मंगळवार, १७ जून, २०२५
देशातील पहिला सांस्कृतिक रेडिओ महोत्सव मुंबईत - २१ जून रोजी 'आशा रेडिओ' पुरस्काराचे वितरण
देशातील पहिला सांस्कृतिक रेडिओ महोत्सव मुंबईत
- २१ जून रोजी 'आशा रेडिओ' पुरस्काराचे वितरण
मुंबई दि. १७
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने येत्या २१ जून रोजी देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सवाचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव' पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी मुंबईत दिली.
मराठी निवेदक, अभिनेते, संगीतकार, गीतकार, लेखक, तंत्रज्ञ, संपादक यांना एक व्यासपीठ मिळावे. त्यांच्या माध्यमातून मराठी कला, साहित्य, संस्कृतीचे जतन व्हावे, असा आमचा प्रयत्न असल्याचे ॲड. शेलार यांनी सांगितले.
प्रदान करण्यात येणाऱ्या १२ रेडिओ पुरस्कारात 'आशा रेडिओ गौरव पुरस्कार' ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या नावाने देण्यात येणार आहे. याचबरोबर सर्वोत्कृष्ट रेडीओ केंद्र, कम्युनिटी रेडिओ, मनोरंजन कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, पुरुष निवेदक, महिला निवेदक इत्यादी गटातही पुरस्कार देण्यात येणार असून जीवनगौरव पुरस्कार वगळता इतर पुरस्कार नामनिर्देशनाद्वारे घोषित करण्यात येणार आहेत. संबंधित कलाकार, तंत्रज्ञ, रेडिओ केंद्र यांनी विहित नमुन्यातील माहिती संचालनालयास सादर करायची आहे. मानचिन्ह आणि भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेडिओ निवेदकांसोबत संवाद साधणार असून तसेच रेडिओशी संबंधित गाणी, चित्रपटांतील ज्या गाण्यांत रेडिओ दिसला आहे अशी गाणी, गप्पा गोष्टी, किस्से यांचेही सादरीकरण होणार आहे.
येत्या २१ जून रोजी नरिमन पॉइंट, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात दुपारी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
सोमवार, १६ जून, २०२५
नवीन पनवेलमध्ये 'कुंडमळा' घडण्याची शक्यता? - गाढी नदीवरील नव्या पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी
नवीन पनवेलमध्ये 'कुंडमळा'घडण्याची शक्यता?
-गाढी नदीवरील नव्या पुलाचे बांधकाम तातडीने
पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी
-देवद ग्रामस्थांकडून सिडकोला निवेदन सादर
पनवेल,दि.१६ जून
सिडकोकडून गाढी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या नियोजनातील काही त्रुटींमुळे हा पूल अद्याप सुरू झालेला नाही.त्यामुळे येथे असलेल्या अरुंद पाईपलाईन पुलाचा वापर केला जात आहे. या पुलाचे बांधकाम लवकरच लवकर पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी देवद ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. या संदर्भात 'सिडको'च्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन देण्यात आले आहे.
'सिडको'ने गाढी नदीवर एक नवीन पूल बांधला असून त्यावर आत्तापर्यंत ११ कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. नियोजनातील त्रुटींमुळे हा पूल अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे हा पूल सार्वजनिक वापरासाठी खुला केलेला नाही. येथे असलेल्या अरुंद पाईपलाईन पुलाचा वापर केला जात आहे. मुळात हा पाईपलाईन पूल वाहनांसाठीचा नाही. पण तरीही नदीवरील या पुलाचा वाहनचालक, पादचाऱ्यांकडून वापर केला जात आहे. ही परिस्थिती अतिशय धोकादायक असून कधीही मोठा अपघात घडण्याची शक्यता असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
अरुंद पाईपलाईन पुलावरील वाहतुकीमुळे नवीन पनवेलमध्ये 'कुंडमळा' घडण्याची भीतीही या निवेदनात व्यक्त करण्यात येत आहे. या निवेदनाची प्रत 'नैना' चे मुख्य नियोजकार, सिडकोचे मुख्य अभियंता यांनाही देण्यात आले आहे.
रविवार, १५ जून, २०२५
राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा; चबुतऱ्यालगतची जमीन खचली
राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा;
चबुतऱ्यालगतची जमीन खचली
सिंधुदुर्ग, दि. १५ जून
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यालगतची जमीन खचल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पुतळ्याच्या डाव्या बाजूला भगदाड पडले असून, त्या ठिकाणी जमीन खोलवर खचल्याचे दिसून येत आहे. सुदैवाने, चबुतरा आणि पुतळा भक्कम असून त्याला कोणताही धोका निर्माण झालेला नाही.
