शुक्रवार, १३ जून, २०२५
हिंदू धर्म आणि देवतांवर श्रद्धा आहे
त्यांनाच सेवेत घ्यावे-सनातन संस्थेची मागणी
-शनिशिंगणापूर मंदिरातील ११४ मुस्लिम कर्मचारी
हटविण्याच्या निर्णयाचे हिंदू जनजागृती समिती कडून स्वागत
मुंबई, दि. १३ जून
हिंदूंची मंदिरे ही श्रद्धास्थाने असून ज्यांची हिंदू धर्म आणि देवता यांच्यावर श्रद्धा आहे,अशांनाच मंदिरसेवेत घ्यावे,अशी मागणी, सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केली आहे. तर शनिशिंगणापूर मंदिरातील ११४ मुसलमान कर्मचाऱ्यांना हटविण्याच्या निर्णयाचे हिंदू जनजागृतीनेही स्वागत केले आहे.
केवळ शनिशिंगणापूरच नव्हे, तर सर्वच देवस्थानांनी ही भूमिका घेऊन सेवकांची नियुक्ती करावी, अशी मागणीही वर्तक यांनी केली आहे.
दरम्यान श्री शनिशिंगणापूर मंदिरातील ११४ मुसलमान कर्मचाऱ्यांना हटविण्याच्या निर्णयाचे हिंदू जनजागृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी स्वागत केले आहे.
शासनाच्या नियंत्रणात असलेल्या अन्य देवस्थानांमध्येही अन्यधर्मीय कर्मचारी असतील तर त्यांची चौकशी करून त्यांनाही तत्काळ सेवामुक्त करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी केली आहे.
रॅगिंग विरोधातील नियमावलीचे पालन न केल्याने ८९ शिक्षण संस्थांना 'युजीसी' कडून नोटीस
रॅगिंग विरोधातील नियमावलीचे पालन न केल्याने
८९ शिक्षण संस्थांना 'युजीसी' कडून नोटीस
रॅगिंग विरोधातील नियमावलीचे गांभीर्याने पालन न केल्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील ८९ संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. या संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 'आयआयटी' मुंबई, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि पुण्यातील स्पाइसर ॲडव्हेंटिस्ट विद्यापीठांचा समावेश आहे.
या संस्थांनी येत्या ३० दिवसांच्या आत संपूर्ण अहवाल सादर न केल्यास मान्यता अथवा संलग्नता रद्द करण्यात येईल असा इशारा 'युजीसी'ने दिला आहे.
विद्यार्थ्यांचा मानसिक छळ, आत्महत्या यांना आळा घालण्यासाठी 'युजीसी' ने २००९ मध्ये रॅगिंग विरोधी नियमावली लागू केली होती. या नियमांचे पालन करणे प्रत्येक शैक्षणिक संस्थेस बंधनकारक असूनही देशभरातील अनेक संस्थांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यामुळे युजीसीकडून ही कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.
भारतीय रेल्वे: सरकारमान्य मृत्यूचा सापळा! ज्येष्ठ पत्रकार अजित गोगटे यांचा लेख
भारतीय रेल्वे;सरकारमान्य मृत्यूचा सापळा!
अजित गोगटे
इंट्रो
भारतात प्रवासी आणि मालाची रेल्वेने वाहतूक करण्याचे अधिकार/ मक्तेदारी अधिकार केंद्र सरकारकडे आहे. सरकारनेच १९८९ मध्ये केलेल्या रेल्वे कायद्यात प्रवासी आणि मालाची सुरक्षित वाहतूक कशी केली जाईल याची कायदेशीर चौकट ठरवून सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी स्वत:स्वीकारली आहे.मात्र भारतात धावणारी प्रत्येक प्रवासी रेल्वेगाडी या चौकटीचे उल्लंघन करून चालविली जात असल्याने भारतीय रेल्वे हा सरकारमान्य मृत्यूचा सापळा आहे,
असेच म्हणावे लागेल.
भारतीय रेल्वे: सरकारमान्य मृत्यूचा सापळा!
