मंगळवार, १५ एप्रिल, २०२५
पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी 'मोक्षकाष्ठ'
'निसर्गस्नेही अनंतयात्रा'कार्यक्रमात
विजय लिमये यांच्याशी संवाद
- पर्यावरणपूरक अंत्यविधिसाठी 'मोक्षकाष्ठ'चा पर्याय
शेखर जोशी
डोंबिवली, दि. १५ एप्रिल
विवेकानंद सेवा मंडळ आणि स्वच्छ डोंबिवली अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १९ एप्रिल रोजी डोंबिवलीत'निसर्गस्नेही अनंतयात्रा'
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.देशभरात पर्यावरणपूरक अंत्यविधीची चळवळ रुजविणार-या 'मोक्ष काष्ठ' या अभिनव संकल्पनेचे जनक आणि पर्यावरणप्रेमी विजय लिमये कार्यक्रमात डोंबिवलीकरांशी संवाद साधणार आहेत.
मृतदेहाचे परंपरागत पद्धतीने दहन करण्यासाठी लाकडांचा वापर केला जातो. लाकडांना पर्याय म्हणून शेती कचऱ्यापासून तयार करण्यात येणाऱ्या 'मोक्ष काष्ठ'चा पर्याय समोर आणला आहे.या उपक्रमातून आतापर्यंत ३० हजार पर्यावरणपूरक अंत्यविधी झाले असून साठ हजारांहून अधिक झाडे वाचली आहेत. 'मोक्षकाष्ठ'सह लिमये यांनी दहनभूमी स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठीही समाजात सकारात्मक मतपरिवर्तन घडवून आणले आहे.
हा कार्यक्रम संध्याकाळी साडेसहा वाजता विवेकानंद सेवा मंडळ, ज्ञान मंदिर, नेरूरकर रोड, दत्त नगर चौक, डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे.पर्यावरणप्रेमी डोंबिवलीकरांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक संस्थांनी केले आहे.
शेतात पीक घेतल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या पिकांचा नको असलेला भाग, शेतातील पालापाचोळा व अन्य शेतकचरा न जाळता त्यापासून पर्यावरणपूरक 'मोक्षकाष्ठ' तयार करण्यात येत आहेत . नौदलातून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर लिमये यांनी 'इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशन'च्या माध्यमातून पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार करण्यासाठी 'मोक्षकाष्ठ' ही जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमातही लिमये यांच्या या पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार संकल्पनेविषयी माहिती दिली होती.
शेखर जोशी
१५ एप्रिल २०२५
सोमवार, १४ एप्रिल, २०२५
सहा डझनांहून अधिक छायाचित्रांचा चेहरे फलक!
सहा डझनांहून अधिक छायाचित्रांचा चेहरे फलक!
चेहरे फलकावर सहा डझनांहून अधिक ( एकूण ७७)
छायाचित्रे लावून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- आठवले गटाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. या आधी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजप डोंबिवलीने दोन डझनांहून अधिक छायाचित्रे असलेला चेहरे फलक लावून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
आत्तापर्यंत या जागेवर शिवसेना, भाजपचे चेहरे फलक लावले जात होते, आता त्यात आरपीआय- आठवले गटाची भर पडली आहे.
उद्या हे नामफलक झाकून लोकमान्य टिळक किंवा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती/ पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचे चेहरे फलक लावले गेले तर ते ही चुकीचेच व अयोग्य आहे. त्याचे समर्थन कधीच करणार नाही.
मुळात रस्ते व चौक यांचे नामफलक झाकून आपले चेहरे फलक लावणेच चुकीचे आहे. सर्वपक्षीय राजकारण्यांनो कधीतरी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. शुभेच्छा, अभिवादन, अभिनंदनाचे चेहरे फलक लावून शहर विद्रुप करू नका.
आरपीआय- आठवले गटाने असे चेहरे फलक शहरातील अनेक रस्ते व चौकात लावले आहेत. मुळात असे चेहरे फलक लावले जाऊ नयेत आणि लावायचेच असतील आणि सर्वपक्षीय राजकारण्यांना आपले चेहरे दाखविण्याची हौस असेल तर रस्ता, चौक यांचे नामफलक झाकले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, एवढीच अपेक्षा. अर्थात निलाज-या व कोडग्या सर्वपक्षीय राजकारण्यांकडून ती कधीच पूर्ण होणार नाही हे माहीत आहे. तरीही समाज माध्यमातून सतत लिहितो. कधीतरी, कोणालातरी सुबुद्धी झाली तर?
शेखर जोशी
१४ एप्रिल २०२५
रविवार, १३ एप्रिल, २०२५
'हरियाली' डोंबिवलीची रोपवाटिका
हरियाली या स्वयंसेवी संस्थेच्या डोंबिवली शाखेने द साऊथ इंडियन असोसिएशन संचालित महाविद्यालयाच्या प्रांगणात रोपवाटीका तयार केली आहे.
