मंगळवार, २० मे, २०२५

प्रत्येक मंदिर मुक्तीसाठी हिंदूंचा सहभाग अत्यावश्यक - अधिवक्ता विष्णु जैन

काशी, मथुराच नव्हे, तर प्रत्येक मंदिर मुक्तीसाठी हिंदूंचा सहभाग अत्यावश्यक - अधिवक्ता विष्णु जैन फोंडा, गोवा, दि. २० मे अहिंदूंचे एकही प्रार्थस्थळ, श्रद्धास्थान सरकारच्या नियंत्रणात नाही, पण प्रत्येक राज्यातील हिंदूंची मंदिरे विविध कायद्यांद्वारे सरकारच्या नियंत्रणात आहेत. काशी-मुथरा येथील मंदिरांच्या मुक्तीचा कायदेशीर लढा आम्ही देत आहोत. मात्र हे पुरेसे नसून देशातील प्रत्येक मंदिर मुक्त करण्याच्या लढ्यात हिंदूंचा सहभाग अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केले. सनातन संस्थेने आयोजित केलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ते बोलत होते. ‘सेव कल्चर सेव भारत फाऊंडेशन’चे उदय माहुरकर, लेखक आणि विचारवंत नीरज अत्री, तसेच हिंदु जनजागृती समितीचे रमेश शिंदे, सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक उपस्थित होते. ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ या ‘ई’ बुकचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. बहुसंख्य हिंदूंना धर्माच्या आधारावर कोणत्याच सुविधा मिळत नाही; याउलट अल्पसंख्यांक म्हणून अन्य धर्मियांना मात्र ‘अल्पसंख्यांक आयोगा’कडून ३ हजार २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांच्या सुविधा मिळतात. उत्तर प्रदेश येथील अल्पसंख्याकांच्या एक वैद्यकीय शिक्षण संस्थेत प्रवेश मिळण्यासाठी हिंदू धर्मांतर करून प्रवेश घेत आहेत, इतकी गंभीर स्थिती आहे. ‘वक्फ बोर्डा’त केवळ २ अहिंदू सदस्य घेतले, तर लगेच ‘सरकार असे करू शकत नाही’, असा न्यायालय निर्णय देते, याकडेही जैन यांनी लक्ष वेधले. सध्या सोशल मीडिया, ‘ओटीटी’, चित्रपट यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक आक्रमण होत आहे. सनातन संस्कृती, पुढील पिढी वाचण्यासाठी हे सांस्कृतिक आक्रमण रोखणे आवश्यक असल्याचे माहूरकर यांनी सांगितले. अत्री म्हणाले, सध्या समाजात पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करण्यात अनेक जण धन्यता मानत आहेत. सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी हिंदूंच्या डोक्यावर बसलेले पाश्चिमात्यांच्या अंधानुकरणाचे भूत उतरविणे आवश्यक आहे. बांगलादेशात सरकारविरोधी आंदोलनात हिंदूंनाच मारण्यात आले. काश्मीर, केरळ आणि बंगाल येथून हिंदूच संपत चालले आहेत. पहेलगाम येथेही धर्म विचारून हिंदूंची हत्या करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी हिंदूंनाच लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे आता केवळ जागृती करत बसण्यापेक्षा त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे शिंदे म्हणाले.

सोमवार, १९ मे, २०२५

शंखनाद महोत्सवात सनातन धर्माचा ध्वज फडकला !

शंखनाद महोत्सवात सनातन धर्माचा ध्वज फडकला! फोंडा,गोवा, दि. १९ मे येथे सुरू असलेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या हस्ते सनातन धर्माच्या ध्वजाचे आरोहण करण्यात आले. यावेळी शंखनाद आणि वेदमंत्रांचा जयघोष करण्यात आला. हा ध्वज राजकीय किंवा संविधानिक नसून आध्यात्मिक स्वरूपाचा ‘धर्मध्वज’ आहे. ‘सनातन हिंदु राष्ट्राची स्थापना’या ध्येयाची जाणीव करून देईल.महाभारत युद्धात श्रीकृष्ण आणि अर्जुन ज्या रथावर आरुढ झाले होते, त्या रथावर बसून हनुमंताने जो ध्वज हातात धरला होता, तो सनातन धर्माचा ध्वज होता. हनुमंताचा रंग शेंदरी म्हणजे केशरी आहे, म्हणून सनातन राष्ट्राचा ध्वज केशरी रंगाचा आहे. या ध्वजावर ‘कल्पवृक्षाच्या खाली कामधेनु उभी आहे’, असे चित्र आहे. कल्पवृक्ष आणि कामधेनु ही दोन्ही ‘समृद्धी, पालन-पोषण, संरक्षण अन् श्रीविष्णूचा अभय वरदहस्त’ यांची प्रतिके आहेत. डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी बिंदा नीलेश सिंगबाळ आणि अंजली मुकुल गाडगीळ यांच्यासह सनातनचे संत, साधक, कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्राची बदललेली भाषा आणि वाणी क्लेशदायक- माजी न्यायमूर्ती धर्माधिकारी

