रविवार, २५ मे, २०२५

'काश्मीर सद्यस्थिती आणि भविष्यातील योजना'

हम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 'काश्मीर सद्यस्थिती आणि भविष्यातील योजना' विषयावर कार्यक्रम - 'हम' कार्यकर्त्यांचा सीमा भागात पाहणी दौरा डोंबिवली, दि. २५ मे हम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे येत्या ४ जून रोजी 'जोडो जम्मू काश्मीर- सद्यस्थिती आणि भविष्यातील योजना' विषयावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात 'हम'चे कार्यकर्ते सीमाभागातील पाहणी दौऱ्यातील आपले अनुभव सांगणार आहेत. पहेलगाम हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' च्या माध्यमातून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले.‌ पाकिस्तानने जम्मू, अखनूर, नौशेरा, राजोरी, पूँछ, उरी, कुपवाडा, तंगधार या सीमावर्ती भागात ड्रोन, मिसाईल्स, मोरटार, इ. ने शेलिंग, फायरिंग केले. सीमेवरील आपल्या नागरिकांनी त्याला धैर्याने तोंड दिले. मात्र त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागली. 'हम' चे कार्यकर्ते वरील भागात फिरून याचा आढावा घेत आहेत. सीमा भागातील हा दौरा, तेथील अनुभव 'हम'चे कार्यकर्ते कार्यक्रमात सविस्तर सांगणार असून एकूणच 'काश्मीर सद्यस्थिती आणि भविष्यातील योजना' या विषयावरही कार्यक्रमात दृकश्राव्य माध्यमातून चर्चा, संवाद होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार, व्याख्याते मकरंद मुळे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता सर्वेश सभागृह, तळमजला, डोंबिवली पूर्व येथे होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन हम चॅरिटेबल ट्रस्ट डोंबिवलीचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी केले आहे.

खगोल अभ्यासकांचे संमेलन डिसेंबरमध्ये ठाणे येथे होणार

खगोल अभ्यासकांचे संमेलन डिसेंबरमध्ये ठाणे येथे होणार - खगोलशास्त्र जीवन गौरव पुरस्कार भरत अडूर यांना जाहीर ठाणे, दि. २५ मे खगोल अभ्यासकांचे १४ वे राज्यस्तरीय संमेलन येत्या २० व २१ डिसेंबर रोजी ठाणे येथे आयोजित करण्यात येणार आहे.‌ संमेलनात यंदाचा खगोलशास्त्र जीवनगौरव पुरस्कार नेहरू तारांगणातील निवृत्त शास्त्रज्ञ भरत अडूर यांना देण्यात येणार आहे.‌ मराठी खगोल अभ्यासक मंडळ कार्यकारिणीची सभा शनिवारी ठाणे येथे झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने हे संमेलन घेण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. दिवंगत खगोलशास्रज्ञ आणि लेखक डाॅ. जयंत नारळीकर यांनी विश्वनिर्मिती सिद्धांतसंबंधित संशोधन केले होते. डिसेंबरमध्ये होणा-या खगोल अभ्यासकांच्या संमेलनात डॉ.‌ नारळीकर यांच्या विश्वनिर्मिती सिद्धांतसंबंधित एक व्याख्यान तसेच एस्ट्राॅइड, गगनयान, आधुनिक दुर्बिणी वगैरे विषयांवर तज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. संमेलनाच्या निमित्ताने रात्री आकाश दर्शन कार्यक्रमही होणार आहे. शनिवारी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेस संस्थेचे अध्यक्ष दा.कृ.सोमण यांच्यसह छत्रपती संभाजी नगर येथील तारांगणाचे श्रीनिवास औंधकर, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह प्रा. नामदेव मांडगे, पिंपरी चिंचवड तारांगणाचे कासार, नारायणगाव येथील रेडिओ दुर्बिणीचे सुधीर फाकटकर, कल्याण आकाशमित्र संस्थेचे हेमंत मोने, नाशिकचे सचिन मालेगावकर, नेहरू तारांगणाचे निवृत्त शास्त्रज्ञ भरत अडूर उपस्थित होते.

