सोमवार, ५ मे, २०२५

'मुक्काम पोस्ट देवाच घर' पाच भारतीय भाषांमध्ये डब

पाच भारतीय भाषांमध्ये डब केलेला पहिला मराठी चित्रपट 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' मुंबई, दि‌ ५ मे हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये 'मुक्काम पोस्ट देवाचं घर'हा मराठी चित्रपट डब करण्यात आला असून पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झालेला हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट पाहता येणार आहे.‌ कीमाया प्रॉडक्शन्सची निर्मित असलेल्या या चित्रपटाचे निर्माते आणि निर्माते महेश कुमार जायस्वाल,कीर्ती जायस्वाल आहेत. चित्रपटाची कथा कोणत्याही एका विशिष्ठ भाषेतील लोकांची नसून आपल्या सर्वांच्या सभोवताली घडणारी आहे.ही कथा देशभरातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पाच भारतीय भाषांमध्ये चित्रपट डब करण्यात आल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले.

शनिवार, ३ मे, २०२५

मग उंचच उंच मूर्ती नका बनवू, काही बिघडणार नाही...

मग उंचच उंच मूर्ती नका बनवू, काही बिघडणार नाही... मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमातून झालेले मार्केटिंग, सर्वपक्षीय राजकारण्यांचा कब्जा, मनी आणि मसल पॉवरचे प्रदर्शन यातून उंचच उंच मूर्तींची स्पर्धा सुरू झाली आहे. एकसंघ शिवसेना असताना तत्कालीन महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी २०/२५ वर्षांपूर्वीच मुंबईत मूर्तीच्या उंचीवर मर्यादा आणण्याची मागणी केली होती. पाठपुरावा केला होता. मात्र उद्धव ठाकरे व शिवसेना नेते डॉ. राऊळ यांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. मूर्तीकारांपुढे त्यांनी नांगी टाकली. शाडू मातीच्या सहाय्याने जितकी उंच मूर्ती बनविणे शक्य असेल तेवढी तयार करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनीही मूर्तीकारांपुढे नांगी टाकू नये. 'पीओपी' बंदीवर कायम राहावे. पीओपी बंदी हा मुद्दा एका रात्रीत समोर आलेला नाही. गेल्या दोन/चार वर्षांपासून तो चर्चेत आहे. प्रत्येक वेळी पीओपी मूर्तीकारांच्या दबावाला बळी पडून यंदा नको, पुढच्या वर्षी अंमलबजावणी करू, असे करून आपल्याला हवे ते पीओपी मूर्तीकार करून घेत होते. पीओपीवर बंदीच, अशी ठोस भूमिका बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने घेतली त्यासाठी अभिनंदन. यावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत पीओपी समर्थक मूर्तीकारांनी हाणामारी केली. चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या गणपतीच्या उंचच उंच मूर्ती बनविण्यावरून चाललेले हे दबावाने राजकारण दुर्दैवी आहे. महापालिका प्रशासन, राज्य शासनातर्फे वेळोवेळी पीओपी मूर्तींवर बंदी आहे हे कानीकपाळी ओरडून सांगितले जात असतानाही मूर्तीकार पीओपीच्या मूर्ती तयार करत असतील तर चूक त्यांची आहे.
रस्ते अडवून, मंडप उभारून, वाहतुकीला व पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करणे, आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत कानाचे पडदे फाटतील, छातीत धडकी भरेल अशा आवाजातील डीजे, अश्लील गाण्यांवर हिडीस नाच असे ओंगळ स्वरूप सार्वजनिक गणेशोत्सवाला आले आहे. कोणाही सुजाण, सुशिक्षित व सारासार विचार करण्या-या माणसांना गणेशोत्सवाचे हे ओंगळ, हिडीस आणि व्यापारी स्वरूप नको आहे. फक्त सार्वजनिक गणेशोत्सवच नव्हे तर नवरात्रोत्सव, दहिहंडी उत्सव यांनाही काही सन्माननीय अपवाद वगळता ओंगळ, हिडीस स्वरूप आले आहे. करोना काळातील निर्बंधांमुळे तेव्हा हे सण कधी आले व गेले ते कळलेच नाही. अत्यंत शांततेत उत्सव पार पडले. आणि ते खूप छान वाटले होते. पण तो अपवाद ठरला होता. शेखर जोशी ३ मे २०२५

