मंगळवार, १७ जानेवारी, २०२३

बहुभाषिक पुस्तक आदानप्रदान सोहळा

पै फ्रेन्ड्स लायब्ररीतर्फे येत्या २१ ते २९ जानेवारी या कालावधीत बहुभाषिक पुस्तक आदानप्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. उपक्रमाचे यंदा पाचवे वर्ष असून सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत या बहुभाषिक पुस्तक आदानप्रदान सोहळ्यात वाचकांना सहभागी होता येणार आहे. आपल्याकडे असलेली जुनी (चांगल्या स्थितीतील) वाचून झालेली पुस्तके येथे देऊन त्या बदल्यात तिथे उपलब्ध असलेल्या पुस्तकांमधून आपल्याला अन्य पुस्तके घेता येणार आहेत. पुस्तकांच्या या आदानप्रदानामुळे आपल्याकडील वाचून झालेली पुस्तके अन्य वाचकांना वाचायला मिळू शकतील तर आपण न वाचलेली पुस्तके आपल्याला घेता येतील. 


शुक्रवार, २० जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता पुस्तक आदानप्रदान सोहळ्याचे उदघाटन होणार आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर, लेखक अच्युत गोडबोले, लेखिका उमा कुलकर्णी, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.

२१ 'जानेवारीला अभिनेते महेश कोठारे यांची प्रकट मुलाखत, २२ जानेवारी या दिवशी 'वाचन संस्कृती आणि कृतज्ञता' या विषयावर प्रल्हाद पै यांचे व्याख्यान, २३ जानेवारीला वसंत लिमये, चंद्रशेखर टिळक यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

लेखक प्रणव सखदेव यांची मुलाखत- २४ जानेवारी, माझ्या कवितेचा प्रवास- अशोक नायगावकर- २५ जानेवारी, स़ंत साहित्य- डॉ. अरुणा ढेरे- २६ जानेवारी, लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांची मुलाखत- २७ जानेवारी असे कार्यक्रम होणार आहेत. २८ जानेवारीला वैद्य परिक्षित शेवडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आणि 'ॲनालायझर न्यूज'चे सुशिल कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. रविवार, २९ जानेवारी रोजी पुस्तक आदानप्रदान सोहळ्याचा समारोप होणार आहे. 

महाजन यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी पाच तर अन्य सर्व कार्यक्रमांची वेळ संध्याकाळी सहा अशी आहे. 

पुस्तक आदानप्रदान सोहळ्याच्या निमित्ताने काॅफी टेबल पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे. अभिनेते, अभिनेत्री, पत्रकार, लेखक, कवी अशा ७५ व्यक्तींनी लिहिलेले रंजक लेख, अनुभव, गोष्टी बरच काही या पुस्तकात असणार आहे. अशोक सराफ, श्रीधर फडके, सुधीर गाडगीळ, अच्युत गोडबोले, गुरु ठाकूर अशा अनेक मान्यवरांचे लेख या कॉफी टेबल बुक मध्ये असणार आहेत. 

पुस्तक आदानप्रदान सोहळ्याचे सर्व कार्यक्रम डोंबिवली पूर्व येथील सावळाराम महाराज क्रीडा संकुलाती होणार आहेत. कार्यक्रमासाठी रसिक श्रोते, वाचक यांना विनामूल्य प्रवेश आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क 7506296034 /9833732713 खालील लिंकवर क्लिक करूनही आपला सहभाग नोंदविता येणार आहे.

https://www.aadanpradan.com

गुरुवार, १२ जानेवारी, २०२३

'रेखा' 'चित्रा'ची गोष्ट!

दोघी सख्या बहिणींनी एकाच वेळी, एकाच चित्रपटातून नायिका म्हणून पदार्पण करण्याचा सुदैवी आणि वर्ष वेगळे पण एकाच तारखेला या जगातून निरोप घेण्याचा दुर्दैवी योगायोग अभिनेत्री रेखा कामत आणि चित्रा नवाथे यांच्याबाबतीत घडला.'लाखाची गोष्ट' या मराठी चित्रपटाद्वारे दोघीही बहिणींनी 'नायिका' म्हणून एकाच वेळी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आणि '११ जानेवारी' या एकाच तारखेला दोघी बहिणींनी या जगाचा निरोप घेतला. रेखा कामत याचे गेल्यावर्षी २०२२ मध्ये तर चित्रा यांचे यावर्षी निधन झाले.