मात्र चबुतऱ्यालगतची जमीन खचल्याने या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण
विश्व संवाद केंद्र, मुंबईतर्फे देण्यात येणा-या
देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण
मुंबई, दि. १५ जून
विश्व संवाद केंद्र, मुंबईतर्फे देण्यात येणा-या यावर्षीच्या ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण शनिवारी मुंबईत एका कार्यक्रमात झाले. पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा दरवर्षी नारद जयंतीचे औचित्य साधून ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येतो.
वांद्रे – कुर्ला संकुल येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास ‘द इंडियन एक्सप्रेस ग्रुप’चे कार्यकारी संचालक अनंत गोयंका प्रमुख पाहुणे तर ‘टाइम्स नेटवर्क’च्या समुह संपादक व ‘टाइम्स नाऊ नवभारत’च्या मुख्य संपादक नाविका कुमार विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
ज्येष्ठ पत्रकार समीर कर्वे (मुद्रीत माध्यम), संदीप रामदासी (इलेक्ट्रॉनिक माध्यम), शैलेश गायकवाड (समाज माध्यम) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पत्रकारितेतील विशेष कामगिरीबद्दल ‘साप्ताहिक विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर यांचाही सन्मान करण्यात आला. पत्रकारितेतील विशेष योगदानाबद्दल ‘मुंबई समाचार’ला तर गेली ७७ वर्षे कार्यरत असलेल्या ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेलाही या पुरस्काराने गौरविण्यात आले. हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेचे मुंबई ब्युरो प्रमुख सुधांशु जोशी यांनी या पुरस्कार स्वीकारला.
समाज माध्यम पुरस्कारांमध्ये यूट्यूबसाठी जय गगन, फेसबुकसाठी मृगा वर्तक आणि इन्स्टाग्रामसाठी सुनीता पावसकर व अमोल जामदारे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पत्रकारितेतील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सूरज चौगुले यांचाही सन्मान करण्यात आला.
कोकण रेल्वेवर रविवारपासून पावसाळी वेळापत्रक
कोकण रेल्वेवर रविवारपासून पावसाळी वेळापत्रक
मुंबई, दि. १५ जून
कोकण रेल्वेवर रविवारपासून (१५ जून) पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणासाठी दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबरदरम्यान कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येते.
मात्र, यावर्षी कोकण रेल्वेने पूर्वपावसाळी आणि इतर पायाभूत कामे पूर्ण केल्याने पावसाळी वेळापत्रकात सुधारणा करून ते १० जूनऐवजी १५ जूनपासून लागू करण्यात आले आहे.
यंदा ३१ ऑक्टोबरऐवजी २० ऑक्टोबरपर्यंतच पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
शनिवार, १४ जून, २०२५
विश्व मराठी संमेलन येत्या डिसेंबर मध्ये नाशिकला
विश्व मराठी संमेलन येत्या डिसेंबर मध्ये नाशिकला
नाशिक, १४ जून
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे घेण्यात येणारे चौथे विश्व मराठी संमेलन येत्या २६ ते २८ डिसेंबर दरम्यान नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सहकार्य या संमेलनास लाभले आहे. पहिली दोन विश्व मराठी संमेलने मुंबईत झाली होती तर तिसरे विश्व मराठी संमेलन अलीकडेच पुण्यात पार पडले होते.
विश्व मराठी संमेलनात ज्येष्ठ सहित्यिकाला देण्यात येणाऱ्या 'साहित्य भूषण' या पुरस्काराची रक्कम यंदापासून दहा लाख रुपये करण्यात आली आहे. याआधी ही रक्कम पाच लाख रुपये होती.
समीक्षक आणि नाटककार जयंत पवार स्मृती संमेलन येत्या २२ जूनला मालवण येथे
समीक्षक आणि नाटककार जयंत पवार
स्मृती संमेलन येत्या २२ जूनला मालवण येथे
मुंबई, दि. १४ जून
ज्येष्ठ समीक्षक, कथाकार, नाटककार जयंत पवार स्मृती संमेलन येत्या २२ जून रोजी मालवण येथे आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते, नाट्यदिग्दर्शक अनिल गवस यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे.
समाज साहित्य प्रतिष्ठान-सिंधुदुर्ग आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण- मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने होणारे संमेलन मालवण येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे उदघाटन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक ॲड. देवदत्त परवडेकर यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनानंतर 'जयंत पवार यांचे कथात्म साहित्य'या विषयावर डॉ. दत्ता घोलप यांचे व्याख्यान होणार आहे. 'जयंत माणूस आणि लेखक, कलावंत' या विषयावर संमेलनाध्यक्ष गवस यांची प्रगट मुलाखतही यावेळी होणार आहे.
समाज साहित्य प्रतिष्ठानने प्रकाशित केलेल्या मराठीतील ७५ कवींच्या 'सृजन रंग' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन तसेच निमंत्रित कवी संमेलनही होणार आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...