मंगळवार, ७ मार्च, २०१७

दिवाकर रावते यांचा 'बोलाचा भात आणि बोलाचीच कढी'


परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा 'बोलाचा भात आणि बोलाचीच कढी'!

या पूर्वीही रावते कल्याण-डोंबिवलीत अरे होते तेव्हाही त्यांनी मुजोर आणि बेशिस्त रिक्षाचालकांना धडा शिकविण्याच्या घोषणा केल्या होत्या. मात्र त्या हवेतच विरल्या. कल्याण-डोंबिवलीत मीटरसक्ती लागू केली जाईल, ज्या प्रवाशांना मीटरनुसार प्रवास करायचा असेल त्यांना तो करता येईल, जे रिक्षाचालक मीटरनुसार रिक्षा चालविणार नाहीत त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, कल्याण येथे मीटर प्रमाणे ज्यांना प्रवास करायचा असेल त्यांच्यासाठी स्वतंत्र रांग असेल वगैरे, वगैरे घोषणा, आश्वासने फक्त कागदावर राहिली आहेत.

मुजोर रिक्षाचालकाकडून एस.टी.च्या चालकाला मारहाण झाल्याच्या प्रकरणी रावते कल्याण येथे आले होते. अशा काही घटना घडल्या, बेशिस्त व मुजोर रिक्षाचालकांच्या बाबतीत वृत्तपत्रे व अन्य प्रसारमाध्यमातून बातम्या आल्या की रावते यांच्यासह परिवहन विभाग, आरटीओ, वाहतूक पोलीस या सगळ्यांना जाग येते. रिक्षा चालक-मालक संघटनांचे नेतेही आम्हाला प्रवाशांचा किती कळवळा आहे याचा देखावा करतात. पुन्हा ये रे माझ्या मागल्या.

खरे तर शेअर पद्धत बंद करा, अशी कोणाचीही मागणी नाही. ती सुरुच ठेवण्यात यावी. पण ज्या प्रवाशांना मीटरनुसार प्रवास करायचा असेल त्यांच्यासाठी रिक्षाचालकांनी कोणतेही कारण न देता मीटर टाकावे इतकीच सर्वसामान्य प्रवाशांची माफक अपेक्षा आहे. डोंबिवलीत पूर्वेहून पश्चिमेला किंवा पश्चिमेहून पुर्वेला जायचे असेल तर केवळ उड्डाणपूल पार करावा लागतो, परतीचे भाडे मिळत नाही अशी कारणे सांगून रिक्षाचालक मनमानी पद्धतीने अव्वाच्या सव्वा पैसे मागतात. प्रवाशांची ही लूट वर्षानुवर्षे सुरु आहे.

रावते साहेब कल्याण-डोंबिवलीतील मुजोर रिक्षाचालकांना तुम्हाला खरोखरच धडा शिकवायचा असेल तर पहिल्यांदा ते मनावर घ्या. प्रसारमाध्यमातून बातम्या आल्या की केवळ तात्तुरती मलमपट्टी करु नका. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्वपक्षीय रिक्षा संघटनांच्या नेत्यांना व पदाधिकाऱयांना पहिल्यांदा वठणीवर आणा. त्यांनी प्रवासी हिताचीच भूमिका घ्यावी अशी तंबी त्यांना द्या. कल्याण-डोंबिवलीतील बहुतांश रिक्षातळ हे शेअर पदधतीचे आहेत. मध्यंतरी मीटरनुसार रिक्षांची वेगळी रांग करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्याला यश आले नाही. त्यामुळे मीटर पद्धतीची वेगळी रांग न करता रिक्षातळावर (मग प्रवासी एकटा रिक्षात बसला आणि त्याला मीटरनुसार जायचे असले) तरी किंवा रिक्षातळसोडून अन्यत्र कुठेही प्रवाशाने रिक्षा पकडली तरीही प्रवाशाने मीटर टाका सांगितले तर रिक्षाचालकाने कोणतीही खळखळ न करता मीटर डाऊन केले पाहिजे, अशा सूचना सर्व रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱयांना द्या.ा त्यांनी आपापल्या रिक्षासंघटनेत त्याची कशी अंमलबजावणी करायची ते त्यांच्यावर सोपवा. पण हे तातडीने झालेच पाहिजे, अशा सूचना सर्वपक्षीय रिक्षा संघटनेचेने नेते आणि पदाधिकाऱयांना द्या. शिवसेनाप्रणित रिक्षासंघटनेपासून याची सुरुवत करुन अन्य संघटनांसाठी एक नवा आदर्श घालून द्या.

कल्याण-डोंबिवलीतील सर्वच रिक्षा संघटनांचे नेते राजकीय पक्षांचे पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी आहेत. त्या सगळ्यांना हजारो प्रवाशांपेक्षा मुठभर रिक्षाचालकांचे हित जपण्यात जास्त धन्यता वाटते. डोंबिवलीत पश्चिमेला पं. दिनदयाळ चौकात, पश्चिमेलाच रेल्वेस्थानक फलाट क्रमांक एकच्या बाहेर (कल्याण दिशेकडे आणि विष्णू नगर पोलीस ठाण्यासमोर) बेशिस्त व मुजोर रिक्षाचालक रस्ता अडवून वाटेल तशा रिक्षा उभ्या करतात. ना रिक्षा संघटनांचे पदाधिकारी किंवा नेते, ना वाहतूक पोलीस ना आरटीओ कोणीही त्यांना वठणीवर आणू शकलेले नाही. इथे केवळ रिक्षाचालक दोषी नाहीत तर रिक्षात बसणारे प्रवासीही तेवढेच दोषी आहेत.

