शुक्रवार, ३० जून, २०२३

विलेपार्ले आणि डोंबिवलीत 'घन बरसे'!

 विलेपार्ले आणि डोंबिवलीत 'घन बरसे'!

गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधी आणि दि गोवा हिंदू असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ८ आणि ९ जुलै रोजी अनुक्रमे विलेपार्ले व डोंबिवलीत 'घन बरसे' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात 'मल्हार' रागाचे विविध प्रकार सादर केले जाणार आहेत

 ८ जुलैला विलेपार्ले  येथील साठ्ये महाविद्यालय सभागृहात  तर ९ जुलैला टिळकनगर विद्या मंदिराचे पेंढरकर सभागृह, डोंबिवली पूर्व येथे हे कार्यक्रम होणार आहेत. दोन्ही कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी साडेपाच अशी आहे.

योगेश हुंसवाडकर, महेश कुलकर्णी, विनायक नाईक, संजय देशपांडे, सारंग कुलकर्णी हे कलाकार हा कार्यक्रम सादर करणार आहेत. 

'मल्हार' रागाची ओळख, पावसाचे आणि महाराष्ट्र व सीमेपल्याड  संगीत संपन्न अशा बेळगाव धारवाड भागातील मल्हार आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा रसिक श्रोत्यांसमोर सादर केला जाणार आहे, अशी माहिती  कार्यक्रमाचे संकल्पनाकार आणि सुसंवादक  सुभाष सराफ यांनी दिली. दोन्ही कार्यक्रमांना विनामूल्य प्रवेश आहे


गुरुवार, २९ जून, २०२३

सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पुनर्वापर करणार

दक्षिण मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील 

सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पुनर्वापर करणार 

- प्रकल्पांतर्गत ४ प्रक्रिया केंद्रे उभारण्याचे काम प्रगतीपथावर

सागरी किनारा मार्ग प्रकल्प परिसर व समुद्रालगत असणा-या झोपडपट्ट्यांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्या पाण्याचा पुनर्वापर करण्याचा पथदर्शी प्रकल्प बृहन्मुंबई महापालिकेने हाती घेतला आहे. प्रकल्पांतर्गत ४ ठिकाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत असून याद्वारे दररोज तब्बल ४ लाख ८५ हजार लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. 

पथदर्शी प्रकल्पातील ४ प्रक्रिया केंद्रांद्वारे प्रक्रिया केलेले पाणी परिसरातील शौचालयांमध्ये आणि उद्यानांमध्ये वापरण्यात येणार आहे. शिवाजी नगर येथील प्रक्रिया केंद्राचे काम आता अंतिम टप्प्यात असून उर्वरित ३ प्रक्रिया केंद्रांचे काम देखील वेगात सुरु आहे. शिवाजी नगर येथील प्रक्रिया केंद्राची क्षमता ही दररेज ५० हजार लीटर (KLD) सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची असून दर्या सागर प्रक्रिया केंद्राची क्षमता ही ३५ हजार लीटर इतकी आहे. तर दर्या नगर व मार्कंडेश्वर मंदिराच्या मागील परिसर येथील प्रक्रिया केंद्रांची क्षमता ही अनुक्रमे दररोज १ लाख लीटर व ३ लाख लीटर इतक्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची असणार आहे, अशी माहिती व्यवसाय विकास विभागाच्या प्रमुख आणि स्माईल कौन्सिलच्या संचालक शशी बाला यांनी दिली.

परिसरातील सांडपाण्यावर जागीच प्रक्रिया व्हावी आणि ते पुन्हा वापरता यावे, यासाठी स्माईल कौन्सिलच्या माध्यमातून आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी इंद्र कांत झा यांच्या ‘एमर्जी एन्वायरो’ या स्टार्टअपने विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित ‘इंटिग्रेटेड वेटलँड टेक्नॉलॉजी’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला असल्याचे शशी बाला यांनी सांगितले. 

