शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा, विचारच देश आणि जगापुढील आजच्या सर्व समस्यांचे उत्तर - किशोरजी व्यास उर्फ गोविंददेवगिरी महाराज यांचे प्रतिपादन
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा,विचारच
देश आणि जगापुढील आजच्या सर्व समस्यांचे उत्तर
- किशोरजी व्यास उर्फ गोविंददेवगिरी महाराज यांचे प्रतिपादन
आळंदी, दि.६ नोव्हेंबर
छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा आणि विचार हेच देश, जगापुढील आजच्या सर्व समस्यांवरील उत्तर आहे, असे प्रतिपादन
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त निधीचे कोषाध्यक्ष किशोरजी व्यास उर्फ गोविंददेवगिरी महाराज यांनी गुरुवारी येथे केले.
गोविंददेवगिरी महाराज यांच्या हस्ते ' शिवप्रताप २०२६' या दैनंदिनीचे प्रकाशन झाले, त्यावेळी ते बोलत होते. दैनंदिनीचे मुख्य संकल्पनाकार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्राचे अभ्यासक रविंद्र पाटील, डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे आणि महाराष्ट्र फेडरेशनचे संचालक मिलिंद आरोलकर, दैनंदिनीचे प्रवर्तक संजय जोशी, दैनंदिनीचे मुद्रणकर्तेसुबोध पटवर्धन इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते.
शिवजयंती साजरी केली,एखादा उत्सव/ कार्यक्रम उरकला,अशी वृत्ती समाजात नसावी.छत्रपती शिवाजी महाराज या चैतन्याचा,विचारांचा संस्कार दररोज आपल्या मनावर झाला पाहिजे.या संस्कारांचे मूळ प्रभू श्री रामचंद्रांमध्ये आहे आणि प्रभू श्रीराम धर्माची पहिली आवृत्ती असतील तर छत्रपती शिवाजी महाराज धर्माची दुसरी आवृत्ती आहेत, असेही गोविंददेवगिरी महाराज यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने निघालेल्या काही दैनंदिनी या आधी पाहिल्या,पुस्तकेही चाळली आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभावी डोस देणारी'शिवप्रताप २०२६'सारखी अन्य कोणतीही दैनंदिनी मला दिसली नाही,अशा शब्दांत गोविंददेवगिरी महाराजांनी या दैनंदिनीचे कौतुक केले.
दैनंदिनी निर्मितीत सहभागी असलेल्या सर्वांचे अभिनंदन करून
गोविंददेवगिरी महाराज म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि प्रेरणा आपल्या अंगी बाणविण्यासाठी ही दैनंदिनी म्हणजे एक प्रभावी औषध असून सर्वांनी ते दररोज घ्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र, चैतन्य आणि प्रेरणेचा समाजात जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा, असे आवाहनही त्यांनी केले.
छायाचित्र ओळी.
छायाचित्रात डावीकडून रवींद्र पाटील, मिलिंद आरोलकर, गोविंददेवगिरी महाराज, संजय जोशी, सुबोध पटवर्धन.
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे जीवन प्रमाणपत्र शिबीराचे आयोजन
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे
जीवन प्रमाणपत्र शिबीराचे आयोजन
डोंबिवली, दि. ७ नोव्हेंबर
येथील टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे निवृत्ती वेतनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र शिबीराचे (हयातीचा दाखला) आयोजन करण्यात आले आहे. येत्या ९ नोव्हेंबरपर्यंत हे शिबीर भरविण्यात आले असून ते विनामूल्य आहे.
टिळकनगर, डोंबिवली पूर्व येथील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे यंदा पाचवे वर्ष आहे. बँकांमध्ये जीवन प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या लांबलचक रांगापासून ज्येष्ठ निवृत्तीधारकांना दिलासा मिळावा, हा उद्देश यामागे आहे.
