शनिवार, १३ सप्टेंबर, २०२५
यावर्षी नवरात्र दहा दिवसांचे
यावर्षी नवरात्र दहा दिवसांचे- ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ.सोमण
ठाणे, दि. १३ सप्टेंबर
आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी होत असल्याने यंदाच्या वर्षी नवरात्र दहा दिवसांचे असून २२सप्टेंबर ते १ आक्टोबर २०२५ या कालावधीत नवरात्रोत्सव आहे, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
आश्विन महिन्यात शेतात तयार झालेले धान्य घरात येत असते. म्हणून नवरात्र निर्मिती शक्तीचा,आदिशक्तीचा उत्सव असून तो महिलांच्या सबलीकरणाचाही उत्सव असतो, असे सोमण यांनी सांगितले.
नवरात्रात कुठल्या रंगाचे वस्त्र परिधान करावे हे कुठल्याही धर्मग्रंथात सांगितलेले नाही. परंतु नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक नाही तर तो सामाजिक, सांस्कृतिकही आहे. नवरात्रात महिलांनी एकाच रंगाची वस्त्रे परिधान केल्याने त्यांच्यात समानतेची, एकतेची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होते, असेही सोमण म्हणाले.
नवरात्री नवरंग २०२५
--------------------------
१)सोम.२२सप्टें. सफेद/पांढरा
२) मंगळ.२३ सप्टें. लाल
३) बुध.२४ सप्टें. निळा
४) गुरू.२५ सप्टें.पिवळा
५) शुक्र.२६ सप्टें. हिरवा
६) शनि.२७ सप्टें.करडा/ग्रे
७) रवि. २८ सप्टें.केशरी/भगवा
८) सोम.२९सप्टें. मोरपिशी/पिकाक ग्रीन
९) मंगळ.३० सप्टें. गुलाबी.
१०) बुध.१ आक्टो. जांभळा.
राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करणार
राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे
जिल्हानिहाय सर्वेक्षण करणार- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई, दि. १३ सप्टेंबर
ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांनी शनिवारी येथे दिली.
सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या एका बैठकीत बारव संवर्धन, संरक्षण याबाबत आढावा घेण्यात आला.
राज्यात ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि पुराणकाळापासून ज्यांच्या नोंदी सापडतात अशा तीन हजारांहून अधिक बारव आहेत. येथे ज्या पद्धतीचे स्थापत्यशास्त्र वापरले आहे, त्या स्थापत्यशास्त्राचा नमुना जगामध्ये दुर्मिळ असून या बारवमुळे जलसंवर्धन आणि जलसंधारणाचेही काम केले जात आहे. शासकीय यंत्रणेतील अधिकारी तसेच जलसंधारण, ऐतिहासिक वारसा विषयांमध्ये काम करणाऱ्या तज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे, असे शेलार यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यामध्ये या सगळ्यांचं दस्तावेजीकरण करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व बारवांच्या प्राथमिक सर्वेक्षणाच्या अहवालाचे काम येत्या तीन महिन्यांमध्ये पूर्ण केले जाणार आहे.
बुधवार, १० सप्टेंबर, २०२५
भारत विकास परिषद आयोजित 'भारत को जानो' स्पर्धा
भारत विकास परिषद आयोजित
'भारत को जानो' स्पर्धा
डोंबिवली, दि. १० सप्टेंबर
भारत विकास परिषद- डोंबिवली शाखा आणि हुतात्मा कॅप्टन विनयकुमार सचान स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच 'भारत को जानो' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता ६ वी वी ते ८ वी या छोट्या गटात २८ तर मोठ्या गटात २५ संघ सहभागी झाले होते.
प्रमुख पाहुणे म्हणून अतिश कुलकर्णी तर कविता मिश्रा प्रांत निरीक्षक म्हणून उपस्थित होत्या. छोट्या गटात ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलने पहिला तर मोठ्या गटात स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णुनगरने पहिला क्रमांक पटकावला. भारत विकास परिषद डोंबिवली शाखेच्या अध्यक्षा ॲड. वृंदा कुळकर्णी यांच्यासह दोन्ही संस्थानचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
'शालू झोका दे गो मैना' आता मोठ्या पडद्यावर
'हास्यजत्रा'प्रसिद्ध प्रभाकर मोरे यांचे
'शालू झोका दे गो मैना' आता मोठ्या पडद्यावर
- आनंद शिंदे यांनी गायलेले गाणे समाज माध्यमांवर सादर
मुंबई, दि. १० सप्टेंबर
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' प्रसिद्ध अभिनेते प्रभाकर मोरे यांचे 'शालू झोका दे गो मैना' हे गाणे लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असून गायक आनंद शिंदे यांनी ते गायले आहे. समाज माध्यमांवर हे गाणे नुकतेच प्रकाशित झाले आहे.
प्रभाकर मोरे,धनश्री काडगावकर यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे 'लास्ट स्टॉप खांदा' या आगामी मराठी चित्रपटात असून हा चित्रपट येत्या २१ नोव्हेंबररोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. श्रमेश बेटकर यांनी लिहिलेलं हे गाणं किशोर मोहिते यांनी संगीतबद्ध केले आहे.
या गाण्याची युट्यूब लिंक
https://youtu.be/Hbgz8RMOcPI?si=iUrLbZGyQ83ljp48
वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी ग्रंथालय मित्र मंडळ
वाचन संस्कृतीच्या जतन,संवर्धनासाठी ग्रंथालय मित्र मंडळ
मराठी वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने डोंबिवली ग्रंथ संग्रहालयातर्फे ग्रंथालय मित्र मंडळ ही संकल्पना घेऊन काम करण्यात येत आहे.
वाचक, लेखक आणि ग्रंथालये यांच्यात संवाद साधून, समाजातील विविध घटकांना बरोबर घेऊन ही चळवळ पुढे नेण्याचा मानस डोंबिवली ग्रंथ संग्रहालयाचे माजी मुख्य कार्यवाह सुधीर बडे यांनी व्यक्त केला.
ग्रंथालय मित्र मंडळ संकल्पनेविषयी बडे यांच्याशी केलेली बातचीत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीकरता संपर्क
सुधीर बडे- +91 93214 31548
गिरीश घाटे- +91 98201 46432
विलास चंदने- +91 98194 23626
प्रकाश ओक- +91 81082 36901
ग्रंथालय मित्र मंडळ संकल्पनेविषयी डोंबिवली ग्रंथ संग्रहालयाचे माजी मुख्य कार्यवाह सुधीर बडे यांच्याशी केलेली बातचीत शेजो उवाच या युट्यूब चॅनेलवर ऐकता/ पाहता येईल. खाली दिलेल्या लिंकवर अंगठा टेकवला की ही लिंक ओपन होईल.
शेजो उवाच
https://youtu.be/olPxM6iD31E?feature=shared
ग्रामीण भागातील मुलांच्या रखडणाऱ्या लग्नाच्या विषयावरील 'कुर्ला टू वेंगुर्ला'
ग्रामीण भागातील मुलांच्या रखडणाऱ्या
लग्नाच्या विषयावरील 'कुर्ला टू वेंगुर्ला'
- येत्या १९ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित
मुंबई, दि. १० सप्टेंबर
ग्रामीण भागातील तरुणांच्या रखडणाऱ्या लग्नाचा विषय
'कुर्ला टू वेंगुर्ला' या आगामी चित्रपटात मांडण्यात आला असून हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
विजय कलमकर दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.
ग्रामीण भागात मुलांची लग्न जमणे ही समस्या झाली आहे. गावातल्या मुलींना शहराचे आकर्षण असते, त्यांच्याही आयुष्याबद्दल काही इच्छा-आकांक्षा असतात. परिणामी शहर आणि ग्रामीण भाग अशी एक दरी निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या रखडणाऱ्या लग्नाचा संवेदनशील विषय, त्याच्याशी जोडलेले सामाजिक मुद्दे, परस्पर नातेसंबंध अशा विषयाची मांडणी कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटात करण्यात आली आहे.
चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लेखन अमरजीत आमले यांचे असून चित्रपटात वीणा जामकर, प्रल्हाद कुडतरकर, वैभव मांगले, सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत, अमेय परब, शेखर बेटकर, अनघा राणे इत्यादी कलाकार आहेत.
मंगळवार, ९ सप्टेंबर, २०२५
राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला हाच का तुमचा सार्वजनिक गणेशोत्सव?
राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला
हाच का तुमचा सार्वजनिक गणेशोत्सव?
शेखर जोशी
राज्य शासनाने म्हणे यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाला
राज्य महोत्सवाचा दर्जा दिला होता. हाच का तुमचा
राज्य महोत्सव...
पुण्यात विसर्जन मिरवणूक ३५ तास, छातीत धडकी भरविणा-या डीजेच्या भींती, अचकट विचकट गाणी व अश्लील नृत्य, ढोल ताशांचा दणदणाट ( दोन/चार ढोल ताशे वादक असतील तर एकवेळ समजू शकतो, ढोल ताशा वादकांची पथके च्या पथके. पारंपरिक असले तरी एका मर्यादेपलीकडे त्याचाही त्रासच होतो), लेझर दिवे आणि धांगडधिंगा.(काही अपवाद वगळता) पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात काही अपवाद वगळता सर्वत्र हेच चित्र होते. स्थानिक पातळीवरील सर्वपक्षीय निर्लज्ज,कोडग्या लोकप्रतिनिधींचाच
वरदहस्त या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर असल्याने वेगळे काय होणार? तुम्ही काहीही करा, सर्वसामान्य सुजाण व सुसंस्कृत नागरिकांना कितीही बोंबलू द्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, या मानसिकतेमुळे ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व त्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते सोकावले आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हा निर्णय घेतला खरा. पण उत्सवाचे विकृतीकरण आणि बाजारीकरण होणार नाही, हे ही राज्य शासन आणि सर्व प्रशासकीय यंत्रणांनी पाहायला हवे होते. पण राज्यात काही सन्माननीय अपवाद वगळता कुठेही दिसले नाही. सोलापूरमध्ये शांततेत विसर्जन मिरवणूक पार पडते तर राज्यात इतर ठिकाणी ते का होत नाही? रस्ता अडवून, पादचारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे भव्य मंडप उभारून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झालाच पाहिजे हा हट्ट कशासाठी? शहरातील बंदिस्त सभागृह, मंगल कार्यालय याठिकाणी गणपती बसवणार असाल तर आणि तरच सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी दिली जाईल, याची कठोरात कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सत्ताधारी राज्यकर्ते आणि विरोधक यांनी धाडस दाखवले पाहिजे. डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेली अनेक वर्षे त्यांचा गणेशोत्सव सुयोग मंगल कार्यालयात साजरा करत आहेत. मंडळाची गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणूकही पारंपरिक पद्धतीने निघते.फटाके, डीजेजा वापर नसतो.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे सदानकदा फडणवीस, शिंदे यांच्यावर तोंडसुख घेत असतात. टोमणेगिरी करतात. पण या प्रकरणी त्यांची अळी मिळी गूप चिळी आहे. अर्थात लोकानुनय न करता प्रसंगी कटू निर्णय घेऊन सत्ता राबवायची असते. शिवसेना एकसंघ असताना शिवसेनेच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी मुंबईतील गणेश मूर्तींच्या उंचीवर मर्यादा आणण्यासाठी महापौर असताना प्रयत्न सुरू केले होते. खरे तर पक्षप्रमुख आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा सांगणाऱ्या त्यांच्या या नातवाने महापौर डॉ. राऊळ यांना पाठिंबा देऊन हा विषय धसास लावायला हवा होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेत तर शिवसेनेचेच बहुमत होते, सत्ताही होती. पण उद्धव ठाकरे यांनी कच खाल्ली आणि धमक दाखवली नाही.
मतपेढीवर डोळा ठेवून सद्गुण विकृती असलेले मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, चमकेश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी याची गंभीर दखल घेऊन कायदा धाब्यावर बसविणारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि पदाधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कायद्यानुसार कारवाई, शिक्षा केली पाहिजे. आम्ही अमूक करू, तमूक करु, कायद्याची अंमलबजावणी करू, यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची काळजी घेऊ, अशी तोंडपाटीलकी न करता प्रत्यक्ष व ठोस कारवाई झाली असल्याचे लोकांना दिसू द्या. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा काळ सोकावत चालला आहे.
शेखर जोशी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...