अन्य काही सूचना

-डोंबिवली पश्चिमेला रेल्वेस्थानकाबाहेर रस्ता अडविणाऱया रिक्षाचालकांच्या विरोधात सातत्याने काही दिवस मोहिम राबवा.

-डोंबिवली पश्चिमेला सारस्वत बॅंकेसमोरील फलाट क्रमांक एकच्या बाहेर कडोंमपा परिवहन सेवेचा केलेला बस थांबा कल्याणच्या दिशेकडे (फलाट क्रमांक एक) सरकवा. म्हणजे रस्ता अडविणाऱया बेशिस्त रिक्षाचालकांना लगाम बसेल.

-डोंबिवली पश्चिमेला रेल्वेस्थानक ते कोपर रस्ता, रेल्वेस्थानक ते पं. दिनदयाळ रस्तामार्गे रेतीबंदर, रेल्वेस्थानक ते गरिबाचा वाडा, नवापाडा, गणेशनगर आदी मार्गावर तातडीने कडोंमपाची परिवहन बससेवा सुरु करा.

-महिन्यातून किमान एकदा तरी कल्याण-डोंबिवलीत भेट द्या आणि प्रवासी सघटना, वाहतूक पोलीस, आरटओ यांची एकत्रित बैठक घ्या.

-सर्व रिक्षातळांवर शेअर पद्धतीचे भाडे कुठून किती त्याचे तसेच रिक्षातळावरील रांगेतील रिक्षात प्रवासी बसल्यानंतर प्रवाशाने मीटरनुसार जाण्यास सांगितले तर रिक्षाचालकाने गेले पाहिजे, असे फलक तातडीने लावण्याच्या सूचना वाहतूक पोलीस आणि आरटीओ अधिकाऱयांना द्या.

सोमवार, ६ मार्च, २०१७

व्होडाफनचा मराठी द्वेष


व्होडाफोनचा मराठी द्वेष डोंबिवली पश्चिमेच्या व्होडाफोन गॅलरीत मराठी आकड्यातील टोकननंबर घेत नाहीत. फक्त इंग्रजीतलेच घेतात. त्यावरुन ग्राहक आणि तेथील कर्मचारी यांच्यात वाद झाला. मराठीतील टोकन नंबर दिले आणि ते न स्वीकारल्यावरुन सोमवारी सकाळी एका ग्राहकाचा व तेथील कर्मचारयाचा वाद झाला. तो ग्राहक तेथील महिला कर्मचाऱयाला म्हणाला, हा टोकन नंबर तुमच्याच सुरक्षा रक्षकाने मला दिला आहे.मराठीत लिहिलेला (मराठी आकडे) टोकन नंबर तुम्ही घेत नसाल तर बाहेर तसा फलक लावा.

त्यावर तेथील महिला कर्मचारयाने त्या ग्राहकाला, आमच्याकडे मराठीतले नाही तर इंग्रजीतलेच टोकन नंबर स्विकारले जाते. तुम्ही पुन्हा नवीन इंग्रजीत लिहिलेले टोकन घ्या. तुम्ही म्हणता तसा बाहेर फलक लावणे आम्हाला करता येणार नाही. तुमची जी तक्रार असेल ती आमच्या मुख्य कार्यालयाकडे करा असे उत्तर दिले. हा वाद ऐकून तो सुरक्षा रक्षक त्या ग्राहकाकडे आला व मी तुम्हाला इंग्रजीत दुसरे टोकन देतो असे सांगितले. त्या ग्राहकाने विचारणा केली की आता हे नवीन टोकन नंबर घेऊन मी पुन्हा माझा नंबर येईपर्यंत वाट पाहायची का? त्यावर व्होडाफोनच्या त्या महिला कर्मचाऱयाने शांतपणे हो असे उत्तर दिले.

यातून काही प्रश्न समोर येतात.

मुळात टोकननंबरवरील मराठीतील आकडा त्या ग्राहकाने लिहिलेला नव्हता. तो व्होडाफोन गॅलरीतील सुरक्षा रक्षकानेच लिहून दिलेला होता. मग त्या सुरक्षा रक्षकाने तो आकडा इंग्रजीतच लिहायचा, म्हणजे मग काहीच प्रश्न आला नसता. किंवा व्होडाफोन गॅलरीतील कर्मचाऱयांनी त्यांच्याकडे नोंद करताना ती इंग्रजीत करायची, व्होडाफोन गॅलरीत असलेल्या संगणकावर मराठी आकडे स्वीकारले जात नसतील तर त्यांनी त्यांच्या संगणकावर तसा बदल तातडीने करुन घेण्याची आवश्यकता आहे. टोकननंबर देण्याचे जे यंत्र असेल त्यावरही मराठी आकडे नसतील तर ते टाकून घेण्याची व्यवस्था तातडीने झाली पाहिजे.

