प्रेमा तुझा रंग कसा?
शेखर जोशी
हिंदी/ भारतीय चित्रपट सृष्टीच्या आजवरच्या इतिहासात नायक नायिका विरहित चित्रपट फार कमी प्रमाणात तयार झाले. नायक नायिका, त्यांचे एकमेकांवरील प्रेम, प्रेमात येणारे अडथळे, नायक नायिकेची प्रेमगीते हा आपल्या हिंदी किंवा प्रादेशिक भाषांमधील सर्व चित्रपटाचा मुख्य आधार राहिला आहे. ज्येष्ठ सिनेपत्रकार आणि लेखिका अनिता पाध्ये यांनी लिहिलेल्या 'प्यार जिंदगी है!' या पुस्तकात त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या काही निवडक हिंदी प्रेमचित्रपटांचा निर्मितीप्रवास आणि त्याच्या वैशिष्ठ्यांचे अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. हे विवेचन करताना ते कुठेही कंटाळवाणे होणार नाही याचीही काळजी पाध्ये यांनी घेतली आहे बॉलीवूड चित्रपटाचे प्रेक्षक, बॉलीवूड चित्रपटांच्या नायक नायिकांवर आणि चित्रपटावर भरभरून प्रेम करणारे चाहते, चित्रपट अभ्यासक यांच्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरले आहे.
हिंदी प्रेमपट या विषयावर पाध्ये यांनी पाच वर्ष काम केले. अभ्यास, संशोधन आणि संबंधित व्यक्तींना भेटून, त्यांच्याशी चर्चा करून पुस्तकाचे लेखन केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या आजवरच्या इतिहासात हजारो प्रेमचित्रपटांची निर्मिती झाली, मात्र यापैकी निवडक १२ चित्रपटांचा समावेश पुस्तकात करण्यात आला आहे. १९५० ते १९९० या वर्षांत प्रदर्शित झालेल्या आणि प्रेमाच्या विविध रंगांचे दर्शन घडविणाऱ्या बारा चित्रपटांची निवड लेखिकेने पुस्तकासाठी केली आहे.
पुस्तकात देवदास, तेरे घर के सामने, अनुपमा, आराधना, बॉबी, छोटी सी बात, कभी कभी, एक दुजे के लिए, कयामत से कयामत तक, आशिकी, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे आणि हम दिल दे चुके सनम या चित्रपटांचा समावेश आहे. प्रत्येक चित्रपटाच्या प्रकरणाला पाध्ये यांनी दिलेली शीर्षके अत्यंत समर्पक आणि चपखल आहेत. या शीर्षकातून त्यांनी चित्रपटाचे संपूर्ण सार एका वाक्यात सांगितले आहे. प्रेमविव्हळ नायकाची अजरामर शोकांतिका- देवदास, नि:शब्द प्रेमकथा- अनुपमा, अव्यक्त प्रेमाची लोभस कथा- छोटी सी बात किंवा बंडखोर प्रेमाची शोकांतिका- एक दुजे के लिये ही काही वानगीदाखल उदाहरणे.
![]() |
चित्रकार रोहन पोरे यांनी काढलेली चित्रे |
प्रेमकथा असलेल्या चित्रपटात खलनायक असायलाच हवा, हा आपल्या हिंदी चित्रपटांचा एक अलिखित नियम आहे. मात्र या नियमाला छेद देऊन विजय आनंद उर्फ गोल्डी यांनी 'तेरे घर के सामने' हा चित्रपट तयार केला. हा चित्रपट केवळ खलनायक विरहित नव्हता तर विनोदी अंगाने फुलत जाणारी प्रेमकथा होती. किंवा 'देवदास' चित्रपटातील दोन लोकप्रिय संवाद, आत्तापर्यंत तयार झालेले १८ 'देवदास' चित्रपट व त्याची माहिती, चित्रपटविषयक काही रंजक घटना याचीही माहिती लेखिका अगदी सहजपणे देऊन जातात.
प्रत्येक चित्रपटाच्या प्रकरणात चित्रपटाची कथा, चित्रपटाची ठळक वैशिष्ठ्ये, चित्रपटाशी संबंधित काही किस्से, रंजक माहिती, चित्रपट प्रदर्शित झाल्याची तारीख, वर्ष, कलाकार, दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक, गीतकार, संगीतकार, सिनेमॅटोग्राफर, चित्रपटातील गाणी, गायक गायिका, चित्रपटाला मिळालेले पुरस्कार याचीही माहिती देण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चित्रपटातील काही निवडक छायाचित्रेही पुस्तकात आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला चित्रकार रोहन पोरे यांनी काढलेले चित्र पुस्तकात अधिकच रंग भरतात. पुस्तकाची प्रस्तावना प्रसिद्ध चित्रपट कथा, पटकथा लेखक कमलेश पांडेय यांची आहे
हिंदी चित्रपट म्हणजे सर्वसामान्य माणसांसाठी स्वप्नांचे जग. दैनंदिन जीवनातील कटकटी, दु:ख, काळजी विसरून दोन अडीच तास तो चित्रपटाशी, कथानकाशी, त्यातील संवाद, गाण्यांशी तो एकरुप होतो. प्रेक्षकांच्या मनावर वर्षानुवर्षे अधिराज्य गाजविणाऱ्या चित्रपटांवरील हे पुस्तक प्रेक्षक आणि वाचकांसाठी अनोखी भेट आहे.
प्यार जिंदगी है!
बारा लोकप्रिय हिंदी रोमॅंटिक चित्रपटांचा निर्मितीप्रवास
लेखिका- अनिता पाध्ये
प्रकाशक- देवप्रिया पब्लिकेशन्स
पृष्ठे- ३२७, मूल्य- सहाशे रुपये
- शेखर जोशी