सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५
दहावी आणि बारावीच्या लेखी, प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक माहितीसाठी संकेतस्थळावर
दहावी आणि बारावीच्या लेखी, प्रात्यक्षिक
परीक्षेचे वेळापत्रक माहितीसाठी संकेतस्थळावर
- परीक्षेपूर्वी शाळांना देण्यात येणारे वेळापत्रकच अंतिम
ठाणे, दि. ३ ऑक्टोबर
पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणा-या इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक माहितीसाठी मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र परीक्षेपूर्वी शाळांना देण्यात येणारे वेळापत्रकच अंतिम असेल, असे मंडळाने जाहीर केले आहे.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत या परीक्षा घेण्यात येतात.
इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ( शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह ) २ ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. तर इयत्ता बारावीची लेखी परीक्षा (सर्वसाधारण, द्विलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा) १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह) २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणार आहे.
सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मात्र ते फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दासबोध अभ्यास शिबिर समारोप कार्यक्रमात 'मनाचे श्लोक' (अर्थासहित) पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन
दासबोध अभ्यास शिबिर समारोप कार्यक्रमात
'मनाचे श्लोक' (अर्थासहित) पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन
डोंबिवली, दि. ३ नोव्हेंबर
स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समिती, मंथन व्याख्यानमाला आणि समर्थायन, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत तीन दिवसीय दासबोध अभ्यास शिबिर आयोजित करण्यात आले होते. श्री गणेश मंदिर संस्थानच्या वक्रतुंड सभागृहात झालेल्या या शिबिरात मनाचे श्लोक आणि दासबोध यांचा अभ्यास कसा करावा यासंबंधी समर्थभक्त समीर लिमये यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
शिबिराच्या समारोपाला लिमये यांनी लिहिलेल्या श्री मनाचे श्लोक (अर्थासहित १ते ६८ श्लोक) पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन शेगावच्या श्री गजाननमहाराजांचे भक्त, वारकरी संप्रदायाचे बाळकृष्ण कुलसुंगे दादा यांच्या हस्ते झाले. यावेळी समीर लिमये,माधव जोशी ,सुधाताई म्हैसकर,प्रवीण दुधे, विनोद करंदीकर, संदीप वैद्य, संजय शेंबेकर, धनश्री नानिवडेकर, संदीप करंजेकर इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.
शनिवार, १ नोव्हेंबर, २०२५
'मी अश्वत्थामा चिरंजीव' महाकादंबरीची नववी आवृत्ती प्रकाशनाच्या वाटेवर
अशोक समेळ लिखित 'मी अश्वत्थामा चिरंजीव'
महाकादंबरीची नववी आवृत्ती प्रकाशनाच्या वाटेवर
ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक अशोक समेळ यांनी लिहिलेल्या 'मी अश्वत्थामा चिरंजीव' या महाकादंबरीची नववी आवृत्ती प्रकाशनाच्या वाटेवर आहे. ६८८ पृष्ठांच्या या महाकादंबरीची पहिली आवृत्ती 'डिंपल पब्लिकेशनाने ३१ जानेवारी २०१५ रोजी प्रकाशित केली होती.
महाभारत आणि संबंधित साहित्याचे अध्ययन करून, जिथे अश्वत्थाम्याचा वास असल्याची वदंता आहे, तो 'अस्तंबा' पर्वत आणि सभोवतालचा परिसर पालथा घालून, तिथल्या लोकांना अश्वत्थाम्याचे आलेले अनुभव ऐकून आणि स्वानुभव घेऊन समेळ यांनी ही महाकादंबरी लिहिली आहे. अश्वत्थाम्याच्या भळभळत्या जखमेचा नवा आयाम शोधण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे.
गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत समेळ यांनी लिहिलेल्या भीष्म पितामह यांच्या जीवनावरील 'ते आभाळ भीष्माचं होतं' आणि
याज्ञसेनी द्रौपदीच्या व्यक्तिमत्वावरील 'द्रौपदी : काल, आज, उद्या' या दोन महाकादंब-या प्रकाशित झाल्या आहेत. 'डिंपल पब्लिकेशन'नेच त्या प्रकाशित केल्या आहेत.
बुधवार, २९ ऑक्टोबर, २०२५
सहा डझनांच्या हापूस आंब्याच्या पेटीला तब्बल २५ हजार रुपये भाव
नवी मुंबई फळ बाजारात हापूस आंबा आला
- सहा डझनांच्या पेटीला तब्बल २५ हजार रुपयांचा भाव
वाशीच्या नवीमुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात कोकणाततील देवगडवरून आलेल्या हापूस आंब्याच्या ६ डझनांच्या पेटीला तब्बल २५ हजार रुपयांचा भाव मिळाला आहे.देवगड तालुक्यातील पडवणे गावचे बागायतदार प्रकाश धोंडू शिर्सेकर यांनी ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हापूस आंब्याची ६ डझनाची पेटी पाठवली होती.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नानाभाऊ जेजूरकर अँड कंपनी या व्यापाऱ्यांकडे ही पेटी दाखल झाली. पेटीची विधिवत पूजा करण्यात येऊन आंबे पूर्णपणे पिकल्यानंतरच विक्रीसाठी ठेवण्यात येतील अशी माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांनी बोली लावण्यात आली असता, या मुहूर्ताच्या आंब्याच्या पेटीला तब्बल २५ हजारांचा विक्रमी दर मिळाल्याचे व्यापारी हर्षल जेजुरकर यांनी सांगितले.
मुंबईतील एका ग्राहकाने ही पेटी खरेदी केली असून, त्याचे नाव व्यापाऱ्यांनी गोपनीय ठेवले आहे. आतापर्यंत हापूस आंब्याच्या पेटीला २० ते २२ हजारांपर्यंत विक्रमी दर मिळाला होता. परंतु, यंदा लक्ष्मी पूजनाच्या शुभ मुहूर्तावर आलेल्या हापूसच्या पेटीला २५ हजारांचा दर मिळाला आहे.
शिर्सेकर यांच्या बागेत जुलै महिन्यातच काही कलमांना आगाऊ मोहोर आला होता. त्या कलमांवर त्यांनी विशेष प्लास्टिक आवरण व फवारणी करून फळधारणा टिकवली. त्यातून तयार झालेल्या आंब्यांपैकी पहिली पेटी दिवाळीपूर्वीच बाजारात पोहोचली.
(छायाचित्र गुगल फोटोवरून साभार)
जल आणि वन संवर्धनाच्या जनजागृतीसाठी ७३ वर्षीय विद्याधर भुस्कुटे यांची पदयात्रा
जल आणि वन संवर्धनाच्या जनजागृतीसाठी
७३ वर्षीय विद्याधर भुस्कुटे यांची पदयात्रा
- महाराष्ट्रात ३ हजार १२५ किलोमीटरचा प्रवास
डोंबिवली, दि. २९ ऑक्टोबर
जल आणि वन संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी डोंबिवलीतील ७३ वर्षीय सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक विद्याधर भुस्कुटे येत्या ३१ ऑक्टोबरपासून पदयात्रा सुरू करणार आहेत. महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांमधून ३ हजार १२५ किलोमीटरची ही पदयात्रा असणार आहे.
डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुल येथील कॅप्टन विनयकुमार सचान स्मारक येथून सकाळी साडेसात वाजता पदयात्रेला भुस्कुटे सुरुवात करणार आहेत. आरोहण या संस्थेने या पदभ्रमंतीचे नियोजन केले आहे.
जल आणि वनसंवर्धनासह देशात, राज्यात शांती, मानवता, भ्रृणहत्या प्रतिबंध, मूल्याधिष्ठीत शिक्षण व्यवस्था यावर पदयात्रेत ते जनजागृती करणार आहेत. २४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत भुस्कुटे डोंबिवलीत परतणार आहेत.
यावेळी भुस्कुटे यांची चौथी पदयात्रा असून भुस्कुटे यांनी पहिली पदयात्रा काश्मीर ते कन्याकुमारी केली होती. चार हजार किलोमीटरच्या या पदयात्रेची लिम्का बुक, अशिया आणि इंडिया बुक्स ऑफ रेकाॅर्डमध्ये नोंद झाली आहे. दुसरी पदयात्रा अरूणाचल प्रदेशातील किबिथू ते गुजरातमधील पोरबंदर अशी चार हजार किलोमीटरची होती. या पदयात्रेचीही लिम्का बुकमध्ये नोंद झाली. तिसरी पदयात्रा गुजरातमधील साबरमती आश्रम, अहमदाबाद, शांतिनिकेतन, कोलकोता, भारताच्या किनारपट्टी मार्गाने तामीळनाडू ते कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक अशी केली होती.
सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५
दिवंगत मोरेश्वर कुंटे यांनी काढलेल्या विविध मंदिरांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन
दिवंगत मोरेश्वर कुंटे यांनी काढलेल्या
विविध मंदिरांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन
- विश्व हिंदू परिषद,मंदिर कोश
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
डोंबिवली, दि. २७ ऑक्टोबर
विश्व हिंदू परिषद आणि मंदिर कोश यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत महाराष्ट्रातील विविध मंदिरांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवंगत मोरेश्वर कुंटे यांनी दुचाकी वाहनावरून महाराष्ट्रातील सुमारे १८ हजार मंदिरांना भेट दिली होती. यातील काही वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांची छायाचित्रे प्रदर्शनात पाहता येणार आहेत.
गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली पूर्व येथे येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे. प्रदर्शनात तरंगणारे तसेच विविध ध्वनी निर्माण करणारे, गाणारे,पाषाणही मांडण्यात आले आहेत.
'आवाज'चा अमृत महोत्सव!
'आवाज'चा अमृत महोत्सव!
शेखर जोशी
'विनोदी वार्षिक' असे बिरूद मिरविणाऱ्या 'आवाज' या वार्षिकाचा यंदाचा दिवाळी अंक 'अमृत महोत्सवी' अंक आहे. 'आवाज' चे संस्थापक- संपादक मधुकर पाटकर यांनी १९५१ च्या दिवाळीमध्ये आवाज वार्षिक प्रकाशनला सुरुवात केली. यंदा आवाज ७५ वर्षांचा झाला.
'हवालदिल मानवाला प्रफुल्लित करणाऱ्या फटाकड्यांच्या 'आवाजां'ची तरी आजच्या काळात खात्री कोण देईल? इतके मात्र खरे 'आवाज'चा हा दिवाळी अंक त्यांना पोटभर हासवील, रिझवील नि त्यांची करमणूकही करील' असे 'आवाज' वार्षिकाच्या पहिल्या दिवाळी अंकाच्या मनोगतात मधुकर पाटकर यांनी म्हटले होते. मधुकर पाटकर यांच्या पश्चात पाटकर यांचे सुपुत्र आणि 'आवाज'चे संपादक -प्रकाशक भारतभूषण पाटकर यांनी हा वारसा 'आवाज'च्या अमृत महोत्सवी वर्षीही पुढे चालविला आहे.
त्या काळात दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठावर महिलांची चित्रे/ छायाचित्रे असणे हा अलिखित नियम होता. 'आवाज' त्याला अपवाद ठरला आणि 'आवाज' ने मुखपृष्ठावरती विनोदी चित्रे/हास्यचित्रेच प्रकाशित केली. १९६० च्या दिवाळी अंकापासून ' आवाज'च्या मुखपृष्ठाला 'खिडकी चित्रां'ची जोड मिळाली. खिडकी चित्र हे आवाजचे खास वैशिष्ठ्य आहे. पुढे इतर काही दिवाळी अंकात या खिडकी चित्रांचे अनुकरण केले गेले.
'आवाज'च्या सुरुवातीच्या काही अंकांचे स्वरूप निखळ विनोदी नव्हते. मात्र १९५३ पासून मुखपृष्ठापासून ते आतील मजकूरापर्यंत 'आवाज' मध्ये अधिकाधिक विनोदी साहित्य, व्यंगचित्रे, हास्यचित्रे, कथा, कादंबरी देण्यास सुरुवात झाली. आणि 'आवाज' संपूर्ण विनोदी वार्षिक झाले. वाचनालयात वाचक 'आवाज' साठी नंबर लावू लागले. १९८९ मध्ये 'आवाज'च्या सुमारे पाऊण लाख अंकांची विक्री झाली आणि दिवाळी अंक विक्रीत 'आवाज'ने एक नवा इतिहास निर्माण केला.
'आवाज' दिवाळी अंकात सुरुवातीपासून ते आजपर्यंत प्रथितयश तसेच प्रयोगशील नवोदित लेखक आणि चित्रकारांना स्थान दिले. महिला लेखिकांचेही विनोदी साहित्य 'आवाज' विनोदी वार्षिकात सातत्याने प्रकाशित होत आहे. 'आवाज' वार्षिकाचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे 'आवाज'मध्ये प्रसिद्ध झालेल्या कथांवरून पुढे काही मराठी, हिंदी चित्रपट आणि नाटके सादर झाली.
गेल्या ७५ वर्षात 'आवाज'ला उत्कृष्ट निर्मितीसह विविध गटांत विभागात शासन आणि सार्वजनिक संस्थांकडून अनेक पुरस्कार, 'आवाज' मधील विविध साहित्याला आणि चित्र साहित्यालाही स्वतंत्र पुरस्कार मिळाले आहेत.
आवाजाच्या पुढील वाटचालीसाठी आणि शतक महोत्सवी दिवाळी अंकासाठी शुभेच्छा.
शेखर जोशी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...