रेखा आणि चित्रा यांची पूर्वीची नावे अनुक्रमे कुमुद आणि कुसुम. 'महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी' म्हणून ज्यांची ओळख आहे त्या गीतकार ग दि माडगूळकर यांनी या दोघी बहिणींचे नामकरण रेखा आणि चित्रा असे केले. माहेरच्या सुखटणकर. पटकथा लेखक ग. रा. कामत यांच्याशी विवाह झाल्यानंतर रेखा या कामत तर दिग्दर्शक राजा नवाथे यांच्याशी विवाह झाल्यानंतर चित्रा या नवाथे झाल्या. कुमुद आणि कुसुम यांच्या 'रेखा चित्रा' कशा झाल्या तोही एक किस्सा आहे. 

अभिनेत्री आणि नृत्यांगना हंसा वाडकर यांनी रेखा आणि चित्रा या दोघी बहिणीचे काम पाहिले होते. त्यांनी निर्माते दिग्दर्शक राजा परांजपे यांना या दोघींची नावे सुचवली होती. योगायोगाने त्याच वेळी राजा परांजपे 'लाखाची गोष्ट' चित्रपटाची निर्मिती करत होते. राजा परांजपे यांनी या दोघींना पुण्यात भेटायला बोलावले. तिथे चित्रपटाचे कथा, पटकथा संवाद लेखक ग दि माडगूळकर आणि संगीतकार सुधीर फडके हे ही उपस्थित होते. राजा परांजपे यांनी दोघी बहिणींना काहीतरी करून दाखवा असे सांगितले आणि त्यांनी 'रामलीला' या नृत्य नाटकातील काही प्रसंग सादर केले आणि दोघींचीही 'लाखाची गोष्ट' या चित्रपटासाठी निवड झाली. कुमुद आणि कुसुम ही नाव जुन्या वळणाची आहेत. चित्रपटासाठी ही नावे नकोत म्हणून 'गदिमा'नी त्या दोघींचे अनुक्रमे रेखा आणि चित्रा असे नामकरण केले आणि तीच त्यांची ओळख झाली.

रेखा मोठ्या तर चित्रा धाकट्या. दोघी बहिणींना नृत्याची आवड होती. गणेशोत्सव मेळाव्यातही दोघीही काम केले होते. आचार्य पार्वती कुमार यांच्याकडे दोघींनी शास्त्रीय नृत्याचे धडे गिरविले होते पार्वती कुमार यांच्या 'रामलीला' या नाटिकेतही त्यांनी काम केले होते. दोघी बहिणींचे पाचवीनंतरचे शिक्षण दादरच्या जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या छबिलदास शाळेत झाले. सुखटणकर कुटुंबीय तेव्हा दादरच्या मीरांडा चाळीत राहायला होते. चाळीत आणि परिसरात होणाऱ्या गणेशोत्सव मेळाव्यात त्या भाग घेत होत्या. 'गुळाचा गणपती', वहिनीच्या बांगड्या' 'उमज पडेल तर', राम राम पाव्हणं' हे चित्रा यांचे गाजलेले चित्रपट. तर ‘कुबेराचे धन’, ‘गृहदेवता’ (यात दुहेरी भूमिका), ‘गंगेत घोडे न्हाले’, ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘माझी जमीन’ तर अगदी अलीकडचा ‘अगंबाई अरेच्चा’ हे रेखा यांचे चे गाजलेले चित्रपट. व्यावसायिक मराठी रंगभूमीवर ‘सौभद्र’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’,‘संशयकल्लोळ’ आदी संगीत नाटकांतून तसेच ‘दिल्या घरी तू सुखी राहा’, ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘कालचक्र’ आदी नाटकांतून रेखा यांनी भूमिका केल्या. प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित ‘प्रपंच’ ही त्यांची पहिली दूरचित्रवाहिनी मालिका. मालिकेत त्यांनी साकारलेली ‘आक्का’ ही भूमिका गाजली. ‘सांजसावल्या’ मालिकेतही त्यांनी काम केले. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मधील ‘माई आजी’ने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. 

