शुक्रवार, २१ मार्च, २०२५

भाजप महाराष्ट्र आणि देवेंद्र फडणवीस हिंमत दाखवणार का?

भाजप महाराष्ट्र आणि देवेंद्र फडणवीस हिंमत दाखवणार का?

औरंगजेबाची मूळ कबर तशीच ठेवून 
सभोवतालचे बांधकाम जमीनदोस्त करा
- लाखो रुपयांचे अनुदान बंद करण्यासाठी निवेदन द्या 
- औरंगजेबाच्या क्रूरकृत्यांची माहिती देणारा फलक लावा
शेखर जोशी 
क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीवरुन वाद रंगला आहे. सर्वपक्षीय राजकारणी, हिंदुत्ववादी संघटनांसह समाज माध्यमातून सर्वसामान्य हिंदुत्ववादी नागरिक आपापली मते, विचार हिरीरीने मांडत आहेत. बाबरीप्रमाणे ही कबर उद्ध्वस्त करावी ते कबर तशीच राहू द्यावी अशी मतमतांतरे आहेत.‌ औरंग्याच्या मूळ कबरीला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत राहून त्या कबरीभोवतीचे सुशोभीकरण व बांधकाम विस्तार करण्यात आले आहे, ते नक्कीच जमीनदोस्त करता येईल. लाखो रुपयांचे अनुदान बंद करण्यासाठी निवेदन देता येईल तसेच औरंगजेबाच्या क्रूरकृत्यांची माहिती देणारा फलकही लावता येईल. अर्थात हे सर्व करण्यासाठी राजकीय धडाडी व इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे, मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती दाखवावी, अशी माफक अपेक्षा. 

प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानची कबर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या वेळी जी काही छोटी कबर बांधली होती, त्याचे नंतरच्या काळात भव्य स्मारकात रुपांतर झाले, केले गेले. सुशोभीकरण झाले, आजुबाजूची जागा हडप करून अनधिकृत बांधकाम केले गेले.‌ गेली अनेक वर्षे कबरीसभोवती झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत हिंदुत्ववादी, हिंदुत्ववादी संस्था, संघटना यांच्याकडून तक्रारी करण्यात येत होत्या. न्यायालयातही दाद मागण्यात आली होती. न्यायालयाकडून वेळोवेळी कबरी सभोवताली झालेले/ केलेले अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे, असे आदेश देण्यात आले होते. मात्र मुसलमानांचे लांगूलचालन करणा-या कॉग्रेसच्या आणि नंतर महाविकास आघाडीच्या काळातही ते पाडले गेले नाही. कबरीच्या सभोवताली अनधिकृत बांधकाम, विस्तार वाढत चालला होता. 

महाविकास आघाडी पायउतार झाल्यानंतर महायुती सत्तेवर आली. आणि त्यानंतर काही दिवसात तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इच्छाशक्ती दाखवून अफजलखानाच्या मूळ कबरीला कोणताही धक्का न लावता न्यायालयाच्या आदेशानुसार कबरी सभोवताली झालेले अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. त्याच धर्तीवर आता मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इच्छाशक्ती दाखवून औरंगजेबाच्या मूळ कबरीला धक्का न लागता त्या कबरीभोवती जे भव्य बांधकाम केले आहे, त्याचा जो विस्तार झाला आहे तो तातडीने जमीनदोस्त करावा. केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देण्यात आले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. ते बरोबर आहे. पुरातत्त्व विभागाने मूळ कबरीला धक्का लावू नये असे सांगितले आहे. पण त्या कबरीभोवती जे सुशोभीकरण, भव्य बांधकाम झाले आहे, त्याचेही संरक्षण करा, असे तर सांगितलेले नाही ना? योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे मूळ कबरीला धक्का न लावता बाकीचे बांधकाम बुलडोझर लावून जमीनदोस्त केले जावे.

आणखी एक, केंद्रातही भाजपचे शासन आहे. या कबरीच्या देखभालीसाठी केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडून लाखो रुपयांची जी खैरात केली जाते, ती तातडीने बंद करण्यात यावी, असे लेखी पत्र महाराष्ट्र शासनाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन आणि पुरातत्व विभागाला देण्यात यावे. एक वेळ उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे आमदार या निवेदनावर स्वाक्षरी करणार नाहीत, पण भाजप आणि शिवसेनेच्या सर्व आमदार, खासदार यांची स्वाक्षरी तर या निवेदनावर तेवढे तरी तुम्ही करू शकता ना? त्या कबरीच्या ठिकाणी क्रूरकर्मा औरंगजेबाने केलेले अत्याचार, छत्रपती संभाजी महाराज यांचे केलेले हाल याची माहिती देणारा फलकही तिथे महाराष्ट्र शासनाच्यावतीने लावा आणि मूळ कबरीला धक्का न लावता कबरी सभोवताली झालेले सुशोभीकरण जमीनदोस्त करण्याची राजकीय धडाडी व इच्छाशक्ती दाखवा, इतकीच माफक अपेक्षा.‌ या गोष्टी करणे आपल्या हातात आहेत. तिथे कोणताही नियम आड येणार नाही, असे वाटते. 
शेखर जोशी 
२१ मार्च २०२५

