शनिवार, २१ जानेवारी, २०२३

समाजशास्त्रीय संशोधक ग्रंथकार- नारायण गोविंद चापेकर

महाराष्ट्र टाइम्स- ठाणे प्लसमधील लेखमालिका. यातील दुसरा लेख. आजच्या ( २१ जानेवारी २०२३) च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. विस्मरणातील बदलापूरकर

समाजशास्त्रीय संशोधक ग्रंथकार 

नारायण गोविंद चापेकर 


महाराष्ट्र टाइम्स ठाणे प्लस २१ जानेवारी २०२३

कोणत्याही शहराच्या जडणघडणीत आणि शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य अशा विविध क्षेत्रात स्थानिक सुजाण नागरिकांचे महत्त्वपूर्ण योगदान असते. विविध क्षेत्रात प्रसिद्धीस आलेल्या नामवंतांनी, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तसेच आपली नोकरी, व्यवसाय आणि संसार सांभाळून सर्वसामान्य नागरिकांनीही शहराच्या विकासासाठी आपला अमूल्य सहभाग दिला. ही माणसे प्रसिद्धीपासून दूर राहिली आणि विस्मृतीतही गेली. कल्याण, बदलापूर, अंबरनाथ येथील अशा विस्मृतीत गेलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कार्याचा परिचय करून देणारी ही लेखमालिका आहे. 




शुक्रवार, २० जानेवारी, २०२३

व्यंकटेश माडगूळकर साहित्य गौरव विशेषांक

 


कथाकार, कादंबरीकार, नाटककार, पटकथाकार व्यंकटेश माडगूळकर यांच्यावर ग्रंथसखा प्रकाशनाने 'व्यंकटेश माडगूळकर साहित्य गौरव विशेषांक' प्रकाशित केला आहे. व्यंकटेश माडगूळकर यांनी स्वतः लिहिलेले, व्यंकटेश माडगूळकर यांनी अन्य काहीजणांविषयी लिहिलेले आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्यावर लिहिलेले लेख असे या ग्रंथाचे स्वरूप आहे. 

माडगूळकर यांनी लिहिलेली पहिली कथा जुलै १९४६ मध्ये 'अभिरुची'त प्रसिद्ध झाली होती.‌ ती संपूर्ण कथा या ग्रंथात देण्यात आली आहे. या कथेचे नाव 'काळ्या तोंडाची' असे होते. माडगूळकर यांनी लिहिलेल्या 'बनगरवाडी'चा बहुतांश भारतीय भाषांमध्ये तसेच इंग्रजी, जर्मन आदि भाषांमध्ये अनुवाद झाला. 'माणदेशी माणसे' आणि 'बनगरवाडी'ने माडगूळकर यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. स्वतः माडगूळकर यांनी 'बनगरवाडी' विषयी लिहिलेले दोन लेख तर प्रा. त्र्यं. शं. शेजवलकर आणि दिगंबर पाध्ये यांनी लिहिलेले लेख ग्रंथात आहेत. 'कथा वाड्मयातील उच्चांक' अशा शब्दात शेजवलकर यांनी 'बनगरवाडी'विषयी लिहिले आहे.

माडगूळकर यांनी वडिलांविषयी लिहिलेला 'दादा', साहित्यिक पु.भा. भावे यांच्यावर लिहिलेला 'एक स्पार्टन योद्धा' तसेच माडगूळकर यांनी लिहिलेले सुरुवातीचे दिवस, माझ्या लिखाणामागील कळसूत्रे आणि अंबाजोगाई येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून केलेले संपूर्ण भाषणही वाचायला मिळते. यासह रवींद्र पिंगे, व.दि. कुलकर्णी, रविमुकुल, गंगाधर गाडगीळ यांनी माडगूळकर यांच्यावर लिहिलेले लेखही आहेत.

वेगवेगळ्या नियतकालिकात प्रसिद्ध झालेले हे लेख व्यंकटेश माडगूळकर साहित्य गौरव विशेषांकात घेण्यात आले आहेत. माडगूळकर यांनी स्वतः लिहिलेले आणि त्यांच्यावर लिहिण्यात आलेले हे सर्व लेख या पुस्तकात एकत्र वाचायला मिळतात. 

