गुरुवार, १ जानेवारी, २०२६
'ह' च्या बाराखडीचा हास्यस्फोट!
रंगभूमीवर पुन्हा एकदा घुमतोय
'ह' च्या बाराखडीचा हास्यस्फोट!
मुंबई, दि. १ जानेवारी
मराठी रंगभूमीवर काही वर्षांपूर्वी प्रचंड गाजलेले 'तरुण तुर्क म्हातारे अर्क' नाटक नव्या दमाने रंगभूमीवर सुरू झाले असून रंगभूमीवर पुन्हा एकदा 'ह' च्या बाराखडीचा हास्यस्फोट घुमतो आहे.
दिवंगत ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक प्रा. मधुकर तोरडमल यांनी लिहिलेले हे नाटक लोकप्रिय झाले. तोरडमल यांच्याच 'रसिकरंजन' नाट्यसंस्थेतर्फे १९७२ मध्ये हे नाटक रंगभूमीवर सादर झाले होते. अन्य नाट्य संस्थांतर्फेही हे नाटक रंगभूमीवर सादर झाले होते.
नाटकातील 'प्रा. बारटक्के' भूमिका स्वतः प्रा. तोरडमल करत असत. तर प्रा. 'डी. डी. थत्ते' ही भूमिका अरुण सरनाईक, मोहन जोशी या दिग्गज अभिनेत्यांनीही साकारली. अभिनेते अतुल परचुरे, सुनील तावडे, राजन पाटीलही नाटकात होते. संपूर्ण नाटक म्हणजे 'ह हा ही, ही, हु, हू' च्या बाराखडीचा अक्षरशः धुमाकूळ होता.
आता पुन्हा एकदा हे नाटक नव्याने रंगभूमीवर आले आहे.
अभिनेते, दिग्दर्शक राजेश देशपांडे दिग्दर्शित या नाटकाची निर्मिती प्रियांका पेडणेकर, मधुरा पेडणेकर, योगिता गोवेकर, प्राची पारकर, विजया राणे या पाच महिलांनी नाटकाची निर्मिती केली आहे.
'तरुण तुर्क म्हातारे अर्क' च्या नव्या संचात 'प्रा.बारटक्के' ही भूमिका अतुल तोडणकर तर 'प्रा. डी.डी.थत्ते' ही भूमिका अभिजित चव्हाण करत आहेत. या दोघांसह चिंतन लांबे, सोहन नांदुर्डीकर, स्वानंद देसाई, निलेश देशपांडे, श्रुती पाटील आणि नीता पेंडसे हे कलाकार नाटकात आहेत. अशोक मुळ्ये,दिनू पेडणेकर नाटकाचे सूत्रधार असून संदेश बेंद्रे (नेपथ्य), तुषार देवल (पार्श्वसंगीत), श्याम चव्हाण (प्रकाश योजना) मंगल केंकरे (वेशभूषा) हे अन्य जबाबदारी सांभाळत आहेत.
मुंबईत रंगणार दोन दिवसांची रंगजत्रा
स्वामीराज प्रकाशन आयोजित दोन दिवसीय 'रंगजत्रा'
- स्वामीराज महोत्सवात तीन एकांकिका, दोन दीर्घांक आणि नाटक सादर होणार, रसिकांना मुक्त प्रवेश
मुंबई, दि. १ जानेवारी
स्वामीराज प्रकाशन संस्थेतर्फे प्रायोगिक रंगभूमीला ऊर्जा देणारी वार्षिक रंगजत्रा अर्थात 'स्वामीराज महोत्सव' येत्या १७ आणि १८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
महोत्सवाचे यंदा दुसरे वर्ष आहे. ज्येष्ठ अभिनेते जनार्दन लवंगारे यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होणार असून ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
महोत्सवात गावय, मास्क, थिम्मक्का या तीन एकांकिका, युगानुयुगे तूच, जन्म एक व्याधी हे दोन दीर्घांक आणि साठा उत्तरांची कहाणी हे दोन अंकी नाटक सादर होणार आहे.