शनिवार, १५ मार्च, २०२५

औरंगजेब कबरीच्या देखभालीसाठी लाखो रुपये

 औरंगजेब कबरीच्या देखभालीसाठी लाखो रुपये 

औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्त्व खात्याकडून दरवर्षी लाखो रुपयांची मदत केली जात आहे. तर महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक असलेल्या मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी राज्य शासनाकडून फक्त २५० रुपयांचा निधी दिला जात असल्याचे हिंदू जनजागृती समितीचे म्हणणे आहे. 


उपलब्ध माहितीनुसार २०२१-२२ मध्ये २,५५,१६० रुपये तर २०२२-२३ (नोव्हेंबरपर्यंत) २,००,६२६ रुपये खर्च करण्यात आला. आतापर्यंत ६.५० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असल्याचे हिंदू जनजागृती समितीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 


औरंगजेबाच्या कबरीसाठी दिली जाणारी भरघोस आर्थिक मदत तत्काळ थांबवावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी भरघोस आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी केली आहे.

रविवार, १४ एप्रिल, २०२४

'शबरी शिधा' देऊन उभारली प्रेमाची गुढी!

नंदुरबार तालुक्यातील एका आदिवासी महिलेला शिधा देण्यात आला


'शबरी शिधा' देऊन उभारली प्रेमाची गुढी! 

महाराष्ट्राच्या वनवासी/ आदिवासी भागात शबरी सेवा समिती गेली अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहे. यापैकी 'शबरी शिधा' हा उपक्रम गेली पाच वर्षे राबविण्यात येत असून गुढीपाडव्याच्या दिवशी धुळे जिल्ह्यातील भिलटपाडा, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगाव, तळोदा तसेच ठाणे जिल्ह्यातील जव्हार, वाडा, विक्रमगड येथील ४६५ कुटुंबांना दोन महिने पुरेल इतका शिधा देण्यात आला. या सर्व घरी गुढीही उभारण्यात आली. 

धडगाव तालुक्यातील वयोवृद्ध, एकाकी महिलेस शिधा देण्यात आला. सोबत शेजारी आणि देवीसिंग पाडवी हे कार्यकर्ते

येथील आदिवासी/ वनवासी कुटुंबांची हलाखीची परिस्थिती आहे. राहण्यासाठी जिथे धड घरही नाही तिथे दररोजच्या जेवणाची आणखीनच भ्रांत. राज्य शासनाकडून गहू, तांदूळ व अन्य काही वस्तू या आदिवासी/वनवासी कुटुंबांना शिधावाटप दुकानात मोफत मिळतात. पण त्याहीपेक्षा अधिक काही वस्तू शबरी सेवा समितीकडून या कुटुंबांना मोफत दिल्या जातात.‌ यात तुरडाळ, मुगडाळ, तेल, काही कडधान्ये, बेसन, रवा,पोहे, शेंगदाणे, गुळ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. काही ठिकाणी आवश्यकता असेल तर कपडेही दिले जातात, अशी माहिती शबरी सेवा समितीचे संस्थापक प्रमोद करंदीकर यांनी दिली.


पिंपळोद येथील केशाबाई वळवी यांना शबरी शिधा देण्यात आला

गेली पाच वर्षे कोणतीही शासकीय आर्थिक मदत न घेता हा उपक्रम सुरू आहे. राजकीय पक्ष/ नेते यांच्याकडूनही मदत घेण्यात येत नाही.‌ समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, सर्वसामान्य नागरिक यांच्या आर्थिक मदतीतून शबरी सेवा समितीचे विविध उपक्रम राबविले जातात. या गुढीपाडव्याला ४६५ कुटुंबांना जो सर्व शिधा देण्यात आला त्यासाठी आनंदकुमार गाडोदिया यांनी आर्थिक मदत केली होती. आता सुमारे दोन महिन्यांनतर या कुटुंबांना पुन्हा शिधा देण्यात येईल. शिधा देताना त्या कुटुंबांची गरज, आवश्यकता याचाही विचार केला जातो, असेही करंदीकर यांनी सांगितले. आपली पत्नी रंजना, शबरी सेवा समितीचे सर्व कार्यकर्ते, हितचिंतक, देणगीदार या सर्वांच्या सहकार्याने आमची वाटचाल सुरू आहे, असेही करंदीकर म्हणाले.