शुक्रवार, २३ जून, २०२३

भूमिकांची उलटापालट आणि दुतोंडीपणा उघड

'आदिपुरुष'च्या निमित्ताने...

भूमिकांची उलटापालट आणि दुतोंडीपणा उघड 

शेखर जोशी

ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' या वादग्रस्त, बिभत्स चित्रपटाच्या निमित्ताने तथाकथित ढोंगी पुरोगामी आणि प्रतिगामी यांच्या भूमिकांची उलटापालट झाली असल्याचे दिसून येत आहे. आणि या दोन्ही बाजूंचा दुतोंडीपणाही उघड झाला आहे.

सहा महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टिझर/ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्याचवेळी दिग्दर्शक ओम राऊत आणि चित्रपटाच्या सादरीकरणावर प्रचंड टीका झाली. खरे तर त्या टिझरवरूनच चित्रपट टुकार, बीभत्स आणि तमाम भारतीयांच्या मनातील रामायणाचे प्रतिमाभंजन करणारा आहे हे लक्षात आले होते. त्यावेळी भाजपचे आमदार राम कदम यांनी चित्रपटाला विरोध केला तर मनसेचे अमेय खोपकर यांनी राऊत यांना समर्थन दिले. चित्रपट पूर्ण पाहा आणि मग ठरवा, ओम राऊत हे हिंदुत्ववादी आहेत, अशी भलामण त्यांनी केली. चित्रपट प्रदर्शित झाला. आणि आता भाजपचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे सर्व नेते, लोकप्रतिनिधी यांची आणि मनसेची, राज ठाकरे यांचीही अळी मिळी गुप चिळी आहे.

आधुनिक काळातील क्रूरकर्मा मुस्लिम दहशतवादी किंवा इतिहासातील क्रूरकर्मा अफझलखानासारख्या दिसणा-या विध्वंसक मुसलमानाच्या वेषातील रावण, त्याच्याच जवळ जाणारा हनुमान, बीभत्स आणि वटवाघूळ सदृश्य पुष्पक विमान, काळोखी लंका, टॅट्यू काढलेला इंद्रजित, हनुमानाच्या तोंडी दिलेले 'जली' असले टपोरी प्रकारचे संवाद आणि बरेच काही. हे सर्वच न पटणारे आहे. काहीतरी नवीन, वेगळे करण्याच्या नावाखाली, दिग्दर्शकीय स्वातंत्र्याच्या नावाखाली ओम राऊत यांनी ज्या विकृत, बीभत्स पद्धतीने आदिपुरुष सादर केला आहे, ते पाहता कोणाही सुजाण, भारतीय संस्कृती, आपले वेद, पुराणे, पौराणिक देव देवता याविषयी आस्था, प्रेम, आदर असणा-यांना चीडच येईल. झापडे लावून याचे समर्थन करणेच चुकीचे आहे. 

हिंदुत्व, भारतीय संस्कृती, परंपरा याचा अभिमान, गर्व असणारी लोकं उजवी म्हणून ओळखली जातात, त्यांना कुचेष्टेने प्रतिगामी म्हटले जाते. तर बहुसंख्यांकांची आस्था, त्यांची दैवते, हिंदुत्व, हिदू संस्कृतीची टिंगल टवाळी करणे, अल्पसंख्याकांचे विशेषतः मुस्लिमांचे लांगुलचालन करणे म्हणजे पुरोगामी असल्याचे समजले जाते. काश्मीर फाईल्स, केरळ स्टोरी या चित्रपटांना याच ढोंगी पुरोगामी मंडळींनी विरोध केला. खरे तर भारतात काश्मीर प्रश्नांबाबत जे काही घडले त्याचे आणि लव्ह जिहादच्या भयाणतेचे वास्तव चित्रण अनुक्रमे या दोन्ही चित्रपटातून सादर करण्यात आले. ते कटू असले तरी सत्य होते. इतर वेळी भावना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणा-या ढोंगी पुरोगामी मंडळींनी दोन्ही चित्रपटाला विरोध केला. यात सर्व कॉंग्रेसी,डावे, समाजवादी, निधर्मवादी, सर्वधर्मसमभाववादी या पुरोगाम्यांचा समावेश होता. दोन्ही चित्रपटांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणीही यांनी केली होती. तर हिंदुत्ववादी म्हणवून घेणारा भाजप, कट्टर हिंदुत्ववादी संघटना असलेल्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि इतर काही हिंदुत्ववादी संघटना, नेते यांनी या चित्रपटांचे समर्थन केले. 

