बुधवार, २६ मार्च, २०२५

'आपले सरकार सेवा केंद्रां'ची संख्या वाढवणार

आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार

- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा*

मुंबई, दि. २६ मार्च 

राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ रितीने उपलब्ध करून देण्यासाठी 'आपले सरकार सेवा केंद्रे' यांचे जाळे विस्तारीत करण्यात येणार असून सेवा केंद्राची संख्या वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सुधारित निर्णयानुसार, लोकसंख्या आणि प्रशासनाच्या गरजेनुसार सेवा केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. सुधारित निकषानुसार ग्रामपंचायत स्तरावर ५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी १ ऐवजी २ सेवा केंद्रे तर पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी २ ऐवजी ४ सेवा केंद्रे देण्यात देणार आहेत.  बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात १२ हजार ५०० लोकसंख्येसाठी २ केंद्रे तर इतर महापालिका व नगरपरिषद क्षेत्रांमध्ये दहा हजार लोकसंख्येसाठी एक ऐवजी दोन सेवा केंद्रे देण्यात येणार असल्याचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी जाहीर केले. 

सध्या आपले सरकार सेवा केंद्रांवरील सेवा शुल्क २० रुपये असून २००८ पासून या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती. वाढती महागाई आणि सेवा केंद्र चालकांच्या मागणीच्या अनुषंगाने सेवा शुल्क आता ५० रुपये करण्यात येणार आहेत.‌ नागरिकांना अधिक सुलभ सेवा मिळण्यासाठी घरपोच वितरण सेवाही सुरू करण्यात येणार आहे. घरपोच भेटीसाठी सेवा शुल्क १००रुपये प्रति नोंदणी (कर वगळून), महाआयटी सेवा दर २० टक्के, सेवा केंद्र चालक सेवा दर ८० टक्के, याशिवाय प्रति अर्ज अतिरिक्त शुल्क ५० रुपये असणार आहे.

श्री विठ्ठल रुख्माई संस्थान रेवसाची जमीन पुन्हा देवस्थानच्या नावावर होणार

श्री विठ्ठल रुख्माई संस्थान रेवसाची जमीन 

पुन्हा देवस्थानच्या नावावर होणार

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पुढाकाराने मिळाला ऐतिहासिक विजय 

श्री विठ्ठल रुख्माई संस्थान, रेवसा (ता. जि. अमरावती) यांच्या मालकीची तब्बल ३० कोटी रुपयांची शेतजमीन अखेर देवस्थानच्या नावावर पुन्हा नोंदवली जाणार आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे झालेल्या पत्रकार परिषदेत मंदिर महासंघाचे राज्य पदाधिकारी अनुप प्रमोद जयस्वाल यांनी ही माहिती दिली. 

महासंघाचे जिल्हा संयोजक विनीत पाखोडे, हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक निलेश टवलारे, अधिवक्ता अभिजीत बजाज संस्थानचे विश्वस्त राजेंद्र वाकोडे, हरीभाऊ वाकोडे, हरिदास मानवटकर, समितीचे सचिन वैद्य उपस्थित होते. 

मौजा रेवसा येथील गट क्र. १६५, क्षेत्रफळ ३ हेक्टर ६९ आर ही शेतजमीन श्री विठ्ठल रुख्माई संस्थानच्या मालकीची आहे. मात्र, ही जमीन हडप करण्याच्या उद्देशाने प्रदीप त्र्यंबकराव वाकोडे व प्रवीण त्र्यंबकराव वाकोडे यांनी तत्कालीन तहसीलदार संतोष काकडे यांच्यासमोर जमिनीच्या ७/१३ उताऱ्यावरील संस्थानचे नाव कमी करून स्वतःच्या नावावर नोंद करण्यासाठी अर्ज सादर केला. 

९ मे २०२२ रोजी तहसीलदार काकडे यांनी महसूल कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करून ७/१२ उताऱ्यातून संस्थानचे नाव कमी केले आणि वाकोडे बंधूंच्या नावावर बेकायदेशीर नोंद केली. या निर्णयाविरोधात राजेंद्र पद्माकर वाकोडे यांनी उपविभागीय अधिकारी अमरावती यांच्यासमोर अपील दाखल केले. अपील प्रकरणात वाकोडे बंधू आणि महसूल कर्मचाऱ्यांचे संगनमत उघड झाले.‌

तहसिलदार काकडे यांनी पारीत केलेला आदेश हा आर्थिक लाभ घेण्याच्या दृष्टीनेच करुन घेतल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचा निष्कर्ष भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी रिचर्ड यंथन यांनी नोंदविला आणि १ ऑगस्ट २०२३ रोजी तहसीलदार काकडे यांचा आदेश रद्द केला. उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशावरील अपिल प्रकरणात अतिरिक्त जिल्हाधिकारी अमरावती यांनी प्रकरणाचा अधिक सखोल तपास करून पुन्हा सुनावणीचे आदेश दिले असल्याचे या वेळी सांगण्यात आले.‌ 

मंदिर महासंघाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देवस्थानच्या हितासाठी तहसीलदारांना निवेदन दिले. या पाठपुराव्याला यश मिळाले आणि तहसीलदार विजय लोखंडे यांनी २० मार्च २०१५ संस्थानच्या बाजूने अंतिम निर्णय दिला.


मंगळवार, २५ मार्च, २०२५

नवाजुद्दीन सिद्दीकी व ‘बिग कॅश’वर कारवाई होणार

नवाजुद्दीन सिद्दीकी व ‘बिग कॅश’वर कारवाई होणार

- पोलिसांच्या गणवेशाचा अवमान करणारी जाहिरात हटवली

मुंबई, दि. २५ मार्च

हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांच्या गणवेशात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकींना दाखवणारी आणि जनतेला जुगार खेळण्यास प्रवृत्त करणारी वादग्रस्त ‘बिग कॅश पोकर’ जाहिरात सोशल मीडियावरून अखेर हटविण्यात आली आहे. मात्र दोषींवर कारवाई अद्याप झालेली नाही. 

जाहिरात हटवण्यात आली असली, तरी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ‘बिग कॅश’चे मालक अंकुर सिंग यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. सुराज्य अभियानाने या प्रकरणात वेळोवेळी फेसबुक, यू-ट्यूब आणि ट्विटर (X) यांच्या तक्रार निवारण अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या होत्या; परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. अखेरीस तक्रार अपील समिती (GAC) कडे तक्रार केली आणि त्यानंतरच ही जाहिरात हटवण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्ता अमिता सचदेवा यांच्या कायदेशीर हस्तक्षेपामुळे हे यश मिळाले आहे. 

सुराज्य अभियानाच्या वतीने सतीश सोनार, रवी नलावडे यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेतली आणि ही जाहिरात पोलीस दलाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणारी असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.‌ गृहराज्यमंत्री कदम यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांना तपास करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

जे पोलीस खाते जुगार खेळणार्‍यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करते, त्याच पोलिसांच्या वेशात अशी जाहिरात केली जाते, हे पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे आणि व्यावसायिक फायद्यासाठी समाजाची दिशाभूल करणारे आहे. यात ‘बडे काम का खेल’ असे म्हणून ‘जुगार’ हा गुन्हे उकलण्यासाठी आवश्यक कौशल्य असल्याचे पोलीस वेशातील नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यांकडून प्रचारित करण्यात आले होते, तसेच यात भगवद्गीतेचाही अवमान करण्यात आला होता. त्यामुळे सुराज्य अभियानाने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ‘बिग कॅश पोकर’ आस्थापनावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची, तसेच भविष्यात पोलीस दलाच्या प्रतिमेचा गैरवापर थांबवण्यासाठी कठोर धोरण आखण्याची मागणी सरकारकडे केली आहे. 

डॉ. होमी भाभा विद्यापीठाचा पदवीदान समारंभ

राज्यपालांचा उपस्थितीत डॉ. होमी भाभा

विद्यापीठाचा पदवीदान समारंभ साजरा 

राज्यपाल तथा कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा चौथा वार्षिक दीक्षांत समारंभ मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात पार पडला.

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्लीचे सदस्य सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सच्चिदानंद जोशी यांचे यावेळी दीक्षांत भाषण झाले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते पीएचडी, पदव्युत्तर पदवी तसेच पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आली तर ६ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राजनीश कामत, कुलसचिव प्रा. विलास पाध्ये, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक नानासाहेब फटांगरे, तसेच विविध विभागांचे अधिष्ठाता. प्राध्यापक, स्नातक विद्यार्थी तसेच निमंत्रित यावेळी उपस्थित होते. प्रारंभी कुलगुरू प्रा. कामत यांनी विद्यापीठाचा मागील वर्षाचा अहवाल सादर केला.



दोन डझनहून अधिक छायाचित्रांचा चेहरे फलक

तब्बल दोन डझनहून अधिक नेत्यांची छायाचित्रे असलेला
 हाच तो चेहरे फलक 

दोन डझनहून अधिक छायाचित्रांचा 'चेहरे फलक' लावून 

भारतीय जनता पक्ष डोंबिवलीतर्फे गुढीपाडवा शुभेच्छा

नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता, विष्णुनगर डोंबिवली पश्चिम, पंजाब नॅशनल बँक चौक येथे कमान उभारून त्यावर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा (डोंबिवली) गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणारा फलक लागला आहे. सत्ताधारी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल दोन डझनहून अधिक नेत्यांच्या छायाचित्रांची हा फलक पूर्ण भरलेला आहे. 

छायाचित्रात नेताजी सुभाषचंद्र बोस नामफलक दिसत आहे.
तर चेहरे फलकाने महर्षी कर्वे रस्ता नामफलक झाकला गेला आहे 

कमानीवरील चेहरे फलक लावण्याआधी नेताजी सुभाषचंद्र बोस व महर्षी कर्वे रस्ता नामफलक असे स्पष्ट व ठळकपणे दिसत होते.

कमानीवरील भरगच्च चेहरे फलकामुळे सुदैवाने चौकातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा नामफलक वाचला आहे. मात्र ते भाग्य महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या वाट्याला आले नाही. या चेहरे फलकाने महर्षी कर्वे नामफलक पुन्हा एकदा झाकला गेला आहे.‌

भाजपचे आमदार व प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण व
अन्य दोन डझनहून अधिक नेत्यांची छायाचित्रे असलेला 
 हाच तो चेहरे फलक 

फलकावर भाजपचे आमदार व भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मोठे छायाचित्र असून फलकावर डाव्या बाजूला चव्हाण यांच्यासह आठ जणांची (यात अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, मोदी, शहा, नड्डा आणि फडणवीस) छायाचित्रे आहेत. तर उजवीकडे वाजपेयी, ठाकरे, दिघे यांची छायाचित्रे कायम ठेवून त्याखाली एकनाथ शिंदे, अजित पवार, श्रीकांत शिंदे, राजेश मोरे यांची छायाचित्रे आहेत. इकडेही रवींद्र चव्हाण यांचे छायाचित्र आहेच. या फलकाच्या अगदी वरच्या बाजूला छोट्या छोट्या गोलात बसवलेली तब्बल दोन डझनहून अधिक नेत्यांची (एकूण ३१) छायाचित्रे आहेत.

शेखर जोशी 

२५ मार्च २०२५

भारताचा 'गोटी सोडा' आता जागतिक बाजारपेठेत!

 

भारताचा 'गोटी सोडा' आता जागतिक बाजारपेठेत! 

भारतातील 'गोटी सोडा' हे शितपेय आता लवकरच 'गोटी पॉप सोडा' या नावाने जागतिक बाजारपेठेत दाखल झाला आहे.‌ 

केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने पारंपरिक गोटी सोड्याला नवे नाव आणि रूप देत जागतिक पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे.‌

https://youtu.be/WhioUg0tXcU

अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि आखाती देशांत गोटी सोडा उत्पादन निर्यातीची चाचणीही यशस्वी झाली असून प्राधिकरणाने 'फेअर एक्सपोर्ट्स इंडिया' सोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. त्यामुळे आखाती प्रदेशातील सर्वात मोठ्या किरकोळ व्यापार साखळींपैकी एक असलेल्या 'लुलू हायपर मार्केट'मध्ये 'गोटी पॉप सोडा' नावाने याचे वितरण होणार आहे.‌

https://youtu.be/WhioUg0tXcU

लंडन येथे १७ ते १९ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'आंतरराष्ट्रीय अन्न आणि पेय महोत्सवात' कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने 'गोटीसोडा' सादर केला होता. 

https://youtu.be/WhioUg0tXcU

'गोटी सोडा' फोडल्यानंतर येणारा आवाज आणि बुडबुडे हे याचे खास वेगळेपण आहे.‌ आंतरराष्ट्रीय पातळीवर 'गोटी सोडा' सादर करताना त्याचे हे वैशिष्ठ्य कायम ठेवण्यात आले आहे.‌ बहुराष्ट्रीय शीतपेय कंपन्यांच्या वर्चस्वामुळे बाजारपेठेतून 'गोटी सोडा' हद्दपार झाला होता. देशी शीतपेय उत्पादनाला प्रोत्साहन आणि त्याची निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. आणि त्या प्रयत्नांमधून 'गोटी सोडा' आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दाखल झाला आहे.‌ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 'गोटी सोडा' नव्या व आधुनिक वेष्टनासह सादर झाला आहे. 

शेखर जोशी 


https://youtu.be/WhioUg0tXcU

सोमवार, २४ मार्च, २०२५

वाल्मिकी रामायणातील 'लोकाभिराम' कथा सादरीकरण

प्रकाशक व निरुपणकार दिलीप महाजन सांगणार 

वाल्मिकी रामायणातील 'लोकाभिराम' कथा!  

चैत्र महिन्यातील राम नवरात्राच्या निमित्ताने प्रकाशक व निरुपणकार दिलीप महाजन कल्याण आणि डोंबिवलीत वाल्मिकी रामायणातील 'लोकाभिराम' कथा उलगडणार आहेत. 

येत्या ३१ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत पारनाका, कल्याण पश्चिम येथील त्रिविक्रम देवस्थान येथे संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत महाजन लोकाभिराम कथा सांगणार आहेत. श्री त्रिविक्रम देवस्थानने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. 

तर ३ ते ५ एप्रिल दरम्यान ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, महात्मा फुले रस्ता, डोंबिवली पश्चिम येथे संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत महाजन यांच्या लोकाभिराम कथा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कल्याण आणि डोंबिवलीतील कार्यक्रम सर्वांसाठी खुले आहेत.



राम नवरात्र पर्वकाळात ही रामसेवा श्रीरामांच्याच कृपेने घडते आहे, असे महाजन यांनी सांगितले.