काही आणू नकोस,  पण पुन्हा भेटायला नक्की ये...

भिलटपाडा येथील ताराबाई यांच्यासाठी जेवण तयार करताना प्रमिला

धुळे जिल्ह्यातील आणि शिरपूर तालुक्यातील भीलटपाडा येथील एक अनुभव डोळ्यात पाणी आणणारा आहे. दोन्ही डोळ्यांनी अंध असणा-या ताराबाई पवार यांच्या घराची अवस्था पाहून शबरी सेवा समितीच्या कार्यकर्त्या प्रमिला सायसिंग यांना हुंदका आवरता आला नाही. ताराबाई जिथे राहात होत्या त्या जागेला घर तरी कसे म्हणावे, अशी अवस्था होती. अक्षरशः उकिरडा झाला होता. प्रमिला यांनी ताराबाई यांचे घर आणि आजुबाजूचा परिसर स्वच्छ केला. प्रमिला यांनी गरम गरम स्वयंपाक केला व ताराबाईंना जेवण वाढले. त्यांच्या घरासमोर गुढी उभारली आणि त्यांना शबरी शिधा दिला. प्रमिला यांनी ताराबाई यांचा निरोप घेतला तेव्हा ताराबाई म्हणाल्या, पुन्हा  भेटायला ये,पण काही आणू नको. मला म्हातारीला काय लागते?  पण भेटायला मात्र ये. हो, अगदी नक्की परत येईन, असे सांगून प्रमिला यांनी ताराबाईंचा निरोप घेतला आणि त्या पुढच्या घराकडे निघाल्या.

शेखर जोशी 

१४ एप्रिल २०२४

प्रमोद करंदीकर 

शबरी सेवा समिती 

संपर्क 

+91 99205 16405


मंगळवार, ९ एप्रिल, २०२४

आधी ठरले होतेच आता 'राज'मुद्रा - ही तर सुरुवात, खरे लक्ष्य विधानसभा, महापालिका

 

आधी ठरले होतेच आता 'राज'मुद्रा   -

 ही तर सुरुवात, खरे लक्ष्य विधानसभा, महापालिका 

शेखर जोशी 

राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार की नाही? याविषयी सुरू असलेल्या चर्चा, अंदाज यांना आज पूर्णविराम मिळाला. छत्रपती शिवाजी उद्यान येथे झालेल्या गुढीपाडवा सभेत आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहेत, अशी घोषणा केली. राज ठाकरे यांनी जाहीर घोषणा केल्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत मनसेला किती जागा मिळतात, ते पाहायचे. याचवेळी राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे सांगून तेव्हा आपल्याला नक्कीच काही जागा मिळतील, असेही सुचित केले. 

२०१४ ला नरेंद्र मोदी यांना पाठिंबा, कौतुक तर २०१९ मध्ये त्यांच्यावर केलेली टीका याबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नोटाबंदी आणि इतर काही निर्णय पटले नाहीत म्हणून २०१९ मध्ये आपण टीका केली. ३७० कलम रद्द करणे, सीएए या सारखे चांगले निर्णय मोदींनी घेतले. देशाला आज खंबीर नेतृत्वाची गरज आहे. आणि त्यामुळेच मोदींसाठीच आपण भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीत सहभागी होत आहोत. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणणे हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे पुढेही काही पटले नाही तर माझे तोंड आहेच, असेही त्यांनी सांगून टाकले. मी मोदींवर वैयक्तिक किंवा उद्धव ठाकरे, संजय राऊत करतात तशी टीका कधीही केली नाही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. 

राज ठाकरे यांच्या मनसेने कमळ किंवा धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवावी, असे त्यांना सांगितले गेले असल्याची चर्चा होती. मात्र आपले इंजिन हे चिन्ह मनसैनिकांची मेहनत आहे. त्यामुळे चिन्हाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आणि सुरू असलेल्या चर्चेवर पडदा टाकला. आपण बिनशर्त पाठिंबा देत आहोत, असे राज ठाकरे यांनी सांगितले असले तरी एक/ दोन जागा मिळाल्याच पाहिजेत, अशी खात्री त्यांनी अमित शहा यांच्याकडून नक्कीच मिळवली असणार. आता थोडे नमते घेऊन विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीत जेवढ्या जागा मिळवता येतील, असा ते प्रयत्न करणार यात शंका नाही. २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोदी विरोधात प्रचार करण्यासाठी कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनीही पुरेपूर वापर करून घेतला. त्या बदल्यात आघाडीत स्थान मिळावे, काही जागा मिळाव्यात अशी राज ठाकरे यांची अपेक्षा होती. पण ती पूर्ण झाली नाही. १८ वर्षात कधी यांच्या बरोबर तर कधी त्यांच्याबरोबर जाऊन काहीच फायदा झाला नाही. आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून महायुतीत सहभागी होण्याचे, काही जागाही देण्यात येतील, असे ठोस आश्वासन दिले गेले असेल तर ते फायदेशीरच आहे, असा शहाणपणाचा विचार करून चला आता हे करून पाहू या, असे त्यांनी ठरवले असेल तर ते चुकीचे नाही. 

