गुरुवार, १० एप्रिल, २०२५

रहस्यमय'छबी'पुढील महिन्यात प्रदर्शित होणार

रहस्यमय'छबी'पुढील महिन्यात प्रदर्शित होणार मुंबई, दि. १० एप्रिल कोकणात छायाचित्रण करणा-या एका छायाचित्रकाराला आलेल्या गूढ व रहस्यमय अनुभवाची गोष्ट 'छबी' या आगामी मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.चित्रपटाचा टीझर प्रकाशित झाला असून हा चित्रपट येत्या ९ मेपासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.केके फिल्म्स क्रिएशन,उप्स डिजिटल एंटरटेन्मेेंट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. छायाचित्र स्पर्धेसाठी एक तरूण छायाचित्रकार कोकणातील एका गावात छायाचित्रे काढतो.मात्र त्या छायाचित्रात कोणीच दिसत नाही. हे गूढ काय आहे? याचा शोध हा छायाचित्रकार घेतो. ध्रुव छेडा,सृष्टी बाहेकर,अनघा अतुल,रोहित लाड,ज्ञानेश दाभणे , अपूर्वा कवडे आणि समीर धर्माधिकारी,मकरंद देशपांडे,शुभांगी गोखले,राजन भिसे,जयवंत वाडकर हे कलाकार चित्रपटात आहेत. जया तलक्षी छेडा निर्मात्या असून चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अद्वैत मसूरकर यांचे आहे. टिझर लिंक https://youtu.be/93Euj4tUOuY?si=3VOv-cMi2eN-L9hF

'मुक्काम पोस्ट देवाचं घर'आता ॲमेझॉन प्राइमवर

'मुक्काम पोस्ट देवाचं घर'आता ॲमेझॉन प्राइमवर मुंबई,दि. १० एप्रिल देवाचं घर म्हणजे काय? ते नक्की कुठे असते? या एका लहान मुलीला पडलेल्या प्रश्नाचे 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटात सादर करण्यात आले आहे. या वर्षी ३१ जानेवारीला प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता ॲमेझॉन प्राइम ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. महेशकुमार जायसवाल, किर्ती जायसवाल हे चित्रपटाचे निर्माते असून वैशाली संजू राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत मानेंसह सुमित गिरी यांनी पटकथालेखन व संवादलेखन केले आहे. मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना चिनार-महेश यांनी संगीतबद्ध केले आहे.‌ बाल कलाकार मायरा वायकुळसह सविता मालपेकर,उषा नाडकर्णी,प्रथमेश परब,मंगेश देसाई,कल्याणी मुळे,रेशम श्रीवर्धन हे कलाकार चित्रपटात आहेत.

मंगळवार, ८ एप्रिल, २०२५

आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण

पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण मुंबई दि.८ महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. येत्या २१ ते २४ एप्रिल दरम्यान पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोधचिन्हाचे अनावरण झाले.महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, वित्तीय सल्लागार- मुख्य लेखा वित्त अधिकारी चित्रलेखा खातू रावराणे, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, तसेच महोत्सवाचे संचालक ज्येष्ठ निर्माते,दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे उपस्थित होते. मराठी सिनेमाची चित्रपताका घेऊन अटकेपार जाणारा मावळा या अर्थाने राज्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाचे नाव 'चित्रपताका' असे ठेवण्यात आले आहे. त्याचेच प्रतिकात्मक रूप बोधचिन्हात उमटले असून घोड्यावर बसलेला, हातात पताका आणि रिळ स्वरूपातील ढाल घेऊन पुढे चाललेला मराठी चित्रपटकर्मी मावळा या बोधचिन्हात दाखविण्यात आला आहे, असे ॲड. शेलार यांनी सांगितले. चार दिवसांच्या चित्रपट महोत्सवात एकूण ४१ दर्जेदार मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत. चित्रपटांची निवड करण्यासाठी डॉ.संतोष पाठारे, सुकन्या कुलकर्णी, समीर आठल्ये आणि पुरुषोत्तम बेर्डे या तज्ज्ञांची निवड समिती नेमण्यात आली होती. महोत्सवात चित्रपट क्षेत्रातील विविध विषयांवर पाच परिसंवाद, दोन मुलाखती आणि दोन कार्यशाळा होणार असल्याचेही ॲड. शेलार म्हणाले. महोत्सवासाठी विनामूल्य प्रवेश असून ऑनलाईन वा प्रत्यक्ष कला अकादमी येथे येऊन महोत्सवासाठी नावनोंदणी करणे गरजेचे आहे.

