रविवार, २५ मे, २०२५

खगोल अभ्यासकांचे संमेलन डिसेंबरमध्ये ठाणे येथे होणार

खगोल अभ्यासकांचे संमेलन डिसेंबरमध्ये ठाणे येथे होणार - खगोलशास्त्र जीवन गौरव पुरस्कार भरत अडूर यांना जाहीर ठाणे, दि. २५ मे खगोल अभ्यासकांचे १४ वे राज्यस्तरीय संमेलन येत्या २० व २१ डिसेंबर रोजी ठाणे येथे आयोजित करण्यात येणार आहे.‌ संमेलनात यंदाचा खगोलशास्त्र जीवनगौरव पुरस्कार नेहरू तारांगणातील निवृत्त शास्त्रज्ञ भरत अडूर यांना देण्यात येणार आहे.‌ मराठी खगोल अभ्यासक मंडळ कार्यकारिणीची सभा शनिवारी ठाणे येथे झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने हे संमेलन घेण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. दिवंगत खगोलशास्रज्ञ आणि लेखक डाॅ. जयंत नारळीकर यांनी विश्वनिर्मिती सिद्धांतसंबंधित संशोधन केले होते. डिसेंबरमध्ये होणा-या खगोल अभ्यासकांच्या संमेलनात डॉ.‌ नारळीकर यांच्या विश्वनिर्मिती सिद्धांतसंबंधित एक व्याख्यान तसेच एस्ट्राॅइड, गगनयान, आधुनिक दुर्बिणी वगैरे विषयांवर तज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. संमेलनाच्या निमित्ताने रात्री आकाश दर्शन कार्यक्रमही होणार आहे. शनिवारी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेस संस्थेचे अध्यक्ष दा.कृ.सोमण यांच्यसह छत्रपती संभाजी नगर येथील तारांगणाचे श्रीनिवास औंधकर, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह प्रा. नामदेव मांडगे, पिंपरी चिंचवड तारांगणाचे कासार, नारायणगाव येथील रेडिओ दुर्बिणीचे सुधीर फाकटकर, कल्याण आकाशमित्र संस्थेचे हेमंत मोने, नाशिकचे सचिन मालेगावकर, नेहरू तारांगणाचे निवृत्त शास्त्रज्ञ भरत अडूर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: