शनिवार, १२ एप्रिल, २०२५

हिंदू जनजागृती समितीतर्फे सामूहिक गदापूजन

हिंदूंमधील शौर्य जागृती आणि सामर्थ्य वाढविण्यासाठी सामूहिक गदापूजन कार्यक्रम- डॉ. उदय धुरी - देशभरात ५०० ठिकाणी आयोजन ठाणे,दि.१२ एप्रिल हिंदू समाजात शौर्य जागृती आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांतर्फे हनुमान जन्मोत्साच्या निमित्ताने शनिवारी संपूर्ण देशात सामूहिक गदापूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते,असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी केले. मारुतीरायांची ‘गदा’केवळ युद्धातील अस्त्र नव्हे,तर ती धर्मरक्षणाचा संकल्प,अन्यायाविरुद्ध उभे राहणे आणि भगवंताच्या कार्यासाठी अहर्निश झटण्याचे प्रतिक आहे, असेही डॉ. धुरी यांनी सांगितले. देशभरात ५०० ठिकाणी तर ठाणे जिल्ह्यात ठाणे,डोंबिवली,भिवंडी, बदलापुर,अंबरनाथ इत्यादी ठिकाणी गदापूजन झाले. या सर्व कार्यक्रमात युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, असेही डॉ. धुरी म्हणाले. कार्यक्रमांची सुरुवात शंखनादाने झाली.सामूहिक प्रार्थना,‘गदापूजन, श्री हनुमानाची आरती,मारुति स्तोत्रपठण केल्यानंतर ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजपही करण्यात आला.‘रामराज्याच्या स्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. तसेच‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’घेण्यात आली.हिंदू जनजागृती समितीकडून देशभरात गेली तीन वर्षे सामूहिक ‘गदापूजन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांशीसंबंधित ठिकाणांना भेट देण्याचा उपक्रम

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांशीसंबंधित ठिकाणांना भेट देण्याचा उपक्रम
- राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयाचा उपक्रम >
मुंबई, दि. १२ एप्रिल
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त डॉ.आंबेडकर यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी भेट देण्याचा उपक्रम येत्या १४ व १५ एप्रिल या दिवशी आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाने याचे आयोजन केले आहे.‌ या उपक्रमासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
मुंबईत दादरमधील चैत्यभूमी, राजगृह, प्रिटींग प्रेस, परळ येथील बी.आय.टी चाळ, वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालय या स्थळांचा तर नाशिकमधील येवले मुक्तीभूमी, त्रिरश्मी लेणी आणि काळाराम मंदिर या स्थळांचा समावेश आहे. नागपूर येथील दिक्षाभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, कामठी येथील ड्रॅगन पॅलेस आणि नागलोक विहार ही ठिकाणेही पाहता येणार असल्याचे देसाई म्हणाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरयांचे विचार,सामाजिक योगदान आणि भारतीय राज्य घटनानिर्मितीतील त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असे पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी सांगितले. उपरोक्त शहरात वरील दोन्ही दिवशी बसगाडीद्वारे या ठिकाणांना भेट देता येणार आहे. अधिक माहिती व सहलीत सहभागी होण्यासाठी ९९६९९७६९६६- मुंबई, ९६०७५२७७६३/९६५७०२१४५६-नाशिक ९७६४४८१९१३/ ७२१८७८३५१५- नागपूर या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

'अमृत भारत स्थानक' योजनेत बेलापूर डोंबिवली, टिटवाळा, शहाडचा समावेश

'अमृत भारत स्थानक' योजनेत बेलापूर डोंबिवली, टिटवाळा, शहाडचा समावेश मुंबई, दि. १२ एप्रिल भारतीय रेल्वेच्या 'अमृत भारत स्थानक' योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला असून यात ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, टिटवाळा, शहाड, दिवा आणि बेलापूर या स्थानकांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ही माहिती दिली.