मुसलमान मतपेढीला महत्त्व न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष हिंदू मतपेढी तयार केली आहे. ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय, राममंदिर उभारणी यामुळे मोदींनी हिंदू मतपेढी आपल्या बाजूने वळवून घेतली आहे. दोन्ही काँग्रेस बरोबर गेल्याने उबाठा गट हिंदुत्वापासून दूर गेला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि उबाठा गटाचे जे कोणी मतदार असतील त्यांना आपल्याकडे वळवून घेण्यासाठी, ती पोकळी भरून काढण्यासाठी उघड हिंदुत्व स्विकारणे फायदेशीरच आहे, हे त्यांनी ओळखले. अर्थात नुसते हिंदुत्व, राममंदिर असे भावनिक मुद्दे घेऊन चालणार नाही, हे ठाम माहिती असल्यानेच त्यांनी आजच्या सभेत बेरोजगारी, नोक-या, अस्वस्थ तरुण यांनाही साद घातली. पंतप्रधान मोदींनी तरुणांकडे लक्ष द्यावे. नोकरी, व्यवसाय उपलब्ध झाले नाहीत तर अराजक माजेल, असेही त्यांनी स्पष्ट करून तरुण, बेरोजगार यांचीही सहानुभूती मिळवली. 

राज ठाकरे यांना समाजाची नेमकी नस माहिती आहे. कुठे, कधी, कोणत्या वेळी काय भूमिका घ्यायची, वेळ साधून काय बोलायचे, हे राज ठाकरे चांगले ओळखतात. मराठी पाट्या, मशिदींवरील भोंगे आणि अजान, पथकर, नोकरभरतीत मराठी तरुणांना प्राधान्य हे मुद्दे त्यांनी अचूक उचलले. मराठी अस्मिता जपण्याबरोबरच राष्ट्रवाद, हिंदुत्व याचे महत्त्वही त्यांना कळले. मनसे आता अठरा वर्षांची म्हणजे सज्ञान झाली आहे. त्यामुळे आता यापुढे तरी धरसोड वृत्ती सोडून घेतलेल्या भूमिकेशी तडजोड न करता प्रामाणिक राहावे. हे त्यांनी 'मनसे' केले तर येणारा काळ राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षासाठी नक्कीच आशादायक, सत्तासोपानाकडे घेऊन जाणारा असेल. 

जाता जाता - राज ठाकरे यांनी उघडपणे भाजपसमवेत जाण्याची घोषणा केल्यामुळे आता पुरोगामी, डावे, कॉग्रेसी, समाजवादी त्यांना शिव्या घालतील. पण हेच राज ठाकरे २०१९ मध्ये भाजप आणि मोदी यांच्यावर टीका करत होते तेव्हा ते या सर्व मंडळींच्या गळ्यातील ताईत होते, हे विसरून चालणार नाही. म्हणजे मोदींना जाऊन मिळाले तर तो माणूस वाईट आणि सोनिया गांधी, शरद पवार, राहुल गांधी यांच्या बाजूने असला तर तो माणूस चांगला अशी भूमिका घेणे हा दुटप्पीपणा आणि ढोंगीपणा झाला. असो.

- शेखर जोशी 

९ एप्रिल २०२४

सोमवार, ८ एप्रिल, २०२४

भाऊ तोरसेकर यांचे भाकित, मोदीच पुन्हा दिल्लीत


भाऊ तोरसेकर यांचे भाकित, मोदीच पुन्हा दिल्लीत 

शेखर जोशी 

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. ज्येष्ठ पत्रकार आणि युट्युबर भाऊ तोरसेकर यांनी त्यावेळी मोदी पंतप्रधान होतील, असे भाकित वर्तवले होते.‌ आणि मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही तोरसेकर यांनी पुन्हा एकदा मोदीच पंतप्रधान होतील, असे भाकित वर्तविले होते आणि ते दुसऱ्यांदा खरे ठरले. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही पुन्हा मोदीच पंतप्रधान होतील, असे भाकित तोरसेकर यांनी व्यक्त केले आहे. आधीची दोन भाकिते खरी ठरल्याने आता तिसऱ्यांदा वर्तवलेले भाकित खरे ठरणारच, असा ठाम विश्वास तोरसेकर यांना आहे. 

