सोमवार, १९ मे, २०२५
महाराष्ट्राची बदललेली भाषा आणि वाणी क्लेशदायक- माजी न्यायमूर्ती धर्माधिकारी
महाराष्ट्राची बदललेली भाषा आणि वाणी क्लेशदायक
- माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी
मुंबई, दि. १९ मे
महाराष्ट्राची बदललेली सामाजिक, राजकीय संस्कृती, भाषा आणि वाणी क्लेशदायक असून हे चित्र बदलण्यासाठी आपण सर्वांनी सामूहिक प्रयत्न करू या, असे आवाहन माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी रविवारी येथे केले.
ज्येष्ठ निवृत्त नाट्य व्यवस्थापक, रंगकर्मी यांच्या संकल्पनेतून साकारलेले 'अध्यक्ष नसलेले 'माझे' असेही एक पत्रकार संमेलन'
दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे साजरे झाले. त्या संमेलनात धर्माधिकारी बोलत होते. विविध मराठी वृत्तपत्रातील जुने, नवे आणि ज्येष्ठ पत्रकार संमेलनास उपस्थित होते.
सामान्य माणसालाही सामान्य माणसासारखे वागता येत नाही, बोलता येत नाही. ही मुळ्ये काकांची फार मोठी खंत आहे. लोकं असे का वागतात, का बोलतात? फक्त युद्धजन्य परिस्थिती आली की आपण सर्व एकत्र येतो. बाकीच्या वेळी एकत्र का येऊ शकत नाही ? महाराष्ट्रात सध्या भाषा आणि वाणीचे हे जे काही झाले आहे ती मुळ्ये काकांची वेदना आहे, आपण सर्व पत्रकार आहात, आज ती वेदना मी आपल्यापर्यंत पोहोचवित आहे, असेही धर्माधिकारी म्हणाले.
मुळ्ये काकांना सुचणा-या कल्पना भन्नाट असतात. आगळे वेगळे कार्यक्रम, संमेलने आयोजित करून ते आपल्याला जे काही देतात त्याचे मोल करता येणार नाही. ते अनमोल आहे. मुळ्ये काकांसारख्या व्यक्ती समाजासाठी आवश्यक असतात. आपण त्यांच्या कायम ऋणात राहिले पाहिजे, असे माझ्या वडिलांनी मला सांगितले होते, मी तोच प्रयत्न करतो, असेही धर्माधिकारी यांनी सांगितले.
माध्यमांपासून खरेतर न्यायालयांनी दूर राहिले पाहिजे. नागरिकांचे जे काही म्हणणे असते ते कोणालाच समजत नसते. काही जागरूक पत्रकार/ प्रसार माध्यमांच्यामार्फत ते न्यायाधीश/ न्यायालयापर्यंत पोहोचत असते. पण तरीही तो संबंध चांगला नाही. आज बरेचदा काय होते की भावनेच्या भरात लोकं काहीही बोलतात. त्याने न्यायालयाचा अवमान होत नाही, पण ती संधी मिळू शकते. आणि ते झाले की जे अपरिमित नुकसान होते ते भरता येत नाही, अशी खंतही धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा आचार्य अत्रे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांना जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने रविवारच्या पत्रकार संमेलनात धर्माधिकारी यांच्या हस्ते म्हात्रे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना म्हात्रे म्हणाले, तीन दशकांच्या पत्रकारितेत खूप शिकायला मिळाले. समाजाबरोबरच स्वतःला बदलण्याचे सामर्थ्य पत्रकारितेत आहे. मुळ्ये काका हे एक वेगळेच रसायन असून त्यांच्या सारखी निस्पृह वृत्तीने काम करणारी माणसे विरळाच. उपेक्षितांच्या अंतरंगात डोकावून पाहण्याचे त्यांचे काम खूप मोठे आहे. एबीपी माझाचे प्रसन्न जोशी यांनी म्हात्रे यांचा परिचय करून दिला.
'माझ्या खिशात दमडा नाही पण ज्यांच्या खिशात दमडा आहे ते सारे माझ्या खिशात आहेत', अशा शब्दांत शाब्दिक फटकेबाजीने सुरुवात करत पत्रकार संमेलन घेण्यामागील संकल्पना आणि आजवर आयोजित केलेले अनेक आगळे वेगळे कार्यक्रम, संमेलने, उपक्रम याची सविस्तर माहिती मुळ्ये काकांनी दिली.
अनेक मंडळी, संस्था माझ्यावर भरभरून प्रेम करतातच आणि माझ्या सर्व कार्यक्रमांना सढळ हस्ते आर्थिक मदतही करतात.आजवर केलेल्या सर्व कार्यक्रमांना प्रसिद्धी देऊन ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सर्व वृत्तपत्रे, वृत्तपत्रांचे संपादक आणि पत्रकारांनी केले आहे. या सर्वांच्या सहकार्यानेच आपण हे कार्यक्रम करत असतो. आजवरच्या आयुष्यात या सर्व मंडळींच्या विश्वासाला मी तडा जाऊ दिला नाही, आणि यापुढेही जाऊ देणार नाही. या सर्वांचा मी ऋणी आहे, असेही मुळ्ये काकांनी सांगितले.
संमेलनात विद्या करलगीकर, डॉ.शिल्पा मालंडकर आणि
प्रसिद्ध गायक श्रीरंग भावे यांनी अविट गोडीची मराठी भावगीते व चित्रपट गीते सादर केली. त्यांना प्रसाद पंडित (तबला) व सागर साठे (संवादिनी) यांनी संगीतसाथ केली. ' या सुखानो या' गाण्याने सुरू झालेल्या मैफलीची सांगता श्रीरंग भावे यांनी गायलेल्या विविध अभंगांच्या मेडलीने झाली.
-शेखर जोशी
१९ मे २०२५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...
1 टिप्पणी:
छान कव्हरेज
टिप्पणी पोस्ट करा