मंगळवार, १ एप्रिल, २०२५
महाबळेश्वर येथे महापर्यटन उत्सव
महाबळेश्वर येथे महापर्यटन उत्सव
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण
मुंबई,दि.१
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व स्थानिक जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २ ते ४ मे दरम्यान महाबळेश्वर येथे
तीन दिवसांच्या महापर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
महोत्सवात स्थानिक लोकसंस्कृतीचा समावेश असलेले कार्यक्रम तसेच नामांकित कलाकारांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन, महाबळेश्वर परिसरातील उदा. पाचगणी, कास पठार, कोयनानगर, तापोळा, गड-किल्ले दर्शन व इतर पर्यटन स्थळ, दर्शन सहलीचे आयोजन, पर्यटकांसाठी विविध श्रेणीच्या तंबू निवास उभारणी करण्यात येणार आहे. पॅराग्लाडींग, पॅरामोटरींग, जलक्रिडा, ट्रेकींग, रॉक क्लायबींग, घोडेस्वारी आदी विविध साहसी उपक्रम राबविणे, स्थानिक बचत गटांचे हस्त कला-कृतीचे प्रदर्शन व विक्रीचे दालन उभारणी, स्थानिक पाककलाकृती संस्कृती व खाद्य महोत्सव दालन उभारणी, महाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २ मे रोजी महोत्सवाचे उदघाटन होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे या वेळी उपस्थितीत राहणार आहेत.
तीन दिवसांच्या या महोत्सवात महाबळेश्वर येथील प्रेक्षणीय स्थळे, स्थानिक कला – संस्कृती, खाद्यसंस्कृतीची ओळख पर्यटकांना करून देण्याबरोबरच पर्यटन वृद्धी व्हावी या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई उपस्थित होते.
सोमवार, ३१ मार्च, २०२५
मुंबईकरांसाठी उन्नत मार्गावरील निसर्ग भ्रमंती
मुंबईकरांसाठी मलबार हिल येथे
उन्नत मार्गावर निसर्ग भ्रमंती
मुंबई, दि. ३१ मार्च
निसर्गाच्या कुशीत भ्रमंती करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने निसर्ग उन्नत मार्ग उपलब्ध करून दिला आहे. कमला नेहरू उद्यान व फिरोजशहा मेहता उद्यान येथे घनदाट झाडांमधून मुंबईकरांना आता भ्रमंती करता येणार आहे.
दररोज पहाटे ५ ते रात्री ९ या वेळेत हा उन्नत मार्ग सुरू राहणार असून भारतीय व परदेशी नागरिकांना यासाठी अनुक्रमे २५ आणि १०० रुपये शुल्क मोजावे लागणार आहे.
बृहन्मुंबई महापालिका जल अभियंता विभागातर्फे हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. येथे भेट देण्यासाठी
https://naturetrail.mcgm.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन तिकीट काढता येणार आहे. या मार्गावर भ्रमंती करण्यासाठी एका वेळी फक्त २०० जणांना चार प्रवेश देण्यात येणार आहे.
या उन्नत मार्गावर भ्रमंती करताना १०० हून अधिक झाडांसह वेगवेगळे पक्षीही पाहता येणार आहेत.
उन्नत मार्गावरील निसर्ग भ्रमंती
रविवार, ३० मार्च, २०२५
सामूहिक हनुमान चालीसा पठण
हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी देशभरात
सामूहिक हनुमान चालीसा पठण
- मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात एक
हजारांहून अधिक हिंदूंचा सहभाग
ठाणे, दि. ३० मार्च
हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी सनातन संस्थेतर्फे शनिवारी संपूर्ण देशभरात सामूहिक श्री हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात होता. या निमित्ताने ठिकठिकाणच्या श्री हनुमान, श्रीराम मंदिरात झालेल्या कार्यक्रमात २० हजारांहून भाविक,साधक, हिंदुत्ववादी सहभागी झाले होते.
मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील कार्हयक्रमात एक हजारांहून अधिक हिंदू नागरिक सहभागी झाले.ठाणे येथील पितांबरी उद्योगसमूहातील कर्मचाऱ्यांनीईह सामूहिक हनुमानचालिसा पठण केले.
शनिवार, २९ मार्च, २०२५
स्वयंसेवक,प्रचारक,मुख्यमंत्री ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची संघ मुख्यालयाला भेट!
स्वयंसेवक,प्रचारक,मुख्यमंत्री ते पंतप्रधान
नरेंद्र मोदींची संघ मुख्यालयाला भेट!
- 'तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना'
असेच संघ आणि भाजपचे नाते
शेखर जोशी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांचे नेते, पदाधिकारी यांनी वेळोवेळी एकमेकांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष टीका केली तरी रा.स्व. संघ आणि भाजप यांचे नाते अतूट आहे.
'तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना'अशी दोघांची अवस्था असून वेळप्रसंगी मी मारल्यासारखे करतो तू पडल्यासारखे कर, असे प्रसार माध्यमांना दाखविण्यासाठी केले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची पितृसंघटना असून भाजपप्रमाणे अन्य अनेक संघटना रा.स्व.संघाच्या मुशीतूनच तयार झाल्या आहेत. त्यामुळे या सर्वांचेच एकमेकांशी आतून घट्ट ऋणानुबंध आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपूर दौऱ्यावर येत असून ते
रा. स्व. संघ मुख्यालयाला, संघाचे संस्थापक, संस्थापक सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत. माधव नेत्रालय, संशोधन केंद्राच्या नवीन व अत्याधुनिक इमारतीचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आणि मोदी यांची संघ मुख्यालय रेशीम बागेची भेट त्यासाठीही महत्त्वाची मानण्यात येत आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी २०१२ मध्ये संघाचे माजी सरसंघचालक सुदर्शन यांच्या अंत्यदर्शनासाठी संघ मुख्यालयात आले होते. त्याआधी संघाचे प्रचारक म्हणून मोदी यांचे संघ मुख्यालयात येणे झालेही असेल. मात्र पंतप्रधान या नात्याने मोदींची संघ मुख्यालयाला ही पहिलीच भेट आहे. याआधी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली होती पण तेव्हा ते पंतप्रधान पदावर नव्हते. संघ मुख्यालयाला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाले. मात्र इतक्या वर्षांनंतर ते नागपुरात संघ मुख्यालयाला भेट देण्यासाठी येत आहेत. राम मंदिर भुमिपूजन, राम मंदिर उदघाटन आणि अन्य एक दोन प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व पंतप्रधान मोदी एका व्यासपीठावर एकत्र आले. पण संघ मुख्यालयाला मोदी यांची पंतप्रधान झाल्यानंतरची ही पहिलीच भेट आहे आणि म्हणूनच संघ, भाजपसह प्रसार व समाज माध्यमातूनही या भेटीबद्दल औत्सुक्य आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काही मतभेद आहेत, मोदी आता संघाला डोईजड होऊ लागले आहेत, मोदी संघाच्या नेत्यांचे ऐकत नाहीत, स्वतःला पाहिजे तेच करतात याची आणि
सरसंघचालक भागवत यांनी केलेल्या काही वक्तव्यांची चर्चा होत असते. सरसंघचालक भागवत यांची ही वक्तव्ये म्हणजे अप्रत्यक्षपणे मोदी यांच्यावर केलेली टीका आहे, त्यांनी मोदींचे कान टोचले, असेही बोलले जाते. अर्थात संघ आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून वेळोवेळी अशी विधाने केली जातात ती अगदी ठरवून केली जातात. खरे तर आपल्या वक्तव्याचे समाज माध्यमातून, प्रसार माध्यमातून काय परिणाम होतात, विरोधकांसह संघ स्वयंसेवक, भाजप कार्यकर्ते, पाठिराखे, हितचिंतक ही मंडळी त्यावर काय प्रतिक्रिया देतात? याची ती चाचपणी असते.
