मंगळवार, २५ मार्च, २०२५

डॉ. होमी भाभा विद्यापीठाचा पदवीदान समारंभ

राज्यपालांचा उपस्थितीत डॉ. होमी भाभा

विद्यापीठाचा पदवीदान समारंभ साजरा 

राज्यपाल तथा कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा चौथा वार्षिक दीक्षांत समारंभ मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात पार पडला.

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्लीचे सदस्य सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सच्चिदानंद जोशी यांचे यावेळी दीक्षांत भाषण झाले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते पीएचडी, पदव्युत्तर पदवी तसेच पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आली तर ६ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राजनीश कामत, कुलसचिव प्रा. विलास पाध्ये, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक नानासाहेब फटांगरे, तसेच विविध विभागांचे अधिष्ठाता. प्राध्यापक, स्नातक विद्यार्थी तसेच निमंत्रित यावेळी उपस्थित होते. प्रारंभी कुलगुरू प्रा. कामत यांनी विद्यापीठाचा मागील वर्षाचा अहवाल सादर केला.



दोन डझनहून अधिक छायाचित्रांचा चेहरे फलक

तब्बल दोन डझनहून अधिक नेत्यांची छायाचित्रे असलेला
 हाच तो चेहरे फलक 

दोन डझनहून अधिक छायाचित्रांचा 'चेहरे फलक' लावून 

भारतीय जनता पक्ष डोंबिवलीतर्फे गुढीपाडवा शुभेच्छा

नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता, विष्णुनगर डोंबिवली पश्चिम, पंजाब नॅशनल बँक चौक येथे कमान उभारून त्यावर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा (डोंबिवली) गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणारा फलक लागला आहे. सत्ताधारी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल दोन डझनहून अधिक नेत्यांच्या छायाचित्रांची हा फलक पूर्ण भरलेला आहे. 

छायाचित्रात नेताजी सुभाषचंद्र बोस नामफलक दिसत आहे.
तर चेहरे फलकाने महर्षी कर्वे रस्ता नामफलक झाकला गेला आहे 

कमानीवरील चेहरे फलक लावण्याआधी नेताजी सुभाषचंद्र बोस व महर्षी कर्वे रस्ता नामफलक असे स्पष्ट व ठळकपणे दिसत होते.

कमानीवरील भरगच्च चेहरे फलकामुळे सुदैवाने चौकातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा नामफलक वाचला आहे. मात्र ते भाग्य महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या वाट्याला आले नाही. या चेहरे फलकाने महर्षी कर्वे नामफलक पुन्हा एकदा झाकला गेला आहे.‌

भाजपचे आमदार व प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण व
अन्य दोन डझनहून अधिक नेत्यांची छायाचित्रे असलेला 
 हाच तो चेहरे फलक 

फलकावर भाजपचे आमदार व भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मोठे छायाचित्र असून फलकावर डाव्या बाजूला चव्हाण यांच्यासह आठ जणांची (यात अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, मोदी, शहा, नड्डा आणि फडणवीस) छायाचित्रे आहेत. तर उजवीकडे वाजपेयी, ठाकरे, दिघे यांची छायाचित्रे कायम ठेवून त्याखाली एकनाथ शिंदे, अजित पवार, श्रीकांत शिंदे, राजेश मोरे यांची छायाचित्रे आहेत. इकडेही रवींद्र चव्हाण यांचे छायाचित्र आहेच. या फलकाच्या अगदी वरच्या बाजूला छोट्या छोट्या गोलात बसवलेली तब्बल दोन डझनहून अधिक नेत्यांची (एकूण ३१) छायाचित्रे आहेत.

शेखर जोशी 

२५ मार्च २०२५

भारताचा 'गोटी सोडा' आता जागतिक बाजारपेठेत!

 

भारताचा 'गोटी सोडा' आता जागतिक बाजारपेठेत! 

भारतातील 'गोटी सोडा' हे शितपेय आता लवकरच 'गोटी पॉप सोडा' या नावाने जागतिक बाजारपेठेत दाखल झाला आहे.‌ 

केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने पारंपरिक गोटी सोड्याला नवे नाव आणि रूप देत जागतिक पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे.‌

https://youtu.be/WhioUg0tXcU

अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि आखाती देशांत गोटी सोडा उत्पादन निर्यातीची चाचणीही यशस्वी झाली असून प्राधिकरणाने 'फेअर एक्सपोर्ट्स इंडिया' सोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. त्यामुळे आखाती प्रदेशातील सर्वात मोठ्या किरकोळ व्यापार साखळींपैकी एक असलेल्या 'लुलू हायपर मार्केट'मध्ये 'गोटी पॉप सोडा' नावाने याचे वितरण होणार आहे.‌

https://youtu.be/WhioUg0tXcU

लंडन येथे १७ ते १९ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'आंतरराष्ट्रीय अन्न आणि पेय महोत्सवात' कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने 'गोटीसोडा' सादर केला होता. 