चर्चगेट येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण होणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या चर्चगेट स्थानकाजवळील पुतळ्याचे सुशोभीकरण >
महेश्वर येथील राजवाडा, इंदूर येथील वास्तूशिल्प,काशीविश्वनाथ मंदिराचा केलेला जीर्णोध्दार कलात्मक स्वरुपात साकारणार >
मुंबई, दि. ८ एप्रिल चर्चगेट स्टेशनजवळ असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.येत्या ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मत्रिशताब्दीनिमित्त हे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.‌
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.‌या बैठकीस बृहन्मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे,अन्य अधिकारी तसेच डॉ.असिम गोकर्ण हरवंश उपस्थित होते.
पुतळ्याची दुरुस्ती,पाठीमागील भिंतीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले कार्य,महेश्वर येथील राजवाडा, इंदूर येथील वास्तूशिल्प, काशीविश्वनाथ मंदिराचा केलेला जीर्णोध्दार, वृक्षसंवर्धन याबाबींचा देखावा प्रकाशयोजनेसह उभारण्यात येणार आहे.येत्या १५ मे पूर्वी हे काम पूर्ण करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले.‌

शुक्रवार, ४ एप्रिल, २०२५

वक्फ सुधारणा विधेयक अपूर्ण

वक्फ सुधारणा विधेयक अपूर्ण; हिंदू समाजावर झालेला अन्याय सरकारने दूर करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी मुंबई, दि. ४ एप्रिल केंद्र सरकारने सादर केलेल्या वक्फ संबंधीच्या विधेयकात वक्फ मंडळाला मिळालेले अमर्याद अधिकार काही प्रमाणात कमी करण्यात आले असले, तरी हिंदू समाजाच्या भूमीच्या रक्षणाची संपूर्ण हमी या विधेयकात आलेली नाही. हिंदूंच्या न्याय्य भूमींवरील अन्याय दूर करण्यासाठी सरकारने संयुक्त संसदीय समितीनेसमोर हिंदू पक्षाने मांडलेल्या सूत्रांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि हिंदू समाजाच्या हक्कांवर होणारा अन्याय दूर केला पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे सध्याचे वक्फ संबंधिचे विधेयक अपूर्ण असून हिंदू समाजाच्या हक्कांचे संपूर्ण संरक्षण करण्यास असमर्थ आहे. .विधेयकातील कलम ४०, १०४, १०७ आणि १०८ यांसारखी काही भयंकरे कलमे रद्द करण्यात आली आहेत, याचे हिंदु जनजागृती समिती पूर्ण समर्थन करते. कलम ३(c) नुसार केवळ सरकारी जमिनींची चौकशी केली जाणार असून पूर्वी जे वक्फ संपत्ती म्हणून घोषित झाल्या आहेत त्यांची माहिती मागवण्यात आली आहे; मात्र हिंदू समाजाच्या मंदिरांच्या जमिनी, ट्रस्टच्या जमिनी, इतर समुदायांच्या मालकीच्या जमिनी आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या अखत्यारीतील जमिनी जर वक्फ संपत्ती म्हणून घोषित झाल्या असतील, तर त्यावर पूर्वलक्षी प्रभाव राहणार नाही. त्यामुळे या जमिनी हिंदू समाजाला परत मिळतील याची कोणतीही हमी या विधेयकात दिली नसल्याचे समितीचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू समाजाच्या हक्कांचे संपूर्ण संरक्षण व्हावे यासाठी या विधेयकात आणखी सुधारणा करणे आवश्यक आहे. पूर्वी वक्फ संपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेल्या सर्व जमिनींची चौकशी व्हावी, हिंदू मंदिर, ट्रस्ट, इतर समाज आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या जमिनींवर झालेल्या अन्यायकारक वक्फ दाव्यांना तत्काळ रद्द करण्यात यावे आणि वक्फ मंडळाला मिळालेले विशेष अधिकार पूर्णपणे हटविण्यात यावे, असेही समितीने म्हटले आहे. हिंदू समाजाच्या हक्कांसाठी हा लढा सुरूच राहील. हिंदू समाजाने आपल्या भूमीच्या संरक्षणासाठी एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज असल्याचे हिंदू जनजागृती समितीचे म्हणणे आहे.

