मंगळवार, २९ एप्रिल, २०२५

जगद्गुरु आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त डोंबिवलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

जगद्गुरु आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त डोंबिवलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन जगद्गुरु आद्य शंकराचार्य सेवा समिती तर्फे शंकराचार्य जयंतीनिमित्त येत्या २ आणि ३ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.‌ उपनिषद सेवा मंडळ आणि संस्कृत भारती यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक स्तोत्र पठण आणि पंधरावा गीता अध्याय पठण होणार आहे. २ मे रोजी रोजी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत विद्यार्थी श्रीमद् भगवद् गीतेच्या १५ व्या अध्यायाचे सामुहिक पठण करणार आहेत. सामूहिक स्तोत्र पठण कार्यक्रमात डोंबिवलीतील उपनिषद सेवा मंडळ, संस्कृत भारत, दुर्वांकुर, डोंबिवली कीर्तन कुलसंस्था, श्री गोविंद विश्वस्त न्यास, समग्र श्री विष्णू सहस्त्रनाम समूह, स्वामींचे घर या संस्थांचे सुमारे पावणेदोनशे सदस्य सहभागी होणार आहेत. २ मे या दिवशी सकाळी साडेसहा ते रात्रीपर्यंत काकड आरती, रुद्राक्ष पूजा, सामूहिक उपनयन, कुंकुमार्चन, भजन, अष्टवंदन, तर ३ मे रोजी सकाळी साडेसहा ते दुपारी एकपर्यंत रुद्र स्वाहाकार होम, 'आद्य शंकराचार्य यांचे तत्वज्ञान' या विषयावर प्रवचन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. हे सर्व कार्यक्रम अगरवाल हॉल, मानपाडा रस्ता , डोंबिवली पूर्व येथे होणार आहेत‌, नागरिक, भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन जगद्गुरु आद्य शंकराचार्य सेवा समितीचे लक्ष्मीकांत कुलकर्णी, उपनिषद सेवा मंडळाचे गंगाधर पुरंदरे यांनी केले आहे.

सोमवार, २८ एप्रिल, २०२५

सुलट प्रेमाची उलट गोष्ट 'मंगलाष्टक रिटर्न'!

सुलट प्रेमाची उलट गोष्ट 'मंगलाष्टक रिटर्न'! मुंबई, दि. २८ एप्रिल 'सुलट प्रेमाची उलट गोष्ट' अशी टॅगलाईन असलेला 'मंगलाष्टक रिटर्न' हा चित्रपट येत्या २३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित करण्यात आले आहे. एकमेकांचे राजकीय विरोधक असलेल्या दोन कुटुंबांतील युवक व युवती एकाच महाविद्यालयात एकत्र येतात. एकमेकांचे विरोधक असलेल्या कुटुंबात व या दोघांच्याही आयुष्यात पुढे काय घडते? हे ' मंगलाष्टक रिटर्न' मध्ये पाहायला मिळणार आहे. वृषभ शाह, शीतल अहिरराव या नव्या जोडीसह चित्रपटात प्रसाद ओक, आनंद इंगळे, सक्षम कुलकर्णी, सोनल पवार, कमलेश सावंत, सुनील गोडबोले, प्रसन्न केतकर इत्यादी कलाकार आहेत‌. शारदा फिल्म्स प्रॉडक्शनच्या वीर कुमार शहा यांनी निर्मिती या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले असून डॉ. भालचंद्र यांनी कथा आणि संवादलेखन, पी. शंकरम यांनी संगीत दिग्दर्शन, विकास सिंह यांनी छायांकन, एस. विक्रमन यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे.