https://youtu.be/WhioUg0tXcU

'गोटी सोडा' फोडल्यानंतर येणारा आवाज आणि बुडबुडे हे याचे खास वेगळेपण आहे.‌ आंतरराष्ट्रीय पातळीवर 'गोटी सोडा' सादर करताना त्याचे हे वैशिष्ठ्य कायम ठेवण्यात आले आहे.‌ बहुराष्ट्रीय शीतपेय कंपन्यांच्या वर्चस्वामुळे बाजारपेठेतून 'गोटी सोडा' हद्दपार झाला होता. देशी शीतपेय उत्पादनाला प्रोत्साहन आणि त्याची निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. आणि त्या प्रयत्नांमधून 'गोटी सोडा' आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दाखल झाला आहे.‌ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 'गोटी सोडा' नव्या व आधुनिक वेष्टनासह सादर झाला आहे. 

शेखर जोशी 


https://youtu.be/WhioUg0tXcU

सोमवार, २४ मार्च, २०२५

वाल्मिकी रामायणातील 'लोकाभिराम' कथा सादरीकरण

प्रकाशक व निरुपणकार दिलीप महाजन सांगणार 

वाल्मिकी रामायणातील 'लोकाभिराम' कथा!  

चैत्र महिन्यातील राम नवरात्राच्या निमित्ताने प्रकाशक व निरुपणकार दिलीप महाजन कल्याण आणि डोंबिवलीत वाल्मिकी रामायणातील 'लोकाभिराम' कथा उलगडणार आहेत. 

येत्या ३१ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत पारनाका, कल्याण पश्चिम येथील त्रिविक्रम देवस्थान येथे संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत महाजन लोकाभिराम कथा सांगणार आहेत. श्री त्रिविक्रम देवस्थानने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. 

तर ३ ते ५ एप्रिल दरम्यान ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, महात्मा फुले रस्ता, डोंबिवली पश्चिम येथे संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत महाजन यांच्या लोकाभिराम कथा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कल्याण आणि डोंबिवलीतील कार्यक्रम सर्वांसाठी खुले आहेत.



राम नवरात्र पर्वकाळात ही रामसेवा श्रीरामांच्याच कृपेने घडते आहे, असे महाजन यांनी सांगितले.


हलाल प्रमाणित उत्पादने-महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी

हलाल प्रमाणित उत्पादनांवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याची सूचना समितीला केली आहे. समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. 

खाद्यपदार्थांच्या संदर्भातील कायद्यानुसार ‘भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI) या शासकीय संस्थेला खाद्यपदार्थांचे मानके ठरवण्याचा व प्रमाणपत्र देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. असे असतानही ‘हलाल प्रमाणपत्र’ ही समांतर प्रणाली उभी करण्यात आली आहे.‌ यातून मिळणारा पैसा पैसा लष्कर-ए-तोयबा, इंडियन मुजाहिदीन, इस्लामिक स्टेट आदी आतंकवादी संघटनांच्या सुमारे ७०० आरोपींना कायदेशीर साहाय्य करण्यासाठी वापरला जात असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

महाराष्ट्रासह देशभरात ‘हलाल इंडिया’, ‘हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस इंडिया’, ‘जमियत उलेमा-ए-हिंद’, ‘जमियत उलेमा-ए-महाराष्ट्र’ आदी अनेक संस्थांकडून बेकायदेशीपणे हलाल प्रमाणपत्रांचे वाटप करून कोट्यवधी रुपये गोळा करण्यात येत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात त्यावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही खाजगी संस्थांना प्रमाणपत्र वाटप करून पैसे गोळा करण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट केले आहे, अशी माहिती निवेदनात देण्यात आली आहे.‌ 


महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे हलाल प्रमाणपत्रे देणार्‍या खाजगी संस्थांवर तत्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, हिंदूंच्या संविधानिक अधिकारांवर आघात करणार्‍या हलाल प्रमाणिकरणावर त्वरित बंदी आणावी; हलालच्या नावाखाली खाजगी संस्थांनी जमा केलेल्या निधीची चौकशी करून कारवाई करावी; हलाल प्रमाणपत्रांतून जमा केलेली अवैध संपत्ती व्याजासह वसूल करावी; या पैशाचा उपयोग कुठे केला आणि त्यातून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला का, याबाबतही सखोल चौकशी करावी, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.



सुभाषचंद्र बोस, महर्षी कर्वे नामफलक पुन्हा एकदा झाकला जाणार

नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता, विष्णुनगर डोंबिवली पश्चिम पंजाब नॅशनल बँक चौक येथील नामफलक 

सुभाषचंद्र बोस, महर्षी कर्वे नामफलक 

पुन्हा एकदा झाकला जाणार

शेखर जोशी 

नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता, विष्णुनगर डोंबिवली पश्चिम पंजाब नॅशनल बँक चौक येथील नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता व महर्षी कर्वे रस्ता नामफलक पुन्हा एकदा झाकला जाणार आहे. दोन दिवसांपूर्वी येथे बांबूची कमान बांधण्यात आली असून बहुदा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणारा फलक तिथे लावण्यात येणार असावा. कमानी उभारण्यात आल्या असत्या तरी अद्याप फलक लावले गेले नसल्याने कोणत्या बड्या असामीचा चेहरे फलक या कमानीवर लावला जाणार आहे? हे गुलदस्त्यात आहे. 

नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता विष्णुनगर डोंबिवली पश्चिम पंजाब नॅशनल बँक चौक येथे उभारण्यात आलेली कमान 

कमान मोठी असल्याने ज्यांचा फलक लावण्यात येईल ती मंडळीही 'मोठी' असामी असण्याची शक्यता आहे. या मोठ्या असामी म्हणजे सत्ताधारी पक्षाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे असतील की शआमदार रवींद्र चव्हाण असतील याची उत्सुकता आहे. असामी कोणीही असोत पण या चेहरे/शुभेच्छा फलकबाजीमुळे आता पुन्हा एकदा सुभाषचंद्र बोस व महर्षी कर्वे नामफलक झाकला जाणार हे नक्की. 

डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागात रस्ते, चौक येथे अनेक ठिकाणी अशा कमानी उभारण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी या कमानी वाहतुकीसाठी अडथळा ठरतात. पण सर्वपक्षीय राजकारण्यांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही. गणपती, नवरात्र, दहीहंडीच्या निमित्ताने कमानी उभारण्याचा अक्षरशः उत आलेला असतो.‌ गणपतीसाठी उभारण्यात आलेल्या या कमानी पुढे नवरात्रापर्यंत कायम असतात. 

या कमानीमुळे आता पुन्हा एकदा नेताजी सुभाषचंद्र बोस व महर्षी कर्वे रस्ता नामफलक झाकला जाणार आहे 

राजकीय फलकबाजी, चेहरे फलक लावून तुमचे नामफलक झाकणा-या या सर्वपक्षीय कोडग्या राजकारण्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस, महर्षी धोंडो केशव कर्वे तुम्ही क्षमा करा.‌ आपले चेहरे फलक लावल्याशिवाय गुढीपाडवा साजराच होणार नाही, असे या महान मंडळींना वाटत असावे आणि त्यासाठीच ही कमान उभारली असावी. असो. 

शेखर जोशी 

२४ मार्च २०२५


रविवार, २३ मार्च, २०२५

अशोक मुळ्ये काकांचा 'माझा पुरस्कार'


ज्येष्ठ निवृत्त नाट्य व्यवस्थापक अशोक मुळ्ये

यांचा 'माझा पुरस्कार' सोहळा साजरा 

- संदेश कुलकर्ण, शुभांगी गोखले, अविनाश नारकर, 

राजन ताम्हाणे, ऋषिकेश शेलार यांना पुरस्कार प्रदान 

ज्येष्ठ निवृत्त नाट्य व्यवस्थापक व रंगकर्मी यांच्या संकल्पनेतून साकारलेला 'माझा पुरस्कार ' वितरण सोहळा शिवाजी नाट्य मंदिर येथे रसिकांच्या उपस्थितीत पार पडला. पुरस्कार सोहळ्याचे यंदा १९ वे वर्ष होते. माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या सोहळ्यात संदेश कुलकर्णी यांना 'असेन मी... नसेन मी...' या नाटकासाठी 'सर्वोत्कृष्ट नाटककार' तर याच नाटकासाठी 'सर्वोत्कृष्ट दुहेरी भूमिका' हा पुरस्कार शुभांगी गोखले यांना प्रदान करण्यात आला. 

 

'सर्वोत्कृष्ट पुनरुज्जीवित नाटका'चा बहुमान जयवंत दळवी लिखित 'पुरुष' नाटकाला मिळाला. या नाटकातील भूमिकेसाठी 

अभिनेते अविनाश नारकर यांना 'सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता' पुरस्काराने गौरविण्यात आले.‌ राजन ताम्हणे यांना 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शका'चा पुरस्कार मिळाला. 'उर्मिलायन' या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र यांना 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, याच नाटकातील अभिनेत्री निहारिका राजदत्त हिला 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' म्हणून तर अभिनेते हृषिकेश शेलार यांना 'शिकायला गेलो एक' या नाटकासाठी 'सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता' पुरस्कार देण्यात आला. अशोक मुळ्ये, सत्यरंजन धर्माधिकारी तसेच पुरस्कार विजेत्यांची मनोगत व्यक्त केले.

याच कार्यक्रमात गेली २५ वर्षे सुरू असलेल्या 'मटा सन्मान' पुरस्कारासाठी महाराष्ट्र टाइम्सचा गौरव करण्यात आला. मटाचे प्रतिनिधी कल्पेशराज कुबल यांनी हा सत्कार स्वीकारला. 

जयंत पिंगुलकर, केतकी भावे-जोशी, शिल्पा मालंडकर, नीलिमा गोखले आणि मंदार आपटे यांनी मराठी आणि हिंदी प्रेमगीते सादर केली. याचे संगीत संयोजन प्रशांत लळीत यांचे होते.