टोकन नंबरवरील आकडा इंग्रजीतूनच असला पाहिजे हा अट्टहास का? मुळात सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात, मुंबईत ते ही महाराष्ट्राच्या राजधानीत मराठीतील टोकन नंबर का स्वीकारले जात नाह? हे धोरण फक्त व्होडाफोनच्या डोंबिवलीतील गॅलरीत आहे? की व्होडाफोनच्या सगळ्या ठिकाणी असणाऱया गॅलरीत असेच चालते. केंद्र शासनाच्या त्रिभाषा सुत्रानुसार मराठी, हिंदी आणि इंग्रजी असाच कामकाजाचा/ व्यवहाराचा क्रम असला पाहिजे. व्होडाफोनने त्या सुत्रालाच हरताळ फासला आहे. मध्यंतरी एका बॅंकेच्या एटीएम केंद्रावरही गुजराथी भाषेतील पर्याय असल्याचे तसेच वीजदेयक की मोबाईलचे देयकही गुजराथी भाषेत पाठवले गेल्याचे समोर आले होते.

व्होडाफोनचा हा मराठी द्वेष संतापजनक आहे. मराठीच्या नावाने टाहो फोडणाऱया राजकीय पक्षानी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी (आमदार व खासदार) या प्रश्नाकडे तातडीने लक्ष ध्यावे. मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मराठीतील टोकन नंबर नाकारले जाण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी.

-शेखर जोशी

रविवार, ५ मार्च, २०१७

रविराज...


देखणे व्यक्तिमत्त्व, हसरा आणि प्रसन्न चेहरा लाभलेल्या या व्यक्तिमत्त्वाचे खरे नाव रवींद्र अनंत कृष्णा राव. चित्रपटासाठी त्यांचे ‘रविराज’ असे नामकरण झाले आणि आज ते याच नावाने ओळखले जातात. मराठी, हिंदूी, गुजराथी चित्रपट आणि मराठी व्यावसायिक रंगभूमीवर २५ वर्षांहून अधिक काळ काम केलेले पण आता रुपेरी दुनिया आणि झगमगटापासून पूर्णपणे दूर गेलेले अभिनेते रविराज आजच्या ‘पुनर्भेट’चे मानकरी आहेत.

रविराज यांचा जन्म मंगलोरचा. ते नऊ महिन्यांचे असताना त्यांचे वडील अनंत कृष्णा राव हे नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आले आणि रविराज मुंबईकरच झाले. रविराज या नावावरून किंवा त्यांच्या बोलण्यावरून ते अमराठी आहेत, असे अजिबात वाटत नाही. कानडी भाषिक असलेल्या रविराज यांचे शालेय शिक्षण मुंबईतच ‘डीजीटी’ अर्थात ‘धरमसी गोविंदजी ठाकरसी’ या मराठी शाळेत तर इंटपर्यंतचे शिक्षण के. सी. महाविद्यालयात, विज्ञान शाखेतील ‘बीएस्सी’पर्यंतचे पुढील शिक्षण रुपारेल महाविद्यालयात झाले. शाळेत असताना इयत्ता नववीच्या स्नेहसंमेलनात त्यांनी एका नाटकात काम केले होते. खरे तर इंटरनंतर त्यांना पुण्याच्या ‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट’ (एफटीआय) मध्ये प्रवेश घ्यायचा होता. पण घरच्यांना ते पसंत नव्हते. पदवीधर हो, नोकरी कर आणि सुरक्षित आयुष्य जग, अशी एक सर्वसाधारण मध्यमवर्गीय अपेक्षा होती. त्यामुळे त्यांनी तो विचार सोडून दिला आणि पुढे शिकायचे ठरविले. शिक्षण पूर्ण झाले आणि लगेचच त्यांना ‘प्रॉडक्शन केमिस्ट’ म्हणून जे. एन. मॉरिसन (आताची निव्हिया कंपनी) कंपनीत नोकरीही मिळाली. १९६६ ते १९७० या कालावधीत ते येथे नोकरी करत होते. पुढे ती कंपनी मुंबईतून बंगलोरला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. कोणतीही अगदी एक रुपयाही पगारवाढ मिळणार नव्हती. त्यामुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. आता पूर्णपणे मोकळे झाल्याने चित्रपटात जायच्या त्यांच्या इच्छेने पुन्हा उचल खाल् ली आणि पुढचे काही महिने त्यांचा संघर्ष सुरू झाला.

चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावरच्या प्रवेशाविषयी ते म्हणाले, ती एक गंमत आणि योगायोगच आहे. आम्ही राहात होतो त्या ठिकाणी गटार तुंबले होते. सर्वत्र घाण पाणी पसरलेले असायचे. दरुगधी यायची. मुंबई महापालिकेत तक्रार अर्ज देऊन, तिथे जाऊन, वारंवार खेपा घालूनही ते गटार काही दुरुस्त होत नव्हते. एके दिवशी रागारागाने मी आमचे स्थानिक नगरसेवक प्रभाकर निखलणकर यांच्या घरी गेलो आणि रागाच्या भरात त्यांना हे सगळे सांगितले. त्यांनी सर्व शांतपणे ऐकून घेतले आणि हे काम होईल असे सांगितले. खरी गंमत तर पुढेच आहे. निखलणकर यांनी मला ‘सध्या काय करताय?,’ असा प्रश्न केला. त्यावर मी नोकरीचा राजीनामा दिला असून सिनेमात काम करण्याची इच्छा असल्याचे त्यांना सांगितले. त्यावर त्यांनी मला गाडीत बसायला सांगितले आणि संगीतकार व ‘शुरा मी वंदिले’ या चित्रपटाचे निर्माते श्रीकांत ठाकरे यांच्या घरी घेऊन गेले. निखलणकरही त्या चित्रपटाचे एक निर्माते होते. आपण चित्रपट करतोय आणि त्या चित्रपटात याला हिरो म्हणून घेतोय असे त्यांनी ठाकरे यांना सांगितले. सरला येवलेकर त्यात माझी नायिका होती. खरे तर चित्रपटात माझी भूमिका खलनायकाची. पण तो चित्रपटातील शेवटचा धक्का होता. चित्रपटात मला ‘अरे दु:खी जीवा बेकरार होऊ नको’ हे गाणे होते. मोहंमद रफी यांनी चित्रपटासाठी पाश्र्वगायन केलेले ते पहिले मराठी गाणे.

