बुधवार, १४ मे, २०२५
मेट्रो लाईन-९ प्रकल्पात रेल्वे आणि उड्डाणपूल एकाच संरचनेत- फडणवीस
मुंबईतील मेट्रो लाईन-९ प्रकल्पात
रेल्वे आणि उड्डाणपूल एकाच संरचनेत- उपमुख्यमंत्री फडणवीस
-ठाणे जिल्ह्यातील पहिल्या मेट्रो लाईनची तांत्रिक चाचणी यशस्वी
- मिरा-भाईंदर ते पश्चिम- पूर्व उपनगरे आणि
आंतरराष्ट्रीय विमानतळाशी मेट्रो ९ जोडली जाणार
ठाणे, दि. १४ मे
ठाणे जिल्ह्यातील पहिल्या मेट्रो लाईन ९ प्रकल्पाच्या तांत्रिक चाचण्या सुरू झाल्या असून लवकरच हा टप्पा प्रवाशांसाठी सुरू केला जाईल.ही मेट्रो लाईन पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.मुंबईत पहिल्यांदाच अशा प्रकारचा डबल डेकर प्रकल्प उभारण्यात आला असून मेट्रो आणि उड्डाणपूल एकाच संरचनेत आहेत,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले.
ठाणे जिल्ह्यातील पहिल्या मेट्रो लाईनची चाचणी(ट्रायल रन)
यशस्वीरित्या पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए)अध्यक्ष,एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही यावेळी उपस्थित होते.
या मेट्रोमुळे मिरा-भाईंदरकरांसाठी मुंबईच्या विविध कोपऱ्यांपर्यंत पोहोचणे आता अधिक सोयीचे आणि वेगवान होणार असल्याचे सांगून
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यावर्षी ५० किमी, पुढील वर्षी ६२ किमी आणि तिसऱ्या वर्षी ६० किमी मेट्रो सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या मेट्रोच्या विरारपर्यंतच्या विस्तारामुळे ठाणे,पालघर आणि रायगड जिल्ह्यांना मेट्रोशी थेट जोडणी मिळणार असून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ३३७ किलोमीटर लांबीचे मेट्रो रेल्वेचे जाळे उभारले जाणार आहे. तर मेट्रो लाईन-९ मुळे कमी वेळात जास्त अंतर पार करता येणार असून एकूणच आर्थिक गतिशीलता वाढवणारा महत्त्वाचा टप्पा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
मेट्रो लाईन-९ चा हा पहिला टप्पा दहिसर (पूर्व) ते काशिगावपर्यंत ४.४ किमी लांबीच असून या मार्गावर दहिसर (पूर्व),पांडुरंगवाडी, मिरा गाव,काशिगाव अशी चार स्थानके आहेत.अंधेरी पश्चिम (लाइन २ बी),घाटकोपर (लाइन १ व ७, लिंक रोड (दहिसर पूर्व – लाइन २ ए) इथे जाता येणार आहे. तर भविष्यात मिरा गाव मेट्रोस्टेशन मार्गे मेट्रो लाईन १०व्दारे ठाणे आणि वसई-विरार (लाइन १३–एनएससीबी स्थानक) जोडली जाणार आहे.
'एमएमआरडीए'चे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा,
मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे,प्रांताधिकारी उर्मिला पाटील, तहसिलदार निलेश गौड, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,
स्थानिक आजी व माजी लोकप्रतिनिधींनी, शासकीय अधिकारी उपस्थित होते.
सोमवार, १२ मे, २०२५
दहशतवादाच्या विरोधात'ऑपरेशन सिंदूर' हेच भारताचे धोरण- पंतप्रधान नरेंद्र मोदी
दहशतवादाच्या विरोधात'ऑपरेशन सिंदूर'
हेच भारताचे धोरण- पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली, दि. १२ मे
दहशतवाद आणि दहशतवाद्यांच्या विरोधात 'ऑपरेशन सिंदूर' हेच भारताचे यापुढे धोरण राहील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले.
ऑपरेशन 'सिंदूर' नंतर देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी बोलत होते.
'ऑपरेशन सिंदूर' संपलेले नाही तर स्थगित करण्यात आले आहे. निर्दोष, निष्पाप नागरिकांना धर्म विचारुन त्यांच्या कुटुंबीयांसमोर अतिशय निर्घृणपणे गोळ्या घालून मारणे हा दहशतवादाचा बिभत्स, क्रूर चेहरा असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
ऑपरेशन 'सिंदूर' हे फक्त नाव नाही, तर देशाच्या कोट्यवधी नागरिकांच्या भावनेचे प्रतिबिंब, न्यायाची अखंड प्रतिज्ञा असल्याने सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, ६ मे च्या रात्री उशिरा आणि ७ मे च्या सकाळी संपूर्ण जगाने आमच्या या प्रतिज्ञेला परिणामात बदलताना पाहिले.
दहशतवाद आणि चर्चा, दहशतवाद आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाही. रक्त व पाणी एकाच वेळी वाहू दिले जाणार नाही. दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर या विषयावरच पाकिस्तानशी चर्चा होऊ शकते. आम्ही आमच्या अटी व शर्तींवरच उत्तर देऊ, असेही पंतप्रधान मोदी यांनी ठामपणे सांगितले.