२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आता भाजपला रा. स्व. संघाची गरज नाही, भाजप सक्षम झाला असल्याचे विधान एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केले होते. २०१४ आणि २०१९ च्या तुलनेत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला. स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नाही. नाराज झालेल्या संघाने मनापासून निवडणुकीत भाजपसाठी काम केले नाही, पण हातातून सत्ता जाणार नाही, इतपत संघाने भूमिका बजावत भाजपसाठी काम केले, अशी चर्चा तेव्हा केली गेली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही भाजपने मार खाल्ला. खरे तर संघाने न बोलता भाजपला दिलेला हा जोरदार झटका होता. पण विधानसभा निवडणुकीत संघाने भूमिका बदलली. आपली संपूर्ण ताकद वेगवेगळ्या माध्यमातून विशेषकरून भाजप आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या पाठीशी उभी केली.संघप्रणित संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात सजग रहो अभियान राबविण्यात आले. नुकत्याच झालेल्या नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीतही पडद्याआड संघ भाजपसाठी सक्रियच राहिला. त्याचे परिणाम दिसून आले. खरे तर नगरसेवक ते खासदार पर्यंतच्या निवडणुकीत संघ, संघाचे कार्यकर्ते आणि संघप्रणित संस्थां, संघटना निस्वार्थीपणे काम, प्रचार करतात म्हणूनच भाजपचे उमेदवार निवडून येतात, हे सत्य नाकारून चालणार नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची काही विधाने अप्रत्यक्षपणे मोदींची कानउघाडणी करण्यासाठीच होती. काही जण स्वतःला देवाचा अवतार समजायला लागले आहेत, प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याची आणि नवीन वाद उकरून काढण्याची गरज नाही, देशात शांतता आवश्यक असून देशातील मणिपूर राज्य गेल्या एक वर्षापासून अशांत आहे, तिथे हिंसाचार थांबविण्याला सरकारने प्राधान्य दिले पाहिजे, जो मर्यादेचे पालन करतो त्याच्यात अहंकार नसतो आणि अहंकार नसलेल्या व्यक्तिलाच सेवक म्हणवून घेण्याचा अधिकार आहे, अशा आशयाची वक्तव्ये संघाचे विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केली होती. यामुळे भाजप व मोदी आणि रा.स्व. संघ यांच्यातील संबंध ताणले गेल्याचे बोलले जात होते. मात्र एका घरात राहणाऱ्यांचे भांड्याला भांडे लागते असाच तो प्रकार होता. अलिकडेच नवी दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जाहीर कौतुक केले होते. महाराष्ट्रात मराठी भाषिकाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. संघ आता वटवृक्ष झाला असून तो शब्तादी साजरी करतो आहे. माझ्यासह लाखो लोकांना संघाने देशासाठी जगण्याची प्रेरणा दिली, असे मोदी म्हणाले होते.
विरोधात असलेले किंवा एकाच विचारसरणीचे दोन महत्त्वाचे राजकीय नेते जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा कोणी कितीही व काहीही सांगितले तरी त्या भेटीत हवा पाण्याच्या गप्पा नक्कीच होत नाहीत. त्यामुळे मोदींची संघ मुख्यालय, डॉ. हेडगेवार स्मृतीस्थळाला भेट हे वरवरचे आणि दाखवण्यासाठीचे निमित्त असू शकते. या धावत्या भेटीप्रसंगी किंवा नंतरच्या गुप्त बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते आणि मोदी यांच्यात भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड हा महत्त्वाचा मुद्दा असू शकतो. मोदींच्या पंचाहत्तरीनंतर त्यांचा पर्याय कोण? की २०२९ मध्येही अपवाद म्हणून पुन्हा मोदीच, वक्फ बोर्ड, भाजपने थेट हिंदुत्व स्विकारावे का, भाजपची मुस्लिमांबाबतची भूमिका अशा काही विषयांवररही चर्चा होणारच नाही, असे म्हणता येणार नाही.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना बाजूला करून नरेंद्र मोदी यांचे नाव रा.स्व. संघाने पुढे केले होते. आता भविष्यात मोदींचा पर्याय म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अन्य कोणाचे नाव पुढे करणार का? आपला पितृ संघटनेचा अधिकार बजावून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोदी व भाजपला काही गोष्टी सुनावणार का? की संघाचे वर्चस्व न मानता मोदी माझेच काय ते खरे करणार? या प्रश्नांची उत्तरे येणारा काळ देईलच. पण तोपर्यंत मोदींच्या संघ मुख्यालय भेटीचे कवित्व मात्र कायम राहील हे नक्की.