महाराष्ट्राची बदललेली भाषा आणि वाणी क्लेशदायक - माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी मुंबई, दि. १९ मे महाराष्ट्राची बदललेली सामाजिक, राजकीय संस्कृती, भाषा आणि वाणी क्लेशदायक असून हे चित्र बदलण्यासाठी आपण सर्वांनी सामूहिक प्रयत्न करू या, असे आवाहन माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी रविवारी येथे केले. ज्येष्ठ निवृत्त नाट्य व्यवस्थापक, रंगकर्मी यांच्या संकल्पनेतून साकारलेले 'अध्यक्ष नसलेले 'माझे' असेही एक पत्रकार संमेलन' दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे साजरे झाले. त्या संमेलनात धर्माधिकारी बोलत होते. विविध मराठी वृत्तपत्रातील जुने, नवे आणि ज्येष्ठ पत्रकार संमेलनास उपस्थित होते. सामान्य माणसालाही सामान्य माणसासारखे वागता येत नाही, बोलता येत नाही. ही मुळ्ये काकांची फार मोठी खंत आहे. लोकं असे का वागतात, का बोलतात? फक्त युद्धजन्य परिस्थिती आली की आपण सर्व एकत्र येतो. बाकीच्या वेळी एकत्र का येऊ शकत नाही ? महाराष्ट्रात सध्या भाषा आणि वाणीचे हे जे काही झाले आहे ती मुळ्ये काकांची वेदना आहे, आपण सर्व पत्रकार आहात, आज ती वेदना मी आपल्यापर्यंत पोहोचवित आहे, असेही धर्माधिकारी म्हणाले. मुळ्ये काकांना सुचणा-या कल्पना भन्नाट असतात. आगळे वेगळे कार्यक्रम, संमेलने आयोजित करून ते आपल्याला जे काही देतात त्याचे मोल करता येणार नाही. ते अनमोल आहे. मुळ्ये काकांसारख्या व्यक्ती समाजासाठी आवश्यक असतात. आपण त्यांच्या कायम ऋणात राहिले पाहिजे, असे माझ्या वडिलांनी मला सांगितले होते, मी तोच प्रयत्न करतो, असेही धर्माधिकारी यांनी सांगितले. माध्यमांपासून खरेतर न्यायालयांनी दूर राहिले पाहिजे. नागरिकांचे जे काही म्हणणे असते ते कोणालाच समजत नसते. काही जागरूक पत्रकार/ प्रसार माध्यमांच्यामार्फत ते न्यायाधीश/ न्यायालयापर्यंत पोहोचत असते‌. पण तरीही तो संबंध चांगला नाही. आज बरेचदा काय होते की भावनेच्या भरात लोकं काहीही बोलतात. त्याने न्यायालयाचा अवमान होत नाही, पण ती संधी मिळू शकते‌. आणि ते झाले की जे अपरिमित नुकसान होते ते भरता येत नाही, अशी खंतही धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा आचार्य अत्रे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांना जाहीर झाला आहे.‌ त्यानिमित्ताने रविवारच्या पत्रकार संमेलनात धर्माधिकारी यांच्या हस्ते म्हात्रे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना म्हात्रे म्हणाले, तीन दशकांच्या पत्रकारितेत खूप शिकायला मिळाले. समाजाबरोबरच स्वतःला बदलण्याचे सामर्थ्य पत्रकारितेत आहे. मुळ्ये काका हे एक वेगळेच रसायन असून त्यांच्या सारखी निस्पृह वृत्तीने काम करणारी माणसे विरळाच. उपेक्षितांच्या अंतरंगात डोकावून पाहण्याचे त्यांचे काम खूप मोठे आहे. एबीपी माझाचे प्रसन्न जोशी यांनी म्हात्रे यांचा परिचय करून दिला. 'माझ्या खिशात दमडा नाही पण ज्यांच्या खिशात दमडा आहे ते सारे माझ्या खिशात आहेत', अशा शब्दांत शाब्दिक फटकेबाजीने सुरुवात करत पत्रकार संमेलन घेण्यामागील संकल्पना आणि आजवर आयोजित केलेले अनेक आगळे वेगळे कार्यक्रम, संमेलने, उपक्रम याची सविस्तर माहिती मुळ्ये काकांनी दिली.
अनेक मंडळी, संस्था माझ्यावर भरभरून प्रेम करतातच आणि माझ्या सर्व कार्यक्रमांना सढळ हस्ते आर्थिक मदतही करतात.‌आजवर केलेल्या सर्व कार्यक्रमांना प्रसिद्धी देऊन ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सर्व वृत्तपत्रे, वृत्तपत्रांचे संपादक आणि पत्रकारांनी केले आहे. या सर्वांच्या सहकार्यानेच आपण हे कार्यक्रम करत असतो. आजवरच्या आयुष्यात या सर्व मंडळींच्या विश्वासाला मी तडा जाऊ दिला नाही, आणि यापुढेही जाऊ देणार नाही. या सर्वांचा मी ऋणी आहे, असेही मुळ्ये काकांनी सांगितले. संमेलनात विद्या करलगीकर, डॉ.शिल्पा मालंडकर आणि प्रसिद्ध गायक श्रीरंग भावे यांनी अविट गोडीची मराठी भावगीते व चित्रपट गीते सादर केली. त्यांना प्रसाद पंडित (तबला) व सागर साठे (संवादिनी) यांनी संगीतसाथ केली. ' या सुखानो या' गाण्याने सुरू झालेल्या मैफलीची सांगता श्रीरंग भावे यांनी गायलेल्या विविध अभंगांच्या मेडलीने झाली.
-शेखर जोशी १९ मे २०२५

