मंगळवार, २९ एप्रिल, २०२५
जगद्गुरु आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त डोंबिवलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
जगद्गुरु आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त
डोंबिवलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
जगद्गुरु आद्य शंकराचार्य सेवा समिती तर्फे शंकराचार्य जयंतीनिमित्त येत्या २ आणि ३ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उपनिषद सेवा मंडळ आणि संस्कृत भारती यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक स्तोत्र पठण आणि पंधरावा गीता अध्याय पठण होणार आहे. २ मे रोजी रोजी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत विद्यार्थी श्रीमद् भगवद् गीतेच्या १५ व्या अध्यायाचे सामुहिक पठण करणार आहेत.
सामूहिक स्तोत्र पठण कार्यक्रमात डोंबिवलीतील उपनिषद सेवा मंडळ, संस्कृत भारत, दुर्वांकुर, डोंबिवली कीर्तन कुलसंस्था, श्री गोविंद विश्वस्त न्यास, समग्र श्री विष्णू सहस्त्रनाम समूह, स्वामींचे घर या संस्थांचे सुमारे पावणेदोनशे सदस्य सहभागी होणार आहेत.
२ मे या दिवशी सकाळी साडेसहा ते रात्रीपर्यंत काकड आरती, रुद्राक्ष पूजा, सामूहिक उपनयन, कुंकुमार्चन, भजन, अष्टवंदन, तर ३ मे रोजी सकाळी साडेसहा ते दुपारी एकपर्यंत रुद्र स्वाहाकार होम, 'आद्य शंकराचार्य यांचे तत्वज्ञान' या विषयावर प्रवचन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत.
हे सर्व कार्यक्रम अगरवाल हॉल, मानपाडा रस्ता , डोंबिवली पूर्व येथे होणार आहेत, नागरिक, भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन जगद्गुरु आद्य शंकराचार्य सेवा समितीचे लक्ष्मीकांत कुलकर्णी, उपनिषद सेवा मंडळाचे गंगाधर पुरंदरे यांनी केले आहे.
सोमवार, २८ एप्रिल, २०२५
सुलट प्रेमाची उलट गोष्ट 'मंगलाष्टक रिटर्न'!
सुलट प्रेमाची उलट गोष्ट 'मंगलाष्टक रिटर्न'!
मुंबई, दि. २८ एप्रिल
'सुलट प्रेमाची उलट गोष्ट' अशी टॅगलाईन असलेला 'मंगलाष्टक रिटर्न' हा चित्रपट येत्या २३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित करण्यात आले आहे.
एकमेकांचे राजकीय विरोधक असलेल्या दोन कुटुंबांतील युवक व युवती एकाच महाविद्यालयात एकत्र येतात. एकमेकांचे विरोधक असलेल्या कुटुंबात व या दोघांच्याही आयुष्यात पुढे काय घडते?
हे ' मंगलाष्टक रिटर्न' मध्ये पाहायला मिळणार आहे.
वृषभ शाह, शीतल अहिरराव या नव्या जोडीसह चित्रपटात प्रसाद ओक, आनंद इंगळे, सक्षम कुलकर्णी, सोनल पवार, कमलेश सावंत, सुनील गोडबोले, प्रसन्न केतकर इत्यादी कलाकार आहेत.
शारदा फिल्म्स प्रॉडक्शनच्या वीर कुमार शहा यांनी निर्मिती या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले असून डॉ. भालचंद्र यांनी कथा आणि संवादलेखन, पी. शंकरम यांनी संगीत दिग्दर्शन, विकास सिंह यांनी छायांकन, एस. विक्रमन यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे.
तर महाराष्ट्रातील हे शेवटचे हिंदुत्वनिष्ठ सरकार ठरेल - रणजित सावरकर
बांगलादेशी घुसखोरांना हाकलले नाही, तर महाराष्ट्रातील हे शेवटचे हिंदुत्वनिष्ठ सरकार ठरेल - रणजित सावरकर
मुंबई, दि. २८ एप्रिल
येत्या पाच ते दहा वर्षांत महाराष्ट्रातील बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढले नाही, तर सध्याचे सरकार हे शेवटचे हिंदुत्वनिष्ठ सरकार ठरेल, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी येथे केले.
विक्रम भावे लिखित 'दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येथील दादर येथील काशीनाथ धुरू सभागृह शनिवारी पार पडला. त्यावेळी सावरकर बोलत होते. सावरकर यांच्यासह हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक, लेखक भावे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
पहलगाम येथील आक्रमण हे हिंदू म्हणून केलेले पहिले आक्रमण नाही. यापूर्वी काश्मिरमधून काश्मिरी पंडीतांना हिंदू म्हणूनच निर्वासित करण्यात आले होते. बंगालमधील मुर्शिदाबाद येथे यापूर्वीच हिंदूंच्या क्रूरपणे हत्या करण्यात आल्या. त्यामुळे अशा घटनांचा प्रतिशोध घेतला गेला नाही, हिंदू संघटित होत नाहीत, तोपर्यंत अशी आक्रमणे सुरुच रहातील. दहशतवादी जर धर्म म्हणून हिंदूंना गोळ्या घालत असतील, तर धर्मासाठी हिंदू मुसलमानांवर आर्थिक बहिष्कार का टाकू शकत नाहीत ? असा प्रश्न सावरकर यांनी उपस्थित केला.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (‘सीबआय’ने) मला आणि हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अन् अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांना विनाकारण गोवून आमचा तीव्र मानसिक छळ केला. हिंदुत्वाचे कार्य करणाऱ्याला येनकेनप्रकारेण खोट्या गुन्ह्यात अडकवून यंत्रणा कशा कार्य करतात, याचे प्रत्यक्ष स्वरूप तुम्हाला या पुस्तकातून पाहायला, अनुभवायला मिळेल, असे भावे यांनी सांगितले. तर विक्रम भावे यांचे पुस्तक म्हणजे हिंदूंच्या शौर्याचे कहाणी आहे , असे अधिवक्ता पुनाळेकर म्हणाले तर सत्याचा चेहरा नीटपणे दिसण्यासाठी आपण जागे व्हायला हवे, असे आवाहन अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी केले. दाभोलकरांची हत्या हिंदुत्वनिष्ठांनी केल्याचे नॅरेटिव्ह निर्माण करण्यासाठी काही लोक कार्यरत होते, असे वर्तक यांनी सांगितले.
