मंगळवार, १० जून, २०२५
संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, लेखक वामन देशपांडे यांचे निधन
संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, लेखक
वामन देशपांडे यांचे निधन
डोंबिवली, दि. १० जून
संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि लेखक वामन देशपांडे यांचे मंगळवारी सकाळी डोंबिवलीत एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन विवाहित पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशपांडे यांच्यावर डोंंबिवलीत एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र ते उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. मंगळवारी सकाळी त्यांची अखेरचा श्वास घेतला.
संत साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. दैनंदिन ज्ञानेश्वरी, दैनंदिन दासबोध, संत तुकाराम आदी धार्मिक विषयांवर तसेच कविता, भावगीते, भक्तिगीते, कथा, समीक्षा, कांदबरी इत्यादी विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले होते. देशपांडे यांची १२५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
संत साहित्यासह विविध विषयांवरील ११८ पुस्तकांना वामन देशपांडे यांनी प्रस्तावना लिहिल्या होत्या. धार्मिक विषयांसह विविध विषयांवरील सुमारे तीन हजाराहून अधिक पुस्तकांचा संग्रह त्यांच्याकडे होता. 'अच्युतानंद' या टोपण नावाने त्यांनी ज्ञानेश्वरीवर लिखाण केले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेचे अध्यक्ष म्हणूनही काम केले होते. संत साहित्यावर ते प्रवचनही करत असत.
सोमवार, ९ जून, २०२५
अशी ही साता-याची त-हा-! विशेष लेख
इंट्रो
आगामी ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे होणार आहे. ३३ वर्षांनंतर पुन्हा एकदा साता-यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होण्याचा योग जुळून आला आहे. त्यानिमित्ताने साहित्य, चित्रपट, कविता यातील 'अशी ही साता-याची त-हा'!
'अशी ही साता-याची त-हा-!'
शेखर जोशी
मराठी साहित्य व्यवहारातील 'कुंभमेळा' अशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ओळख आहे. दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या या साहित्य संमेलनाचा आता 'इव्हेंट' झाला असून हे संमेलन राजकारण्यांच्या ताब्यात गेले आहे. साहित्य संमेलन आणि वाद ,कार्यक्रमातील साचेबद्धपणा हे नेहमीचे रडगाणे असले तरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही मराठी साहित्य व्यवहारातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. आगामी ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे होणार आहे. रविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यंदा सातारा येथे साहित्य संमेलनाचा फड रंगणार आहे.
ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर
सातारा शहराला ऐतिहासिक वारसा असून हे शहर कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर वसले आहे. छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज हे साता-याच्या गादीचे पहिले संस्थापक. १८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९ असा त्यांचा कार्यकाळ होता. १७०८ मध्ये त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. ब्रिटिशांच्या काळात सातारा हे एक अग्रगण्य संस्थान म्हणून ओळखले जात होते. शहराभोवती असलेल्या सात किल्ल्यांवरून शहराला सातारा हे नाव मिळाले. प्रत्येक शहराची स्वतःची काही ना काही अशी स्वतंत्र ओळख असते. अजिंक्यतारा किल्ला, व्योम धरण, कास पठार, सज्जनगड, ठोसेघर धबधबा, जरंडेश्वर हनुमान, बारा मोट्याची विहीर, ही साताऱ्या जवळील काही प्रसिद्ध ठिकाणे सातारा शहर आणि जिल्ह्याची मुख्य ओळख ठरली आहेत. सातारी कंदी पेढे आणि सातारी जर्दा ही सुद्धा साता-याची वेगळी ओळख आहे.
साहित्य, चित्रपटातील सातारा
'सातारा' हे नाव असलेला, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 'अलगूज' कादंबरीवर आधारित 'अशी ही साता-याची त-हा' हा चित्रपटही सुमारे पन्नास वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. अरुण सरनाईक, उमा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मुरलीधर कापडी यांनी केले होते. चित्रपटातील 'परभणीहुनी कुणी आलेत पाहुणे मला घालाया मागणी, काय करू काय करू' हे गाणे प्रसिद्ध आहे.
https://youtu.be/q7tTNzfDX5w?feature=shared या लिंकवर हे गाणे पाहता व ऐकता येईल.
अशाच एका अत्यंत लोकप्रिय गाण्यात/ लावणीत 'सातारा' आलेला आहे. 'सांगत्ये ऐका' चित्रपटातील 'बुगडी माझी सांडली गं जाता साताऱ्याला गं जाता साताऱ्याला ' हे ते गाणे. आज इतक्या वर्षांनंतरही गाण्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. https://youtu.be/lSLMTR0tCZY?feature=shared
या लिंकवर क्लिक करून हे गाणे ऐकता येईल.
गदिमांचा 'जोगिया'
'आधुनिक वाल्मिकी' अशी ओळख असलेले कवी, गीतकार ग. दि. माडगूळकर यांचा 'जोगीया' हा पहिला काव्यसंग्रह. यातील १६ कविता संगीतबद्ध करून एक सांगितिक अल्बम प्रकाशित झाला आहे. गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी या अल्बमची निर्मिती केली असून सुरेश देवळे यांनी ही गाणी संगीतबद्ध केली आहेत. श्रीधर फडके रवींद्र साठे उत्तरा केळकर चारुदत्त आफळे, ज्ञानदा परांजपे यांनीही गाणी गायली आहे. चारुदत्त आफळे यांची किर्तनकार/ प्रवचनकार अशी महाराष्ट्राला ओळख आहे. मात्र या आल्बममध्ये आफळे बुवांनी चक्क गदिमांनी लिहिलेली 'ही घोळ निऱ्यांचा पदी अडखळे, जलद चालणे जरा, दिसे ही साताऱ्याची तऱ्हा' ही लावणी गायली आहे. लावणीचे शब्द, संगीत आणि स्वर एकदम फक्कड आहेत. रसिक वाचकांना ही लावणी https://www.gadima.com/jogia/index.php#google_vignette या लिंकवर ऐकता येईल.
साताऱ्यात होणारे ४ थे साहित्य संमेलन
आगामी ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे होणार आहे. या आधीही तीन संमेलने साता-यात झाली होती. १८७८ मध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी 'ग्रंथकार संमेलन' सुरु केल्यानंतर १९०५ मध्ये तिसरे संमेलन रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात झाले होते. १९६२ मध्ये न. वि. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली ४४ वे तर १९९३ मध्ये विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली ६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साता-यात झाले होते.
सातारा येथे होणाऱ्या आगामी ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजनाचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनला मिळाला आहे.
असाही एक योगायोग
सातारा येथे होणारे नियोजित ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन छत्रपती शाहू स्टेडियम येथे होणार आहे. १९९३ साली ६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याच ठिकाणी झाले होते. हे स्टेडियम १४ एकरात असून तिथे एक मुख्य मंडप, दोन अन्य मंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी गझल कट्टा अशी
व्यवस्था करण्यात येणार आहे. इतर परिसंवाद/कार्यक्रम करण्यासाठी तीन सभागृहेही उपलब्ध आहेत. स्टेडियममध्ये २५ हजार प्रेक्षक क्षमतेची गॅलरी आहे. स्टेडियम सातारा बस स्थानकापासून पायी चालत जाण्याच्या अंतरावर आहे. स्टेडियमच्या मागील बाजूस पोलीस परेड ग्राउंडची मोठी जागा असून त्याचा वापर पार्किंगसाठी करता येणार आहे.
पूर्ण--
शनिवारी डोंबिवलीत रंगणार चतुरंग चैत्रपालवी संगीतोत्सव
शनिवारी डोंबिवलीत रंगणार
चतुरंग चैत्रपालवी संगीतोत्सव
डोंबिवली, दि. ९ जून
चतुरंग प्रतिष्ठान आयोजित चतुरंग चैत्रपालवी संगीतोत्सव येत्या १४ जून रोजी डोंबिवलीत रंगणार आहे.
