सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५
विद्यादान सहाय्यक मंडळाच्या संस्थापक गीता शहा यांना यंदाचा केशवसृष्टी पुरस्कार जाहीर
विद्यादान सहाय्यक मंडळाच्या संस्थापक
गीता शहा यांना यंदाचा केशवसृष्टी पुरस्कार जाहीर
मुंबई, दि. ६ ऑक्टोबर
ठाणे येथील विद्यादान सहाय्यक मंडळाच्या संस्थापक, विश्वस्त गीता शहा यांना यंदाचा केशवसृष्टी पुरस्कार जाहीर झाला आहे.
केशवसृष्टी पुरस्काराचे यंदाचे १६ वे वर्ष असून पुरस्कार वितरण समारंभ येत्या ११ ऑक्टोबर रोजी ठाणे येथे होणार आहे. बृहन्मुबई महापालिकेच्या उपायुक्त ( शिक्षण ) डॉ. प्राची जांभेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. श्रीराम व्यायामशाळा, डॉ. मूस रोड, तलावपाळी जवळ, ठाणे पश्चिम येथे दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
शहा यांनी ग्रामीण भागातील गरजू, होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा शिक्षणाद्वारे सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने काम सुरू केले. काही सहकारी आणि कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन १५ ऑगस्ट २००८ रोजी विद्यादान सहाय्यक मंडळ संस्था सुरू केली.
शिक्षणासह या विद्यार्थ्यांच्या मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक इत्यादी प्रश्नांची जवाबदारीही संस्था घेते. त्यांना समाजात सक्षम पणे उभे करते. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक सुज्ञ पालक, मार्गदर्शक निवडला जातो. तो ह्या मुलांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याची सर्व जवाबदारी घेतो.आज असे पन्नास पालक मार्गदर्शक कार्यरत आहेत.
विद्यार्थ्यांंचा शैक्षणिक खर्च, निवास व्यवस्था, जेवणाचा खर्च , वैद्यकीय खर्च संस्थेतर्फे केला जातो. आजपर्यंत संस्थेने १२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवला आहे. त्यामध्ये डॉक्टर, अभियंते, परिचारक, तंत्रज्ञ, वकील, सनदी लेखापाल, कला दिग्दर्शक, वास्तु विशारद यांचा समावेश आहे.
सहा शाखा , आठ वसतिगृहे, १७ मार्गदर्शक समित्या आणि एक हजारांहून अधिक कार्यरत माजी विद्यार्थी यांच्या मदतीने ३५ जिल्ह्यातील ८५० विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कार्यरत आहे.
अमेया जाधव यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. अलका मांडके, डॉ. शुभा राऊळ, डॉ. कविता रेगे, हेमा भाटवडेकर, रश्मी भातखळकर, वैजयंती कुलकर्णी-आपटे, अर्चना वाडे, सुनयना नटे, ॲड. सुनीता तिवारी, राधा पेठे, शुभदा दांडेकर, सीमा उपाध्याय यांच्या निवड समितीने या वर्षीच्या केशवसृष्टी पुरस्काराची निवड केली.
शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०२५
'डोंबिवली टँलेन्ट हंट'ची रविवारी अंतिम फेरी
'डोंबिवली टँलेन्ट हंट'ची रविवारी अंतिम फेरी
- लायन्स क्लब ऑफ डोंबिवलीतर्फे आयोजन
डोंबिवली, दि. ३ ऑक्टोबर
लायन्स क्लब ऑफ डोंबिवली आयोजित 'डोंबिवली टँलेन्ट हंट' स्पर्धेची अंतिम फेरी येत्या ५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. दिवंगत प्राचार्य डॉ. सुरेंद्र बाजपेयी यांच्या स्मरणार्थ घेण्यात येणा-या स्पर्धेचे यंदा १३ वे वर्ष आहे.
यंदाच्या वर्षी २० ऑगस्ट रोजी पहिली फेरी तर दुसरी फेरी २८ सप्टेंबर रोजी पार पडली. प्रथम फेरीत ४०,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते. त्यातून दुसऱ्या फेरीसाठी एक हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
अंतिम फेरीसाठी ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. वक्तृत्व - कौशल्य, वैयक्तिक मुलाखत, स्किल-टेस्ट, माईंड गेम्स इत्यादी विविध आव्हाने अंतिम फेरीतील सहभागी विद्यार्थ्यांना पार करावी लागणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवर अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. अंतिम फेरीतील ५० स्पर्धकांमधून ५ वी ते ७ वी आणि ८वी ते १०वी या दोन गटातून पहिल्या पाच विजेत्यांची निवड केली जाणार आहे.
मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५
'शिवप्रताप'दैनंदिनीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक हजार घटनांची नोंद
'शिवप्रताप'दैनंदिनीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या
जीवनातील एक हजार घटनांची नोंद
मुंबई, दि. ३० सप्टेंबर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्वाच्या एक हजार घटनांचा उल्लेख असलेली 'शिवप्रताप' दैनंदिनी लवकरच प्रकाशित होणार आहे.
डॉ. रवींद्र पाटील यांची संकल्पना असलेल्या २०२६ च्या दैनंदिनीत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांची सचित्र माहिती देण्यात येणार आहे.
'शिवप्रताप' दैनंदिनीची पृठसंख्या २४० असून दैनंदिनीत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज्ञापत्रे, जीवनपट, सनावळी, दर महिन्याचे नियोजन पान याचा समावेश असेल. दैनंदिनीचे प्रकाशक शब्दप्रभू पब्लिकेशन असून शिवप्रताप दैनंदिनीची नोंदणी सुरू झाली आहे.
अधिक माहिती आणि संपर्क
संजय जोशी- 9819371425 ( सकाळी साडेदहा ते रात्री साडेसात) किंवा शब्दप्रभू पब्लिकेशन- 7887337332
शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५
कोकणातील कातळशिल्पांचे जतन संवर्धन करणार
कोकणातील कातळशिल्प जतन संवर्धनसाठी
पर्यटन विकास महामंडळ,निसर्गयात्री संस्थेत सामंजस्य करार
- जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र पर्यटन
विकास महामंडळ मार्फत राज्यात विविध कार्यक्रम
मुंबई, दि. २७ सप्टेंबर
कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पांचे जतन संवर्धन तसेच प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे यांनी रत्नागिरीतील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्राला भेट दिली. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गणपतीपुळे येथे झालेल्या कार्यक्रमात निसर्गयात्री संस्था, रत्नागिरीचे संस्थापक अध्यक्ष तसेच कोकणातील कातळशिल्प शोधकर्ते व अभ्यासक सुधीर रिसबूड आणि प्रादेशिक व्यवस्थापक दीपक माने या दोघांच्या स्वाक्षरीने हा सामंजस्य करार करण्यात आला
जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटन विकास महामंडळाच्या मुख्य कार्यालय आणि संलग्नित सर्व प्रादेशिक कार्यालये, पर्यटक निवास येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जागतिक पर्यटन दिन उपक्रमात विविध स्पर्धेत यशस्वी स्पर्धकांना व्यवस्थापकीय संचालक नीलेश र . गटणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर , नाशिक, रत्नागिरी येथील प्रादेशिक कार्यालयात पर्यटकांचे स्वागत, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. विविध पर्यटक निवासात पर्यटकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, हॉटेल रिसॉर्ट चे प्रख्यात वास्तुविशारद खोझेमा चितलवाला व वन्यजीव पर्यटन तज्ज्ञ संजय देशपांडे यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५
महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे सर्व अंक आता माहितीच्या महाजालावर
महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे सर्व अंक
आता माहितीच्या महाजालावर
गेल्या ९७ वर्षांपासून त्रैमासिक स्वरूपात प्रकाशित होत असलेल्या 'महाराष्ट्र साहित्य पत्रिका' या मासिकाच्या आत्तापर्यंतच्या सर्व अंकांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.
महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे सर्व अंक आता साहित्यप्रेमी आणि वाचकांसाठी माहितीच्या महाजालात उपलब्ध झाले आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे १९२८ पासून 'महाराष्ट्र साहित्य पत्रिका' हे त्रैमासिक प्रकाशित करण्यात येत आहे. राज्य मराठी विकास संस्थेतर्फे या मासिकाच्या डिजिटायझेशनचे काम हाती घेण्यात आले होते.
या त्रैमासिकाचा पहिला अंक १९१३ मध्ये 'विविधज्ञानविस्तार'ची पुरवणी म्हणून प्रकाशित झाला होता. १९२८ पासून ते त्रैमासिक स्वरूपात स्वतंत्रपणे सुरू झाले. त्रैमासिकाचे सर्व अंक महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या sahityaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
शनिवार, २० सप्टेंबर, २०२५
'सागरी सीमा मंच‘ कोकण प्रांतातर्फे किनारपट्टी स्वच्छता अभियान
'सागरी सीमा मंच‘कोकण प्रांतातर्फे
किनारपट्टी स्वच्छता अभियान
मुंबई, दि. २० सप्टेंबर
जागतिक किनारपट्टी अभियान दिन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षाच्या औचित्याने 'सागरी सीमा मंच'च्या कोकण प्रांतातर्फे किनारा स्वच्छता अभियान उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शनिवारी ( २० सप्टेंबर) या अभियानाची सुरुवात झाली. कोकण किनारपट्टीवरील तब्बल शंभरहून अधिक ठिकाणी हा उपक्रम एकाचवेळी राबविण्यात येणार आहे.