 गेली पन्नास ते साठ वर्षे दोघी बहिणींनी चित्रपट, नाटकात योगदान दिले. आधी रेखा आणि आता चित्रा यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीच्या सुवर्णकाळातील साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेल्या. रेखा आणि चित्रा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

मंगळवार, १० जानेवारी, २०२३

प्रथम तुज पाहता

मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक-अभिनेते रामदास कामत यांचा ८ जानेवारी २०२३ या दिवशी प्रथम स्मृतिदिन होता. त्यानिमित्ताने...
गुंतता हृदय हे, तम निशेचा सरला, देवाघरचे ज्ञात कुणाला, नको विसरू संकेत मीलनाचा, साद देती शिखरे ही आणि यासारखी अनेक नाट्यपदे रामदास कामत यांनी अजरामर केली. या नाट्यपदांचे गारुड आजही रसिकांच्या मनावर कायम आहे. 

रामदास कामत यांनी अनेक नाट्यपद गायली असली तरी चित्रपटासाठी त्यांनी खूपच कमी पार्श्वगायन केलं. ‘मुंबईचा जावई’ या चित्रपटासाठी त्यांनी गायलेलं ‘प्रथम तुजं पाहता’ हे एकमात्र चित्रपट गीत असावं. या गाण्याचे गीतकार होते ग दि माडगूळकर आणि संगीतकार होते सुधीर फडके. सुधीर फडके यांनी रामदास कामत यांना दूरध्वनी केला आणि ‘मुंबईचा जावई’ या चित्रपटातील ‘प्रथम तुज पाहता’ हे गाणे तुम्ही गावे अशी आपली इच्छा असल्याचे सांगितले. 

या रविवारी गाण्याचं ध्वनिमुद्रण करायचं असून तुम्ही अवश्य यावे असा निरोप दिला. मात्र त्याच दरम्यान म्हणजे शनिवारी बार्शी येथे रामदास कामत यांचा गाण्याचा कार्यक्रम होता आणि रविवारीच गाण्याचं ध्वनिमुद्रण करायचं असल्यानं त्यांनी फडके यांना आपल्याला जमणार नाही असं सांगितलं. परंतु फडके यांनी कसही करून हे जमवाच असा आग्रह झाला आणि कामत यांनी त्याला हो म्हटले. 

शनिवारी बार्शीचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्रीच्या गाडीने मुंबईला परतायचं कामत त्यांनी ठरवलं. बार्शी चा कार्यक्रम पार पडला आणि कामात मुंबईला येण्यासाठी निघाले. आरक्षण केलेलं नसल्याने तिकीट काढून ते कसेबसे गाडी चढले. पुण्याला त्यांना बसायला मिळालं. रात्रभर झोप न झाल्यांन त्यांचा आवाज पार बसला होता. रविवारी मुंबईत परतल्यानंतर त्यांनी फडके यांना आपण मुंबईत आल्याचं कळवलं. पुण्याला त्यांना बसायला मिळालं. रात्रभर झोप न झाल्यांन त्यांचा आवाज पार बसला होता. रविवारी मुंबईत परतल्यानंतर त्यांनी फडके यांना आपण मुंबईत आल्याचं कळवलं. 

फडके यांनी सांगितल्याप्रमाणे रामदास कामत गाण्याच्या ध्वनिमुद्रणस्थळी हजर झाले. तिथे संगीतसाथीसाठी तबल्यावर वसंत आचरेकर, सारंगीवर राम नारायण आणि संवादिनीवर प्रभाकर पेडणेकर ही मंडळी आलेली होती. माझा आवाज बसला आहे त्यामुळे मी चांगलं गाऊ शकणार नाही असं रामदास कामत यांनी फडके यांना सांगून पाहिलं. परंतु ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळी गाण्याचं ध्वनिमुद्रण करणं गरजेचं होतं कारण दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी कोल्हापूरला या गाण्याचं चित्रीकरण होणार होतं आणि त्यासाठी रविवारी रात्रीच ध्वनिमुद्रित केलेलं गाणं कोल्हापूरला पाठवायचं होतं.

 त्यामुळे रामदास कामत यांनी गळ्याचे काही व्यायाम करून आपला आवाज मोकळा केला आणि हे गाणं ध्वनिमुद्रित झालं. आज इतक्या वर्षानंतरही हे गाणं रसिकांच्या ओठावर आहे आणि स्मरणातही आहे. चित्रपटात पडद्यावर हे गाणं अरुण सरनाईक यांच्यावर चित्रित झालं होतं. 