अजित गोगटे
रेल्वे कायद्यानुसार प्रत्येक प्रवासी गाडीच्या प्रत्येक डब्याची कमाल प्रवासी क्षमता किती असेल व मालगाडीच्या प्रत्येक वाघिणीची माल भरण्याची कमाल क्षमता किती असेल हे ठरविण्याचे बंधन आहे. रेल्वे प्रशासनाला ही कमाल क्षमता केंद्र सरकारकडून मंजूर करून घ्यावी लागते. प्रवाशांची व मालाच्या वजनाची ही कमाल क्षमता ठरविण्यामागे ‘सुरक्षित प्रवास’ हाच मूळ हेतू आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. रेल्वे प्रशासनाने प्रत्येक प्रकारच्या प्रवासी गाडीच्या प्रत्येक डब्याची अशी सरकारने ठरवून दिलेली कमाल प्रवासी क्षमता त्या डब्यात व रेल्वेच्या आवारात लोकांना स्पष्टपणे वाचता येईल अशा प्रकारे हिंदी, इंग्रजी व स्थानिक भाषेत लिहिणेही कायद्याने बंधनकारक आहे. रेल्वे याची अंशत:अंमलबजावणी करते. म्हणजेप्रवासी गाड्यांच्या डब्यांमध्ये प्रवासी क्षमतेचा आकडा दर्शविणारा संदेश तीन भाषांमध्ये लिहिलेला असतो. मात्र तो ‘अमूक प्रवाशांना बसण्यासाठी’ अशा प्रकारे लिहिलेला असतो. म्हणजे लिहिलेली संख्या ही प्रवाशांची कमाल संख्या आहे, हे त्यावरून स्पष्ट होत नाही.
मजेची गोष्ट म्हणजे प्रवासी गाड्यांच्या डब्यांमध्ये प्रवाशांची कमाल संख्या लिहवी, असे कायदा सांगत असला तरी डब्यातून त्याहून अधिक प्रवासी प्रवास करू शकत नाहीत किंवा रेल्वेने त्याहूनअधिक प्रवाशांना प्रवास करू देऊ नये, असे कायदा सांगत नाही. मात्र मालगाड्यांच्या बाबतीत मात्र कायद्याची भाषा याच्या अरदी विपरित आहे. त्यात मालगाडीच्या प्रत्येक वाघिणीची माल भरण्याच्या वजनाची कमाल क्षमता ठरविलेली आहे. एवढेच नव्हे तर त्याहून जास्त माल भरण्यास मज्जाव आहे व जास्त माल भरला असेल तर तो खाली उतरवून टाकण्याची आणि ज्याने जास्त माल भरला असेल त्याला दंड करण्याचीही तरतूद आहे. यावरून असे स्पष्ट दिसते की, रेल्वे कायद्याला आणि तो कायदा करणाºया सरकारला फक्त मालाच्या सुरक्षित वाहतुकीची काळजी आहे व प्रवाशांच्या सुरक्षित वाहतुकीची अजिबात नाही.
याच रेल्वे कायद्यानुसार संपूर्ण देशासाठी एक मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्त (Chief Commissioner of Railway safety) व प्रत्येक विभागीय रेल्वेसाठी एकेक रेल्वे सुरक्षा आयुक्त नेमलेला असतो. रेल्वेची वाहतूक संरक्षितपणे केली जाईल, याची खात्री करणे व अपघात झाल्यास चौकशी करून त्याची जबाबदारी निश्चित करणे हे या सुरक्षा आयुक्तांचे काम असते. हे काम निष्पक्षपणे केले जावे यासाठी रेल्वे वगळून अन्य सरकारी अधिकाºयांची या आयुक्तपदी नेमणूक केली जाते. मुख्य आयुक्तांनी दरवर्षी आपल्या कामाचा अहवाल द्यायचा असतो व सरकारने तो संसदेत सादर करायचा असतो. माझ्या पत्रकारितेच्या चार दशकांच्या कालावधीत सुरक्षा आयुक्तांच्या अहवालात गाड्यांमधील कमाल प्रवासी संख्येचे सर्रास अनुभवाला येणार्या उल्लंघनाचा कधीही साधा उल्लेखही केला गेल्याचे माझ्या स्मरणात नाही. कमाल प्रवासी संख्या सरकारने या आयुक्तांच्याच सल्ल्याने ठरविलेली असते. पण आपणच ठरवून दिलेल्या या मर्यादेचे रेल्वेकडून पालन होते की नाही, हेही हे आयुक्त कधी पाहात नाहीत.
रेल्वेच्या कोणत्याही गाडीत तेथे लिहिलेल्या कमाल संख्येहून जास्त प्रवासी प्रवास करत असतात, हे प्रत्येकाला अनुभवास येणारे वास्तव आहे. मुंबईच्या उपनगरी लोकलगाड्यांमध्ये तर गाडीच्या कमाल प्रवासीसंख्येची ही मर्यादा दुपटी-तिपटीने ओलांडली जाते. धावत्या लोकलमधून खाली पडून प्रवाशांचा मृत्यू होणे हा याचाच परिणाम आहे. मुंबई उपनगरी रेल्वेच्या क्षेत्रात दरवर्षी सरकारी तीन हजार प्रवासी धावत्या गाडीतून पडून जीव गमावत असतात. अशा प्रत्येक मृत्यूसाठी रेल्वेला आठ लाख रुपयांची भरपाई द्यावी लागले. म्हणजे एकट्या मुंबईतील उपनगरी वाहतुकीत कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल रेल्वेला दरवर्षी सुमारे २४० कोटी रुपयांचा अप्रत्यक्ष भूर्दंड सोसावा लागतो. आपणच कायदे करायचे. आपणच त्याचे उल्लंघन करायचे व त्याचा भूर्दंड करांच्या स्वरूपात जनतेच्या माथी मारायचा, असा हा सरकारचा उरफाचा मक्तेदारी धंदा आहे.
प्रत्येक विभागीय रेल्वेच्या कारभाराची संपूर्ण जबाबदारी महाव्यवस्थापकांवर असते. प्रवासी गाड्यांमधून प्रवास करणाºया प्रवाशांची सुरक्षितता आणि जीव धोक्यात येईल अशी कोणतीही कृती हेतूपुरस्सर करणाºया किंवा अपेक्षित कृती करण्यचे टाळून सुरक्षितता धोक्यात आणणाºया कोणत्याही व्यक्तीवर खटला भरून त्यास पाच वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षाही याच रेल्वे कायद्यात आहे. हे कलमा रेल्वेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनांही लागू होते. खरे तर रेल्वेतून पडून होणाºया प्रवाशाच्या प्रत्येक मृत्यूबद्दल महाव्यवस्थापकांना अशी शिक्षा होऊ शकते व तशी व्हायलाही हवी. कारण कायद्याचे हे हेतूपुरस्सर उल्लंघन त्यांच्याच डोळ्यादेखत दररोज होत असते.
सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांना कमाल प्रवासी संख्येची मर्यादा घालून देणारा असा कायदा रस्ते वाहतुकीच्या संबंधीही आहे. तेथेही कायद्याचे तंतोतंत पालन करून प्रवासी गाड्यांमधून निर्धारित कमाल संख्येएवढ्याच प्रवाशांची वाहतूक करण्याचे रेल्वेने मनात आणले तरी ते वास्तवात अशक्य आहे, हे मान्य. पण हा कायदा केला तेव्हा तो करणा-यांना या वस्तुस्थितीची पूर्ण कल्पना होती. तरीही त्यांनी कायद्यात या तरतूदी केल्या. यावरून मुळात पालन न करण्याच्या उद्देशानेच हा कायदा केला गेला, हे उघड आहे. आपण संसदेवर निवडून पाठविलेल्या लोकप्रतिनिधींचे कायदे करणे हेच मुख्य काम असते. परंतु मंजूर करत असलेला कायदा ते वाचतही नाहीत. अन्यथा प्राप्त वस्तुस्थितीत ज्याची अंमलबजावणी कधीच होऊ शकत नाही, असा केवळ कागदावर राहणारा हास्यास्पद कायदा त्यांनी केलाच नसता. पण रेल्वेचा हा सरकारमान्य मृत्यूचा सापळा रचला जाण्यास नागरिक म्हणून आपणही तेवढेच जबाबदार आहोत. आपण याविषयी सरकारला व आपल्या लोकप्रतिनिधींना कधीही जाब विचारत नाही. लोकप्रतिनिधी त्याच्या खासदार निधीतून किती सार्वजनिक शौचालये, बांधतो, किती गल्लीबोळांमध्ये पेवरब्लॉक बसवितो, किती पडक्या चाळींची दुरुस्ती करतो आणि किती गणपती उत्सवांत व दहीहंड्यांमध्ये मिरवितो यावरून आपल्या दृष्टीने तो ‘कार्यसम्राट’ ठरत असतो.
