गुरुवार, ८ मे, २०२५

शंखनाद महोत्सव १ हजार वर्षांपूर्वीच्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दुर्मिळ दर्शन

शंखनाद महोत्सव १ हजार वर्षांपूर्वीच्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दुर्मिळ दर्शन पणजी (गोवा), दि. ८ मे सनातन संस्थेने येत्या १७ ते १९ मे या कालावधीत फोंडा, गोवा येथे आयोजित केलेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात एक हजार वर्षांपूर्वीच्या सोरटी सोमनाथ जोतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची दुर्मिळ संधी उपस्थितांना मिळणार आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी गुरुवारी पणजी येथील पत्रकार परिषदेत दिली. फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर हा महोत्सव होणार आहे.हे शिवलिंग मूर्तीभंजक गझनी याने तोडले होते आणि नंतर पुढे अग्निहोत्र संप्रदायाच्या साधकांनी त्याचा सांभाळ केला. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्यामुळे हे शिवलिंग महोत्सवाच्या ठिकाणी दर्शनासाठी ठेवले जाणार आहे, असेही राजहंस यांनी सांगितले. काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि अयोध्येतील श्रीराम मंदिरामुळे उत्तर प्रदेशला दरवर्षी सुमारे २२ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रात ७ व्या क्रमांकावर असलेले उत्तर प्रदेश राज्य आता अग्रस्थानावर पोहोचले आहे. पूर्वी ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोव्यालाही असा लाभ निश्चितच मिळू शकतो. मंदिरे म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचा आत्मा आणि कणा आहेत. असेही राजहंस म्हणाले.‌ या तीन दिवसीय महोत्सवासाठी देशविदेशातून २५ हजारांहून अधिक भाविक, साधक, प्रतिष्ठित लोक गोव्यात दाखल होणार आहेत. हे सर्वजण येथे ३ ते ५ दिवस निवास, प्रवास करणार आहेत. यामुळे सर्व स्थानिक व्यवसाय आणि रोजगार यांना चालना मिळणार आहे.‌ महोत्सवाविषयी अधिक माहिती SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळावर मिळू शकेल.
छायाचित्र ओळी छायाचित्रात डावीकडून युवराज गावकर, जयेश थळी, राज शर्मा, सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस, संजय घाडगे, नितीन फळदेसाई,अनिल नाईक

डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण

डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ९ ते ११ मे या कालावधीत संपूर्ण गीतरामायण सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष असून कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. धनंजय भोसेकर संपूर्ण गीतरामायण सादर करणार असून कार्यक्रमाचे निवेदन भोसेकर यांच्या पत्नी देवयानी भोसेकर यांचे आहे. धनंजय भोसेकर यांच्या भगिनी नीला सोहनी, त्यांचे पती प्रमोद सोहनी हे अनुक्रमे संवादिनी व तबल्याची तर व्यंकटेश कुलकर्णी तालवाद्य साथ करणार आहेत. सावित्रीबाई फुले नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार असून ९ व १० मे रोजी रात्री साडेआठ आणि ११ मे रोजी दुपारी साडेतीन वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे. धनंजय भोसेकर यांच्या वडीलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल दिला जाणारा 'सदगुरू चंद्रकांत अनंत भोसेकर सेवाव्रती पुरस्कार' यंदाच्या 'पै फ्रेण्ड्स लायब्ररी'चे संस्थापक पुंडलिक पै यांना प्रदान करण्यात येणार आहे. तीन दिवस अनुक्रमे प्रा.डॉ. विनय भोळे, प्रा. डॉ शुभदा जोशी आणि अजित करकरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या दैनंदिन विनामूल्य प्रवेशिका सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली पूर्व येथे तिकीट खिडकीवर कार्यक्रमाच्या आधी एक तास उपलब्ध होणार आहेत.

बुधवार, ७ मे, २०२५

गोव्यातील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात ‘हिंदु राष्ट्ररत्न''सनातन धर्मश्री’पुरस्कार वितरण