आता आदिपुरुष बाबतीत याच भूमिकांची उलटापालट झाली आहे. आदिपुरुष म्हणजे रामायणाचे आणि त्यातील व्यक्तिरेखांचे उघडपणे केलेले प्रतिमाभंजनच आहे हे दिसताय. पण तरीही महाराष्ट्रातील किंवा देशातील एकाही भाजप नेत्यांने, लोकप्रतिनिधीने, पदाधिकाऱ्यांने चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केलेली नाही. सादरीकरणावरून दिग्दर्शक ओम राऊत, संवाद लेखक मनोज मुंतशीर यांचा विरोध/ निषेध केलेला नाही. 'पठाण' चित्रपटात भगवी बिकिनी घातली म्हणून तो चित्रपट बंद पाडण्याची भाषा करणारे हिंदुत्ववादी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदिपुरुषबाबत मूग गिळून गप्प आहेत. आणि याच्या उलट डावे, कॉंग्रेसी, समाजवादी असे तथाकथित पुरोगामी चित्रपटाच्या विरोधात बोलत आहेत. बंदी घालण्याची मागणी करत आहेत. राज ठाकरे, मनसेही गप्प आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपसोबत आलो असे सांगणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही चित्रपटाचा निषेध किंवा विरोध केलेला नाही. आता शिंदे गटातील खासदार श्रीरंग बारणे यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. 


मुळात हा चित्रपट केंद्रीय सेन्सॉर बोर्डाने मंजूर कसा केला हे कोडे आहे. याच केंद्रीय सेन्सॉर बोर्डावर प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे, हिंदुत्ववादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक रमेश पतंगे सदस्य आहेत. चित्रपटासाठी तज्ज्ञ अभ्यासक म्हणून व्याख्याते, प्रवचनकार सच्चिदानंद शेवडे यांनी काम केले आहे. ज्या देवदत्त नागे यांनी 'खंडोबा' ची भूमिका केली ते या चित्रपटात हनुमानाच्या भुमिकेत आहेत. याशिवाय अजय अतुल, प्रसाद सुतार, तेजस्विनी पंडित, सोनाली खरे ही मंडळीही चित्रपटाशी संबंधित आहेत. या सर्वांनी झापडे लावून, डोळ्यांवर पट्टी बांधून काम केले का? चित्रपटाचा टिझर आणि आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, सर्व स्तरातून प्रचंड टीका होत असताना, समाज माध्यमांतूनही अत्यंत प्रक्षुब्ध भावना व्यक्त होत असताना ही सर्व मंडळी गप्प आहेत. ओम राऊत, मनोज मुंतशीर यांच्याकडून किंवा वरील अन्य काही जणांकडून केलेल्या कृतीचे समर्थन करण्यात येत आहे ते अजिबात न पटणारे व चीड आणणारे आहे. तुम्ही चुकलात, माती खाल्ली हे मान्य करायला, कबुली द्यायला हिंमत लागते, ती तुम्ही दाखवावी.