( ज्येष्ठ पत्रकार अजित गोगटे यांच्या फेसबुक पेजवरून साभार)
गुरुवार, १२ जून, २०२५
अंबरनाथच्या साप्ताहिक आहुतीचे हिरकमहोत्सवी वर्षांत पदार्पण!
अंबरनाथ येथील 'साप्ताहिक आहुती'ने ११ जून रोजी हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण केले. स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ पत्रकार वसंतराव त्रिवेदी आणि त्यांच्या पत्नी मनोरमाबेन त्रिवेदी यांनी ११ जून १९६६ रोजी 'साप्ताहिक आहुती' सुरू केले. मुंबईच्या मोठ्या वृत्तपत्रात स्थानिक बातम्यांना ठळक प्रसिद्धी मिळत नाही हा 'आहुती' सुरू करण्यामागील मुख्य उद्देश होता. वसंतराव त्रिवेदी यांचे सुपुत्र गिरीश वसंत त्रिवेदी हे 'साप्ताहिक आहुती' चे संपादक असून त्यांना वडीलबंधू, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.
येत्या १ जानेवारी २०२६ रोजी साप्ताहिक आहुतीचा हिरक महोत्सवी वर्धापन दिन विशेषांक प्रकाशित करण्याचा तसेच हिरक महोत्सवी वर्षांत विविध उपक्रम राबविण्याचा मनोदय साप्ताहिक आहुतीचे संपादक गिरीश त्रिवेदी यांनी साप्ताहिक आहुतीच्या ताज्या अंकातील संपादकीयात व्यक्त केला आहे.
स्थानिक पातळीवर गेली ५९ वर्षं साप्ताहिक प्रकाशित करणे ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. त्यासाठी साप्ताहिक आहुतीच्या सर्व चमूला शुभेच्छा. हिरकमहोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त अभिनंदन आणि शुभेच्छा. या निमित्ताने साप्ताहिक आहुतीच्या सौजन्याने 'आहुती'च्या संपादकीयचा हा संपादित अंश.
अंबरनाथच्या साप्ताहिक आहुतीचे
हिरकमहोत्सवी वर्षांत पदार्पण!
मुंबई येथील मोठ्या वर्तमानपत्रात स्थानिक बातम्यांना ठळक प्रसिद्धी मिळत नाही म्हणून साप्ताहिक आहुतीची मुहूर्तमेढ वसंतराव त्रिवेदी यांनी रोवली. सामाजिक बांधिलकी जपत हे साप्ताहिक सुरु आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, अध्यात्मिक अशा विविध उपक्रमांना सचित्र आणि सविस्तर प्रसिद्धी देण्याच्या हेतूनेच आहुतीची सुरुवात करण्यात आली. गेल्या ५९ वर्षात खून, मारामारी, बलात्कार आदी गुन्हे स्वरूपाच्या बातम्या देण्याचे कटाक्षाने टाळले आहे. या पुढेही तेच धोरण राहील. वसंतराव त्रिवेदी यांनी घालून दिलेल्या तत्वानेच आहुतीची वाटचाल अखंडपणे सुरु आहे. गेल्या तब्बल ५९ वर्षांत वाचकांना सकारात्मक आणि चांगलेच द्यायचा प्रयत्न केला आहे.
गेल्या ५९ वर्षातील आहुतीची ही वाटचाल एक दिशादर्शक वाटचाल आहे. गेल्या ५९ वर्षात आहुतीने केवळ वृत्तपत्र प्रकाशित करण्याचे काम केले नाही तर अनेक समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविले. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आदि अनेक क्षेत्रात आपले योगदान दिले. साप्ताहिक आहुतीचा वर्धापन दिन साजरा करताना राजकीय, शासकीय वरिष्ठाना निमंत्रित करून त्या त्या परिसरातील समस्यांना वाचा फोडण्याची प्रथा आहुतीने सुरु केली.
अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर व्हावे यासाठी आहुती आणि त्रिवेदी परिवार सातत्याने पाठपुरावा करीत आहे. या प्रयत्नांना आता निश्चित अशी दिशा मिळाली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ शहर हे 'मंदिराचे शहर' अर्थात टेम्पल सिटी करण्याचा यशस्वी प्रयत्न सुरु केला आहे. १४० कोटी खर्चाचा प्रस्ताव मंजुर होऊन काम सुरु झाले आहे. अंबरनाथ तालुका व्हावा, प्रशासकीय इमारत उभारून सर्व कार्यालये एकाच ठिकाणी असावी ही मागणी आहुतीने लावून धरली होती. भ्रमणध्वनी कंपन्यांनी मुंबई महाराष्ट्रातून वेगळी केली आहे ती पुन्हा एक करावी अर्थात मुंबई आणि महाराष्ट्र हे एकच सर्कल असावे यासाठीही आहुतीने सातत्याने पाठपुरावा केला. त्याला काही प्रमाणात यश येवून सरकारी बी एस एन एल आणि एम टी एन एल या कंपन्यांनी मुंबई आणि महाराष्ट्र सर्कल एक केले आहे. कल्याण महापालिकेतून अंबरनाथ आणि बदलापूर स्वतंत्र पालिका कराव्यात या मागणीसाठीही आहुतीने योगदान दिले आहे. १४ एप्रिल १९९२ रोजी या दोन पालिका स्वतंत्र झाल्या. कल्याण जिल्ह्याची निर्मिती व्हावी यासाठी सुद्धा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.
वेगवेगळ्या विषयावर, वेगवेगळ्या आकारात विशेषांक प्रकाशित करून आहुतिने इतिहास रचलेला आहे. वर्धापन दिन असो वा दिवाळी विशेष अंक असो एक विषय घेवून त्या विषयावर आहुतीने विशेषांक प्रकाशित केले आहेत. त्यात "आई", प्राचीन शिवमंदिर विशेष अंक (शिवमंदिर विशेष अंकाच्या दोन आवृत्या प्रकाशित झाल्या.) आहुतीच्या इतिहासात गाजलेला विशेष अंक म्हणजे शिवमंदिर विशेष अंक. १४ जून १९९२ रोजी आहुतीच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यास उपस्थित मान्यवरांनी शिव मंदिरात जावून दर्शन घेतले त्यावेळी मधुकरराव चौधरी, मनोहर जोशी आदींनी साबिरभाई शेख यांना विचारले की या मंदिराची माहिती देणारी पुस्तिका आहे का ? त्यावेळी सर्वांनी नकारार्थी उत्तर दिले. त्याच वेळी वसंतराव त्रिवेदी यांनी आदेश दिले की आहुतीचा शिवमंदिर विशेषांक प्रकाशित करायचा. त्याची पहिली आवृत्ती
९ मार्च १९९४ रोजी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आणि जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या उपस्थितीत 'मातोश्री' येथे प्रकाशित झाली. शिवमंदिराचा अभ्यास करणाऱ्यांना कमी किमतीत भरपूर माहिती द्यायची याच हेतूने हा अंक अवघ्या पाच रुपयात उपलब्ध करून दिला होता. त्या अंकाच्या प्रती संपल्या नंतर २००९ मध्ये शिवमंदिराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. याचे प्रकाशन २२ ऑगस्ट २००९ रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. गो. बं. देगलूरकर, पद्मश्री डॉ. सदाशिव गोरक्षकर, डॉ. कुमुद कानिटकर, सदाशिव टेटविलकर, सदाशिव साठे, लक्ष्मणराव कुलकर्णी अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. शेती, इतिहास, पर्यटन, करोना, उद्योग, प्रशासकीय अधिकारी संधी आणि आव्हाने, कृषी उद्योग, विशेष मुलांच्या व्यथा आणि व्यवस्था आदी विविध विषयावर दिवाळी अंक प्रकाशित करण्यात आले आहेत.