गोव्यातील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात ‘हिंदु राष्ट्ररत्न''सनातन धर्मश्री’पुरस्कार वितरण मुंबई, दि. ७ मे सनातन धर्म,हिंदुत्वासाठी समर्पित वृत्तीने विशेष कार्य करणाऱ्यांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ आणि 'सनातन धर्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. येत्या १७ ते १९ मे या कालावधीत गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, विरार येथील श्री जीवदानी देवी संस्थानचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर, हिंदू जनजागृती समितीचे प्रवा्ते सतीश कोचरेकर यावेळी उपस्थित होते. संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आणि संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा शंखनाद महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याचे सांगून वर्तक म्हणाले, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतून २ हजार ५०० हून अधिक हिंदूप्रेमी नागरिक,कार्यकर्ते, हिंदुत्वनिष्ठ संघटना,आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधीही तसेच पदेशातूनही अनेक मंडळी उपस्थित रहाणार आहेत. फार्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर महोत्सव साजरा होणार आहे. देशांतर्गत आणि बाह्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सनातन धर्म, त्याची मूल्ये आणि त्याचे रक्षण याची नितांत आवश्यक आहे. 'धर्मेण जयति राष्ट्रम्’ (धर्मामुळे राष्ट्राचा विजय होतो) हे महोत्सवाचे घोषवाक्य आहे.‘सनातन राष्ट्रा’साठी ‘रामराज्य संकल्प जपयज्ञा’द्वारे एक कोटी श्रीरामनामाचा जप करण्यात येणार असल्याचे वर्तक यांनी सांगितले. गोमंतकातील लोककलांचेही सादरीकरण होणार असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील प्राचीन शस्त्रास्त्रे, तसेच सनातन संस्कृती, राष्ट्र, कला, आयुर्वेद, आध्यात्मिक वस्तू यांचे भव्य प्रदर्शन महोत्सवाच्या ठिकाणी भरविण्यात येणार आहे.‌ महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील दहाहून अधिक संतांच्या पादुकांचे दर्शन येथे घेता येणार आहे, अशी माहितीही वर्तक यांनी दिली. अधिक माहिती SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळावर मिळू शकेल.
छायाचित्रात डावीकडून सतीश कोचरेकर,घनश्याम उपाध्याय,अभय वर्तक, प्रदीप तेंडोलकर

संगीतकार अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर

संगीतकार अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर मुंबई, दि. ७ मे संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा यंदाचा 'कृतज्ञता गौरव पुरस्कार'ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह आणि रोख ५१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार सोहळ्याचे यंदा २८ वे वर्ष असून पुरस्कार वितरण सोहळा येत्या १० मे रोजी संध्याकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल व पौडवाल कुटुंबीयांच्या उपस्थितीत उत्तरा केळकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पार्श्वगाय जी. मल्लेश, संगीतकार राम कदम,यशवंत देव, प्रभाकर जोग,दत्ता डावजेकर,अशोक पत्की,संगीत संयोजक श्यामराव कांबळे, तालवादक जयसिंग भोई, प्रमोद साने, संतूर वादक - उल्हास बापट, गीतकार जगदीश खेबुडकर,शांताराम नांदगावकर, वंदना विटणकर,भावगीत गायक अरुण दाते आणि अन्य मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. उत्तरा केळकर यांच्या गायन कारकिर्दीला ५३ वर्षे पूर्ण झाली असून त्यांनी १२ विविध भाषांमध्ये ४२५ हुन अधिक चित्रपटांसाठी तर साडेसहाशेहून अधिक ध्वनीफिती,सीडी तसेच अनेक लघुपट, जाहिरातींसाठी पार्श्वगायन केले आहे.

मंगळवार, ६ मे, २०२५

रेल्वे अधिकारी, कर्मचारी यांच्यात हा कोडगेपणा, माज कुठून येतो?

