सोमवार, १८ ऑगस्ट, २०२५

जयंत काशिद यांची ३० वेळा भीमाशंकर वारी

डोंबिवलीकर जयंत काशिद दरवर्षी श्रावणात भीमाशंकरला डोंगरवाटेने जातात. यंदाच्या वर्षी त्यांची ३० वी भीमाशंकर वारी झाली.‌ श्रावण सोमवारच्या निमित्ताने काशिद यांच्याशी केलेली बातचीत. शेजो उवाच https://youtu.be/WXgzFZ2aRjY?feature=shared लाईक, शेअर, सबस्क्राईब

गुरुवार, ७ ऑगस्ट, २०२५

पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस

सनातन संस्थेला ‘दहशतवादी’ म्हटल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस मुंबई, दि. ७ ऑगस्ट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन संस्थेला ‘दहशतवादी’ म्हटल्याप्रकरणी सनातन संस्थेचे विश्वस्त वीरेंद्र मराठे यांच्या वतीने त्यांना दहा कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच चव्हाण यांनी सनातन संस्थेची बिनशर्त माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी दिला आहे. चव्हाण यांनी १५ दिवसांच्या आत लेखी माफी मागणे, मूळ मुलाखतीइतक्याच प्रसिद्धीने ती माफी प्रसिद्ध करणे, भविष्यात कोणतीही बदनामीकारक विधाने न करणे आणि १० हजार रुपये कायदेशीर खर्च भरपाई देणे, अशा मागण्या या नोटीसीत करण्यात आल्या आहेत. चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे सनातन संस्थेची प्रतीमा मलीन झाली असून हजारो साधकांच्या भावना दुखावल्या आहेत. ही नोटीस मिळूनही उत्तर न दिल्यास चव्हाण यांच्यावर फौजदारी आणि दिवाणी खटले दाखल करण्यात येणार आहेत, असे संस्थेचे मानद कायदेशीर सल्लागार तथा मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता रामदास केसरकर यांनी नोटिसीत म्हटले आहे. पृथ्वीराज चव्हाण आज सांगत आहेत की, ‘भगवा’ हा महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीचा, छत्रपती शिवरायांचा, संत ज्ञानेश्वरांपासून सर्व संत आणि वारकर्‍यांचा पवित्र भगवा आहे. त्यामुळे कोणीही “भगवा दहशतवाद’’ असे म्हणू नये, असे काँग्रेसी नेत्यांना आवाहन करत आहेत; पण जेव्हा मालेगाव प्रकरण झाले, त्या वेळी काँग्रेसी नेते पी. चिदंबरम्, दिग्विजय सिंह, सुशीलकुमार शिंदे आदी नेत्यांनी ‘भगवा दहशतवाद’ म्हणत हिंदूंना लक्ष्य केले. तेव्हा चव्हाण यांना ‘भगवा’ छत्रपतींचा आहे, संतांचा आहे, हे लक्षात आले नाही ? इतकी वर्षे ते झोपले होते का? असा प्रश्न वर्तक यांनी उपस्थित केला आहे.‌

बुधवार, ३० जुलै, २०२५

ऑनलाईन जुगारावरील नियंत्रणासाठी राष्ट्रव्यापी कायदा करण्याची सुराज्य अभियानाची मागणी

ऑनलाईन जुगारावरील नियंत्रणासाठी राष्ट्रव्यापी कायदा करण्याची सुराज्य अभियानाची मागणी मुंबई, दि. ३० जुलै देशभरात झपाट्याने वाढणार्‍या ऑनलाईन जुगारामुळे (‘रिअल मनी गेमिंग’मुळे) लाखो कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. काही हजार कोटी रुपयांची लुट होत आहे. यावर केवळ राज्यात कायदा करणे पुरेसे नसून राष्ट्रीय स्तरावर कठोर आणि प्रभावी कायदा करण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’ने केली आहे. सुराज्य अभियानाच्या शिष्टमंडळाने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राष्ट्रीय स्तरावरील कायदा करण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २५२ अंतर्गत केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्याची मागणी केली. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत केंद्र सरकारकडे लवकरच प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. छत्तीसगडमध्ये हिंदु जनजागृती समितीचे छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि स्वा. सावरकारंचे नातू रणजीत सावरकर, सर्वश्री गोविंद साहू, रोहित तिरंगा, हेमंत कानस्कर आणि इतर सदस्य उपस्थित होते तर गोवा राज्यात ‘सुराज्य अभियान’च्या शिष्टमंडळामध्ये सर्वश्री राजेंद्र देसाई, नारायण नाडकर्णी, मनोज गावकर, सुचेंद्र अग्नी, स्वप्नील नाईक, सत्यविजय नाईक आणि सदाशिव धोंड यांचा समावेश होता. जुगाराच्या ॲप्स आस्थापनाकडे २५ हजार कोटी रुपयांची थकबाकी देशपातळीवर अनेक चित्रपट अभिनेते या ऑनलाईन जुगाराची जाहिरात करतात. २०२५ या वर्षात ५० कोटींपेक्षा अधिक भारतीय ऑनलाईन जुगार खेळत असल्याचे समोर आले आहे.‌ ऑनलाईन जुगार चालवणारी अनेक आस्थापने विदेशी असून हा सर्व पैसा विदेशात जात असल्याचे सांगितले जाते. केंद्र सरकारचा वस्तू आणि सेवा कर (जी.एस.टी.) बुडवल्याच्या प्रकरणी सरकारने ऑनलाइन जुगार चालवणार्‍या आस्थापनांना ५५ हजार कोटी रुपयांचा कर भरण्याची नोटीस बजावली आहे. त्यात केवळ ‘ड्रीम इलेव्हन’ची २५ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. ऑनलाईन जुगाराच्या विरोधात देशातील केवळ आसाम, तेलंगाणा, आंधप्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांनी कायदे केले आहेत; मात्र राज्यांनी केलेले कायदे अपुरे पडत असून तमिळनाडूतील कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. एकूणच राज्यनिहाय कायदे अपुरे ठरत असल्याने राष्ट्रव्यापी कठोर कायदा हाच एकमेव प्रभावी उपाय असल्याचे सुराज्य अभियानाचे म्हणणे आहे.