गुरुवारी शिबीराच्या पहिल्या दिवशी डोंबिवलीतील १३० निवृत्ती वेतनधारकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. निवृत्ती वेतनधारकांना आँनलाईन जीवन प्रमाणपत्र बनवून देण्याच्या कामात मंडळाचे हितचिंतक माधव मराठे, सुनील जोशी, सुहास वैद्य यांनी महत्त्वाचे योगदान दिले.
आजारी,अंध ,वाँकर घेऊन चालणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना प्राधान्य देऊन लगेचच जीवन प्रमाणपत्र बनवून देण्यात आले. जास्तीत जास्त निवृत्ती वेतनधारकांनी मंडळाच्या या उपक्रमाचा फायदा घ्यावा असे आवाहन मंडळाने केले आहे. शक्य झाल्यास डोंबिवलीतील आजारी तसेच घराबाहेर पडू न शकणाऱ्या वयोवृध्द निवृत्ती वेतनधारकांचे जीवन प्रमाणपत्र त्यांच्या घरी जाऊनही करुन देण्याचा मंडळाचा प्रयत्न असणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क संजय शेंबेकर- ९९२०१२९८०३
मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०२५
श्री क्षेत्र परशुराम डोंगर माथ्यावरील पणतीचे त्रिपुरारी पौर्णिमेला प्रज्वलन
श्री क्षेत्र परशुराम डोंगर माथ्यावरील
पणतीचे त्रिपुरारी पौर्णिमेला प्रज्वलन
चिपळूण, दि. ४ नोव्हेंबर
श्री क्षेत्र परशुराम येथे डोंगरमाथ्यावर , सवतसड्याच्या वरील टेकडीवर असणारी पुरातन भव्य पणती ५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने प्रज्वलित करण्यात येणार आहे. भगवान श्री परशुराम मंदिरातून मशाल पेटवून नेऊन ही पणती प्रज्वलित केली जाणार असल्याची माहिती श्री भार्गवराम परशुराम संस्थानकडून देण्यात आली.
श्री क्षेत्र परशुराम येथील ही पुरातन दीपमाळ शिवकालीन असून महेंद्रगिरी पर्वतावरील एका ऊंच शिखर माथ्यावर हीदीपमाळ आहे. या शिखर बिन्दुवरून चिपळूण शहर, श्री परशुराम मंदिर व गाव, सह्याद्री पर्वताच्या मुख्य आणि उपरांगा परिसराचे दर्शन होते. दीपमाळेकडे जाण्यासाठी परशुराम गावच्या पायरवाडीतून पाऊलवाट असून ही वाट जंगलमय, गवताळ कुरणे, डोंगराळ भाग यातून जाते, असे संस्थानच्या फेसबुक पेजवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
ही भव्य दीपमाळ जांभा दगडात कोरलेली असून त्यावरील पुरातन भव्य पणती काळ्या दगडात कोरलेली आहे. दिपमाळ प्रज्वलनासाठी त्यामधे सुमारे १५ लिटर गोडेतेल आणि एक धोतर वात म्हणून वापरले जाते. त्रिपुरारी पौर्णिमेला संध्याकाळी साडेसहा वाजता या भव्य पणतीमध्ये दीपप्रज्वलन करण्यात येते. याच दिवशी सायंकाळी परंपरेने भगवान श्री परशुराम मंदिरात तुळशी विवाह सोहोळाही साजरा केला जातो.ज्ञ
पूर्वी ग्रामदैवत जुना काळभैरव देवस्थानतर्फे श्री क्षेत्र परशुराम येथील भव्य पणतीमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला दीप प्रज्वलनासाठी १ डबा तेल व वातीसाठी १ धोतराचे पान प्रतिवर्षी देण्याची ऐतिहासिक परंपरा होती. गेल्या २२ वर्षांपासून श्री ग्रामदैवत जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूणतर्फे ही परंपरा पुन्हा सुरू करण्यात आली आहे .
पुर्वी या पणतीचा प्रकाश श्री देव परशुराम यांच्या मूर्तीवर पडत असे वयोवृद्ध, जाणकार मंडळींकडून सांगितले जाते. रात्री चिपळूण शहर परिसरातून या पणतीचा प्रकाश सर्वत्र दिसतो.
पणती प्रज्वलन कार्यक्रमासाठी परशुरामचे स्थानिक ग्रामस्थ, चिपळूण शहर व परीसरातील भक्तगण, कार्यकर्ते परिश्रम घेत असतात. भक्तगण, नागरिकांनी या दीप दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री भार्गवराम परशुराम संस्थानने केले आहे.
अधिक माहिती आणि उपक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क
नितीन लोकरे - 8149444044
समीर शेट्ये - 9890159247
( हे छायाचित्र श्री भार्गवराम परशुराम संस्थानच्या फेसबुक पेजवरून साभार)
सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५
ज्योतिषशास्त्र केवळ भविष्यच नव्हे, तर आध्यात्मिक उन्नतीचा मार्गही दाखवते !
ज्योतिषशास्त्र केवळ भविष्यच नव्हे, तर
आध्यात्मिक उन्नतीचा मार्गही दाखवते !
- ज्योतिष अधिवेशनात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन सादर
पणजी, दि. ३ ऑक्टोबर
ज्योतिषशास्त्र केवळ शिक्षण, विवाह, व्यवसाय इत्यादी व्यावहारिक गोष्टींपुरते मर्यादित नसून, ते व्यक्तीच्या आध्यात्मिक उन्नतीचा मार्गही दाखविते,असा दावा ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे ज्योतिष विशारद राज कर्वे यांनी येथे केला.
गोवा येथे आयोजित 'जयसिंगराव चव्हाण ११ व्या आंतरराष्ट्रीय ज्योतिष अधिवेशना'त कर्वे बोलत होते. अधिवेशनाचे उदघाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. ‘जन्मकुंडली - जिवात्म्याचा प्रवास दर्शवणारी मार्गदर्शिका !’ या शोधनिबंधाचे मार्गदर्शक डॉ. जयंत बाळाजी आठवले असून, कर्वे हे लेखक आहेत.
व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती करण्याची क्षमता आणि मार्ग दर्शविण्यामध्ये ‘ग्रहांमध्ये होणारे योग’ सर्वाधिक महत्त्वाचे असतात. जन्मकुंडलीत चंद्र, बुध, शुक, मंगळ, राहू यांमध्ये परस्पर योग असल्यास व्यक्ती बाह्य विषयवस्तूंपासून सुख मिळवण्यासाठी अधिक उत्सुक असते; याउलट जन्मकुंडलीत या ग्रहांचे सूर्य, गुरु, शनि, केतू, हर्षल, नेपच्यून यांच्याशी योग असल्यास व्यक्ती आंतरिक आनंद, सत्याचे ज्ञान आणि शांती प्राप्त करण्यासाठी प्रेरित होते, तसेच ती समाजाच्या हिताचा विचार करते, असे कर्वे यांनी सांगितले.
जन्मकुंडलीत असणार्या ग्रहयोगांप्रमाणे व्यक्तीचा आध्यात्मिक उन्नती करण्याचा मार्ग असतो; कुणी भक्तीद्वारे, कुणी ज्ञानाद्वारे, कुणी कर्माद्वारे तर कुणी सेवेद्वारे अध्यात्मात प्रगती करतात. आध्यात्मिक प्रगतीमुळे आपल्यात व्यापकता येते. ज्योतिषांनी लोकांच्या व्यावहारिक समस्यांवर दिशादर्शन देण्यासोबतच आध्यात्मिक उन्नतीसाठीही लोकांना दिशादर्शन करणे आवश्यक आहे, असे आवाहनही कर्वे यांनी यावेळी केले.