शेखर जोशी
२९ मार्च २०२५
उघड्यावर कचरा जाळला तर मुंबईत एक हजार रुपये दंड
उघड्यावर कचरा जाळला तर
मुंबईत एक हजार रुपये दंड
उघड्यावर कचरा जाळला तर त्यामुळे होणारे वायू आणि पर्यावरण प्रदूषण तसेच आरोग्याच्या निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या विचारात घेऊन बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने आता उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना जबर दंड आकारणी करण्याचे ठरवले आहे बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात उघड्यावर कचरा जाळला तर आता एक हजार रुपये दंड आकारला जाणार असून येत्या एक एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
बृहन्मुंबई आणि उपनगरात अनेक ठिकाणी उघड्यावर कचरा जाळण्यात येतो यातून विषाणू वायू तयार होऊन हवेची गुणवत्ता खराब होत आहे तसेच नागरिकांमध्ये शासनाचे आजारही वाढत आहेत. आतापर्यंत उघड्यावर कचरा जाळताना कोणी दिसून आलं तर महापालिकेच्या स्वच्छता उपविधीनुसार फक्त शंभर रुपये इतकाच दंड आकारला जात होता तंडाची रक्कम कमी असल्यामुळे नागरिकांमध्ये याविषयी गांभीर्य नसल्याचं आढळून आलं त्यामुळे आता उघड्यावर कचरा जळताना कोणी आढळल्यास त्या व्यक्तीला एक हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने घेतला आहे.
(छायाचित्र गुगल फोटोवरुन साभार)
उघड्यावर कचरा जाण्याचे प्रकार रोखण्यासाठी महापालिकेच्या प्रभाग स्तरावर पथके तयार करण्यात आली आहेत. नोव्हेंबर २३ ते फेब्रुवारी २५ या कालावधीत कचरा जाळल्याच्या ५३१ तक्रारी महापालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. उघड्यावर कचरा जाळण्याबाबत तक्रार करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने
मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई या हेल्पलाइन अंतर्गत 81696-81697 हा हेल्पलाइन क्रमांक दिला आहे.
शुक्रवार, २८ मार्च, २०२५
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी आता दरमहा ५० हजार रुपये मिळणार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी
आता दरमहा ५० हजार रुपये मिळणार
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
मुंबई, दि. २८ मार्च
मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरासाठी दरमहा ५० हजार रुपये निधी वाढवून देण्यात यावा. आणि त्यासाठी तत्काळ लेखी प्रस्ताव सादर करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी महसूल विभागाच्या सचिवांना दिले. तसेच शासनाची मदत सुरू होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वैयक्तिक ५० हजार रुपयांची मदत केली.
क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीसाठी लाखो रुपये खर्च होत असतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी तुटपुंजे अर्थसाहाय्य हा अन्याय आहे, या भूमिकेतून हिंदू जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महसूल विभागाच्या सचिवांना दूरध्वनी करून मंदिरासाठी दरमहा २५० रुपयांऐवजी ५० हजार रुपये देण्याचे स्पष्ट आदेश दिले.
