शनिवार, ३ मे, २०२५

मग उंचच उंच मूर्ती नका बनवू, काही बिघडणार नाही...

मग उंचच उंच मूर्ती नका बनवू, काही बिघडणार नाही... मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमातून झालेले मार्केटिंग, सर्वपक्षीय राजकारण्यांचा कब्जा, मनी आणि मसल पॉवरचे प्रदर्शन यातून उंचच उंच मूर्तींची स्पर्धा सुरू झाली आहे. एकसंघ शिवसेना असताना तत्कालीन महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी २०/२५ वर्षांपूर्वीच मुंबईत मूर्तीच्या उंचीवर मर्यादा आणण्याची मागणी केली होती. पाठपुरावा केला होता. मात्र उद्धव ठाकरे व शिवसेना नेते डॉ. राऊळ यांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. मूर्तीकारांपुढे त्यांनी नांगी टाकली. शाडू मातीच्या सहाय्याने जितकी उंच मूर्ती बनविणे शक्य असेल तेवढी तयार करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनीही मूर्तीकारांपुढे नांगी टाकू नये. 'पीओपी' बंदीवर कायम राहावे. पीओपी बंदी हा मुद्दा एका रात्रीत समोर आलेला नाही. गेल्या दोन/चार वर्षांपासून तो चर्चेत आहे. प्रत्येक वेळी पीओपी मूर्तीकारांच्या दबावाला बळी पडून यंदा नको, पुढच्या वर्षी अंमलबजावणी करू, असे करून आपल्याला हवे ते पीओपी मूर्तीकार करून घेत होते. पीओपीवर बंदीच, अशी ठोस भूमिका बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने घेतली त्यासाठी अभिनंदन. यावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत पीओपी समर्थक मूर्तीकारांनी हाणामारी केली. चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या गणपतीच्या उंचच उंच मूर्ती बनविण्यावरून चाललेले हे दबावाने राजकारण दुर्दैवी आहे. महापालिका प्रशासन, राज्य शासनातर्फे वेळोवेळी पीओपी मूर्तींवर बंदी आहे हे कानीकपाळी ओरडून सांगितले जात असतानाही मूर्तीकार पीओपीच्या मूर्ती तयार करत असतील तर चूक त्यांची आहे.
रस्ते अडवून, मंडप उभारून, वाहतुकीला व पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करणे, आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत कानाचे पडदे फाटतील, छातीत धडकी भरेल अशा आवाजातील डीजे, अश्लील गाण्यांवर हिडीस नाच असे ओंगळ स्वरूप सार्वजनिक गणेशोत्सवाला आले आहे. कोणाही सुजाण, सुशिक्षित व सारासार विचार करण्या-या माणसांना गणेशोत्सवाचे हे ओंगळ, हिडीस आणि व्यापारी स्वरूप नको आहे. फक्त सार्वजनिक गणेशोत्सवच नव्हे तर नवरात्रोत्सव, दहिहंडी उत्सव यांनाही काही सन्माननीय अपवाद वगळता ओंगळ, हिडीस स्वरूप आले आहे. करोना काळातील निर्बंधांमुळे तेव्हा हे सण कधी आले व गेले ते कळलेच नाही. अत्यंत शांततेत उत्सव पार पडले. आणि ते खूप छान वाटले होते. पण तो अपवाद ठरला होता. शेखर जोशी ३ मे २०२५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: