महाभाग कसला? महाबोगस एपिसोड...
प्रेक्षकहो, 'ठरलं तर' मालिकेला आपटवा
शेखर जोशी
अगं बाई तुला एखाद्या गरीब, गरजू माणसाला मदत करायची आहे तर एखाद्या चांगल्या संस्थेत जा आणि आर्थिक मदत कर. कोण, कुठला, ओळख ना पाळख असलेला रस्त्यावरचा माणूस भेटतो आणि सायली त्या माणसाला आपल्या योजनेत सामील करून घेते? प्रथितयश वकील असलेला अर्जुन या कामासाठी त्याच्या माहितीतील शिक्षा भोगून सुटलेल्या एकाची मदत घेणार असतो तर सायली आपली अक्कल पाजळते आणि त्याला विरोध करते.
रविराज किल्लेदार. हा ही हुषार, गाजलेला वकील. पण आपला भाऊ, आपली मुलगी प्रिया काय करतात? हे त्याला कळत नाही. दोघेही त्याला गुंडाळून ठेवतात. प्रिया कोणत्या कॉलेजमध्ये जाते? तिथे काय दिवे लावते? स्टडी टूरच्या नावाखाली काय करते? हे याला कळत नाही.
तो चैतन्य महामुर्ख. अण्णा व साक्षीच्या घरात राहतो. पण या दोघांचे बोलणे कधीच त्याच्या कानावर पडत नाही. सायलीला कीडनॅप करून घरात आणून ठेवलाय, तिला तिथून दुसरीकडे घेऊन जाताहेत आणि घरात इतकं काय काय घडताय पण चैतन्यला यातले काही कळत नाही.
अस्मिता गेल्या अनेक महिन्यांपासून माहेरीच येऊन राहिलेली आहे. सायली विरोधात कट कारस्थाने सुरू आहेत. स्वतः काही गुन्ह्यात पकडली गेली आहे. तरी ती अजूनही माहेरीच राहते आहे. मधुनच कधीतरी तिची आई व पूर्णा आजी तिला मी मारल्यासारखे करते आणि तू रडल्यासारखे कर असे बोलतात पण तिला येथून चालती हो म्हणत नाहीत.
![]() |
प्रतिमा कुठे गायब झाली? |
सगळ्यात महत्त्वाचे. प्रतिमा. काही भागात तिला दाखवून आता पूर्णपणे गायब केली आहे. त्या कुसुमच्या घरून ती कुठे गेली? अदृश्य झाली काही पत्ता नाही. मधुभाऊ बिचारे अजून विलासच्या खुनाच्या आरोपाखाली आतच आहेत. वात्सल्य आश्रम खटला, प्रतिमा हे मालिकेतील मुख्य घटक आहेत, पण तेच कुठे दिसत नाहीत. मधेच कधीतरी त्यांची आठवण होते आणि चटणी, कोशिंबीरीसारखे तोंडी लावायला त्यांचा उल्लेख केला जातो. हे मूळ कथानक पुढे जाण्याऐवजी फालतू आणि रटाळ उपकथानक जोडून एपिसोड वाढवत चालले आहेत. महाएपिसोडच्या नावाखाली तासभर प्रेक्षकांच्या माथी काहीही थोपवले जात आहे. सायली अर्जुनचा हनिमून, माथेरान भाग त्याचाच एक भाग होता.
शेजो उवाच
https://youtu.be/rGdvBpCttvo?feature=shared
प्रेक्षक मालिका पाहताहेत म्हणून तुम्ही टीआरपीत सध्या एक नंबरवर आहात. पण असा एपिसोडकाढूपणा केलात तर धाडकन खाली आपटायला वेळ लागणार नाही. नव्हे आता ती वेळ आली आहे. फक्त प्रेक्षकांनी 'ठरलं तर मग' असे म्हटले पाहिजे. इथे काही जण म्हणतील, रिमोट तुमच्या हातात आहे, बंद करा, पाहू नका. अनेक प्रेक्षक तसे करतातही. पण
आपण प्रेक्षकांच्या जे माथी मारू ते चांगलेच आहे, आम्ही आम्हाला पाहिजे ते करू असे करण्याचा ठेका वाहिनी, लेखक, दिग्दर्शक, निर्माता यांना कोणीही दिलेला नाही. निषेधाचा सूर उटटलाच पाहिजे. प्रेक्षकांनी मालिकेला आपटायचे ठरवले, समाज माध्यमातून टीका केली की मालिकांना कशा प्रकारे गाशा गुंडाळावा लागतो, वेळ बदलावी लागते त्याची उदाहरणे आहेत. 'ठरलं तर मग' असे प्रेक्षकांनी मनाशी ठरवून तुमची मालिका पाडायच्या आधी जागे व्हा, कथानक वेगाने पुढे न्या, महाएपिसोडच्या नावाखाली काहीही प्रेक्षकांच्या माथी मारू नका.
- शेखर जोशी
७ एप्रिल २०२४
शेजो उवाच
https://youtu.be/rGdvBpCttvo?feature=shared