रविवार, ११ मे, २०२५
ठाण्यात 'मॉक ड्रिल'
ठाण्यात 'मॉक ड्रील'
ठाणे, दि. ११ मे
केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठाणे येथे रविवारी
आपत्कालीन तयारीची चाचणी घेण्यात आली. ठाण्यातील लोढा अमारा,कोलशेत मैदानावर 'ऑपरेशन अभ्यास' मॉक ड्रिल पार पडले. सायरन वाजवून या मॉक ड्रिलची सुरुवात करण्यात आली.
मॉक ड्रिलच्या दरम्यान काल्पनिक परिस्थितीत एअर स्ट्राईक/बॉम्ब हल्ल्याची सूचना देण्यात आली. यानंतर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी सूचनांचे प्रसारण करण्यात आले. नागरिकांनी कोणताही गोंधळ अथवा धावपळ न करता शांतपणे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन केले आणि सुरक्षितस्थळी आश्रय घेतला. त्यानंतर, संबंधित परिसरात शोध मोहीम राबवून जखमी तसेच अडकलेल्या चाळीस नागरिकांना तात्काळ बाहेर काढण्यात येऊन त्यांच्यवर प्रथमोपचार करण्यात आले.इमारतीत अडकलेल्या
पाच जणांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली. मॉक ड्रिलदरम्यान कुठल्याही प्रकारची अफवा पसरली नाही आणि नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला.
आजचे मॉक ड्रिल केवळ आपत्कालीन परिस्थितीत आपली तयारी किती आहे, हे तपासण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. कोणतीही खरी आपत्ती ओढवलेली नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे प्रांताधिकारी उर्मिला पाटील आणि तहसिलदार उमेश पाटील यांनी सांगितले. मॉक ड्रिल मध्ये महसूल,आरोग्य, पोलीस, नागरी संरक्षण दल, होमगार्ड, ठाणे महानगरपालिका,आपत्ती व्यवस्थापन, टीडीआरएफ चे जवान, अग्निशमन दल,लोढा अमारा गृह संकुलातील अग्निशमन यंत्रणेचे जवान, सुरक्षा रक्षक आणि तेथील नागरिक सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे,
नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विजय जाधव,तहसिलदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले होते.
गुरुवार, ८ मे, २०२५
शंखनाद महोत्सव १ हजार वर्षांपूर्वीच्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दुर्मिळ दर्शन
शंखनाद महोत्सव १ हजार वर्षांपूर्वीच्या
सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दुर्मिळ दर्शन
पणजी (गोवा), दि. ८ मे
सनातन संस्थेने येत्या १७ ते १९ मे या कालावधीत फोंडा, गोवा येथे आयोजित केलेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात एक हजार वर्षांपूर्वीच्या सोरटी सोमनाथ जोतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची दुर्मिळ संधी उपस्थितांना मिळणार आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी गुरुवारी पणजी येथील पत्रकार परिषदेत दिली.
फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर हा महोत्सव होणार आहे.हे शिवलिंग मूर्तीभंजक गझनी याने तोडले होते आणि नंतर पुढे अग्निहोत्र संप्रदायाच्या साधकांनी त्याचा सांभाळ केला. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर
यांच्यामुळे हे शिवलिंग महोत्सवाच्या ठिकाणी दर्शनासाठी ठेवले जाणार आहे, असेही राजहंस यांनी सांगितले.
काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि अयोध्येतील श्रीराम मंदिरामुळे उत्तर प्रदेशला दरवर्षी सुमारे २२ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रात ७ व्या क्रमांकावर असलेले उत्तर प्रदेश राज्य आता अग्रस्थानावर पोहोचले आहे. पूर्वी ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणार्या गोव्यालाही असा लाभ निश्चितच मिळू शकतो.
मंदिरे म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचा आत्मा आणि कणा आहेत. असेही राजहंस म्हणाले.
या तीन दिवसीय महोत्सवासाठी देशविदेशातून २५ हजारांहून अधिक भाविक, साधक, प्रतिष्ठित लोक गोव्यात दाखल होणार आहेत. हे सर्वजण येथे ३ ते ५ दिवस निवास, प्रवास करणार आहेत. यामुळे सर्व स्थानिक व्यवसाय आणि रोजगार यांना चालना मिळणार आहे.
महोत्सवाविषयी अधिक माहिती
SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळावर मिळू शकेल.
छायाचित्र ओळी
छायाचित्रात डावीकडून युवराज गावकर, जयेश थळी, राज शर्मा, सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस, संजय घाडगे, नितीन फळदेसाई,अनिल नाईक
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण
- उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष
डोंबिवली, दि. ८ मे
भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ९ ते ११ मे या कालावधीत संपूर्ण गीतरामायण सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष असून कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.
धनंजय भोसेकर संपूर्ण गीतरामायण सादर करणार असून कार्यक्रमाचे निवेदन भोसेकर यांच्या पत्नी देवयानी भोसेकर यांचे आहे. धनंजय भोसेकर यांच्या भगिनी नीला सोहनी, त्यांचे पती प्रमोद सोहनी हे अनुक्रमे संवादिनी व तबल्याची तर व्यंकटेश कुलकर्णी तालवाद्य साथ करणार आहेत. सावित्रीबाई फुले नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार असून ९ व १० मे रोजी रात्री साडेआठ आणि ११ मे रोजी दुपारी साडेतीन वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे.
धनंजय भोसेकर यांच्या वडीलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल दिला जाणारा 'सदगुरू चंद्रकांत अनंत भोसेकर सेवाव्रती पुरस्कार' यंदाच्या 'पै फ्रेण्ड्स लायब्ररी'चे संस्थापक पुंडलिक पै यांना प्रदान करण्यात येणार आहे. तीन दिवस अनुक्रमे प्रा.डॉ. विनय भोळे, प्रा. डॉ शुभदा जोशी आणि अजित करकरे
हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या दैनंदिन विनामूल्य प्रवेशिका सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली पूर्व येथे तिकीट खिडकीवर कार्यक्रमाच्या आधी एक तास उपलब्ध होणार आहेत.
बुधवार, ७ मे, २०२५
गोव्यातील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात ‘हिंदु राष्ट्ररत्न''सनातन धर्मश्री’पुरस्कार वितरण
गोव्यातील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात
‘हिंदु राष्ट्ररत्न''सनातन धर्मश्री’पुरस्कार वितरण
मुंबई, दि. ७ मे
सनातन धर्म,हिंदुत्वासाठी समर्पित वृत्तीने विशेष कार्य करणाऱ्यांना
‘हिंदु राष्ट्ररत्न’ आणि 'सनातन धर्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. येत्या १७ ते १९ मे या कालावधीत गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, विरार येथील श्री जीवदानी देवी संस्थानचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर, हिंदू जनजागृती समितीचे प्रवा्ते सतीश कोचरेकर यावेळी उपस्थित होते.
संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आणि संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा शंखनाद महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याचे सांगून वर्तक म्हणाले,
मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतून २ हजार ५०० हून अधिक हिंदूप्रेमी नागरिक,कार्यकर्ते, हिंदुत्वनिष्ठ संघटना,आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधीही तसेच पदेशातूनही अनेक मंडळी उपस्थित रहाणार आहेत. फार्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर महोत्सव साजरा होणार आहे.
देशांतर्गत आणि बाह्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सनातन धर्म, त्याची मूल्ये आणि त्याचे रक्षण याची नितांत आवश्यक आहे. 'धर्मेण जयति राष्ट्रम्’ (धर्मामुळे राष्ट्राचा विजय होतो) हे महोत्सवाचे घोषवाक्य आहे.‘सनातन राष्ट्रा’साठी ‘रामराज्य संकल्प जपयज्ञा’द्वारे एक कोटी श्रीरामनामाचा जप करण्यात येणार असल्याचे वर्तक यांनी सांगितले.
गोमंतकातील लोककलांचेही सादरीकरण होणार असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील प्राचीन शस्त्रास्त्रे, तसेच सनातन संस्कृती, राष्ट्र, कला, आयुर्वेद, आध्यात्मिक वस्तू यांचे भव्य प्रदर्शन महोत्सवाच्या ठिकाणी भरविण्यात येणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील दहाहून अधिक संतांच्या पादुकांचे दर्शन येथे घेता येणार आहे, अशी माहितीही वर्तक यांनी दिली.
अधिक माहिती SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळावर मिळू शकेल.
छायाचित्रात डावीकडून सतीश कोचरेकर,घनश्याम उपाध्याय,अभय वर्तक, प्रदीप तेंडोलकर
संगीतकार अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर
संगीतकार अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार
ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर
मुंबई, दि. ७ मे
संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा यंदाचा 'कृतज्ञता गौरव पुरस्कार'ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह आणि रोख ५१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार सोहळ्याचे यंदा २८ वे वर्ष असून पुरस्कार वितरण सोहळा
येत्या १० मे रोजी संध्याकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल व पौडवाल कुटुंबीयांच्या उपस्थितीत उत्तरा केळकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पार्श्वगाय जी. मल्लेश, संगीतकार राम कदम,यशवंत देव, प्रभाकर जोग,दत्ता डावजेकर,अशोक पत्की,संगीत संयोजक श्यामराव कांबळे, तालवादक जयसिंग भोई, प्रमोद साने, संतूर वादक -
उल्हास बापट, गीतकार जगदीश खेबुडकर,शांताराम नांदगावकर, वंदना विटणकर,भावगीत गायक अरुण दाते आणि अन्य मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
उत्तरा केळकर यांच्या गायन कारकिर्दीला ५३ वर्षे पूर्ण झाली असून
त्यांनी १२ विविध भाषांमध्ये ४२५ हुन अधिक चित्रपटांसाठी तर
साडेसहाशेहून अधिक ध्वनीफिती,सीडी तसेच अनेक लघुपट, जाहिरातींसाठी पार्श्वगायन केले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...