नतद्रष्ट 'नट'रंगवाला
नतद्रष्ट 'नट'रंगवाला...
काश्मीर पंडितांना जीवे मारले, काश्मीरमधून हुसकावून लावले तेव्हा नतद्रष्ट 'नट'रंगवाल्याला तिथे जावेसे वाटले नाही. बैसरन- पहलगाम येथील काही स्थानिकांचीही या निर्घृण व क्रूर नरसंहारासाठी दहशतवाद्यांना मदत झाली असे समोर आले आहे.
अशा परिस्थितीत दहशतवाद्यांना मदत करणा-या स्थानिकांचे आर्थिक कंबरडे मोडण्यासाठी पर्यटकांनी काही काळ काश्मीरमध्ये पर्यटनासाठी जाऊ नये, असा एक मतप्रवाह पुढे येत आहे. तो चुकीचा नाही. समाजातील तथाकथित सेलिब्रिटीनींही या चळवळीत सहभागी झाले पाहिजे. मात्र अपवाद वगळता उलटेच चित्र पाहायला मिळते आहे.
स्थानिक व्यावसायिकांचा कळवळा काही जणांना आला असून हे सेलिब्रिटी तमाम भारतीयांना खिजवून हे शूरवीर मुद्दामच काश्मीरला जात आहेत. खरे तर तमाम भारतीयांनी या नतद्रष्टांवर आणि त्यांच्या कलाकृतींवर बहिष्कार टाकून व्यक्त त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.
सुरुवात नतद्रष्ट 'नट'रंगवाल्यापासून...
शेखर जोशी
२८ एप्रिल २०२५
शुक्रवार, २५ एप्रिल, २०२५
सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले
सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले. अशी वक्तव्ये पुन्हा केली तर सर्वोच्च न्यायालयाकडून त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असेही न्यायालयाने गांधींना सुनावले.
न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायाधीश मनमोहन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. महाराष्ट्रातील अकोला येथील एका सभेमध्ये राहुल गांधींनी सावरकारांचा जाणीवपूर्वक अपमान केला, असा आरोप करत वकील नृपेंद्र पांडे यांनी त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील सत्र न्यायालयात खटला दाखल केला आहे. न्यायालयाने राहुल यांना समन्स बजावले होते. त्याविरोधात त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळली
सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी ‘माफी वीर’ अशी टिप्पणी केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्यसैनिकांची चेष्टा करू नका, असे सुनावले. महात्मा गांधी यांनीही ब्रिटिशांशी संवाद साधताना स्वतःसाठी 'तुमचा विश्वासू सेवक' या शब्दांचा वापर केला होता, हे राहुल गांधी यांना माहीत आहे का? असा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राहुल गांधींचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांना विचारला.
मंगळवार, २२ एप्रिल, २०२५
हिंदी अनिवार्य न करता ऐच्छिक ठेवणार
पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी
अनिवार्य न करता ऐच्छिक ठेवणार
- शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
मुंबई, दि. २२ एप्रिल
नवीन शैक्षणिक धोरण राबविताना सुकाणू समितीने घेतलेल्या निर्णयानुसार पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा विषय अनिवार्य करण्यात आला होता. तथापि हिंदी भाषा विषय ऐच्छिक ठेवण्याबाबतचा सुधारित शासन निर्णय काढला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
सर्व शाळा व अंगणवाड्यांचे जिओटॅगिंग करण्यासाठी एमआरसॅक ॲप
सुरु करण्यात आले आहे.'पीएमश्री' शाळेच्या धर्तीवर राज्यात 'सीएम श्री' आदर्श शाळा उभारण्यात येणार आहे. तसेच ‘आनंद गुरुकुल’ उपक्रमाअंतर्गत प्रत्येक विभागात एक निवासी शाळा सुरू करून त्यात कला, क्रीडा व एआय (AI) प्रशिक्षणासह स्पेशालिटी शिक्षण दिले जाईल. शिक्षकांवरील शिक्षणबाह्य कामांचे ओझे कमी करण्यासाठी १५ समित्यांचे एकत्रीकरण करून आता फक्त चार समित्या ठेवण्यात आल्या आहेत, असेही भुसे यांनी सांगितले.
राज्यात सीबीएससी पॅटर्नमधील चांगल्या बाबींचा स्वीकार करत, त्यानुसार राज्याच्या अभ्यासक्रमात सुधारणा केल्या जाणार आहेत. तथापि राज्य शिक्षण मंडळ, बालभारती राज्याचा इतिहास, भूगोल याविषयी कुठेही तडजोड होणार नाही, असे भुसे यांनी स्पष्ट केले.
सोमवार, २१ एप्रिल, २०२५
सोनी मराठी वाहिनीवर आज काय बनवू या...?
