बुधवार, १६ ऑगस्ट, २०२३

महाकवी कालिदास संस्कृत साधना' पुरस्कार ‘संस्कृतदिनी’च द्यावा

 'महाकवी कालिदास संस्कृत साधना'

 पुरस्कार ‘संस्कृतदिनी’च द्यावा

- सुराज्य अभियाना’ची मागणी

महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्कारांचे वितरण संस्कृतदिनी अर्थातच ३० ऑगस्ट या दिवशी करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’ कडून करण्यात आली आहे. या संदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. 

राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ( २७ जुलै २०१२) शासन निर्णयानुसार ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ संस्कृतदिनाच्या दिवशी देण्यात यावा, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे; मात्र २०१२ पासून आजपर्यंत हा पुरस्कार संस्कृतदिनी देण्यात आलेला नाही. पुरस्कार वर्षअखेरीस डिसेंबर महिन्यात दिले जातात. तसेच दरवर्षी पुरस्कार प्रदान न करता दोन/तीन वर्षांचे पुरस्कार एकत्रितपणे दिले जातात, असे सुराज्य अभियानाचे म्हणणे आहे.

प्राचीन संस्कृत पंडित, वेदमूर्ती, संस्कृत शिक्षक, संस्कृत प्राध्यापक, संस्कृत कार्यकर्ते या पात्रतेतील आठ जणांना हा पुरस्कार दिला जातो. ‘संस्कृतदिन’ आता काही दिवसांवर आला आहे. या दृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्यास पुरेसा अवधी मिळावा, असे ‘सुराज्य अभियाना’चे समन्वयक अभिषेक मुरुकटे यांनी या निवेदनात म्हटले आहे. 

२०२१ ते २०२३ या वर्षांतील पुरस्कार अद्याप घोषित करण्यात आलेले नाहीत. हा पुरस्कार सुरू केल्यापासून गेल्या दहा वर्षांत पुरस्काराच्या रकमेत एक रुपयाचीही वाढ करण्यात आलेली नाही. ही रक्कम वाढविण्याविषयी मंत्रिमहोदयांची भेट घेतली असता, त्यांनी खात्याचे प्रधान सचिव यांना अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. त्यालाही आता पाच महिने झाले, याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

शनिवार, ५ ऑगस्ट, २०२३

कर्करोगावर मात केलेल्या लढवय्यांचा आनंद मेळावा!

माजी नाट्य व्यवस्थापक आणि ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून साकारलेला एक आगळा कार्यक्रम नुकताच दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात आयोजित करण्यात आला होता. कर्करोगावर मात करुन आनंदाने आयुष्य जगणाऱ्या लढवय्यांच्या आनंद मेळाव्याचे.

कर्करोगावर मात केलेले ४० जण आपल्या कुटुंबियांसह कार्यक्रमाला उपस्थित होते. कर्करोगावर मात करणारे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कर्करोगमुक्त पत्रकार नेहा पुरव यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला.

राजश्री बोरकर, तृप्ती तोडणकर आणि पत्रकार नेहा पुरव यांनी यावेळी आजाराशी दोन हात करण्याचे अनुभव सांगितले आणि कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा कानमंत्र दिला. कर्करोगमुक्त प्रदीप पाटोळे यांनी गाणी म्हटली. 

केतकी भावे- जोशी, जयंत पिंगुळकर यांच्या गाण्यांचा कार्यक्रम यावेळी सादर झाला.



विस्मरणातील कल्याणकर- तत्वनिष्ठ सेवाव्रती


विस्मरणातील कल्याणकर या लेखमालिकेतील पुढील लेख
तत्वनिष्ठ सेवाव्रती- श्रीवल्लभ बापट
महाराष्ट्र टाइम्स- ठाणे प्लस/ ५ ऑगस्ट २०२३


शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

अवयवदान जनजागृती उद्यान



अवयव दान ही काळाची गरज असून याविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण झाली तर अनेक जीव वाचविण्यास मदत होणार आहे. अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी  राज्यातील पहिले ‘अवयवदान जनजागृती उद्यानʼ ठाण्यात उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच भविष्यात अशा स्वरूपाचे उद्यान राज्यातील इतर शहरात महापालिका आणि नगरपरिषदेतर्फे सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

