बुधवार, १६ एप्रिल, २०२५

डिजिटल शिक्षण पोर्टल‘महाज्ञानदीप’चे उदघाटन

डिजिटल शिक्षण पोर्टल‘महाज्ञानदीप’चे उदघाटन मुंबई, दि. १६ एप्रिल डिजिटल शिक्षणाच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली असून 'महाज्ञानदीप’या देशातील पहिल्या डिजिटल शिक्षण पोर्टलचे उदघाटन बुधवारी मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. ,‘महाज्ञानदीप’ उपक्रमांतर्गत एक हजार तज्ज्ञ प्राध्यापक घडविण्याचा संकल्प आहे. आतापर्यंत १५० प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP-2020) अंतर्गत 'भारतीय ज्ञान प्रणाली – जेनेरिक' (IKS - Indian Knowledge System - Generic) हा अभ्यासक्रम मराठी भाषेत तयार केला आहे. हा अभ्यासक्रम या पोर्टलवर अपलोड करण्यात आला असून जगभरातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असल्याचे पाटील यांनी सांगितले. या उपक्रमात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचा सहभाग आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सजीव सोनवणे, आयआयटी गांधीनगरचे प्रा. समीर सहस्त्रबुद्धे तसेच राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव, प्राध्यापक, विविध विद्याशाखांचे संचालक यावेळी उपस्थित होते.

चांगली सुविधा न देणाऱ्या हॉटेल्सचे थांबे रद्द करा

चांगली सुविधा न देणाऱ्या हॉटेल्सचे थांबे रद्द करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश मुंबई, दि. १६ एप्रिल लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा मिळत नसतील तर असे थांबे रद्द करण्याचे आदेश परिवहन मंत्री आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले. या संदर्भात सध्या सुरू असलेल्या सर्व थांब्याचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पुढील १५ दिवसात सादर करण्याच्या सूचनाही एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना केल्या. लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस विविध हॉटेल-मोटेल थांब्यावर थांबतात. तेथे प्रवाशांना चहा -नाष्टा अथवा जेवण तसेच नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो. परंतु अनेक हॉटेलमधील थांब्या बाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असून प्रामुख्याने प्रसाधनगृहे अस्वच्छ असणे, फराळाचे जिन्नस शिळे, अशुद्ध व महाग असणे, याचबरोबर संबंधित हॉटेल वरील कर्मचारी व मालकांची वर्तणूक एस टी प्रवासांच्या सोबत अत्यंत वाईट असणे अशा तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन मंत्री सरनाईक यांनी हे आदेश दिले. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रवाशांच्या आरोग्याशी कोणती तडजोड न करता संबंधित हॉटेल-मोटेल थांब्यावर कारवाई करावी, अशी स्पष्ट सूचनाही सरनाईक यांनी केली.

मंगळवार, १५ एप्रिल, २०२५

राज्यातील २० 'आय.टी.आय'मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार

राज्यातील २० 'आय.टी.आय'मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार मुंबई, दि. १५ एप्रिल राज्यातील २० 'आय.टी.आय'मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. तसेच सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी उद्योजक मेळावे आयोजित करून रोजगार निर्मिती करणे,राज्यातील 'आयटीआय' मध्ये शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक शिक्षण आणि रोजगार संधीही वाढविण्यात येणार आहेत. कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि श्री. श्री. ग्रामीण विकास कार्यक्रम ट्रस्ट बंगलोर, स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन बेंगलोर, पुण्याची देआसरा फाउंडेशन, अंधेरी येथील प्रोजेक्ट मुंबई या सामाजिक संस्थामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी सामंजस्य करार करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, कौशल्य विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त नितीन पाटील व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, सहसंचालक सतीश सुर्यवंशी, श्री श्री रुरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त विजय हाके, स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशनच्या सीएसआर प्रमुख रिचा गौतम, दामिनी चौधरी, प्रोजेक्ट मुंबईचे संचालक जलज दानी, दे आसरा या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पंडित यावेळी उपस्थित होते. या कराराच्या माध्यमातून स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन या संस्थेतर्फे आगामी तीन वर्षाच्या कालावधीत राज्यातील 20 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून इलेक्ट्रिशियन या व्यवसायाच्या कार्यशाळाची दर्जा वाढ करण्यात येणार आहे. तसेच सोलार टेक्निशियन लॅब व इंडस्ट्रियल ऑटोमेशन लॅब उभारून देण्यात येणार आहेत.स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन तर्फे राज्यातील वीजतंत्री व्यवसायाच्या सर्व शिल्प प्रदेशांना बेंगलोर येथे आधुनिक तंत्रज्ञान व सॉफ्ट स्किल्सचे पंधरा दिवसांचे प्रशिक्षण मोफत देण्यात येईल, असेही करारात नमूद करण्यात आले आहे.‌ राज्यातील विविध विभागांतील २० शासकीय आयटीआय केंद्रांची निवड करण्यात आली असून यात मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, नाशिक इत्यादी विभागांचा समावेश आहे.

पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी 'मोक्षकाष्ठ'

'निसर्गस्नेही अनंतयात्रा'कार्यक्रमात विजय लिमये यांच्याशी संवाद - पर्यावरणपूरक अंत्यविधिसाठी 'मोक्षकाष्ठ'चा पर्याय शेखर जोशी डोंबिवली, दि. १५ एप्रिल विवेकानंद सेवा मंडळ आणि स्वच्छ डोंबिवली अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १९ एप्रिल रोजी डोंबिवलीत'निसर्गस्नेही अनंतयात्रा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.देशभरात पर्यावरणपूरक अंत्यविधीची चळवळ रुजविणार-या 'मोक्ष काष्ठ' या अभिनव संकल्पनेचे जनक आणि पर्यावरणप्रेमी विजय लिमये कार्यक्रमात डोंबिवलीकरांशी संवाद साधणार आहेत. मृतदेहाचे परंपरागत पद्धतीने दहन करण्यासाठी लाकडांचा वापर केला जातो. लाकडांना पर्याय म्हणून शेती कचऱ्यापासून तयार करण्यात येणाऱ्या 'मोक्ष काष्ठ'चा पर्याय समोर आणला आहे.या उपक्रमातून आतापर्यंत ३० हजार पर्यावरणपूरक अंत्यविधी झाले असून साठ हजारांहून अधिक झाडे वाचली आहेत. 'मोक्षकाष्ठ'सह लिमये यांनी दहनभूमी स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठीही समाजात सकारात्मक मतपरिवर्तन घडवून आणले आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी साडेसहा वाजता विवेकानंद सेवा मंडळ, ज्ञान मंदिर, नेरूरकर रोड, दत्त नगर चौक, डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे.पर्यावरणप्रेमी डोंबिवलीकरांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक संस्थांनी केले आहे.
शेतात पीक घेतल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या पिकांचा नको असलेला भाग, शेतातील पालापाचोळा व अन्य शेतकचरा न जाळता त्यापासून पर्यावरणपूरक 'मोक्षकाष्ठ' तयार करण्यात येत आहेत . नौदलातून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर लिमये यांनी 'इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशन'च्या माध्यमातून पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार करण्यासाठी 'मोक्षकाष्ठ' ही जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमातही लिमये यांच्या या पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार संकल्पनेविषयी माहिती दिली होती. शेखर जोशी १५ एप्रिल २०२५

सोमवार, १४ एप्रिल, २०२५

सहा डझनांहून अधिक छायाचित्रांचा चेहरे फलक!

