धे कुटुंबीयांच्या व्यवसायास यंदा आषाढी एकादशीला १०१ वर्षे पूर्ण झाली.‌ दिवंगत कृष्णाजी विश्वनाथ ऊर्फ बाबुराव सहस्रबुद्धे यांनी १९२१ मध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी कल्याण येथे व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली.‌ सहस्रबुद्धे परिवारातील तिसरी आणि चौथी पिढी हा व्यवसाय सांभाळत आहे. आता सहस्रबुद्धे यांचे सहयोग वस्त्र भांडार आणि सहस्त्रबुद्धे आणि मंडळी (आयुर्वेदिक औषधांचे विक्रेते) या नावाने सहस्त्रबुद्धे कुटुंबियांचा व्यवसाय सुरू आहे. व्यवसायाच्या शताब्दीपूर्ती निमित्ताने सहस्रबुद्धे कुटुंबियांतर्फे नुकतेच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.‌ पितांबरी उद्योग समूहाचे संस्थापक रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
कृष्णाजी विश्वनाथ ऊर्फ बाबुराव सहस्रबुद्धे
 
स्मरणिकेत पाहिला लेख 'मागे वळून पाहताना' ( विश्वास सहस्रबुद्धे) यांचा आहे. 'मनोगत' (अरविंद सहस्रबुद्धे) या लेखात कृष्णाजी विश्वनाथ यांनी सुरू केलेल्या व्यवसायाचा सविस्तर आढावा घेतला आहे.‌ 'सहस्रबुद्धे आणि मंडळी' (डॉ. श्रीनिवास साठे) यांनी सहस्रबुद्धे कुटुंबीयांचे मूळ गाव, त्यांच्या मागील पिढ्या, त्यांचे झालेले स्थलांतर, कृष्णाजी विश्वनाथ आणि त्यांची मुले, त्यांनी व्यवसायाचे केलेले जतन, संवर्धन आणि एकूणच कर्तृत्वाचा आढावा घेतला आहे. विश्वास सहस्रबुद्धे यांनी ' शंभर वर्षांच्या व्यावसायिक प्रवासाची' कथा सविस्तर उलगडून सांगितली आहे.‌ डॉ. रत्नाकर फाटक यांनी समाजसवेचा वारसा जोपासणा-या शतायुषी उद्योगाची कहाणी सादर केली आहे.‌ मनिषा आपटे (सुशिला सहस्रबुद्धे), सौ. माधवी नातू ( लता सहस्रबुद्धे) या माहेरवाशिणींनी कवितेतून आठवणी जागविल्या आहेत.‌ 

 स्मरणिकेत मला भावलेले संस्थान- सहस्रबुद्धे आणि मंडळी (अनंत खरे), बहुकष्टाने कल्पवृक्ष बहरून आला ( सौ. शुभा सहस्रबुद्धे) शंभर वर्षांचा प्रवास (सौ. विद्या सहस्रबुद्धे) सहस्रबुद्धे आणि मंडळी म्हणजे आमच्या अभिमानाचा विषय (सौ. स्मिता सहस्रबुद्धे) राखीव खेळाडूचे मनोगत ( यशवंत आपटे), हिमनग (अच्युत सहस्रबुद्धे), सचोटीने व्यवसायाची शताब्दी ( आनंद सहस्रबुद्धे) तेथे कर माझे जुळती (नेत्रा सहस्रबुद्धे- नरवणे), सहस्रबुद्धे आणि मंडळी म्हणजे मॅनेजमेंटचे कॉलेजच ( प्राची सहस्रबुद्धे-आपटे) यांचेही लेख आहेत. 

 स्मरणिकेत सार्वजनिक गणेशोत्सव, सुभेदारवाडा, कल्याण शताब्दी पुरस्कार मानपत्र, सहस्रबुद्धे कुलप्रतिष्ठान आयोजित कोतवडे येथे झालेल्या सहस्रबुद्धे कुल संमेलनात मिळालेले गौरवपत्र तसेच व्यवसायाशी संबंधित काही आणि सहस्त्रबुद्धे कुटुंबियांची छायाचित्रेही देण्यात आली आहेत.‌

 संपर्क सहयोग वस्त्र भांडार ०२५१- २२०२१७१ 

 सहस्रबुद्धे आणि मंडळी, नरहर सहकारी गृहनिर्माण संस्था, टिळक चौक, कल्याण (पश्चिम) 
 ©️ शेखर जोशी

निस्वार्थी कार्यकर्ता- गंगाधर महादेव उर्फ पंत जोशी

विस्मरणातील कल्याणकर या लेखमालिकेतील निस्वार्थी कार्यकर्ता- गंगाधर महादेव ऊर्फ पंत जोशी हा लेख महाराष्ट्र टाइम्स ठाणे प्लसमध्ये २० फेब्रुवारी २०२३ च्या अंकात प्रसिद्ध झाला.

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०२३

दोन्ही काँग्रेसशी करता संग शिवसेनेचा होई अंत

असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ, अशी मराठी भाषेत म्हण आहे. निवडणूक आयोगाच्या कालच्या निर्णयानंतर यात थोडा बदल करून दोन्ही काँग्रेसशी करता संग, शिवसेनेचा झाला अंत असेच म्हणावे लागेल. कारण मुळात शिवसेना हा पक्ष आधी मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी संघटना म्हणून नावारूपाला आला. नंतर शिवसेनेने हिंदुत्ववादी भूमिका घेतली. आणि त्याचा शिवसेनेला फायदाच झाला. पुढे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांनी शिवसेना भाजप युती करण्याचा निर्णय घेतला. प्रमोद महाजन यांचीही यात महत्त्वाची भूमिका होती. युती झाल्याचा फायदा शिवसेना आणि भाजप दोघांनाही झाला. आधी शिवसेना मोठा भाऊ व भाजप धाकटा भाऊ असे महाराष्ट्रात चित्र होते. नंतर यात बदल होऊन भाजप मोठा भाऊ आणि शिवसेना छोटा भाऊ असे महाराष्ट्रात घडले.‌ हिंदुत्ववादी विचारधारा घेऊन शिवसेना आणि भाजप यांनी एकत्रच असायला हवे असे माझे तेव्हाही मत होते, आजही आहे आणि यापुढेही ते राहील. भाजपची युती करण्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी इतर पक्षांशीही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष युती, आघाडी केली होती. कोणताही राजकीय पक्ष सूर सापडेपर्यंत असे प्रयोग करत असतोच. पण बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाला इतर नेत्यांच्या किंवा पक्षाच्या दावणीला बांधले नव्हते, आपला पक्ष गहाण ठेवला नव्हता. उद्धव ठाकरे यांनी ती मोठी चूक केली. आणि शिवसेना दोन्ही काँग्रेसच्या दावणीला बांधली.‌ उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे भाजपने त्यांना फसवले, मुख्यमंत्रीपद वाटून घेऊ असे बंद दाराआड सांगितले आणि नंतर शब्द फिरवला. हे सत्य आहे असे मानले तरी २०१९ मध्ये जनादेश भाजप शिवसेना यांनाच मिळाला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी भाजपबरोबर जाऊन सत्तेत सहभागी होऊन भाजपच्या नाकी नऊ आणता आले असते. किंवा महत्वाची खाती पदरात पाडून घेता आली असती.‌ नाहीतरी दोन्ही काँग्रेसबरोबर जाऊन मुख्यमंत्रीपद वगळता इतर सर्व महत्वाच्या खात्यावर पाणीच सोडावे लागले. सर्वसामान्य शिवसैनिकांला मुख्यमंत्री करेन, असा शब्द बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता तर मग तुम्ही मुख्यमंत्री होण्याऐवजी सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून तेव्हाच एकनाथ शिंदे यांन किंवा शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांला मुख्यमंत्री म्हणून मान्यता द्यायला हवी होती. पण तुम्हालाच मुख्यमंत्री होण्याची हाव सुटली आणि तिथेच चुकले. विश्वासार्हता गमावलेल्या आणि पाठीत खंजीर खुपसणारे अशी ज्यांची ओळख आहे त्या शरद पवार आणि देशातून हद्दपार होत चाललेल्या दोन्ही काँग्रेसशी तुम्ही हातमिळवणी केली, हिंदुत्ववादी विचारधारेशी फारकत घेतली इथेच चुकले.‌ त्यांनी विशेषतः शरद पवार यांनी फेकलेल्या जाळ्यात तुम्ही फसलात तिथेच चुकलात. अर्णव गोस्वामी, कंगना राणावत, पालघर साधू हत्याकांड, क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव मुंबईतील उद्यानाला देणे, नवाब मलिक, सचिन वाझे या सगळ्या प्रकरणी शरद पवार यांनी किंवा तुमच्या बदसल्लागारांनी दिलेल्या सल्ल्यानुसार तुम्ही जे वागलात, निर्णय घेतले त्या प्रत्येक वेळी तुम्ही तोंडघशी पडलात, बदनाम झालात.‌ पण तरीही भानावर आला नाहीत, तिथे चुकले.
एकनाथ शिंदे आणि काही शिवसेना आमदारांनी शिवसेना सोडल्यानंतर त्याच वेळी दोन्ही काँग्रेसची साथ सोडली असती आणि दोन्ही काँग्रेसच्या दावणीला बांधलेला शिवसेना पक्ष मोकळा केला असतात तरी आज तुमच्यावर ही वेळ आली नसती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कष्टाने ऊभी केलेली शिवसेना तुम्ही तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे, असंगाशी संग केल्यामुळे हातातून घालवली आहे.
भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांच्याबरोबर जाऊन शपथ घेणे हे चुकीचेच होते. त्याचे समर्थन अजिबात नाही. विश्वासार्हता गमावलेल्या शरद पवार यांच्याबरोबर मुळातच जाणे चुकीचेच होते. शेवटी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनाही तोंडघशी पडावे लागले. आता बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा निष्ठावान सर्वसामान्य कार्यकर्ता असलेल्या एकनाथ शिंदे यांना बरोबर घेतले आहे. आता निवडणूक आयोगानेही शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा देऊन शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. ( उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यायचे ठरविले आहे.‌ तिथे काय निर्णय लागेल तो लागेल) त्यामुळे आता बृहन्मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच विधानसभा निवडणुका भाजप व मुख्यमंत्री शिंदे यांनी गुण्यागोविंदाने लढवाव्यात. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही काँग्रेसच्या एकाही आयारामांना पायघड्या घालून निष्ठावंतांचे पोतेरे करू नये अशी अपेक्षा. मुख्यमंत्री शिंदे यांनीही दोन्ही काँग्रेसच्या एकाही आयारामांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांनी शिवसेना भाजप युतीचे बघितलेले स्वप्न काही काळापुरते भंगले होते असे समजून पुढील वाटचाल सुरू करावी आणि दोन्ही काँग्रेसला महाराष्ट्रात पूर्णपणे गाडावे अशी अपेक्षा.

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३

विश्वासार्हता गमावलेल्या शरद पवार यांच्यावर विश्वासच कसा ठेवलात?