वृत्तपत्रांमध्ये अलीकडे जी स्पर्धा सुरु आहे ती गुणात्मक स्पर्धा वाटत नसून ती जीवघेणी स्पर्धा वाटत आहे असे वाटते. या पार्श्वभूमीवर एक उदाहरण आहुतीचे द्यावेसे वाटते. साप्ताहिक विवेकने अंबरनाथ शहरावर एक विशेषांक प्रकाशित केला होता. याचा प्रकाशन सोहळा अंबरनाथ शहरात आयोजित करण्यात आला. त्यावेळी "विवेक" साप्ताहिकाचे स्वागत करणारा, त्या चमूची माहिती देणारा आहुतीचा स्वतंत्र विशेषांक प्रकाशित करण्यात आला होता. वृत्तपत्रांनी अथवा पत्रकारांनी एकमेकांचे हेवेदावे न करता एकमेकाना सहकार्य करावे असे वसंतराव त्रिवेदी यांचे मत होते आणि त्याच तत्वाने आजही आहुतीची वाटचाल सुरु आहे.
आहुतीचे रौप्य महोत्सवी वर्ष जोरदार साजरे करण्यात आले. १४ जून १९९२ रोजी हा अविस्मरणीय असा सोहळा पार पडला. आहुतीचा सुवर्ण महोत्सवी वर्षारंभ मातृवंदनाने ११ जून २०१५ रोजी करण्यात आला.
(साप्ताहिक आहुतीच्या सौजन्याने)
बुधवार, ११ जून, २०२५
'पु.ल. कट्टा' दर शुक्रवारी पुन्हा रंगणार
पु ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचा
'पु.ल. कट्टा' दर शुक्रवारी पुन्हा रंगणार
- पुलंच्या स्मृतीदिनानिमित्त विशेष कार्यक्रम
मुंबई, दि. ११ जून
'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व' पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या खुल्या रंगमंचावर उद्या (१२ जून) विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमापासून 'पु.ल.कट्टा' हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यात येत आहे.
यापुढे हा उपक्रम दर शुक्रवारी अकादमीच्या खुल्या रंगमंचावर रंगणार असून राज्यभरातील सर्व कलाकारांना आपापली कला या रंगमंचावर सादर करण्याची संधी मिळणार आहे.
१२ जून रोजी संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत होणा-या कार्यक्रमात गायक शार्दूल कवठेकर, गायिका अदिती पवार , संवादिनी वादक प्रणव हरिदास, तबला वादक सौरभ शिर्के, अभिवाचक अक्षय शिंपी, नेहा कुलकर्णी, डाॅ कविता सोनावणे, नृत्यांगना राधिका जैतपाळ आणि डॉ. शिरीष ठाकूर हे कलाकार सहभागी होणार आहेत. पुलंच्या साहित्यकृतीवर आधारित हा कार्यक्रम असून तो सर्वांसाठी खुला आहे.
'उदकशांंत' दीर्घांकाचे शनिवारी कल्याणला सादरीकरण
शरद तळवलकर स्मृती दीर्घांक स्पर्धेतील विजेत्या
'उदकशांंत'चे शनिवारी कल्याणला सादरीकरण
- मुलगा गमावलेल्या आई वडिलांच्या भावनिक संघर्षाची कहाणी
डोंबिवली, दि. ११ जून
शरद तळवलकर स्मृती करंडक दीर्घांक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या 'उदकशांत' या दीर्घांकाचा प्रयोग येत्या १४ जून रोजी रात्री साडेआठ वाजता आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण येथे आयोजित करण्यात आला आहे. हा प्रयोग सशुल्क असून प्रयोगाचा कालावधी सलग एक तास २० मिनिटे इतका आहे.
