रविवार, १३ एप्रिल, २०२५

'हरियाली' डोंबिवलीची रोपवाटिका

हरियाली या स्वयंसेवी संस्थेच्या डोंबिवली शाखेने द साऊथ इंडियन असोसिएशन संचालित महाविद्यालयाच्या प्रांगणात रोपवाटीका तयार केली आहे. डोंबिवली जिमखाना रस्ता,बालाजी मंदिराजवळ,डोंबिवली पूर्व येथे ही रोपवाटिका असून पर्यावरण जतन व संवर्धन हा उद्देश यामागे आहे. सतीश जोशी, बाळकृष्ण कुडे हे ज्येष्ठ नागरिक व त्यांचे सहकारी दर गुरूवार व रविवार या दोन दिवशी सकाळी ९ ते ११ या वेळेत इथे असतात. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक यांनी या कामात किमान काही वेळ मानद सेवा द्यावी, असे आवाहन जोशी व कुडे यांनी केले आहे. सतीश जोशी - 98335 45767 बाळकृष्ण कुडे- 93220 07586 यावर केलेल्या व्हिडिओची लिंक शेजो उवाच 'हरियाली' डोंबिवलीची रोपवाटिका https://youtu.be/Q5_vuCi8k5M?si=KlFcHENVLx_qAtc6

शनिवार, १२ एप्रिल, २०२५

'चित्रपताका' महोत्सवाची नावनोंदणी प्रक्रिया सुरू

'चित्रपताका'महोत्सवाच्या नावनोंदणी प्रक्रिाेला सुरूवात मुंबई, दि. १२ एप्रिल महाराष्ट्र शासनाच्या 'चित्रपताका' या पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाच्या नाव नोंदणीला सुरुवात झाली आहे. चित्रपट रसिकांना https://evnts.info/chitrapatakafest2025 या लिंकवर ऑनलाइन नावनोंदणी करता येणार आहे.तसेच प्रभादेवी, दादर येथील पु .ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात ऑफलाइन पद्धतीनेही नावनोंदणी करता येणार असून महोत्सवात विनामूल्य प्रवेश आहे. महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ व पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २१ ते २४ एप्रिल दरम्यान पु.ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी,दादर येथे हा महोत्सव होणार आहे. महोत्सवामध्ये प्रेक्षकांना नाटकांसह विविध विषयांवरील ४१ आशयघन चित्रपट विनामूल्य पाहता येणार आहेत.परिसंवाद, मुलाखत, कार्यशाळाही यावेळी होणार आहेत.

हिंदू जनजागृती समितीतर्फे सामूहिक गदापूजन

हिंदूंमधील शौर्य जागृती आणि सामर्थ्य वाढविण्यासाठी सामूहिक गदापूजन कार्यक्रम- डॉ. उदय धुरी - देशभरात ५०० ठिकाणी आयोजन ठाणे,दि.१२ एप्रिल हिंदू समाजात शौर्य जागृती आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांतर्फे हनुमान जन्मोत्साच्या निमित्ताने शनिवारी संपूर्ण देशात सामूहिक गदापूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते,असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी केले. मारुतीरायांची ‘गदा’केवळ युद्धातील अस्त्र नव्हे,तर ती धर्मरक्षणाचा संकल्प,अन्यायाविरुद्ध उभे राहणे आणि भगवंताच्या कार्यासाठी अहर्निश झटण्याचे प्रतिक आहे, असेही डॉ. धुरी यांनी सांगितले. देशभरात ५०० ठिकाणी तर ठाणे जिल्ह्यात ठाणे,डोंबिवली,भिवंडी, बदलापुर,अंबरनाथ इत्यादी ठिकाणी गदापूजन झाले. या सर्व कार्यक्रमात युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, असेही डॉ. धुरी म्हणाले. कार्यक्रमांची सुरुवात शंखनादाने झाली.सामूहिक प्रार्थना,‘गदापूजन, श्री हनुमानाची आरती,मारुति स्तोत्रपठण केल्यानंतर ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजपही करण्यात आला.‘रामराज्याच्या स्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. तसेच‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’घेण्यात आली.हिंदू जनजागृती समितीकडून देशभरात गेली तीन वर्षे सामूहिक ‘गदापूजन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांशीसंबंधित ठिकाणांना भेट देण्याचा उपक्रम

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांशीसंबंधित ठिकाणांना भेट देण्याचा उपक्रम
- राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयाचा उपक्रम >
मुंबई, दि. १२ एप्रिल
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त डॉ.आंबेडकर यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी भेट देण्याचा उपक्रम येत्या १४ व १५ एप्रिल या दिवशी आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाने याचे आयोजन केले आहे.‌ या उपक्रमासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
मुंबईत दादरमधील चैत्यभूमी, राजगृह, प्रिटींग प्रेस, परळ येथील बी.आय.टी चाळ, वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालय या स्थळांचा तर नाशिकमधील येवले मुक्तीभूमी, त्रिरश्मी लेणी आणि काळाराम मंदिर या स्थळांचा समावेश आहे. नागपूर येथील दिक्षाभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, कामठी येथील ड्रॅगन पॅलेस आणि नागलोक विहार ही ठिकाणेही पाहता येणार असल्याचे देसाई म्हणाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरयांचे विचार,सामाजिक योगदान आणि भारतीय राज्य घटनानिर्मितीतील त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असे पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी सांगितले. उपरोक्त शहरात वरील दोन्ही दिवशी बसगाडीद्वारे या ठिकाणांना भेट देता येणार आहे. अधिक माहिती व सहलीत सहभागी होण्यासाठी ९९६९९७६९६६- मुंबई, ९६०७५२७७६३/९६५७०२१४५६-नाशिक ९७६४४८१९१३/ ७२१८७८३५१५- नागपूर या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

'अमृत भारत स्थानक' योजनेत बेलापूर डोंबिवली, टिटवाळा, शहाडचा समावेश

'अमृत भारत स्थानक' योजनेत बेलापूर डोंबिवली, टिटवाळा, शहाडचा समावेश मुंबई, दि. १२ एप्रिल भारतीय रेल्वेच्या 'अमृत भारत स्थानक' योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला असून यात ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, टिटवाळा, शहाड, दिवा आणि बेलापूर या स्थानकांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ही माहिती दिली.

