सोमवार, २४ मार्च, २०२५

हलाल प्रमाणित उत्पादने-महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी

हलाल प्रमाणित उत्पादनांवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याची सूचना समितीला केली आहे. समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. 

खाद्यपदार्थांच्या संदर्भातील कायद्यानुसार ‘भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI) या शासकीय संस्थेला खाद्यपदार्थांचे मानके ठरवण्याचा व प्रमाणपत्र देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. असे असतानही ‘हलाल प्रमाणपत्र’ ही समांतर प्रणाली उभी करण्यात आली आहे.‌ यातून मिळणारा पैसा पैसा लष्कर-ए-तोयबा, इंडियन मुजाहिदीन, इस्लामिक स्टेट आदी आतंकवादी संघटनांच्या सुमारे ७०० आरोपींना कायदेशीर साहाय्य करण्यासाठी वापरला जात असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

महाराष्ट्रासह देशभरात ‘हलाल इंडिया’, ‘हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस इंडिया’, ‘जमियत उलेमा-ए-हिंद’, ‘जमियत उलेमा-ए-महाराष्ट्र’ आदी अनेक संस्थांकडून बेकायदेशीपणे हलाल प्रमाणपत्रांचे वाटप करून कोट्यवधी रुपये गोळा करण्यात येत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात त्यावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही खाजगी संस्थांना प्रमाणपत्र वाटप करून पैसे गोळा करण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट केले आहे, अशी माहिती निवेदनात देण्यात आली आहे.‌ 


महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे हलाल प्रमाणपत्रे देणार्‍या खाजगी संस्थांवर तत्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, हिंदूंच्या संविधानिक अधिकारांवर आघात करणार्‍या हलाल प्रमाणिकरणावर त्वरित बंदी आणावी; हलालच्या नावाखाली खाजगी संस्थांनी जमा केलेल्या निधीची चौकशी करून कारवाई करावी; हलाल प्रमाणपत्रांतून जमा केलेली अवैध संपत्ती व्याजासह वसूल करावी; या पैशाचा उपयोग कुठे केला आणि त्यातून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला का, याबाबतही सखोल चौकशी करावी, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.



सुभाषचंद्र बोस, महर्षी कर्वे नामफलक पुन्हा एकदा झाकला जाणार

नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता, विष्णुनगर डोंबिवली पश्चिम पंजाब नॅशनल बँक चौक येथील नामफलक 

सुभाषचंद्र बोस, महर्षी कर्वे नामफलक 

पुन्हा एकदा झाकला जाणार

शेखर जोशी 

नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता, विष्णुनगर डोंबिवली पश्चिम पंजाब नॅशनल बँक चौक येथील नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता व महर्षी कर्वे रस्ता नामफलक पुन्हा एकदा झाकला जाणार आहे. दोन दिवसांपूर्वी येथे बांबूची कमान बांधण्यात आली असून बहुदा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणारा फलक तिथे लावण्यात येणार असावा. कमानी उभारण्यात आल्या असत्या तरी अद्याप फलक लावले गेले नसल्याने कोणत्या बड्या असामीचा चेहरे फलक या कमानीवर लावला जाणार आहे? हे गुलदस्त्यात आहे. 

नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता विष्णुनगर डोंबिवली पश्चिम पंजाब नॅशनल बँक चौक येथे उभारण्यात आलेली कमान 

कमान मोठी असल्याने ज्यांचा फलक लावण्यात येईल ती मंडळीही 'मोठी' असामी असण्याची शक्यता आहे. या मोठ्या असामी म्हणजे सत्ताधारी पक्षाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे असतील की शआमदार रवींद्र चव्हाण असतील याची उत्सुकता आहे. असामी कोणीही असोत पण या चेहरे/शुभेच्छा फलकबाजीमुळे आता पुन्हा एकदा सुभाषचंद्र बोस व महर्षी कर्वे नामफलक झाकला जाणार हे नक्की. 

डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागात रस्ते, चौक येथे अनेक ठिकाणी अशा कमानी उभारण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी या कमानी वाहतुकीसाठी अडथळा ठरतात. पण सर्वपक्षीय राजकारण्यांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही. गणपती, नवरात्र, दहीहंडीच्या निमित्ताने कमानी उभारण्याचा अक्षरशः उत आलेला असतो.‌ गणपतीसाठी उभारण्यात आलेल्या या कमानी पुढे नवरात्रापर्यंत कायम असतात. 

या कमानीमुळे आता पुन्हा एकदा नेताजी सुभाषचंद्र बोस व महर्षी कर्वे रस्ता नामफलक झाकला जाणार आहे 

राजकीय फलकबाजी, चेहरे फलक लावून तुमचे नामफलक झाकणा-या या सर्वपक्षीय कोडग्या राजकारण्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस, महर्षी धोंडो केशव कर्वे तुम्ही क्षमा करा.‌ आपले चेहरे फलक लावल्याशिवाय गुढीपाडवा साजराच होणार नाही, असे या महान मंडळींना वाटत असावे आणि त्यासाठीच ही कमान उभारली असावी. असो. 

शेखर जोशी 

२४ मार्च २०२५


रविवार, २३ मार्च, २०२५

अशोक मुळ्ये काकांचा 'माझा पुरस्कार'


ज्येष्ठ निवृत्त नाट्य व्यवस्थापक अशोक मुळ्ये

यांचा 'माझा पुरस्कार' सोहळा साजरा 

- संदेश कुलकर्ण, शुभांगी गोखले, अविनाश नारकर, 

राजन ताम्हाणे, ऋषिकेश शेलार यांना पुरस्कार प्रदान 

ज्येष्ठ निवृत्त नाट्य व्यवस्थापक व रंगकर्मी यांच्या संकल्पनेतून साकारलेला 'माझा पुरस्कार ' वितरण सोहळा शिवाजी नाट्य मंदिर येथे रसिकांच्या उपस्थितीत पार पडला. पुरस्कार सोहळ्याचे यंदा १९ वे वर्ष होते. माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या सोहळ्यात संदेश कुलकर्णी यांना 'असेन मी... नसेन मी...' या नाटकासाठी 'सर्वोत्कृष्ट नाटककार' तर याच नाटकासाठी 'सर्वोत्कृष्ट दुहेरी भूमिका' हा पुरस्कार शुभांगी गोखले यांना प्रदान करण्यात आला. 

 

'सर्वोत्कृष्ट पुनरुज्जीवित नाटका'चा बहुमान जयवंत दळवी लिखित 'पुरुष' नाटकाला मिळाला. या नाटकातील भूमिकेसाठी 

अभिनेते अविनाश नारकर यांना 'सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता' पुरस्काराने गौरविण्यात आले.‌ राजन ताम्हणे यांना 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शका'चा पुरस्कार मिळाला. 'उर्मिलायन' या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र यांना 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, याच नाटकातील अभिनेत्री निहारिका राजदत्त हिला 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' म्हणून तर अभिनेते हृषिकेश शेलार यांना 'शिकायला गेलो एक' या नाटकासाठी 'सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता' पुरस्कार देण्यात आला. अशोक मुळ्ये, सत्यरंजन धर्माधिकारी तसेच पुरस्कार विजेत्यांची मनोगत व्यक्त केले.

याच कार्यक्रमात गेली २५ वर्षे सुरू असलेल्या 'मटा सन्मान' पुरस्कारासाठी महाराष्ट्र टाइम्सचा गौरव करण्यात आला. मटाचे प्रतिनिधी कल्पेशराज कुबल यांनी हा सत्कार स्वीकारला. 

जयंत पिंगुलकर, केतकी भावे-जोशी, शिल्पा मालंडकर, नीलिमा गोखले आणि मंदार आपटे यांनी मराठी आणि हिंदी प्रेमगीते सादर केली. याचे संगीत संयोजन प्रशांत लळीत यांचे होते.

शनिवार, २२ मार्च, २०२५

राजकीय फलकबाजीविना गुढीपाडवा साजरा व्हावा



राजकीय फलकबाजीविना गुढीपाडवा साजरा व्हावा; 

डॉ. श्रीकांत शिंदे, रवींद्र चव्हाण यांना आवाहन 

- शहर विद्रूपीकरण न करण्याची गुढी उभारा

शेखर जोशी 

यंदाच्या वर्षी गुढीपाडवा शुभेच्छा फलकबाजीने डोंबिवली शहराचे विद्रुपीकरण होणार नाही, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा आणि शुभेच्छांच्या राजकीय फलकबाजीविना गुढीपाडवा साजरा व्हावा. 

नववर्ष स्वागत यात्रेची सुरुवात डोंबिवलीतून झाली आणि पुढे संपूर्ण महाराष्ट्राने त्याचे अनुकरण केले‌. त्याप्रमाणे यंदाच्या गुढीपाडव्यापासून शुभेच्छा फलकबाजी विरहित गुढीपाडवा साजरा करण्याचा नवा आदर्श या दोघांनी घालून द्यावा. 

शुभेच्छा द्यायच्याच असतील तर या दोघांनी पुढाकार घेऊन डोंबिवली शहरातील सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करावी. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्यावतीने शुभेच्छा देणारा फक्त एक मोठा फलक डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागात रेल्वेस्थानक परिसरात लावावा. 

या फलकावर डोंबिवलीतील सर्वपक्षीय नेत्यांची नावे ठेवावी. या मुख्य व प्रातिनिधिक फलकाखेरीज शहराच्या कोणत्याही भागात, रस्ते, चौकात शुभेच्छांची राजकीय फलकबाजी होणार नाही, यासाठी शिंदे व चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा. असे जर खरोखरच झाले तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ती एक नवी सुरुवात ठरेल. 

नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता व महर्षी कर्वे रस्ता 

नामफलक पुन्हा एकदा झाकला जाणार

गेल्या दोन/चार दिवसांपासून मोकळा श्वास घेत असलेले नेताजी सुभाषचंद्र बोस व महर्षी कर्वे रस्ता नामफलक गुढीपाडवा शुभेच्छांनी पुन्हा एकदा झाकले जाणार आहेत.‌

गेल्या काही महिन्यांपासून नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता, विष्णुनगर, पंजाब नॅशनल बँक चौक, डोंबिवली पश्चिम येथील हे दोन्ही नामफलक राजकीय फलकबाजीने झाकले जात होते. मात्र समाज माध्यमातून आणि लोकसत्ता ऑनलाईनने यावर लिहिल्यावर ते फलक हटविण्यात आले होते. शुक्रवारी फलकासाठी बांबूची कमान बांधण्यात आली. कमान बांधतांना एक कामगारा तर चक्क या दोन्ही नामफलकाच्या पाटीवर पाय ठेवून काम करतांना दिसून आला. 

किती सर्वपक्षीय राजकारणी, नेते, पदाधिकारी अशा कमानी उभारून फलक लावण्यासाठी महापालिकेची परवानगी घेतात? परवानगी न घेता किती राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी, संस्था, संघटना अशा अनधिकृत फलकबाजी करतात? आत्तापर्यंत अनधिकृत फलकबाजी करणा-यांच्या विरोधात किती गुन्हे महापालिकेने दाखल केले? किती दंड वसूल केला त्याचीही माहिती महापालिका प्रशासनाने जाहीर करावी. 

शेखर जोशी 

२२ मार्च २०२५

शुक्रवार, २१ मार्च, २०२५

भाजप महाराष्ट्र आणि देवेंद्र फडणवीस हिंमत दाखवणार का?

भाजप महाराष्ट्र आणि देवेंद्र फडणवीस हिंमत दाखवणार का?

औरंगजेबाची मूळ कबर तशीच ठेवून 
सभोवतालचे बांधकाम जमीनदोस्त करा
- लाखो रुपयांचे अनुदान बंद करण्यासाठी निवेदन द्या 
- औरंगजेबाच्या क्रूरकृत्यांची माहिती देणारा फलक लावा
शेखर जोशी 
क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीवरुन वाद रंगला आहे. सर्वपक्षीय राजकारणी, हिंदुत्ववादी संघटनांसह समाज माध्यमातून सर्वसामान्य हिंदुत्ववादी नागरिक आपापली मते, विचार हिरीरीने मांडत आहेत. बाबरीप्रमाणे ही कबर उद्ध्वस्त करावी ते कबर तशीच राहू द्यावी अशी मतमतांतरे आहेत.‌ औरंग्याच्या मूळ कबरीला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत राहून त्या कबरीभोवतीचे सुशोभीकरण व बांधकाम विस्तार करण्यात आले आहे, ते नक्कीच जमीनदोस्त करता येईल. लाखो रुपयांचे अनुदान बंद करण्यासाठी निवेदन देता येईल तसेच औरंगजेबाच्या क्रूरकृत्यांची माहिती देणारा फलकही लावता येईल. अर्थात हे सर्व करण्यासाठी राजकीय धडाडी व इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे, मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती दाखवावी, अशी माफक अपेक्षा. 