मराठी साहित्याचे विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक आणि माडगूळकर साहित्यप्रेमी यांच्यासाठी हा विशेषांक एक संदर्भ ग्रंथ ठरला आहे.‌ कॅ. आशिष दामले या विशेषांकाचे संपादक असून श्याम जोशी हे कार्यकारी संपादक आहेत. 

संपर्क

ग्रंथसखा प्रकाशन 

९३२००३४१५६



बुधवार, १८ जानेवारी, २०२३

फक्त निलंबन नको, अशा उमेदवारांना निवडणूक लढवायला बंदी करा नाहीतर पाडा

छायाचित्र गुगल फोटोच्या सौजन्याने
छायाचित्र गुगल फोटोच्या सौजन्याने 

महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील पाच जागांसाठी येत्या ३० जानेवारीला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत होणाऱ्या लढतीवरून महाराष्ट्रातील राजकारण तापले असून वाद प्रतिवाद सुरू आहेत. शह काटशहाचे राजकारण सुरू आहे.‌ 

यातही नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नाशिक पदवीधर मतदार संघातून काँग्रेसचे नेते व आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर झाली होती मात्र आपले सुपुत्र सत्यजित तांबे यांच्यावरील प्रेमापोटी डॉक्टर सुधीर तांबे यांनी अनपेक्षितपणे माघार घेतली. इकडे सत्यजीत तांबे यांना काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी दिलेली नव्हती त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला.‌ तांबे पिता पुत्राच्या एकाच वेळी काँग्रेस आणि भाजप यांच्याबरोबर वाटाघाटी सुरू होत्या. झाल्या प्रकाराची दखल घेऊन नेहमीप्रमाणे सत्यजित यांचे वडील आणि काँग्रेसचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली तर सत्यजित तांबे यांच्यावर निरंभानाची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

छायाचित्र गुगल फोटोच्या सौजन्याने 

विधान परिषदेवरील रिक्त जागा असो किंवा विधान परिषदेवर निवडून द्यायच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या जागा असोत. या सर्व जागांवर खरे तर पक्षासाठी आजवर घाम गाळलेल्या, प्रामाणिक कार्यकर्त्याची किंवा त्या त्या क्षेत्रातील मान्यवर अनुभवी व्यक्तींची निवड होणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून पक्षश्रेष्ठी किंवा पक्षातील बड्या नेत्यांशी जवळीक असलेल्या तसेच 'मनी' मसल पॉवर' असलेल्या लोकांना उमेदवारी मिळते. हे करण्यात सर्वच राजकीय पक्ष आघाडीवर आहेत. 'पार्टी विथ डिफरन्स' म्हवून घेणारा भाजपही याला अपवाद नाही. 

लोकसभा, विधानसभा किंवा अगदी महापालिका, नगरपालिका निवडणुकीसाठीही उमेदवारी देताना 'जिंकून येण्याची क्षमता' हा आणि त्या उमेदवाराची मनी, मसल पॉवर किती आहे? हेच पाहिले जाते. मग तो उमेदवार आपल्या पक्षातील असो किंवा दुसऱ्या पक्षातून आयात केलेला असो.‌ पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांनी आपल्याला या निवडणुकीत उमेदवारी मिळेल म्हणून काम सुरू केलेले असते मात्र ऐनवेळी त्यांना ठेंगा दाखवला जातो. पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म दिले जात नाहीत आणि भलत्याच व्यक्तीची उमेदवार म्हणून निवड केली जाते किंवा त्याला अपक्ष म्हणून रिंगणात उतरवून पाठिंबा दिला जातो. आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांवर पुन्हा एकदा अन्याय होतो.

छायाचित्र गुगल फोटोच्या सौजन्याने 

या सगळ्यात अशा प्रकारे पक्ष बदलणाऱ्या, आपल्या फायद्यासाठी तत्वांना सोडचिठ्ठी देणाऱ्या उमेदवाराचे काहीच नुकसान होत नाही. कारण त्यांनी आधीच्या पक्षाकडून आमदार, खासदार किंवा अन्य महत्त्वाची राजकीय पदे उपभोगलेली असतातच. आणि आता त्यांनी ज्या नव्या राजकीय पक्षात उडी मारलेली असते तिथूनही ते निवडून येतात आणि या पक्षबदलुंचे पुन्हा एकदा सर्व काही सुरळीत चालू राहते.  

याला कुठेतरी आळा बसणे आवश्यक आहे.‌ अशा प्रकारे निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी जे पक्ष बदलतील किंवा पक्षभंग करून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील अशा लोकांवर फक्त निलंबनाची कारवाई पुरेशी नाही. तर निवडणूक आयोगाने या लोकांना निवडणूक लढविण्यास बंदी घातली पाहिजे. पण, पण येथे सर्वपक्षीय राजकारणी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून अशा प्रकारची सुधारणा, नियम करण्यास किंवा पक्षाच्या घटनेत बदल करण्यास कधीही तयार होणार नाहीत. त्यामुळे अशा पक्षबदलू लोकांना निवडणूक लढविण्यास बंदी घालावी यासाठी निवडणूक आयोगाकडे दाद मागणे किंवा न्यायालयत जनहित याचिका दाखल करणे हा एक मार्ग जागरूक नागरिकांच्या हातात आहे. यात कितपत यश येईल किंवा नाही हा भाग वेगळा. 

छायाचित्र गुगल फोटोच्या सौजन्याने 

किंवा अशा उमेदवारांना पाडणे हा आणखी एक पर्याय जागरूक मतदार म्हणून आपण निवडू शकतो.‌ त्यामुळे मतदारांनी ठरवून असा पक्षबदलू उमेदवार पाडला तर कदाचित सर्वपक्षीय राजकारण्यांच्या वागण्याला चाप बसू शकेल, अशी किमान अपेक्षा करायला हरकत नाही.

मंगळवार, १७ जानेवारी, २०२३

बहुभाषिक पुस्तक आदानप्रदान सोहळा

पै फ्रेन्ड्स लायब्ररीतर्फे येत्या २१ ते २९ जानेवारी या कालावधीत बहुभाषिक पुस्तक आदानप्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. उपक्रमाचे यंदा पाचवे वर्ष असून सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत या बहुभाषिक पुस्तक आदानप्रदान सोहळ्यात वाचकांना सहभागी होता येणार आहे. आपल्याकडे असलेली जुनी (चांगल्या स्थितीतील) वाचून झालेली पुस्तके येथे देऊन त्या बदल्यात तिथे उपलब्ध असलेल्या पुस्तकांमधून आपल्याला अन्य पुस्तके घेता येणार आहेत. पुस्तकांच्या या आदानप्रदानामुळे आपल्याकडील वाचून झालेली पुस्तके अन्य वाचकांना वाचायला मिळू शकतील तर आपण न वाचलेली पुस्तके आपल्याला घेता येतील. 


शुक्रवार, २० जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता पुस्तक आदानप्रदान सोहळ्याचे उदघाटन होणार आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर, लेखक अच्युत गोडबोले, लेखिका उमा कुलकर्णी, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.

२१ 'जानेवारीला अभिनेते महेश कोठारे यांची प्रकट मुलाखत, २२ जानेवारी या दिवशी 'वाचन संस्कृती आणि कृतज्ञता' या विषयावर प्रल्हाद पै यांचे व्याख्यान, २३ जानेवारीला वसंत लिमये, चंद्रशेखर टिळक यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

लेखक प्रणव सखदेव यांची मुलाखत- २४ जानेवारी, माझ्या कवितेचा प्रवास- अशोक नायगावकर- २५ जानेवारी, स़ंत साहित्य- डॉ. अरुणा ढेरे- २६ जानेवारी, लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांची मुलाखत- २७ जानेवारी असे कार्यक्रम होणार आहेत. २८ जानेवारीला वैद्य परिक्षित शेवडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आणि 'ॲनालायझर न्यूज'चे सुशिल कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. रविवार, २९ जानेवारी रोजी पुस्तक आदानप्रदान सोहळ्याचा समारोप होणार आहे. 