https://youtu.be/ezBhVw7HYRs?feature=shared

उपलब्ध आकडेवारी, राजकीय विश्लेषण, पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव याच्या बळावर तोरसेकर यांनी केलेले भाकित खरे ठरले.  तोरसेकर यांनी २०१४ मध्ये 'मोदीच का' तर २०१९ मध्ये 'पुन्हा मोदीच का?' या दोन पुस्तकांच्या माध्यमातून आपले हे विश्लेषण/भाकित मांडले होते. आत्ताही तोरसेकर यांनी 'फक्त मोदीच' या पुस्तकाच्या माध्यमातून पुन्हा मोदीच का? याचे सखोल विवेचन केले आहे. विशेष बाब म्हणजे ही तीनही पुस्तके मोरया प्रकाशन यांनी प्रकाशित केली आहेत.‌


'फक्त मोदीच' या पुस्तकाच्या मनोगतात तोरसेकर म्हणतात, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या दहा वर्षातील माझे हे तिसरे पुस्तक आहे. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय मतदारांनी मी वर्तवलेले भाकित खरे ठरविले आहे.  आता 'फक्त मोदीच' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणूक निकालाचा अचूक आकडा सांगण्याबरोबरच असे आकडे कुठून येतात आणि कशामुळे येतात ते समजवण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे निवडणुका जिंकण्यासाठी काम करावे लागते निवडणुकीतून जनतेकडून सत्तेचे वरदान मिळवताना सत्ता मिळाल्यास जनतेला अधिकाधिक सुखी कसे करता येईल असा विचार राजकीय पक्षांनी करणे अपेक्षित असते यातून जनमानस कसे बदलत जाते याचा अभ्यास हा या पुस्तकाचा हेतू आहे. 



https://youtu.be/ezBhVw7HYRs?feature=shared

'फक्त मोदीच' या पुस्तकात १९ प्रकरणे आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी बहुमताने पुन्हा जिंकणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मुद्दा किती जागांनी, किती फरकाने व किती टक्के मते मिळवून नरेंद्र मोदी पुन्हा १८ वी लोकसभा जिंकणार इतकाच आहे. आणि त्या जागा किती, कशा आणि कुठून मोदींच्या पदरात पडणार याचे विवेचन आणि भाकित या पुस्तकातील एकेका प्रकरणात भाऊ तोरसेकर यांनी केले आहे. निवडणुकांचे प्रकार, निवडणूक जिंकण्याचा निकष, उमेदवाराचे विभिन्न प्रकार, मतांच्या बेरजा आणि वजाबाक्या, सबळ दुर्बळ राजकीय पक्ष, मतसंख्या, टक्केवारी आणि ध्रुवीकरण, प्रगल्भ मतदाराने आणलेले मोदीयुग, नेहरु- इंदिरा युगाचा अस्त, भाजप नावाची राजकीय पहाट, मोदी युगाचा आरंभ, सत्ताकारणाचे बदलते आशय, निवडणुकांची बदलती समीकरणे, १८ व्या लोकसभेचे गणित आणि मोदी दिग्विजय हाच विरोधकांचाही अजेंडा अशी ही विविध प्रकरणे आहेत. पुस्तकातील प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला तोरसेकर यांनी आयन रॅण्ड, अल्बर्ट आईन्स्टाईन, हेनरिख हायने, विस्टन चर्चिल, वॉल्ट डिस्ने, मार्क ट्वेन, प्लेटो, ॲंड्रू जॅक्सन, ॲरिस्टॉटल, जॉर्ज बर्नार्ड शॉ, थॉमस जेफरसन इत्यादी विचारवंत, बुद्धीवतांचे एखादे वाक्य/ वचन/ विचार दिला आहे. 

