आधी ठरले होतेच आता 'राज'मुद्रा -
ही तर सुरुवात, खरे लक्ष्य विधानसभा, महापालिका
शेखर जोशी
राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार की नाही? याविषयी सुरू असलेल्या चर्चा, अंदाज यांना आज पूर्णविराम मिळाला. छत्रपती शिवाजी उद्यान येथे झालेल्या गुढीपाडवा सभेत आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहेत, अशी घोषणा केली. राज ठाकरे यांनी जाहीर घोषणा केल्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत मनसेला किती जागा मिळतात, ते पाहायचे. याचवेळी राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे सांगून तेव्हा आपल्याला नक्कीच काही जागा मिळतील, असेही सुचित केले.
२०१४ ला नरेंद्र मोदी यांना पाठिंबा, कौतुक तर २०१९ मध्ये त्यांच्यावर केलेली टीका याबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नोटाबंदी आणि इतर काही निर्णय पटले नाहीत म्हणून २०१९ मध्ये आपण टीका केली. ३७० कलम रद्द करणे, सीएए या सारखे चांगले निर्णय मोदींनी घेतले. देशाला आज खंबीर नेतृत्वाची गरज आहे. आणि त्यामुळेच मोदींसाठीच आपण भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीत सहभागी होत आहोत. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणणे हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे पुढेही काही पटले नाही तर माझे तोंड आहेच, असेही त्यांनी सांगून टाकले. मी मोदींवर वैयक्तिक किंवा उद्धव ठाकरे, संजय राऊत करतात तशी टीका कधीही केली नाही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.
राज ठाकरे यांच्या मनसेने कमळ किंवा धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवावी, असे त्यांना सांगितले गेले असल्याची चर्चा होती. मात्र आपले इंजिन हे चिन्ह मनसैनिकांची मेहनत आहे. त्यामुळे चिन्हाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आणि सुरू असलेल्या चर्चेवर पडदा टाकला. आपण बिनशर्त पाठिंबा देत आहोत, असे राज ठाकरे यांनी सांगितले असले तरी एक/ दोन जागा मिळाल्याच पाहिजेत, अशी खात्री त्यांनी अमित शहा यांच्याकडून नक्कीच मिळवली असणार. आता थोडे नमते घेऊन विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीत जेवढ्या जागा मिळवता येतील, असा ते प्रयत्न करणार यात शंका नाही. २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोदी विरोधात प्रचार करण्यासाठी कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनीही पुरेपूर वापर करून घेतला. त्या बदल्यात आघाडीत स्थान मिळावे, काही जागा मिळाव्यात अशी राज ठाकरे यांची अपेक्षा होती. पण ती पूर्ण झाली नाही. १८ वर्षात कधी यांच्या बरोबर तर कधी त्यांच्याबरोबर जाऊन काहीच फायदा झाला नाही. आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून महायुतीत सहभागी होण्याचे, काही जागाही देण्यात येतील, असे ठोस आश्वासन दिले गेले असेल तर ते फायदेशीरच आहे, असा शहाणपणाचा विचार करून चला आता हे करून पाहू या, असे त्यांनी ठरवले असेल तर ते चुकीचे नाही.
मुसलमान मतपेढीला महत्त्व न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष हिंदू मतपेढी तयार केली आहे. ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय, राममंदिर उभारणी यामुळे मोदींनी हिंदू मतपेढी आपल्या बाजूने वळवून घेतली आहे. दोन्ही काँग्रेस बरोबर गेल्याने उबाठा गट हिंदुत्वापासून दूर गेला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि उबाठा गटाचे जे कोणी मतदार असतील त्यांना आपल्याकडे वळवून घेण्यासाठी, ती पोकळी भरून काढण्यासाठी उघड हिंदुत्व स्विकारणे फायदेशीरच आहे, हे त्यांनी ओळखले. अर्थात नुसते हिंदुत्व, राममंदिर असे भावनिक मुद्दे घेऊन चालणार नाही, हे ठाम माहिती असल्यानेच त्यांनी आजच्या सभेत बेरोजगारी, नोक-या, अस्वस्थ तरुण यांनाही साद घातली. पंतप्रधान मोदींनी तरुणांकडे लक्ष द्यावे. नोकरी, व्यवसाय उपलब्ध झाले नाहीत तर अराजक माजेल, असेही त्यांनी स्पष्ट करून तरुण, बेरोजगार यांचीही सहानुभूती मिळवली.
राज ठाकरे यांना समाजाची नेमकी नस माहिती आहे. कुठे, कधी, कोणत्या वेळी काय भूमिका घ्यायची, वेळ साधून काय बोलायचे, हे राज ठाकरे चांगले ओळखतात. मराठी पाट्या, मशिदींवरील भोंगे आणि अजान, पथकर, नोकरभरतीत मराठी तरुणांना प्राधान्य हे मुद्दे त्यांनी अचूक उचलले. मराठी अस्मिता जपण्याबरोबरच राष्ट्रवाद, हिंदुत्व याचे महत्त्वही त्यांना कळले. मनसे आता अठरा वर्षांची म्हणजे सज्ञान झाली आहे. त्यामुळे आता यापुढे तरी धरसोड वृत्ती सोडून घेतलेल्या भूमिकेशी तडजोड न करता प्रामाणिक राहावे. हे त्यांनी 'मनसे' केले तर येणारा काळ राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षासाठी नक्कीच आशादायक, सत्तासोपानाकडे घेऊन जाणारा असेल.
जाता जाता - राज ठाकरे यांनी उघडपणे भाजपसमवेत जाण्याची घोषणा केल्यामुळे आता पुरोगामी, डावे, कॉग्रेसी, समाजवादी त्यांना शिव्या घालतील. पण हेच राज ठाकरे २०१९ मध्ये भाजप आणि मोदी यांच्यावर टीका करत होते तेव्हा ते या सर्व मंडळींच्या गळ्यातील ताईत होते, हे विसरून चालणार नाही. म्हणजे मोदींना जाऊन मिळाले तर तो माणूस वाईट आणि सोनिया गांधी, शरद पवार, राहुल गांधी यांच्या बाजूने असला तर तो माणूस चांगला अशी भूमिका घेणे हा दुटप्पीपणा आणि ढोंगीपणा झाला. असो.
- शेखर जोशी
९ एप्रिल २०२४