महाजन यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी पाच तर अन्य सर्व कार्यक्रमांची वेळ संध्याकाळी सहा अशी आहे. 

पुस्तक आदानप्रदान सोहळ्याच्या निमित्ताने काॅफी टेबल पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे. अभिनेते, अभिनेत्री, पत्रकार, लेखक, कवी अशा ७५ व्यक्तींनी लिहिलेले रंजक लेख, अनुभव, गोष्टी बरच काही या पुस्तकात असणार आहे. अशोक सराफ, श्रीधर फडके, सुधीर गाडगीळ, अच्युत गोडबोले, गुरु ठाकूर अशा अनेक मान्यवरांचे लेख या कॉफी टेबल बुक मध्ये असणार आहेत. 

पुस्तक आदानप्रदान सोहळ्याचे सर्व कार्यक्रम डोंबिवली पूर्व येथील सावळाराम महाराज क्रीडा संकुलाती होणार आहेत. कार्यक्रमासाठी रसिक श्रोते, वाचक यांना विनामूल्य प्रवेश आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क 7506296034 /9833732713 खालील लिंकवर क्लिक करूनही आपला सहभाग नोंदविता येणार आहे.

https://www.aadanpradan.com

गुरुवार, १२ जानेवारी, २०२३

'रेखा' 'चित्रा'ची गोष्ट!

दोघी सख्या बहिणींनी एकाच वेळी, एकाच चित्रपटातून नायिका म्हणून पदार्पण करण्याचा सुदैवी आणि वर्ष वेगळे पण एकाच तारखेला या जगातून निरोप घेण्याचा दुर्दैवी योगायोग अभिनेत्री रेखा कामत आणि चित्रा नवाथे यांच्याबाबतीत घडला.'लाखाची गोष्ट' या मराठी चित्रपटाद्वारे दोघीही बहिणींनी 'नायिका' म्हणून एकाच वेळी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आणि '११ जानेवारी' या एकाच तारखेला दोघी बहिणींनी या जगाचा निरोप घेतला. रेखा कामत याचे गेल्यावर्षी २०२२ मध्ये तर चित्रा यांचे यावर्षी निधन झाले.

रेखा आणि चित्रा यांची पूर्वीची नावे अनुक्रमे कुमुद आणि कुसुम. 'महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी' म्हणून ज्यांची ओळख आहे त्या गीतकार ग दि माडगूळकर यांनी या दोघी बहिणींचे नामकरण रेखा आणि चित्रा असे केले. माहेरच्या सुखटणकर. पटकथा लेखक ग. रा. कामत यांच्याशी विवाह झाल्यानंतर रेखा या कामत तर दिग्दर्शक राजा नवाथे यांच्याशी विवाह झाल्यानंतर चित्रा या नवाथे झाल्या. कुमुद आणि कुसुम यांच्या 'रेखा चित्रा' कशा झाल्या तोही एक किस्सा आहे. 

अभिनेत्री आणि नृत्यांगना हंसा वाडकर यांनी रेखा आणि चित्रा या दोघी बहिणीचे काम पाहिले होते. त्यांनी निर्माते दिग्दर्शक राजा परांजपे यांना या दोघींची नावे सुचवली होती. योगायोगाने त्याच वेळी राजा परांजपे 'लाखाची गोष्ट' चित्रपटाची निर्मिती करत होते. राजा परांजपे यांनी या दोघींना पुण्यात भेटायला बोलावले. तिथे चित्रपटाचे कथा, पटकथा संवाद लेखक ग दि माडगूळकर आणि संगीतकार सुधीर फडके हे ही उपस्थित होते. राजा परांजपे यांनी दोघी बहिणींना काहीतरी करून दाखवा असे सांगितले आणि त्यांनी 'रामलीला' या नृत्य नाटकातील काही प्रसंग सादर केले आणि दोघींचीही 'लाखाची गोष्ट' या चित्रपटासाठी निवड झाली. कुमुद आणि कुसुम ही नाव जुन्या वळणाची आहेत. चित्रपटासाठी ही नावे नकोत म्हणून 'गदिमा'नी त्या दोघींचे अनुक्रमे रेखा आणि चित्रा असे नामकरण केले आणि तीच त्यांची ओळख झाली.