सोनी मराठी वाहिनीवर येत्या ५ मेपासून ‘आज काय बनवू या...? मधुरा स्पेशल’ हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.
‘मधुराज् रेसिपीज्’ या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या मधुरा बाचल हा कार्यक्रम सादर करणार आहेत. महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या पाककृती आणि प्रेक्षकांचे आवडते पदार्थ यात पाहायला मिळतील.
सोमवार ते शुक्रवार, दुपारी एक वाजता कार्यक्रम प्रसारित होणार आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतातील विशेष खाद्यपदार्थ कार्यक्रमात तयार करून दाखवले जाणार आहेत.
योगी आदित्यनाथ यांना शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना
शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण
लखनऊ, दि. २१ एप्रिल
सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गोवा येथे येत्या
१७ ते १९ मे या कालावधीत‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे निमंत्रण सोमवारी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देण्यात आले.
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या ‘स्वागत समिती’तील (डॉ.) चारुदत्त पिंगळे, जौनपूर, मडियाहू विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्रकुमार पटेल,विश्वनाथ कुलकर्णी आदी उपस्थित होते.
सनातन संस्था’निर्मित श्रीरामाचे सात्त्विक चित्र असलेली मोठी प्रतिमा
हिंदु जनजागृती समितीने निर्मिलेली ‘हिंदू राष्ट्र आवश्यक क्यो ?’, ‘हिंदू राष्ट्र स्थापना की दिशा’, ‘हिंदू राष्ट्र खंडण एवं आक्षेप’ आणि ‘हलाल जिहाद’ ही हिंदी भाषेतील पुस्तके मुख्यमंत्री
योगी आदित्यनाथ यांना भेट देण्यात आली.
सध्या हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहेत. अधिकाधिक हिंदूंना संघटित करणे आवश्यक आहे. अशा कार्यक्रमाच्या माध्यमांतून अधिकाधिक हिंदूंना संघटित करण्याचे काम सुरू ठेवावे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सनातन संस्थेच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या कल्याणला जोडल्या जाणाऱ्या अर्धवट बांधकामाचे थडगे
ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या कल्याणला
जोडल्या जाणाऱ्या अर्धवट बांधकामाचे थडगे
ही छायाचित्रे डोंबिवली पूर्व भागातील ठाकुर्ली परिसरातील आहेत. छायाचित्रे पाहताक्षणी ती मेट्रो रेल्वेच्या कामाची आहेत असे वाटेल. पण नाही. ही छायाचित्रे आहेत डोंबिवली पूर्व व पश्चिम परिसराला जोडणा-या ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या कल्याणला जाणाऱ्या अर्धवट बांधकामाची.
ठाकुर्ली उड्डाणपुल नव्याने बांधला तो आत्ता जेवढ्या रुंदीचा आहे त्यापेक्षा अधिक रुंद व मोठा असायला हवा होता. मुळात तो पुढील २५/ ५० वर्षांचा विचार करून बांधायला हवा होता तसा बांधला गेला नाही. पुन्हा काही वर्षांनी तो पाडून नवा बांधण्यासाठीच असा बांधला असावा असा 'अर्थ' असावा.
याच पुलाची एक बाजू ( डोंबिवली पश्चिमेकडून पूर्वेकडे येताना डावीकडची आणि डोंबिवली पूर्व भागातून पश्चिमेला येताना उजवीकडची) आज वर्षानुवर्षे तशीच अर्धवट अवस्थेत आहे. ही बाजू ठाकुर्ली पूर्व स्थानकापर्यंत आणण्यात आलेली आहे. आधी असे सांगितले गेले होते की ही बाजू/ उड्डाणपुल थेट पत्रीपुलाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे डोंबिवलीहून कल्याणला आणि कल्याणहून डोंबिवलीला लांबचा फेरा न घेता अवघ्या काही मिनिटांत जाता येईल. पण म्हणे माशी शिंकली. या मार्गात एक वसाहत ( झोपडपट्टी) आडवी येत होती. ती हटविल्याशिवाय पुलाचे बांधकाम पुढे सरकणार नव्हते. अजूनही ती जागा मोकळी झालेली नाही.
हे एक बरे असते. सर्वपक्षीय राजकारण्यांनी गळ्यात गळे घालून रेल्वे मार्गाचा आजुबाजूचा भाग, रेल्वे किंवा शासकीय यंत्रणांच्या मालकीच्या मोकळ्या जागा हेरून तिथे अनधिकृत बांधकामे उभी करायची. इतकी वर्षे झाली म्हणून नंतर ती नियमित करायची. किंवा काही विकास कामे करायची असली की अनधिकृत बांधकामे तोडायला विरोध करायचा, पुनर्वसन झालेच पाहिजे म्हणून आंदोलने करायची. हे सर्व नीट मार्गी लागले तर ठिक. नाहीतर प्रकल्प रखडला किंवा खर्च वाढला.
ठाकुर्ली उड्डाणपुलाचा कल्याणला जाण्याच्या मार्गातील हा अडथळा आता दूर झाला आहे असे म्हणतात. पण तसे झाले असले तरी आता ही अर्धवट राहिलेली बाजू ठाकूर्लीला ९० फूट रस्त्यावर उतरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. अर्धवट असलेली ही बाजू आधीप्रमाणे कल्याणला पत्रीपुलापर्यंत न्यायची म्हटली तरी ते कठीण होणार आहे. कारण या मार्गात आता ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पुर्व पश्चिम जोडणारा पादचारी पूल व सरकता जिना बांधण्यात आला आहे. त्यामुळे हे बांधकाम आधी पाडावे लागेल. आणि तसे केले तर यावर केलेला खर्च वाया जाईल. आणि म्हणूनच ही बाजू आता ठाकुर्ली ९० फूट रस्त्यावर उतरविण्यात येणार आहे, असे म्हणतात.
अर्थात आजच्या ( २१ एप्रिल २०२५) तारखेपर्यंत तरी कामाच्या बाबतीत काही हालचाल असल्याचे दिसले नाही. स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना त्यांच्या अन्य महत्त्वाच्या कामातून वेळ मिळाला तर कदाचित ते या अनेक वर्षे रखडलेल्या कामात लक्ष घालतील. किंवा कडोंमपाची निवडणूक आली की मतं मिळवण्यासाठी पुन्हा या कामाचे ढोल पिटतील,
आम्ही काहीतरी काम करतोय असे दाखविण्याचे नाटक करतील. बघू या...
शेखर जोशी
२१ एप्रिल २०२५
गुरुवार, १७ एप्रिल, २०२५
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव'संकेतस्थळाचे उदघाटन
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव'संकेतस्थळाचे उदघाटन
पणजी, दि. १७ एप्रिल
सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त येत्या १७ ते १९ मे
या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.
SanatanRashtraShankhnad.in या इंग्रजी भाषेतील संकेतस्थळाचे उदघाटन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.
संकेतस्थळावर सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव, सनातन राष्ट्राचा उद्देश; सनातन राष्ट्राचा शंखनाद करताचे भगवान श्रीकृष्णाचे बोधचिन्ह; सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा परिचय, सनातन संस्थेची माहिती; कार्यक्रमाला उपस्थित रहाणारे संत, महंत, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रतिष्ठित व्यक्ती यांची माहिती, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला
याची माहिती देण्यात येणार आहे.
राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार भीमराव पांचाळे यांना जाहीर
व्ही.शांताराम, राज कपूर जीवन गौरव
आणि लता मंगेशकर पुरस्कार जाहीर
- महेश मांजरेकर,अनुपम खेर,भीमराव पांचाळे
काजोल देवगण,मुक्ता बर्वे मानकरी
मुंबई, दि. १७ एप्रिल
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारे व्ही.शांताराम, राज कपूर जीवन गौरव आणि लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. पुरस्कारांचे वितरण येत्या २५ एप्रिल रोजी एन.एस.सी.आय. डोम, वरळी
येथे होणार आहे.
या वर्षीचा चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे. १० लाख रुपये रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, मानपत्र असे याचे स्वरूप आहे्.चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार
अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना जाहीर झाला असून ६ लाख रुपये, स्मृतीचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
राज कपूर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल देवगण यांना जाहीर झाला आहे.दोन्ही पुरस्कार अनुक्रमे १० लाख रुपये व ६ लाख या रकमेचे आहेत.
१९९३ पासून देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी मराठीतील ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांना जाहीर झाला आहे. १० लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र असे याचे
स्वरुप आहे.
संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे येत्या
२० एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता गेट वे
ऑफ इंडिया येथे खास सांगीतिक मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमात सुरेश वाडकर, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, उर्मिला धनगर, नंदेश उमप आदी कलाकार सहभागी होणार आहेत.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून विनामूल्य सन्मानिका
शिवाजी नाट्य मंदिर व रवींद्र नाट्य मंदिर येथे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर देण्यात येणार आहेत, असेही ॲड.शेलार यांनी सांगितले.
परकीय भाषा किंवा संस्कृत सक्तीची करावी, हिंदीची सक्ती नकोच
परकीय भाषा किंवा संस्कृत सक्तीची करावी,हिंदीची सक्ती नकोच
शेखर जोशी
आधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाऐवजी 'सीबीएससी' बोर्ड यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येणार असे सांगितले आणि आता पहिलीपासून हिंदीची सक्तीची. हा अट्टहास कशासाठी? पहिलीपासून एखादी भाषा सक्तीचीच करायची असेल तर अन्य एखादी परभाषा सक्तीची करावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात नोकरी, करिअरसाठी त्याचा नक्कीच फायदा होईल. भारतीय भाषांची जननी असलेली संस्कृत भाषाही सक्तीची करता येईल.
महाराष्ट्रातील इंग्रजी माध्यमाच्या खासगी तसेच सीबीएससी/ आयसीएससी बोर्डाच्या शाळांमध्ये पहिलीपासून मराठी सक्तीची आहे की करायची याबाबत आपल्या इथे संभ्रमच असतो. सरकार किंवा शिक्षण मंत्री बदलला की या ठिकाणी मराठी सक्तीची केली जाईल, अशी घोषणा नव्याने केली जाते. इंग्रजी माध्यमाच्या किती खासगी शाळा, सीबीएससी/ आयसीएससी बोर्डाच्या शाळांमध्ये काटेकोर अंमलबजावणी होते? ज्या संस्था याची अंमलबजावणी करत नाहीत, त्यांच्या विरोधात काय कठोर कारवाई केली जाते? आत्तापर्यंत केली गेली, या शाळांची मान्यता रद्द केली का? हे सर्व प्रश्न अनुत्तरितच आहेत. आणि त्यात आता हिंदीची सक्ती.