शनिवार, २४ मे, २०२५

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचा समारोप

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचा समारोप; भारतासह २३ देशांतील ३० हजार हिंदूंचा सहभाग फोंडा, गोवा, २४ मे येथे आयोजित करण्यात आलेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची सांगता झाली.‌आगामी काळात भारताला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी आपण सर्वांनी आवश्यक ते प्रत्येक पाऊल उचलून संघटित राहिले पाहिजे,असे आवाहन तेलंगणा येथील हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजासिंह यांनी महोत्सवाच्या सांगताप्रसंगी केले. सनातन संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आणि संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.भारतासह जगभरातील २३ देशांतून आलेले सुमारे ३० हजार हिंदू धर्मप्रेमी आणि साधक या महोत्सवात सहभागी झाले होते.
महोत्सवात विविध आध्यात्मिक,राष्ट्रहितकारी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय सैन्य, सनातन धर्मप्रेमी आणि राष्ट्ररक्षणासाठी महोत्सवात शतचंडी याग तसेच समस्त सनातन हिंदु धर्मियांना चांगले आरोग्य लाभावे यासाठी महाधन्वंतरी यज्ञही आयोजित करण्यात आला होता.देशभरात राष्ट्र अन् धर्म कार्य करणार्‍या २५ जणांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ आणि ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हे पुरस्कार आता दरवर्षी दिले जाणार आहेत. महोत्सवात कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांचा जीवनपट कीर्तनाच्या माध्यमातून उलगडला.श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरिजी, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रविंद्र पुरीजी महाराज, अयोध्या हनुमानगढी येथील महंत राजू दास, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपादजी नाईक, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माजी केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर, तसेच काशी-मथुरा येथील मंदिरांचा खटला लढवणारे सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्यासह अनेक मान्यवर महोत्सवात सहभागी झाले होते.

मान्सून केरळमध्ये दाखल!

मान्सून केरळमध्ये दाखल! नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने शनिवारी केली. याआधी २००९ मध्ये मान्सून केरळात २३ मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर खूप वर्षांनी मान्सून इतक्या लवकर केरळात दाखल झाला आहे. दरवर्षी १ जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा मान्सून यंदाच्या वर्षी आठवडाभर आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे. आता पुढील चार ते पाच दिवसांत मान्सून कोकणात आणि येत्या १ जूनपर्यंत मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.

ॲप आधारित टॅक्सी भाडेवाडीवर मर्यादा

ॲप आधारित टॅक्सी भाडेवाडीवर मर्यादा मुंबई,दि. २४ मे सोनू उत्सव तसेच गर्दीच्या वेळी होणारी प्रवाशांची लुटमार रोखण्यासाठी राज्य शासनाने मुंबईसह राज्यात आधारित टॅक्सीच्या अवास्तव भाडेवाढीवर मर्यादा घातली आहे.‌ मागणी वाढल्यानंतर मूळ भाडेदरात १.५ पट मर्यादेपर्यंतच भाडेबाड करता येणार आहे आणि तसे बल ॲप आधारित प्रवासी सेवांच्या नियमात करण्यात आले आहेत. मंगळवारपासून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. नैऋत्य मान्सून रविवारी केरळमध्ये पुणे, दि. २४ मे नैऋत्य मोसमी पाऊस रविवारी २५ मे रोजी केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.‌ गेल्या वर्षी नैऋत्य मान्सून ३० मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता.‌ येत्या १५ जूनपर्यंत देशातील अनेक भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.
मतदान केंद्राबाहेर भ्रमणध्वनी ठेवण्यासाठी सोय मुंबई, दि.२४ मे मतदारांच्या सोयीसाठी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर भ्रमणध्वनी ठेवण्याची सुविधा निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भ्रमणध्वनीचा वाढता वापर आणि मतदानाच्या दिवशी येणाऱ्या अडचणीचा विचार करून भ्रमणध्वनी ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मुरुड जंजिरा किल्ला बंद होणार अलिबाग, दि. २४ मे आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर येत्या २६ मे पासून मुरुड जंजिरा किल्ला बंद करण्यात येणार आहे अशी माहिती पुरातत्त्व विभागाने दिली आहे. दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राजपुरी खाडीतील मुरुड जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी पुरातत्व विभाग व मेरिटाईम बोर्डाकडून बंद ठेवण्यात येतो. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची येत्या २९ जूनला निवडणूक कल्याण, दि. २४ मे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या २९ जून रोजी होणार आहे. बाजार समितीच्या १८ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. २६ मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली अंतिम मतदार यादी १४ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पनवेल शहरात बुधवार, गुरुवार पाणी पुरवठा बंद पनवेल, दि. २४ मे पनवेल शहराचा पाणीपुरवठा बुधवार २८ मे ते गुरुवार २९ मे रोजी सकाळी ९ ते गुरुवारी रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.‌ त्यामुळे या कालावधीत पनवेल शहरात कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कळविले आहे.

गुरुवार, २२ मे, २०२५

शंखनाद महोत्सवात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात शिवकालीन दुर्मिळ शस्त्र प्रदर्शन फोंडा, गोवा, दि. २३ मे येथे आयोजित करण्यात आलेल्या‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त भरविण्यात आलेले शिवकालीन ऐतिहासिक आणि दुर्मिळ शस्त्रांचे भव्य प्रदर्शन विशेष आकर्षण ठरले. सुमारे सहा हजार चौरसफूट क्षेत्रात हे प्रदर्शन मांडण्यात आले होते.‌ प्रदर्शनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज,धर्मवीर संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण झाले.
प्रदर्शनात कोल्हापूरच्या सव्यासाची गुरुकुलम आणि पुण्याच्या शिवाई संस्थान यांचे शस्त्रप्रदर्शन, गोव्यातील सौंदेकर घराण्याची प्राचीन शस्त्रे, तसेच सरदार येसाजी कंक यांची तलवार आणि सरदार कान्होजी जेधे यांच्या चिलखताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने बंदिस्त करताना वापरलेले मूळ साखळदंड शिवले कुटुंबाने पिढ्यान्‌पिढ्या जतन केले आहेत.ते साखळदंडही प्रदर्शनात पाहायला मिळाले.
शिवले कुटुंबातील वंशज सर्वश्री सागर शिवले, कुमार शिवले, सोमनाथ शिवले, दीपक टाकळकर, वेदांत शिवले यांचा हिंदु जनजागृती समितीचे पूर्वाेत्तर भारताचे धर्मप्रचारक नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
शिवकालीन युद्धकलेत वापरण्यात येाऱ्या विविध प्रकारच्या तलवारी, बंदुका, ढाली, जांबिया, तोफा, कट्यारी, चिलखत, शिरस्त्राण, भाले, कुर्‍हाडी, त्रिशूल, अंकुश, सिकल, पुरबा इत्यादीं प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या सैन्यातील विविध सरदारांच्या पराक्रमाची सचित्र माहितीही प्रदर्शनात सादर करण्यात आली.

मंगळवार, २० मे, २०२५

हिंदूंचे राजनितीकीकरण आणि राजनीतीचे सैनिकीकरण आवश्यक

फोंडा,गोवा, दि. २० मे हिंदूंचे राजनितीकीकरण आणि राजनीतीचे सैनिकीकरण होणे आवश्यक असून हिंदू बलशाली व्हायलाच हवा, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी येथे केले. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात‘सनातन राष्ट्र आणि डॉ. जयंत आठवले यांचे विविधांगी कार्य'या सत्रात ते ‘सनातन राष्ट्राची सुरक्षा’ या विषयावर बोलत होते. ‘चाणक्य फोरम’चे मुख्य संपादक तथा सेवानिवृत्त मेजर गौरव आर्य,पंजाब गोरक्षक दलाचे संस्थापक अध्यक्ष सतीश प्रधान, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक नंदकुमार जाधव,हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याचे समन्वयक सुनील घनवट व्यासपीठावर उपस्थित होते. स्वातंत्र्यानंतर देशात सत्तेवर आलेल्या सरकारने याकडे लक्ष दिले नाही. हिंदू बलशाली होण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे देशाचे अवमूल्यन झाले, असेही सावरकर म्हणाले. राष्ट्राचे रक्षण शस्त्रानेच करावे लागते. साधूसंतांच्या रक्षणासाठी श्रीरामाचा जन्म झाला. मुघलांचे आक्रमण वाढल्यानंतर हिंदूंच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज, गुरुगोविंदसिंग यांचा जन्म झाला, असे गौरव आर्य यांनी सांगितले. हिंदूंना धर्मशिक्षण प्राप्त व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीने धर्मशिक्षणवर्ग सुरू केले सद्यस्थितीत देशात समितीच्या वतीने ५०० ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग चालू आहेत, अशी माहिती नंदकुमार जाधव यांनी दिली. पंजाब गोरक्षक दलाचे संस्थापक अध्यक्ष प्रधान म्हणाले, महाराष्ट्रात गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला, त्याप्रमाणे हिंदूंच्या आस्थेचा विचार करून सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने गोवा सरकारनेही गोमातेला राज्यमातेचा दर्जा द्यावा.