तर महाराष्ट्रातील हे शेवटचे हिंदुत्वनिष्ठ सरकार ठरेल - रणजित सावरकर

बांगलादेशी घुसखोरांना हाकलले नाही, तर महाराष्ट्रातील हे शेवटचे हिंदुत्वनिष्ठ सरकार ठरेल - रणजित सावरकर मुंबई, दि. २८ एप्रिल येत्या पाच ते दहा वर्षांत महाराष्ट्रातील बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढले नाही, तर सध्याचे सरकार हे शेवटचे हिंदुत्वनिष्ठ सरकार ठरेल, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी येथे केले. विक्रम भावे लिखित 'दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येथील दादर येथील काशीनाथ धुरू सभागृह शनिवारी पार पडला. त्यावेळी सावरकर बोलत होते. सावरकर यांच्यासह हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक, लेखक भावे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पहलगाम येथील आक्रमण हे हिंदू म्हणून केलेले पहिले आक्रमण नाही. यापूर्वी काश्मिरमधून काश्मिरी पंडीतांना हिंदू म्हणूनच निर्वासित करण्यात आले होते. बंगालमधील मुर्शिदाबाद येथे यापूर्वीच हिंदूंच्या क्रूरपणे हत्या करण्यात आल्या. त्यामुळे अशा घटनांचा प्रतिशोध घेतला गेला नाही, हिंदू संघटित होत नाहीत, तोपर्यंत अशी आक्रमणे सुरुच रहातील. दहशतवादी जर धर्म म्हणून हिंदूंना गोळ्या घालत असतील, तर धर्मासाठी हिंदू मुसलमानांवर आर्थिक बहिष्कार का टाकू शकत नाहीत ? असा प्रश्न सावरकर यांनी उपस्थित केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (‘सीबआय’ने) मला आणि हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अन् अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांना विनाकारण गोवून आमचा तीव्र मानसिक छळ केला. हिंदुत्वाचे कार्य करणाऱ्याला येनकेनप्रकारेण खोट्या गुन्ह्यात अडकवून यंत्रणा कशा कार्य करतात, याचे प्रत्यक्ष स्वरूप तुम्हाला या पुस्तकातून पाहायला, अनुभवायला मिळेल, असे भावे यांनी सांगितले. तर विक्रम भावे यांचे पुस्तक म्हणजे हिंदूंच्या शौर्याचे कहाणी आहे , असे अधिवक्ता पुनाळेकर म्हणाले तर सत्याचा चेहरा नीटपणे दिसण्यासाठी आपण जागे व्हायला हवे, असे आवाहन अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी केले. दाभोलकरांची हत्या हिंदुत्वनिष्ठांनी केल्याचे नॅरेटिव्ह निर्माण करण्यासाठी काही लोक कार्यरत होते, असे वर्तक यांनी सांगितले‌.

नतद्रष्ट 'नट'रंगवाला

नतद्रष्ट 'नट'रंगवाला... काश्मीर पंडितांना जीवे मारले, काश्मीरमधून हुसकावून लावले तेव्हा नतद्रष्ट 'नट'रंगवाल्याला तिथे जावेसे वाटले नाही. बैसरन- पहलगाम येथील काही स्थानिकांचीही या निर्घृण व क्रूर नरसंहारासाठी दहशतवाद्यांना मदत झाली असे समोर आले आहे. अशा परिस्थितीत दहशतवाद्यांना मदत करणा-या स्थानिकांचे आर्थिक कंबरडे मोडण्यासाठी पर्यटकांनी काही काळ काश्मीरमध्ये पर्यटनासाठी जाऊ नये, असा एक मतप्रवाह पुढे येत आहे. तो चुकीचा नाही. समाजातील तथाकथित सेलिब्रिटीनींही या चळवळीत सहभागी झाले पाहिजे. मात्र अपवाद वगळता उलटेच चित्र पाहायला मिळते आहे. स्थानिक व्यावसायिकांचा कळवळा काही जणांना आला असून हे सेलिब्रिटी तमाम भारतीयांना खिजवून हे शूरवीर मुद्दामच काश्मीरला जात आहेत. खरे तर तमाम भारतीयांनी या नतद्रष्टांवर आणि त्यांच्या कलाकृतींवर बहिष्कार टाकून व्यक्त त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. सुरुवात नतद्रष्ट 'नट'रंगवाल्यापासून... शेखर जोशी २८ एप्रिल २०२५