गुरुवार, ३ एप्रिल, २०२५

येत्या १ मे पासून ‘एक राज्य एक नोंदणी’

येत्या १ मे पासून ‘एक राज्य एक नोंदणी’- चंद्रशेखर बावनकुळे
- राज्यात कुठेही,कुठल्याही जिल्ह्यात घरांची नोंदणी करता येणार मुंबई, दि. ३ एप्रिल महाराष्ट्रात येत्या १ मे पासून ‘एक राज्य एक नोंदणी’ ही पद्धत सुरू करण्यात येणार आहे. यामुळे राज्यात कुठेही, कुठल्याही जिल्ह्यातील घरांची नोंदणी करता येणार असून ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिली. घर खरेदी-विक्री नोंदणीसाठी सरकारी कार्यालयात जावे लागते, अनेक हेलपाटे मारावे लागतात. नोंदणी करताना मध्ये दलालांचा अडथळा असतो. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शी व गतीमान सरकारच्या १०० दिवसांच कार्यक्रम दिला होता, त्याअंतर्गत महसूल खात्याच्या मुद्रांक निरिक्षकांनी व महानिरिक्षकांनी ‘एक राज्य एक नोंदणी’ अशी पद्धत आणली असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. आधार कार्ड आणि आयकर दस्तऐवजांच्या मदतीने ऑनलाईन फेसलेस नोंदणी करता येणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर मुंबई आणि उपनगरांत ही नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, आता येत्या १ मेपासून संपूर्ण राज्यभरात सुरू करण्यात येणार आहे.

बुधवार, २ एप्रिल, २०२५

गायत्री परिवार ट्रस्टतर्फे डोंबिवलीत गायत्री महायज्ञ

गायत्री परिवार ट्रस्टतर्फे डोंबिवलीत गायत्री महायज्ञ
गायत्री परिवार ट्रस्टच्या डोंबिवली शाखेतर्फे येत्या ४ ते ७ एप्रिल या कालावधीत डोंबिवली पश्चिम येथील भागशाळा मैदानात १०८ कुंडी गायत्री महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गायत्री परिवार अयोध्याचे अरविंदकुमार यांनी दिली.राष्ट्र जागरण आणि महिला सशक्तीकरण या उद्देशाने हा महायज्ञ होणार असल्याचेही ते म्हणाले.
शांतीकुंज, हरिद्वार येथील पं. श्रीराम शर्मा व भगवतीदेवी शर्मा यांच्या प्रेरणेतून गायत्री परिवार ट्रस्ट सुरू करण्यात आला आहे. याआधी डोंबिवलीत भागशाळा मैदानावरच ५१ कुंडी गायत्री यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. ४ एप्रिल या दिवशी दुपारी तीन वाजता शिवमंदिर, रामनगर, डोंबिवली पूर्व येथून कलशयात्रा निघणार असून पाच वाजता ही कलशयात्रा भागशाळा मैदानावर येणार आहे. त्यानंतर पुस्तक प्रदर्शन उदघाटन आणि रात्री आठपर्यंत गरबा, गोंधळ, जागरण कार्यक्रम होणार असल्याचे अरविंदकुमार यांनी सांगितले.
शनिवार ५ एप्रिल रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत देवपूजन, गायत्री महायज्ञ संस्कार व अन्य कार्यक्रम तर सहा वाजता प्रवचन होणार आहे. रविवार ६ एप्रिल या दिवशी गायत्री महायज्ञ संस्कार तर संध्याकाळी सहा वाजता ११ हजार १११ दीप महायज्ञ, कन्या पूजन होणार आहे. सोमवार, ७ एप्रिल या दिवशी सकाळी आठ वाजता गायत्री महायज्ञाची पूर्णाहुती होणार असल्याचे अरविंदकुमार म्हणाले.
या संपूर्ण कार्यक्रमात उपस्थितांनी भारतीय वेष परिधान केलेला असावा. दीप महायज्ञासाठी सहभागी होणाऱ्यांनी एका तबकात कमीत कमी पाच दिवे घेऊन यावे, असे आवाहनही त्यांनी केले. हे सर्व कार्यक्रम निःशुल्क असून ऐच्छिक देणगी स्विकारण्यात येणार आहे.
गायत्री परिवार डोंबिवलीच्या संध्या पाटील या कार्यक्रमाच्या प्रमुख संयोजक आहेत. संपर्क 9082364845 शेखर जोशी २ एप्रिल २०२५