मंगळवार, १० जानेवारी, २०२३

सार्वजनिक वाचनालयाचे जनक- सदाशिव मोरेश्वर साठे

कोणत्याही शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला असला तरीही शहराच्या जडणघडणीत शहरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचा मोठा सहभाग असतो. गेल्या पन्नास ते सत्तर वर्षांच्या कालावधीत कल्याण शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, विविध कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात शहरातील सुजाण नागरिकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

विविध क्षेत्रात प्रसिद्धीस आलेल्या नामवंतांनी, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तसेच आपली नोकरी, व्यवसाय आणि संसार सांभाळून सर्वसामान्य कल्याणकर नागरिकांनी कल्याण शहराच्या विकासासाठी आपले योगदान दिले. ही माणसे प्रसिद्धीपासून दूर राहिली आणि विस्मृतीतही गेली. विस्मृतीत गेलेल्या अशा कल्याणकरांचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय करून देणारी ही लेखमालिका महाराष्ट्र टाइम्सच्या ठाणे प्लस पुरवणीत सुरू झाली आहे. 

कल्याणसह अंबरनाथ, बदलापूर या शहरातीलही विस्मरणातील व्यक्तींचा परिचय यात करून देण्यात येणार आहे. पंधरा दिवसांनी एक असे महिन्यातून दोन लेख असतील. 

या लेखमालिकेतील पहिला लेख महाराष्ट्र टाइम्सच्या ठाणे प्लस पुरवणीत ७ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध झाला. कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाची स्थापना ज्यांनी केली त्या सदाशिव मोरेश्वर साठे यांच्यावर होता. त्या लेखाचे क्लिपिंग

यंदा मकर संक्रांत १५ जानेवारीला

ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ. सोमण

यंदाच्या वर्षी शनिवार, १४ जानेवारी रोजी रात्री ८-४४ वाजता  सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार असल्याने मकर संक्रांत रविवार १५ जानेवारी रोजी आली आहे अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. 

निरयन मकर संक्रांत दरवर्षी  १४ जानेवारीलाच येते हे खरे नाही. सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा मकर राशीत प्रवेश करेपर्यंत ३६५ दिवस ६ तास ९ मिनिटे १० सेकंद एवढा कालावधी लागतो. त्यामुळे निरयन मकर संक्रांतीचा दिवस हा पुढे पुढे जात असतो, असे सोमण यांनी सांगितले.

वर्ष २०० मध्ये निरयन मकर संक्रांत २२ डिसेंबरला तर १८९९ मध्ये १३ जानेवारीला आली होती. १९७२ पर्यंत मकर संक्रांत १४ जानेवारीलाच येत होती. २०८५ पर्यंत मकर संक्रांती कधी १४ ला तर कधी १५ जानेवारीला येत राहील. सन २१०० पासून निरयन मकर संक्रांती १६ जानेवारीला येणार आहे. सन ३२४६ मध्ये निरयन मकर संक्रांती  चक्क १ फेब्रुवारीला तर २०२४, २०२७ मध्ये निरयन मकर संक्रांत १५ जानेवारीला तर  २०२५, २०२६, २०२९, २०३० मध्ये १४ जानेवारीला येणार असल्याचे सोमण म्हणाले.

छायाचित्र- गुगलच्या सौजन्याने 

आपली पंचांगे निरयन पद्धतीची असल्याने सूर्य  निरयन राशीत प्रवेश करतो त्यावेळी आपण मकर संक्रांत साजरी करतो. सूर्याने जर रात्री मकर राशीत प्रवेश केला तर दुस-या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते. कोणतीही वाईट घटना घडली की, 'संक्रांत आली' असे म्हटले जाते,पण ते योग्य नाही. धनू राशीतून मकर राशीत सूर्याने प्रवेश करणे वाईट कसे असेल ? या दिवसापासून दिनमान वाढत जाते ते वाईट कसे म्हणता येईल ? तिळगूळ देऊन गोड बोलायला शिकविणारा हा दिवस वाईट कसा असू शकेल ? संक्रांतीदेवीने जर या दिवशी दुष्ट राक्षसाला ठार मारले असेल तर ते वाईट असेल का ? मकर संक्रांतीचा सण अशुभ नाही.  मकर संक्रांतीच्यावेळी अनेक खोट्या व चुकीच्या अफवा पसरविल्या जातात त्यावरही विश्वास ठेवू नका. मकर संक्रांतीच्या दिवशी दिनमान वाढत जाण्याच्या आनंदाप्रीत्यर्थ सूर्याचे स्वागत करण्यासाठी रंगीबेरंगी पतंग उडविण्याची प्रथा आहे. परंतू पतंग उडविण्यासाठी धारदार नॅायलॅानच्या मांजाचा वापर करू नका, असे आवाहनही सोमण यांनी केले. 

छायाचित्र गुगलच्या सौजन्याने 

मकर संक्रांती पुण्यकालात मातीच्या सुगडात ( सुघटात ) ऊस, बोरे, शेंगा , गाजर, ओले हरभरे वगैरे त्यावेळी शेतात पिकणारे पदार्थ आणि तिळगूळ  दान देण्याची पद्धत आहे. मकर संक्रांतीला काळी वस्त्रे परिधान करण्याची पद्धत आहे. कारण हे दिवस थंडीचे असतात. काळ्या रंगाची वस्त्रे शरीर उबदार ठेवतात.  थंडीच्या  दिवसात  तीळ आरोग्यास चांगले असतात. म्हणून तीळाचे पदार्थ करून खाण्यास सांगितलेले आहेत. ज्यांच्याशी वर्षभरात भांडण झाले असेल, अबोला धरला गेला असेल तर एकमेकांना तिळगूळ देवून मने एकत्र आणणारा, गोड बोला असा संदेश देणारा हा गोड सण आहे.मकर संक्रांतीच्या दिवशी वस्त्रदान , अन्नदान, तिळगूळ दान देण्याची प्रथा आहे. परंतू आधुनिक काळात विद्यादान, श्रमदान, ग्रंथदान , रक्तदान, सामाजिक- शैक्षणिक संस्थाना अर्थदान करणे हे ही तितकेच पुण्यदायक आहे असेही सोमण यांनी स्पष्ट केले.

©️ शेखर जोशी


१० जानेवारी २०२३

-----


                                        

याच विषयावर ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांच्याशी केलेली बातचीत