शुक्रवार, २५ एप्रिल, २०२५

सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले. अशी वक्तव्ये पुन्हा केली तर सर्वोच्च न्यायालयाकडून त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असेही न्यायालयाने गांधींना सुनावले. न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायाधीश मनमोहन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. महाराष्ट्रातील अकोला येथील एका सभेमध्ये राहुल गांधींनी सावरकारांचा जाणीवपूर्वक अपमान केला, असा आरोप करत वकील नृपेंद्र पांडे यांनी त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील सत्र न्यायालयात खटला दाखल केला आहे. न्यायालयाने राहुल यांना समन्स बजावले होते. त्याविरोधात त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळली सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी ‘माफी वीर’ अशी टिप्पणी केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्यसैनिकांची चेष्टा करू नका, असे सुनावले. महात्मा गांधी यांनीही ब्रिटिशांशी संवाद साधताना स्वतःसाठी 'तुमचा विश्वासू सेवक' या शब्दांचा वापर केला होता, हे राहुल गांधी यांना माहीत आहे का? असा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राहुल गांधींचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांना विचारला.

मंगळवार, २२ एप्रिल, २०२५

हिंदी अनिवार्य न करता ऐच्छिक ठेवणार

पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य न करता ऐच्छिक ठेवणार - शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे मुंबई, दि. २२ एप्रिल नवीन शैक्षणिक धोरण राबविताना सुकाणू समितीने घेतलेल्या निर्णयानुसार पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा विषय अनिवार्य करण्यात आला होता. तथापि हिंदी भाषा विषय ऐच्छिक ठेवण्याबाबतचा सुधारित शासन निर्णय काढला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. सर्व शाळा व अंगणवाड्यांचे जिओटॅगिंग करण्यासाठी एमआरसॅक ॲप सुरु करण्यात आले आहे.‌'पीएमश्री' शाळेच्या धर्तीवर राज्यात 'सीएम श्री' आदर्श शाळा उभारण्यात येणार आहे. तसेच ‘आनंद गुरुकुल’ उपक्रमाअंतर्गत प्रत्येक विभागात एक निवासी शाळा सुरू करून त्यात कला, क्रीडा व एआय (AI) प्रशिक्षणासह स्पेशालिटी शिक्षण दिले जाईल. शिक्षकांवरील शिक्षणबाह्य कामांचे ओझे कमी करण्यासाठी १५ समित्यांचे एकत्रीकरण करून आता फक्त चार समित्या ठेवण्यात आल्या आहेत, असेही भुसे यांनी सांगितले. राज्यात सीबीएससी पॅटर्नमधील चांगल्या बाबींचा स्वीकार करत, त्यानुसार राज्याच्या अभ्यासक्रमात सुधारणा केल्या जाणार आहेत. तथापि राज्य शिक्षण मंडळ, बालभारती राज्याचा इतिहास, भूगोल याविषयी कुठेही तडजोड होणार नाही, असे भुसे यांनी स्पष्ट केले.

सोमवार, २१ एप्रिल, २०२५

सोनी मराठी वाहिनीवर आज काय बनवू या...?

सोनी मराठी वाहिनीवर येत्या ५ मेपासून ‘आज काय बनवू या...? मधुरा स्पेशल’ हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. ‘मधुराज् रेसिपीज्’ या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या मधुरा बाचल हा कार्यक्रम सादर करणार आहेत. महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या पाककृती आणि प्रेक्षकांचे आवडते पदार्थ यात पाहायला मिळतील.
सोमवार ते शुक्रवार, दुपारी एक वाजता कार्यक्रम प्रसारित होणार आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतातील विशेष खाद्यपदार्थ कार्यक्रमात तयार करून दाखवले जाणार आहेत.