रेल्वे अधिकारी, कर्मचारी यांच्यात हा कोडगेपणा, माज कुठून येतो? - ट्रेन लेट असल्याची घोषणा न करणा-या संबंधित स्टेशन मास्तरांवर कारवाईचा बडगा उगारा - वेतनात कपात करा, बढती व वेतनवाढ रोखा शेखर जोशी ट्रेन लेट असेल तर त्याची घोषणा न करण्याचा कोडगेपणा, निगरगट्टपणा, मस्ती, माज कुठून व कशी येते? आत्ताच्या काळात सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान, सोयी, सुविधा उपलब्ध असतानाही या संदर्भातील रितसर घोषणा का केली जात नाही? प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि संतप्त प्रवाशांनी राडा केला तर आणि तरच रेल्वे प्रशासनाला जाग येणार आहे का? भर दुपारची वेळ. अंगाची काहिली करणारा उन्हाळा. वसई रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक सहा/ सातवर दुपारी ३.३५ वाजता सुटणा-या वसई- दिवा ट्रेनसाठी प्रवासी तीन/सव्वा तीन वाजल्यापासून वाट पाहत थांबलेले. घड्याळाचा काटा पुढे सरकतोय. सात नंबर वरुन दोन मालगाड्या दिव्याच्या दिशेने रवाना होतात. इकडे फलाट क्रमांक सहावर दिव्याच्या दिशेने एक मालगाडी येते विरारच्या दिशेने रवाना होते. त्यानंतर आणखी एक मालगाडी येते ती फलाट क्रमांक सहावरच थांबते. फलाटावरील गर्दी वाढत चाललेली. घड्याळाचा काटा पुढे जातच चाललाय. प्रवाशांमध्ये चुळबुळ सुरु. ट्रेन येणार आहे ना? की रद्द केली? एकमेकांकडे विचारपूस होते. पण काही कळत नाही. कारण वसई- दिवा ट्रेनबाबची कोणतीही घोषणा वसईत झालेली नसते. वाढत चाललेल्या गर्दीत ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले असे सर्व आबालवृद्ध प्रवासी. रेल्वेचे तिकीट काढून प्रवासी रेल्वे फलाटावर ट्रेनची वाट पाहात ताटकळत उभे आहेत. ३.३५ ला सुटणारी ट्रेन वेळेत सुटणार नाही, ही वस्तुस्थिती प्रवाशांना सांगण्याची जबाबदारी कोणाची? वसई रेल्वे स्टेशन मास्तरांची आहे ना? ते आपली जबाबदारी कसे टाळू शकतात? इतका कोडगेपणा, निगरगट्टपणा, मस्ती, माज रेल्वे अधिकाऱ्यांकडे कुठून येतो? ट्रेन सुटण्याची जी वेळ आहे त्यावेळेच्या अर्ध्या तासानंतर रेल्वे प्रशासन, वसई रेल्वे स्टेशन मास्तर, संबंधित अधिकारी, कर्मचारी जागे होतात. आणि ३.५५/४ च्या सुमारास वसईहून दिव्याला जाणारी ट्रेन येत आहे, अशी घोषणा वसई रेल्वे स्थानकात केली जाते. फलाट क्रमांक सात वरील प्रवासी तयारीत राहतात. गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने काही पुरुष व महिला प्रवासी फलाटावरून उतरून रेल्वे मार्ग ओलांडून विरुद्ध बाजूला उभे राहतात. वसई - दिवा ट्रेन फलाट क्रमांक सहावर येते आणि आक्रमण केल्याप्रमाणे फलाटावरील प्रवासी ट्रेनमध्ये चढण्यासाठी तर ट्रेनमधील प्रवासी फलाटावर उतरण्यासाठी निकराचा संघर्ष करतात. यात ढकलाढकली, थोडी चेंगराचेंगरी होते. आणि ४.१० ट्रेन सुटते. बसायला मिळालेल्या प्रवाशांना जणू काही जग जिंकले असे वाटते. वसई स्टेशन सुटल्यावर दिव्याच्या दिशेने जाताना ४.१५ वाजता पहिले स्टेशन जुचंद्र येते. एक/ दोन मिनिटे ट्रेन थांबेल आणि सुटेल असे वाटत असतना जुचंद्र स्थानकात ट्रेन पाच/ दहा मिनिटे नव्हे तब्बल वीस मिनिटे थांबते. ट्रेन का थांबली? इतका वेळ झाला तरी का सुटत नाही? पुढे नेमके काय झाले? या प्रश्नांची उत्तरे प्रवाशांना नेहमीप्रमाणे मिळत नाहीत. खरेतर लोकल ट्रेन किंवा या ट्रेनमध्येही चालक किंवा गार्ड यांनी घोषणा केली तर एकाच वेळी सर्व डब्यातील प्रवाशांना ऐकू येईल अशी व्यवस्था, स्पीकर आहेत. पण ते कधीही केले जात नाही. प्रवासी चिडतात, रेल्वेच्या नावाने बोटे मोडतात, चरफडतात. अखेर ४.३५ च्या सुमारास थांबलेली ट्रेन सुटते, प्रवासी सुटकेचा निःश्वास सोडतात. रेल्वे प्रशासनाच्या लेखी मालवाहतूक इतकी महत्त्वाची आहे का? की त्यासाठी नियमित ट्रेन लेट झाली तरी चालेल. असाच अनुभव लोकल ट्रेन प्रवाशांना येतो. या ट्रेनऐवजी लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य देऊन त्या पुढे काढल्या जातात. एखादी ट्रेन लेट झाली तर त्याची आगाऊ माहिती प्रवाशांना मिळणे हा त्यांचा हक्क व अधिकार आहे. तो जर वेळोवेळी डावलला जात असेल तर रेल्वे स्थानकात लेट ट्रेनची घोषणा न करणा-या संबंधित स्टेशन मास्तरांवर शिक्षा म्हणून रेल्वे प्रशासनाने कठोरात कठोर कारवाई करावी, त्यांचे वेतन कापावे, बढती, वेतनवाढ रोखली जावी. असे काही केले तर आणि तरच या कोडगेपणाला, निगरगट्टपणाला आळा बसेल, मस्ती, माज उतरेल. एकावर असा बडगा उगारला तर बाकीचे नक्कीच सुतासारखे सरळ होतील. रेल्वे प्रवासी प्रवासी संघटना, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे यासाठी साकडे घालावे. शेखर जोशी ६ मे २०२५

सोमवार, ५ मे, २०२५

'मुक्काम पोस्ट देवाच घर' पाच भारतीय भाषांमध्ये डब

पाच भारतीय भाषांमध्ये डब केलेला पहिला मराठी चित्रपट 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' मुंबई, दि‌ ५ मे हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये 'मुक्काम पोस्ट देवाचं घर'हा मराठी चित्रपट डब करण्यात आला असून पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झालेला हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट पाहता येणार आहे.‌ कीमाया प्रॉडक्शन्सची निर्मित असलेल्या या चित्रपटाचे निर्माते आणि निर्माते महेश कुमार जायस्वाल,कीर्ती जायस्वाल आहेत. चित्रपटाची कथा कोणत्याही एका विशिष्ठ भाषेतील लोकांची नसून आपल्या सर्वांच्या सभोवताली घडणारी आहे.ही कथा देशभरातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पाच भारतीय भाषांमध्ये चित्रपट डब करण्यात आल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले.

शनिवार, ३ मे, २०२५

मग उंचच उंच मूर्ती नका बनवू, काही बिघडणार नाही...

मग उंचच उंच मूर्ती नका बनवू, काही बिघडणार नाही... मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमातून झालेले मार्केटिंग, सर्वपक्षीय राजकारण्यांचा कब्जा, मनी आणि मसल पॉवरचे प्रदर्शन यातून उंचच उंच मूर्तींची स्पर्धा सुरू झाली आहे. एकसंघ शिवसेना असताना तत्कालीन महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी २०/२५ वर्षांपूर्वीच मुंबईत मूर्तीच्या उंचीवर मर्यादा आणण्याची मागणी केली होती. पाठपुरावा केला होता. मात्र उद्धव ठाकरे व शिवसेना नेते डॉ. राऊळ यांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. मूर्तीकारांपुढे त्यांनी नांगी टाकली. शाडू मातीच्या सहाय्याने जितकी उंच मूर्ती बनविणे शक्य असेल तेवढी तयार करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनीही मूर्तीकारांपुढे नांगी टाकू नये. 'पीओपी' बंदीवर कायम राहावे. पीओपी बंदी हा मुद्दा एका रात्रीत समोर आलेला नाही. गेल्या दोन/चार वर्षांपासून तो चर्चेत आहे. प्रत्येक वेळी पीओपी मूर्तीकारांच्या दबावाला बळी पडून यंदा नको, पुढच्या वर्षी अंमलबजावणी करू, असे करून आपल्याला हवे ते पीओपी मूर्तीकार करून घेत होते. पीओपीवर बंदीच, अशी ठोस भूमिका बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने घेतली त्यासाठी अभिनंदन. यावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत पीओपी समर्थक मूर्तीकारांनी हाणामारी केली. चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या गणपतीच्या उंचच उंच मूर्ती बनविण्यावरून चाललेले हे दबावाने राजकारण दुर्दैवी आहे. महापालिका प्रशासन, राज्य शासनातर्फे वेळोवेळी पीओपी मूर्तींवर बंदी आहे हे कानीकपाळी ओरडून सांगितले जात असतानाही मूर्तीकार पीओपीच्या मूर्ती तयार करत असतील तर चूक त्यांची आहे.
रस्ते अडवून, मंडप उभारून, वाहतुकीला व पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करणे, आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत कानाचे पडदे फाटतील, छातीत धडकी भरेल अशा आवाजातील डीजे, अश्लील गाण्यांवर हिडीस नाच असे ओंगळ स्वरूप सार्वजनिक गणेशोत्सवाला आले आहे. कोणाही सुजाण, सुशिक्षित व सारासार विचार करण्या-या माणसांना गणेशोत्सवाचे हे ओंगळ, हिडीस आणि व्यापारी स्वरूप नको आहे. फक्त सार्वजनिक गणेशोत्सवच नव्हे तर नवरात्रोत्सव, दहिहंडी उत्सव यांनाही काही सन्माननीय अपवाद वगळता ओंगळ, हिडीस स्वरूप आले आहे. करोना काळातील निर्बंधांमुळे तेव्हा हे सण कधी आले व गेले ते कळलेच नाही. अत्यंत शांततेत उत्सव पार पडले. आणि ते खूप छान वाटले होते. पण तो अपवाद ठरला होता. शेखर जोशी ३ मे २०२५