हे उद्यान कम्युनिटी पार्क, पोखरण रोड नं २, येथील सहा हजार चौरस मीटर जागेवर उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी अवयवदान संदर्भातील माहिती पुस्तिका उपलब्‍ध करून देण्यात येणार असून  प्रस्तावित उद्यानात मूत्रपिंड (किडनी), यकृत ( लिव्हर), हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड, छोटे आतडे, डोळे, त्वचा, हाडे, हात या अवयवाच्या आणि पेशींच्या प्रतिकृती उभारण्यात येणार आहेत. तसेच या अवयवांसंदर्भातील माहिती त्याठिकणी मोठ्या फलकावर लावण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 

अवयवदानासंदर्भातील शास्त्रीय स्वरूपाची माहिती या ठिकाणी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या उद्यानात अवयव दान करण्याचा प्रतिज्ञा अर्ज नागरिकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. ज्या नागरिकांना हा अर्ज भरायचा आहे त्यांच्याकडून तेथेच भरून घेण्यात येऊन तो अर्ज नोंदणीकरिता राज्य अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण संस्थेच्या  कार्यालयात सुपूर्द करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.‌

एक मेंदूमृत व्यक्ती अवयवदान करून ८ व्यक्तींना जीवनदान देऊ शकते. गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच वैद्यकीय विश्वातील प्रगतीमुळे अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. त्यामुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण पुढे येत आहे. मात्र मेंदूमृत व्यक्तीकडून अवयवदान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. ती दूर करण्यासाठी मेंदूमृत अवयवदान मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. 

सध्या राज्यात अवयव प्रत्यारोपणासाठी मोठ्या प्रमाणावर रुग्ण प्रतिक्षेत आहेत. ही आकडेवारी पुढीलप्रमाणे 

मुत्रपिंड प्रत्यारोपण - ५,८३२,  यकृत प्रत्यारोपण- १,२८४, 

हृदय प्रत्यारोपण– १०८, फुफ्फुस प्रत्यारोपण – ४८,  स्वादुपिंड प्रत्यारोपण – ३५, छोटे आतडे प्रत्यारोपण – ३

शनिवार, २९ जुलै, २०२३

शतकवीर रक्तदात्यांचा गौरव

शतकवीर रक्तदाते

शंभरपेक्षा अधिकवेळा रक्तदान करुन अनेकांचे प्राण वाचविण्यात मोलाची भूमिका बजाविणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने शतकवीर असणाऱ्या २० रक्तदात्यांचा विशेष सन्मान बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील 'मुंबई जिल्हा एड्स कंट्रोल नियंत्रण सोसायटी'द्वारे नुकताच करण्यात आला.


रक्तदान केल्यामुळे एखाद्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. पर्यायने त्या व्यक्तीच्या कुटुंबालाही मदत होऊ शकते. ही बाब लक्षात घेता रक्तदान हे एक सामाजिक कार्य असून सर्व निरोगी व्यक्तींनी नियमितपणे रक्तदान करावे, असे आवाहन मुंबई जिल्हा एड्स कंट्रोल सोसायटी अर्थात एम-डॅक्सचे संचालक आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त  रमाकांत बिरादार यांनी यावेळी केले.  

अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजयकुमार करंजकर, सहाय्यक संचालिका (रक्त संक्रमण सेवा) श्रीमती. अपर्णा पवार, रक्त केंद्र अधिकारी, समुपदेशक आणि समाज विकास अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

रक्तदानाबरोबरच प्लेटलेट, नेत्रदान, अवयव-दान आणि देहदान यासाठी देखील सर्वांनीच पुढाकार घेणे आणि आपल्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींना यात सहभागी करून घेणे अत्यंत आवश्यक असल्याचेही बिरादार यांनी सांगितले. 