सहा डझनांहून अधिक छायाचित्रांचा चेहरे फलक! चेहरे फलकावर सहा डझनांहून अधिक ( एकूण ७७) छायाचित्रे लावून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- आठवले गटाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. या आधी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजप डोंबिवलीने दोन डझनांहून अधिक छायाचित्रे असलेला चेहरे फलक लावून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आत्तापर्यंत या जागेवर शिवसेना, भाजपचे चेहरे फलक लावले जात होते, आता त्यात आरपीआय- आठवले गटाची भर पडली आहे.‌ उद्या हे नामफलक झाकून‌ लोकमान्य टिळक किंवा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती/ पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचे चेहरे फलक लावले गेले तर ते ही चुकीचेच व अयोग्य आहे. त्याचे समर्थन कधीच करणार नाही. मुळात रस्ते व चौक यांचे नामफलक झाकून आपले चेहरे फलक लावणेच चुकीचे आहे. सर्वपक्षीय राजकारण्यांनो कधीतरी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. शुभेच्छा, अभिवादन, अभिनंदनाचे चेहरे फलक लावून शहर विद्रुप करू नका. आरपीआय- आठवले गटाने असे चेहरे फलक शहरातील अनेक रस्ते व चौकात लावले आहेत. मुळात असे चेहरे फलक लावले जाऊ नयेत आणि लावायचेच असतील आणि सर्वपक्षीय राजकारण्यांना आपले चेहरे दाखविण्याची हौस असेल तर रस्ता, चौक यांचे नामफलक झाकले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, एवढीच अपेक्षा. अर्थात निलाज-या व कोडग्या सर्वपक्षीय राजकारण्यांकडून ती कधीच पूर्ण होणार नाही हे माहीत आहे. तरीही समाज माध्यमातून सतत लिहितो. कधीतरी, कोणालातरी सुबुद्धी झाली तर? शेखर जोशी १४ एप्रिल २०२५

रविवार, १३ एप्रिल, २०२५

'हरियाली' डोंबिवलीची रोपवाटिका

हरियाली या स्वयंसेवी संस्थेच्या डोंबिवली शाखेने द साऊथ इंडियन असोसिएशन संचालित महाविद्यालयाच्या प्रांगणात रोपवाटीका तयार केली आहे. डोंबिवली जिमखाना रस्ता,बालाजी मंदिराजवळ,डोंबिवली पूर्व येथे ही रोपवाटिका असून पर्यावरण जतन व संवर्धन हा उद्देश यामागे आहे. सतीश जोशी, बाळकृष्ण कुडे हे ज्येष्ठ नागरिक व त्यांचे सहकारी दर गुरूवार व रविवार या दोन दिवशी सकाळी ९ ते ११ या वेळेत इथे असतात. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक यांनी या कामात किमान काही वेळ मानद सेवा द्यावी, असे आवाहन जोशी व कुडे यांनी केले आहे. सतीश जोशी - 98335 45767 बाळकृष्ण कुडे- 93220 07586 यावर केलेल्या व्हिडिओची लिंक शेजो उवाच 'हरियाली' डोंबिवलीची रोपवाटिका https://youtu.be/Q5_vuCi8k5M?si=KlFcHENVLx_qAtc6

शनिवार, १२ एप्रिल, २०२५

'चित्रपताका' महोत्सवाची नावनोंदणी प्रक्रिया सुरू

'चित्रपताका'महोत्सवाच्या नावनोंदणी प्रक्रिाेला सुरूवात मुंबई, दि. १२ एप्रिल महाराष्ट्र शासनाच्या 'चित्रपताका' या पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाच्या नाव नोंदणीला सुरुवात झाली आहे. चित्रपट रसिकांना https://evnts.info/chitrapatakafest2025 या लिंकवर ऑनलाइन नावनोंदणी करता येणार आहे.तसेच प्रभादेवी, दादर येथील पु .ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात ऑफलाइन पद्धतीनेही नावनोंदणी करता येणार असून महोत्सवात विनामूल्य प्रवेश आहे. महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ व पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २१ ते २४ एप्रिल दरम्यान पु.ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी,दादर येथे हा महोत्सव होणार आहे. महोत्सवामध्ये प्रेक्षकांना नाटकांसह विविध विषयांवरील ४१ आशयघन चित्रपट विनामूल्य पाहता येणार आहेत.परिसंवाद, मुलाखत, कार्यशाळाही यावेळी होणार आहेत.