या कार्यक्रमात म्हैसकर फाऊंडेशन पुरस्कृत 'चतुरंग संगीत सन्मान' डॉ. पं. विद्याधर व्यास यांना तर 'चतुरंग संगीत शिष्यवृत्ती' अद्वैत केसकर यांना पं. अरुण कशाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रीय संगीत/ नाट्य संगीत गायिका आशा खाडिलकर यांच्या सत्तर वर्षपूर्ती निमित्ताने ‘आशाताई - एक सुरदासी’ हा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे. यात आशा खाडिलकर यांच्या सांगितिक कारकिर्दीचा आढावा घेण्यात येणार असून आशा खाडिलकर यांच्या कन्या वेदश्री खाडिलकर- ओक सहभागी होणार आहेत. त्यांना अनिरुद्ध गोसावी (संवादिनी), निषाद करलगीकर (तबला) हे संगीतसाथ करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन डॉ . समीरा गुजर - जोशी यांचे आहे.
याच कार्यक्रमात अद्वैत केसकर यांचेही गायन होणार आहे. त्यांना
निषाद चिंचोले (तबला), निनाद जोशी (संवादिनी) संगीतसाथ करणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी साडेचार ते नऊ या वेळेत सुयोग मंगल कार्यालय, डोंबिवली पूर्व येथे होणार असून रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.
शुक्रवार, ६ जून, २०२५
ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि व्याख्याते दाजी पणशीकर यांचे निधन
ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि व्याख्याते
दाजी पणशीकर यांचे निधन
ठाणे, ६ जून
ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि व्याख्याते दाजी पणशीकर यांचे अल्प आजाराने शुक्रवारी ठाण्यात राहत्या घरी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन कन्या, जावई, मुलगा आणि सून असा परिवार आहे.
पणशीकर यांनी लिहिलेली महाभारत एक सुडाचा प्रवास, कर्ण खरा कोण होता?, कथामृतम, कणिकनिती, शंकराचार्यांच्या स्तोत्रांवर आधारित स्तोत्र गंगा (दोन भाग), अपरिचित रामायण (पाच भाग), गानसरस्वती किशोरी आमोणकर - आदिशक्तीचा धन्योद्गार आणि इतर पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
पणशीकर यांनी देशविदेशात सुमारे अडीच हजार व्याख्याने दिली असून काही वृत्तपत्रातूनही त्यांनी लिहिलेल्या विविध लेखमाला प्रसिद्ध झाल्या आहेत.
पणशीकर यांच्या पार्थिवावर शनिवार ७ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता जवाहर बाग स्मशानभूमी, ठाणे पश्चिम येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
हिंदुद्वेषी एम्.एफ्. हुसेन यांच्या मुंबईतील चित्रांच्या लिलावावर बंदी घाला - हिंदू जनजागृती समितीची मागणी
हिंदुद्वेषी एम्.एफ्. हुसेन यांच्या
मुंबईतील चित्रांच्या लिलावावर बंदी घाला
- हिंदू जनजागृती समितीची मागणी
मुंबई, ६ जून
भारतमातेचे ‘रेप ऑफ इंडिया’नावाने अत्यंत विकृत, बिभत्स, नग्न व अश्लील चित्र रेखाटणारे वादग्रस्त चित्रकार एम.एफ. हुसेन यांच्या २५ चित्रांचा लिलाव मुंबईत येत्या १२ जूनला होणार आहे. या लिलावावर तात्काळ बंदी घालण्यात यावी आणि हुसेन यांच्या गुन्हेगारी कृत्याचे उदात्तीकरण बंद केले जावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.
या प्रकरणी समितीने शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बृहन्मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती याच्यासह मुंबईचे जिल्हाधिकारी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सादर केलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे.