तुमच्याविषयी सर्वसामान्य मराठी माणसांच्या मनात जी प्रतिमा आहे, त्याला तुम्ही स्वतःच तडा देण्याचे कृती केली आहे. 'काम केले/झाले, सर्व काही मिळाले' आता होऊ दे काहीही. समाज माध्यमातून लोक चार दिवस बोलतील आणि विसरून जातील., अशी तुमची भूमिका आहे आणि असणार. म्हणूनच तुम्ही सर्व गप्प आहात. तुमचेही बरोबरच आहे म्हणा. खरेच आहे, लोकं चार, आठ दिवसांत सर्व काही विसरून जातात. अशा लिहिण्याने काही फरक पडणार नाही, हे माहीत असूनही मनातील खदखद व्यक्त केली आहे. मला वाटले ते लिहिले.

शेखर जोशी

२३ जून २०२३

गुरुवार, २२ जून, २०२३

देशभरात 'लव्ह जिहाद'च्या विरोधात मोहीम

 

डावीकडून  रमेश शिंदे, डॉ. चारुदत्त पिंगळे, चित्तरंजन स्वामी महाराज, नीरज अत्री, जयेश थळी

 ‘दी केरल स्टोरी’ या चित्रपटानंतर देशभरात लव्ह जिहादची भीषणता दर्शवणारी अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. अशा वेळी हिंदू मुली आणि पालक यांच्यात अधिक जनजागृती करणे आवश्यक असल्याने 'लव्ह जिहाद'च्या विरोधात वर्षभर मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ.चारुदत्त पिंगळे यांनी येथे दिली.

फोंडा, गोवा येथे हिंदू जनजागृती समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या समारोप पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने महाराष्ट्रात १३१ मंदिरांत वस्त्रसंहिता लागू झाल्यावर कर्नाटक, छत्तीसगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आदी अनेक राज्यांतूनही ‘मंदिर महासंघ’ स्थापन करण्याची मागणी आली आहे. त्यानुसार त्या त्या राज्यांत महासंघ स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच त्याद्वारे एक हजारांहून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले असल्याचेही डॉ. पिंगळे यांनी सांगितले.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने हिंदुहिताच्या उपक्रमांना गती देण्यासाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर हिंदु संघटनांचे एकत्रीकरण करून देशभरात ‘हिंदु राष्ट्र समन्वय समित्या’ स्थापन करण्यात येणार आहेत. हिंदू राष्ट्र आणि हिंदुहिताच्या सूत्रांवर कार्य करण्याचे वचन देणारे राजकीय पक्ष आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधींनाच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हिंदूंचा पाठिंबा मिळेल, असेही ते म्हणाले.

 अधिवेशनात भारत आणि नेपाळ यांना हिंदु राष्ट्र घोषित करणे; लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोवंश हत्या विरोधी कठोर कायदा करणे; हलाल सर्टिफिकेशनवर बंदी आणणे; मंदिरांचे सरकारीकरण रहित करणे; ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ अन् ‘वक्फ’ कायदे रहित करणे; जनसंख्या नियंत्रण कायदा करणे; काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन आदी विषयांवर ‘हर हर महादेव’च्या जयघोषात एकमताने ठराव संमत करण्यात आले असल्याची माहिती हिंदू जनजागृती समिती’चे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी दिली.‌

गोमंतक मंदिर महासंघा’चे सचिव जयेश थळी म्हणाले, या अधिवेशनात देशभरातून मंदिर विश्वस्त सहभागी झाले होते. त्यात ‘मंदिरे सरकारीकरण आणि अतिक्रमण यांतून मुक्त करणे’ या मुख्य मागणीसह देशभरात ‘मंदिर संस्कृती रक्षण आणि संवर्धन’ यांसाठी कर्नाटक, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली या राज्यांमध्ये राज्यस्तरीय मंदिर परिषदांचे आयोजन करण्याचे ठरले आहे. 