खरे तर ‘आहट’ हा हिंदीतील माझा पहिला चित्रपट. पण काही र्वषाच्या खंडांनतर रेंगाळलेला हा चित्रपट प्रदर्शित झाला. दरम्यान, मी काम केलेला गुलजार यांचा ‘अचानक’ हा हिंदी आणि राजा ठाकूर दिग्दर्शित ‘जावई विकत घेणे आहे’ हे चित्रपट ‘आहट’च्या आधी प्रदर्शित झाले. ‘आहट’मध्ये विनोद मेहरा, जया भादुरी,अमरीश पुरी, डॉ. श्रीराम लागू, रमेश देव, सतीश दुभाषी (जया भादुरीच्या वडिलांची भूमिका), धर्मेंद्र पाहुणा कलाकार अशी मंडळी होती. रमेश देव, डॉ. लागू आणि अमरिश पुरी हे तिघेही त्यात खलनायक होते. चित्रपटाचे निर्माते किशोर रेगे यांच्यामुळे ‘आहट’ मला मिळाला. तो चित्रपट वेळच्या वेळी तयार होऊन प्रदर्शित झाला असता तर कदाचित हिंदीतही मी पुढे आलो असतो. पण ते झाले नाही, अशी खंतही रविराज यांनी व्यक्त केली. १९७२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जावई विकत घेणे आहे’चे दिग्दर्शन राजा ठाकूर यांचे होते. एक दिवस त्यांनी रविराज यांना भेटायला बोलाविले आणि ‘जावई विकत घेणे आहे’ साठी त्यांची नायक म्हणून निवड झाली. गणेश सोळंकी, शरद तळवलकर, मधुकर तोरमडल, राजा बापाट, रुही आदी कलाकार त्यात होते. हा चित्रपट गाजला आणि त्यातील रविराज आणि रुही यांच्यावर चित्रित झालेले ‘या मिलनी रात्र ही रंगली’ हे गाणे लोकप्रिय झाले. या चित्रपटाने रविराज यांना नाव आणि प्रसिद्धी मिळाली. नंतर रविराज यांनी ‘ओवाळिते भाऊराया’, ‘तूच माझी राणी’, ‘रूप पाहता लोचनी’, ‘देवापुढे माणूस’, ‘अजातशत्रू’, ‘दोस्त असावा तर असा’, ‘जावयाची जात’, ‘नणंद भावजय’, ‘भन्नाट भानू’ आदी मराठी चित्रपट केले. ‘ओवाळिते भाऊराया’मधील ‘बाजार फुलांचा भरला, मज तुळस दिसेना, मज बहीण दिसेना’, ‘दोस्त असावा तर असा’ चित्रपटातील ‘जे जे सुंदर ते माझे घर मी तर आहे मस्त कलंदर’, ‘जावयाची जात’मधील ‘प्रिया सखी चंद्रमुखी जवळ ये जरा, माझ्या प्रितपाखरा’ ही त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी गाजली. ‘अन्यायाचा प्रतिकार’ हा त्यांनी काम केलेला शेवटचा मराठी चित्रपट. रविराज यांनी ‘अचानक’, तीन चेहरे’, ‘एक चिठ्ठी प्यार भरी’, ‘चांद का टुकडा’ आणि गाजलेल्या ‘खट्टा मिठा’ या हिंदी चित्रपटातही भूमिका केल्या. यातील ‘थोडा है थोडे की जरुरत है’ आणि ‘रोल गोल माकुनिसा’ ही गाणी गाजली. ‘मेघनी रात’, ‘गाजर नी पिपुडी’, जे पीड परायी जानी रे’ आदी गुजराती चित्रपटही त्यांच्या नावावर जमा आहेत.

मधुसुदन कोल्हटकर यांचे ‘शबरी’ हे त्यांनी काम केलेले पहिले मराठी व्यावसायिक नाटक. त्यानंतर ‘डार्लिग डार्लिग’ यासह मधुसुदन कालेलकर यांची ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘दिल्या घरी तू सुखी राहा’ ही नाटके तसेच ‘हिट अ‍ॅण्ड हॉट’च्या जमान्यात ‘बदफैली’, ‘डाग’, ‘सेक्सी’ अशी नाटकेही केली. या सर्व नाटकांच्या त्यांनी केलेल्या एकूण प्रयोगांची संख्या तीन हजार इतकी आहे. रामानंद सागर यांच्या ‘श्रीकृष्ण’ मालिकेत त्यांनी ‘गर्ग’ मुनी साकारले होते. ‘अदालत’, ‘एअर होस्टेस’, ‘शिव पुराण’आदी हिंदी मालिकांमधूनही त्यांच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली. देखणे व्यक्तिमत्त्व, प्रसन्न आणि हसरा चेहरा असलेला हा अभिनेता सध्या रुपेरी दुनिया आणि मायावी झगमगटापासून पूर्णपणे दूर गेला आहे. इतकी वर्षे अभिनयाच्या क्षेत्रात काम करूनही वयाच्या ७३ व्या वर्षी हा कलाकार भाडय़ाच्या घरात राहतो आहे. कलाकारांच्या राखीव कोटय़ातून घर मिळविण्यासाठी त्यांनी १९८१ पासून प्रयत्न केले. संबंधितांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या, निवेदने दिली पण आश्वासनांखेरीज हातात काहीही मिळाले नसल्याची खंत त्यांना आहे. या क्षेत्रातील काही कडू अनुभवांमुळे त्यांनी या क्षेत्राकडेच पाठ फिरविली. कोणतेही सोहळे, पुरस्कार वितरण समारंभ याचेही त्यांना बोलावणे नसते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे ते सदस्य आहेत. पण आता ते कुठेच दिसत नाहीत.

इतकी वर्षे या क्षेत्रात काम केल्यानंतर पुन्हा एकदा अभिनय करायची इच्छा त्यांना होते. पण जे पटणार नाही ते न करणे, स्वभावातील स्पष्टवक्ते पणा आणि ‘काम द्या’ म्हणून कोणाच्या मागे न लागणे यामुळे तशी संधी त्यांना मिळालेली नाही. पण आजवरच्या अनुभवाचा आणि वयाचा मान राखून चांगली भूमिका मिळाली तर आजही काम करायची त्यांची इच्छा व तयारी आहे. रुपेरी दुनियेपासून पूर्णपणे दूर गेलो असलो तरी आजही कुठेही लोक भेटले की ते मला ओळखतात. जुन्या चित्रपटांची आठवण काढतात. माझ्यासाठी तीच समाधानाची आणि आनंदाची बाब असल्याचे रविराज सांगतात. पत्नी उषा आणि प्रितेश हा मुलगा व पूजश्री ही मुलगी असा त्यांचा परिवार. सकाळी जमेल आणि झेपेल तसा दररोजचा व्यायाम, आध्यात्मिक पुस्तकांचे वाचन आणि निर्मलादेवी यांनी सांगितलेला ‘सहजसमाधी योग’ (ध्यानधारणा) करणे, समवयस्क मित्रांबरोबर गप्पा व भेटीगाठी हा त्यांचा सध्याचा विरंगुळा आहे.

वयोपरत्वे माणसांचे जे काही हाल होतात ते त्यांना पाहावत नाहीत. ती बाब त्यांना सतत अस्वस्थ करते. त्यामुळेच पुन्हा जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात त्यांना अडकायचे नाहीये. श्रीमद् भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे जन्ममरणाच्या फेऱ्यातून कायमची सुटका होऊन मोक्ष मिळावा, अशी माझी परमेश्वराकडे इच्छा असल्याचे सांगत त्यांनी गप्पांचा समारोप केला.

(हा लेख लोकसत्ता-रविवार वृत्तान्त (५ मार्च २०१७) मध्ये प्रसिद्ध झाला आहे)

शेखर जोशी

गुरुवार, २ मार्च, २०१७

यंदाच्या वर्षी गुढीपाडवा अमावास्येला


यंदाच्या वर्षी गुढीपाडवा अमावास्येला

-८ वाजून २७ मिनिटांनंतर गुढी उभारावी

यंदाच्या वर्षी फाल्गुन अमावास्येच्या दिवशी गुढीपाडवा येत आहे. यंदा चैत्र शुक्ल प्रतिपदा क्षयतिथी असल्याने मंगळवार, २८ मार्च २०१७ या दिवशी सकाळी ८ वाजून २७ मिनिटांनी अमावास्या संपल्यानंतरच गुढी उभारावी, असे आवाहन ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी केले आहे.

यावर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी कोणत्याही दिवशी सूर्योदयाला नाही. अशा तिथीला ' क्षय तिथी ' असे म्हणतात. यापूर्वी २८ मार्च १९९८ , १९ मार्च २००७ आणि ६ एप्रिल २००८ रोजी अशी स्थिती आली होती. तेव्हाही फाल्गुन अमावास्या संपल्यानंतरच गुढी उभारून गुढी पाडवा साजरा करण्यात आला होता. या वर्षानंतर पुन्हा १९ मार्च २०२६ रोजी चैत्र शुक्ल प्रतिपदा क्षय तिथी येणार असल्याची माहिती सोमण यांनी दिली.

गुढी पाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईसह राज्यात सर्वत्र नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येतात. त्याची सुरुवात २८ मार्च रोजी सकाळी ८ वाजून २७ मिनिटांपूर्वी करण्यास काहीही हरकत नाही. मात्र गुढी ही ८ वाजून २७ मिनिटांनंतरच उभारावी आणि गुढीची पूजा करावी, असेही सोमण म्हणाले

बापू म्हणजे आदर्श अभिनयाचा वस्तुपाठ-किशोर प्रधान


ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांनी दिवंगत अभिनेते, दिग्दर्शक आत्माराम भेंडे यांच्या स्मृतींना दिलेला उजाळा.. मी मूळचा नागपूरचा. लहानपणापासून विनोदी नाटके आणि अभिनय यांचा फार मोठा ओढा मला होता. शाळेपासून मी रंगभूमीवर काम करत आलो. मी भूमिका केलेली नाटके ही प्रामुख्याने विनोदीच होती. महाविद्यालयात गेलो तेव्हा स्वत:चे जग सोडून बाहेरच्या जगाकडे पाहण्याची दृष्टी आली. यातून चांगल्या नाटकांची पुस्तके वाचायला सुरुवात केली. यात आमचे बापू अर्थात आत्माराम भेंडे यांची 'झोपी गेलेला जागा झाला', 'दिनूच्या सासुबाई राधाबाई', 'पळा पळा कोण पुढे पळे तो' या आणि अन्य नाटकांचा समावेश होता. नाटके वाचताना ही नाटके आपल्याला प्रत्यक्ष पाहायला कधी मिळतील, असा विचार सतत मनात असायचा. कारण १९५०च्या सुमारास आमच्या नागपुरात तेवढय़ा प्रमाणात नाटय़विषयक वातावरण नव्हते आणि नाटकेही येत नसत. असे असताना एक घटना घडली. आयुष्यातील एक मोठी संधी मला मिळाली. मुंबईच्या टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्समध्ये दोन वर्षांच्या शिष्यवृत्तीवर काम करण्याची संधी चालून आली. या निमित्ताने मुंबईत वास्तव्य करण्याची संधी मिळणार होती. जेव्हा ही शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी धडपड करत होतो, तेव्हा ती मिळविणे हा मुख्य उद्देश होताच. पण त्या बरोबरच आता मोठय़ा कलाकारांची नाटके प्रत्यक्ष पाहायला मिळणार होती. नागपूरला असताना पुष्कळशा गाजलेल्या विनोदी नाटकांत काम करण्याची तसेच दिग्दर्शनाची संधी मिळाली होती. पण आता आपण मुंबईला जाणार, नाटके पाहणार हा आनंद काही वेगळाच होता. १९६० मध्ये मुंबईला आलो. त्या वेळी बापूंचे 'झोपी गेलेला जागा झाला' या नाटकाचे प्रयोग धूमधडाक्यात सुरू होते. त्या वेळी नाटकाचे प्रयोग प्रामुख्याने जयहिंदू महाविद्यालयाच्या सभागृहात व्हायचे. एक दिवस मित्राला घेऊन घाबरत घाबरत नाटक पाहायला गेलो. तिकीट काढतानाही हात थरथरत होता. भेंडे यांना आता प्रत्यक्ष रंगभूमीवर काम करताना आपल्याला पाहायला मिळणार ही कल्पना उत्तेजित करणारी होती. त्या नाटकातील प्रत्येक क्षण आणि क्षण मी अक्षरश: जगलो. भारावलेल्या मन:स्थितीत घरी आलो. हे नाटक पुन्हा कधी पाहायला मिळेल याची उत्सुकता मनात ठेवून झोपी गेलो. नाटक पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा होती, पण खिशात दमडीही नव्हती. पण त्याच वेळी 'टाटा'मधल्या एका सहकाऱ्याची ओळख झाली होती. तो 'झोपी गेलेला जागा झाला' या नाटकासाठी संगीत ऑपरेट करतो हे कळल्यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या मित्राला मस्का लावून 'झोपी गेलेला जागा झाला'चे अनेक प्रयोग मी नाटय़गृहाच्या कोपऱ्यात उभे राहून पाहिले. १९६८ मध्ये राज्य नाटय़ स्पर्धेत आमच्या 'नटराज' संस्थेने 'काका किशाचा' हा कोरा करकरीत फार्स सादर केला होता. आमच्यात कोणीही नावाजलेला कलाकार नसतानाही या नाटकाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले. त्या यशानंतर अनेक व्यावसायिक नाटकात काम करण्याची, ही नाटके दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली. अनेक व्यावसायिक नाटकांमधून काम केले, पण अद्याप आत्माराम भेंडे यांच्याबरोबर काम करायला मिळाले नाही, ही खंत मनात होती. मुंबईला स्थायिक झाल्यानंतर मी सातत्याने त्यांचे प्रत्येक नाटक भक्तिभावाने पाहायचो व मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळू दे, अशी प्रार्थनाही करायचो. बऱ्याच दिवसांनी ती संधी चालून आली. अनिल सोनार लिखित 'मालकीण मालकीण दार उघड' या भेंडे यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकासाठी मला बोलाविण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर सातत्याने नाटके केली. त्यांच्यासमवेत काम करणे हा माझ्या दृष्टीने अभिनयाचा आदर्श वस्तुपाठ होता. त्यांच्या रंगभूमीवरच्या हालचाली, क्षणोक्षणी बदलणारा त्यांचा मुद्राभिनय व जबरदस्त टायमिंग सेन्स या सगळ्यात त्यांचा हात धरणारा दुसरा रंगकर्मी मी अजून तरी पाहिलेला नाही. त्यांचा अभिनय बघत असताना कळत नकळत मी त्यांच्याकडून अभिनयाचे धडे घेत होतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यानंतर 'लागेबांधे', 'हनीमून झालाच पाहिजे', 'हॅट खाली डोके असतेच असे नाही' आणि त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक नाटकांमधून काम करताना मी घडत गेलो. बापूंच्या दिग्दर्शनाखाली नाटकाची तालीम करणे हासुद्धा एक आनंददायी अनुभव होता. एखादा प्रसंग ते अभिनेत्याला बारकाव्यासहित नीट समजावून सांगायचे आणि नंतर तू हा कसा करशील असे त्याला सांगून त्याला तो त्याच्या पद्धतीने करायला सांगायचे. त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करताना प्रत्येक अभिनेत्याला या नाटकाने आपल्याला काहीतरी वेगळे दिले, अशी भावना मनात असायची. आपल्या हाताखाली काम करणारी व्यक्ती ही अभिनेता आहे, टिपकागद नाही याची त्यांना पूर्ण जाणीव होती. आणि म्हणूनच त्यांच्या हाताखाली केवळ अभिनेत्यांची नव्हे तर दिग्दर्शकांचीही एक नवी फळी तयार झाली. बापूंनी मला नाटय़कलेचे खूप मोठे दालन उघडून दिले. त्यात मी हरवून गेलो. एके दिवशी त्यांचा दूरध्वनी आला. भरत दाभोळकर हे 'बॉटम्स अप' हे इंग्रजी नाटक करत असून यात मी भूमिका करावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. सुमारे २० वर्षे सातत्याने मराठी रंगभूमीवर काम केल्यानंतर इंग्रजी रंगभूमीवर काम करायला मिळणे, ही माझ्यासाठी मोठी संधी होती. नाटकाच्या तालमी सुरू असताना माझ्या लक्षात आले की, संपूर्ण दोन तासांच्या या नाटकात माझे फक्त दोनच प्रवेश आहेत. म्हणजे माझी भूमिका म्हटले तर अगदी नगण्य होती. मराठी रंगभूमीवर प्रमुख भूमिका करणाऱ्या माझ्यासारख्या अभिनेत्यासाठी तो मोठा धक्का होता. मी द्विधा मन:स्थितीत बापूंकडे गेलो आणि मी हे नाटक सोडतो, असे त्यांना सांगितले. त्यावर त्यांनी त्यांच्या नेहमीच्या मिश्कील शैलीत मला एवढेच सांगितले की, 'किशोर घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नकोस. जरा थांब. आगे आगे देखीये होता है क्या. त्यांच्या या सांगण्यामुळे मी नाटक केले. आणि पुढे बापू म्हणाले तसेच घडले. या नाटकानंतर भरतने त्याच्या प्रत्येक इंग्रजी नाटकात माझ्या अभिनय शैलीनुसार माझ्यासाठी भूमिका लिहिल्या आणि त्या सर्व गाजल्या. उत्तम दिग्दर्शकाला लागणारा महत्त्वाचा गुण त्यांच्यात होता. तो म्हणजे सहनशीलता. कोणत्याही अभिनेत्याने जर मनासारखा अभिनय केला नाही तर ते न कंटाळता अनेक वेळा त्याच्याकडून करवून घेत असत. पण हे करताना त्यांना कधीही चिडलेले, संतापलेले मी पाहिले नाही. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक वादळे आली. सतत सावलीसारखी असणारी त्यांची पत्नी आशाताई, अकाली गेलेला त्यांचा मुलगा नंदू याचे डोंगराएवढे दु:ख त्यांना होते, पण ते त्यांनी कधीही बाहेर झिरपू दिले नाही. मराठी रंगभूमीएवढीच इंग्रजी रंगभूमीवरही मला जबरदस्त लोकप्रियता मिळाली, हा माझ्या दृष्टीने बापूंनी दिलेला आशीर्वाद ठरला.. "त्यांच्या रंगभूमीवरच्या हालचाली, क्षणोक्षणी बदलणारा त्यांचा मुद्राभिनय व जबरदस्त टायमिंग सेन्स या सगळ्यात त्यांचा हात धरणारा दुसरा रंगकर्मी मी अजून तरी पाहिलेला नाही." "त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करताना प्रत्येक अभिनेत्याला या नाटकाने आपल्याला काहीतरी वेगळे दिले, अशी भावना मनात असायची. आपल्या हाताखाली काम करणारी व्यक्ती ही अभिनेता आहे, टिपकागद नाही याची त्यांना पूर्ण जाणीव होती." शब्दांकन - शेखर जोशी अष्टपैलूत्व आणि सकारात्मक दृष्टिकोन! दिलीप प्रभावळकर (ज्येष्ठ अभिनेते) आत्माराम भेंडे यांच्यामुळेच माझ्या अभिनयाची सुरवात झाली असे म्हणायला हरकत नाही. महाविद्यालयात असताना एकांकिका स्पर्धेसाठी मुख्य भूमिकेकरता त्यांनी माझी निवड केली आणि मला vv03अभिनयाचे बाळकडू दिले. रंगभूमीवर 'मॉडर्न फार्स' त्यांनी आणला. बबन प्रभू आणि आत्माराम भेंडे यांच्या जोडीने रंगभूमीवर अक्षरश: धुमाकूळ घातला. बबन प्रभूंनी फार्स लिहायचा आणि भेंडे यांनी दिग्दर्शन, अभिनय करायचे हे ठरलेले होते. 'झोपी गेलेला जागा झाला', 'दिनूच्या सासूबाई राधाबाई', 'पळा पळा कोण पुढे पळे तो' ही भेंडेंची नाटके रंगभूमीवर गाजली. अभिनेत्याला अत्यंत आवश्यक असलेले टायमिंगचे भान आणि सहजता भेंडे यांच्याकडून शिकण्यासारखी होती. त्यांची नाटके प्रेक्षक म्हणून पाहण्याचा योग तर आलाच, पण त्यांच्यातला अभिनेताही सहकलाकार म्हणून अनुभवता आला. 'पळा पळा कोण पुढे पळे तो' या पुनरुज्जीवित नाटकात बबन प्रभूंची भूमिका मला साकारायला मिळाली. भेंडे यांनी व्यावसायिक नाटक करण्यापूर्वी प्रायोगिक नाटकेही केली. याबाबतीत ते काळाच्या पुढे होते. माधव मनोहर यांची 'सशाची शिंगे', 'आई' ही दोन नाटकेत्यांनी केली. विनोदी अभिनयाबरोबरच गंभीर भूमिकाही त्यांनी केल्या. पु. ल. देशपांडे यांच्या 'सुंदर मी होणार'मधील डॉ. पटवर्धन, 'कथा कुणाची व्यथा कुणा'मधील खलनायक, वसंत कानेटकरांच्या 'प्रेमा तुझा रंग कोणता'मधील प्रा. बल्लाळ या त्यांच्या भूमिका स्मरणात राहतात. पुलंच्या 'तुझं आहे तुजपाशी'मध्ये त्यांनी साकारलेली 'डॉ. सतीश' ही भूमिका मी पाहिली होती. त्यानंतर बऱ्याच वर्षांनंतर याच नाटकाच्या इंग्रजी रूपांतरात त्यांची 'आचार्य' ही भूमिका सहकलाकार म्हणून मला अनुभवता आली. ते मला दाभोळकरांच्या गटात घेऊन गेले आणि तिथून माझी इंग्रजी रंगभूमीशी ओळख झाली. ते खऱ्या आयुष्यात जसे होते तसे अगदी तशीच भूमिका त्यांनी 'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपटामध्ये साकारली होती. नव्वदी जवळ आल्यावरही ते सक्रिय होते. त्यांच्यात नकारात्मक भावना कधीच नव्हती. सतत इतरांना मदत करणे, प्रेरणा देत राहणे हा वसा त्यांनी कायम ठेवला होता. काही महिन्यांपूर्वी त्यांना जीवनगौरव पुरस्कार माझ्या हस्ते देण्यात आला, त्या वेळी मला त्यांची मुलाखत घेण्याची संधीही मिळाली. माझ्यासाठी तो मोठा सन्मान होता. तसेच 'आत्मरंग' या आत्मचरित्राची पहिली प्रत मी त्यांच्याकडून स्वाक्षरी करून घेतली होती. पुण्यात वास्तव्याला असल्यामुळे त्यांच्या शेवटच्या दिवसांत त्यांना भेटण्याचा योगही आला होता. (शब्दांकन- मृणाल भगत) सुसंस्कृत विनोदी अभिनेते इंडियन नॅशनल थिएटर या संस्थेमार्फत अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या आत्माराम भेंडे यांनी सुसंस्कृत विनोदी अभिनेते म्हणून आपला ठसा उमटविला होता. अंगविक्षेप किंवा थिल्लरपणा न करताही चेहऱ्यावरचे हावभाव, शब्दफेक आणि टायमिंगच्या जोरावर विनोदनिर्मिती करता येते हे भेंडे यांनी दाखवून दिले. केवळ अभिनयच नाही, तर दिग्दर्शक आणि निर्माता या भूमिकाही त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. 'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपटात त्यांनी साकारलेला आत्माराम आणि 'यंदा कर्तव्य आहे' चित्रपटातील त्यांनी आजोबांची रंगवलेली छोटेखानी भूमिका रसिकांच्या स्मरणात आहे. १९६०-७० च्या दशकात लेखक बबन प्रभू आणि दिग्दर्शक आत्माराम भेंडे या जोडगोळीने मराठी रंगभूमीला फार्सिकल नाटकांची ओळख करून देत रसिकांना खळखळून हसविले. 'दिनूच्या सासूबाई राधाबाई', 'झोपी गेलेला जागा झाला', 'पिलूचं लग्न' ही त्यांची नाटके तूफान गाजली होती. 'मन पाखरू पाखरू', 'प्रीती परी तुजवरती, 'तरुण तुर्क म्हातारे अर्क', 'तुझे आहे तुजपाशी' आणि 'पळा पळा कोण पुढे पळे तो' या नाटकांतून भेंडे यांनी आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली होती. हिंदूी, इंग्रजी आणि िहग्लिश नाटकांतूनही भेंडे यांनी कामे केली. त्यांनी जाहिरातींमध्ये अभिनय करण्याबरोबरच दूरदर्शन मालिकांसाठी दिग्दर्शनही केले होते. भेंडे यांना नाटय़दर्पण, नाटय़भूषण, शंकर घाणेकर पुरस्कार, चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार, नटसम्राट नानासाहेब फाटक पुरस्कार या पुरस्कारांसह राज्य सरकारच्या सांस्कृतिक पुरस्काराने गौरविण्यात आले होते. रंगभूमीवरील चतुरस्र अभिनेते आत्माराम भेंडे मराठी रंगभूमीवरचे चतुरस्र अभिनेते होते. रंगभूमीवर 'स्टार' म्हणून ओळख मिळविणारेvv04 ते पहिले अभिनेते होते. त्यांनी त्यांची ही ओळख यशस्वी करून दाखवली. त्यांना विनोदाची विलक्षण जाण होती. नाटक फार्सिकल असो किंवा व्यावसायिक, त्यांनी प्रत्येक प्रकारात 'विशारद' ही पदवी मिळविली होती. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीने एक मोठा अभिनेता गमावला आहे. मला त्यांच्यासोबत नाटकात काम करण्याचा योग आला नाही, याची खंत आहे. - अशोक सराफ (ज्येष्ठ अभिनेते) (लोकसत्ता-मुंबई/ रविवार वृत्तान्त/ ८ फेब्रुवारी २०१५)

अभिनयाचे वैभव



मान्यवरांच्या जन्म आणि मृत्यू दाखल्यांचा संग्राहक