शुक्रवार, ११ एप्रिल, २०२५

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आता दर महिन्याच्या ७ तारखेला होणार

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आता दर महिन्याच्या ७ तारखेला होणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई, ११ एप्रिल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचा पगार आता प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला होईल, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी मुंबईत केली. सरनाईक यांनी शुक्रवारी वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांची भेट घेतली. या बैठकीत महामंडळ व कर्मचारी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर झाली चर्चा झाली. पुढील महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी लागणारा निधी एक महिना आधीच राज्य सरकार एसटी महामंडळाला हस्तांतरित करणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. १ हजार ७६ कोटी रुपयांची मागणी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केली होती, त्यापैकी १२० कोटी रुपये आता देण्यात येणार असून उर्वरित रक्कम तीन टप्प्यात राज्य शासनाकडून महामंडळाला देण्यात येणार असल्याचे सरनाईक म्हणाले.

शाश्वत विकासासाठी सात्त्विकता आणि धर्माचरण आवश्यक

शाश्वत विकासासाठी सात्त्विकता आणि धर्माचरण आवश्यक
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय,‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या संशोधनातील निष्कर्ष
नवी दिल्ली, दि. ११ एप्रिल प्राचीन भारतीय धर्मशास्त्रांतील ‘सात्त्विकता’, धर्माचरण, भारतीय गायीचे महत्त्व आणि नामजप हेच खर्‍या अर्थाने शाश्वत विकासाचे मुख्य घटक आहेत.असा निष्कर्ष महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय आणि ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने मांडण्यात आला आहे.
नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘ग्रामीण आर्थिक परिषदे’त(‘रूरल इकॉनॉमिक फोरम’मध्ये) हा निष्कर्ष मांडण्यात आला. शॉन क्लार्क यांनी हे सादरीकरण केले.‌
केवळ पर्यावरणपूरक तंत्रज्ञान नव्हे,तर अध्यात्मिक शुद्धतेवर आधारित विचारसरणीशिवाय मानवी जीवन आणि पृथ्वीचे भविष्य सुरक्षित राहणार नाही, असेही सादरीकरणात सांगण्यात आले.‌महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने आतापर्यंत ११८ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले असून त्यापैकी १४ परिषदांमध्ये ‘सर्वोत्तम सादरीकरण’ पुरस्कार मिळविले आहेत.
औद्योगिक क्रांतीपासून आजवर विकासाच्या मार्गात पर्यावरणाचा विचार फारसा झाला नाही. ‘शाश्वत विकास’ ही संकल्पना वर्ष १९७२ मध्ये स्टॉकहोम परिषदेत मांडली गेली खरी; पण ५० वर्षांनंतरही त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झालेली नाही. आजच्या पर्यावरणीय संकटांची कारणे मानवी मनोवृत्तीत असलेल्या असात्त्विकतेत आहेत. म्हणूनच ‘विकास’ ही केवळ भौतिक संकल्पना न राहता ती आध्यात्मिकदृष्ट्याही सात्त्विक असली पाहिजे, असा या संशोधनाचा निष्कर्ष आहे.
आंघोळीच्या पाण्यात गोमूत्राचे काही थेंब घातल्यावर व्यक्तीच्या देहातील सप्तचक्रे ६५ ते ७८ टक्के संतुलितरित्या कार्यरत होतात, तर गोमूत्राचे काही थेंब प्राशन केल्यावर ती ९० टक्के संतुलितरित्या कार्यरत होतात. गायीच्या उपस्थितीमुळे परिसरातील सकारात्मक स्पंदने २२ टक्क्यांनी वाढतात. गोमूत्राच्या वापरातून त्वचारोगावर आणि आरोग्यावर सकारात्मक होतात, असे ‘जीडीव्ही बायोवेल’ या तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या एका प्रयोगात दिसून आले आहे. अनेक विकार आणि व्यसनाधीनता यांचा उगम अध्यात्मिक कारणांमुळे असतो हे संशोधनातून अधोरेखित झाले. ‘श्री गुरुदेव दत्त’ या नामजपामुळे व्यसनमुक्ती, मानसिक स्थैर्य आणि प्रारब्धजन्य विकारांवर नियंत्रण ठेवणे शक्य होते.३ महिने नियमितपणे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्यामुळे २० वर्ष जुना एक्झिमा (त्वचा रोग) फक्त नामजपाने बरा झाल्याचे उदाहरण या वेळी देण्यात आले. अध्यात्मशास्त्रानुसार सध्या जगात पर्यावरणातील पालट आणि त्याचे भयंकर दुष्परिणाम टाळण्यासाठी केले जाणारे उपाय हे वरवरचे आहेत. जगात असात्त्विकता वाढल्याने त्याचा विपरित परिणाम संपूर्ण विश्वाच्या हवामानाचे संचलन करणार्‍या पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांवर होतो. वातावरणातील सात्त्विकता वाढवण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे साधना, असल्याचे मतही या वेळी मांडण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
नवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