डोंबिवली जिमखाना रस्ता,बालाजी मंदिराजवळ,डोंबिवली पूर्व येथे ही रोपवाटिका असून पर्यावरण जतन व संवर्धन हा उद्देश यामागे आहे. सतीश जोशी, बाळकृष्ण कुडे हे ज्येष्ठ नागरिक व त्यांचे सहकारी दर गुरूवार व रविवार या दोन दिवशी सकाळी ९ ते ११ या वेळेत इथे असतात.
शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक यांनी या कामात किमान काही वेळ मानद सेवा द्यावी, असे आवाहन जोशी व कुडे यांनी केले आहे.
सतीश जोशी - 98335 45767
बाळकृष्ण कुडे- 93220 07586
यावर केलेल्या व्हिडिओची लिंक
शेजो उवाच
'हरियाली' डोंबिवलीची रोपवाटिका
https://youtu.be/Q5_vuCi8k5M?si=KlFcHENVLx_qAtc6
शनिवार, १२ एप्रिल, २०२५
'चित्रपताका' महोत्सवाची नावनोंदणी प्रक्रिया सुरू
'चित्रपताका'महोत्सवाच्या नावनोंदणी प्रक्रिाेला सुरूवात
मुंबई, दि. १२ एप्रिल
महाराष्ट्र शासनाच्या 'चित्रपताका' या पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाच्या नाव नोंदणीला सुरुवात झाली आहे. चित्रपट रसिकांना https://evnts.info/chitrapatakafest2025
या लिंकवर ऑनलाइन नावनोंदणी करता येणार आहे.तसेच प्रभादेवी, दादर येथील पु .ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात ऑफलाइन पद्धतीनेही नावनोंदणी करता येणार असून महोत्सवात विनामूल्य प्रवेश आहे.
महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ व पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २१ ते २४ एप्रिल दरम्यान पु.ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी,दादर येथे हा महोत्सव होणार आहे.
महोत्सवामध्ये प्रेक्षकांना नाटकांसह विविध विषयांवरील ४१ आशयघन चित्रपट विनामूल्य पाहता येणार आहेत.परिसंवाद, मुलाखत,
कार्यशाळाही यावेळी होणार आहेत.
हिंदू जनजागृती समितीतर्फे सामूहिक गदापूजन
हिंदूंमधील शौर्य जागृती आणि सामर्थ्य वाढविण्यासाठी
सामूहिक गदापूजन कार्यक्रम- डॉ. उदय धुरी
- देशभरात ५०० ठिकाणी आयोजन
ठाणे,दि.१२ एप्रिल
हिंदू समाजात शौर्य जागृती आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांतर्फे हनुमान जन्मोत्साच्या निमित्ताने शनिवारी संपूर्ण देशात सामूहिक गदापूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते,असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी केले.
मारुतीरायांची ‘गदा’केवळ युद्धातील अस्त्र नव्हे,तर ती धर्मरक्षणाचा संकल्प,अन्यायाविरुद्ध उभे राहणे आणि भगवंताच्या कार्यासाठी अहर्निश झटण्याचे प्रतिक आहे, असेही डॉ. धुरी यांनी सांगितले.
देशभरात ५०० ठिकाणी तर ठाणे जिल्ह्यात ठाणे,डोंबिवली,भिवंडी, बदलापुर,अंबरनाथ इत्यादी ठिकाणी गदापूजन झाले. या सर्व कार्यक्रमात युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, असेही डॉ. धुरी म्हणाले.
कार्यक्रमांची सुरुवात शंखनादाने झाली.सामूहिक प्रार्थना,‘गदापूजन, श्री हनुमानाची आरती,मारुति स्तोत्रपठण केल्यानंतर ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजपही करण्यात आला.‘रामराज्याच्या स्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. तसेच‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’घेण्यात आली.हिंदू जनजागृती समितीकडून
देशभरात गेली तीन वर्षे सामूहिक ‘गदापूजन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांशीसंबंधित ठिकाणांना भेट देण्याचा उपक्रम
'अमृत भारत स्थानक' योजनेत बेलापूर डोंबिवली, टिटवाळा, शहाडचा समावेश
'अमृत भारत स्थानक' योजनेत बेलापूर
डोंबिवली, टिटवाळा, शहाडचा समावेश
मुंबई, दि. १२ एप्रिल
भारतीय रेल्वेच्या 'अमृत भारत स्थानक' योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला असून यात
ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, टिटवाळा, शहाड, दिवा आणि बेलापूर या स्थानकांचा समावेश आहे.
या योजनेअंतर्गत देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ही माहिती दिली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...