एम.एफ. हुसेन यांनी '२६/११' हल्ल्च्यायाच्या वेळी ‘रेप ऑफ इंडिया’ नावाच्या चित्रात भारतमातेचे नग्न व अपमानास्पद चित्र साकारून त्यांनी देशद्रोहाची परिसीमा गाठली. दुसऱ्या एका चित्रात भारतमातचे नग्न चित्रण काढून त्यावर विविध शहरांची नाव लिहिलेली दाखविली होती. माता सरस्वती, माता पार्वती, माता गंगा, माता यमुना आदी देवीदेवतांचे जाणीवपूर्वक विकृत, नग्न व अश्लील चित्रण करून कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा त्यांनी अपमान केला असल्याचे समितीचे म्हणणे आहे.
अशा अपमानास्पद चित्रांच्या विरोधात हुसेनविरोधात देशभरात
१ हजार २५० हून अधिक पोलीस तक्रारी दाखल झाल्या आहेत. देशभरातही त्यांच्या प्रदर्शनांना विरोध झाला आणि अखेर हुसेन यांनी भारतातून पलायन करून कतारचे नागरिकत्व स्वीकारले होते. हुसेन यांच्या २५ चित्रांचा लिलाव म्हणजे त्यांच्या आधीच्या राष्ट्रविरोधी व समाजविघातक कृत्यांना अप्रत्यक्षपणे समर्थन देणे होय. ‘कलात्मक स्वातंत्र्य’ या नावाखाली धार्मिक भावना दुखावणाऱ्या आणि देशविघातक व्यक्तींचे गौरव करणे हे कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाही, असे समितीने या निवेदनात म्हटले आहे.
दिल्लीतील पटीयाला हाऊस न्यायालयाने हुसेन यांच्या प्रदर्शनातील चित्रे जप्त करण्याचे आदेश दिले असून त्याची चौकशी चालू आहे. यापूर्वी देशभरात हुसेन यांच्या अनेक चित्रप्रदर्शनांना विरोध झालेला आहे. ती प्रदर्शने रद्द झालेली आहे. हुसेनच्या नावाने दिले जाणारे पुरस्कारही रद्द करण्यात आले आहेत. आणि त्यामुळे
हुसेन यांच्या चित्रांचा प्रस्तावित लिलाव व विक्री त्वरित थांबवावी
आणि त्यावर कायदेशीर बंदी घालावी. तसेच या चित्रांचे प्रदर्शन किंवा विक्री करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा कला दालनांवरही कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणीही हिंदू जनजागृती समितीने केली आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर - अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर
- अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
मुंबई, दि. ६ जून
नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि सुरेश साखवळकर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
परिषदेतर्फे व्यावसायिक नाट्य पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. गेली ५१ वर्षे प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या अनुराग कल्याण या संस्थेला विशेष पुरस्कार या सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यात गोविंदायन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात संगीत शारदा संगीत संशय कल्लोळ संगीत मृच्छकटिक नाटकातील प्रवेश सादर होणार आहेत.
पुरस्कार वितरण सोहळा येत्या १४ जून रोजी दुपारी चार वाजता यशवंत नाट्यमंदिर माटुंगा येथे होणार आहे. या सोहळ्यास सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.
साहित्य संमेलन स्थळ निवड समितीची रविवारी बैठक - संमेलन स्थळ औदुंबर, इचलकरंजी, कोल्हापूर की सातारा?
साहित्य संमेलन स्थळ निवड समितीची रविवारी बैठक
- संमेलन स्थळ औदुंबर, इचलकरंजी, कोल्हापूर की सातारा?
मुंबई, दि. ६ जून
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या साहित्य संमेलन स्थळ निवड समितीची बैठक येत्या रविवारी ८ जून रोजी पुण्यात होत आहे. या बैठकीत आगामी ९९ वेळ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे घ्यायचे? त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
अलीकडेच नवी दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय आता तीन वर्षांसाठी पुण्यात आले आहे. त्यामुळे स्थळ निवड समितीची बैठक पुण्यात होणार असून बैठकीनंतर ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ जाहीर केले जाणार आहे.
९९ वे साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी महामंडळाकडे सदानंद साहित्य मंडळ -औदुंबर, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा इचलकरंजी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी- सातारा या संस्थांकडून निमंत्रणे आली आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...