रविवार, २१ मार्च, २०२१

व्यक्तिवेध-विनायक चासकर

मुंबई दूरदर्शनच्या स्थापनेपसून तेथे कार्यरत असलेले ज्येष्ठ निर्माते विनायक चासकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्यावरील हा व्यक्तिवेध. हा लेख लोकसत्ता-मुख्य अंक, २० मार्च २०२१ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. विनायक चासकर ग्रॅण्ट रोड येथे जाण्यासाठी माटुंगा रोड स्थानकात आले. स्थानकातील पादचारी पूल उतरत असतानाच गाडी सुटली. आता मला ती गाडी मिळणे शक्यच नव्हते. पण ती गाडी काही क्षणातच थांबली आणि मला त्याच गाडीत चढायला मिळाले. ही किमया ‘गजरा’ कार्यक्रमाने घडविली. धावतपळत उतरूनही मला गाडी पकडता आली नाही हे त्या गाडीच्या मोटरमनने पाहिले. त्या अमराठी मोटरमनला ‘गजरा’ कार्यक्रमामुळे मी परिचित होते. केवळ त्या ओळखीमुळे त्यांनी सुरू झालेली गाडी काही क्षण पुन्हा थांबविली आणि ‘मॅडम मैं आपका प्रोग्रॅम देखता हूँ, हमें अच्छा लगता हैं’अशी दादही त्यांनी दिली… ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांच्या बाबतीत घडलेला हा किस्सा त्यांनीच ‘लोकसत्ता-रविवार वृत्तान्त’मधील ‘पुनर्भेट’ या सदरासाठी घेतलेल्या मुलाखतीच्या वेळी सांगितला होता. खरोखरच अशी अमाप लोकप्रियता त्या काळी विनायक चासकर यांच्या ‘गजरा’ कार्यक्रमाला मिळाली होती. अमराठी प्रेक्षकांमध्येही ‘गजरा’ पाहिला जायचा. निखळ विनोद आणि करमणूक असे त्याचे स्वरूप होते. चासकर यांनी सादर केलेला ‘गजरा’ आणि ‘नाटके’ यातून शं. ना. नवरे, रत्नाकर मतकरी, लक्ष्मीकांत बेर्डे, सुमती गुप्ते, अरविंद देशपांडे, रिमा लागू, मोहन गोखले यांच्यासह सुरेश खरे, दया डोंगरे, मोहनदास सुखटणकर, बाळ कर्वे, जयंत सावरकर, दिलीप प्रभावळकर, विजय कदम आदी आणि आता नामवंत, मातब्बर असलेल्या लेखक, कलाकारांचा सहभाग होता. या सर्वांना ‘गजरा’ आणि दूरदर्शनच्या नाटकांनी महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचविले.
चासकर हे दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे (नॅशनल स्कू ल ऑफ ड्रामा) पदवीधर. मुंबई दूरदर्शनमध्ये ते नेपथ्यकार म्हणून रुजू झाले. पुढे जिद्द, मेहनत, बुद्धिमत्ता, कल्पकता या गुणांच्या जोरावर एक सर्जनशील निर्माता अशी ओळख मिळविली. दूरचित्रवाणीसारख्या सरकारी, कौटुंबिक माध्यमाच्या प्रेक्षकांना काय आवडेल याचा विचार करून त्यांनी मुंबई दूरदर्शनवर अनेक वेगवेगळे कार्यक्रम सादर केले. पण यातही चासकर यांनी सादर केलेली विविध नाटके आणि ‘गजरा’ हे कार्यक्रम विशेष लक्षवेधी ठरले. दूरदर्शन परिवारात ते ‘भाऊ’ या नावाने प्रसिद्ध होते. २ ऑक्टोबर १९७२ रोजी मुंबई दूरदर्शनची म्हणजेच आत्ताच्या ‘सह्याद्री’ वाहिनीची सुरुवात झाली. तेव्हापासून अनेक ‘व्यत्यय’ पार करत मुंबई दूरदर्शनवरील निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, वृत्तनिवेदक, निवेदक, सूत्रसंचालक आणि पडद्यामागच्या सर्वानीच अनेक दर्जेदार, मनोरंजक, ज्ञानवर्धक कार्यक्रम सादर करून काही पिढ्या संस्कारित केल्या आणि या प्रत्येकानेच आपला स्वतंत्र ठसा कामावर उमटविला. डॉ. विश्वास मेहंदळे, याकूब सईद, विजया जोगळेकर-धुमाळे, अरुण काकतकर, सुहासिनी मुळगावकर, विनय धुमाळे, आकाशानंद, मनोहर पिंगळे, डॉ. किरण चित्रे, प्रदीप भिडे, अनंत भावे, सुधीर गाडगीळ, भक्ती बर्वे, स्मिता पाटील आदींसह विनायक चासकर हे नावही अग्रक्रमाने घ्यावेच लागेल. मुंबई दूरदर्शनचा इतिहास विनायक चासकर या नावाशिवाय पूर्णच होणार नाही.

मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

उचलली जीभ आणि लावली टाळ्याला


मराठीत 'उचलली जीभ आणि लावली टाळ्याला' अशी म्हण आहे. सध्या काही राजकीय नेत्यांनी हा प्रकार सुरु केला असून सभा, संमेलने, जाहीर कार्यक्रमातून राजकीय नेत्यांची जीभ घसरत चालली आहे. हातात माईक आणि समोर श्रोता मिळाला की काय बोलावे, कसे बोलावे याचे भान व ताळतंत्र सुटत चाललेले पाहायला मिळत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन. दारु विक्री वाढवायची असेल तर दारुला महिलांचे नाव द्या. कारखान्यात तयार केलेल्या दारुला 'महाराजा' ऐवजी 'महाराणी' असे नाव ठेवा त्याची विक्री वाढेल असा सल्ला महाजन यांनी सातपुडा साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाला दिला. महाजन यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध झाल्यानंतर त्यांना उपरती झाली आणि त्यांनी जाहीर माफी मागितली. पण मुळात जाहीरपणे असे बोलायची खुमखुमी महाजन यांना का आली हा प्रश्नच आहे.

जाहीर कार्यक्रमातून बोलताना जीभ घसरणारे महाजन हे काही पहिलेच राजकीय नेते किंवा मंत्री नाहीत. याही अगोदर अजित पवार, आर. आर. पाटील, गिरीश बापट, रावसाहेब दानवे आदी राजकीय नेत्यांची जीभ घसरली होती. महाराष्ट्रात ऐन दुष्काळी परिस्थीती असताना धरणात पाणी नाही तर मी काय xx का?, असा सवाल जाहीरपणे विचारुन अजित पवार यांनी खालची पातळी गाठली होती. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तेव्हाचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी 'बडे बडे शहरोंमे ऐसे छोटे छोटे हादसे होते है असे विधान करुन गदारोळ उडविला होता. 'भाजप'चे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी 'साले'हा शब्द उच्चारला आणि स्वतला व पक्षालाही अडचणीत आणले होते. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनीही 'तसल्या'व्हिडिओ क्लिपा आम्ही पण पाहतो, आम्ही पिकलेलं पान असलो तरी आमचे हिरवे देठ आहेत असे वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला होता. भाजप समर्थक आमदार प्रशांत परिचारक यांचीही जीभ अशीच घसरली. राजकारण कसे असते हे उपस्थीतांना समजून सांगताना परिचारकांनी सैनिकांविषयी संतापजनक वक्तव्य केले. ‘सीमेवरील जवान वर्ष भर घरी येत नाही. तरीदेखील घरी आल्यावर त्याला मुलगा झाल्याचे समजते आणि तो गावात मुलगा झाल्याच्या आनंदात पेढेही वाटतो’, असे परिचारक बोलले होते. केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात पत्रकार आणि नागरिकांना उद्देशून‘तुमच्या नशिबी लक्ष्मीदर्शनाचा योग आहे. येणाऱ्या लक्ष्मीला नाकारू नका’, असे वक्तव्य केले होते. निवडणुक आयोगनेही गडकरी यांच्या या विधानाची दखल घेऊन ताशेरे ओढले होते.लोकसभा निवडणुकीच्या वेळी साताऱ्यातील सभेत बोलताना ‘बोटाची शाई पुसून पुन्हा मतदान करा’ हे त्यांचे विधान भलतेच गाजले. त्यांच्या या विधानाची निवडणुक आयोगानेही दखल घेतली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही मराठी साहित्यिकांची ‘बैल’ या शब्दांत संभावना करून तसेच ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व’ पु. ल. देशपांडे यांना दिलेल्या ‘महाराष्ट भूषण’ पुरस्कारावरून ‘झक मारली आणि पुलंना हा पुरस्कार दिला’, 'मोडका पूल' अशी विधाने केली होती.

खरे तर सार्वजनिक जीवनात वावरताना मोठ्या पदावर किंवा समाजात ज्याला मान व प्रतिष्ठा आहे अशा कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीने आचार-विचार आणि कृतीचे काही किमान संकेत पाळणे अत्यंत गरजेचे आहे. कारण ही सर्व मंडळी ज्या पदावर काम करत आहेत, त्यांना अशा प्रकारची बेजबाबदार आणि जीभ घसरणारी वक्तव्ये करणे न शोभणारे आहे. आजही आपल्या समाजात अशा प्रकारचे बोलणे हे असंस्कृत आणि निषेधार्ह मानने जाते आणि त्यात काहीही चूक नाही. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दिला असला तरी त्याचा अर्थ उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असा होत नाही, याचे भान राजकीय नेत्यांनी ठेवण्याची गरज आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काहीही कृती करून, काहीही बोलून, आपल्या जीभेचा पट्टा वाट्टेल तसा सैल सोडून इतरांना दुखावणे नव्हे. आपण बोलतो किंवा वागतो त्याचा काय परिणाम होईल याचा विचार प्रत्येक राजकीय नेत्याने केला पाहिजे. अशी विधाने करताना त्याचा इतरांवर, समाजावर काय परिणाम होईल याचे भान ठेवले पाहिजे. जीभ घसरणार नाही याची त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे अशा प्रकारे वादग्रस्त वक्तव्य एखाद्या राजकीय नेत्याने केले तर तो माफी मागून मोकळा होतो आणि सुटतो. काही दिवसांनी लोकही तो काय बोलला होता ते विसरुन जातात. या मंडळींच्या विरोधात पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व कोणतीही कारवाई करत नाही त्यामुळे राजकीय मंडळीही पुन्हा आपल्याला हवे ते बोलायला मोकळी होतात. असे वक्तव्य पुन्हा होणार नाही याची जरब बसण्यासाठी त्यांना काहीतरी शिक्षा झाली पाहिजे, तरच असे प्रकार थांबतील. राजकीय पक्ष त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करणा नसेल तर त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे, न्यायालयात याचिका दाखल करणे किंवा निवडणुकीत मत मागायला आले की त्यांच्या वक्तव्याची आठवण करुन देऊन त्यांना मतदान न करणे अशी पावले उचलून त्यांना धडा शिकविला पाहिजे.

असे जो पर्यंत होत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांची जीभ अशीच वळवळत राहणार, घसरणार आणि उचलली जीभ व लावली टाळ्याला असेच घडत राहणार...

-शेखर जोशी

सोमवार, १७ जुलै, २०१७

समर्थ रामदास स्वामींचे बोल


आज अमरनाथ यात्रा नरसंहाराच्या पार्श्वभूवीवरती ,,,, रामदास स्वामी आठवतात

अध्यात्माच्या पोकळ आणि वांझोट्या गप्पा न मारता ज्यांनी हिन्दु समाजास बलोपासनेची शिकवण दिली आणि क्षात्रतेज जागृत ठेवले त्या समर्थ रामदास स्वामींना साष्टांग प्रणाम.

जयासी वाटे जीवाचे भय।

तेणे क्षात्रधर्म करो नये।

काहीतरी करोनी उपाये।

पोट भरावे।।

मराठा तितुका मेळवावा।


महाराष्ट्र धर्म वाढवावा।

सगट स्वकीयांचा जिव्हाळा।

सोडु नये।।

धर्मासाठी झुंजावे।

झुंजोनी अवघ्यासी मारावें।

मारितां मारितां घ्यावें।

राज्य आपुलें।।

आधी गाजवावे तडाखे।

तरिच भूमंडळ धाके।

हे न करिता धक्के।

राज्यास होती।।

धटासी आणावा धट।

उद्धटासी उद्धट।

खटनटासी खटनट।

सामर्थ्य करीं।।

देशद्रोही तितुके कुत्ते।

मारोनि घालावे परते।

देवदास पावती फत्ते।

यदर्थी संशयो नाही।।

आहे तितुके जतन करावें।

पुढे आणिक मेळवावें।

महाराष्ट्र राज्य करावें।

जिकडे तिकडे।।

~समर्थ रामदास स्वामी

असा रांगडा आणि क्षात्रवृत्ती उत्तेजित करणारा उपदेश करणारा संत क्वचितच कोणत्याही प्रांतात जन्मला असेल. राष्ट्रभक्ती आणि धर्मभक्ती हेच खरे अध्यात्म असा उपदेश करणारे समर्थ रामदास लवकरात लवकर उभ्या हिन्दुस्थानास समजणे अत्यंत आवश्यक आहे. रामदास स्वामींच्या उपदेशाप्रमाणे स्वत्व आणि स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा, हिंमत आणि ताकत सर्व भारतीयांना लाभो हीच प्रार्थना.

