
बहुसंख्य हिंदूंच्या भावनांची काळजी न करता धर्मांध, आक्रमक मुसलमान, ख्रिश्चन यांची काळजी ज्यांना वाटते, क्रूरकर्मा औरंगजेबाचे छायाचित्र स्टेटसला ठेवल्यानंतर कोल्हापुरात ताण तणाव निर्माण झाला म्हणून बहुसंख्य हिंदूंना दोषी ठरविणारे, पण मुळात क्रूरकर्मा औरंगजेबाचे स्टेटस का ठेवले? असा प्रतिप्रश्न न करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला क्रूरकर्मा औरंगजेबाचा इतका पुळका का येतो? हा खरा प्रश्न आहे.
आधी औरंगाबाद येथे संदल मिरवणुकीत औरंगजेबाचे छायाचित्र नाचविल्यानंतर तसेच कोल्हापूर येथे औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यानंतर जो ताण तणाव, वाद निर्माण झाला त्यावर पवार यांनी मुळात क्रूरकर्मा औरंगजेबाचे छायाचित्र मिरवणुकीत का नाचवले? आक्षेपार्ह स्टेटस का ठेवले? याबद्दल चकार शब्द काढला नाही किंवा ज्या लोकांनी जाणीवपूर्वक छायाचित्र नाचवले, स्टेटस ठेवले ती कृती चुकीची, देशविघातक, समाजविघातक आहे, या चुकीबद्दल जे दोषी असतील त्यांना कायद्याने जी काही शिक्षा असेल ती झालीच पाहिजे, असे वक्तव्यही पवारांनी केले नाही. मात्र त्याचवेळी, काही लोक चुकीचे वागत असतील पण बहुसंख्य समाजाने संयमाची भूमिका घेतल्यानंतर, राज्य शासनाने सामंजस्याची भूमिका घेतल्यानंतर ही परिस्थिती बदलेल, शांतता प्रस्थापित होईल. त्याला सर्वांनी साथ द्यावी असे मात्र साळसूदपणे सांगतात. उपदेशाचा डोस हिंदूनाच पाजतात, हे अनाकलनीय आहे. हिंदूंनी जशास तसे उत्तर दिले त्याची पोटदुखी शरद पवार यांना झाली असावी.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेच मुस्लिमांचे लागूंचालन करत असतील, औरंगजेबाची भलामण करणा-यांच्या विरोधात मुग गिळून गप्प बसत असतील तर त्यांचे बगलबच्चे, राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आपल्या साहेबांचीच री ओढणार. ते ही औरंगजेबाचीच भलामण, उदात्तीकरण करणार यात नवल ते काय? राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष इलियास किरमाणी यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या जिल्हाधिकार्यांना पत्र लिहिले आणि औरंगाबाद जिल्ह्यात औरंगजेबाच्या महालाचे/ वास्तूचे संवर्धन करावे, अशी मागणी केली होती. याआधीही शरद पवार यांचे मानसपुत्र असलेल्या जीतेंद्र आव्हाड यांनाही औरंगजेबाचा पुळका आला होता. औरंगजेबाने संभाजीराजांना जिथे मारले तिथे विष्णूचेही मंदिर होते. औरंगजेब जर हिंदू द्वेष्टा असता तर त्याने हे मंदिरही फोडले असते, असे विधान आव्हान यांनी केले होते. मात्र सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर आव्हाड यांनी सारवासारव केली.
अहमदनगर, कोल्हापूर, संभाजीनगर, बीड येथे औरंगजेबाच्या पोस्टर भरून तणाव निर्माण झाला. मुळात क्रूरकर्मा औरंगजेब किंवा टिपू सुलतान हे भारताचे, हिंदुस्थानाचे राष्ट्रपुरुष नाहीत. ते आक्रमक आणि हिंदुद्वेष्टेच होते. त्यांनी भारतातील अनेक मंदिरे फोडली, हिंदू आया बहिणींवर अत्याचार केले. अशा क्रूरकर्मा औरंगजेब आणि टिपू सुलतानचा पुळका शरद पवार यांना किंवा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला का येतो? हा खरा प्रश्न आहे.
संभाजीनगर येथे बोलताना शरद पवार यांनी, मी संभाजीनगर म्हणणार नाही तर औरंगाबादच म्हणणार असे वक्तव्य केले. मात्र या वादग्रस्त वक्तव्यावर समाज माध्यमातून टीका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार असे बोललेच नाहीत असे सांगण्यात आले. कोल्हापुरातील घटनेनंतर लगेच रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरूप देणे योग्य नाही त्यामुळे दोन समाजात कटूता निर्माण होते असे आश्चर्यकारक, चीड आणणारे विधानही शरद पवार यांनी केले.
शरद पवार यांना येथील मुस्लिम, ख्रिश्चन यांची काळजी वाटते. मात्र बहुसंख्या हिंदूंची काळजी वाटत नाही हे दुर्दैव आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना 'जाणता राजा' म्हणू नका कारण समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना या नावाने संबोधले होते, असे पवार म्हणतात तर पुण्यात लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचे शिल्प एका रात्रीत हटविल्यानंतर ती कृती अयोग्य होती असे पवार कधीही बोलत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचेच पर्यायाने शरद पवार यांचे पिल्लू असलेल्या संभाजी ब्रिगेडने वेळोवेळी ब्राह्मण ज्ञातीबद्दल आक्षेपार्ह टीका केली. पण त्याबाबत साधा निषेधचा सुरही पवार यांनी कधी आळवला नाही. ऋषितुल्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पवारांचेच मानसपुत्र जीतेंद्र आव्हाड यांनी अश्लाघ्य शब्दात बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली. परंतु पवार यांनी आव्हाड यांचे कान उपटले नाहीत. पुरंदरे यांच्या निधनानंतर समाजमाध्यमांवरून अत्यंत खालच्या पातळीवरील शेरेबाजी त्यांच्याविषयी करण्यात आली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक आणि बगलबच्चे मोठ्या प्रमाणात होते. मात्र त्यावेळीही शरद पवार यांनी आपली नापसंती व्यक्त केली नाही. समाज माध्यमांतून अशा प्रकारची शेरेबाजी करणे, टीका करणे चुकीचे, अयोग्य आहे असेही कधी म्हणाले नाहीत. रामनवमी, गुढीपाडवा, शिवराज्याभिषेक दिन या दिवशी अर्थात हिंदूं सण, हिंदू अस्मिता दिनाच्यादिवशी धर्मांध मुस्लिमांकडून हिंदूंच्या मिरवणुकीवर, शोभायात्रांवर दगडफेक होते. मात्र तेव्हाही पवार कधी अवाक्षर काढत नाहीत.
काही वर्षांपूर्वी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्लामी दहशतवादी विरोधात कठोर पावले उचलू असे वक्तव्य केले. त्यावेळी पवारांचा बगलबच्चा असलेल्या जीतेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केले. आता फ्रान्समधील घटनेचा भारताशी काय संबंध? किंवा
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्लामी दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलू असे म्हटले तर आव्हाड किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या
पोटात दुखायचे कारण काय? पण त्यावेळीही पवार यांनी आव्हाडांना खडसावले नाही. याच आव्हाडांनी पोलीस चकमकीत ठार झालेल्या इशरत जहाँ या दहशतवादी तरुणीच्या नावाने रुग्णवाहिका सुरु केली. तेव्हाही पवार यांना जाब विचारावा वाटला नाही. याच आव्हाडांनी पॅलेस्टाईनमधील मुसलमानांना पाठिंबा म्हणून इथे 'सेव्ह गाझा' असे टी शर्ट घालून आंदोलन केले होते. तेव्हाही पवार यांनी चकार शब्द काढला नाही. म्यानमारमधील घटनेच्या निषेधार्थ मुंबईत रझा अकादमीने मोर्चा काढला. दंगल घडवली, बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयासमोर असलेल्या 'अमर जवान ज्योती' ची नासधूस केली. मात्र त्याविरुद्धही शरद पवार यांनी कधी तोंड उघडले नाही.
माजी खासदार निलेश राणे यांनी पवारांची तुलना औरंगजेबाशी केल्यानंतर मोठा गदारोळ झाला. औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार आहेत असे ट्विट राणे यांनी केले होते. शरद पवार यांच्यावर समाज माध्यमातून अनेकदा 'बाबरमतीकर' अशी टीका केली जाते किंवा त्यांची तुलना औरंगजेबाशी केली जाते. इथे एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की समाज माध्यमांतून अशा प्रकारची टीका किंवा औरंगजेबाशी तुलना शरद पवार यांचीच का केली जाते? काँग्रेसचे नेतेही मुस्लिम लांगूलचालन करतात. पण काँग्रेसच्या नेत्यांची कधी औरंगजेबाशी तुलना केली गेली नाही. शरद पवार यांच्यावर या विषयावर जेवढी टीका केली जाते, तशी काँग्रेस नेत्यांवर का केली जात नाही? दरवेळी आपली किंवा आपल्याच पक्षाची तुलना औरंगजेबाशी का केली जाते? असा प्रश्न शरद पवार यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी स्वतःला विचारावा.
पक्षाच्या नावात 'राष्ट्रवादी' असले तरी आपले विचार, कृती आणि उक्ती ही त्या विरोधात आहे हे वेळोवेळी दिसून आले आहे. त्यामुळे तुम्ही कसले राष्ट्रवादी तुम्ही तर राष्ट्रघातकी असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
शेखर जोशी