हिंदू राष्ट्राची स्थापना ही समष्टी साधनाच-डॉ. जयंत आठवले

हिंदू राष्ट्राची स्थापना ही समष्टी साधनाच-डॉ. जयंत आठवले फोंडा, गोवा, दि. १८ मे स्वत: साधना करणे ही व्यष्टी साधना, तर समाजाला साधनेला लावणे, ही समष्टी साधना आहे. सनातन संस्था समष्टी साधना शिकवते, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी रविवारी येथे केले. गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त डॉ. आठवले बोलत होते. सर्वच समाज सात्त्विक झाला, तर हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होईल. हिंदु राष्ट्राची स्थापना, ही समष्टी साधना आहे, त्यासाठी सर्वांनी साधना करावी, हे सांगण्यासाठी समाजात जायला हवे, असेही डॉ. आठवले यांनी सांगितले. समाजातील डॉ. केवळ शारीरिक आणि मानसिक आजारावर औषध देतात; मात्र अनिष्ट शक्तींच्या त्रासासह अनेक रोग हे स्वभावदोष, प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास यांमुळे होतात. हे त्यांना माहितच नसते. त्यामुळे या त्रासावर त्यांच्याकडे कोणतीच उपाययोजना नसते. परिणामी अनिष्ट शक्तींचा त्रास दूर करण्यासाठी नामजप अर्थात् साधनाच करावी लागते, असेही डॉ. आठवले म्हणाले. विविध संप्रदाय, संत व मान्यवरांकडून डॉ. आठवले यांचा सन्मान करण्यात आला.

अधर्माचा प्रतिकारासाठी समाज घडविण्याची आवश्यकता- स्वामी गोविंद देवगिरीजी

अधर्माचा प्रतिकार करण्यासाठी समाजाला तयार करण्याची आवश्यकता- स्वामी गोविंद देवगिरीजी फोंडा, गोवा, दि. १८ मे अधर्माचा प्रतिकार करण्यासाठी समाजाला तयार करण्याची आवश्यकता आहे. सनातन धर्माच्या आड येणार्‍या कायद्यांमध्ये बदल करण्याची आवश्यकता असून सनातन धर्माच्या प्रसाराचे कार्य ही साधना, ईश्वराची उपासना आहे, असे प्रतिपादन श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरीजी यांनी रविवारी येथे केले. सनातन संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आणि संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने फोंडा गोवा येथे तीन दिवसीय सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवातील ‘सनातन राष्ट्र संकल्प’ सभेत ते बोलत होते. सनातन संस्थेचे संपूर्ण कार्य आध्यात्मिकतेच्या पायावर उभे असून सनातन संस्था भारत राष्ट्राला एक समजून काम करत आहे. श्रीमद् भगवद्गीता युद्धाच्या भूमीवर सांगितलेला ग्रंथ असून सनातन संस्थेनेही या ग्रंथाप्रमाणेच अध्यात्मापासून युद्धापर्यंत जागृती केली असल्याचे स्वामी गोविंद देवगिरीजी म्हणाले. सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी शक्तीची उपासना करा, असे आवाहन उत्तरप्रदेश विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी केले. अल्पसंख्यांकांमुळेच लव्ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर यांसह अनेक समस्यांना हिंदू बळी पडत आहेत. प्रतिदिन १० हजार लोकांचे धर्मांतर होत आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण कायदा हाच अनेक समस्यांवर उत्तर आहे, असे अधिवक्ता अश्विनी उपाध्याय यांनी सांगितले. ‘सनातन राष्ट्रा’साठी ‘धर्मदूत’ बनण्याचा संकल्प करू या, असे चारुदत्त पिंगळे म्हणाले. अयोध्या येथील महंत श्री राजूदासजी महाराज, स्वामी बालकानंद गिरीजी महाराज, सुदर्शन वाहिनीचे सुरेश चव्हाणके, स्वामी आनंद स्वरूप, धर्मयशजी महाराज यांनीही मनोगत व्यक्त केले.