।।जय जय रघुवीर समर्थ।।

महाराष्ट्राची 'राज'धारा


http://epaper.loksatta.com/c/20620076 महाराष्ट्राची 'राज'धारा लोकसत्ता-मुख्य अंक ३० एप्रिल २०१७

लावणी सम्राज्ञी


पुनर्भेट

सुलोचना चव्हाण

संगीतकार वसंत पवार एक दिवस अचानक त्यांच्या घरी आले आणि चित्रपटासाठीची एक लावणी मला तुमच्याकडूनच गाऊन घ्यायची आहे, असे त्यांनी सांगितले. लावणी आणि तीही आपण गायची या कल्पनेने त्या क्षणभर गांगरल्या. लावणी गाऊ शकणार नाही, असे त्यांनी सांगितले. पण वसंत पवार यांनी आपला हट्ट सोडला नाही. अखेर त्या ती लावणी गायला तयार झाल्या. ती लावणी होती ‘नाव गाव कशाला पुसता मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हनत्यात लवंगी मिरची’. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली ती लावणी ‘रंगल्या रात्री अशा’ चित्रपटातील होती. या लावणीने ज्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले आणि आचार्य अत्रे यांनी ज्यांना ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब दिला त्या ज्येष्ठ पाश्र्वगायिका सुलोचना चव्हाण आजच्या ‘पुनर्भेट’च्या मानकरी आहेत. ‘सेलिब्रेटी’पणाचा कोणताही तोरा नसलेल्या सुलोचानाबाई यांना घरात आणि परिचितांमध्ये ‘माई’ या नावाने संबोधले जाते. त्यांच्याकडे पाहिले तर या व्यक्तिमत्त्वाने लावणीचा तो ठसका, खटय़ाळपणा, शृंगार गाण्यातून पुरेपूर पोहोचवला यावर विश्वासच बसत नाही. प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर असतानाही त्या जशा साध्या होत्या तशा त्या आजही आहेत. कपाळावर मोठे कुंकू आणि अंगभर लपेटून घेतलेला पदर हे त्यांचे रूप आजही तसेच आहे.

‘नाव गाव कशाला पुसता..’ या लावणीचा किस्सा अधिक विस्ताराने सांगताना त्या म्हणाल्या, माझे पती शामराव चव्हाण हे मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक-कॅमेरामन म्हणून काम करत होते. त्यांचा आणि वसंत पवार यांचा परिचय होता. मी पाश्र्वगायन करते हे पवार यांना ठाऊक होतेच. पण तेव्हा मी हिंदीत जास्त गात होते. मराठीत नुकतीच सुरुवात केली होती. पवार घरी आले आणि चव्हाणांना (मी आशा भोसले यांच्या सांगण्यावरून शामरावांना ‘अहो’च्या ऐवजी चव्हाण अशी हाक मारू लागले.) म्हणाले, ‘नाव गाव कशाला पुसता’ ही लावणी मला सुलोचनाबाईंकडूनच गाऊन घ्यायची आहे. चव्हाणांना मी खुणेने नाही नाही असे म्हणत होते. चव्हाण यांनी मला थांब अशी खूण केली. पवार यांनी ही लावणी गाऊन घेणार तर तुमच्याकडूनच असा प्रेमळ हट्ट धरला. चव्हाण यांनीही तू लावणी गाऊ शकशील असे प्रोत्साहन दिले.

