सोमवार, १४ एप्रिल, २०२५

सहा डझनांहून अधिक छायाचित्रांचा चेहरे फलक!

सहा डझनांहून अधिक छायाचित्रांचा चेहरे फलक! चेहरे फलकावर सहा डझनांहून अधिक ( एकूण ७७) छायाचित्रे लावून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- आठवले गटाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. या आधी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजप डोंबिवलीने दोन डझनांहून अधिक छायाचित्रे असलेला चेहरे फलक लावून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आत्तापर्यंत या जागेवर शिवसेना, भाजपचे चेहरे फलक लावले जात होते, आता त्यात आरपीआय- आठवले गटाची भर पडली आहे.‌ उद्या हे नामफलक झाकून‌ लोकमान्य टिळक किंवा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती/ पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचे चेहरे फलक लावले गेले तर ते ही चुकीचेच व अयोग्य आहे. त्याचे समर्थन कधीच करणार नाही. मुळात रस्ते व चौक यांचे नामफलक झाकून आपले चेहरे फलक लावणेच चुकीचे आहे. सर्वपक्षीय राजकारण्यांनो कधीतरी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. शुभेच्छा, अभिवादन, अभिनंदनाचे चेहरे फलक लावून शहर विद्रुप करू नका. आरपीआय- आठवले गटाने असे चेहरे फलक शहरातील अनेक रस्ते व चौकात लावले आहेत. मुळात असे चेहरे फलक लावले जाऊ नयेत आणि लावायचेच असतील आणि सर्वपक्षीय राजकारण्यांना आपले चेहरे दाखविण्याची हौस असेल तर रस्ता, चौक यांचे नामफलक झाकले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, एवढीच अपेक्षा. अर्थात निलाज-या व कोडग्या सर्वपक्षीय राजकारण्यांकडून ती कधीच पूर्ण होणार नाही हे माहीत आहे. तरीही समाज माध्यमातून सतत लिहितो. कधीतरी, कोणालातरी सुबुद्धी झाली तर? शेखर जोशी १४ एप्रिल २०२५

रविवार, १३ एप्रिल, २०२५

'हरियाली' डोंबिवलीची रोपवाटिका

हरियाली या स्वयंसेवी संस्थेच्या डोंबिवली शाखेने द साऊथ इंडियन असोसिएशन संचालित महाविद्यालयाच्या प्रांगणात रोपवाटीका तयार केली आहे. डोंबिवली जिमखाना रस्ता,बालाजी मंदिराजवळ,डोंबिवली पूर्व येथे ही रोपवाटिका असून पर्यावरण जतन व संवर्धन हा उद्देश यामागे आहे. सतीश जोशी, बाळकृष्ण कुडे हे ज्येष्ठ नागरिक व त्यांचे सहकारी दर गुरूवार व रविवार या दोन दिवशी सकाळी ९ ते ११ या वेळेत इथे असतात. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक यांनी या कामात किमान काही वेळ मानद सेवा द्यावी, असे आवाहन जोशी व कुडे यांनी केले आहे. सतीश जोशी - 98335 45767 बाळकृष्ण कुडे- 93220 07586 यावर केलेल्या व्हिडिओची लिंक शेजो उवाच 'हरियाली' डोंबिवलीची रोपवाटिका https://youtu.be/Q5_vuCi8k5M?si=KlFcHENVLx_qAtc6

शनिवार, १२ एप्रिल, २०२५

'चित्रपताका' महोत्सवाची नावनोंदणी प्रक्रिया सुरू

'चित्रपताका'महोत्सवाच्या नावनोंदणी प्रक्रिाेला सुरूवात मुंबई, दि. १२ एप्रिल महाराष्ट्र शासनाच्या 'चित्रपताका' या पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाच्या नाव नोंदणीला सुरुवात झाली आहे. चित्रपट रसिकांना https://evnts.info/chitrapatakafest2025 या लिंकवर ऑनलाइन नावनोंदणी करता येणार आहे.तसेच प्रभादेवी, दादर येथील पु .ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात ऑफलाइन पद्धतीनेही नावनोंदणी करता येणार असून महोत्सवात विनामूल्य प्रवेश आहे. महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ व पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २१ ते २४ एप्रिल दरम्यान पु.ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी,दादर येथे हा महोत्सव होणार आहे. महोत्सवामध्ये प्रेक्षकांना नाटकांसह विविध विषयांवरील ४१ आशयघन चित्रपट विनामूल्य पाहता येणार आहेत.परिसंवाद, मुलाखत, कार्यशाळाही यावेळी होणार आहेत.

हिंदू जनजागृती समितीतर्फे सामूहिक गदापूजन

हिंदूंमधील शौर्य जागृती आणि सामर्थ्य वाढविण्यासाठी सामूहिक गदापूजन कार्यक्रम- डॉ. उदय धुरी - देशभरात ५०० ठिकाणी आयोजन ठाणे,दि.१२ एप्रिल हिंदू समाजात शौर्य जागृती आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांतर्फे हनुमान जन्मोत्साच्या निमित्ताने शनिवारी संपूर्ण देशात सामूहिक गदापूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते,असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी केले. मारुतीरायांची ‘गदा’केवळ युद्धातील अस्त्र नव्हे,तर ती धर्मरक्षणाचा संकल्प,अन्यायाविरुद्ध उभे राहणे आणि भगवंताच्या कार्यासाठी अहर्निश झटण्याचे प्रतिक आहे, असेही डॉ. धुरी यांनी सांगितले. देशभरात ५०० ठिकाणी तर ठाणे जिल्ह्यात ठाणे,डोंबिवली,भिवंडी, बदलापुर,अंबरनाथ इत्यादी ठिकाणी गदापूजन झाले. या सर्व कार्यक्रमात युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, असेही डॉ. धुरी म्हणाले. कार्यक्रमांची सुरुवात शंखनादाने झाली.सामूहिक प्रार्थना,‘गदापूजन, श्री हनुमानाची आरती,मारुति स्तोत्रपठण केल्यानंतर ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजपही करण्यात आला.‘रामराज्याच्या स्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. तसेच‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’घेण्यात आली.हिंदू जनजागृती समितीकडून देशभरात गेली तीन वर्षे सामूहिक ‘गदापूजन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांशीसंबंधित ठिकाणांना भेट देण्याचा उपक्रम

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांशीसंबंधित ठिकाणांना भेट देण्याचा उपक्रम
- राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयाचा उपक्रम >
मुंबई, दि. १२ एप्रिल
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त डॉ.आंबेडकर यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी भेट देण्याचा उपक्रम येत्या १४ व १५ एप्रिल या दिवशी आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाने याचे आयोजन केले आहे.‌ या उपक्रमासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
मुंबईत दादरमधील चैत्यभूमी, राजगृह, प्रिटींग प्रेस, परळ येथील बी.आय.टी चाळ, वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालय या स्थळांचा तर नाशिकमधील येवले मुक्तीभूमी, त्रिरश्मी लेणी आणि काळाराम मंदिर या स्थळांचा समावेश आहे. नागपूर येथील दिक्षाभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, कामठी येथील ड्रॅगन पॅलेस आणि नागलोक विहार ही ठिकाणेही पाहता येणार असल्याचे देसाई म्हणाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरयांचे विचार,सामाजिक योगदान आणि भारतीय राज्य घटनानिर्मितीतील त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असे पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी सांगितले. उपरोक्त शहरात वरील दोन्ही दिवशी बसगाडीद्वारे या ठिकाणांना भेट देता येणार आहे. अधिक माहिती व सहलीत सहभागी होण्यासाठी ९९६९९७६९६६- मुंबई, ९६०७५२७७६३/९६५७०२१४५६-नाशिक ९७६४४८१९१३/ ७२१८७८३५१५- नागपूर या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

'अमृत भारत स्थानक' योजनेत बेलापूर डोंबिवली, टिटवाळा, शहाडचा समावेश

'अमृत भारत स्थानक' योजनेत बेलापूर डोंबिवली, टिटवाळा, शहाडचा समावेश मुंबई, दि. १२ एप्रिल भारतीय रेल्वेच्या 'अमृत भारत स्थानक' योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला असून यात ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, टिटवाळा, शहाड, दिवा आणि बेलापूर या स्थानकांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ही माहिती दिली.

शुक्रवार, ११ एप्रिल, २०२५

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आता दर महिन्याच्या ७ तारखेला होणार

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आता दर महिन्याच्या ७ तारखेला होणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई, ११ एप्रिल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचा पगार आता प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला होईल, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी मुंबईत केली. सरनाईक यांनी शुक्रवारी वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांची भेट घेतली. या बैठकीत महामंडळ व कर्मचारी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर झाली चर्चा झाली. पुढील महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी लागणारा निधी एक महिना आधीच राज्य सरकार एसटी महामंडळाला हस्तांतरित करणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. १ हजार ७६ कोटी रुपयांची मागणी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केली होती, त्यापैकी १२० कोटी रुपये आता देण्यात येणार असून उर्वरित रक्कम तीन टप्प्यात राज्य शासनाकडून महामंडळाला देण्यात येणार असल्याचे सरनाईक म्हणाले.