आपल्याकडे आपण मराठी माणसे अनोळखी मराठी माणसाशी- तो मराठी आहे हे कळेपर्यंत हिंदीतच बोलत असतो. अमराठी भाषिकांशीही हिंदीत बोलतो. हिंदी चित्रपट, मालिकांमुळे लहानपणापासूनच आपल्या प्रत्येक मराठी माणसांना हिंदी भाषा मुंबईय्या हिंदीत का होईना पण बोलता येते, कळते, समजते. समोरच्या माणसाचे विचार कळण्यासाठी आणि आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी भाषेची गरज भासते. हिंदी भाषा हे काम पहिल्यापासून महाराष्ट्रात करत आहेच. पुढे एखाद्याला हिंदी भाषा, साहित्य यात गोडी निर्माण झाली तर तो विद्यार्थी, माणूस हिंदी भाषेतील साहित्याची ओळख आपणहून करून घेईल, त्यासाठी हिंदीची सक्ती का?
पहिलीपासून एखादी भाषा सक्तीचीच करायची असेल तर अन्य एखादी परभाषा सक्तीची करावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात नोकरी, करिअरसाठी त्याचा नक्कीच फायदा होईल. भारतीय भाषांची जननी असलेली संस्कृत भाषाही सक्तीची करता येईल. जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी तिची ओळख आहे. विशिष्ट वर्गाची किंवा उच्चवर्णीय लोकांची भाषा असा शिक्का त्यावर मारला गेल्यामुळे खूप नुकसान झाले आहे. म्हणजे जगातील अनेक विद्वानांनी आपल्याकडील संस्कृत ग्रंथांचा अभ्यास केला, त्यावर संशोधन केले, संगणकासाठीही संस्कृत भाषा अधिक योग्य असल्याचे सांगितले आणि आपण मात्र या भाषेचा दुस्वास केला, करत आहोत आणि यापुढेही करत राहू ही खेदाची बाब आहे.
हिंदी भाषा अद्यापही अधिकृतपणे आपली राष्ट्रभाषा होऊ शकलेली नाही. केंद्रात आणि अनेक राज्यांत भाजप व मित्रपक्ष सत्तेवर आहेत. जे कॉग्रेसने इतक्या वर्षांत केले नाही, ते केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने करावे. आज संपूर्ण भारतात हिंदी हिच एकमेव अशी भाषा आहे की ती ९०/९५ टक्के भारतीय नागरिकांना सहज कळते, समजते आणि बोलता येते. दाक्षिणात्य राज्यांचा हिंदी भाषेला असलेला टोकाचा विरोध सोडला तर अन्य राज्यांचा अगदी महाराष्ट्राचाही विरोध नाही. पण म्हणून महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीची सक्तीची करणे आवश्यक नाही, अयोग्य आहे. आपण त्रिभाषा सुत्राचा स्वीकार केला आहे. त्यामुळे त्या त्या राज्यातील स्थानिक भाषा, नंतर राष्ट्रभाषा/ राष्ट्रीय भाषा म्हणून हिंदी आणि तिस-या क्रमांकावर इंग्रजी याची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही हे पाहिले जावे.
शेखर जोशी
१७ एप्रिल २०२५
बुधवार, १६ एप्रिल, २०२५
राज्यातील बालिका आणि बालक आश्रमांचे सर्वेक्षण करा- डॉ. नीलम गोऱ्हे
राज्यातील बालिका आणि बालक
आश्रमांचे सर्वेक्षण करा- डॉ. नीलम गोऱ्हे
ठाणे, १६ एप्रिल
राज्यातील बालिका आणि बालक आश्रमांचे सर्वेक्षण करून अवैध आश्रमांवर कठोर कारवाई केली जावी, असे आदेश विधान परिषदेच्याउपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी दिले.
ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन डॉ. गोऱ्हे यांनी
उल्हासनगर येथील ठाणे जिल्हा महिला व बाल विकास विभागाला भेट दिली. पीडित २० मुली आणि ९ मुले यांच्याशीही संवाद साधला.
या प्रकरणातील पीडित मुली आणि मुलांचे शिक्षण खंडित होता कामा नये. त्यांना सुरक्षित आणि निर्भय वातावरण मिळावे. मुली व मुलांना कुठे राहायचे आहे, याबाबत बाल न्यायालय निर्णय घेईल,
असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. जिल्हा परिषद किंवा महापालिकेच्या शाळांमध्ये एकच पत्ता असलेली मुले आढळल्यास, त्या ठिकाणी अवैध बालिका आश्रम आहेत का तसेच 'पसायदान' संस्थेत जिथे पीडित मुले राहत होती तिथे प्रत्येक मुलाचा पत्ता ‘रेल्वे स्टेशन’ असा नमूद असून हे अत्यंत संशयास्पद आहे. ही मुले खरंच स्टेशनवर राहत होती का? की संस्थाचालकांनी मुद्दाम चुकीची माहिती दिली? याचीही चौकशी करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणाच्या अनुषंगाने उल्हासनगर शहरातील इतर सामाजिक प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा करून येत्या महिन्यात आढावा बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिधापत्रिका तपासणी मोहिम सुरू
शिधापत्रिका तपासणी मोहिम सुरू
ठाणे, १६ एप्रिल
ठाणे जिल्ह्यातील अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी (केशरी) आणि शुभ्र शिधापत्रिकांची तपासणी करण्यात येत असून ही शोधमोहीम येत्या ३१ मेपर्यंत सुरू राहणार आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सूचनेनुसार ही मोहिम राबविण्यात येत आहे.
शोधमोहिमेत अपात्रठरलेल्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांना शासनाने विहित केलेल्या अर्जाचा नमुना देण्यात येणार आहे. शिधापत्रिकाधारक कुटुंबांनी हा अर्ज परिपूर्ण माहिती आणि आवश्यक त्या कागदपत्रांसह शिधावाटप दुकानात (रास्त भाव दुकान) सादर करावयाचा आहे.
अर्ज तहसिलदार कार्यालयाकडे प्राप्त झाल्यानंतर त्याची छाननी करण्यात येणार असून आवश्यक कागदपत्रांची पुर्तता न करणाऱ्या कुटुंबांच्या शिधापत्रिका अपात्र ठरविण्यात येणार आहेत. पडताळणीअंती शासकीय/निमशासकीय कार्यालयातील/खाजगी कंपन्यातील कर्मचारी/कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न एक लाखांहून जास्त असेल अशा कर्मचाऱ्यांकडे पिवळी/केशरी शिधापत्रिका असेल तर ती शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरवून रद्द केली जाणार आहे.
शोध मोहिमेदरम्यान मयत, स्थलांतरीत, दुबार नोंद झालेल्या लाभार्थ्यांना वगळण्यात येईल, तसेच चुकीची अथवा खोटी माहिती व कागदपत्रे दिल्यास संबंधित शिधापत्रिका धारकांविरुध्द योग्य ती कारवाई केली जाणार आहे.
शिधापत्रिकाधारक कुटुंबांनी विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण कागदपत्रांसह रास्त भाव दुकानदाराकडे जमा करावा, असे अवाहन ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे यांनी केले आहे.
डिजिटल शिक्षण पोर्टल‘महाज्ञानदीप’चे उदघाटन
डिजिटल शिक्षण पोर्टल‘महाज्ञानदीप’चे उदघाटन
मुंबई, दि. १६ एप्रिल
डिजिटल शिक्षणाच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली असून 'महाज्ञानदीप’या देशातील पहिल्या डिजिटल शिक्षण पोर्टलचे उदघाटन
बुधवारी मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले.
,‘महाज्ञानदीप’ उपक्रमांतर्गत एक हजार तज्ज्ञ प्राध्यापक घडविण्याचा संकल्प आहे. आतापर्यंत १५० प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP-2020) अंतर्गत 'भारतीय ज्ञान प्रणाली – जेनेरिक' (IKS - Indian Knowledge System - Generic) हा अभ्यासक्रम मराठी भाषेत तयार केला आहे. हा अभ्यासक्रम या पोर्टलवर अपलोड करण्यात आला असून जगभरातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असल्याचे पाटील यांनी सांगितले.
या उपक्रमात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचा सहभाग आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सजीव सोनवणे, आयआयटी गांधीनगरचे प्रा. समीर सहस्त्रबुद्धे तसेच राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव, प्राध्यापक, विविध विद्याशाखांचे संचालक यावेळी उपस्थित होते.
चांगली सुविधा न देणाऱ्या हॉटेल्सचे थांबे रद्द करा
चांगली सुविधा न देणाऱ्या हॉटेल्सचे थांबे रद्द करा
-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश
मुंबई, दि. १६ एप्रिल
लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या
हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा मिळत नसतील तर असे थांबे रद्द करण्याचे आदेश परिवहन मंत्री आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले.
या संदर्भात सध्या सुरू असलेल्या सर्व थांब्याचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पुढील १५ दिवसात सादर करण्याच्या सूचनाही एसटीचे
उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना केल्या.
लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस विविध हॉटेल-मोटेल थांब्यावर थांबतात. तेथे प्रवाशांना चहा -नाष्टा अथवा जेवण तसेच नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो. परंतु अनेक हॉटेलमधील थांब्या बाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असून प्रामुख्याने प्रसाधनगृहे अस्वच्छ असणे, फराळाचे जिन्नस शिळे, अशुद्ध व महाग असणे, याचबरोबर संबंधित हॉटेल वरील कर्मचारी व मालकांची वर्तणूक एस टी प्रवासांच्या सोबत अत्यंत वाईट असणे अशा तक्रारी आल्या आहेत.
या तक्रारींची दखल घेऊन मंत्री सरनाईक यांनी हे आदेश दिले.
कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रवाशांच्या आरोग्याशी
कोणती तडजोड न करता संबंधित हॉटेल-मोटेल थांब्यावर कारवाई करावी, अशी स्पष्ट सूचनाही सरनाईक यांनी केली.
मंगळवार, १५ एप्रिल, २०२५
राज्यातील २० 'आय.टी.आय'मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार
राज्यातील २० 'आय.टी.आय'मध्ये
अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार
मुंबई, दि. १५ एप्रिल
राज्यातील २० 'आय.टी.आय'मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा
उभारण्यात येणार आहेत. तसेच सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी उद्योजक मेळावे आयोजित करून रोजगार निर्मिती करणे,राज्यातील 'आयटीआय' मध्ये शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक शिक्षण आणि रोजगार संधीही वाढविण्यात येणार आहेत.
कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि श्री. श्री. ग्रामीण विकास कार्यक्रम ट्रस्ट बंगलोर, स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन बेंगलोर, पुण्याची देआसरा फाउंडेशन, अंधेरी येथील प्रोजेक्ट मुंबई या सामाजिक संस्थामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी सामंजस्य करार करण्यात आले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, कौशल्य विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त नितीन पाटील व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, सहसंचालक सतीश सुर्यवंशी, श्री श्री रुरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त विजय हाके, स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशनच्या सीएसआर प्रमुख रिचा गौतम, दामिनी चौधरी, प्रोजेक्ट मुंबईचे संचालक जलज दानी, दे आसरा या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पंडित यावेळी उपस्थित होते.
या कराराच्या माध्यमातून स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन या संस्थेतर्फे आगामी तीन वर्षाच्या कालावधीत राज्यातील 20 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून इलेक्ट्रिशियन या व्यवसायाच्या कार्यशाळाची दर्जा वाढ करण्यात येणार आहे. तसेच सोलार टेक्निशियन लॅब व इंडस्ट्रियल ऑटोमेशन लॅब उभारून देण्यात येणार आहेत.स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन तर्फे राज्यातील वीजतंत्री व्यवसायाच्या सर्व शिल्प प्रदेशांना बेंगलोर येथे आधुनिक तंत्रज्ञान व सॉफ्ट स्किल्सचे पंधरा दिवसांचे प्रशिक्षण मोफत देण्यात येईल, असेही करारात नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील विविध विभागांतील २० शासकीय आयटीआय केंद्रांची निवड करण्यात आली असून यात मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, नाशिक इत्यादी विभागांचा समावेश आहे.
पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी 'मोक्षकाष्ठ'
'निसर्गस्नेही अनंतयात्रा'कार्यक्रमात
विजय लिमये यांच्याशी संवाद
- पर्यावरणपूरक अंत्यविधिसाठी 'मोक्षकाष्ठ'चा पर्याय
शेखर जोशी
डोंबिवली, दि. १५ एप्रिल
विवेकानंद सेवा मंडळ आणि स्वच्छ डोंबिवली अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १९ एप्रिल रोजी डोंबिवलीत'निसर्गस्नेही अनंतयात्रा'
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.देशभरात पर्यावरणपूरक अंत्यविधीची चळवळ रुजविणार-या 'मोक्ष काष्ठ' या अभिनव संकल्पनेचे जनक आणि पर्यावरणप्रेमी विजय लिमये कार्यक्रमात डोंबिवलीकरांशी संवाद साधणार आहेत.
मृतदेहाचे परंपरागत पद्धतीने दहन करण्यासाठी लाकडांचा वापर केला जातो. लाकडांना पर्याय म्हणून शेती कचऱ्यापासून तयार करण्यात येणाऱ्या 'मोक्ष काष्ठ'चा पर्याय समोर आणला आहे.या उपक्रमातून आतापर्यंत ३० हजार पर्यावरणपूरक अंत्यविधी झाले असून साठ हजारांहून अधिक झाडे वाचली आहेत. 'मोक्षकाष्ठ'सह लिमये यांनी दहनभूमी स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठीही समाजात सकारात्मक मतपरिवर्तन घडवून आणले आहे.
हा कार्यक्रम संध्याकाळी साडेसहा वाजता विवेकानंद सेवा मंडळ, ज्ञान मंदिर, नेरूरकर रोड, दत्त नगर चौक, डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे.पर्यावरणप्रेमी डोंबिवलीकरांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक संस्थांनी केले आहे.
शेतात पीक घेतल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या पिकांचा नको असलेला भाग, शेतातील पालापाचोळा व अन्य शेतकचरा न जाळता त्यापासून पर्यावरणपूरक 'मोक्षकाष्ठ' तयार करण्यात येत आहेत . नौदलातून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर लिमये यांनी 'इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशन'च्या माध्यमातून पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार करण्यासाठी 'मोक्षकाष्ठ' ही जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमातही लिमये यांच्या या पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार संकल्पनेविषयी माहिती दिली होती.
शेखर जोशी
१५ एप्रिल २०२५
सोमवार, १४ एप्रिल, २०२५
सहा डझनांहून अधिक छायाचित्रांचा चेहरे फलक!
सहा डझनांहून अधिक छायाचित्रांचा चेहरे फलक!
चेहरे फलकावर सहा डझनांहून अधिक ( एकूण ७७)
छायाचित्रे लावून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- आठवले गटाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. या आधी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजप डोंबिवलीने दोन डझनांहून अधिक छायाचित्रे असलेला चेहरे फलक लावून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
आत्तापर्यंत या जागेवर शिवसेना, भाजपचे चेहरे फलक लावले जात होते, आता त्यात आरपीआय- आठवले गटाची भर पडली आहे.
उद्या हे नामफलक झाकून लोकमान्य टिळक किंवा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती/ पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचे चेहरे फलक लावले गेले तर ते ही चुकीचेच व अयोग्य आहे. त्याचे समर्थन कधीच करणार नाही.
मुळात रस्ते व चौक यांचे नामफलक झाकून आपले चेहरे फलक लावणेच चुकीचे आहे. सर्वपक्षीय राजकारण्यांनो कधीतरी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. शुभेच्छा, अभिवादन, अभिनंदनाचे चेहरे फलक लावून शहर विद्रुप करू नका.
आरपीआय- आठवले गटाने असे चेहरे फलक शहरातील अनेक रस्ते व चौकात लावले आहेत. मुळात असे चेहरे फलक लावले जाऊ नयेत आणि लावायचेच असतील आणि सर्वपक्षीय राजकारण्यांना आपले चेहरे दाखविण्याची हौस असेल तर रस्ता, चौक यांचे नामफलक झाकले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, एवढीच अपेक्षा. अर्थात निलाज-या व कोडग्या सर्वपक्षीय राजकारण्यांकडून ती कधीच पूर्ण होणार नाही हे माहीत आहे. तरीही समाज माध्यमातून सतत लिहितो. कधीतरी, कोणालातरी सुबुद्धी झाली तर?
शेखर जोशी
१४ एप्रिल २०२५
रविवार, १३ एप्रिल, २०२५
'हरियाली' डोंबिवलीची रोपवाटिका
हरियाली या स्वयंसेवी संस्थेच्या डोंबिवली शाखेने द साऊथ इंडियन असोसिएशन संचालित महाविद्यालयाच्या प्रांगणात रोपवाटीका तयार केली आहे.