https://youtu.be/ezBhVw7HYRs?feature=shared

२०१४ मध्ये लोकसभा शर्यतीत मोदी उतरले, त्याच्या दोन वर्षे आधी त्यांनी एक रणनीती आखली होती आणि ती साधीसरळ होती. एकही मुस्लिम उमेदवार निवडून आला नाही तरी मोदींनी बहुमताचे सरकार बनवले त्यासाठी त्यांनी १७ ते १८ टक्के मुस्लिम मतपेढीला निकामी करण्याची हिंदू मतपेढी बनवली होती. मौलवीने देऊ केलेली टोपी नाकारून मोदी हिंदू मनाचे ताईत झाले. मग पाच वर्षे सत्ता राबवताना मोदींनी लाभार्थी नावाची नवी मतपेढी त्याला जोडली.  त्यातून लोकसभेत आपले संख्याबळ वाढवले आणि आता तिसऱ्या लढतीत १८ व्या लोकसभा निवडणुकीत उतरताना मोदींनी नवी तिसरी मतपेढी जोडून घेतली आहे ती नवी मतपेढी 'महिला लाभार्थी' अशी आहे या तीन नव्या मतपेढ्या आणि त्यांच्या मतांचे गठ्ठे राजकारणाला निर्णायक वळण देऊ शकतात याचा २०१४ पूर्वी कोणी विचारच केला नव्हता.  यापूर्वीच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये त्याची ओळखही कोणाला नव्हती.  निकाल लागले तेव्हा त्याचे विश्लेषण करताना या गोष्टी समोर आल्या. मोदी यांच्या या तीन नव्या मत पेढ्याने जुन्या जातीपाती धर्माच्या मतपेढ्यांना शृंग लावलेला आहे एका बाजूला भाजपासाठी मोदींनी नव्या मतांचे गठ्ठे तयार केले आणि त्यातून जुन्या जातीपातीच्या मतपेढ्यांना निकालात काढले. मग सगळी जुनी गणिते विस्कटली असून नवीन गणिते आकाराला येत आहेत, असे भाऊ तोरसेकर यांचे म्हणणे आहे. 

१९९१ च्या निवडणुकीतील अर्ध्याहून अधिक मतदान पूर्ण झालेले असताना एका प्रचार सभेत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची घातपाती हत्या झाली आणि त्याचा नंतरच्या मतदानावर खूप प्रभाव पडला.  पूर्वार्धात मागे पडलेल्या काँग्रेस पक्षाला नंतरच्या मतदानात कमी जागांमध्ये अफाट यश मिळवून तो लोकसभेतील सर्वात मोठे पक्ष बनला. अशा अनपेक्षित घटना ऐनवेळी निवडणुकांना प्रभावित करू शकतात, पण प्रत्यक्ष मतदानापूर्वी चार महिने आधी असलेल्या परिस्थितीच्या आधारे आपण केलेले हे राजकीय आकलन /अंदाज आहे. आणि तशीच परिस्थिती राहिली तर माझ्या अपेक्षेनुसार भाजप ३२५ ते ३५९ जागांचा पल्ला नक्की गाठणार आहे, असा भाऊ तोरसेकर यांचा दावा आहे.

https://youtu.be/ezBhVw7HYRs?feature=shared



फक्त भाजपच नव्हे तर इतर राजकीय पक्ष, राजकीय नेते, कार्यकर्ते, सर्वसामान्य मतदार, राजकीय अभ्यासक, विश्लेषक, पत्रकार, विद्यार्थी, प्राध्यापक अशा सर्वांसाठी 'फक्त मोदीच' हे पुस्तक अभ्यास आणि गृहपाठ म्हणून उपयुक्त आहे. १६६ पृष्ठांच्या या पुस्तकाचे मूल्य २०० रुपये आहे. 

- शेखर जोशी 

८ एप्रिल २०२४

पुस्तकासाठी संपर्क- मोरया प्रकाशन 

ई-मेल info@morayaprakashan.com

संकेतस्थळ www.morayaprakashan.com

दूरध्वनी ७०२१९१३६४५/८६००१६६२९७

रविवार, ७ एप्रिल, २०२४

महाभाग कसला? महाबोगस एपिसोड... प्रेक्षकहो, 'ठरलं तर' मालिकेला आपटवा

महाभाग कसला? महाबोगस एपिसोड...

प्रेक्षकहो, 'ठरलं तर' मालिकेला आपटवा 

शेखर जोशी 

अगं बाई तुला एखाद्या गरीब, गरजू माणसाला मदत करायची आहे तर एखाद्या चांगल्या संस्थेत जा आणि आर्थिक मदत कर. कोण, कुठला, ओळख ना पाळख असलेला रस्त्यावरचा माणूस भेटतो आणि सायली त्या माणसाला आपल्या योजनेत सामील करून घेते? प्रथितयश वकील असलेला अर्जुन या कामासाठी त्याच्या माहितीतील शिक्षा भोगून सुटलेल्या एकाची मदत घेणार असतो तर सायली आपली अक्कल पाजळते आणि त्याला विरोध करते. 

 रविराज किल्लेदार. हा ही हुषार, गाजलेला वकील. पण आपला भाऊ, आपली मुलगी प्रिया काय करतात? हे त्याला कळत नाही. दोघेही त्याला गुंडाळून ठेवतात. प्रिया कोणत्या कॉलेजमध्ये जाते? तिथे काय दिवे लावते? स्टडी टूरच्या नावाखाली काय करते? हे याला कळत नाही. 

तो चैतन्य महामुर्ख. अण्णा व साक्षीच्या घरात राहतो. पण या दोघांचे बोलणे कधीच त्याच्या कानावर पडत नाही. सायलीला कीडनॅप करून घरात आणून ठेवलाय, तिला तिथून दुसरीकडे घेऊन जाताहेत आणि घरात इतकं काय काय घडताय पण चैतन्यला यातले काही कळत नाही.