महाराष्ट्रातील गाजलेला पहाटेचा शपथविधी आणि सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याच संमतीने स्थापन झाले होते, असे 'उघड' सत्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आणि महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले. फडणवीस काय म्हणाले, त्यावर शरद पवार काय बोलले त्याची पुनरावृत्ती करत नाही. पण फडणवीस यांच्या या उघड बोलण्याने शरद पवार कसे उघडे पडले? राष्ट्रवादी काँग्रेस कशी कोंडीत सापडली, आत्तापर्यंत या सगळ्याला अजित पवार यांना दोषी ठरवले जात होते पण हे मोठ्या पवारांनीच कसे घडवून आणले, वगैरे वगैरे विवेचन, विश्लेषण केले जात आहे. मला काही वेगळे मुद्दे मांडायचे आहेत. हे सगळे घडून गेले ते आज उघड करावे, अशी कोणती परिस्थिती अचानक निर्माण झाली? सांगायचेच होते तर महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर लगेचच फडणवीस यांनी हे का सांगितले नाही? फडणवीस यांनी हा जो काही गौप्यस्फोट केला तेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सांगितले होते. पहाटेचा तो शपथविधी ही शरद पवार यांचीच खेळी हैती, असे ते म्हणाले होते. आणि नंतर माझा तो कयास होता, अशी सारवासारवही त्यांनी केली होती. मुळात जयंत पवार हे असे काही स्वतःच्या मनाने बोलणार नाहीत. हे बोला असे आणि काय प्रतिक्रिया उमटते ते पाहू असे दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच त्यांना सांगितले आणि ते बोलले. आता जयंत पाटील यांच्या चार पावले पुढे जाऊन फडणवीस यांनी पत्ते उघडले. हे ही शरद पवार यांच्याच संमतीने, सांगण्यावरून झाले असेल, अशा शंकेला वाव आहे.
ज्या माणसाची राजकीय विश्वासार्हता पार धुळीला मिळालेली आहे, ज्या माणसाने आजवर फक्त आणि फक्त विश्वासघाताचेच राजकारण केले, तोच ज्या माणसाचा इतिहास आहे त्या माणसावर भाजपने, मोदी- शहा आणि फडणवीस यांनी विश्वासच कसा ठेवला? हा प्रश्न मुळात निर्माण होतो. त्याचे उत्तर काय? की भाजप आणि राष्ट्रवादी यांनी मिळून शिवसेना संपविण्यासाठी हे नाटक केले होते? असा प्रश्न उपस्थित होतो. शिवसेनेने काही ना काही कारणाने आपला विश्वासघात केला असे भाजप, फडणवीस यांना वाटत होते तर शिवसेना फोडण्याचा जो प्रयोग आत्ता केला तो तेव्हा का नाही केला? शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाण्याचा निर्णय घेण्याऐवजी शिवसेनेतीलच एक गट फोडता आला असता. खरे तर २०१९ मध्ये महाराष्ट्रासारखे महत्वाचे राज्य हातातून जाऊच कसे दिले? अमित शहा यांनी महाराष्ट्रात तेव्हा का नाही लक्ष दिले? फडणवीस यांचे पंख कापण्यासाठी? त्यांना धडा शिकविण्यासाठी? याची उत्तरे कधीच मिळणार नाहीत.
फडणवीस यांच्या या गौप्यस्फोटाकडे आणखी काही वेगळ्या भूमिकेतून पाहता येईल का? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याशी संबंधित मालमत्ता जप्तीवर मोहोर उमटवली जाणे, त्याचवेळी गोंदिया येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच व्यासपीठावर येणे आणि राज्याचे विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पुढील मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी केलेले आवाहन. त्यावर आमची तेवढी ताकदच नाही, असे काही होऊ शकत नाही, असे पवार यांनी त्यावर दिलेले उत्तर, यातून काही नवीन राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे का? हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या ऐन तोंडावर फडणवीस यांनी पहाटेच्या त्या शपथविधीचे प्रकरण पुन्हा बाहेर काढले आहे. याचा काही राजकीय परिणाम निवडणूक निकालावर होईल का? हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी इशारा आहे का?कदाचित या पोटनिवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारण काही वेगळे वळण घेईल का? पाहू या काय होते? ©️ शेखर जोशी १४ फेब्रुवारी २०२३

शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०२३

शिवपिंडीवरील बर्फ आणि विरोधकांच्या हातात कोलीत

त्र्यंबकेश्वर- संग्रहित छायाचित्र गुगल फोटोच्या सौजन्याने
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील शिवपिंडीवर बर्फ जमा होण्याचा प्रकार बनावट असल्याचे उघड झाले आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात ज्यांनी हा प्रकार घडवून आणला तो पुजारी आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात कोणत्याही दबावाला बळी न पडता कठोर कारवाई झालीच पाहिजे. गेल्या वर्षी ३० जून २०२२ या दिवशी मंदिरातील एक पुजारी आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांनी शिवपिंडीवर बर्फ जमा झाल्याची ध्वनिचित्रफित तयार करून ती समाजमाध्यमातून प्रसारित करण्यात आली. घडलेल्या घटनेनंतर देवस्थानच्या ट्रस्टने तीन विश्वस्त सदस्यांची समिती नेमून समितीला अहवाल सादर करण्यास सांगितला. या समितीने मंदिराचे सीसीटीव्ही चित्रीकरण आणि चौकशी करून बर्फ तयार झाल्याचा हा प्रकार बनावट असल्याचा अहवाल सादर केला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत 'पुजारी' असा उल्लेख करण्यात आला आहे.‌ त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघाने पुजारी म्हणजे पुरोहित नाही. त्र्यंबकेश्वर येथे हे हे दोन घटक वेगवेगळे आहेत, अशी जाहीर सूचनाच पुरोहित संघाने केली आहे. तथाकथित ढोंगी पुरोगामी, अंनिसवाले आणि हिंदू धर्म, संस्कृतीविरोधक आधीच टपून बसलेले असतात. त्यांच्या हातात नाहक कोलीत मिळेल असे कृत्य करायचेच कशाला? हा सगळा प्रकार चीड आणणारा आहे. या प्रकरणातील आरोपी फरार झाले असून ते अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले जाते. लाखो भाविकांच्या श्रद्धेशी खेळण्याच हा प्रकार संतापजनक आहे. या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप किंवा दबाव आणला जाणार नाही हे पाहिले पाहिजे. हा प्रकार पुजा-यानी केला आहे. भविष्यात कोणा पुरोहिताकडूनही समजा असे गैरकृत्य घडले तर त्यांच्या विरोधातही कठोर कारवाई केली जावी. मुळातच भावना,श्रद्धेशी खेळण्या-यांना कोणतीही दयामाया दाखविली जाऊ नये.‌बर्फ ठेवणारे ते आरोपी महादेवाच्या पिंडीवरील विंचू ठरू नयेत, ही त्या त्रंबकेश्वरचरणी प्रार्थना.

मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३

ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल असोसिएशनतर्फे डोंबिवलीत दोन दिवसीय परिषद

ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल असोसिएशतर्फे येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी डोंबिवलीत सातव्या व्यावसायिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे सहयोगी संचालक अरविंद कोऱ्हाळकर यांनी दिली. ही परिषद डोंबिवली पूर्व येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात होणार असून परिषदेस महाराष्ट्रासह देश- विदेशातून सातशे उद्योजक उपस्थित राहणार आहेत, असेही कोऱ्हाळकर यांनी सांगितले. उद्योग, व्यवसाय याविषयी ब्राह्मण समाजात जागरूकता निर्माण करून अधिकाधिक ब्राह्मण युवकांना उद्योग, व्यापार, व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी दिली.
तर 'लोकल ते ग्लोबल' ह्या संकल्पनेवर ही परिषद आधारित असून उद्योज क्षेत्रातील दीपक घैसास, संजय लोंढे, बँकिंग क्षेत्रातील सतीश मराठे, आशुतोष रारावीकर आदि मान्यवरही उपस्थित राहणार आहेत. लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस, भाजप उद्योग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार यांचे मार्गदर्शन परिषदेत होणार आहे, असे 'परिवर्तन २०२३' चे प्रमुख महेश जोशी यांनी सांगितले. दोन दिवसांच्या या परिषदेत व्यावसायिक प्रदर्शन, नेटवर्किंगद्वारे व्यवसाय वाढविण्यासाठी ई प्लॅटफॉर्म उपलब्ध असणार असल्याची माहिती उद्योजिका श्वेता इनामदार यांनी दिली. परिषदेच्या नावनोंदणीसाठी www.parivartan23.in या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच अधिक माहितीसाठी ७२०८२६६१६९ किंवा ८३६९९३१३६६ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.