बुधवार, १४ मे, २०२५

मेट्रो लाईन-९ प्रकल्पात रेल्वे आणि उड्डाणपूल एकाच संरचनेत- फडणवीस

मुंबईतील मेट्रो लाईन-९ प्रकल्पात रेल्वे आणि उड्डाणपूल एकाच संरचनेत- उपमुख्यमंत्री फडणवीस -ठाणे जिल्ह्यातील पहिल्या मेट्रो लाईनची तांत्रिक चाचणी यशस्वी - मिरा-भाईंदर ते पश्चिम- पूर्व उपनगरे आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाशी मेट्रो ९ जोडली जाणार ठाणे, दि. १४ मे ठाणे जिल्ह्यातील पहिल्या मेट्रो लाईन ९ प्रकल्पाच्या तांत्रिक चाचण्या सुरू झाल्या असून लवकरच हा टप्पा प्रवाशांसाठी सुरू केला जाईल.ही मेट्रो लाईन पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.मुंबईत पहिल्यांदाच अशा प्रकारचा डबल डेकर प्रकल्प उभारण्यात आला असून मेट्रो आणि उड्डाणपूल एकाच संरचनेत आहेत,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले.‌ ठाणे जिल्ह्यातील पहिल्या मेट्रो लाईनची चाचणी(ट्रायल रन) यशस्वीरित्या पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए)अध्यक्ष,एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही यावेळी उपस्थित होते.
या मेट्रोमुळे मिरा-भाईंदरकरांसाठी मुंबईच्या विविध कोपऱ्यांपर्यंत पोहोचणे आता अधिक सोयीचे आणि वेगवान होणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यावर्षी ५० किमी, पुढील वर्षी ६२ किमी आणि तिसऱ्या वर्षी ६० किमी मेट्रो सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या मेट्रोच्या विरारपर्यंतच्या विस्तारामुळे ठाणे,पालघर आणि रायगड जिल्ह्यांना मेट्रोशी थेट जोडणी मिळणार असून‌ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ३३७ किलोमीटर लांबीचे मेट्रो रेल्वेचे जाळे उभारले जाणार आहे. तर मेट्रो लाईन-९ मुळे कमी वेळात जास्त अंतर पार करता येणार असून एकूणच आर्थिक गतिशीलता वाढवणारा महत्त्वाचा टप्पा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
मेट्रो लाईन-९ चा हा पहिला टप्पा दहिसर (पूर्व) ते काशिगावपर्यंत ४.४ किमी लांबीच असून या मार्गावर दहिसर (पूर्व),पांडुरंगवाडी, मिरा गाव,काशिगाव अशी चार स्थानके आहेत.अंधेरी पश्चिम (लाइन २ बी),घाटकोपर (लाइन १ व ७, लिंक रोड (दहिसर पूर्व – लाइन २ ए) इथे जाता येणार आहे. तर भविष्यात मिरा गाव मेट्रोस्टेशन मार्गे मेट्रो लाईन १०व्दारे ठाणे आणि वसई-विरार (लाइन १३–एनएससीबी स्थानक) जोडली जाणार आहे.‌ 'एमएमआरडीए'चे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे,प्रांताधिकारी उर्मिला पाटील, तहसिलदार निलेश गौड, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, स्थानिक आजी व माजी लोकप्रतिनिधींनी, शासकीय अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: