शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५
सीमेवरील दहा हजार जवानांना डोंबिवलीतून फराळ पोहोचणार!
सीमेवरील दहा हजार जवानांना
डोंबिवलीतून फराळ पोहोचणार!
-भारत विकास परिषदेच्या डोंबिवली शाखेचा उपक्रम
डोंबिवली, दि. १९ सप्टेंबर
'ऑपरेशन सिंदूर' निमित्ताने सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारत विकास परिषद-हुतात्मा कॅप्टन विनयकुमार सचान डोंबिवली शाखेतर्फे यावर्षी देशाच्या सीमांवरील दहा हजार जवानांना डोंबिवलीतून दिवाळी फराळ आणि शालेय विद्यार्थ्यांनी बनविलेली शुभेच्छा पत्र पाठविण्यात येणार आहेत.
उपक्रमाचे हे तिसरे वर्ष असून २०२४ या वर्षी सीमांवरील पाच हजार तर त्या आधीच्या वर्षी दोन हजारसैनिकांपर्यंत दिवाळी फराळ पोहोचविण्यात आला होता. फराळाचे डबे सीमावर्ती भागात पाठवण्यासाठी सुमारे पन्नास लाख रुपये इतका खर्च अपेक्षित असून लोकसहभागातून ही रक्कम उभी केली जाणार आहे.
फराळाचे सर्व पॅकिंग परिषदेचे सदस्य, डोंबिवली शहरातील नागरीक, विद्यार्थी यांच्या श्रमदानातून होणार आहे. याची सुरवात शारदीय नवरात्र घटस्थापनेच्या दिवशी (२२ सप्टेंबर ) या दिवशी पद्मश्री गजानन माने आणि इतर मान्यवरांच्या हस्ते फराळाचे डबे भरून केली जाणार आहे.
या सेवायज्ञात कमीत कमी ५०० रुपये देऊन फराळाचा एक डबा किंवा अधिक कितीही देणगी देऊन सहभागी होता येईल. दिलेल्या देणगीला आयकर कायद्यानुसार ८० जी ची वजावट आहे. दानशूर आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन भाविप, डोंबिवली शाखा अध्यक्षा अँड वृंदा कुलकर्णी यांनी केलेआहे. अधिक माहितीसाठी ९८२१४२९६७७/९८९२२५८९२३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
चाणक्य मंडळचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी, 'एसआयआरएफ' संस्थेच्या संचालिका सुमेधा चिथडे, निवेदिका आणि सूत्रसंचालिका अनघा मोडक आदी मान्यवरांनी ध्वनीचित्रफित तयार करून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५
आचार्य अत्रे चौक, आरे मेट्रो स्थानकातून पहिली मेट्रो गाडी आता सकाळी ५.५५ ला सुटणार
आचार्य अत्रे चौक, आरे मेट्रो स्थानकातून
पहिली मेट्रो गाडी आता सकाळी ५.५५ ला सुटणार
- १५ सप्टेंबरपासून अंमलबजावणी सुरू
मुंबई, दि. १५ सप्टेंबर
कुलाबा-वांद्रे-आरे-सीप्झ भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील आचार्य अत्रे चौक आणि आरे मेट्रो स्थानकावर सकाळी ६.३० ऐवजी आता सकाळी ५.५५ वाजता पहिली मेट्रो गाडी सुटणार आहे.
आरे ते बीकेसी मार्गिका ऑक्टोबर २०२४ मध्ये तर बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मार्गिका मे २०२५ मध्ये सुरू झाली. ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासून सोमवार ते शनिवारदरम्यान सकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेत आरे ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकादरम्यान मेट्रो गाड्या चालवल्या जातात. तर रविवारी मात्र सकाळी ८.३० ते रात्री १०.३० अशी मेट्रो सेवेची वेळ होती.
दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे बुधवारी उदघाटन; 'संत तुकाराम' चित्रपटाचे सादरीकरण
दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे
बुधवारी उदघाटन; 'संत तुकाराम' चित्रपटाचे सादरीकरण
मुंबई, दि. १५ सप्टेंबर
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे येत्या १७ सप्टेंबर रोजी उदघाटन करण्यात येणार आहे. प्रभात फिल्म कंपनीनिर्मित 'संत तुकाराम' हा चित्रपट यावेळी दाखविण्यात येणार आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या लघू नाट्यगृहात दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगातील सर्वोत्तम दहा चित्रपटांमध्ये स्थान मिळवणारा 'संत तुकाराम' पहिला भारतीय चित्रपट ठरला होता.
दर्जेदार चित्रपट बघणारा रसिकवर्ग घडविणे आणि जुन्या काळातील गाजलेले, ऐतिहासिक चित्रपट तसेच नव्या पिढीने निर्मित केलेले सकस, प्रगल्भ व विचारप्रवर्तक चित्रपट यांचा रसिकांना आस्वाद घेता यावा, याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील सांगितले.
कार्यक्रम विनामूल्य असून 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश' या तत्वावर आसन व्यवस्था करण्यात येणार आहे.
शनिवार, १३ सप्टेंबर, २०२५
यावर्षी नवरात्र दहा दिवसांचे
यावर्षी नवरात्र दहा दिवसांचे- ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ.सोमण
ठाणे, दि. १३ सप्टेंबर
आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी होत असल्याने यंदाच्या वर्षी नवरात्र दहा दिवसांचे असून २२सप्टेंबर ते १ आक्टोबर २०२५ या कालावधीत नवरात्रोत्सव आहे, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
आश्विन महिन्यात शेतात तयार झालेले धान्य घरात येत असते. म्हणून नवरात्र निर्मिती शक्तीचा,आदिशक्तीचा उत्सव असून तो महिलांच्या सबलीकरणाचाही उत्सव असतो, असे सोमण यांनी सांगितले.
नवरात्रात कुठल्या रंगाचे वस्त्र परिधान करावे हे कुठल्याही धर्मग्रंथात सांगितलेले नाही. परंतु नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक नाही तर तो सामाजिक, सांस्कृतिकही आहे. नवरात्रात महिलांनी एकाच रंगाची वस्त्रे परिधान केल्याने त्यांच्यात समानतेची, एकतेची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होते, असेही सोमण म्हणाले.
नवरात्री नवरंग २०२५
--------------------------
१)सोम.२२सप्टें. सफेद/पांढरा
२) मंगळ.२३ सप्टें. लाल
३) बुध.२४ सप्टें. निळा
४) गुरू.२५ सप्टें.पिवळा
५) शुक्र.२६ सप्टें. हिरवा
६) शनि.२७ सप्टें.करडा/ग्रे
७) रवि. २८ सप्टें.केशरी/भगवा
८) सोम.२९सप्टें. मोरपिशी/पिकाक ग्रीन
९) मंगळ.३० सप्टें. गुलाबी.
१०) बुध.१ आक्टो. जांभळा.
राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करणार
राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे
जिल्हानिहाय सर्वेक्षण करणार- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई, दि. १३ सप्टेंबर
ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांनी शनिवारी येथे दिली.
सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या एका बैठकीत बारव संवर्धन, संरक्षण याबाबत आढावा घेण्यात आला.
राज्यात ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि पुराणकाळापासून ज्यांच्या नोंदी सापडतात अशा तीन हजारांहून अधिक बारव आहेत. येथे ज्या पद्धतीचे स्थापत्यशास्त्र वापरले आहे, त्या स्थापत्यशास्त्राचा नमुना जगामध्ये दुर्मिळ असून या बारवमुळे जलसंवर्धन आणि जलसंधारणाचेही काम केले जात आहे. शासकीय यंत्रणेतील अधिकारी तसेच जलसंधारण, ऐतिहासिक वारसा विषयांमध्ये काम करणाऱ्या तज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे, असे शेलार यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यामध्ये या सगळ्यांचं दस्तावेजीकरण करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व बारवांच्या प्राथमिक सर्वेक्षणाच्या अहवालाचे काम येत्या तीन महिन्यांमध्ये पूर्ण केले जाणार आहे.
बुधवार, १० सप्टेंबर, २०२५
भारत विकास परिषद आयोजित 'भारत को जानो' स्पर्धा
भारत विकास परिषद आयोजित
'भारत को जानो' स्पर्धा
डोंबिवली, दि. १० सप्टेंबर
भारत विकास परिषद- डोंबिवली शाखा आणि हुतात्मा कॅप्टन विनयकुमार सचान स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच 'भारत को जानो' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता ६ वी वी ते ८ वी या छोट्या गटात २८ तर मोठ्या गटात २५ संघ सहभागी झाले होते.
प्रमुख पाहुणे म्हणून अतिश कुलकर्णी तर कविता मिश्रा प्रांत निरीक्षक म्हणून उपस्थित होत्या. छोट्या गटात ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलने पहिला तर मोठ्या गटात स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णुनगरने पहिला क्रमांक पटकावला. भारत विकास परिषद डोंबिवली शाखेच्या अध्यक्षा ॲड. वृंदा कुळकर्णी यांच्यासह दोन्ही संस्थानचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
'शालू झोका दे गो मैना' आता मोठ्या पडद्यावर
'हास्यजत्रा'प्रसिद्ध प्रभाकर मोरे यांचे
'शालू झोका दे गो मैना' आता मोठ्या पडद्यावर
- आनंद शिंदे यांनी गायलेले गाणे समाज माध्यमांवर सादर
मुंबई, दि. १० सप्टेंबर
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' प्रसिद्ध अभिनेते प्रभाकर मोरे यांचे 'शालू झोका दे गो मैना' हे गाणे लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असून गायक आनंद शिंदे यांनी ते गायले आहे. समाज माध्यमांवर हे गाणे नुकतेच प्रकाशित झाले आहे.
प्रभाकर मोरे,धनश्री काडगावकर यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे 'लास्ट स्टॉप खांदा' या आगामी मराठी चित्रपटात असून हा चित्रपट येत्या २१ नोव्हेंबररोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. श्रमेश बेटकर यांनी लिहिलेलं हे गाणं किशोर मोहिते यांनी संगीतबद्ध केले आहे.
या गाण्याची युट्यूब लिंक
https://youtu.be/Hbgz8RMOcPI?si=iUrLbZGyQ83ljp48
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...