शनिवार, १७ मे, २०२५

सनातन संस्थेचे कार्य समाजासाठी दीपस्तंभ - गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला सुरुवात; सनातन संस्थेचे कार्य समाजासाठी दीपस्तंभ - गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत फोंडा,गोवा- दि. १७ मे गेल्या २५ वर्षांपासून सनातन संस्था हिंदू धर्माचा प्रसार करण्याचे मोठे कार्य करत असून सनातन संस्थेचे कार्य समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे आहे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी येथे केले. सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष आणि संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने १७ ते १९ मे या कालावधीत फार्मागुडी,फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ.सावंत बोलत होते.
गोवा येथील कुंडई येथील दत्त पद्मनाभ पीठाचे पद्मश्री बह्मेशानंद स्वामीजी, ‘सनातन बोर्ड’चे प्रणेते देवकीनंदन ठाकूर,केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक,भाजपचे गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, कर्नाटक येथील म्हैसूर राजघराण्याचे युवराज तसेच म्हैसूरचे खासदार यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार, ‘सुदर्शन न्यूज’चे प्रधान संपादक सुरेश चव्हाणके, सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस,अभय वर्तक उपस्थित यावेळी होते. पूर्वी गोव्यात लोक समुद्र तसेच अन्य गोष्टी पाहाण्यासाठी येत होते. गोव्यात सनातन संस्थेचे कार्य सुरू झाल्यानंतर आता नागरिक भारतीय संस्कृती आणि मंदिरे पहाण्यासाठी गोव्यात येतात. गोवा भोगभूमी नसून ही देवभूमी असल्याचे सांगून मुख्यमंत्री डॉ.सावंत म्हणाले, सनातन संस्कृती आणि शंखनाद महोत्सवामुळे येथील अर्थकारण आणि सांस्कृतिक पर्यटन वाढेल, असा विश्वासही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री डॉ.सावंत यांनी गोवा शासनाच्या वतीने डॉ. जयंत आठवले यांना शाल-श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन विशेष सन्मान केला, तर देशाच्या संरक्षण कार्यासाठी डॉ.आठवले यांच्या हस्ते मुख्ममंत्री डॉ. सावंत यांच्याकडे साहाय्यता निधी सुपूर्द करण्यात आला. सनातन राष्ट्राची मुहूर्तमेढ गोवा येथून होत असून हा ऐतिहासिक क्षण आहे, असे केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले.गोवा ही ‘बीच’वर बसण्याची नव्हे,तर परशुरामाची उपासना करण्याची भूमी असल्याचे देवकीनंदन ठाकूर यांनी सांगितले.राम-कृष्ण यांचा आदर्श ठेवून शक्तीची उपासना करा,असे आवाहन ब्रह्मेशानंद स्वामी यांनी केले. सनातन धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असून हा महोत्सव धर्मभक्तांना आध्यात्मिक बळ,नवचैतन्य आणि ऊर्जा प्रदान करेल, असे चेतन राजहंस यांनी सांगितले.खासदार यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार गोव्याचे वीजमंत्री श्री. सुदीन ढवळीकर, भाजपचे गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची अधिक माहिती SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळावर मिळू शकेल.

कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारतीचे रविवारी उदघाटन

कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारतीचे रविवारी उदघाटन कल्याण, दि. १७ मे कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.‌ राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. नूतन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याणमधील चक्की नाका, सेंट लॉरेन्स स्कूलजवळ, उंबर्डे येथे बांधण्यात आले आहे.‌