देशभरात विशेषत: ईशान्येकडील राज्यांत होत असलेले हिंदूंचे धर्मांतर ही मोठी समस्या आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘धर्मांतर हे राष्ट्रांतर’ असल्याचे जे सांगितले होते ते आपण मणिपूर येथील हिंसाचारावरून अनुभवत आहोत. असे प्रकार अन्य राज्यांत घडू नयेत यासाठी कठोर धर्मांतरविरोधी कायदा तातडीने करण्याची आवश्यकता आहे, असे त्रिपुरा येथील ‘शांती काली आश्रमा’चे चित्तरंजन स्वामी यांनी सांगितले.‌

हरियाणा येथील ‘विवेकानंद कार्य समिती’चे अध्यक्ष नीरज अत्री म्हणाले, देशाच्या रक्षणासाठी आणि हिंदूंना जागृत करण्यासाठी करण्यात येणार्‍या वक्तव्यांना ‘हेट-स्पीच’ ठरवून हिंदूंवर एकतर्फी कारवाई चालू आहे. यासंदर्भात कायदेशीर लढा कसा देता येईल, यावरही देशभरातून आलेल्या अधिवक्त्यांनी चर्चा केली.

अधिवेशनात भारतातील बहुसंख्य हिंदूंना न्याय देण्यासाठी संविधानातील ‘सेक्युलर’ आणि ‘सोशालिस्ट’ शब्द वगळून तेथे ‘स्पिरिच्युअल’ शब्द घालावा आणि भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे, देशभरात श्रद्धा वालकर, साक्षी, अनुपमा अश्या अनेक हिंदू मुलींची लव्ह जिहादींनी निर्घृणपणे हत्या केली आहे. या समस्येवर उपाय म्हणून देशपातळीवर कठोर असा ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्यात यावा, हिंदूंच्या मूलभूत अधिकारांचे हनन करणारा ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट 1991’ आणि ‘वक्फ’ कायदा त्वरित रहित करून काशी, मथुरा, ताजमहल, भोजशाळा आदी मोगल आक्रमकांनी बळकावलेली हजारो मंदिरे आणि भूमी हिंदूंच्या ताब्यात द्यावी, देशभरातील शासनाच्या नियंत्रणातील सर्व मंदिरांचे सरकारीकरण रहित करून मंदिरे भक्तांच्या हाती सोपवावीत, तसेच मंदिरांसाठी ‘हिंदु बोर्ड’ स्थापन करून त्यात शंकराचार्य, धर्माचार्य, भक्त, पुजारी, धर्मनिष्ठ न्यायाधीश आणि अधिवक्ते यांचा समावेश करण्यात यावा, केंद्रशासनाने संपूर्ण देशात ‘गोवंश हत्या बंदी’ आणि ‘धर्मांतरबंदी’ करणारे कायदे संमत करावेत, ‘समांतर अर्थव्यवस्था’ निर्माण करणार्‍या ‘हलाल सर्टिफिकेशन’ वर त्वरित बंद घालावी आणि अन्य ठराव मंजूर करण्यात आले.


मुख्यमंत्रीपदी बसण्यासाठी मिंधे कोण झाले?


मुख्यमंत्रीपदी बसण्यासाठी मिंधे कोण झाले? 

 उबाठा गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, उबाठा गटाचे 'उत' आलेले खासदार, प्रवक्ते सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख मिंधे म्हणून करत असतात. पण खरे मिंधे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत. सत्तेसाठी, मुख्यमंत्रीपदावर बसण्यासाठी त्यांनीच मिंधेगिरी केली.

महाविकास आघाडी आणि गद्दारी या शब्दाचे जनक, मूळपुरुष शरद पवार यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेना फोडली. त्याआधी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून, त्यांचे सरकार पाडून, आमदार फोडून म्हणजे गद्दारांना बरोबर घेऊन ते मुख्यमंत्री झाले होते. असो. 

तर याच शरद पवार यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेनेचे छगन भुजबळ आणि अन्य काही आमदार फोडले. पवार तेव्हा कॉंग्रेस आय पक्षात असल्याने त्यांनी या सर्वांना कॉंग्रेस आय पक्षात प्रवेश दिला. याच गद्दार भुजबळ यांना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, पुढे उपमुख्यमंत्रीपद दिले.


भुजबळ यांचे शिवसेनेतून अशा प्रकारे बाहेर पडणे बाळासाहेब ठाकरे यांच्या जिव्हारी लागले.‌ ठाकरे आणि शिवसेनेकडून भुजबळ यांचा उल्लेख कायम 'लखोबा लोखंडे' या शेलक्या शब्दात केला जायचा. भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानी संतप्त शिवसैनिकांनी हल्ला केला होता. पुढे याच भुजबळांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली.‌

हा सर्व इतिहास माहित असताना, ज्या शरद पवार यांनी शिवसेना फोडली, ज्या गद्दार भुजबळ यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली, ज्या भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांची 'टी बाळू' अशी टिंगल टवाळी केली त्या पवार, भुजबळ यांच्याशी, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करून मुख्यमंत्रीपद मिळवले, गद्दार भुजबळ यांच्यासोबत अडीच वर्षे काम केले. मुख्यमंत्रीपदावर बसण्यासाठी ही मिंधेगिरी नाही तर काय होते? 

मला मुख्यमंत्री करणार असाल तर गद्दार भुजबळ मंत्रीमंडळात नको, अशी भूमिका का घेतली नाही? ( शरद पवार यांनी तुमचे म्हणणे मान्य केले असते किंवा नसते हा नंतरचा प्रश्न) किमान तसे जाहीरपणे एकदाही का बोलला नाहीत? भुजबळांना मंत्रीमंडळात घेणार असाल तर मला मुख्यमंत्रीपद नको, अशी भूमिका का घेतली नाही? आपण असे बोललो आणि शरद पवार यांनी ते मान्य केले तर हातातोंडाशी आलेले मुख्यमंत्रीपद गमवावे लागेल, अशी भीती वाटली आणि मिंधेपणा पत्करून एकदाचे मुख्यमंत्रीपदावर बसलात. 

शेखर जोशी

२२ जून २०२३


बुधवार, २१ जून, २०२३

नंदन नीलेकणी तुम्हाला दंडवत!


नंदन नीलकेणी 

नंदन नीलेकणी तुम्हाला दंडवत!

आपण ज्या शाळेत, महाविद्यालयात शिकतो, शिक्षण पूर्ण करतो ती शाळा, महाविद्यालय यांच्या बाबतीत आपण सर्वजण कृतज्ञ असतो. आणि असलेच पाहिजे. शाळा/ महाविद्यालयाप्रती असलेली ही कृतज्ञता प्रत्येक विद्यार्थी आपापल्या परिने व्यक्त करत असतो. 

'आयआयटी' मुंबईचे माजी विद्यार्थी आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांनी कृतज्ञता म्हणून 'आयआयटी' मुंबईला तब्बल ३१५ कोटी रुपयांची (३८.५ मिलियन डॉलर्स) देणगी दिली आहे. 'आयआयटी' मुंबईत पायाभूत सुविधांची निर्मिती, उदयोन्मुख क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी नीलकेणी यांनी ही देणगी दिली आहे.

'आयआयटी'ला एका  माजी विद्यार्थ्याकडून मिळालेली ही आजवरची सर्वांत मोठी देणगी आहे. या आधीही नीलेकणी यांनी ८५ कोटींची देणगी 'आयआयटी' मुंबईला दिली होती. या देणगीतून नवीन वसतिगृहे बांधणे, स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला वीजपुरवठा करणे आणि देशाचे पहिले विद्यापीठ इनक्यूबेटर स्थापित करणे यासाठी होती. 

ही देणगी केवळ आर्थिक मदत नाही, तर आर्थिक मदतीपेक्षाही अधिक आहे.  ज्या संस्थेने मला खूप काही दिले त्या संस्थेप्रती हे  ऋण आहे, असे नीलकेणी सांगतात.