शुक्रवार, ११ एप्रिल, २०२५

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आता दर महिन्याच्या ७ तारखेला होणार

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आता दर महिन्याच्या ७ तारखेला होणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई, ११ एप्रिल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचा पगार आता प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला होईल, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी मुंबईत केली. सरनाईक यांनी शुक्रवारी वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांची भेट घेतली. या बैठकीत महामंडळ व कर्मचारी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर झाली चर्चा झाली. पुढील महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी लागणारा निधी एक महिना आधीच राज्य सरकार एसटी महामंडळाला हस्तांतरित करणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. १ हजार ७६ कोटी रुपयांची मागणी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केली होती, त्यापैकी १२० कोटी रुपये आता देण्यात येणार असून उर्वरित रक्कम तीन टप्प्यात राज्य शासनाकडून महामंडळाला देण्यात येणार असल्याचे सरनाईक म्हणाले.

शाश्वत विकासासाठी सात्त्विकता आणि धर्माचरण आवश्यक

शाश्वत विकासासाठी सात्त्विकता आणि धर्माचरण आवश्यक
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय,‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या संशोधनातील निष्कर्ष
नवी दिल्ली, दि. ११ एप्रिल प्राचीन भारतीय धर्मशास्त्रांतील ‘सात्त्विकता’, धर्माचरण, भारतीय गायीचे महत्त्व आणि नामजप हेच खर्‍या अर्थाने शाश्वत विकासाचे मुख्य घटक आहेत.असा निष्कर्ष महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय आणि ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने मांडण्यात आला आहे.
नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘ग्रामीण आर्थिक परिषदे’त(‘रूरल इकॉनॉमिक फोरम’मध्ये) हा निष्कर्ष मांडण्यात आला. शॉन क्लार्क यांनी हे सादरीकरण केले.‌
केवळ पर्यावरणपूरक तंत्रज्ञान नव्हे,तर अध्यात्मिक शुद्धतेवर आधारित विचारसरणीशिवाय मानवी जीवन आणि पृथ्वीचे भविष्य सुरक्षित राहणार नाही, असेही सादरीकरणात सांगण्यात आले.‌महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने आतापर्यंत ११८ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले असून त्यापैकी १४ परिषदांमध्ये ‘सर्वोत्तम सादरीकरण’ पुरस्कार मिळविले आहेत.
औद्योगिक क्रांतीपासून आजवर विकासाच्या मार्गात पर्यावरणाचा विचार फारसा झाला नाही. ‘शाश्वत विकास’ ही संकल्पना वर्ष १९७२ मध्ये स्टॉकहोम परिषदेत मांडली गेली खरी; पण ५० वर्षांनंतरही त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झालेली नाही. आजच्या पर्यावरणीय संकटांची कारणे मानवी मनोवृत्तीत असलेल्या असात्त्विकतेत आहेत. म्हणूनच ‘विकास’ ही केवळ भौतिक संकल्पना न राहता ती आध्यात्मिकदृष्ट्याही सात्त्विक असली पाहिजे, असा या संशोधनाचा निष्कर्ष आहे.
आंघोळीच्या पाण्यात गोमूत्राचे काही थेंब घातल्यावर व्यक्तीच्या देहातील सप्तचक्रे ६५ ते ७८ टक्के संतुलितरित्या कार्यरत होतात, तर गोमूत्राचे काही थेंब प्राशन केल्यावर ती ९० टक्के संतुलितरित्या कार्यरत होतात. गायीच्या उपस्थितीमुळे परिसरातील सकारात्मक स्पंदने २२ टक्क्यांनी वाढतात. गोमूत्राच्या वापरातून त्वचारोगावर आणि आरोग्यावर सकारात्मक होतात, असे ‘जीडीव्ही बायोवेल’ या तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या एका प्रयोगात दिसून आले आहे. अनेक विकार आणि व्यसनाधीनता यांचा उगम अध्यात्मिक कारणांमुळे असतो हे संशोधनातून अधोरेखित झाले. ‘श्री गुरुदेव दत्त’ या नामजपामुळे व्यसनमुक्ती, मानसिक स्थैर्य आणि प्रारब्धजन्य विकारांवर नियंत्रण ठेवणे शक्य होते.३ महिने नियमितपणे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्यामुळे २० वर्ष जुना एक्झिमा (त्वचा रोग) फक्त नामजपाने बरा झाल्याचे उदाहरण या वेळी देण्यात आले. अध्यात्मशास्त्रानुसार सध्या जगात पर्यावरणातील पालट आणि त्याचे भयंकर दुष्परिणाम टाळण्यासाठी केले जाणारे उपाय हे वरवरचे आहेत. जगात असात्त्विकता वाढल्याने त्याचा विपरित परिणाम संपूर्ण विश्वाच्या हवामानाचे संचलन करणार्‍या पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांवर होतो. वातावरणातील सात्त्विकता वाढवण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे साधना, असल्याचे मतही या वेळी मांडण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गुरुवार, १० एप्रिल, २०२५

कालबद्ध आणि ठोस 'अभिनव'कृती आराखड्याची गरज

कालबद्ध आणि ठोस 'अभिनव'कृती आराखड्याची गरज प्रती अभिनव गोएल कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त नमस्कार कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त म्हणून भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी अभिनव गोएल यांनी सुत्रे स्विकारली आहेत. गोएल यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. सर्वपक्षीय राजकारण्यांनी एकत्र येऊन कल्याण आणि डोंबिवलीची अक्षरशः वाट लावली आहे. यात आमुलाग्र सुधारणा करायची असेल तर कठोर राहून आणि कोणाचाही मुलाहिजा न बाळगता या शहरांच्या विकासासाठी 'अभिनव' कृती आराखडा कालबद्ध कार्यक्रम राबवून अंमलात आणावा लागेल आणि हेच तुमच्या समोरचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर टी. चंद्रशेखर यांच्यासारखे अधिकारी आयुक्त म्हणून महापालिकेला लाभले. पण निवडून आलेल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी काही महिन्यांतच त्यांची बदली केली. कदाचित चंद्रशेखर किमान तीन वर्षे तरी कडोंमपात आयुक्त म्हणून राहिले असते तर त्यांनी ठाणे शहराचा चेहरामोहरा जसा बदलला तसा तो कल्याण व डोंबिवली या शहरांचा बदलला गेला असता. यु.पी. एस. मदान यांच्यासारख्या कठोर अधिका-यानेही इथे आयुक्त म्हणून काम केले आणि आपल्या कामाचा ठसा उमटवला.‌ डोंबिवलीत आज जे सावळाराम महाराज क्रीडा संकुल दिसते आहे त्याचे सर्व श्रेय मदान यांचे आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात या जागेला बंदिस्त कुंपण घालून ही जागा अतिक्रमण किंवा बेकायदा झोपडपट्टी उभी राहण्यापासून वाचविली होती. महापालिका क्षेत्रात जितक्या म्हणून आरक्षित जागा आहेत त्या जागेवर बंदिस्त कुंपण/ भिंत बांधून त्या जागी अतिक्रमण, बेकायदा इमारती, झोपडपट्टी, टप-या उभ्या राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
कल्याण डोंबिवली महापालिकेत पहिल्यापासून एकसंध असलेली शिवसेना व भाजप यांनी दीर्घकाळ सत्ता उपभोगली. नंतर काही वर्षे दोन्ही कॉग्रेस सत्तेवर होती. २००९ मध्ये झालेल्या कडोंमपा निवडणुकीत शिवसेना व भाजपला कंटाळलेल्या मतदारांनी मनसेचे २०हून अधिक नगरसेवक निवडून दिले. भाजपचे बालेकिल्ले समजल्या जाणाऱ्या प्रभागातही भाजपच्या उमेदवार पराभूत झाले होते. पण नागरिक/ मतदार ज्या अपेक्षेने मनसेकडे पाहात होते त्या अपेक्षा मनसेने पूर्ण केल्या नाहीत आणि नंतरच्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत मनसेला चांगलाच फटका बसला. पुन्हा भाजप- शिवसेना सत्तेवर आली. असो. 'रेरा'ची बनावट कागदपत्रे तयार करून महापालिका क्षेत्रात ज्या ६५ बेकायदा इमारती उभ्या राहिल्या त्या पाडण्याचे खरे आव्हान आपल्यासमोर आहे. मावळत्या आयुक्त इंदुराणी जाखड यांनी या प्रकरणी कठोर पावले उचलत कारवाईला सुरुवात केली होती. महापालिका प्रशासनातील अधिकारी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पोलीस, अन्य शासकीय यंत्रणा आणि बांधकाम व्यावसायिक यांच्या अभद्र युतीमुळेच या इमारती व अनधिकृत बांधकामे उभी राहिली, हे वास्तव आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार या इमारती पाडण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनावर आहे. अनधिकृत फेरीवाले यांचेही मोठे आव्हान आपल्याला पेलायचे आहे. रेल्वे स्थानक परिसरला पडलेला फेरिवाल्यांचा विळखा आजवर कोणत्याही महापालिका आयुक्तांना सोडवता आलेला नाही. नवीन महापालिका आयुक्त पदाची सूत्रे स्विकारल्यानंतर अचानक कल्याण किंवा डोंबिवलीतील रेल्वे स्थानक परिसराला भेट देण्याचा उपचार पार पाडतात. तुम्हालाही तो पार पाडावा लागेल. पण तो उपचार राहू नये आणि फेरिवाल्यांचा कायमचा बंदोबस्त करावा ही अपेक्षा. फेरिवाले हटविण्याची व रेल्वे स्थानक परिसरात बसणार नाहीत याची जबाबदारी ज्यांच्यावर दिली असेल त्यांनी ती प्रामाणिकपणे पार पाडली नाही, तर त्यांच्यावर जरब बसेल अशी कठोरात कठोर कारवाई करावी. ते अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन रोखावे, दरमहा वेतनातून काही रक्कम कापावी, पदोपदी रोखावी. या उपायांनी तरी ही मंडळी चांगले काम करतात का? हे पाहता येईल.‌