डोंबिवली जिमखाना रस्ता,बालाजी मंदिराजवळ,डोंबिवली पूर्व येथे ही रोपवाटिका असून पर्यावरण जतन व संवर्धन हा उद्देश यामागे आहे. सतीश जोशी, बाळकृष्ण कुडे हे ज्येष्ठ नागरिक व त्यांचे सहकारी दर गुरूवार व रविवार या दोन दिवशी सकाळी ९ ते ११ या वेळेत इथे असतात.
शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक यांनी या कामात किमान काही वेळ मानद सेवा द्यावी, असे आवाहन जोशी व कुडे यांनी केले आहे.
सतीश जोशी - 98335 45767
बाळकृष्ण कुडे- 93220 07586
यावर केलेल्या व्हिडिओची लिंक
शेजो उवाच
'हरियाली' डोंबिवलीची रोपवाटिका
https://youtu.be/Q5_vuCi8k5M?si=KlFcHENVLx_qAtc6
शनिवार, १२ एप्रिल, २०२५
'चित्रपताका' महोत्सवाची नावनोंदणी प्रक्रिया सुरू
'चित्रपताका'महोत्सवाच्या नावनोंदणी प्रक्रिाेला सुरूवात
मुंबई, दि. १२ एप्रिल
महाराष्ट्र शासनाच्या 'चित्रपताका' या पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाच्या नाव नोंदणीला सुरुवात झाली आहे. चित्रपट रसिकांना https://evnts.info/chitrapatakafest2025
या लिंकवर ऑनलाइन नावनोंदणी करता येणार आहे.तसेच प्रभादेवी, दादर येथील पु .ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात ऑफलाइन पद्धतीनेही नावनोंदणी करता येणार असून महोत्सवात विनामूल्य प्रवेश आहे.
महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ व पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २१ ते २४ एप्रिल दरम्यान पु.ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी,दादर येथे हा महोत्सव होणार आहे.
महोत्सवामध्ये प्रेक्षकांना नाटकांसह विविध विषयांवरील ४१ आशयघन चित्रपट विनामूल्य पाहता येणार आहेत.परिसंवाद, मुलाखत,
कार्यशाळाही यावेळी होणार आहेत.
हिंदू जनजागृती समितीतर्फे सामूहिक गदापूजन
हिंदूंमधील शौर्य जागृती आणि सामर्थ्य वाढविण्यासाठी
सामूहिक गदापूजन कार्यक्रम- डॉ. उदय धुरी
- देशभरात ५०० ठिकाणी आयोजन
ठाणे,दि.१२ एप्रिल
हिंदू समाजात शौर्य जागृती आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांतर्फे हनुमान जन्मोत्साच्या निमित्ताने शनिवारी संपूर्ण देशात सामूहिक गदापूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते,असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी केले.
मारुतीरायांची ‘गदा’केवळ युद्धातील अस्त्र नव्हे,तर ती धर्मरक्षणाचा संकल्प,अन्यायाविरुद्ध उभे राहणे आणि भगवंताच्या कार्यासाठी अहर्निश झटण्याचे प्रतिक आहे, असेही डॉ. धुरी यांनी सांगितले.
देशभरात ५०० ठिकाणी तर ठाणे जिल्ह्यात ठाणे,डोंबिवली,भिवंडी, बदलापुर,अंबरनाथ इत्यादी ठिकाणी गदापूजन झाले. या सर्व कार्यक्रमात युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, असेही डॉ. धुरी म्हणाले.
कार्यक्रमांची सुरुवात शंखनादाने झाली.सामूहिक प्रार्थना,‘गदापूजन, श्री हनुमानाची आरती,मारुति स्तोत्रपठण केल्यानंतर ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजपही करण्यात आला.‘रामराज्याच्या स्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. तसेच‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’घेण्यात आली.हिंदू जनजागृती समितीकडून
देशभरात गेली तीन वर्षे सामूहिक ‘गदापूजन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांशीसंबंधित ठिकाणांना भेट देण्याचा उपक्रम
'अमृत भारत स्थानक' योजनेत बेलापूर डोंबिवली, टिटवाळा, शहाडचा समावेश
'अमृत भारत स्थानक' योजनेत बेलापूर
डोंबिवली, टिटवाळा, शहाडचा समावेश
मुंबई, दि. १२ एप्रिल
भारतीय रेल्वेच्या 'अमृत भारत स्थानक' योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला असून यात
ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, टिटवाळा, शहाड, दिवा आणि बेलापूर या स्थानकांचा समावेश आहे.
या योजनेअंतर्गत देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ही माहिती दिली.
शुक्रवार, ११ एप्रिल, २०२५
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आता दर महिन्याच्या ७ तारखेला होणार
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आता
दर महिन्याच्या ७ तारखेला होणार
- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
मुंबई, ११ एप्रिल
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचा पगार आता
प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला होईल, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी मुंबईत केली.
सरनाईक यांनी शुक्रवारी वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांची भेट घेतली. या बैठकीत महामंडळ व कर्मचारी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर झाली चर्चा झाली.
पुढील महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी लागणारा निधी एक महिना आधीच राज्य सरकार एसटी महामंडळाला हस्तांतरित करणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
१ हजार ७६ कोटी रुपयांची मागणी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केली होती, त्यापैकी १२० कोटी रुपये आता देण्यात येणार असून उर्वरित रक्कम तीन टप्प्यात राज्य शासनाकडून महामंडळाला देण्यात येणार असल्याचे सरनाईक म्हणाले.



















