दहावी आणि बारावीच्या लेखी, प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक माहितीसाठी संकेतस्थळावर
दहावी आणि बारावीच्या लेखी, प्रात्यक्षिक
परीक्षेचे वेळापत्रक माहितीसाठी संकेतस्थळावर
- परीक्षेपूर्वी शाळांना देण्यात येणारे वेळापत्रकच अंतिम
ठाणे, दि. ३ ऑक्टोबर
पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणा-या इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक माहितीसाठी मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र परीक्षेपूर्वी शाळांना देण्यात येणारे वेळापत्रकच अंतिम असेल, असे मंडळाने जाहीर केले आहे.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत या परीक्षा घेण्यात येतात.
इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ( शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह ) २ ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. तर इयत्ता बारावीची लेखी परीक्षा (सर्वसाधारण, द्विलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा) १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह) २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणार आहे.
सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मात्र ते फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दासबोध अभ्यास शिबिर समारोप कार्यक्रमात 'मनाचे श्लोक' (अर्थासहित) पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन
दासबोध अभ्यास शिबिर समारोप कार्यक्रमात
'मनाचे श्लोक' (अर्थासहित) पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन
डोंबिवली, दि. ३ नोव्हेंबर
स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समिती, मंथन व्याख्यानमाला आणि समर्थायन, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत तीन दिवसीय दासबोध अभ्यास शिबिर आयोजित करण्यात आले होते. श्री गणेश मंदिर संस्थानच्या वक्रतुंड सभागृहात झालेल्या या शिबिरात मनाचे श्लोक आणि दासबोध यांचा अभ्यास कसा करावा यासंबंधी समर्थभक्त समीर लिमये यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
शिबिराच्या समारोपाला लिमये यांनी लिहिलेल्या श्री मनाचे श्लोक (अर्थासहित १ते ६८ श्लोक) पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन शेगावच्या श्री गजाननमहाराजांचे भक्त, वारकरी संप्रदायाचे बाळकृष्ण कुलसुंगे दादा यांच्या हस्ते झाले. यावेळी समीर लिमये,माधव जोशी ,सुधाताई म्हैसकर,प्रवीण दुधे, विनोद करंदीकर, संदीप वैद्य, संजय शेंबेकर, धनश्री नानिवडेकर, संदीप करंजेकर इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.
शनिवार, १ नोव्हेंबर, २०२५
'मी अश्वत्थामा चिरंजीव' महाकादंबरीची नववी आवृत्ती प्रकाशनाच्या वाटेवर
अशोक समेळ लिखित 'मी अश्वत्थामा चिरंजीव'
महाकादंबरीची नववी आवृत्ती प्रकाशनाच्या वाटेवर
ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक अशोक समेळ यांनी लिहिलेल्या 'मी अश्वत्थामा चिरंजीव' या महाकादंबरीची नववी आवृत्ती प्रकाशनाच्या वाटेवर आहे. ६८८ पृष्ठांच्या या महाकादंबरीची पहिली आवृत्ती 'डिंपल पब्लिकेशनाने ३१ जानेवारी २०१५ रोजी प्रकाशित केली होती.
महाभारत आणि संबंधित साहित्याचे अध्ययन करून, जिथे अश्वत्थाम्याचा वास असल्याची वदंता आहे, तो 'अस्तंबा' पर्वत आणि सभोवतालचा परिसर पालथा घालून, तिथल्या लोकांना अश्वत्थाम्याचे आलेले अनुभव ऐकून आणि स्वानुभव घेऊन समेळ यांनी ही महाकादंबरी लिहिली आहे. अश्वत्थाम्याच्या भळभळत्या जखमेचा नवा आयाम शोधण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे.
गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत समेळ यांनी लिहिलेल्या भीष्म पितामह यांच्या जीवनावरील 'ते आभाळ भीष्माचं होतं' आणि
याज्ञसेनी द्रौपदीच्या व्यक्तिमत्वावरील 'द्रौपदी : काल, आज, उद्या' या दोन महाकादंब-या प्रकाशित झाल्या आहेत. 'डिंपल पब्लिकेशन'नेच त्या प्रकाशित केल्या आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...