फेरीवाल्यांप्रमाणेच काही मुठभर, बेशिस्त आणि मुजोर रिक्षाचालकांचा रेल्वे स्थानकाला पडलेला विळखा सोडविण्यासाठीही आपण पुढाकार घ्यावा. रिक्षा चालक मालक संघटना, त्यांचे पदाधिकारी, वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांची तातडीने बैठक घ्यावी आणि रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा उभ्या राहणार नाहीत, इकडेही लक्ष द्यावे. डोंबिवली आणि कल्याण शहरात रिक्षांसाठीची शेअर भाडे पद्धत कायम ठेवून मीटरसक्तीसाठीही संबंधितांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा. रेल्वे स्थानक परिसरातच दहा/ वीस पावलांवर वेगवेगळ्या रिक्षा चालक मालक संघटनांना देण्यात आलेले रिक्षा थांबे तत्काळ हटवावेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सेवा अधिकाधिक सक्षम कशी होईल ते पाहावे. रेल्वे स्थानकापासून दूरवर उभ्या राहिलेल्या निवासी संकुलासाठी कडोंमपाची परिवहन सेवा तातडीने सुरू करावी.
या खेरीज डोंबिवलीतील ठाकुर्ली उड्डाणपुलाचा कल्याण दिशेकडे जाणारा जो मार्ग आहे, तो तातडीने सुरू होण्यासाठी पावले उचलावीत, शहरातील रस्ते व चौकांचे नामफलक झाकून त्यावर चेहरे फलक लावणा-या सर्वपक्षीय राजकारण्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारावा. शहर विद्रूप करणा-या या निर्लज्ज लोकांकडून कोणताही मुलाहिजा न बाळगता दंड वसूल करावा, गुन्हे दाखल करावेत. अनधिकृतपणे पाणी जोडणी घेणा-यांच्या विरोधात धडक मोहीम सुरू करून पाणी चोरीला आळा घालावा, पदभार स्वीकारल्यानंतर आपण तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करू असे सांगितले होते. महिन्यातून किमान एकदातरी समाज माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधावा, कडोंमपाच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात आठवड्यातून एकदा नागरिकांना भेटावे, महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी वेळेपूर्वी कार्यालयात व आपल्या जागेवर हजर असतील, असे पाहावे. महत्त्वाचे रस्ते, चौक येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी रस्ते, चौक अडवले जात आहेत. कोणतीही व कितीही मोठी संस्था वा राजकीय पक्ष असो आता यापुढे रस्ता/ चौक अडवून, वाहतूक अन्यत्र वळवून ते आयोजित करत असलेल्या कार्यक्रमांना सरसकट बंदी घालण्याचा कठोर व धाडसी निर्णय आपण घ्यावा, अशी आग्रही मागणी आहे. तसेच आगामी दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव हे रस्ता व चौक अडवून, मंडप उभारून साजरे होणार नाहीत हे ही पाहावे. गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. कडोंमपा क्षेत्रात याचीही काटेकोर अंमलबजावणी करावी.
आपण कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त म्हणून किती दिवस, महिने, वर्षे इथे राहाल याची आम्हाला कल्पना नाही. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्याही राज्य पातळीवरील नेत्यांच्या मनात आहे तोपर्यंत तुम्ही इथे असाल, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. तुम्ही कल्याण डोंबिवली महापालिकेत जितका काळ राहाल त्या काळात धडाकेबाज कामगिरी करून दाखवा, कठोर निर्णय घ्या. सहकारी अधिकारी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांचे ऐकून घ्या पण प्रत्यक्षात कृती मात्र तुमच्या मनाला पटेल व योग्य असेल तीच करा. नाव चांगल्या प्रकारे कमवा. असो. अजूनही खूप काही बोलायचे आहे पण तुर्तास इथेच थांबतो. आपल्या पुढच्या कार्यकाळासाठी खूप खूप शुभेच्छा. कळावे, आपला शेखर जोशी १० एप्रिल २०२५