समारोप सोहळ्याला जेष्ठ अभिनेते अनिल गवस, दिग्दर्शक अनिल बांदिवडेकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवात अभिनेता चेतन दळवी (रंगसेवा पुरस्कार), विजय टाकळे (संहिता सन्मान), अमर हिंद मंडळ, दादर (प्रयोगघर पुरस्कार), लीला हडप (धुळाक्षर पुरस्कार), जयवंत देसाई (सेवाव्रती पुरस्कार) यांना गौरविण्यात येणार आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यंदाचा महोत्सव दिवंगत अभिनेते, दिग्दर्शक रघुनाथ कदम यांच्या स्मृतीला समर्पित असून यशवंत नाट्य मंदिर, दादर येथे होणा-या महोत्सवासाठी नाट्यरसिकांना मुक्त प्रवेश आहे.
डोंबिवली पूर्व भागातील टपाल कार्यालयाचे स्थलांतर
कठड्याचा स्लॅब कोसळून धोकादायक झालेल्या
इमारतीमधील टपाल कार्यालयाचे स्थलांतर
- कार्यालय 'एमआयडीसी' त गेल्याने नागरिकांचीही गैरसोय
डोंबिवली, दि. १ जानेवारी
डोंबिवली पूर्व भागातील टपाल कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले आहे. एमआयडीसी टपाल कार्यालय, के.वि. पेंढरकर महाविद्यालयामागे, डोंबिवली पूर्व येथे हे टपाल कार्यालय हलविण्यात आले आहे.
डोंबिवली पूर्व भागातील लक्ष्मी सागर इमारतीत हे टपाल कार्यालय होते. काही दिवसांपूर्वी या इमारतीचा स्लॅब ( गच्चीचा कठडा) कोसळला होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी या दुर्घटनेत झाली नव्हती. स्लॅब कोसळल्यानंतर महापालिकेने ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर केली आणि इमारतीमधील रहिवासी, व्यावसायिक गाळे रिकामे केले होते.
डोंबिवली पूर्व भागात रेल्वे स्थानकापासून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर असलेले हे टपाल कार्यालय या इमारतीत गेल्या अनेक वर्षांपासून होते. नागरिक, ज्येष्ठ नागरिकांसाठीही ते सोयीचे होते. आता डोंबिवली एमआयडीसी भागात हे टपाल कार्यालय हलविण्यात आल्याने नागरिक व टपाल कार्यालयात येणा-यांना तिथे जाणे गैरसोयीचे ठरते आहे.
स्थानिक आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून हे कार्यालय मूळ इमारतीत आणण्यासाठी किंवा रेल्वे स्थानकाच्या जवळ आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवार, २९ डिसेंबर, २०२५
मुंबई मराठी पत्रकार संघाचे विविध पुरस्कार जाहीर
मुंबई मराठी पत्रकार संघाचे विविध पुरस्कार जाहीर
- ज्येष्ठ पत्रकार विवेक दिवाकर,दिलीप ठाकूर, तुळशीदास भोईटे, अविनाश कोल्हे आणि अन्य मानकरी
६ जानेवारीला पुरस्कार वितरण
मुंबई, दि. २९ डिसेंबर
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार विवेक दिवाकर, दिलीप ठाकूर, तुळशीदास भोईटे, अविनाश कोल्हे आणि अन्य पत्रकाराचा यात समावेश आहे. पत्रकार दिनी (६ जानेवारी २०२६) ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
बृहन्मुंबईतील नागरी समस्यांवरील गेल्या वर्षभरातील उत्कृष्ट वृत्तांत, स्तंभ व लिखाण यासाठी दिला जाणा-या पुरस्कारासाठी सचिन अंकुश लुंगसे (लोकमत) यांची तर पत्रकारितेला उपयुक्त ठरणार्या विषयावर (उदा. सामाजिक, आर्थिक, पर्यावरण आदी) लेखन करणार्या जयहिंद प्रकाशन पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे यांची निवड करण्यात आली आहे
कामगार, झोपडपट्टी, भाडेकरू, घरदुरुस्ती व दलितोद्धार या विषयांवरील पत्रकारितेसाठी दिला जाणारा कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार विवेक शंकर दिवाकर (नवराष्ट्र) यांना तर
पत्रकाराने केलेल्या ललित लेखनासाठी दिला जाणारा विद्याधर गोखले ललित लेखन पुरस्कार मुक्त पत्रकार अविनाश कोल्हे यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट राजकीय बातम्या व राजकीय वृत्तांताबद्दल दिला जाणारा रमेश भोगटे पुरस्कार अशोक नागनाथ अडसूळ( लोकसत्ता) आणि चित्रपट व मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेल्या ज्येष्ठ सिनेपत्रकारासाठीचा शिरीष कणेकर स्मृती पुरस्कार पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार दिलीप अनंत ठाकूर यांना जाहीर झाला आहे.
इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करणार्या वरिष्ठ वृत्तवाहिनी कॅमेरामनसाठीच्या वैभव कनगुटकर स्मृती वृत्तवाहिनी कॅमेरामन पुरस्कारासाठी राजेश माळकर (न्यूज नेशन) यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि निवड झालेल्या छायाचित्रकारांचा सत्कारही या वेळी करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार योगेश बिडवई, अजय कौतिकवार, अभिजित मुळये, समीर चवरकर यांच्या निवड समितीने ही निवड केली. मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयासमोर, आझाद मैदान येथे संध्याकाळी पाच वाजता होणार आहे.
शनिवार, २७ डिसेंबर, २०२५
द्रौपदी बुध्दिमान, तेजस्विनी आणि विवेकी-प्रा. मेधा सोमण
द्रौपदी बुध्दिमान, तेजस्विनी आणि विवेकी- प्रा. मेधा सोमण
'द्रौपदी : काल, आज, उद्या' महाकादंबरी प्रकाशित
मुंबई, दि. २७ डिसेंबर
द्रौपदी बुध्दिमान, तेजस्विनी आणि विवेकी होती. द्रौपदीचा मातृत्व आणि विवेकाचा हा गुण अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन संस्कृत तज्ज्ञ, अभ्यासक व लेखिका प्रा. मेधा सोमण यांनी केले.
ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक अशोक समेळ यांनी लिहिलेल्या 'द्रौपदी : काल, आज, उद्या' या महाकादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डिंपल पब्लिकेशन'ने ही कादंबरी प्रकाशित केली आहे.
द्रौपदीच्या पाचही मुलांना अश्वत्थाम्याने अत्यंत क्रूरतेनं आणि अधर्मानं मारल्यावर त्याला तिच्यासमोर आणले असता आणि अश्वत्थाम्याला ठार करण्यासाठी तिची अनुमती मागितली असताना ती, त्याला मारू नका.' असे सांगते. यामागची द्रौपदीची विवेकबुध्दी स्पष्ट करताना प्रा.सोमण म्हणाल्या, कृपीला पतीवियोगाचे दुःख आहे. अश्वत्थाम्याला ठार केले तर तिला पुत्र वियोगाचे दुःख सहन होणार नाही. पुत्र वियोगाचे दुःख काय असते, ते मी अनुभवतेय. ज्या द्रौपदीच्या पाचही मुलांना ठार मारले हे कळले आहे, तरीही ती आपला विवेक ढळू देत नाही.
'द्रौपदीला एकाच दुर्योधनाकडून, एकाच दुःशासनाकडून अत्याचार सहन करावा लागला. आजच्या द्रौपदीला अनेक दुर्योधन, दुःशासनांशी सामना, संघर्ष करावा लागतोय. द्रौपदीला जे एक कृष्णतत्व मिळाले, तसे आज अनेकांमधून कृष्णतत्व मिळायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षपदावरून बोलताना दा. कृ. सोमण म्हणाले, आज मी सगळ्या नक्षत्र, ताऱ्यांना घेऊन आलोय. अशोक समेळ यांच्या महकादंबर्या वाचल्या आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांच्या शंभर आवृत्या निघोत आणि त्या मागच्या पिढीपासून पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचोत. डिम्पल पब्लिकेशनचे अशोक मुळ्ये यांनीही मनोगत व्यक्त केले. लेखक समेळ यांची मुलाखत किरण वालावलकर, स्मिता गवाणकर यांनी घेतली. संग्राम समेळ, संजीवनी समेळ यांनी 'द्रौपदी' महाकादंबरीतील काही भागाचे अभिवाचन केले. सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले तर अरूण घाडीगावकर यांनी आभार मानले.
छायाचित्रात डावीकडून कौतुक मुळ्ये, अशोक समेळ, किरण वालावलकर, प्रा. मेधा सोमण, दा. कृ. सोमण, अशोक मुळ्ये, अरुण घाडीगावकर
शनिवार, २० डिसेंबर, २०२५
'गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि त्यावरील लस' या विषयावर डॉ. अंजली खाडिलकर यांचे व्याख्यान
'गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि त्यावरील लस'
या विषयावर डॉ. अंजली खाडिलकर यांचे व्याख्यान
- भारत विकास परिषद, ध्रुव अकादमीतर्फे आयोजन
डोंबिवली, दि. २० सप्टेंबर
भारत विकास परिषद आणि ध्रुव अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २५ डिसेंबर रोजी डोंबिवलीत 'गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (cervical cancer) आणि त्यावरील लस' या विषयावर सकाळी अकरा वाजता एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत विकास परिषदेच्या डोंबिवली शाखेच्या सदस्य डॉ. अंजली खाडिलकर या विषयावर माहिती देणार आहेत.
भारतात स्तनाच्या कर्करोगानंतर महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग अधिक प्रमाणात दिसून येतो. दरवर्षी साधारण १ लाख ३० हजार महिला दरवर्षी या रोगाच्या तडाख्यात सापडतात आणि ७५ हजारांहून अधिक महिला मृत्युमुखी पडतात. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग ज्या HPV विषाणूमुळे होतो त्यावर आता लस उपलब्ध आहे.ही लस ७ ते ४० या वयोगटातील मुलींना / महिलांना घेता येऊ शकते. भारत विकास परिषदेच्या पुढाकाराने ही लस अल्प किंमतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या मुलींचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे त्यांना ही लस घेण्यासाठी पालकांची संमती असणे आवश्यक आहे.
व्याख्यानाला उपस्थित राहण्यासाठी तसेच लसीकरणासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त महिला, मुलींनी वैयक्तिक किंवा पालकांसह व्याख्यानास उपस्थित राहावे. नावनोंदणीसाठी पालवी मोघे यांच्याशी
९६१९ १८५ ७४६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन भारत विकास परिषद, ध्रुव अकादमीने केले आहे.
शुक्रवार, १९ डिसेंबर, २०२५
'रिक्षा मीटरसक्ती' विषयावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची 'अळी मिळी गुप चिळी'!
'रिक्षा मीटरसक्ती' विषयावर सर्वपक्षीय
लोकप्रतिनिधींची 'अळी मिळी गुप चिळी'!
- लोकसत्ता ठाणे वृत्तान्तच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा
- आमदार रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
यांची उदासीनता, अनास्था खेदजनक, संतापजनक
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक २०२६
रिक्षा मीटर सक्ती चळवळ
शेजो उवाच -५
शेखर जोशी
डोंबिवली, दि. १९ डिसेंबर
'रिक्षा मीटरसक्ती' या विषयावर गेली बारा वर्षे सातत्याने पाठपुरावा करत आहे. लोकसत्ता ठाणे वृत्तान्तच्या माध्यमातून वेळोवेळी अनेक बातम्या दिल्या होत्या. मात्र खेदाची आणि संतापजनक बाब म्हणजे कल्याण डोंबिवलीतील एकही राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी, राजकीय पक्षांचे स्थानिक व राज्य पातळीवरील नेते, स्थानिक सर्वपक्षीय नेते, नगरसेवक यांनीही या प्रकरणी अळी मिळी गुप चिळी अशी भूमिका घेतली.
रिक्षा चालक मालक संघटना, पदाधिकारी आणि मुठभर मुजोर रिक्षाचालकांपुढे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, पदाधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस यांनी नेहमीच नांगी टाकली.
काही वर्षांपूर्वी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी लोकसत्ता आणि अन्य काही वृत्तपत्रांनी सुरू केलेल्या रिक्षा मीटर सक्ती चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला होता. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासह स्वतः डोळे यांनी आपला दूरध्वनी क्रमांक जाहीर केला होता. रिक्षात बसल्यावर रिक्षा चालकाला सांगूनही त्यांने मीटर डाऊन केले नाही तर फोन केल्यावर शक्य तिथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, स्वतः डोळे, वाहतूक पोलीस हजर राहात होते. मी व माझ्या कुटुंबीयांनानीही त्या वेळी मीटर न टाकणा-या मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस यांच्याकडेच लेखी तक्रारी करणे, रिक्षात बसल्यावर मीटर टाकण्याचा आग्रह धरणे इत्यादी मार्ग अवलंबिले होते.
माझ्या आठवणीप्रमाणे २०१३/ १४ मध्ये लोकसत्ता आणि अन्य काही वृत्तपत्रांनी रिक्षा मीटर सक्ती विषय लावून धरल्याने कल्याण डोंबिवलीत रिक्षा मीटर सक्ती दृष्टीपथात आली असे वाटत होते. पण त्यावेळीही स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राजकीय इच्छाशक्ती व रिक्षा मीटर सक्तीसाठी ठोस प्रयत्न केले नाहीत. हा विषय कधीच गांभीर्याने घेतला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वगळता तेव्हा अन्य सर्व राजकीय पक्षांच्या रिक्षा चालक मालक संघटना होत्या. याचे पदाधिकारीही राजकीय पक्षांचेच लोकप्रतिनिधी होते. या विषयावर तेव्हा मनसेच्या स्थानिक पातळीवरील नेते, पदाधिकारी यांचे लक्ष वेधले होते. हा विषय हाती घेण्यास सांगितले होते. सुरुवातीला मनसेकडून फलक लावून रिक्षा मीटर सक्तीसाठी प्रयत्न केले गेले. नंतर त्यांनीही या विषयाकडे पाठ फिरवली.
भारतीय जनता पक्ष स्वतःला पार्टी विथ डिफरन्स' असे म्हणवून घेतो. त्यामुळे भाजपप्रणित रिक्षा चालक मालक संघटनेच्या रिक्षा चालकांनी तरी मीटरप्रमाणे रिक्षा चालवायला हव्यात, आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या संघटनेच्या सदस्यांना तरी मीटरप्रमाणे रिक्षा चालवायला भाग पाडायला हवे, पण आजवर ते झालेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मुठभर रिक्षाचालकांची मनमानी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना वेळोवेळी ई मेल करून, ट्विटरवर ट्विट करून लक्ष वेधून घेतले आहे. पण कोणालाही काही पडलेले नाही.
त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणुकीत
रिक्षा मीटर सक्ती नाही तर मतदान नाही
किंवा 'नोटा' वापरून निषेध.
लोकसत्ता ठाणे वृत्तान्तच्या माध्यमातून रिक्षा मीटर सक्तीसाठी पाठपुरावा केला होता त्या बातम्यांच्या लिंक्स
http://www.loksatta.com/vruthanta-news/no-any-action-on-rude-rickshaw-drivers-80909/
(मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात पदाधिकाऱयांची अळीमिळी गुपचिळी-लोकसत्ता-ठाणे वृत्तान्त/१४ मार्च २०१३/ पान क्रमांक
http://www.loksatta.com/vruthanta-news/indisciplined-rikshaw-driver-on-the-root-of-disciplined-rikshaw-driver-81471/
(बेशिस्त रिक्षाचालक प्रामाणिक रिक्षाचालकांच्या मुळावर, लोकसत्ता-ठाणे वृत्तान्त/१५ मार्च २०१३/ पान क्रमांक ३)
http://www.loksatta.com/vruthanta-news/woman-hitch-to-arrogant-rikshaw-driver-81470/
(उद्दाम रिक्षाचालकांना रणरागिणीचा हिसका, लोकसत्ता-ठाणे वृत्तान्त/ १५ मार्च २०१३/ पान क्रमांक ३)
http://www.loksatta.com/vruthanta-news/rickshaw-drivers-in-dombivli-impudence-behaviour-80269/
(पूल पार करावा लागतो म्हणून द्या मागू तेवढे भाडे-डोंबिवलीतील रिक्षाचालकांचे अजब तर्कट
लोकसत्ता-ठाणे वृत्तान्त/ १३ मार्च २०१३/ पान क्रमांक १)
http://www.loksatta.com/vruthanta-news/andolan-in-front-of-auto-rickshaw-drivers-for-takeing-the-fare-meter-79542/
(मुजोर रिक्षाचालकांपुढे रिक्षा संघटना आणि लोकप्रतिनिधींची नांगी/ लोकसत्ता-ठाणे वृत्तान्त/ १२ मार्च २०१३/ पान क्रमांक १
http://www.loksatta.com/vruthanta-news/rto-notice-to-riksha-driver-who-denay-fare-as-per-meter-77564/
मीटरनुसार भाडे नाकारणाऱया रिक्षाचालकाला आरटीओची नोटीस लोकसत्ता-ठाणे वृत्तान्त/९ मार्च २०१३
शेखर जोशी
१९ डिसेंबर २०२५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...