शतकवीर रक्तदात्यांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉक्टर अविनाश सुपे, ज्येष्ठ पत्रकार  प्रसाद मोकाशी यांच्यासह किरण राजूरकर, विश्वेश लेले,  संजय डोबके, हिरोस खंबाटा, विठ्ठल शितोळे, संतोष मिश्रा, तरुण भगत, सतीश सावंत, राजेंद्र कुलकर्णी, संजय लवांडे, गणेश आमडोसकर, मनीष सावंत, मंतोष केळकर, विलास घाडीगावकर, गजानन नार्वेकर, डॉ. प्रगती वाझा, प्रशांत म्हात्रे दिव्या चंडोक यांचा समावेश आहे.

शनिवार, २२ जुलै, २०२३

रुग्णसेवाव्रती- डॉ. गणेश गंगाधर रायकर

विस्मरणातील कल्याणकर या लेखमालिकेतील पुढील लेख रुग्णसेवाव्रती- डॉ. गणेश गंगाधर रायकर

महाराष्ट्र टाइम्स- ठाणे प्लस/ २२ जुलै २०२३

 

सोमवार, १० जुलै, २०२३

तर भारताचा 'फ्रान्स' होईल

 

भारतातील घुसखोरांविषयी कठोर पावले

 उचलली नाहीत तर भारताचा 'फ्रान्स' होईल 

- अनिल धीर यांचा इशारा 

फ्रान्समध्ये लादलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या अपयशाचे गंभीर परिणाम फ्रान्समधील नागरिक भोगत आहेत. भारतात अवैध पद्धतीने रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांना अनेक ठिकाणी वसविले जात असून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. या घुसखोरांविषयी केंद्र सरकराने कठोर पावले उचलली नाहीत तर भारताचाही 'फ्रान्स' होईल, असा इशारा ओडिशा, भुवनेश्वर येथील ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’चे संयोजक, अभ्यासक अनिल धीर यांनी दिला.‌

हिंदू जनजागृती समितीने आयोजित केलेल्या 'फ्रान्सची आग भारतापर्यंत येईल का ?’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

एक सेक्युलर देश म्हणून युरोपमध्ये फ्रान्सचे उदाहरण दिले जाते. दुसर्‍या महायुद्धानंतर फ्रान्सने आपल्या सीमा शरणार्थींसाठी खुल्या केल्या. आता फ्रान्समध्ये ज्या दंगली होत आहेत, त्या अचानक होत नसून गेल्या ३० ते ४० वर्षांपासूनची तयारी आहे, असेही धीर यांनी सांगितले. 

पोलंड आणि जपान या देशांनी सुरुवातीपासूनच अवैध घुसखोरी होऊ दिली नाही. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसुद्धा याच धर्तीवर प्रयत्नरत आहेत. हिंसाचारानंतर आता फ्रान्समध्ये कठोर कायदे लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या स्थितीवरून भारताने धडा घेऊन अवैध घुसखोरी आणि वास्तव्याविषयी देशात कठोर कायदे लागू करायला हवेत, असेही धीर म्हणाले.

सध्या फ्रान्समध्ये दंगली घडवून आणल्या जात असून तो पूर्वीपासूनच अल्पसंख्यांकांचा ‘ग्लोबल पॅटर्न’ राहिला आहे. प्रथम शरणार्थी म्हणून जायचे, नंतर तेथील संस्कृती, वारसा, ऐतिहासिक वास्तू नष्ट करून तेथील लोकांनाच शरणार्थी बनवून तिथे ‘दार-उल-इस्लाम’चे राज्य आणायचे. काही वर्षापूर्वी भारतामध्येही अवैध पद्धतीने आलेले रोहिंग्या मुसलमान यांचाही असाच धोका असून आज भारतात अनेक ‘मिनी पाकिस्तान’ निर्माण झाले आहेत., असे विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी सांगितले.

जर्मनी येथील लेखिका मारिया वर्थ म्हणाल्या, सध्या फ्रान्समध्ये झालेल्या दंगली पूर्वनियोजित होत्या. फ्रान्स आणि विविध देशांतील राजकीय नेते शरणार्थीं मुसलमानांचा दंगली अन् हिंसाचार करण्यासाठी वापर करत आहेत; मात्र फ्रान्समध्ये शरणार्थी मुसलमानांनी घडवून आणलेल्या दंगलीचे समर्थन करण्याची आवश्यकता नाही. एकंदरीत फ्रान्समधील स्थिती पाहता भारताने खूप सतर्क रहायला हवे.