अस्मिता गेल्या अनेक महिन्यांपासून माहेरीच येऊन राहिलेली आहे. सायली विरोधात कट कारस्थाने सुरू आहेत. स्वतः काही गुन्ह्यात पकडली गेली आहे. तरी ती अजूनही माहेरीच राहते आहे. मधुनच कधीतरी तिची आई व पूर्णा आजी तिला मी मारल्यासारखे करते आणि तू रडल्यासारखे कर असे बोलतात पण तिला येथून चालती हो म्हणत नाहीत. 

प्रतिमा कुठे गायब झाली? 

सगळ्यात महत्त्वाचे. प्रतिमा. काही भागात तिला दाखवून आता पूर्णपणे गायब केली आहे. त्या कुसुमच्या घरून ती कुठे गेली? अदृश्य झाली काही पत्ता नाही. मधुभाऊ बिचारे अजून विलासच्या खुनाच्या आरोपाखाली आतच आहेत. वात्सल्य आश्रम खटला, प्रतिमा हे मालिकेतील मुख्य घटक आहेत, पण तेच कुठे दिसत नाहीत. मधेच कधीतरी त्यांची आठवण होते आणि चटणी, कोशिंबीरीसारखे तोंडी लावायला त्यांचा उल्लेख केला जातो. हे मूळ कथानक पुढे जाण्याऐवजी फालतू आणि रटाळ उपकथानक जोडून एपिसोड वाढवत चालले आहेत. महाएपिसोडच्या नावाखाली तासभर प्रेक्षकांच्या माथी काहीही थोपवले जात आहे. सायली अर्जुनचा हनिमून, माथेरान भाग त्याचाच एक भाग होता. 

शेजो उवाच 

https://youtu.be/rGdvBpCttvo?feature=shared

प्रेक्षक मालिका पाहताहेत म्हणून तुम्ही टीआरपीत सध्या एक नंबरवर आहात. पण असा एपिसोडकाढूपणा केलात तर धाडकन खाली आपटायला वेळ लागणार नाही. नव्हे आता ती वेळ आली आहे. फक्त प्रेक्षकांनी 'ठरलं तर मग' असे म्हटले पाहिजे. इथे काही जण म्हणतील, रिमोट तुमच्या हातात आहे, बंद करा, पाहू नका. अनेक प्रेक्षक तसे करतातही. पण

आपण प्रेक्षकांच्या जे माथी मारू ते चांगलेच आहे, आम्ही आम्हाला पाहिजे ते करू असे करण्याचा ठेका वाहिनी, लेखक, दिग्दर्शक, निर्माता यांना कोणीही दिलेला नाही. निषेधाचा सूर उटटलाच पाहिजे. प्रेक्षकांनी मालिकेला आपटायचे ठरवले, समाज माध्यमातून टीका केली की मालिकांना कशा प्रकारे गाशा गुंडाळावा लागतो, वेळ बदलावी लागते त्याची उदाहरणे आहेत. 'ठरलं तर मग' असे प्रेक्षकांनी मनाशी ठरवून तुमची मालिका पाडायच्या आधी जागे व्हा, कथानक वेगाने पुढे न्या, महाएपिसोडच्या नावाखाली काहीही प्रेक्षकांच्या माथी मारू नका. 

- शेखर जोशी 

७ एप्रिल २०२४

शेजो उवाच

 https://youtu.be/rGdvBpCttvo?feature=shared


बुधवार, १० जानेवारी, २०२४

प्रेमा तुझा रंग कसा?



प्रेमा तुझा रंग कसा? 

शेखर जोशी 

हिंदी/ भारतीय चित्रपट सृष्टीच्या आजवरच्या इतिहासात नायक नायिका विरहित चित्रपट फार कमी प्रमाणात तयार झाले. नायक नायिका, त्यांचे एकमेकांवरील प्रेम, प्रेमात येणारे अडथळे, नायक नायिकेची प्रेमगीते हा आपल्या हिंदी किंवा प्रादेशिक भाषांमधील सर्व चित्रपटाचा मुख्य आधार राहिला आहे. ज्येष्ठ सिनेपत्रकार आणि लेखिका अनिता पाध्ये यांनी लिहिलेल्या 'प्यार जिंदगी है!' या पुस्तकात त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या काही निवडक हिंदी प्रेमचित्रपटांचा निर्मितीप्रवास आणि त्याच्या वैशिष्ठ्यांचे  अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. हे विवेचन करताना ते कुठेही कंटाळवाणे होणार नाही याचीही काळजी पाध्ये यांनी घेतली आहे बॉलीवूड चित्रपटाचे प्रेक्षक,  बॉलीवूड चित्रपटांच्या नायक नायिकांवर आणि चित्रपटावर  भरभरून प्रेम करणारे चाहते,  चित्रपट अभ्यासक यांच्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरले आहे.