आपला मतीमंद मुलगा आता या जगात नाही हे सत्य मुलाच्या आईने स्विकारले आहे पण मुलाचे वडील ते स्विकारायला तयार नाहीत. मुलाच्या मृत्यूची सावली या दोघांच्याही आयुष्यावर पडली आहे. ही सावली इतकी गडद आहे की ते दोघे सुखाने जगूही शकत नाहीत. या आई-वडिलांच्या भावनिक संघर्षाची कहाणी 'उदकशांत' या दीर्घांकात सादर करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे यंदा पहिल्यांदाच शरद तळवलकर स्मृती करंडक दीर्घांक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत डॉ. समीर मोने लिखित आणि अभिनेते मिलिंद अधिकारी दिग्दर्शित 'उदकशांत' या दीर्घांकाला प्रथम क्रमांक मिळाला. डोंबिवलीच्या तिहाई कलासाधक संस्थेने हा दीर्घांक सादर केला होता. महाराष्ट्रातून एकूण २७ संघ स्पर्धेत सहभागी झाले होते.
'उदकशांत' दीर्घांकात प्रतिक खिसमतराव, श्रद्धा भालेकर, धनंजय धुमाळ, मिनाक्षी जोशी, देवेश काळे हे कलाकार आहेत.
दिग्दर्शशनासह नेपथ्याची जबाबदारी मिलिंद अधिकारी यांनी सांभाळली असून पार्श्वसंगीत आणि प्रकाशयोजना अनुक्रमे
आशुतोष वाघमारे व राजेश शिंदे यांची आहे.
'उदकशांत' मधील जोडप्याचा मतिमंद मुलगा गेल्याला आता एक वर्ष झाले आहे. परंतु ते दोघेही त्याच्या आठवणी विसरू शकत नाहीत. वेगवेगळ्या प्रकारे ते दोघेही आपल्या मतिमंद मुलाचे मरण स्विकारायला तयार नाहीत. हा दीर्घांक एका रात्रीतला असला तरी त्याची पार्श्वभूमी त्या जोडप्याच्या पूर्ण आयुष्याचे भोगणे असल्याचे 'उदकशांत' चे दिग्दर्शक व नेपथ्यकार मिलिंद अधिकारी यांनी सांगितले.
'एका कोंडीतून मुक्त होणाऱ्या जोडप्याची गोष्ट', असा प्रवास आपल्याला जाणवला आणि मी त्या पद्धतीने नाटक बसवत गेलो. सर्व कलाकारांची उत्तम साथ मिळाली आणि हा प्रयोग चांगल्या प्रकारे सादर करू शकलो, असेही अधिकारी म्हणाले.
शरद तळवलकर स्मृती दीर्घांक स्पर्धेत 'उदकशांत'ने पुढील पारितोषिकेही पटकावली आहेत.
दिग्दर्शक (मिलिंदअधिकारी)- प्रथम
संगीत (आशुतोष वाघमारे) - प्रथम
अभिनेत्री ( श्रद्धा भालेकर) - प्रथम
अभिनेत्री (मीनाक्षी जोशी)- तृतीय
अभिनेता ( प्रतिक खिसमतराव) - तृतीय
'सहा सरसंघचालक' पुस्तकाचे शुक्रवारी प्रकाशन
'सहा सरसंघचालक'पुस्तकाचे शुक्रवारी प्रकाशन
छत्रपती संभाजीनगर, दि. ११ जून
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर लिखित'सहा सरसंघचालक'तसेच
प्रा. डॉ. रवींद्र बेम्बरे (देगलूर) यांनी लिहिलेल्या‘नैसर्गिक आपत्तीत मराठी संतांचे मनोविज्ञान’या दोन पुस्तकांचे प्रकाशन येत्या १३ जून रोजी येथे होणार आहे.साहित्यभारती,देवगिरी प्रांत,शाखा छत्रपती संभाजीनगर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
माजी लोकायुक्त-गोवा व माजी न्यायमूर्ती अंंबादासराव जोशी, अखिल भारतीय साहित्य परिषदेचे सहसंघटनमंत्री मनोजकुमार,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र सेवा कार्य प्रमुख प्रा. डाॕ. उपेंद्र कुलकर्णी,साहित्य भारतीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बळिराम गायकवाड हे प्रमुख पाहुणे तर देवगिरी प्रांताचे संघचालक अनिल भालेराव हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.'सहा सरसंघचालक' या पुस्तकावर प्रा. डॉ. कैलास अतकरे भाष्य करणार आहेत.
हा कार्यक्रम संध्याकाळी साडेसहा वाजता दामूअण्णा दाते सभागृह,
डॉ. हेडगेवार रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...