मंगळवार, २६ ऑगस्ट, २०२५

कल्याण गायन समाज संस्थेला सुभेदारवाडा शताब्दी पुरस्कार जाहीर

कल्याण गायन समाज संस्थेला सुभेदारवाडा शताब्दी पुरस्कार जाहीर - गणेशोत्सवाचे व्यवस्थापन यावर्षी श्रीराम सेवा मंडळाकडे कल्याण, दिनांक,२६ ऑगस्ट शास्त्रीय संगीत, गायनाचा प्रचार आणि प्रसाराचे महत्वपूर्ण काम करणाऱ्या कल्याणमधील गायन समाजाला सार्वजनिक गणेशोत्सव सुभेदारवाडा शताब्दी पुरस्कार समितीतर्फे देण्यात येणारा यंदाचा शताब्दी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अलीकडेच कल्याण गायन समाजाने शताब्दी वर्षात पदार्पण केले आहे. सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा १३१ वे वर्ष असून गणेशोत्सवाचे व्यवस्थापन यावर्षी श्रीराम सेवा मंडळा कडे आहे पुरस्कार वितरणाचा सोहळा येत्या २ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता सुभेदारवाडा शाळा येथील सभागृहात होणार आहे. बिर्ला महाविद्यालयाचे संचालक प्रा. डाॅ. नरेशचंद्र, शताब्दी पुरस्कार समिती न्यायासाचे चिटणीस डाॅ. रत्नाकर फाटक, ज्येष्ठ वकील ॲड. सुरेश पटवर्धन, श्रीकांत जोशी, भालचंद्र जोशी, मुयरेश आगलावे हे संचालक, श्रीराम सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण शिंपी उपस्थित राहणार आहेत. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवाव्रती, संस्थांना प्रेरणा म्हणून सुभेदारवाडा गणेशोत्सवातर्फे शताब्दी पुरस्कार दिला जातो. शताब्दी वर्षात झालेल्या २५ हजार रूपयांच्या निधी संकलनातून जमा झालेली रक्कम मुदत ठेव म्हणून बँकेत ठेऊन त्यात देणगीदारांनी दिलेल्या देणगीची भर घालून त्या व्याजातून हा पुरस्कार दिला जातो. रोख रक्कम, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून हा कार्यक्रम २ सप्टेंबर रोजी होणार आहे. सुभेदार वाडा गणेशोत्सवात यंदा 'शिव साम्राज्य' ही संकल्पना घेऊन सजावट करण्यात येणार असून प्रसिद्ध कलादिग्दर्शक संजय धबडे यांनी सुभेदार वाड्याच्या मैदानावर शिवाजी महाराजांच्या महालाचे नेपथ्य केले आहे. २८ ऑगस्ट रोजी पांडुरंग बलकवडे यांचे 'शिवरायांची अष्टक्रांती' या विषयावर व्याख्यान होणार असून ३० ऑगस्ट रोजी मावळा बोर्ड गेमच्या निर्मात्यांशी गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. १ सप्टेंबर रोजी युवा शाहीर रामानंद उगले यांचा 'महाराष्ट्राची लोकगाणी' हा कार्यक्रम होणार असून सर्व कार्यक्रमांची वेळ रात्री साडेआठ अशी आहे. ४ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता 'कल्याणकर नवदुर्गा पुरस्कार' वितरण सोहळा व अचला वाघ यांचे 'शिवकालीन स्त्रिया' या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमास ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ४ आणि ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री १२ या वेळेत शिवकालीन शस्त्रास्त्रे आणि नाण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५

सर्वपक्षीय राजकारण्यांचा 'बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी' - मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर

सर्वपक्षीय राजकारण्यांचा 'बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी' - मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर शेखर जोशी रस्ते आणि चौकांच्या नावांच्या पाट्या झाकून फलकबाजी करण्यात सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पटाईत आहेत.‌ अधूनमधून या मंडळींना असे अनधिकृत फलक उभारून शहर बकाल, विद्रुप होत असल्याचा साक्षात्कार होतो आणि या सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळींचा 'बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी' चे नाटक सुरू होते. प्रसार माध्यमातून ही मंडळी कठोर इशारे देतात आणि कार्यकर्ते, पदाधिकारीही 'मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर ' असे समजून तिकडे साफ दुर्लक्ष करतात. अनधिकृत फलक उभारून शहर बकाल, विद्रूप केले जात आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत फलकबाजी करणाऱ्या मतदान करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझे छायाचित्र असलेले फलक लागले असतील तर ते काढून टाका आणि ते लावणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. ही बातमी रविवारच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. या आधीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी असे आदेश दिले होते. पण काही फरक पडलेला नाही. असे अनधिकृत फलक लावणारे, रस्ते, चौकांचे नामफलक झाकून त्यावर आपले चेहरे फलक लावणारे राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांना जबरदस्त आर्थिक दंड होत नाही तोपर्यंत ही फलकबाजी अशीच सुरू राहणार आहे. किमान एक तरी प्रकरणी अशी कठोर कारवाई झाली तर आणि तरच या प्रकाराला आळा बसेल. सर्वसामान्य नागरिकांना जे दिसते ते महापालिका प्रशासन, महापालिका अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग यांना दिसत नसेल यावर शेंबडे पोरही विश्वास ठेवणार नाही. डोंबिवली पश्चिमेत नेताजी सुभाषचंद्र बोस रस्त्यावरील ( पंजाब नॅशनल बँक/आरबीएल बॅंक चौक) सुभाष रस्ता, महर्षी कर्वे रस्ता नावांच्या पाट्यांवर सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची फलकबाजी सुरू आहे. मध्यंतरी वेळोवेळी याची छायाचित्रे काढून समाज माध्यमातून प्रसारित करत होतो. स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही लक्ष 'एक्स' (ट्विटर) वेधून घेतले होते. मात्र काहीही फरक पडलेला नाही. निर्लज्ज आणि कोडगे सर्वपक्षीय राजकीय नेते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते रस्ता व चौक नामफलक झाकून आपले चेहरे फलक बिनदिक्कतपणे लावत आहेत. हे सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासारख्या निर्लज्जपणा, कोडगेपणा मला करता येत नाही, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या फलकबाजीच्या विरोधात समाज माध्यमातून छायाचित्रे प्रसारित करणे बंद केले आहे. अशीच परिस्थिती डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी रस्ता, आयआरबीचे म्हैसकर यांच्या नावाचा चौक, घनश्याम गुप्ते रस्ता, गोपी मॉल चौक येथे आहे. आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्थानिक आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आदींसह भाजपचे पदाधिकारी यांची छायाचित्रे असलेल्या मोठ्या कमानी डोंबिवलीभर लावण्यात आल्या आहेत. या कमानीवर सर्व मिळून साठ/ सत्तरहून अधिक स्टॅम्पसाईज फोटो आहेत. या कमानी अधिकृत असतीलही. पण या कमानींनी रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील दोन ते अडीच फूट जागा अडवली गेली आहे. दरवर्षीप्रमाणे भाजपच्या या कमानी आता नवरात्रोत्सव, दिवाळीपर्यंत अशाच कायम असतील. अनेक रस्ते अरुंद असल्याने या कमानींमुळे वाहतूक कोंडीतही भर पडत आहे. पण सत्ताधारी भाजपकडूनच हे होत असल्याने महापालिका प्रशासनही तिकडे डोळेझाक करत आहे. त्यामुळे अनधिकृत फलक उभारून शहर बकाल आणि विद्रुप करणा-यांना आगामी महापालिका निवडणुकीत मतदान करू नका, हे अजित पवार यांनी केलेले आवाहन योग्यच आहे. मतदारांनी ते खरोखरच मनावर घ्यावे आणि मतदान करताना 'नोटा' वापरून आपला निषेध व्यक्त करावा. ©️शेखर जोशी

शनिवार, २३ ऑगस्ट, २०२५

पुन्हा एकदा तेच 'नाटक'! - मीटर पद्धत सुरू करायचीच असेल तर ती संपूर्ण कल्याण शहरात सुरू करावी