गुरुवार, १ मे, २०२५

कार्टूनिस्ट्स कंबाईनतर्फे मुंबईत व्यंगचित्र संमेलनाचे आयोजन

कार्टूनिस्ट्स कंबाईनतर्फे मुंबईत व्यंगचित्र संमेलनाचे आयोजन मुंबई, दि. १ मे जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त कार्टूनिस्ट्स कंबाईनतर्फे येत्या ५ आणि ६ मे रोजी मुंबईत व्यंगचित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी १९८३ मध्ये कार्टूनिस्ट्स कंबाईन संस्थेची स्थापना केली होती. मराठी व्यंगचित्रकारांची ही अखिल भारतीय संघटना आहे. यंदाचे व्यंगचित्र संमेलन ओला वाकोला हॉल, सांताक्रूझ (पूर्व) येथे होणार असून शिवसेना नेते सुभाष देसाई हे विशेष अतिथी म्हणून संमेलनास उपस्थित राहणार आहेत. व्यंगचित्र प्रदर्शन,व्यंगचित्र स्पर्धा,व्यंगचित्रकारांची प्रात्यक्षिकासह व्याख्याने,परिसंवाद या संमेलनात होणार आहेत. रसिक प्रेक्षकांना आपले स्वतःचे व्यंगचित्रही संमेलनात काढून घेता येणार आहे. या संमेलनात शंभर वर्षापूर्वीचीही दुर्मिळ व्यंगचित्रेही पाहता येणार आहेत. सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत व्यंगचित्र प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.कार्टूनिस्ट्स कंबाईनचे अध्यक्ष संजय मिस्त्री, शिवसेना आमदार संजय पोतनीस,ओला वाकोलाचे संदेश चव्हाण यांनी या संमेलनाचे आयोजन केले आहे.‌

मंगळवार, २९ एप्रिल, २०२५

जगद्गुरु आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त डोंबिवलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

जगद्गुरु आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त डोंबिवलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन जगद्गुरु आद्य शंकराचार्य सेवा समिती तर्फे शंकराचार्य जयंतीनिमित्त येत्या २ आणि ३ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.‌ उपनिषद सेवा मंडळ आणि संस्कृत भारती यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक स्तोत्र पठण आणि पंधरावा गीता अध्याय पठण होणार आहे. २ मे रोजी रोजी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत विद्यार्थी श्रीमद् भगवद् गीतेच्या १५ व्या अध्यायाचे सामुहिक पठण करणार आहेत. सामूहिक स्तोत्र पठण कार्यक्रमात डोंबिवलीतील उपनिषद सेवा मंडळ, संस्कृत भारत, दुर्वांकुर, डोंबिवली कीर्तन कुलसंस्था, श्री गोविंद विश्वस्त न्यास, समग्र श्री विष्णू सहस्त्रनाम समूह, स्वामींचे घर या संस्थांचे सुमारे पावणेदोनशे सदस्य सहभागी होणार आहेत. २ मे या दिवशी सकाळी साडेसहा ते रात्रीपर्यंत काकड आरती, रुद्राक्ष पूजा, सामूहिक उपनयन, कुंकुमार्चन, भजन, अष्टवंदन, तर ३ मे रोजी सकाळी साडेसहा ते दुपारी एकपर्यंत रुद्र स्वाहाकार होम, 'आद्य शंकराचार्य यांचे तत्वज्ञान' या विषयावर प्रवचन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. हे सर्व कार्यक्रम अगरवाल हॉल, मानपाडा रस्ता , डोंबिवली पूर्व येथे होणार आहेत‌, नागरिक, भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन जगद्गुरु आद्य शंकराचार्य सेवा समितीचे लक्ष्मीकांत कुलकर्णी, उपनिषद सेवा मंडळाचे गंगाधर पुरंदरे यांनी केले आहे.

सोमवार, २८ एप्रिल, २०२५

सुलट प्रेमाची उलट गोष्ट 'मंगलाष्टक रिटर्न'!

सुलट प्रेमाची उलट गोष्ट 'मंगलाष्टक रिटर्न'! मुंबई, दि. २८ एप्रिल 'सुलट प्रेमाची उलट गोष्ट' अशी टॅगलाईन असलेला 'मंगलाष्टक रिटर्न' हा चित्रपट येत्या २३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित करण्यात आले आहे. एकमेकांचे राजकीय विरोधक असलेल्या दोन कुटुंबांतील युवक व युवती एकाच महाविद्यालयात एकत्र येतात. एकमेकांचे विरोधक असलेल्या कुटुंबात व या दोघांच्याही आयुष्यात पुढे काय घडते? हे ' मंगलाष्टक रिटर्न' मध्ये पाहायला मिळणार आहे. वृषभ शाह, शीतल अहिरराव या नव्या जोडीसह चित्रपटात प्रसाद ओक, आनंद इंगळे, सक्षम कुलकर्णी, सोनल पवार, कमलेश सावंत, सुनील गोडबोले, प्रसन्न केतकर इत्यादी कलाकार आहेत‌. शारदा फिल्म्स प्रॉडक्शनच्या वीर कुमार शहा यांनी निर्मिती या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले असून डॉ. भालचंद्र यांनी कथा आणि संवादलेखन, पी. शंकरम यांनी संगीत दिग्दर्शन, विकास सिंह यांनी छायांकन, एस. विक्रमन यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे.