रेखा मोठ्या तर चित्रा धाकट्या. दोघी बहिणींना नृत्याची आवड होती. गणेशोत्सव मेळाव्यातही दोघीही काम केले होते. आचार्य पार्वती कुमार यांच्याकडे दोघींनी शास्त्रीय नृत्याचे धडे गिरविले होते पार्वती कुमार यांच्या 'रामलीला' या नाटिकेतही त्यांनी काम केले होते. दोघी बहिणींचे पाचवीनंतरचे शिक्षण दादरच्या जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या छबिलदास शाळेत झाले. सुखटणकर कुटुंबीय तेव्हा दादरच्या मीरांडा चाळीत राहायला होते. चाळीत आणि परिसरात होणाऱ्या गणेशोत्सव मेळाव्यात त्या भाग घेत होत्या. 'गुळाचा गणपती', वहिनीच्या बांगड्या' 'उमज पडेल तर', राम राम पाव्हणं' हे चित्रा यांचे गाजलेले चित्रपट. तर ‘कुबेराचे धन’, ‘गृहदेवता’ (यात दुहेरी भूमिका), ‘गंगेत घोडे न्हाले’, ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘माझी जमीन’ तर अगदी अलीकडचा ‘अगंबाई अरेच्चा’ हे रेखा यांचे चे गाजलेले चित्रपट. व्यावसायिक मराठी रंगभूमीवर ‘सौभद्र’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’,‘संशयकल्लोळ’ आदी संगीत नाटकांतून तसेच ‘दिल्या घरी तू सुखी राहा’, ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘कालचक्र’ आदी नाटकांतून रेखा यांनी भूमिका केल्या. प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित ‘प्रपंच’ ही त्यांची पहिली दूरचित्रवाहिनी मालिका. मालिकेत त्यांनी साकारलेली ‘आक्का’ ही भूमिका गाजली. ‘सांजसावल्या’ मालिकेतही त्यांनी काम केले. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मधील ‘माई आजी’ने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. 

 गेली पन्नास ते साठ वर्षे दोघी बहिणींनी चित्रपट, नाटकात योगदान दिले. आधी रेखा आणि आता चित्रा यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीच्या सुवर्णकाळातील साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेल्या. रेखा आणि चित्रा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

मंगळवार, १० जानेवारी, २०२३

प्रथम तुज पाहता

मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक-अभिनेते रामदास कामत यांचा ८ जानेवारी २०२३ या दिवशी प्रथम स्मृतिदिन होता. त्यानिमित्ताने...
गुंतता हृदय हे, तम निशेचा सरला, देवाघरचे ज्ञात कुणाला, नको विसरू संकेत मीलनाचा, साद देती शिखरे ही आणि यासारखी अनेक नाट्यपदे रामदास कामत यांनी अजरामर केली. या नाट्यपदांचे गारुड आजही रसिकांच्या मनावर कायम आहे. 

रामदास कामत यांनी अनेक नाट्यपद गायली असली तरी चित्रपटासाठी त्यांनी खूपच कमी पार्श्वगायन केलं. ‘मुंबईचा जावई’ या चित्रपटासाठी त्यांनी गायलेलं ‘प्रथम तुजं पाहता’ हे एकमात्र चित्रपट गीत असावं. या गाण्याचे गीतकार होते ग दि माडगूळकर आणि संगीतकार होते सुधीर फडके. सुधीर फडके यांनी रामदास कामत यांना दूरध्वनी केला आणि ‘मुंबईचा जावई’ या चित्रपटातील ‘प्रथम तुज पाहता’ हे गाणे तुम्ही गावे अशी आपली इच्छा असल्याचे सांगितले. 

या रविवारी गाण्याचं ध्वनिमुद्रण करायचं असून तुम्ही अवश्य यावे असा निरोप दिला. मात्र त्याच दरम्यान म्हणजे शनिवारी बार्शी येथे रामदास कामत यांचा गाण्याचा कार्यक्रम होता आणि रविवारीच गाण्याचं ध्वनिमुद्रण करायचं असल्यानं त्यांनी फडके यांना आपल्याला जमणार नाही असं सांगितलं. परंतु फडके यांनी कसही करून हे जमवाच असा आग्रह झाला आणि कामत यांनी त्याला हो म्हटले. 

शनिवारी बार्शीचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्रीच्या गाडीने मुंबईला परतायचं कामत त्यांनी ठरवलं. बार्शी चा कार्यक्रम पार पडला आणि कामात मुंबईला येण्यासाठी निघाले. आरक्षण केलेलं नसल्याने तिकीट काढून ते कसेबसे गाडी चढले. पुण्याला त्यांना बसायला मिळालं. रात्रभर झोप न झाल्यांन त्यांचा आवाज पार बसला होता. रविवारी मुंबईत परतल्यानंतर त्यांनी फडके यांना आपण मुंबईत आल्याचं कळवलं. पुण्याला त्यांना बसायला मिळालं. रात्रभर झोप न झाल्यांन त्यांचा आवाज पार बसला होता. रविवारी मुंबईत परतल्यानंतर त्यांनी फडके यांना आपण मुंबईत आल्याचं कळवलं. 

फडके यांनी सांगितल्याप्रमाणे रामदास कामत गाण्याच्या ध्वनिमुद्रणस्थळी हजर झाले. तिथे संगीतसाथीसाठी तबल्यावर वसंत आचरेकर, सारंगीवर राम नारायण आणि संवादिनीवर प्रभाकर पेडणेकर ही मंडळी आलेली होती. माझा आवाज बसला आहे त्यामुळे मी चांगलं गाऊ शकणार नाही असं रामदास कामत यांनी फडके यांना सांगून पाहिलं. परंतु ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळी गाण्याचं ध्वनिमुद्रण करणं गरजेचं होतं कारण दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी कोल्हापूरला या गाण्याचं चित्रीकरण होणार होतं आणि त्यासाठी रविवारी रात्रीच ध्वनिमुद्रित केलेलं गाणं कोल्हापूरला पाठवायचं होतं.

 त्यामुळे रामदास कामत यांनी गळ्याचे काही व्यायाम करून आपला आवाज मोकळा केला आणि हे गाणं ध्वनिमुद्रित झालं. आज इतक्या वर्षानंतरही हे गाणं रसिकांच्या ओठावर आहे आणि स्मरणातही आहे. चित्रपटात पडद्यावर हे गाणं अरुण सरनाईक यांच्यावर चित्रित झालं होतं. 

©️ शेखर जोशी

प्रथम तुज पाहता या गाण्याची युट्युब लिंक





सार्वजनिक वाचनालयाचे जनक- सदाशिव मोरेश्वर साठे

कोणत्याही शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला असला तरीही शहराच्या जडणघडणीत शहरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचा मोठा सहभाग असतो. गेल्या पन्नास ते सत्तर वर्षांच्या कालावधीत कल्याण शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, विविध कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात शहरातील सुजाण नागरिकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

विविध क्षेत्रात प्रसिद्धीस आलेल्या नामवंतांनी, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तसेच आपली नोकरी, व्यवसाय आणि संसार सांभाळून सर्वसामान्य कल्याणकर नागरिकांनी कल्याण शहराच्या विकासासाठी आपले योगदान दिले. ही माणसे प्रसिद्धीपासून दूर राहिली आणि विस्मृतीतही गेली. विस्मृतीत गेलेल्या अशा कल्याणकरांचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय करून देणारी ही लेखमालिका महाराष्ट्र टाइम्सच्या ठाणे प्लस पुरवणीत सुरू झाली आहे. 

कल्याणसह अंबरनाथ, बदलापूर या शहरातीलही विस्मरणातील व्यक्तींचा परिचय यात करून देण्यात येणार आहे. पंधरा दिवसांनी एक असे महिन्यातून दोन लेख असतील. 

या लेखमालिकेतील पहिला लेख महाराष्ट्र टाइम्सच्या ठाणे प्लस पुरवणीत ७ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध झाला. कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाची स्थापना ज्यांनी केली त्या सदाशिव मोरेश्वर साठे यांच्यावर होता. त्या लेखाचे क्लिपिंग