पुन्हा एकदा तेच 'नाटक'! - मीटर पद्धत सुरू करायचीच असेल तर ती संपूर्ण कल्याण शहरात सुरू करावी शेखर जोशी येत्या २५ ऑगस्टपासून कल्याणमध्ये मीटर पद्धतीने रिक्षा चालवल्या जाणार आहेत. वाहतूक पोलीस, आरटीओ, रेल्वे अधिकारी आणि रिक्षा चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मीटर रिक्षांसाठी रिक्षातळ निश्चित केला आहे. उल्हासनगर कडे जाणाऱ्या रिक्षा तळावरून या मीटर रिक्षा चालवल्या जाणार आहेत. मीटर पद्धतीने रिक्षा चालवण्याचे 'नाटक' पुन्हा एकदा रंगणार असल्याची चर्चा प्रवाशांमध्ये आहे. एखाद्या विशिष्ट ठिकाणीच मीटरप्रमाणे रिक्षा थांबा/ तळ प्रवाशांना नको आहे तर संपूर्ण शहरात मीटर पद्धतीचा अवलंब झाला पाहिजे, अशी प्रवाशांची मागणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण डोंबिवली शहरामध्ये शेअर पद्धतीने रिक्षा चालवल्या जात आहेत. एखाद्या प्रवाशाने मीटर टाका, असे सांगितले तर इथे मीटरपद्धत नाही. शेअर किंवा थेट ( आम्ही सांगू तितके पैसे द्या) जायची पद्धत आहे.‌ वर्षानुवर्षे रिक्षाचालकांची ही मनमानी सुरू आहे. कल्याण डोंबिवलीतील विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, विद्यमान आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना या प्रकरणी लक्ष घालायला वेळ नाही. सर्वपक्षीय राजकीय नेते, वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी रिक्षा चालक मालक संघटना, त्यांचे नेते आणि मुजोर रिक्षाचालकांपुढे नांगी टाकली आहे. १.०५ किलोमीटर अंतरासाठी रिक्षाचे किमान भाडे आता २६ रुपये झाले आहे. मात्र यापेक्षा कमी किंवा इतके अंतर जाण्यासाठी एखादा प्रवासी एकटा किंवा कुटुंबासोबत रिक्षात बसला तर रिक्षाचालक मनाला येईल ते (५० ते ७० रुपयांपर्यंत) पैसे मागतात.‌ अशा रिक्षाचालकांची तक्रार करा, असे वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सांगतात. पण प्रत्येक वेळी सर्वसामान्य माणसाला ते शक्य नाही. त्यामुळे रिक्षाचालक आणखी मुजोर झाले आहेत. मुळातच एखाद्या विशिष्ट ठिकाणीच मीटरप्रमाणे रिक्षा थांबा/तळ सुरू करणे हास्यास्पद आहे. याआधीही कल्याण डोंबिवलीत असे प्रयोग करून झाले आहेत. त्याला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून तो प्रयोग बंदही झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत शेअर आणि मीटर अशा दोन्ही प्रकारच्या पद्धती असल्या पाहिजेत.‌ वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कल्याण डोंबिवलीत अधिकृत रिक्षातळ/ थांबे दिले आहेत त्य ठिकाणी शेअर आणि मीटर दोन्ही पद्धती ठेवायला हव्यात. तसेच अमूक ठिकाणी जायचे असेल तर हा थांबा, तमूक ठिकाणी जायचे असेल तर हा थांबा असे प्रकार केल्यामुळे कल्याण डोंबिवलीत रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रिक्षाथांबे तयार करण्यात आले आहेत. ते पहिल्यांदा बंद झाले पाहिजेत. रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर रिक्षाथांब्यावर प्रवासी बसला की तो सांगेल त्याप्रमाणे रिक्षाचालकाने कोणतीही कटकट न करता गेले पाहिजे. कल्याण डोंबिवलीत तो दिवस कधी उजाडेल माहिती नाही. खरे तर रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर कडोंमपाच्या परिवहन सेवेच्या बसगाड्यांना प्राधान्य दिले जाणे आवश्यक आहे. आता २५ ऑगस्टपासून उल्हासनगरकडे जाणा-या रिक्षा तळावरून मीटर प्रमाणे रिक्षा चालवल्या जाणार आहेत. रेल्वे स्थानकातून उतरणारे प्रवासीच फक्त रिक्षाने प्रवास करतात का? कल्याण रेल्वेस्थानकातून बाहेर पडणारे प्रवासी फक्त उल्हासनगरला जाणारेच असणार आहेत का? त्यामुळे एकूणच हा प्रकार हास्यास्पद आहे. कल्याण डोंबिवली शहरात घरातून बाहेर पडलेल्या प्रवाशांना घरापासून दुसरीकडे जायचे असेल तर काय? कल्याणमध्ये राहणा-या कोणाला घरापासून उल्हासनगरला जायचे असेल तर त्याने आधी घरापासून रिक्षाने कल्याण रेल्वे स्थानकावर यायचे आणि तिथून उल्हासनगरला जाण्यासाठी मीटरप्रमाणे असलेल्या रिक्षातळावर रिक्षा पकडावी, असे रिक्षा चालक मालक संघटना, त्यांचे पदाधिकारी, वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना अपेक्षित आहे का? कल्याणमधील रिक्षा चालक मालक संघटनांचे नेते, वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना मीटरनुसार रिक्षा घालाव्या, प्रवाशांची लुटमार होऊ नये असे खरोखरच वाटत असेल तर फक्त विशिष्ट ठिकाणीच मीटरप्रमाणे रिक्षातळ/ थांबा न करता संपूर्ण कल्याण व डोंबिवली शहरात रिक्षा मीटर सक्ती लागू करावी. मुठभर मुजोर रिक्षाचालकांपुढे नांगी न टाकता त्यांना वठणीवर आणावे.