प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानची कबर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या वेळी जी काही छोटी कबर बांधली होती, त्याचे नंतरच्या काळात भव्य स्मारकात रुपांतर झाले, केले गेले. सुशोभीकरण झाले, आजुबाजूची जागा हडप करून अनधिकृत बांधकाम केले गेले.‌ गेली अनेक वर्षे कबरीसभोवती झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत हिंदुत्ववादी, हिंदुत्ववादी संस्था, संघटना यांच्याकडून तक्रारी करण्यात येत होत्या. न्यायालयातही दाद मागण्यात आली होती. न्यायालयाकडून वेळोवेळी कबरी सभोवताली झालेले/ केलेले अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे, असे आदेश देण्यात आले होते. मात्र मुसलमानांचे लांगूलचालन करणा-या कॉग्रेसच्या आणि नंतर महाविकास आघाडीच्या काळातही ते पाडले गेले नाही. कबरीच्या सभोवताली अनधिकृत बांधकाम, विस्तार वाढत चालला होता. 

महाविकास आघाडी पायउतार झाल्यानंतर महायुती सत्तेवर आली. आणि त्यानंतर काही दिवसात तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इच्छाशक्ती दाखवून अफजलखानाच्या मूळ कबरीला कोणताही धक्का न लावता न्यायालयाच्या आदेशानुसार कबरी सभोवताली झालेले अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. त्याच धर्तीवर आता मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इच्छाशक्ती दाखवून औरंगजेबाच्या मूळ कबरीला धक्का न लागता त्या कबरीभोवती जे भव्य बांधकाम केले आहे, त्याचा जो विस्तार झाला आहे तो तातडीने जमीनदोस्त करावा. केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देण्यात आले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. ते बरोबर आहे. पुरातत्त्व विभागाने मूळ कबरीला धक्का लावू नये असे सांगितले आहे. पण त्या कबरीभोवती जे सुशोभीकरण, भव्य बांधकाम झाले आहे, त्याचेही संरक्षण करा, असे तर सांगितलेले नाही ना? योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे मूळ कबरीला धक्का न लावता बाकीचे बांधकाम बुलडोझर लावून जमीनदोस्त केले जावे.

आणखी एक, केंद्रातही भाजपचे शासन आहे. या कबरीच्या देखभालीसाठी केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडून लाखो रुपयांची जी खैरात केली जाते, ती तातडीने बंद करण्यात यावी, असे लेखी पत्र महाराष्ट्र शासनाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन आणि पुरातत्व विभागाला देण्यात यावे. एक वेळ उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे आमदार या निवेदनावर स्वाक्षरी करणार नाहीत, पण भाजप आणि शिवसेनेच्या सर्व आमदार, खासदार यांची स्वाक्षरी तर या निवेदनावर तेवढे तरी तुम्ही करू शकता ना? त्या कबरीच्या ठिकाणी क्रूरकर्मा औरंगजेबाने केलेले अत्याचार, छत्रपती संभाजी महाराज यांचे केलेले हाल याची माहिती देणारा फलकही तिथे महाराष्ट्र शासनाच्यावतीने लावा आणि मूळ कबरीला धक्का न लावता कबरी सभोवताली झालेले सुशोभीकरण जमीनदोस्त करण्याची राजकीय धडाडी व इच्छाशक्ती दाखवा, इतकीच माफक अपेक्षा.‌ या गोष्टी करणे आपल्या हातात आहेत. तिथे कोणताही नियम आड येणार नाही, असे वाटते. 
शेखर जोशी 
२१ मार्च २०२५

शनिवार, १५ मार्च, २०२५

औरंगजेब कबरीच्या देखभालीसाठी लाखो रुपये

 औरंगजेब कबरीच्या देखभालीसाठी लाखो रुपये 

औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्त्व खात्याकडून दरवर्षी लाखो रुपयांची मदत केली जात आहे. तर महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक असलेल्या मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी राज्य शासनाकडून फक्त २५० रुपयांचा निधी दिला जात असल्याचे हिंदू जनजागृती समितीचे म्हणणे आहे. 


उपलब्ध माहितीनुसार २०२१-२२ मध्ये २,५५,१६० रुपये तर २०२२-२३ (नोव्हेंबरपर्यंत) २,००,६२६ रुपये खर्च करण्यात आला. आतापर्यंत ६.५० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असल्याचे हिंदू जनजागृती समितीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 


औरंगजेबाच्या कबरीसाठी दिली जाणारी भरघोस आर्थिक मदत तत्काळ थांबवावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी भरघोस आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी केली आहे.

रविवार, १४ एप्रिल, २०२४

'शबरी शिधा' देऊन उभारली प्रेमाची गुढी!

नंदुरबार तालुक्यातील एका आदिवासी महिलेला शिधा देण्यात आला


'शबरी शिधा' देऊन उभारली प्रेमाची गुढी! 

महाराष्ट्राच्या वनवासी/ आदिवासी भागात शबरी सेवा समिती गेली अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहे. यापैकी 'शबरी शिधा' हा उपक्रम गेली पाच वर्षे राबविण्यात येत असून गुढीपाडव्याच्या दिवशी धुळे जिल्ह्यातील भिलटपाडा, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगाव, तळोदा तसेच ठाणे जिल्ह्यातील जव्हार, वाडा, विक्रमगड येथील ४६५ कुटुंबांना दोन महिने पुरेल इतका शिधा देण्यात आला. या सर्व घरी गुढीही उभारण्यात आली. 

धडगाव तालुक्यातील वयोवृद्ध, एकाकी महिलेस शिधा देण्यात आला. सोबत शेजारी आणि देवीसिंग पाडवी हे कार्यकर्ते

येथील आदिवासी/ वनवासी कुटुंबांची हलाखीची परिस्थिती आहे. राहण्यासाठी जिथे धड घरही नाही तिथे दररोजच्या जेवणाची आणखीनच भ्रांत. राज्य शासनाकडून गहू, तांदूळ व अन्य काही वस्तू या आदिवासी/वनवासी कुटुंबांना शिधावाटप दुकानात मोफत मिळतात. पण त्याहीपेक्षा अधिक काही वस्तू शबरी सेवा समितीकडून या कुटुंबांना मोफत दिल्या जातात.‌ यात तुरडाळ, मुगडाळ, तेल, काही कडधान्ये, बेसन, रवा,पोहे, शेंगदाणे, गुळ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. काही ठिकाणी आवश्यकता असेल तर कपडेही दिले जातात, अशी माहिती शबरी सेवा समितीचे संस्थापक प्रमोद करंदीकर यांनी दिली.


पिंपळोद येथील केशाबाई वळवी यांना शबरी शिधा देण्यात आला

गेली पाच वर्षे कोणतीही शासकीय आर्थिक मदत न घेता हा उपक्रम सुरू आहे. राजकीय पक्ष/ नेते यांच्याकडूनही मदत घेण्यात येत नाही.‌ समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, सर्वसामान्य नागरिक यांच्या आर्थिक मदतीतून शबरी सेवा समितीचे विविध उपक्रम राबविले जातात. या गुढीपाडव्याला ४६५ कुटुंबांना जो सर्व शिधा देण्यात आला त्यासाठी आनंदकुमार गाडोदिया यांनी आर्थिक मदत केली होती. आता सुमारे दोन महिन्यांनतर या कुटुंबांना पुन्हा शिधा देण्यात येईल. शिधा देताना त्या कुटुंबांची गरज, आवश्यकता याचाही विचार केला जातो, असेही करंदीकर यांनी सांगितले. आपली पत्नी रंजना, शबरी सेवा समितीचे सर्व कार्यकर्ते, हितचिंतक, देणगीदार या सर्वांच्या सहकार्याने आमची वाटचाल सुरू आहे, असेही करंदीकर म्हणाले.


काही आणू नकोस,  पण पुन्हा भेटायला नक्की ये...

भिलटपाडा येथील ताराबाई यांच्यासाठी जेवण तयार करताना प्रमिला

धुळे जिल्ह्यातील आणि शिरपूर तालुक्यातील भीलटपाडा येथील एक अनुभव डोळ्यात पाणी आणणारा आहे. दोन्ही डोळ्यांनी अंध असणा-या ताराबाई पवार यांच्या घराची अवस्था पाहून शबरी सेवा समितीच्या कार्यकर्त्या प्रमिला सायसिंग यांना हुंदका आवरता आला नाही. ताराबाई जिथे राहात होत्या त्या जागेला घर तरी कसे म्हणावे, अशी अवस्था होती. अक्षरशः उकिरडा झाला होता. प्रमिला यांनी ताराबाई यांचे घर आणि आजुबाजूचा परिसर स्वच्छ केला. प्रमिला यांनी गरम गरम स्वयंपाक केला व ताराबाईंना जेवण वाढले. त्यांच्या घरासमोर गुढी उभारली आणि त्यांना शबरी शिधा दिला. प्रमिला यांनी ताराबाई यांचा निरोप घेतला तेव्हा ताराबाई म्हणाल्या, पुन्हा  भेटायला ये,पण काही आणू नको. मला म्हातारीला काय लागते?  पण भेटायला मात्र ये. हो, अगदी नक्की परत येईन, असे सांगून प्रमिला यांनी ताराबाईंचा निरोप घेतला आणि त्या पुढच्या घराकडे निघाल्या.

शेखर जोशी 

१४ एप्रिल २०२४

प्रमोद करंदीकर 

शबरी सेवा समिती 

संपर्क 

+91 99205 16405