हिंदी प्रेमपट या विषयावर पाध्ये यांनी पाच वर्ष काम केले. अभ्यास, संशोधन आणि संबंधित व्यक्तींना भेटून, त्यांच्याशी चर्चा करून पुस्तकाचे लेखन केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या आजवरच्या इतिहासात हजारो प्रेमचित्रपटांची निर्मिती झाली‌, मात्र यापैकी निवडक १२ चित्रपटांचा समावेश पुस्तकात करण्यात आला आहे.  १९५० ते १९९० या वर्षांत प्रदर्शित झालेल्या आणि प्रेमाच्या विविध रंगांचे दर्शन घडविणाऱ्या बारा चित्रपटांची निवड लेखिकेने पुस्तकासाठी केली आहे.

पुस्तकात देवदास, तेरे घर के सामने, अनुपमा, आराधना, बॉबी, छोटी सी बात, कभी कभी, एक दुजे के लिए, कयामत से कयामत तक, आशिकी, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे आणि हम दिल दे चुके सनम या चित्रपटांचा समावेश आहे. प्रत्येक चित्रपटाच्या प्रकरणाला  पाध्ये यांनी दिलेली शीर्षके अत्यंत समर्पक आणि चपखल आहेत. या शीर्षकातून त्यांनी चित्रपटाचे संपूर्ण सार एका वाक्यात सांगितले आहे. प्रेमविव्हळ नायकाची अजरामर शोकांतिका- देवदास,  नि:शब्द प्रेमकथा-  अनुपमा, अव्यक्त प्रेमाची लोभस कथा- छोटी सी बात किंवा बंडखोर प्रेमाची शोकांतिका-  एक दुजे के लिये ही काही वानगीदाखल उदाहरणे.

चित्रकार रोहन पोरे यांनी काढलेली चित्रे 

प्रेमकथा असलेल्या चित्रपटात खलनायक असायलाच हवा, हा आपल्या हिंदी चित्रपटांचा एक अलिखित नियम आहे. मात्र या नियमाला छेद देऊन विजय आनंद उर्फ गोल्डी यांनी 'तेरे घर के सामने' हा चित्रपट तयार केला. हा चित्रपट केवळ खलनायक विरहित नव्हता तर विनोदी अंगाने फुलत जाणारी  प्रेमकथा होती. किंवा 'देवदास' चित्रपटातील दोन लोकप्रिय संवाद, आत्तापर्यंत तयार झालेले १८ 'देवदास' चित्रपट व त्याची माहिती,  चित्रपटविषयक काही रंजक घटना याचीही माहिती लेखिका अगदी सहजपणे देऊन जातात.

प्रत्येक चित्रपटाच्या प्रकरणात चित्रपटाची कथा, चित्रपटाची ठळक वैशिष्ठ्ये, चित्रपटाशी संबंधित काही किस्से, रंजक माहिती,  चित्रपट प्रदर्शित झाल्याची तारीख, वर्ष, कलाकार, दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक, गीतकार, संगीतकार, सिनेमॅटोग्राफर, चित्रपटातील गाणी, गायक गायिका, चित्रपटाला मिळालेले पुरस्कार याचीही माहिती देण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चित्रपटातील काही निवडक छायाचित्रेही पुस्तकात आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला चित्रकार रोहन पोरे यांनी काढलेले चित्र पुस्तकात अधिकच रंग भरतात. पुस्तकाची प्रस्तावना प्रसिद्ध चित्रपट कथा, पटकथा लेखक कमलेश पांडेय यांची आहे

हिंदी चित्रपट म्हणजे सर्वसामान्य माणसांसाठी स्वप्नांचे जग.  दैनंदिन जीवनातील कटकटी, दु:ख, काळजी विसरून दोन अडीच तास तो चित्रपटाशी, कथानकाशी, त्यातील संवाद, गाण्यांशी तो एकरुप होतो. प्रेक्षकांच्या मनावर वर्षानुवर्षे अधिराज्य गाजविणाऱ्या चित्रपटांवरील हे पुस्तक प्रेक्षक आणि वाचकांसाठी अनोखी भेट आहे. 

प्यार जिंदगी है! 

बारा लोकप्रिय हिंदी रोमॅंटिक चित्रपटांचा निर्मितीप्रवास

लेखिका- अनिता पाध्ये

प्रकाशक- देवप्रिया पब्लिकेशन्स

पृष्ठे- ३२७, मूल्य- सहाशे रुपये 

- शेखर जोशी