मंगळवार, २९ जुलै, २०२५

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे चीनार पुस्तक महोत्सव

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे चीनार पुस्तक महोत्सव श्रीनगर, दि. २९ जुलै राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे (नॅशनल बुक ट्रस्ट) येत्या २ ते १० ऑगस्ट दरम्यान श्रीनगर येथे चीनार पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदा दुसरे वर्ष असून हा महोत्सव शेर-ए-कश्मीर आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्रात (एसकेआयसीसी) येथे होणार आहे. शारदा लिपीविषयक प्रदर्शन, काश्मीरी, गोजरी, डोगरी आणि अन्य स्थानिक बोलीभाषांवर चर्चा, बदलत्या काळानुसार साहित्य, करोनानंतर डिजिटल युगात कथाकथनाचे बदलते स्वरूप, साहित्य लेखन, प्रकाशन आणि वाचन यावर पुस्तक महोत्सवात चर्चा, परिसंवाद, पुस्तक प्रकाशन, काव्यवाचन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. पुस्तक विक्रेते, प्रकाशक, लेखकांचाही सहभाग असणार आहे.

राज्य शासनाचे उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय‌ आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता/सेवक पुरस्कार जाहीर

राज्य शासनाचे उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय‌ आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता/सेवक पुरस्कार जाहीर - येत्या १२ ऑगस्ट रोजी पुरस्कार वितरण मुंबई, दि २९ जुलै राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवकांना दिल्या जाणाऱ्या डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. २०२३-२४ या वर्षासाठीचे हे पुरस्कार असून यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार शहरी विभागात चार आणि ग्रामीण विभागात तीन उत्कृष्ट ग्रंथालयांना त्यांच्या वर्गवारीनुसार जाहीर करण्यात आले आहेत. शहरीभागासाठी रोख रक्कम अनुक्रमे एक लाख ते २५ हजार रुपये, ग्रामीण भागासाठी ७५हजार ते २५ हजार अनुक्रमे आणि सन्मानचिन्ह प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) पुरस्कार राज्यस्तरावर दोघांना जाहीर झाले असून पुरस्कार रक्कम ५० हजार रुपये अशी आहे. विभागस्तरावर पाच जणांना पुरस्कार जाहीर झाले असून डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार विभागस्तरावर सहा जणांना जाहीर झाले आहेत.‌ रोख २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या १२ ऑगस्ट रोजी पाटकर सभागृह, एसएनडीटी महिला विद्यापीठ, चर्चगेट मुंबई येथे एका कार्यक्रमात पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. पुरस्कार पुढीलप्रमाणे उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार शहरी विभाग सार्वजनिक वाचनालय, शिवाजी चौक, कल्याण पश्चिम, ता.कल्याण, जि.ठाणे सर्वात्मक वाचनालय, बापू बंगला स्टॉप, इंदिरानगर, नाशिक ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय, वाघापूर, ता.जि.यवतमाळ शिल्पकार ल. ना. भालेराव सार्वजनिक वाचनालय, पंचवटी, नाशिक ग्रामीण विभाग स्व. समीर (तात्या) सोनटक्के वाचनालय, चोराखळी, ता. कळंब, जि. धाराशिव बलराम सार्वजनिक वाचनालय, फुलउमरी, ता. मानोरा, जि. वाशिम प्रगती सार्वजनिक वाचनालय, सिल्ली (आंबाडी) जि. भंडारा डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार राज्यस्तरीय ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) धनंजय वसंतराव पवार, अध्यक्ष, श्री. गुणवंतराव रामचंद्र पाटील सार्वजनिक वाचनालय, हासाळा, पो. बुधोडा, ता. औसा, जि. लातूर राज्यस्तरीय ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) श्रध्दा अशोक आमडेकर, ग्रंथपाल, श्री सदगुरु लोकमान्य वाचनालय देवरुख, तालुका संगमेश्वर, जिल्हा-रत्नागिरी विभागस्तरीय पुरस्कार अमरावती: श्री. रामभाऊ पंढरी मुळे, सचिव, छत्रपती शाहू सार्वजनिक वाचनालय, मु. पो. हनुमान नगर, अकोला, ता.जि. अकोला. छत्रपती संभाजीनगर: श्री. खंडेराव साहेबराव सरनाईक, अध्यक्ष, श्री संत ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालय, केंद्रा बु., ता. सेनगाव, जि. हिंगोली. नाशिक: श्री. राहुलकुमार मालजी महिरे, अध्यक्ष, बौध्दवासी शांताई महिरे वाचनालय, आखाडे, मु.पो. आखाडे, ता. साक्री, जि.धुळे पुणे: श्री. दत्तात्रय सखाराम देशपांडे, अध्यक्ष, ज्ञानदा मोफत वाचनालय, जरळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर मुंबई: श्री. सुभाष सीताराम कुळकर्णी, अध्यक्ष, प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय वाशी, नवी मुंबई डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार* अमरावती: श्री. अनंत श्रीराम सातव, ग्रंथपाल, सरस्वती वाचनालय, पातुर्डा बु., ता.संग्रामपूर, जि.बुलडाणा छत्रपती संभाजीनगर: श्री. सूर्यकांत कमलाकर जाधव, ग्रंथपाल, विवेकानंद वाचनालय, आलमला, ता. औसा, जि. लातूर नागपुर: श्री. खेमचंद अंताराम डोंगरवार, ग्रंथपाल,श्रीमती सोनाबाई सितारामजी खुणे सार्वजनिक वाचनालय, नवेगाव / बांध, ता.अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया नाशिक: श्री. चिंतामण संतोष उगलमुगले, ग्रंथपाल, ओंकार नगर सार्वजनिक वाचनालय, ओंकारनगर, पेठ रोड, ता.जि. नाशिक पुणे: श्रीमती रुपाली यशवंत मुळे, ग्रंथपाल, श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालय, सातारा. मुंबई: श्री. संजय काशिनाथ शिंदे, ग्रंथपाल, नगर वाचन मंदिर, मालवण, जि. सिंधुदुर्ग