रहस्यमय'छबी'पुढील महिन्यात प्रदर्शित होणार

रहस्यमय'छबी'पुढील महिन्यात प्रदर्शित होणार मुंबई, दि. १० एप्रिल कोकणात छायाचित्रण करणा-या एका छायाचित्रकाराला आलेल्या गूढ व रहस्यमय अनुभवाची गोष्ट 'छबी' या आगामी मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.चित्रपटाचा टीझर प्रकाशित झाला असून हा चित्रपट येत्या ९ मेपासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.केके फिल्म्स क्रिएशन,उप्स डिजिटल एंटरटेन्मेेंट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. छायाचित्र स्पर्धेसाठी एक तरूण छायाचित्रकार कोकणातील एका गावात छायाचित्रे काढतो.मात्र त्या छायाचित्रात कोणीच दिसत नाही. हे गूढ काय आहे? याचा शोध हा छायाचित्रकार घेतो. ध्रुव छेडा,सृष्टी बाहेकर,अनघा अतुल,रोहित लाड,ज्ञानेश दाभणे , अपूर्वा कवडे आणि समीर धर्माधिकारी,मकरंद देशपांडे,शुभांगी गोखले,राजन भिसे,जयवंत वाडकर हे कलाकार चित्रपटात आहेत. जया तलक्षी छेडा निर्मात्या असून चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अद्वैत मसूरकर यांचे आहे. टिझर लिंक https://youtu.be/93Euj4tUOuY?si=3VOv-cMi2eN-L9hF
नवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