समुद्र किनाऱ्यांवरील प्लास्टिक व घनकचरा हटविणे, किनाऱ्यांची प्रत्यक्ष स्वच्छता करणे आणि किनारपट्टी सुरक्षेबाबत जनजागृती करणे असे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. 'स्वच्छ सागर - सुरक्षित सागर, सुरक्षित किनारपट्टी - समर्थ भारत' संकल्पनेला या उपक्रमात मूर्त स्वरूप देण्यात येणार आहे.
अभियान यशस्वी करण्यासाठी भारतीय तटरक्षक दल, राष्ट्रीय सेवा योजना, मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास खाते, विविध अशासकीय संस्था, शासकीय विभाग, पर्यावरण स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये व शाळा या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
'सागरी सीमा मंचा' तर्फे विद्यार्थी व स्थानिक नागरिकांमध्ये स्वच्छ व सुरक्षित समुद्रकिनाऱ्यांचे महत्त्व पटवून दिले जात आहे. भारतीय संस्कृतीत भूमातेबद्दल असलेला आदर लक्षात घेऊन आजच्या पिढीने समुद्र, किनारे आणि निसर्ग जतन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, हा संदेश रा. स्व. संघाच्या शताब्दीवर्षातील अभियानातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे 'सागरी सीमा मंच' कोंकण प्रांतच्यावतीने सांगण्यात आले.
अधिक माहितीसाठी संपर्क
दुर्गेश बोराडे (अभियान प्रमुख) ८१०८०६६२३८
शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५
सीमेवरील दहा हजार जवानांना डोंबिवलीतून फराळ पोहोचणार!
सीमेवरील दहा हजार जवानांना
डोंबिवलीतून फराळ पोहोचणार!
-भारत विकास परिषदेच्या डोंबिवली शाखेचा उपक्रम
डोंबिवली, दि. १९ सप्टेंबर
'ऑपरेशन सिंदूर' निमित्ताने सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारत विकास परिषद-हुतात्मा कॅप्टन विनयकुमार सचान डोंबिवली शाखेतर्फे यावर्षी देशाच्या सीमांवरील दहा हजार जवानांना डोंबिवलीतून दिवाळी फराळ आणि शालेय विद्यार्थ्यांनी बनविलेली शुभेच्छा पत्र पाठविण्यात येणार आहेत.
उपक्रमाचे हे तिसरे वर्ष असून २०२४ या वर्षी सीमांवरील पाच हजार तर त्या आधीच्या वर्षी दोन हजारसैनिकांपर्यंत दिवाळी फराळ पोहोचविण्यात आला होता. फराळाचे डबे सीमावर्ती भागात पाठवण्यासाठी सुमारे पन्नास लाख रुपये इतका खर्च अपेक्षित असून लोकसहभागातून ही रक्कम उभी केली जाणार आहे.
फराळाचे सर्व पॅकिंग परिषदेचे सदस्य, डोंबिवली शहरातील नागरीक, विद्यार्थी यांच्या श्रमदानातून होणार आहे. याची सुरवात शारदीय नवरात्र घटस्थापनेच्या दिवशी (२२ सप्टेंबर ) या दिवशी पद्मश्री गजानन माने आणि इतर मान्यवरांच्या हस्ते फराळाचे डबे भरून केली जाणार आहे.
या सेवायज्ञात कमीत कमी ५०० रुपये देऊन फराळाचा एक डबा किंवा अधिक कितीही देणगी देऊन सहभागी होता येईल. दिलेल्या देणगीला आयकर कायद्यानुसार ८० जी ची वजावट आहे. दानशूर आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन भाविप, डोंबिवली शाखा अध्यक्षा अँड वृंदा कुलकर्णी यांनी केलेआहे. अधिक माहितीसाठी ९८२१४२९६७७/९८९२२५८९२३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
चाणक्य मंडळचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी, 'एसआयआरएफ' संस्थेच्या संचालिका सुमेधा चिथडे, निवेदिका आणि सूत्रसंचालिका अनघा मोडक आदी मान्यवरांनी ध्वनीचित्रफित तयार करून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...