केंद्रातील तत्कालिन काँग्रेस सरकारच्या काळात २०१२ पासून क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीसाठी निधी देण्यास सुरुवात झाली. नोव्हेंबर २०२३ पर्यंत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी ६.५० लाख रुपयांहून अधिक निधी खर्च केला. औरंगजेब हा एक क्रूर आक्रमक होता. त्याने छत्रपती संभाजी महाराजांवर अमानुषपणे निर्घृण हत्या केली. त्याच्या कबरीच्या देखभालीसाठी निधी खर्च करणे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारे आहे. त्यामुळे हा निधी सरकारने बंद करावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली.
छत्रपती राजाराम महाराजांनी स्वत: मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर बांधलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे हे एकमेव आणि प्राचीन मंदिर आहे. येथे लाखो शिवप्रेमी आणि पर्यटक भेट देतात. किल्ल्यावर बोटीने यावे लागते. त्यामुळे येणार्या पर्यटकांची योग्य सोय करणे आवश्यक आहे. किल्ला मोठा असल्यामुळे झाडी-झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. त्या हटवून किल्ल्याचे सुशोभीकरण करणे, परिसरात सुंदर बगीचा, पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, प्रसाधनगृह आणि गोड्या पाण्याच्या विहिरीचे सुशोभीकरण करावे, इत्यादी मागण्या उपमुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या वेळी समितीचे सतीश सोनार, रवि नलावडे, नांदेड येथील शिवसेनेचे आमदार आनंद बोंडारकर उपस्थित होते.
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत
जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग
शेखर जोशी
डोंबिवली, दि. २८ मार्च
डोंबिवलीतील गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. जम्मू काश्मीर भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरळीत व सुरक्षित शिक्षण घेता यावे आणि भारतातील इतर भागांशी या विद्यार्थ्यांची सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने डोंबिवलीतील हम चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था गेली आठ वर्षे जम्मू काश्मीरमध्ये काम करत आहे.'जोडो काश्मीर'हे संस्थेचे ध्येय आहे.
डोंबिवलीतील यंदाच्या नववर्ष शोभायात्रेत सेवाभारती संचालित जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थी वसतिगृहातील ३१ विद्यार्थी आणि 'सेवाभारती'चे काही पदाधिकारी चित्ररथासह सहभागी होणार आहेत. डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थान आयोजित या नववर्ष स्वागत यात्रेत हम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमधील विद्यार्थी करोना काळ वगळता गेली काही वर्षे सातत्याने सहभागी होत आहेत.
(संग्रहित छायाचित्र)
जम्मू आणि कटरा येथील या विद्यार्थ्यांचा डोंबिवलीत पाच दिवसांचा मुक्काम असून हे विद्यार्थी सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत
डोंबिवलीत वेगवेगळ्या कुटुंबात एक दिवस राहणार आहेत. तसेच या दौऱ्यात सर्व विद्यार्थी डोंबिवलीतील टिळकनगर विद्या मंदिर, पै फ्रेंड्स लायब्ररी, हेरंब म्युझिक अकादमीला तसेच मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्र तसेच अन्य काही महत्त्वाच्या ठिकाणीही भेट देणार आहेत.
दरम्यान हम चॅरिटेबल ट्रस्टच्या जम्मू काश्मीर येथील शिक्षण क्षेत्रातील कामाची माहिती डोंबिवलीकर नागरिकांना व्हावी यासाठी ३१ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात हम संस्थेच्या कार्याची माहिती तसेच जम्मू व कटरा येथून डोंबिवलीत आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद, या विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
हा कार्यक्रम सर्वेश सभागृह, दुसरा मजला, डोंबिवली पूर्व येथे होणार असून डोंबिवलीकर नागरिक, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हम चॅरिटेबल ट्रस्टने केले आहे.
शेखर जोशी
२८ मार्च २०२५
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...