२१ जून २०२३

मंगळवार, २० जून, २०२३

राष्ट्रवादीच्या उलट्या बोंबा!

राष्ट्रवादीच्या उलट्या बोंबा!

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. तुमच्या पिताश्रींनी काही वर्षांपूर्वी आत्ताची उबाठा सेना फोडली होती. छगन भुजबळ यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार (अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या घाऊक प्रमाणात फोडले/ आपल्या बाजूने वळविले त्या तुलनेत तुमचे पिताश्री कमीच पडले) फोडून कॉंग्रेस आय पक्षात आणले होते. तेव्हा तुमचे पिताश्री या पक्षात होते.‌त्यावेळी कुठे गेला होता तुमचा धर्म...

तेव्हाची शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी भुजबळ यांच्यासह फुटलेले सर्व आमदार गद्दारच होते. पण तेव्हा पवार साहेबांनी शिवसेना फोडली म्हणून ते किती ग्रेट आहेत, कसे चतुर, चाणाक्ष, मुत्सद्दी आहेत म्हणून त्यांची आरती ओवाळली होती. वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून काही आमदार फोडून तुमच्या पिताश्रींनी ते सरकारही पाडले होते. म्हणजे खरे तर या गद्दारीची सुरुवात तुमच्या पिताश्रींनी केली आहे.

उबाठा गटाचे प्रवक्ते, खासदार जे 'उत' आल्यासारखे नेहमीच बोलत असतात त्यांनी तर षटकार ठोकला. संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र लिहून २० जून हा दिवस जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करावा, अशी मागणी केली. उबाठा गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही याची री ओढली. ( हा 'उत' आलेला माणूस वेळोवेळी उबाठा यांना आणि गटालाही अडचणीत आणतोय हे उबाठा यांना कधी कळणार? शिल्लक सेना पूर्णपणे संपेल बहुदा तेव्हा यांचे डोळे उघडतील)

'उत 'आलेले प्रवक्ते, खासदार आणि माननीय उबाठाजी अहो या गद्दारीचे जनक,मूळपुरुष तुमचेच बॉस आहेत याचा सोयिस्कर विसर पडला का? 

ज्या शिंदे यांना मिंधे मिंधे म्हणून शिव्या घालता त्या शिंदे यांच्या आधी मिंधेपण तुमच्याच साहेबांनी शरद पवार यांनी केले. एक वेळ मी अंगाला राख फासून हिमालयात जाईन पण पुन्हा कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार नाही, अशी गर्जना करणा-या तुमच्याच साहेबांनी तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. ते मिंधेपण नाही तर काय होते? 

सोनिया गांधींच्या विदेशीपणाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करणा-या तुमच्या याच साहेबांनी नंतर सत्तेसाठी सोनिया गांधी आणि काँग्रेस आय पक्षाशी सूत जुळवून केंद्रात मंत्रीपद भुषवले. महाराष्ट्रात सत्ता उपभोगली. ते मिंधेपण नाहीतर काय होते? 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे  छगन भुजबळ यांचा उल्लेख कायम 'लखोबा लोखंडे' असाच करत असत. तेव्हाच्या शिवसेनेसाठी छगन भुजबळ हे गद्दारच होते. आणि याच गद्दार छगन भुजबळ यांना (सुप्रियाताई तुमच्या पिताश्रींनी, 'उत' आलेले खासदारजी, महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्या बॉसनी)  अर्थात शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केले, उपमुख्यमंत्री केले. उद्धवराव याच गद्दार छगन भुजबळ यांच्याबरोबर तुम्हाला महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर काम केले. मांडीला मांडी लावून बसावे लागले होते. सुप्रियाताई, 'उत' आलेले खासदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ही तुम्ही विसरलात का? 

त्यामुळे तुम्ही सर्वजण आता काहीही बोललात, म्हणालात तरी गद्दारीचे खरे जनक शरद पवार हेच आहेत. 

शेखर जोशी

२० जून २०२३