©️ शेखर जोशी

प्रथम तुज पाहता या गाण्याची युट्युब लिंक





सार्वजनिक वाचनालयाचे जनक- सदाशिव मोरेश्वर साठे

कोणत्याही शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला असला तरीही शहराच्या जडणघडणीत शहरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचा मोठा सहभाग असतो. गेल्या पन्नास ते सत्तर वर्षांच्या कालावधीत कल्याण शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, विविध कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात शहरातील सुजाण नागरिकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

विविध क्षेत्रात प्रसिद्धीस आलेल्या नामवंतांनी, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तसेच आपली नोकरी, व्यवसाय आणि संसार सांभाळून सर्वसामान्य कल्याणकर नागरिकांनी कल्याण शहराच्या विकासासाठी आपले योगदान दिले. ही माणसे प्रसिद्धीपासून दूर राहिली आणि विस्मृतीतही गेली. विस्मृतीत गेलेल्या अशा कल्याणकरांचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय करून देणारी ही लेखमालिका महाराष्ट्र टाइम्सच्या ठाणे प्लस पुरवणीत सुरू झाली आहे. 

कल्याणसह अंबरनाथ, बदलापूर या शहरातीलही विस्मरणातील व्यक्तींचा परिचय यात करून देण्यात येणार आहे. पंधरा दिवसांनी एक असे महिन्यातून दोन लेख असतील. 

या लेखमालिकेतील पहिला लेख महाराष्ट्र टाइम्सच्या ठाणे प्लस पुरवणीत ७ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध झाला. कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाची स्थापना ज्यांनी केली त्या सदाशिव मोरेश्वर साठे यांच्यावर होता. त्या लेखाचे क्लिपिंग

यंदा मकर संक्रांत १५ जानेवारीला

ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ. सोमण

यंदाच्या वर्षी शनिवार, १४ जानेवारी रोजी रात्री ८-४४ वाजता  सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार असल्याने मकर संक्रांत रविवार १५ जानेवारी रोजी आली आहे अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. 

निरयन मकर संक्रांत दरवर्षी  १४ जानेवारीलाच येते हे खरे नाही. सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा मकर राशीत प्रवेश करेपर्यंत ३६५ दिवस ६ तास ९ मिनिटे १० सेकंद एवढा कालावधी लागतो. त्यामुळे निरयन मकर संक्रांतीचा दिवस हा पुढे पुढे जात असतो, असे सोमण यांनी सांगितले.

वर्ष २०० मध्ये निरयन मकर संक्रांत २२ डिसेंबरला तर १८९९ मध्ये १३ जानेवारीला आली होती. १९७२ पर्यंत मकर संक्रांत १४ जानेवारीलाच येत होती. २०८५ पर्यंत मकर संक्रांती कधी १४ ला तर कधी १५ जानेवारीला येत राहील. सन २१०० पासून निरयन मकर संक्रांती १६ जानेवारीला येणार आहे. सन ३२४६ मध्ये निरयन मकर संक्रांती  चक्क १ फेब्रुवारीला तर २०२४, २०२७ मध्ये निरयन मकर संक्रांत १५ जानेवारीला तर  २०२५, २०२६, २०२९, २०३० मध्ये १४ जानेवारीला येणार असल्याचे सोमण म्हणाले.

छायाचित्र- गुगलच्या सौजन्याने 

आपली पंचांगे निरयन पद्धतीची असल्याने सूर्य  निरयन राशीत प्रवेश करतो त्यावेळी आपण मकर संक्रांत साजरी करतो. सूर्याने जर रात्री मकर राशीत प्रवेश केला तर दुस-या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते. कोणतीही वाईट घटना घडली की, 'संक्रांत आली' असे म्हटले जाते,पण ते योग्य नाही. धनू राशीतून मकर राशीत सूर्याने प्रवेश करणे वाईट कसे असेल ? या दिवसापासून दिनमान वाढत जाते ते वाईट कसे म्हणता येईल ? तिळगूळ देऊन गोड बोलायला शिकविणारा हा दिवस वाईट कसा असू शकेल ? संक्रांतीदेवीने जर या दिवशी दुष्ट राक्षसाला ठार मारले असेल तर ते वाईट असेल का ? मकर संक्रांतीचा सण अशुभ नाही.  मकर संक्रांतीच्यावेळी अनेक खोट्या व चुकीच्या अफवा पसरविल्या जातात त्यावरही विश्वास ठेवू नका. मकर संक्रांतीच्या दिवशी दिनमान वाढत जाण्याच्या आनंदाप्रीत्यर्थ सूर्याचे स्वागत करण्यासाठी रंगीबेरंगी पतंग उडविण्याची प्रथा आहे. परंतू पतंग उडविण्यासाठी धारदार नॅायलॅानच्या मांजाचा वापर करू नका, असे आवाहनही सोमण यांनी केले. 

छायाचित्र गुगलच्या सौजन्याने 

मकर संक्रांती पुण्यकालात मातीच्या सुगडात ( सुघटात ) ऊस, बोरे, शेंगा , गाजर, ओले हरभरे वगैरे त्यावेळी शेतात पिकणारे पदार्थ आणि तिळगूळ  दान देण्याची पद्धत आहे. मकर संक्रांतीला काळी वस्त्रे परिधान करण्याची पद्धत आहे. कारण हे दिवस थंडीचे असतात. काळ्या रंगाची वस्त्रे शरीर उबदार ठेवतात.  थंडीच्या  दिवसात  तीळ आरोग्यास चांगले असतात. म्हणून तीळाचे पदार्थ करून खाण्यास सांगितलेले आहेत. ज्यांच्याशी वर्षभरात भांडण झाले असेल, अबोला धरला गेला असेल तर एकमेकांना तिळगूळ देवून मने एकत्र आणणारा, गोड बोला असा संदेश देणारा हा गोड सण आहे.मकर संक्रांतीच्या दिवशी वस्त्रदान , अन्नदान, तिळगूळ दान देण्याची प्रथा आहे. परंतू आधुनिक काळात विद्यादान, श्रमदान, ग्रंथदान , रक्तदान, सामाजिक- शैक्षणिक संस्थाना अर्थदान करणे हे ही तितकेच पुण्यदायक आहे असेही सोमण यांनी स्पष्ट केले.

©️ शेखर जोशी


१० जानेवारी २०२३

-----


                                        

याच विषयावर ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांच्याशी केलेली बातचीत

रविवार, २१ मार्च, २०२१

व्यक्तिवेध-विनायक चासकर

मुंबई दूरदर्शनच्या स्थापनेपसून तेथे कार्यरत असलेले ज्येष्ठ निर्माते विनायक चासकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्यावरील हा व्यक्तिवेध. हा लेख लोकसत्ता-मुख्य अंक, २० मार्च २०२१ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. विनायक चासकर ग्रॅण्ट रोड येथे जाण्यासाठी माटुंगा रोड स्थानकात आले. स्थानकातील पादचारी पूल उतरत असतानाच गाडी सुटली. आता मला ती गाडी मिळणे शक्यच नव्हते. पण ती गाडी काही क्षणातच थांबली आणि मला त्याच गाडीत चढायला मिळाले. ही किमया ‘गजरा’ कार्यक्रमाने घडविली. धावतपळत उतरूनही मला गाडी पकडता आली नाही हे त्या गाडीच्या मोटरमनने पाहिले. त्या अमराठी मोटरमनला ‘गजरा’ कार्यक्रमामुळे मी परिचित होते. केवळ त्या ओळखीमुळे त्यांनी सुरू झालेली गाडी काही क्षण पुन्हा थांबविली आणि ‘मॅडम मैं आपका प्रोग्रॅम देखता हूँ, हमें अच्छा लगता हैं’अशी दादही त्यांनी दिली… ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांच्या बाबतीत घडलेला हा किस्सा त्यांनीच ‘लोकसत्ता-रविवार वृत्तान्त’मधील ‘पुनर्भेट’ या सदरासाठी घेतलेल्या मुलाखतीच्या वेळी सांगितला होता. खरोखरच अशी अमाप लोकप्रियता त्या काळी विनायक चासकर यांच्या ‘गजरा’ कार्यक्रमाला मिळाली होती. अमराठी प्रेक्षकांमध्येही ‘गजरा’ पाहिला जायचा. निखळ विनोद आणि करमणूक असे त्याचे स्वरूप होते. चासकर यांनी सादर केलेला ‘गजरा’ आणि ‘नाटके’ यातून शं. ना. नवरे, रत्नाकर मतकरी, लक्ष्मीकांत बेर्डे, सुमती गुप्ते, अरविंद देशपांडे, रिमा लागू, मोहन गोखले यांच्यासह सुरेश खरे, दया डोंगरे, मोहनदास सुखटणकर, बाळ कर्वे, जयंत सावरकर, दिलीप प्रभावळकर, विजय कदम आदी आणि आता नामवंत, मातब्बर असलेल्या लेखक, कलाकारांचा सहभाग होता. या सर्वांना ‘गजरा’ आणि दूरदर्शनच्या नाटकांनी महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचविले.
चासकर हे दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे (नॅशनल स्कू ल ऑफ ड्रामा) पदवीधर. मुंबई दूरदर्शनमध्ये ते नेपथ्यकार म्हणून रुजू झाले. पुढे जिद्द, मेहनत, बुद्धिमत्ता, कल्पकता या गुणांच्या जोरावर एक सर्जनशील निर्माता अशी ओळख मिळविली. दूरचित्रवाणीसारख्या सरकारी, कौटुंबिक माध्यमाच्या प्रेक्षकांना काय आवडेल याचा विचार करून त्यांनी मुंबई दूरदर्शनवर अनेक वेगवेगळे कार्यक्रम सादर केले. पण यातही चासकर यांनी सादर केलेली विविध नाटके आणि ‘गजरा’ हे कार्यक्रम विशेष लक्षवेधी ठरले. दूरदर्शन परिवारात ते ‘भाऊ’ या नावाने प्रसिद्ध होते. २ ऑक्टोबर १९७२ रोजी मुंबई दूरदर्शनची म्हणजेच आत्ताच्या ‘सह्याद्री’ वाहिनीची सुरुवात झाली. तेव्हापासून अनेक ‘व्यत्यय’ पार करत मुंबई दूरदर्शनवरील निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, वृत्तनिवेदक, निवेदक, सूत्रसंचालक आणि पडद्यामागच्या सर्वानीच अनेक दर्जेदार, मनोरंजक, ज्ञानवर्धक कार्यक्रम सादर करून काही पिढ्या संस्कारित केल्या आणि या प्रत्येकानेच आपला स्वतंत्र ठसा कामावर उमटविला. डॉ. विश्वास मेहंदळे, याकूब सईद, विजया जोगळेकर-धुमाळे, अरुण काकतकर, सुहासिनी मुळगावकर, विनय धुमाळे, आकाशानंद, मनोहर पिंगळे, डॉ. किरण चित्रे, प्रदीप भिडे, अनंत भावे, सुधीर गाडगीळ, भक्ती बर्वे, स्मिता पाटील आदींसह विनायक चासकर हे नावही अग्रक्रमाने घ्यावेच लागेल. मुंबई दूरदर्शनचा इतिहास विनायक चासकर या नावाशिवाय पूर्णच होणार नाही.

मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

उचलली जीभ आणि लावली टाळ्याला


मराठीत 'उचलली जीभ आणि लावली टाळ्याला' अशी म्हण आहे. सध्या काही राजकीय नेत्यांनी हा प्रकार सुरु केला असून सभा, संमेलने, जाहीर कार्यक्रमातून राजकीय नेत्यांची जीभ घसरत चालली आहे. हातात माईक आणि समोर श्रोता मिळाला की काय बोलावे, कसे बोलावे याचे भान व ताळतंत्र सुटत चाललेले पाहायला मिळत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन. दारु विक्री वाढवायची असेल तर दारुला महिलांचे नाव द्या. कारखान्यात तयार केलेल्या दारुला 'महाराजा' ऐवजी 'महाराणी' असे नाव ठेवा त्याची विक्री वाढेल असा सल्ला महाजन यांनी सातपुडा साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाला दिला. महाजन यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध झाल्यानंतर त्यांना उपरती झाली आणि त्यांनी जाहीर माफी मागितली. पण मुळात जाहीरपणे असे बोलायची खुमखुमी महाजन यांना का आली हा प्रश्नच आहे.

जाहीर कार्यक्रमातून बोलताना जीभ घसरणारे महाजन हे काही पहिलेच राजकीय नेते किंवा मंत्री नाहीत. याही अगोदर अजित पवार, आर. आर. पाटील, गिरीश बापट, रावसाहेब दानवे आदी राजकीय नेत्यांची जीभ घसरली होती. महाराष्ट्रात ऐन दुष्काळी परिस्थीती असताना धरणात पाणी नाही तर मी काय xx का?, असा सवाल जाहीरपणे विचारुन अजित पवार यांनी खालची पातळी गाठली होती. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तेव्हाचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी 'बडे बडे शहरोंमे ऐसे छोटे छोटे हादसे होते है असे विधान करुन गदारोळ उडविला होता. 'भाजप'चे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी 'साले'हा शब्द उच्चारला आणि स्वतला व पक्षालाही अडचणीत आणले होते. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनीही 'तसल्या'व्हिडिओ क्लिपा आम्ही पण पाहतो, आम्ही पिकलेलं पान असलो तरी आमचे हिरवे देठ आहेत असे वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला होता. भाजप समर्थक आमदार प्रशांत परिचारक यांचीही जीभ अशीच घसरली. राजकारण कसे असते हे उपस्थीतांना समजून सांगताना परिचारकांनी सैनिकांविषयी संतापजनक वक्तव्य केले. ‘सीमेवरील जवान वर्ष भर घरी येत नाही. तरीदेखील घरी आल्यावर त्याला मुलगा झाल्याचे समजते आणि तो गावात मुलगा झाल्याच्या आनंदात पेढेही वाटतो’, असे परिचारक बोलले होते. केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात पत्रकार आणि नागरिकांना उद्देशून‘तुमच्या नशिबी लक्ष्मीदर्शनाचा योग आहे. येणाऱ्या लक्ष्मीला नाकारू नका’, असे वक्तव्य केले होते. निवडणुक आयोगनेही गडकरी यांच्या या विधानाची दखल घेऊन ताशेरे ओढले होते.लोकसभा निवडणुकीच्या वेळी साताऱ्यातील सभेत बोलताना ‘बोटाची शाई पुसून पुन्हा मतदान करा’ हे त्यांचे विधान भलतेच गाजले. त्यांच्या या विधानाची निवडणुक आयोगानेही दखल घेतली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही मराठी साहित्यिकांची ‘बैल’ या शब्दांत संभावना करून तसेच ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व’ पु. ल. देशपांडे यांना दिलेल्या ‘महाराष्ट भूषण’ पुरस्कारावरून ‘झक मारली आणि पुलंना हा पुरस्कार दिला’, 'मोडका पूल' अशी विधाने केली होती.

खरे तर सार्वजनिक जीवनात वावरताना मोठ्या पदावर किंवा समाजात ज्याला मान व प्रतिष्ठा आहे अशा कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीने आचार-विचार आणि कृतीचे काही किमान संकेत पाळणे अत्यंत गरजेचे आहे. कारण ही सर्व मंडळी ज्या पदावर काम करत आहेत, त्यांना अशा प्रकारची बेजबाबदार आणि जीभ घसरणारी वक्तव्ये करणे न शोभणारे आहे. आजही आपल्या समाजात अशा प्रकारचे बोलणे हे असंस्कृत आणि निषेधार्ह मानने जाते आणि त्यात काहीही चूक नाही. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दिला असला तरी त्याचा अर्थ उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असा होत नाही, याचे भान राजकीय नेत्यांनी ठेवण्याची गरज आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काहीही कृती करून, काहीही बोलून, आपल्या जीभेचा पट्टा वाट्टेल तसा सैल सोडून इतरांना दुखावणे नव्हे. आपण बोलतो किंवा वागतो त्याचा काय परिणाम होईल याचा विचार प्रत्येक राजकीय नेत्याने केला पाहिजे. अशी विधाने करताना त्याचा इतरांवर, समाजावर काय परिणाम होईल याचे भान ठेवले पाहिजे. जीभ घसरणार नाही याची त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे अशा प्रकारे वादग्रस्त वक्तव्य एखाद्या राजकीय नेत्याने केले तर तो माफी मागून मोकळा होतो आणि सुटतो. काही दिवसांनी लोकही तो काय बोलला होता ते विसरुन जातात. या मंडळींच्या विरोधात पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व कोणतीही कारवाई करत नाही त्यामुळे राजकीय मंडळीही पुन्हा आपल्याला हवे ते बोलायला मोकळी होतात. असे वक्तव्य पुन्हा होणार नाही याची जरब बसण्यासाठी त्यांना काहीतरी शिक्षा झाली पाहिजे, तरच असे प्रकार थांबतील. राजकीय पक्ष त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करणा नसेल तर त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे, न्यायालयात याचिका दाखल करणे किंवा निवडणुकीत मत मागायला आले की त्यांच्या वक्तव्याची आठवण करुन देऊन त्यांना मतदान न करणे अशी पावले उचलून त्यांना धडा शिकविला पाहिजे.

असे जो पर्यंत होत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांची जीभ अशीच वळवळत राहणार, घसरणार आणि उचलली जीभ व लावली टाळ्याला असेच घडत राहणार...

-शेखर जोशी