तर महाराष्ट्रातील हे शेवटचे हिंदुत्वनिष्ठ सरकार ठरेल - रणजित सावरकर

बांगलादेशी घुसखोरांना हाकलले नाही, तर महाराष्ट्रातील हे शेवटचे हिंदुत्वनिष्ठ सरकार ठरेल - रणजित सावरकर मुंबई, दि. २८ एप्रिल येत्या पाच ते दहा वर्षांत महाराष्ट्रातील बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढले नाही, तर सध्याचे सरकार हे शेवटचे हिंदुत्वनिष्ठ सरकार ठरेल, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी येथे केले. विक्रम भावे लिखित 'दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येथील दादर येथील काशीनाथ धुरू सभागृह शनिवारी पार पडला. त्यावेळी सावरकर बोलत होते. सावरकर यांच्यासह हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक, लेखक भावे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पहलगाम येथील आक्रमण हे हिंदू म्हणून केलेले पहिले आक्रमण नाही. यापूर्वी काश्मिरमधून काश्मिरी पंडीतांना हिंदू म्हणूनच निर्वासित करण्यात आले होते. बंगालमधील मुर्शिदाबाद येथे यापूर्वीच हिंदूंच्या क्रूरपणे हत्या करण्यात आल्या. त्यामुळे अशा घटनांचा प्रतिशोध घेतला गेला नाही, हिंदू संघटित होत नाहीत, तोपर्यंत अशी आक्रमणे सुरुच रहातील. दहशतवादी जर धर्म म्हणून हिंदूंना गोळ्या घालत असतील, तर धर्मासाठी हिंदू मुसलमानांवर आर्थिक बहिष्कार का टाकू शकत नाहीत ? असा प्रश्न सावरकर यांनी उपस्थित केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (‘सीबआय’ने) मला आणि हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अन् अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांना विनाकारण गोवून आमचा तीव्र मानसिक छळ केला. हिंदुत्वाचे कार्य करणाऱ्याला येनकेनप्रकारेण खोट्या गुन्ह्यात अडकवून यंत्रणा कशा कार्य करतात, याचे प्रत्यक्ष स्वरूप तुम्हाला या पुस्तकातून पाहायला, अनुभवायला मिळेल, असे भावे यांनी सांगितले. तर विक्रम भावे यांचे पुस्तक म्हणजे हिंदूंच्या शौर्याचे कहाणी आहे , असे अधिवक्ता पुनाळेकर म्हणाले तर सत्याचा चेहरा नीटपणे दिसण्यासाठी आपण जागे व्हायला हवे, असे आवाहन अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी केले. दाभोलकरांची हत्या हिंदुत्वनिष्ठांनी केल्याचे नॅरेटिव्ह निर्माण करण्यासाठी काही लोक कार्यरत होते, असे वर्तक यांनी सांगितले‌.

नतद्रष्ट 'नट'रंगवाला

नतद्रष्ट 'नट'रंगवाला... काश्मीर पंडितांना जीवे मारले, काश्मीरमधून हुसकावून लावले तेव्हा नतद्रष्ट 'नट'रंगवाल्याला तिथे जावेसे वाटले नाही. बैसरन- पहलगाम येथील काही स्थानिकांचीही या निर्घृण व क्रूर नरसंहारासाठी दहशतवाद्यांना मदत झाली असे समोर आले आहे. अशा परिस्थितीत दहशतवाद्यांना मदत करणा-या स्थानिकांचे आर्थिक कंबरडे मोडण्यासाठी पर्यटकांनी काही काळ काश्मीरमध्ये पर्यटनासाठी जाऊ नये, असा एक मतप्रवाह पुढे येत आहे. तो चुकीचा नाही. समाजातील तथाकथित सेलिब्रिटीनींही या चळवळीत सहभागी झाले पाहिजे. मात्र अपवाद वगळता उलटेच चित्र पाहायला मिळते आहे. स्थानिक व्यावसायिकांचा कळवळा काही जणांना आला असून हे सेलिब्रिटी तमाम भारतीयांना खिजवून हे शूरवीर मुद्दामच काश्मीरला जात आहेत. खरे तर तमाम भारतीयांनी या नतद्रष्टांवर आणि त्यांच्या कलाकृतींवर बहिष्कार टाकून व्यक्त त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. सुरुवात नतद्रष्ट 'नट'रंगवाल्यापासून... शेखर जोशी २८ एप्रिल २०२५