पवार यांनी खिशातून लावणी लिहिलेला कागद काढला आणि त्यांनी केलेल्या संवादिनीच्या साथीवर लावणी गायले. त्यांना ती आवडली. पुढे लावणीचे ध्वनिमुद्रण झाले आणि त्या एका लावणीने माझे आयुष्य बदलून गेले. पुढे लावणी गायिका म्हणून प्रसिद्ध झाले, त्याचा पाया ‘नाव गाव कशाला’ने घातला होता. आठवणींचा पट उलगडताना त्यांनी सांगितले, मी मूळची गिरगावचीच. माहेरची सुलोचना कदम. गिरगावातील फणसवाडी येथील चाळीतच लहानाची मोठी झाले. माझा मोठा भाऊ दीनानाथ कदम याने मेळा काढला होता. त्या मेळ्यात अभिनेत्री संध्या, त्यांची बहीण वत्सला देशमुख काम करायच्या. माझी मोठी बहीण शकुंतलाही त्यात असायची. घरचाच मेळा असल्याने मीही त्यात लहानसहान कामं करायची. आमच्या घरचे वातावरण बाळबोध. एकदा भावाने वत्सलाबाई कुमठेकर यांनी गायलेल्या ‘सांभाळ गं दौलत लाखाची तुझ्या ज्वानीची..’ ही ध्वनिमुद्रिका घरी आणली. ग्रामोफोनवर ती लावली. मला ते गाणे आवडले. ते मी सतत म्हणू लागले. आमच्या आईला काही ते आवडले नाही. लावणी किंवा असली गाणी घरात आणि तीही मुलीने म्हणायची, असा तो काळ नव्हता. ही अशी गाणी घरात लावतात का, म्हणून ती ओरडायची. प्रसंगी मला तिच्या हातचा मारही खावा लागला. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. कारण पुढे लावणी गायिका म्हणूनच मी प्रसिद्ध झाले.

मेळ्यात काम करत असताना काही भजने व गाणी गायचे. आमच्या मेळ्यातील रंगभूषाकार दांडेकर एके दिवशी मला संगीत दिग्दर्शक श्यामबाबू पाठक यांच्याकडे घेऊन गेले. माझा आवाज त्यांनी ऐकला आणि ‘कृष्ण सुदामा’ या हिंदी चित्रपटातील गाणे गायची संधी मला मिळाली. पाश्र्वगायन केलेले ते माझे पहिले गाणे. गाण्याचे ध्वनिमुद्रण फ्रॉकमध्ये केले होते. तेव्हा मी जेमतेम आठ ते दहा वर्षांची होते. पुढे काही वर्षांनी मा. भगवान यांच्या चित्रपटांसाठी मी पाश्र्वगायन केले. सी. रामचंद्र, मन्ना डे, मोहंमद रफी, मुकेश, जोहराबाई, आमीरबाई, शमशाद बेगम आणि त्या काळातील सर्व मान्यवर गायक-गायिकांबरोबर द्वंद्वगीते, तसेच माझी स्वत:ची वैयक्तिक गाणीही त्या वेळी ध्वनिमुद्रित झाली. ‘चोरी चोरी’, ‘जो बिगड गयी वो किस्मत हू’, ‘नजर से नजर लड गई’, ‘जिगर में छुरी गड गई’ ‘हाए राम’या , ‘आँखो से मिली आँखे’, ‘आरमानोंकी दुनिया मे एक’, ‘रात अंधेरी मत कर देरी तु मेरा मै तेरी’, ‘अब तू ही बता तेरा दिल किसको पुकारे’, ही आणि अशी अनेक हिंदी गाणी मी गायले असून त्यांची संख्या सुमारे अडीचशे इतकी आहे. ही सर्व गाणी त्या काळात खूप लोकप्रिय झाली. मी गायलेली ही हिंदी गाणी माझ्या वाढदिवसाच्या (१३ मार्च) दिवशी ‘रेडिओ सिलोन’वरून दरवर्षी सकाळी दीड ते दोन तास वाजवली जातात. ती ऐकून रसिक श्रोते व चाहत्यांकडून आजही प्रतिसाद मिळतो, आपल्यासाठी ती आनंदाची गोष्ट असल्याचेही सुलोचनाबाई यांनी सांगितले. लावणी गायनाने मला प्रसिद्धी व यश मिळवून दिले. मला मोठे केले. लावणी गायनाला मी प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून दिली. स्वत:चा आब, मर्यादा राखूनच मी लावणी गायनाचे अक्षरश: हजारो कार्यक्रम केले. महाराष्ट्रातील असे कोणतेही छोटे-मोठे शहर, गाव, तालुका किंवा खेडे नसेल की जेथे मी कार्यक्रम केला नाही. आणि खरे सांगू का, कोणत्याही प्रकारचे संगीत असो ते कधीही कमी दर्जाचे नसते. प्रत्येक संगीत प्रकाराची स्वत:ची स्वतंत्र ओळख आणि वैशिष्टय़ आहे, हे विसरता कामा नये. हल्लीचे लावणी सादरीकरण, गायन याविषयी आपले मत स्पष्टपणे मांडताना त्या म्हणाल्या, आज लावणी सादर करण्यापेक्षा त्याचे प्रदर्शन अधिक प्रमाणात केले जाते. श्रोते किंवा प्रेक्षकांपर्यंत लावणी पोहोचवण्यासाठी तोकडे कपडे, अश्लील हावभाव, भडक रंगभूषा, अंगप्रदर्शन याची काहीही गरज नसते. ‘शिवाजी मंदिर नाटय़गृहा’चे उद्घाटन माझ्या लावणी गायन कार्यक्रमाने झाले. तसेच ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनप्रसंगीही माझ्या गाण्याचा कार्यक्रम झाला असल्याची आठवण त्यांनी सांगितली.

गायन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना विविध सन्मान पुरस्कार मिळाले. राज्य शासनाच्या लता मंगेशकर पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले. पण केंद्र शासनाच्या पद्मश्री, पद्म पुरस्कारासाठी अद्याप त्यांची दखल घेण्यात आलेली नाही. या दिग्गज पाश्र्वगायिकेला स्वत:चे हक्काचे घर नाही. आजही त्या गिरगावात एका चाळीत छोटय़ा घरात भाडय़ाच्या जागेत राहात आहेत. मोठी सून प्रफुल्ल, (मोठा मुलगा जय आता या जगात नाही) व त्यांची मुलगी आरती, धाकटा मुलगा विजय, त्यांची पत्नी कविता आणि त्यांचा मुलगा अजय असा त्यांचा परिवार. विजय हे प्रसिद्ध ढोलकी वादक असून अन्यही लोकतालवाद्ये ते वाजवितात. मराठी, हिंदूीसह काही भारतीय प्रादेशिक भाषांमधील मान्यवर संगीतकारांकडे ते संगीतसाथ करतात. लौकिक अर्थाने केवळ चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या आणि गाण्यातील कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण न घेतलेल्या सुलोचनाबाई यांनी अथक परिश्रम, सतत शिकण्याची वृत्ती यामुळे गाण्याच्या क्षेत्रात विशेषत: लावणी गायनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.

आचार्य अत्रे यांच्या ‘हीच माझी लक्ष्मी’ चित्रपटात संगीतकार वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली ‘मुंबईच्या कॉलेजात गेले पती, आले होऊनशान बी.ए. बी.टी.’ ही लावणी त्यांनी गायली. पुढे ‘कलगीतुरा’ चित्रपटासाठी काही लावण्या त्या गायल्या. लावणी गायनाने त्यांना प्रसिद्धी मिळाल्यानंतर पुढे अनेक तमाशाप्रधान चित्रपटांतील लावण्या त्यांनी आपल्या दमदार आणि खडय़ा आवाजाने लोकप्रिय केल्या. लावणी आणि सुलोचना चव्हाण असे एक अतूट नाते तयार झाले. ‘औंदा लगीन करायचं’, ‘कसं काय पाटील बरं हाय का’, ‘कळीदार कपुरी पान’, ‘खेळतांना रंग बाई होळीचा’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘फड सांभाळ गं तुऱ्याला आला’, ‘मी बया पडले भिडची, ग बाई भिडची’, ‘सोळावं वरिस धोक्याचं’ या आणि इतरही अनेक लावण्या आजही लोकप्रिय आहेत. त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. विविध पुरस्कार वितरण सोहळ्यांत या लावण्यांवर नृत्य सादरीकरण केले जाते ते मूळ गाणे सुलोचना यांच्याच आवाजातील असते.

शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता-रविवार वृत्तान्त, ३० एप्रिल २०१७