बुधवार, २३ जुलै, २०२५

'अर्पण' सांगितिक मैफलीत १७५ शिष्यांचे बासरी वादन

'अर्पण'सांगितिक मैफलीत १७५ शिष्यांचे बासरी वादन ठाणे, दि. २३ जुलै ठाण्यातील गुरुकुल प्रतिष्ठानच्यावतीने येत्या २७ जुलै रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सकाळी दहा वाजता ‘अर्पण’ या सांगितीक मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात गुरुकुल प्रतिष्ठानच्या १७५ बासरीवादक शिष्यांचे सामूहिक बासरीवादन होणार आहे. ज्येष्ठ बासरीवादक पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. गुरूंप्रती कृतज्ञता, संगीताप्रती समर्पण आणि संस्कृतीप्रती आदर या उद्देशाने ‘अर्पण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. कार्यक्रमाचे यंदा १३ वे वर्ष असून यावेळी पं. विवेक सोनार यांचेही बासरी वादन होणार आहे. कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.

लोकल प्रवासात फुलली प्रेमाची गोष्ट'! 'मुंबई लोकल' येत्या १ ऑगस्टला प्रदर्शित होणार

लोकल प्रवासात फुलली प्रेमाची गोष्ट'! 'मुंबई लोकल' येत्या १ ऑगस्टला प्रदर्शित होणार मुंबई, दि. २३ जुलै मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल प्रवासात त्याची आणि तिची नजरानजर होते आणि सुरू होतो दोघांचेही आयुष्य बदलणारा प्रवास. त्या दोघांची ही गोष्ट 'मुंबई लोकल' या आगामी मराठी चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या १ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात अभिनेते स्वप्नील जोशी यांच्या विशेष उपस्थितीत चित्रपटाच्या ट्रेलरचे प्रकाशन व सादरीकरण करण्यात आले. अभिनेता प्रथमेश परब, ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.‌ चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अभिजीत यांनी केले असून बिग ब्रेन प्रॉडक्शन्स, आनंदी एंटरटेनमेंट आणि स्प्लेंडिड प्रॉडक्शन्सने चित्रपटाची निर्मिती केली आहे. आयुष्यात प्रत्येक गोष्ट गमावत असलेली ती आणि आयुष्यातली प्रत्येक लढाई हरत असलेला तो 'मुंबई लोकल' प्रवासात एकमेकांना पाहतात. प्रवासातच त्यांच्या प्रेमकहाणीला हिरवा कंदील मिळतो. पण पुढे त्यांच्या आयुष्यात जे घडते ते चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटात मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे इत्यादी कलाकार आहेत.