मालेगाव बॉम्बस्फोट,७/११ आणि दाभोलकर प्रकरणांतील राजकीय हस्तक्षेप मीरा बोरवणकर यांनी जाहीर करावा -सनातन संस्थेचे आवाहन

मालेगाव बॉम्बस्फोट,७/११ आणि दाभोलकर प्रकरणांतील राजकीय हस्तक्षेप मीरा बोरवणकर यांनी जाहीर करावा -सनातन संस्थेचे आवाहन कोल्हापूर, दि. २३ ऑगस्ट मालेगाव बाँबस्फोट, मुंबईतील ७/११ चा रेल्वे बॉबस्फोट आणि दाभोलकर हत्या प्रकरणांत ‘राजकीय हस्तक्षेप करणार्‍या ‘त्या’ राजकीय नेत्यांची नावे माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी जाहीर करावी, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी शनिवारी येथे केले.‌ कोल्हापूर येथील प्रेसक्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या घटना ज्या काळात घडल्या, त्या वेळी महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार होते. दाभोलकर प्रकरणात काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हत्येच्या घटनेनंतर तपास चालू होण्यापूर्वीच ‘ही हत्या गोडसेवादी प्रवृत्तींनी केली’, असे म्हणत तपासाला दिशा दिली, हा राजकीय हस्तक्षेप होता, असे मीरा बोरावणकर यांना म्हणायचे होते का? एटीएस् प्रमुख हेमंत करकरे यांच्यावरही राजकीय दबाव होता, असे त्या म्हणाल्या, त्यातून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, गृहमंत्री आर्.आर्. पाटील कि केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी हस्तक्षेप केला, असे बोरवणकर यांना म्हणायचे आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे राजहंस म्हणाले. पुणे येथे दाभोलकरांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने झालेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (‘अंनिस’च्या) कार्यक्रमात मीरा बोरवणकर म्हणाल्या की, खाकीने हिरवे, भगवे वा पांढरे होणे, हे अत्यंत घातक आहे. आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, खाकीने डावे आणि उजवेही असता कामा नये. ज्या संघटनेचे कार्यकर्ते नक्षलवादी म्हणून अटक होत आहेत, ज्या संघटनेचे नाव काँग्रेसच्या काळात आर्.आर्. पाटील हे गृहमंत्री असतांना महाराष्ट्र गुप्तवार्ता विभागाच्या ‘नक्षलवाद्यांना साहाय्य करणार्‍या संघटनांच्या’ यादीत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी राहिलेल्या बोरवणकर यांना हे माहिती नव्हते का ? नुकताच प्रशांत कांबळे उर्फ सुनील जगताप या कट्टर नक्षलवाद्याला रायगडमध्ये अटक झाली. तो अंनिसचे कार्यकर्ता आहे. हे बोरवणकर यांना माहिती नाही का ? स्वतःला विवेकाचा आवाज म्हणवणार्‍या अंनिसबद्दल आम्ही नव्हे, तर सातारा येथील साहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी कडक ताशेरे ओढत यांच्या ट्रस्टवर प्रशासक नेमण्याची, तसेच विशेष लेखापरिक्षण करण्याची शिफारस केली आहे, हे त्यांना माहित नाही का ? असा प्रश्नही राजहंस यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे करवीर तालुका संयोजक अशोक गुरव, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाप्रमुख दीपक देसाई, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक निरंजन शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी यावेळी उपस्थित होते.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील हे १२ पूल धोकादायक

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील हे १२ पूल धोकादायक घाटकोपर रेल्वे पूल, करी रोड रेल्वे पूल चिंचपोकळी रेल्वे पूल भायखळा रेल्वे पूल सँण्डहर्स्ट रोड रेल्वे पूल मरीन लाईन्स रेल्वे पूल ग्रँटरोड जवळील फ्रेंच पूल ग्रँटरोड ते चर्नीरोड दरम्यानचा केनडी रेल्वे पूल मुंबई सेंट्रल ते ग्रँटरोड महालक्ष्मी रेल्वे पूल दादर लोकमान्य टिळक रेल्वे पूल हे सर्व पूल धोकादायक स्वरूपाचे असून यातील काही पुलांच्या दोस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सवकाळात गणपती आगमन, विसर्जन मिरवणुकीदरम्यान या पुलांवर मोठ्या प्रमाणात गर्दी तसेच नाचगाणी करू नये असे आवाहन बृहन्मुंबई महापालिकेने केले आहे.

अजितदादांना जे सुचले ते राजकारणी कोकण सुपुत्रांना का सुचले नाही?

अजितदादांना जे सुचले ते राजकारणी कोकण सुपुत्रांना का सुचले नाही? शेखर जोशी मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात सर्रास 'चाकरमानी' हा शब्द वापरला जातो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या शब्दासाठी 'कोकणवासीय' हा शब्द वापरला जावा, असे आदेश दिले, ते योग्यच आहे. वर्षानुवर्षे 'चाकरमानी' हाच शब्द मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांसाठी वापरला जातो. खरे तर 'चाकरमानी' ऐवजी 'नोकरदार' हा शब्द आणि आता अजित पवार म्हणतात त्याप्रमाणे 'कोकणवासीय' किंवा 'कोकणवासी' हा शब्द योग्य आहे. अजितदादांना जे सुचले ते राजकारणी कोकण सुपुत्रांना इतकी वर्षे का सुचले नाही? मुळचे कोकणवासीय असलेले आणि आता नोकरी/ व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत राहणारी सर्व नोकरदार/ व्यावसायिक मंडळी गणपती, शिमगा उत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी जात असतात. त्यांचा हा नेम वर्षानुवर्षे अव्याहतपणे सुरू आहे. गणपती किंवा शिमगा सणासाठी कोकणात जाणाऱ्या मंडळींमध्ये मुंबईत राहून व्यवसाय करणारे मूळ कोकणवासीयही असतातच.‌ ते 'चाकरमानी' कसे होऊ शकतात.‌ उलट ते त्यांच्या दुकानात, कार्यालयात, व्यवसायात काही जणांना नोकरीवर ठेवतात. त्यामुळे नोकरदार किंवा मुंबईकर कोकणवासीय हा शब्द आता यापुढे वापरला गेला पाहिजे. मूळ कोकणवासीय राजकीय नेते सर्वपक्षात आहेत. अजित पवार यांना हे सुचले ते याआधी मुंबईकर झालेल्या आणि राजकारणात उच्च पदे भुषविलेल्या कोकण सुपुत्रांना का सुचले नाही? म्हटले तर अजित पवार यांनी दिलेल्या आदेशात तसे विशेष असे काही नाही. पण अजितदादांनी संधी साधली आणि बाजी मारली असे म्हणावे लागेल.

शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०२५

ब्रह्माकुमारीजच्या आबुरोड येथील मुख्यालयात उद्या महा रक्तदान शिबिर

आबुरोड येथील मुख्यालयात उद्या महा रक्तदान शिबिर - ब्रह्माकुमारीजच्या देशभरातील सहा हजारांहून अधिक सेवाकेंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन आबूरोड (राजस्थान), दि. २२ ऑगस्ट येथील ब्रह्माकुमारीज संस्थानचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय असलेल्या 'शांतीवन' येथे उद्या- २३ ऑगस्ट रोजी महाभव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रह्माकुमारीजच्या दिवंगत राजयोगिनी दादी प्रकाशमणि यांची पुण्यतिथी विश्वबंधू दिन म्हणून साजरी करण्यात येते. याचा एक भाग म्हणून ब्रह्माकुमारीजतर्फे संपूर्ण भारतभर तसेच नेपाळ येथे रक्तदानाचे महाअभियान आयोजित करण्यात आले आहे. या महाअभियानची सुरुवात १७ ऑगस्ट रोजी गुरुग्राम येथे केंद्रीय आरोग्यमंत्री जे.‌पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. आता ब्रह्माकुमारीजतर्फे संपूर्ण देशात २२ ते २५ ऑगस्ट या कालावधीत सहा हजारांहून अधिक सेवाकेंद्रात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या महारक्तदान शिबिरात एक लाख रक्त पिशव्या जमा करण्याचे लक्ष्य आहे.‌ तसेच या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद व्हावी, यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत.