मंगळवार, ६ मे, २०२५

रेल्वे अधिकारी, कर्मचारी यांच्यात हा कोडगेपणा, माज कुठून येतो?

रेल्वे अधिकारी, कर्मचारी यांच्यात हा कोडगेपणा, माज कुठून येतो? - ट्रेन लेट असल्याची घोषणा न करणा-या संबंधित स्टेशन मास्तरांवर कारवाईचा बडगा उगारा - वेतनात कपात करा, बढती व वेतनवाढ रोखा शेखर जोशी ट्रेन लेट असेल तर त्याची घोषणा न करण्याचा कोडगेपणा, निगरगट्टपणा, मस्ती, माज कुठून व कशी येते? आत्ताच्या काळात सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान, सोयी, सुविधा उपलब्ध असतानाही या संदर्भातील रितसर घोषणा का केली जात नाही? प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि संतप्त प्रवाशांनी राडा केला तर आणि तरच रेल्वे प्रशासनाला जाग येणार आहे का? भर दुपारची वेळ. अंगाची काहिली करणारा उन्हाळा. वसई रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक सहा/ सातवर दुपारी ३.३५ वाजता सुटणा-या वसई- दिवा ट्रेनसाठी प्रवासी तीन/सव्वा तीन वाजल्यापासून वाट पाहत थांबलेले. घड्याळाचा काटा पुढे सरकतोय. सात नंबर वरुन दोन मालगाड्या दिव्याच्या दिशेने रवाना होतात. इकडे फलाट क्रमांक सहावर दिव्याच्या दिशेने एक मालगाडी येते विरारच्या दिशेने रवाना होते. त्यानंतर आणखी एक मालगाडी येते ती फलाट क्रमांक सहावरच थांबते. फलाटावरील गर्दी वाढत चाललेली. घड्याळाचा काटा पुढे जातच चाललाय. प्रवाशांमध्ये चुळबुळ सुरु. ट्रेन येणार आहे ना? की रद्द केली? एकमेकांकडे विचारपूस होते. पण काही कळत नाही. कारण वसई- दिवा ट्रेनबाबची कोणतीही घोषणा वसईत झालेली नसते. वाढत चाललेल्या गर्दीत ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले असे सर्व आबालवृद्ध प्रवासी. रेल्वेचे तिकीट काढून प्रवासी रेल्वे फलाटावर ट्रेनची वाट पाहात ताटकळत उभे आहेत. ३.३५ ला सुटणारी ट्रेन वेळेत सुटणार नाही, ही वस्तुस्थिती प्रवाशांना सांगण्याची जबाबदारी कोणाची? वसई रेल्वे स्टेशन मास्तरांची आहे ना? ते आपली जबाबदारी कसे टाळू शकतात? इतका कोडगेपणा, निगरगट्टपणा, मस्ती, माज रेल्वे अधिकाऱ्यांकडे कुठून येतो? ट्रेन सुटण्याची जी वेळ आहे त्यावेळेच्या अर्ध्या तासानंतर रेल्वे प्रशासन, वसई रेल्वे स्टेशन मास्तर, संबंधित अधिकारी, कर्मचारी जागे होतात. आणि ३.५५/४ च्या सुमारास वसईहून दिव्याला जाणारी ट्रेन येत आहे, अशी घोषणा वसई रेल्वे स्थानकात केली जाते. फलाट क्रमांक सात वरील प्रवासी तयारीत राहतात. गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने काही पुरुष व महिला प्रवासी फलाटावरून उतरून रेल्वे मार्ग ओलांडून विरुद्ध बाजूला उभे राहतात. वसई - दिवा ट्रेन फलाट क्रमांक सहावर येते आणि आक्रमण केल्याप्रमाणे फलाटावरील प्रवासी ट्रेनमध्ये चढण्यासाठी तर ट्रेनमधील प्रवासी फलाटावर उतरण्यासाठी निकराचा संघर्ष करतात. यात ढकलाढकली, थोडी चेंगराचेंगरी होते. आणि ४.१० ट्रेन सुटते. बसायला मिळालेल्या प्रवाशांना जणू काही जग जिंकले असे वाटते. वसई स्टेशन सुटल्यावर दिव्याच्या दिशेने जाताना ४.१५ वाजता पहिले स्टेशन जुचंद्र येते. एक/ दोन मिनिटे ट्रेन थांबेल आणि सुटेल असे वाटत असतना जुचंद्र स्थानकात ट्रेन पाच/ दहा मिनिटे नव्हे तब्बल वीस मिनिटे थांबते. ट्रेन का थांबली? इतका वेळ झाला तरी का सुटत नाही? पुढे नेमके काय झाले? या प्रश्नांची उत्तरे प्रवाशांना नेहमीप्रमाणे मिळत नाहीत. खरेतर लोकल ट्रेन किंवा या ट्रेनमध्येही चालक किंवा गार्ड यांनी घोषणा केली तर एकाच वेळी सर्व डब्यातील प्रवाशांना ऐकू येईल अशी व्यवस्था, स्पीकर आहेत. पण ते कधीही केले जात नाही. प्रवासी चिडतात, रेल्वेच्या नावाने बोटे मोडतात, चरफडतात. अखेर ४.३५ च्या सुमारास थांबलेली ट्रेन सुटते, प्रवासी सुटकेचा निःश्वास सोडतात. रेल्वे प्रशासनाच्या लेखी मालवाहतूक इतकी महत्त्वाची आहे का? की त्यासाठी नियमित ट्रेन लेट झाली तरी चालेल. असाच अनुभव लोकल ट्रेन प्रवाशांना येतो. या ट्रेनऐवजी लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य देऊन त्या पुढे काढल्या जातात. एखादी ट्रेन लेट झाली तर त्याची आगाऊ माहिती प्रवाशांना मिळणे हा त्यांचा हक्क व अधिकार आहे. तो जर वेळोवेळी डावलला जात असेल तर रेल्वे स्थानकात लेट ट्रेनची घोषणा न करणा-या संबंधित स्टेशन मास्तरांवर शिक्षा म्हणून रेल्वे प्रशासनाने कठोरात कठोर कारवाई करावी, त्यांचे वेतन कापावे, बढती, वेतनवाढ रोखली जावी. असे काही केले तर आणि तरच या कोडगेपणाला, निगरगट्टपणाला आळा बसेल, मस्ती, माज उतरेल. एकावर असा बडगा उगारला तर बाकीचे नक्कीच सुतासारखे सरळ होतील. रेल्वे प्रवासी प्रवासी संघटना, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे यासाठी साकडे घालावे. शेखर जोशी ६ मे २०२५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: